Wednesday, September 5, 2007

बोरिस जोशी

अखेर शेवटी काल बोरिस जोशीच्या नावाआधी कै लागलं. ते लागणार हे गेले २ महिने दिसतच होतं. ह्ळू हळू ज्या पध्द्तीने त्याची तब्येत ढसळत होती ते पाह्ता हे घडणार हे सगळेजणच समजून होते. नाही तर त्या आधी सकाळ संध्याकाळ तो फ़िरायला जायचा. म्हणजे कोंणी ना कोणी त्याला घेऊनच जायचं त्यामुळे त्याचाही नाईलाज व्हायचा. नपेक्षा शक्य तो जागा न सोडावी हा त्याचा मानस असायचा. फ़िरायला जातानाही त्याची शान बघून घ्यावी. हा म्हणजे मागच्या जन्मी कोणी बडा सरकारी अधिकारी असल्यासारखा इकडे तिकडे ढुंकूनही बघणार नाही. आपण मारे" काय बोरुनाना, फ़िरायला चालला वाटतं " असं मोठ्या प्रेमानं विचारावं तर रावसाहेब दुसरीकडेच बघणार." मेल्या, आता घरातली माणसं बाहेर गेली की हाक मार, मग साम्गते तुला" असं चिडून म्हणावं की नाईलाजाने नजर टाकल्यासारखं करणार. पण एकंदरीत अविर्भाव उपकार केल्याचा.
बारा वर्षांपूर्वी एके दिवशी समोरच्या जोशांच्याकडे जेव्हा एक कापसाचं बंडल चार पायावर दुडदुडायला लागलं तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांनीच तिकडे धाव घेतली. विशेषत: शाळकरी निकेतने पळता पळता पुढे जाणार्‍या बाबांकडे जो कटाक्ष टाकला होता तो स्वच्छ वाचता येत होता, " आपण पाळू या म्हटलं तर नको म्हणतात आणि आता कशाला पळताहेत ?" त्या पिलाभोवती भोवती करताना सुरवातीला कितीदातरी शाळेची वेळ टळून जात असे. कारण निकेत , निनादला त्याला अगदी 'पोलिसी कुत्रा ' करायचं असायचं. त्यामुळे त्यांनी त्याच्या " शिक्षणाची "सगळी जबाबदारी शिरावर घेतलेली असायची.बोरुही फ़ेकलेला चेंडू आणणं जोरात पळणं या सगळ्या कसरतीत बालसुलभ उत्साहाने भाग घ्यायचा. कधी कधी तर मोहनने पळवत तळजाईवर नेलं तर चक्क पळत जायचा. [ अर्थात तळजाईवर जाईपर्यंत तो स्कूटरवर बसायचा हे उघडच आहे] कालांतराने बोरिसचं वेळापत्रक संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी शुभदावर आली आणि ती एक ओघाने येणारी गोष्ट झाली ते वेगळं. त्यामुळे त्याला शिस्त लावताना बोरिसने शुभदाचे किती फ़टके खाल्ले असतील ते बोरिसच जाणे ! पण त्या फ़टक्यांचा धाक अखेरपर्यंत होता. शेवटी शेवटी एक गावठी कुत्रं बोरिसच्या दारावरून चालालं होतं , चक्क मान वर करून. किंचित किलकिलं रहिलेल्या दारातून बोरिसनं ते बघितलं, " बूढा हुवा तो क्या हुवा, शेर कभी घास नहीं खाता " या अविर्भावत तो लंगडतच त्याच्यावर चाल करून गेला आणि ' आई ' मारणार म्हणून दारातच दबून उभा राहिला. अर्थात आजारी असल्यामुळे शिक्षा झाली नाही तो भाग वेगळा. आजी आणि दादांनी केवळ नातवंडांच्या प्रेमाखातरच त्या ' राक्षसा'ला घरात घ्यायला परवानगी दिलेली असल्यामुळे आणि बोरिस मोठा होता होता खरोखरच 'राक्षस ' दिसू लागल्यामुळे त्याला फ़िरवणे हा प्रकार त्या दोघाम्नाही शक्य नव्हता. त्यामुळे बोटीवरून सुटीला आला की मोहन, शाळा क्लास यातून वेळ मिळाला की नेहा, निनाद यांना बोरिस फ़िरवून आणायचा. इतर वेळी बोरिस आणि त्याची "आई." मग अशा वेळी मला जोर चढे, " बघा, आधी नाचतात पाळू या म्हणून आणि मग सगळी जबाबदारी पडते घरच्या बाईवर." बोरिस तसा शांत स्वभावाचा किंवा आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे की काय पण कुणाकडे फ़ारसं लक्ष द्यायचा नाही. त्याने नुसती मान वर करून भुंकणार्‍या कुत्र्याकडे बघितलं तरी त्या कुत्र्याची बोलती बंद होवून शेपूट पायात जात असे. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे राळ्यांचा सोनू. बोरिस फ़िरायला निघाला की सोनू भुंकून भुंकून तोंडाला फ़ेस आणत असे. पण बोरिस शांत. पण एकदा त्याच्याही अंगात दीवारमधला अमिताभ संचारला होता की काय न कळे, गळ्यातल्या पट्ट्यासकट राळ्यांच्या घरात शिरून त्याने सोनूला असा लोळवला की अखेरपर्यंत बोरीस दिसला की सोनू आज्ञाधारक दासाच्या भूमिकेत शिरायचा. योगायोग म्हणजे बोरिस जाण्याआधी एक दिवस सोनु ' गेला.'
बोरिस आमच्या दोन्ही घरात विभागला गेला होता. म्हणजे जोशी मंडळी बाहेर गेली की बोरीसचं पालकत्व आमच्याकडे असायचं. घर बंद झालं की अर्ध्या तासातच त्याच्या हाका सुरू होत. आपण जरा दुर्लक्ष केलं की बंद दाराला नखांनी खाजवून तो आपला निषेध व्यक्त करी.दार उघडलं की घराभोवती एक फ़ेरी मारली की त्याचं समाधान होई. मग परत तो आत जायला तयार ! कोणी पाहुणा आला आणि त्याला बाल्कनीत कोंडलं आणि फ़ाटक उघडून पाहुणे बाहेर पडलेले दिसले की हा दार ढकलत रहायचा आत घेण्यासाठी.लहान असताना किरकिर्‍या मुलासारखा बराच वेळ त्याचं भुंकणं चालायचं. मोठा झाल्यावर संध्याकाळच्या सिरियल्स लागल्या की याला ' नरडं ' साफ़ करायची हुक्की येत असे. त्यासाठी त्याने आम्हा सगळ्यांच्या शिव्या खाल्लेल्या होत्या. अपवाद मणजे निनाद आणि विलास. ही दोन माणसं त्याने काहीही केलं तरी यशोदेनं कान्ह्याच्या बाललीलांकडे बघावं तशी बघायची.
हळू हळू आजींच्या राक्षसाचं " बोरु " त कधी रुपांतर झालं ते त्यांनाही कळलं नाही. इतकं की दादू, बबी सारखं हे नातवंडही आजींकडून गुपचुप लाड करून घ्यायला लागलं.आणि आम्हाला तर कितीजणांनी "आपल्या शत्रूपक्षा"त टाकलं असणार.
वय झालं की माणसांसारखीच कुत्र्यांनाही दुखणी होतात हे नवच ज्ञान आम्हाला झालं. शेपटाला झालेली जखम इतकी प्राणघातक असेल असा संशयही येऊ नये इतक्या पटकन बोरुनानांची तब्येत ढासळत गेली. तसंही आपल्या हिशेबाने त्यांचं वय ७५ झालच होतं. आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको असं म्हटल्यासारखं त्याने आपला मुक्काम बेसमेंटमध्ये हलवला. अगदीच आठवण झाली की तो वर घरात जाई.पण अखेर अर्ध्या अंगातली शक्ती पूर्णपणे गेल्याने त्याला एक पायरीही चढवेना. आपली अखेर कळल्यासारखा तो शेवटच्या दिवसाची वाट पहात पडून राहू लागला.त्याच्या यातना न बघवून त्याला अखेर इच्छामरण दिलं .
आज तो मते फ़ार्ममधल्या जोशांच्या बागेत चिरविश्रांती घेतोय. या जगात कुठलीच गोष्ट विनाश पावत नाही; ती संपूर्णपणे नाहीशी होत नाही. त्याला पुरलेल्या ठिकाणी त्याची आठवण म्हणून लावलेलं झाड वर्षभरात वाढेल. त्याच्या पानांचं हिरवेपण , फ़ुलांचा सुगंध जीवनाचं गाणं गात राहतील. त्या झाडाच्या पारावर बसून गप्पा मारताना मध्येच बोरुची आठवण निघेल. त्याच्या खोड्यांना हसताना प्रत्येकाच्या मनात त्याच्या वेगवेगळ्या आठवणी जाग्या होतील, पण त्या सगळ्या आनंदगान गाणार्‍या असतील, नक्कीच !

Tuesday, August 21, 2007

उंच उभारलेले हात

कोल्हापुरच्या बालसंकुलाला भेट द्यायला जाताना मन द्विधा मनस्थितीत होतं. सिनेमात बघि्तलेले अनाथाश्रम, तिथल्या पायरीवर बाळ ठेऊन चेहरा पदरा आड लपवत जाणाया नायिका हे डोक्यात इतकं भिनलेलं होतं की इतकं वय झालं तरी एक मन त्यातून बाहेर पडायला तयार नव्हतं.दुसरं निबर झालेलं मन अगदी व्यावहारिक पातळीवर या सगळ्याचा विचार करत होतं.रिक्षातून उतरताना दिसली ती इमारत नेहमीच्या शाळेसारखीच वाटली. म्हणजे मधोमध थोडीशी मोकळी जागा, ध्वजारोहणाचा खांब, आणि भोवताली दगडी इमारती. आम्हाला पाहून स्टाफ़ची थोडी जलद हालचाल झाली . बंधूंनी त्यांची कामं आटोपली आणि इमारतीचा फ़ेरफ़टका मारायला आम्ही दोघी बहिणी त्यांच्यामागून निघालो. पहिलीच खोली तान्ह्या बाळांची होती. पाय क्षणभर थबकले. भाच्यांचे शब्द आठवले, " आत्या, फ़ार कसं तरी होतं ग, तिथे जाऊन. " पण आतून स्वागताला तिथल्या बाई दारात येऊन उभ्या होत्या. आत पाऊल टाकताच दिसले ते सगळ्या खोलीभर झुलणारे पाळणे आणि त्यात डोलणारं बालब्रह्म. कुणी मुठी चोखतय, कुणी डोळे मिटून स्वप्नरंजनात मग्न, तर कुणी कुशीवर वळून पोटाची सोय अलगद तोंडात पडते का ते शोधण्यात गुंग. काळ्यासावळ्या निरागसतेला एक सामाजिक बंधनाची करुण किनार झुलत होती पाळ्ण्याच्या लयीत.दुसरी खोली थोड्या मोठ्या मुलांची होती. आत पाऊल टाकताच डोळ्यासमोर आले ते छोटे छोटे हात. ब्रह्मांड आठवलं. पायात शिशाचे गोळे उतरले.दाही दिशा लोपल्या. डोळ्यासमोर फ़क्त चिमुकले हात, उंचावलेले. एकाला हाताशी धरावं तर दुसरा हाताशी झोंबतो, कुणा एकाने तर पायाला मिठीच मारली.त्याला उचलून कडेवर घेतलं तर त्याने गालावर पाप्या घेऊन गाल ओला करून टाकला. घशाशी येणारा हुंदका परतवत त्याला घट्ट छातीशी आवळत बसकण मारली.मागून पुढून सगळ्या बाजूंनी त्या छोट्या हातांनी मी वेढली गेले. मग कुणाला मांडीवर बसवून तर कुणाला शेजारी बसवून " आपडी थपडी" खेळले तर कुणाशी डोळे झाकून " बुवाआआअ भो: " केलं. निघायची वेळ झाली तरी गळामिठी सुटेना. पण मग त्यांच्या बाई बोलल्या, " चला, सोडा त्यांना, कामाला जायचय त्यांना. " लगेच हात सुटले. एका बाजूला सगळी बाळं गोळा झाली. " मी मग येते हां " असं म्हटल्यावर हात टा टा करायला हलले. क्षणापूर्वी चमकलेले डोळे परत निर्विकार झाले.खोलीच्या दारातून बाहेर पडताना दहा पंधरा मिनिटांचा तो वात्सल्याचा रंग पाठीला चटके देत होता. मोठ्यांच्या सामाजिक नीतिमत्तेच्या दबावाखाली भरडलं जात असलेलं बालपण , मूकपणे वाट पहात होतं मोकळा श्वास मिळण्याची.
घरी परताना एक गोष्ट जाणवली ती ही की, २ ३ वषांची मुलं बोलत नव्हती. आप्पाला विचारलं तर त्यानं साम्गितलेलं सत्य हे की, त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं. त्यामुळे दत्तक गेल्यानंतर बोलू लागणारी ती मुलं ऐकू शकत असली तरी बोलू शकत नव्हती.आपल्या घरात बाळाचं आगमन झाल्या दिवसापासून सगळेजण त्याच्याभोवती गोळा होऊन बडबड करत असतो. इथे एवढी मोठी मुलं कुणी बोलायला नाही म्हणून मुकी ?आपण आपल्या मनाशी समाजसेवेचे काही ठोकताळे बांधलेले आहेत असं मला वाटायला लागलं. त्या मुलांना खाऊ दिला, कपडे दिले, वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या की आपलं काम संपत नाही. या छोट्या मुलांना त्याची काय मातबरी ? त्यांचे डोळे आसुसलेले असतात मायेचं माणूस बघायला, कान लागलेले असतात छातीतल्या ठोक्याचं अंगाईगीत ऐकत झोपण्याकडे,हात शोधत असतात आधार. मला वाटतं , की हे सगळं या मुलांना दिलं पाहिजे, त्यांची मूळ गरज आहे ती मायेच्या उबेची. त्यांच्याशी बोलण्याची. त्यांना जवळ घेण्याची. आपल्या आठवड्यातला एक तास आपण त्यांना देऊ शकणार नाही का ? मात्र भावनेच्या भरात हो म्हणू नका. कारण कोणतीही गोष्ट करताना आपण चार वेळा जाऊन ती मग करणं बंद करणार असू तर ती न करणं चांगलं. कारण कुणालाही आशा लावून सोडून देणं हे अधिक निश्ठूरपणाचं आहे. विचार करा, आपले लहानपणाचे दिवस आठवा. क्षणभर आई दिसली नाही तर आपली होणारी हालत आठवा, कदाचित तुमची पावलं तुमच्या गावातल्या बालसंकुलाकडे वळतील, त्या उभारलेल्या हातांना अलगद मिठीत घेण्यासाठी.

draft

Wednesday, June 27, 2007

एक वर्तुळ पूर्ण झालं

श्रीरामपूरमध्ये मुलाच्या मित्राचं लग्न होतं आणि श्रीरामपूरपासून ८ कि. मी. वर हरिगाव आहे. आता पुण्याहून इतक्या लांब आल्यानंतर हरिगावला भेट देण्याची इच्छा होणं अगदी स्वाभाविक होतं. कारण हरिगाव आणि आमचं सगळ्यांचच, म्हणजे आम्ही, नवरदेवाकडची मण्डळी आणि जमलेल्यांपैकी बहुसंख्य व‍र्‍हाडी मंडळीच हरिगावशी आतडं जुळलेलं होतं. हरिगाव म्हणजे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरजवळचं बेलापूर शुगर कंपनी जिथे ६४ -६५ वर्षं दिमाखाने वसली, नांदली आणि १९ वर्षांपूर्वी जिला टाळं लागल्यानंतर जिथली माणसं आपापल्या संसारानिशी रानभैरी झाले ते गाव. अक्षत पडल्यानंतर हरिगावला जाण्याचा विचार बोलून दाखवताच सगळ्याम्नी कळवळून कळकळीचा सल्ला दिला, " कशाला जाताय ? नाही बघवणार तुम्हाला. उगं रडत परताल. आता काय उरलय तिथं ? सगळं उजाड झालय. नका जाऊ. "पण ते तर होणं नव्हतं. किंबहुना लग्नाला इतक्या लाम्ब येण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. गेली १९ वर्षं तिथल्या परिस्थितीबद्दल इतक्याजणांकडून इतकं ऐकलं होतं, की मन त्या सगळ्याला सामोरं जायची तयारी करून होतं.गाडी श्रीरामपूरहून हरिगावच्या रस्ताला लागली आणि आमचा रिप व्हऍन विंकल झाला. सतत हरिगाव - श्रीरामपूर ये जा करून ज्या रस्त्याचा कण न कण ओळखीचा आहे असं वाटत होतं, तो रस्ता वाढलेल्या वस्तीमुळे अनोळखी वाटायला लागला होता. नेवासा फ़ाट्याकडून गाडी हरिगावच्या रस्त्याला लागली आणि डाव्या बाजूला छोट्या मोठ्या घरांच्या समोरच्या बागा बघून मन उल्हासित झालं. वाकड्या लिंबाच्या वळणावरून पुढे गेल्यानंतर दुतर्फ़ा हिरवीगार झाडं खडी ताजीम देत होती.पूर्वी हा उघडा बोडका माळ होता. आता त्यावर ४, ५ मोर फ़िरताना दिसत होते. लोक उगीचच जुन्या आठवणीत रमतात आणि नव्याचा स्वीकार करत नाहीत असेही विचार मनात यायला लागले आणि ध्यानीमनी नसताना कोणीतरी फ़ाडकन कानसुलात द्यावी तसं झालं. " पाच खोल्या" या नावाने ओळखली जाणारी चाळ बॉम्ब स्फ़ोटात उध्वस्त व्हावी तशी फ़क्त भिंतींच्या रुपात उभी होती. दारं, खिडक्या, छप्पर काही काही शिल्लक उरलं नव्हतं. तिथे राहणारी एक एक माणसं आठवायला लागली. खरच होतं लोक म्हणत होते ते. उरी बाळगलेल्या जखमा नख लावून उसवायची काय गरज होती, असा विचार मनात येईतो गाडी हरळी गे्टमधून कॉलनीत शिरली. हरळी गेटवरचं कारंजं केव्हाच नामशेष झालं होतं.१९ वर्षांच्या धुळीखाली हरळ गाडली गेली होती. इथेच आम्ही मैत्रीणी, आमच्या सासवा, मुलं संध्याकाळचा वेळ घालवत होतो. सुख दु:खाच्या गोष्टी बोलत होतो.
गाडी आम्ही रहात असलेल्या बंगल्यासमोर आली.फ़ाटक उघडून आत जाण्याचा प्रष्नच नव्हता.कारण फ़ाटक जाग्यावर नव्हतं, कंपाऊंडच्या तारा नव्हत्या. पण हे आम्ही ऐकूनच होतो, की हरिगावात राहिलेल्या लोकांनी जळणासाठी बंगल्यांची फ़ाटकं , खिडक्या उचकटून नेल्या, तारा भंगारात विकल्या.त्यासाठी त्यांना तरी कोणत्या तोंडाने दोष देणार ? भुकेपुढे प्रतिसृष्टी निर्माण करणार्‍या विश्वामित्राचा पाड लागला नाही तर सर्वस्व गमावून भांबावलेल्या कामगारांचा काय दोष ? हे एक वेळ समजून घेतलं तरी दारातली आंब्याची, चिकू , जांभळाची झाडंही दिसेनात. ज्या आंब्याखाली मुलं लहानाची मोठी झाली, ज्याची सुमधुर फ़ळं सगळ्या हरिगावाने खाल्ली ते आंब्याचं झाड समूळ नाहिसं झालं होतं.पुढेपासून मागेपर्यंत पारध्याने एक एक पाखरू नेम धेरून टिपावं तशी झाडं नाहिशी झाली होती. आंबा, रामफ़ळ सीताफ़ळ, चिकू, माड, आवळा सगळे सगळे नाहिसे झाले होते. उरला होता एक जमिनीचा मोकळा तुकडा.बोरी चिंच, काटेरी झुडपं यांनी गुंतलेला आणि मध्ये धुळीची पुटं चढलेला बंगला, आमचं घर., आणि किलकिल्या दारांना डोळी लावून आत डोकावून पाहणारे आम्ही. न रहावून लेकीने खिडकीत तोंड खुपसून हाक मारली, " आजोबा, आजोबा ".तिच्या वेडेपणाला आम्ही मोठी माणसं हसलो, पण आतून सगळेजणच आपल्या गजबजलेल्या भूतकाळाला साद घालत होतो, मनातल्या मनात.त्या क्षणी एखादी दैवी शक्ती आम्हाला मिळाली असती तर आमच्यापैकी प्रत्येकाने कालचक्र २० वर्षंमागे नेलं असतं.हरिगावातल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही फ़िरलो,. काही ठिकाणी कामगारवस्तीत जाग होती तर काही ठिकाणी पडझड झाली होती.नियोजनशून्य , बेपर्वा निष्ठूर राजकारणात बळी गेलेल्या आमच्या निसर्गरम्य साध्यासुध्या जीवनाचं कलेवर पाठीवर घेऊनच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.कोणाचं कुठे कसं आणि काय चुकलं याचे मनाशी हिशेब करत.निष्फ़ळ हिशेब.
हा सगळा प्रसंग मी माझ्या अमेरिकेतल्या लेकाला सांगत होते. कधी आवाज भरून येत होता, तर कधी स्वरात हताश कोरडेपणा होता. तोही बारीकसारीक तपशील विचारत होता. अचानक त्याने प्रष्न विचारला, " आई, तुम्ही हरिगावात किती वाजता होता ? "
" साधारण दुपारी ३- ४ च्या सुमाराला. का रे ? "
" आई, अग, त्याच वेळी मला स्वप्न पडलं की मी आणि बाबा आपल्या शेजारच्या घरात हरिगावला उभे आहोत. मला जाग आली तेव्हा इकडे पहाटेचे ४ वाजले होते."
म्हणजे आम्ही ज्यावेळी हरिगावात होतो तेव्हा हजारो मैलांवरून मनाने तोही आमच्याबरोबर होता. अखेर कुठेही गेलो, तरी आपली मुळं जिथे घट्ट रोवलेली असतात, ती माती आपल्याला साद घालतेच.
draft

Wednesday, May 30, 2007

हरिगावातले सण

मी लग्न होवून हरेगावला आले तेव्हा कारखान्याचा सरता काळ सुरू झाला होता आणि आपल्या हातातून वाळू सरकून जातेय हे फ़ार थोड्यांच्या लक्षात येत होतं. वरवर सगळं पूर्वीसारखंच चालू होतं. संध्याकाळी वाड्यांवरून डल्लॉप गाड्या जिमखान्यात येत, खेळणार्‍यांच्या आरोळ्या उठत, पण प्रमाण कमी होत होतं.पूर्वी जशी खेळायला टे. टे. चं टेबल मिळण्यासाठी किंवा बॅडमिंटनसाठी कोर्ट मिळण्यासाठी भांडणं होत, तसा काही प्रकार उरला नव्हता. पण तरीही हरेगावी दिवस म्हणजे झाडाच्या शेंड्यावरचे पोपटच भासत होते. तसेच उत्फ़ुल्ल. मग भले ते जग केवळ अधिकारीवर्गाचं का असेना.

जिमखान्यात चैत्राचं महिला मंडळाचे हळदीकुंकू, कांदेनवमी असे कार्यक्रम उत्साहाने साजरे होत होते. शे-सव्वाशे बायका आणि त्यांची मुलं जमून नुसती धम्माल करत.. पण सगळ्यात उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशचतुर्थी, दसरा आणि संक्रांत. त्या दिवसात म्हणजे आमच्या घरी जत्रा उसळत असे. माझे सासरे हे कारखाना सुरु झाल्यापासूनच तिथं कामाला होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणार्‍यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणपती सार्वजनिक असला तरी आमच्याकडे घरात लगबग आणि राबता चालूच राही. गणपतीच्या पूजेसाठी रोज सकाळी घरातून तबक जात असे. त्यात ठेवण्यासाठी सासूबाई सुरेख हार करत. कधी जाईचे, कधी जुईचे, कधी दुर्वांचे... अनंत चतुर्दशीला सगळ्या गावाला घरचा पंचखाद्याचा प्रसाद असे. त्यादिवशी गणपतीची मिरवणूक फ़र्लांगभर अंतरावर आलली की सास~यांची गडबड सुरू होई, ' बाई, (ते सासूबाईंना बाई म्हणत, आणि त्यांच्याशी कोकणीत बोलत) सगळां ठेवलसस मा ? प्रसाद ठेवलस ना भरपूर, गुरुजी येतीत आत्ता. काशीनाथ, चल लवकर दारात उभा रहा लवकर.' नुसता गोंधळ उडवून देत.

दसरा आणि संक्रांतीला तर ते आणि सासूबाई संध्याकाळी ५ वाजताच सगळं आटपून बसत . पध्दत अशी की दसर्‍याला लहानांनी सोनं लुटायचं आणि संक्रांतीला मोठ्यांनी तिळगूळ द्यायचा. मग बेलापूर गावातून ४, ५ किलो रेवड्या आणि किलो दोन किलो तिळगूळ आणला जायचा. रेवड्या भाऊंनी द्यायच्या आणि तिळगूळ सासूबाईंनी. पहिले भाऊंच्या खात्यातले हमाल यायचे ५ वाजता. मग जी रांग सुरू व्हायची ती रात्री १० वाजेपर्यंत. साधारण ७च्या सुमाराला म्हणजे फ़ुल्ल मारामारीच. फ़ाटकाकडे वाल्हा उभा असायचा. कारण वात्रट मुलं एकमेकांचे शर्ट घालून २,२ ३,३ वेळा रेवड्या न्यायला यायची. मग वाल्हाचा आरडाओरडा " ईईए ए, आल्ता न तू मघा, उजुक का आला रे ****." की आतून कोणीतरी वाल्हाला आठवण करून देत असे की आज ' ति्ळगूळ घ्या गोड बोला "चा सण आहे. मग थोडा वेळ शांतता असे. काही हमाल बायकांना, नव्या सुनेला घेऊन येत. मग त्या आत माजघरात येऊन बसत... नव्या नवरीला नाव घेण्याचा आग्रह होई. काही बायका अगदी आगगाडीसारखी लांबलचक नाव घेत. साधारण ९ पर्यंत हा कल्ला असे आणि मग अधिकारीवर्गाची दुसरी फ़ळी येत असे. त्यांच्यासाठी तिळाचे लाडू घरी केलेले असत. त्यापुढे जेवण आणि जेवतानाही कोण आलं कोण नाही याची चर्चा चालू असे. दसर्‍यालाही याच नाटकाचा प्रयोग असे, पण फ़रक एवढाच की घरात ढीगभर आपट्याची पानं जमा होत आणि दुसर्‍या दिवशी काशीनाथला आपट्याची पानं झाडावी लागत.

Friday, May 25, 2007

सीझन

साधारणपणे दसर्‍याच्या सुमाराला कारखान्याचा बॉयलर पेटवला जात असेआणि त्या दिवशी पूजा अर्चा करून समारंभाने गव्हाणीत ऊस टाकला जात असे. कारखान्याचा सीझन चांगला चालण्यावर सगळ्यांचं पोट अवलंबून असल्याने सगळा अधिकारीवर्ग सपत्निक हजर असे. आपल्याच घरातल्या समारंभाचा उत्साह सगळ्यांच्या देहबोलीतून ओसंडत असे. आता जाणवतं ते हे की या अशा समारंभाला कामगारवर्गाच्या बायका मात्र उपस्थित नसत. खर तर त्यांचं पोट तर जास्त प्रमाणात कारखान्यावर अवलम्बून होतं. पण काही काही गोष्टी आपण ' तशी पध्दत नाही ' म्हणून दुर्लक्ष करतो त्यातली ही एक . आमचे गुरुजीही मस्तच होते. कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून इतर देवतांना आवाहन करतानाच ते " शुगरदेवताय नम: " म्हणून मोकळे होत.कारखान्याचा सीझन चालू झाला की सगळं वातावरणच बदलून जाई. पहाट दुपार, रात्र अशा पाळ्यात पुरषांचं आयुष्य आणि देवा ब्राह्मणासमक्ष हाताला हात लावून 'मम ' म्हटलेलं असल्यामुळे त्यांचे डबे करण्यात आणि त्यांची झोपमोड होवू नये म्हणून मुलांचं ध्वनिप्रदुषण रोखण्यात बायकांचं आयुष्य गुंतून जाई. पोरांची अवस्था म्हणजे " ह्यो कोन बाबा आपल्या घरात रोज येतो ग आई, ' अशी होवून जाई. कारण बाबा घरी तेव्हा पोरं शाळेत आणि पोरं घरी तेव्हा बाबा एक तर झोपलेला किंवा कारखान्यात.
सीझन सुरू झाला की कारखान्याचा परिसर एकदम गजबजून जाई. कारखान्यासाठी लागणारा ऊस घेवून येणार्‍या डल्लॉप गाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण [ बैलगाडीला डनलॉप टायर्स लावले की डल्लाप गाडी होते.] ऊस लेबर वाहून नेणार्‍या ट्रक्सचा फ़रफ़राट, वातावरणात भरून राही. साखरेची पोती, बगॅसचे गठ्ठे वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या वॅगन्स छोट्या रुळांवरून थेट श्रीरामपूरहून कारखान्याच्या दारात उभ्या रहात. रस्त्यांच्या कडाम्ना ऊस तोडणी कामगारांच्या त्रिकोणी आकाराच्या तट्ट्याच्या झोपड्या उभ्या रहात. अगदी पहाटे किंवा सांजला त्यांच्या चुलीतला जाळ ढणढणत राही, भाकरी आणि कोरड्यास करायला. संध्याकाळ कधी कधी दारू प्यालेल्या बाप्यांच्या गुरगुराटात आणि मार खाणार्‍या बायांच्या कलकलाटात मिसळून जाई. सगळीकडे रसाचा गोड वास आणि नवीन माणसाचं डोकं उठवणारा मळीचा दर्प दरवळत राही. पुरुषांच्या बोलण्यात क्रशिंग, रिकव्हरी असे शब्द वारंवार येऊ लागत.
कारखान्याचा सीझन सुरू झाला की घरातली बायका मुलं खूष असत.कारण आपली आणि आजूबाजूच्या शेजीबाईंचे मुलं घेऊन कारखाना बघायला जाणं हा एक मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झालेला असे. मग मुलांनी आतली अजस्त्र मशिन्स भयचकीत चेह्र्‍याने न्याहाळण , पोटभर रस पिणं गरम गरम साखरेचा बोकणा भरून खिदळणं हे सगळं सगळं बरेच दिवस चर्चा करायला पुरत असे. आमच लग्न ठरल्यानंतर पुण्यात आम्ही भेटल्यानंतर माझे पाय रसवंतीगृहाकडे वळत असत.कारण कोल्हापूरला असली न्हाई ती झेण्गटं नव्हती, कारन" रस कुट असा पितात व्हय ? सरळ रसाचा तांब्याच एका दमात रिकामा करायचा असतोय की राव, " ही कोल्हापुरची विचारधारा तेव्हा होती. पण मी कितीही लाडिकपणे " आपण रस पिवू या ? " असं विचारलं तरी " तू घे ना मी सोबत करतो " असं उत्तर यायचं मग मीही मनातल्या मनात " अरसिक किती हा मेला " असं म्हणत उघड " नको राहू दे तुला नको तर आपण दुसरं काही तरी घेऊ" असं म्हणत असे. पण पहिला सीझन सुरू झाल्यानम्तर नवर्‍याच्या नकाराचं कारण लक्षात आलं. सहा महिने रसाच्या वासात डुंबत राहिल्यानंतर तो तरी बापडा परत रस कसा पिणार ?
पण हळू हळू ३,४ महिन्यांनंतर याचाही थकवा यायचा. मुलांच्या वार्षिक परिक्षा झालेल्या असायच्या आणि मीही कारखान्याचा सीझन कधी सम्पतो आनि आपण मुलाम्च्या मामाच्या गावाला कधी निघतो याची वात बघायला लागायची, मुलांच्या बरोबरीने !
draft

Sunday, May 20, 2007

शब्द

पारिजातकाचा सडा,
कधी पाणोठ्याचा जलघडा,
तोरड्यांची रुमझुम,
कधी कंकणांची किणकिण,
पहाटेचा पक्षीरव,
कधी सायसाखरेची कव !
करी प्रतोदाचा वार,
प्रत्यंचेचा टणत्कार,
दर्पाचा बुभुत्कार,
कधी विखारी फ़ुत्कार !
शब्द जहरीला डंख ,
कधी तेजाळला पंख !
रती मदनाचा संग,
कधी अनंग नि:संग !
शब्दा शब्दानेच बने मना मनाचा साकव
शब्द जोडे अन तोडे नीट ध्यानामधी ठेव !

Saturday, May 19, 2007

पियाका घर --हरेगाव

हरेगाव ! बेलापूर हा महाराष्ट्रातला पहिला खाजगी साखर कारखाना. तेथील अधिकार्‍यांसाठी व कामगारांसाठी बांधलेली वसाहत म्हणजे हरेगाव. ए, बी, सी, डी अशा टाइपच्या घरात विभागलेली. एक वाडी, दोन वाडी, पाच वाडी, आठ वाडी अशा वाड्यांनी वेढलेली. जगप्रसिध्द आर्किटेक्ट बोधे यांच्या आखीव रेखीव बांधकामात बंदिस्त झालेली.अस समजलं की वारणानगरचे तात्यासाहेब कोरे आपल्या कारखान्याच्या वसाहतीचं बांधकाम सुरु करण्यापूर्वी इथली वसाहत बघून गेले होते. ए टाइपचे बंगले ४ बेडरूम्सचे होते, बी टाइपचे २ बेडरूमचे तर सी टाइपचे १ बेडरूमचे होते. एक नंबर बंगला व डायरेक्टर्स बंगलो हे एक वेगळच प्रकरण होतं. आधीच अमचं दिशाज्ञान दिव्य, त्यात ते गर्द झाडीत लपलेले बंगले ओळखणं म्हणजे घरच्यांना एक गमतीचा विषय झाला होता.कोल्हापूरचं घर म्हणजे पायर्‍या संपल्या की रस्ता या प्रकारचं असल्यामुळे मागे पुढे लाम्बरुंद बागा ही माझ्या दृष्टीने एक अद्घुतरम्य गोष्टच होती.इथलं सगळं आयुष्य कारखान्याच्या भोंग्याला बाण्धलेलं होतं. सकाळी साडेसात्तच्या भोंग्याला माझे सासरे घराबाहेर पडत . १,२ मिनिटांच्या अंतराने त्यांच्या वेळचे सगळे सिनियर्स निघत. ८ च्या सुमाराला दुसरी फ़ळी , म्हणजे माझ्या नव‍याच्या वयोगटाचे लोक, निघत. त्यातही काहीजण त्या ढेंगभर अंतरासाठी सायकलचा वापर करत. १२ वाजता परत येताना मात्र सगळे एकदम बाहेर . परत २ च्या भोंग्याला हाच प्रकार. मोठ्यांची वाट लहानांनी अनुसरावी. मात्र साडेपाचच्या भोंग्याला ' पळा पळा कोण पुढे पळे तो'.एकम्दरीत एक संथ साध आयुष्य म्हणजे हरेगाव. कारखान्यात जायच्या यायच्या वेळी जी काही मनुष्यजातीच्या अस्तित्वाची जाणीव होई तेवढीच. एरवी सारे कसे शांत शांत !आता आठवलं की हसू येतं, पण शहरात वेगवेगळ्या उद्योगात सतत मग्न असलेल्या मला त्या शांत वातावरणात रुळायला फ़ारसा त्रास कसा झाला नाही ? की स्त्रीला कोणत्याही परिस्थितीशी पटकन जुळवून घ्यायचं नैसर्गिक वरदान असतं ? की तिच्या मनावर तसं बिंबवलेलं असतं ? कोण जाणे, पण एकंदरीत नववधु ची भूमिका मी मनापासून एन्जॉय करत होते खरी.म्हणजे असं की आम्ही दोघे सम्ध्याकाळी फ़िरायला बाहेर पडलो की आजूबाजूच्या मुली ' वहिनीला' बघायला गर्दी करत. त्यातली एकजण एकदा ' मेड फ़ॉर इच अदर ' म्हणून हसली. एरवी मी 'थॅंक्यु ' म्हणून आणखीही पी जे. टाकला असता पण नव्या नवरीने अधोमुख, मितभाषी असाव हे पार कण्वापासून बजावल गेलेल असल्यामुळे मी आपली शाम्तच राहिले. पण पुढे ओळख झाल्यावर या माझ्या ' नणदा ' मला चिडवायच्या, " वहिनी, आम्हाला वाटलं हो्तं तुम्ही अगदी गरीब आहात , पण तुम्ही म्हनजे लई भारी आहात हं " काय करणार स्वभावाला औषध नाही. आणखी एक म्हणजे हरिगावात सगळे मोठे लोक काका, काकी आणि त्यापेक्षा लहान दादा वहिनी असत. त्यामुळे एका मोठ्ठ्या कुटुंबाचच वातावरण तिथे होतं. आणि त्याची सुरवात दुसर्‍या दिवसापासूनच झाली.
दुसर्‍या दिवशी आम्हा सासू, सुनेचे नवरे कामावर गेल्यानंतर दर ५ मिनिटाम्नी दारावरची बेल वाजत होती. नवी नवरी असल्यामुळे डोअरकीपिंगशिवाय मला दुसरं काहीच काम नव्हतं,. येणारी व्यक्ती ' बाई आहेत ? ' असं अगदी अदबीनं विचारायची. मग मी सासूबाईंना बोलावलं की् ती व्यक्ती त्यांच्याशी कुजबुजत काही तरी बोलायची. मग त्या हसत माझ्याकडे वळून म्हणायच्या, ' अरे, मग तूच दे ना लहान्या बाईंना. ' मी बुचकळ्यात की या लहान्या बाई कोण . तोपर्यंत त्या व्यक्तीने माझे पाय घट्ट पकडलेले असायचे आणि ' 'अहो असं काय, ' असं म्हणेपर्यंत पायावर डोकं टेकलेलं असायचं. झटकन उठून स्टीलची वाटी, ताटली, पेला असं काहीतरी माझ्या हातात कोंबून लाजून उभी असायची. सासूबाई डोळ्यांनी खुणावायच्या, 'असू दे.' ' मला फ़ार ओशाळल्यागत व्हायचं. पण जस जशी तिथे रुळत गेले तस तसं कळत गेलं की ही माणसं यायची ते केवळ रेडकर साहेबाची सून बघायला. कारण रेडकर साहेबाने त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती. प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. आपल्या घरातल्याच पोराचं लगीन होवून नवी नवरी घरी आली आहे आणि आपण तिचं स्वागत करायचं आहे हीच एक आपुलकीची भावना त्यामागे असायची. खर साम्गायचं तर हरेगावातले पहिले १५ दिवस आम्ही दोघे घरी जेवलोच नाही. अगदी मॅनेजरपासून सामान्य कामगारापर्यंत सगळ्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो. आणि त्या बायांचं ते अलबला करणं, पुरुषांचं अदबीनं बोलणं हे सगळं मला एखाद्या जुन्या मराठी सिनेमाचाच भाग असल्याप्रमाणे वाटायला लागलं होतं.
ही कारखान्याची वसाहत असल्यामुळे सगळं आयुष्यच भोंग्याच्या वेळांशी बांधलेलं असे. जेव्हा 'सीझन ' चालू नसे, तेव्हा आयुष्य अगदी संथ असे. सकाळी ब्रेकफ़ास्ट घेऊन कारखान्यात जावं, जेवायला १२ वाजता घरी यावं. वामकुक्षी करून २ वाजता परत जावं ते साडेपाच वाजता चहा खाणं करायला परत घरी. सहा, साडेसहाला फ़िरायला किंवा जिमखान्यात खेळायला बाहेर पडावं आणि आठ, साडेआठला परत घरी. बायका महिलामंडळ, भजनीमंडळ यात जीव रमवत, अधिका‍यांच्या बायका ब्रिज , टेबलटेनिस खेळायला जिमखान्यात जमत. सगळा माहोल अगदी एखाद्या समारंभासारखा असे. मुलांना संभाळायला खात्याचे कामगार असत. तेच घरी स्वयंपाकही करत. निदान स्वयंपाकात मदत करत. रात्री १० वाजता जिमखाना बंद होई आणि सगळ्या बंगल्यांवर झाडांची गर्द छाया पसरून राही, निस्तब्ध!
सीझन चालू झाला की वातावरण एकदम बदले,---
draft

Wednesday, May 9, 2007

नैहर छुटोही जाय

हरिगांव हे दोन अडिचशे उंबर्‍यांचं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आहे याची १९७३ सालापर्यंत मला खरच कल्पना नव्हती.पण माझे तीळ तांदूळ या गावचे आहेत हे माझ्या निकटवर्तीयांना समजलं, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, " बघ ग बाई, नगर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष, डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पाणी आणायला भटकावं लागेल हां. " अशी होती. पण ' सावरे अयजय्यो ' च्या त्या काळात डोक्यावरचा हंडा उतरायला साजण असणार ही कल्पनाच मनाला गुदगुल्या करत होती.कोल्हापूरसारख्या हिरव्यागार गावातून टळटळीत उन्हात प्रवास करून श्रीरामपूरच्या रखरखीत बस स्थानकावर मी पोचले तेव्हा दुपार ढळत होती. अजून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या साखरकारखान्याच्या वसाहतीत आम्हाला जायच होतं. कारखान्याची जीप काही कामासाठी श्रीरामपुरात आली होती, तीच आम्हाला मुक्कामी घेऊन जाणार होती. इथल्या बस स्थानकावर आल्यावर मला समजलं की ज्या हरिगावचा मुरलीरव मला इथवर खेचून घेऊन आला होता, ते ' हरि'गाव नसून 'हरे'गाव आहे. त्यामुळे प्रवासाचा चिकटा अंगावर आणि कुठे येऊन पडलो ही ठुसठुस मनात घेऊन ' हरे राम ' म्हणत हरेगावला जाणार्‍या जीपमध्ये बसण्याखेरीज गत्यंतर नव्हतं.
श्रीरामपूर संपता संपता रस्त्यावरचा प्रकाश विरळ होवू लागला. वाटेवर अंधुक अम्धुकसे दिवे मिणमिणायला लागले.गाडी हरेगावकडे जाणार्‍या रस्त्यावरून दणदणायला लागलीआणि बघता बघता मिट्ट अंधार झाला. त्या निर्मनुष्य रस्त्यावरच्या अंधाराचं मनावर दडपण यायला लागलं. नवर्‍याचा उल्हासलेला आवाज कानाशी गुणगुणत होता, " हा वाकडा लिंब, इथे मोठा दरोडा पडला होता. ही तीन वाडी, हा ब्राह्मणगाव फ़ाटा, हे स्टाफ़ क्वार्टर, हे हरळीगेट आणि हे----'असं म्हणत कोपर कुशीत घुसल आणि आवाजातल ' डाबर हनी ' वाढलं तेव्हा लक्षात आलं की आपलं घर आ-----ल. नपेक्षा मिट्ट अम्धारात, जीपच्या दिव्याच्या झोतात, वाकड्या लिंबापासून हरळीगे्टपर्यंत सगळीच ठिकाणं माझ्या दृष्टीने सारखीच ' प्रेक्षणीय' होती. जीपमधून उतरता उतरता व्हरांड्यातल्या स्वच्छ प्रकाशात मला दिसली ती पिवळ्या भिंतीवरची हिरवीगार मनीप्लांट आणि जाणवला प्रवास करून थकलेल्या मनाला तजेला देणारा मोगर्‍याचा सुगंध. आता हेच ' आपलं ' घर ही खूण मनावर एक गंधित मोहोर उमटवून गेली.
सकाळ झाली आणि अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना दिसला मागील दारी सळसळणारा पिंपळ. ताडकन उठून खिडकीतून डोकावले तर चिंच, पिंपळ, उंबर एकाच खोडातून आकाशाकडे झेपावलेले. असच झाड रेडकरांच्या मूळगावी, रेडीला, आहे हे समजल्यावर आपल्या सासरचे कोणी आदि पुरुष छत्र धरून आहेत की काय अशी भावना जागी झाली. पुढच्या दारी आंबा, जाम्भूळ, यांची सावली. ट्विन बंगल्यांची सीमारेषा ठरवणार्‍या तारेला लागून मोगर्‍याची रांग.बागेत गुलाब , जाई, जुई, कुंद, चमेली , अबोली यांचा बहर.रामफ़ळ , सीताफ़ळ, आवळा, नारळ, विलायती चिंच . ही सगळी रेलचेल क्षणा क्षणाला डोळे विस्फ़ारायला लावत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही उंच वृक्ष सावली धरून हवेतला उकाडा कमी करण्याचा प्रयत्न करत होते. सम्पूर्ण कॉलनीतल्या लांबरुंद बागा आणि आखीव रेखीवपणा बघून आपण "कुठे" येऊन पडलो ही खंत केव्हाच पुसली गेली. कारखान्याच्या या 'बी' टाइपच्या बंगल्यात मी ७३ मध्ये रहायला आले आणि आयुष्याची १७ वर्षं, कारखाना बम्द पडल्यावर पोटासाठी गाव सोडेपर्यंत, तिथेच राहिले.
draft

Sunday, April 29, 2007

काही क्षण ... दिवेआगरचे


पोरांचं आपलं बर असतं. आदल्या रात्री ठरवतात, चला, उद्या अलाण्या फ़लाण्या ठिकाणी जावून भटकून येऊ या. मग सकाळी उठून ब्रेकफ़ास्ट घेताना [ तोही सावकाश उठून ] घोषणा, "पटकन आटपा, आपल्याला अलाण्या फ़लाण्या ठिकाणी फ़िरायला जायचं आहे. दोन तासात निघू. जमलं तर हॉल्ट करू, नाही तर रात्री उशीरा परतू. " अरे पण मेल्या, पोळ्याची बाई, कामवाली येणार उशिरा, तिला निरोप द्यायला नको ? शिवाय बाबांची पूजा आणि देवाचं वाचायलाच तासभर लागेल. कसं आटपणार ? पण या असल्या चिल्लर प्रश्नांची उत्तरं त्याने आधीच तयार ठरवलेली असतात. आम्ही कितीही आरडाओरडा केला, तरी आमचं सामान आणि ब्लडप्रेशर सावरत तो स्टिअरिंग पकडून कुठल्या गाण्याची सी डी लावायची ते बायकोबरोबर ठरवत मिष्किल हसत बसलेला असतो.
या पार्श्वभूमीवर आमची दिवेआगरची ट्रिप अगदी वेगळीच होती.आज जावू या की उद्या जाणं सोईचं होईल हे ठरवण्यातच दोन महिने गेले. मग हाच दिवस प्रयाणाला योग्य आहे अशी आमची खात्री पटली आणि आम्ही निघालो.गाडी धावत होती आणि प्रथमच जाणीव झाली की काही तरी चुकतय. काय ते समजत नाही, पण कुछतरी गडबड छे.हां, गाण्याचा ठेका चुकतोय आणि मान पुढे मागे लचकत हलण्याऐवजी आडवी डोलतेय समेवर !म्हणजे " क्रेझी किया रे " ऐवजी चक्क भजनी ठेका.... इंद्रायणी काठी. असं होणं सहाजिकच होतं कारण गाडीतली चारी डोकी ज्येष्ठ नागरिक. मी , माझा चक्रधर नवरा, त्याची बहीण आणि तिचा नवरा. गाडी जसजशी गाव सोडून घाटाच्या दिशेने पळायला लागली, तसं गाडीतला डेकही बंद झाला आणि स्रुरू झाली रंगांची उधळण करणार्‍या निसर्गाची संगत आणि त्याच्याच संगीताची साथ.
ताम्हिणी घाटात गेल्यानंतर एका वळणावर खोल दरी आहे. चारी बाजूनी उतरत उतरत डोंगराचं पाणी मधल्या खळग्यात मुरून पाचू फ़ुलवत होतं. पावसाळ्यात खळाळणारे प्रवाह फ़ेनफ़ुलं उधळत असतीलही, पण जानेवारीत मात्र तो उतार जरा रक्तदाब वाढवणाराच वाटला. अर्थात कुणाच्या रक्तदाबाच्या, कुणाच्या मधुमेहाच्या गोळ्या घ्यायच्या असल्याने ब्रेकफ़ास्ट करणं गरजेचं होतं.अल्युमिनियम फ़ॉइलमध्ये गुंडाळलेली प्रत्येकाच्या वाटणीची सॅंडविचेस एका हातात आणि थर्मासमधल्या कॉफ़ीचा वाफ़ाळता मग दुसर्‍या हातात घेऊन प्रत्येकाने आपापल्या सोईची जागा पकडली आणि भोवतालच्या हिरवाईत जो तो गुंगून गेला, एक मूक संवाद साधत !पुढच्या प्रवासात कुठे रक्तवर्ण कुंकुमासारखा पलाश भेटत राहिला तर कुठे गुलाबीसर फ़ुलांच्या डहाळ्या लगटत राहिल्या. साथीला कधी कधी लता, कधी आशा तर कधी किशोर तर कधी तलत.
दिवेआगरच्या बापटांच्या अंगणात हातपाय धुवून खुर्चीत विसावतोय न विसावतोय तोच, " कवा आलासा ? काय च्या पानी घेनार का जेवनार एकदम ? " असं विचारायला आल्यागत जोरदार को कोच को ऐकू आल आणि त्याच्यामागून मान लगालगा करत मातीतले दाणे , किडे शोधत ३ -४ कोंबड्या आणि त्यांची पिलावळ. माहेरच्या गावाला घेऊन जाणारं ते कुटुंब बघून दिवेआगर मला एकदम आपलसच वाटल. मस्तपैकी शेणाने सारवलेली जमीन बघूनही खुर्चीवर बसणं हा करंटेपणाच होता. त्यामुळे आखडलेल्या पायांना जमिनीवर पसरून भिंतीला टेकून समोरच्या कोंबड्या आणि पिले बघण्यात दंग झाले. मान किती म्हणजे किती चटा चटा हलवावी त्या बायांनी की मलाच माझ्या स्पॉंडिलिसिसची आठवण व्हावी. कोंबडेबुवा मात्र कंपाऊंडच्या भिंतीवरून मान तोर्‍यात उडवत ' कुटुंबावर" नजर ठेवून होते. रस्त्यात माणूस नाही की काणूस नाही. निरव शाम्तता. बापटांच्याकडच्या जेवणाने तृप्त होवून बाकीची मंडळी वामकुक्षी घेत असताना मी माझी खुर्ची पोफ़ळीच्या झाडाखाली हलवली. झाडांखालची जमीन ओलसर होती. आदल्या दिवशी पाणी दिलेलं असावं बहुतेक .टपकन एक पोफ़ळ खाली पडलं. उचललं आणि दर्शनाने[ केअर टेकर बाईचं इतक सुंदर नाव मी प्रथमच ऐकलं.] ठेवलेल्या टोपलीत टाकलं.आणखी दोनचार झाडांच्या बुंध्यांशी लुडबुड केल्यावर आणखी काही पोफ़ळी सापडल्या. दर्शना, अग, गेली कुठे ही असं म्हणत पुढे चालले तर शेजारच्या घराच्या परसदारी दिसली. ' काय करतेस ग ' म्हटलं तर म्हणे, ' पोफ़ळी चिरून वाळायला टाकतो ' बघू तरी कशी चिरतात ते म्हणून बसले तर मुलाणेके मामू का कोंबडं कापायचा सुरा असतो तसं पातं असलेली विळी. आता मागे सरायचं नाही असं ठरवून हात घातला. ' आजी नको हां, हात कापात.' आजीने दोन तीन पोफ़ळं चिरली आणि माघार घेतली. बाकीच्या मुली खसा खसा चिरत होत्या. अशी सालं काढलेली पोफ़ळं २ -३ महिनी ऊन खात पडतील तेव्हा कुठे त्यांची खडखडीत सुपारी होते, आणि सुपारीला भावही चांगला, ३५० रु. किलो.
संध्याकाळी दिवेआगरच्या समुद्रकिनार्‍यावर जाताना वाटेतच एका देवळाचं बांधकाम चालू होतं. राजस्थानी धाटणीचं लाल दगडाचं देऊळ सुम्दर होतं, पण मला मात्र आणखी ५ वर्षांनंतरची तिथली बजबजपुरी डोळ्यापुढे आली आणि मन खट्टू झालं. नितान्त सुंदर निसर्गाचा , अशी धार्मिक ' दुकानं ' थाटून माणूस का विध्वंस करतो ? समुद्राच्या उधाणलेल्या लाटात, एका लयीत वाजणार्‍या गाजेत , दूरवर पसरलेल्या अथाम्ग जलाशयात , रंगांची उधळण करत त्याच पाण्यात मिसळून जाणार्‍या सूर्यबिंबात असणार्‍या दिव्यत्वाचा स्पर्श माणसाला का पुरेसा होत नाही ? अशा विचारांनी मन खट्टू झालं

समुद्रकिनार्‍यावर गेल्यानंतर त्या अथांग सागराला बघताना किती रुपं आठवावी त्याची. लहानपणी शिरोड्याला , आजोळी गेलं की त्याच्या वाळूत पाय खुपसून चालताना किती वाळू उडवत होतो. सगळ्यांच्या हातात हात गुंफ़ून लाटेबरोबर पायाखालची वाळू सरकताना जोराने किंचाळायची चढाओढच लागायची. वाळू भरलेले ओले कपडे घालून मागच्या दारी विहिरीवर जावून आंघोळ केल्याशिवाय आजी घरात पाऊल टाकू द्यायची नाही.किती आठवणी घेऊन त्याच्याशी संवाद करत फ़ेर्‍या मारल्या , मात्र यावेळी पाय मात्र कोरडेच राहिले.
अंधार पडताच रस्त्यावरचे मिणमिणते दिवे थेट बालपणातच घेऊन गेले. अशा दिव्यातच आम्ही वाढलो होतो. उजेडापेक्षा अंधार गडद करणारे दिवे आणि रस्त्यावर आखलेल्या लोकांच्या घरातल्या उजेडाच्या चौकोनांनी आम्हा सगळ्यांना लहानच करून टाकलं. कदाचित संध्याकाळी " सुवर्ण गणपती "च्या मंदिरात म्हटलेल्या आरतीचा आणि अगदी हात जोडून आणि पहिलीतल्या पोरांसारखे डोळे मिटून " मना सज्जाना भक्तीपंथेचि जावे " म्हटलेल्याचाही परिणाम असावा तो.
पण दिवेआगरने खोलवर दडलेली सुरावट छेडली खरी !
समुद्र हा माझा आतल्या गाभ्यातला सखा आहे. तो मला अशी खट्टू होवून जाऊ देणार होता थोडाच ?आदल्या दिवसाची कसर दुसर्‍या दिवशी भरून निघाली. दिवेआगर ते श्रीवर्धन हा सकाळी केलेला प्रवास आणि दिवेआगर ते दिघी हा संध्याकळी केलेला प्रवास म्हणजे केवळ अविस्मरणीय ! रुसलेल्या छोट्या बहिणीला मोठ्या भावाने वेगवेगळ्या भेटी देवून मनवावं तसा वा्टला तो समुद्र मला ! गाडी एखाद्या वळणावर वळली की खाली खोलवर तो असा काही चमचमत उसळत असायचा की त्या त्याच्या नर्तनाच्या खोडकर लाटा आपल्याही हृदयातून उसळाव्यात. झाडीतून त्याचं मंद सम्गीत खुलवत रहायचं. म्हणायचं, बघ, माझ्यापासून दूर तू जाऊच कशी शकतेस ? मी आहे इथेच. चल , शोध मला. आणि आपणही नटखट मुरलीधराला शोधणार्‍या गोपींच्या आतुरतेने त्याला शोधत रहावं तर अचानक त्याचा अथांग जलाशय बाहू पसरून खुणावत रहायचा. एके ठिकाणी कधी न पाहिलेल्या पांढर्‍याशुभ्र रंगात समुद्र डोलताना दिसला आणि जवळ गेल्यावर लक्षात आलं की शेकडो बगळे भक्ष्याच्या प्रतिक्षेत ' बकध्यान ' लावून पाण्यात लाटेवर झुलताहेत.
संध्याकाळचा दिवेआगर ते दिघी हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देवून गेला. विशेषत: नानवलीहून दूरवर समुद्रात वसलेला जंजिरा पाहताना कोणत्याही क्षणी किल्ल्यात हालचाली सुरु होतील असं वाटावं इतका तो जिवंत वाटत होता.
या सगळ्या क्षणांनी जो जिवंतपणा रसरसून आतपर्यंत झिरपत गेला तो खूप दिवस तसाच रहाणार होता हे नक्की !

draft

Thursday, April 26, 2007

क्षमा

तापलेल्या रस्त्यावरून सोलवटलेले पाय ओढत तुझ्या दाराशी आल्यावर
क्षणभर थांबून समोर सहज पाहिलं, तर
काटेरी मुकुटात जखडलेला दिसलास तू भिंतीवर
कललेली मान सावरत
रक्ताळलेले हात पेलत !
तुझं वेदनेनं कल्लोळलेलं शरीर
दौडवीत गेली अदीम थरथर
" वेदनेतून उमटलेला मायेचा हुंकार
रक्तातून घुमलेला क्षमेचा तत्कार
असावे बहुधा मिथक खोटे
थोडे रचलेले , थोडे लुटुपुटीचे!"
धुमसणार्‍या कराल तप्त लोंढ्याला थोपवत भिडवला तुझ्या डोळ्याशी डोळा,
,दाबलं पाऊल काट्यासह चिळकाम्ड्या उडवत चळचळा.
एक थंड लहर लपेटत चालली अंग भर
" देवा , क्षमा कर तू ह्याला ,खरच क्षमा कर!
क्षमेचा अर्थ उमगण्यासाठी तरी क्षमा कर !"
ठिबकणार्‍या रक्तातून,चरचरणार्‍या जखमेतून
हसलास तू कष्टाने,
" अग्नीने दाह द्यावा,
जलाने तो शांतवावा.
चाले तो जैसे ज्याचे मन
जल बन तू लेकरा, जल बन"
विरली वेदना विरले चराचर
नुरली वंचना , नुरले जहर............. !

वळून पाऊल टाकताना बाहेर, जाणवलं तू आहेस पाठी
,आधाराला देऊन क्षमेची काठी.
अर्थ जाणवला तुझ्या वचनाचा थोडासा ,
समजलाससं वाटलं तू जराजरासा !
draft

Monday, April 23, 2007

चंद्र अमेरिकेतला

दारात उभी राहून चंद्र न्याहाळताना वाटलं,
अमेरिकेतला चंद्र कसा दिसेल?
लखलखत्या दिव्यांच्या साथीला
आकाशाची थोडीतरी किनार असेल?
लेकाला विचारलं," बाबा रे ,असतो तरी कसा तो ?
दिसण्याने त्याच्या जीव तुझा सुखावतो ? "
तर म्हणाला, "आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.
आता बघावसं वाटल, तरी टाळतोच ती कल्पना,
वाटतं, कदाचित नसेल ना मागे शिक्का ' मेड इन चायना ?' "

Sunday, April 22, 2007

खासबागेतलं घर

आजवरच्या आयुष्यात जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या घरात राहण्याचा योग आला, पण आयुष्याची पहिली १९ वर्षं ज्या घरात काढली, ते घर गैरसोईचं होतं असं आज वाटलं, तरीही तेच सर्वात प्रिय वाटतं. ते घर म्हणजे कोल्हापुरातलं खासबाग या भागातलं " राज अंजुमन ताज " अशा भारी भक्कम नावाचं बी. नांद्रेकरांचं घर. घराच्या नावातले ३ शब्द हे त्यांच्या ३ मुलांची नावं होती. त्यांची ४थी मुलगी ' शुक्रिया' आमच्यापेक्षा ३- ४ वर्षांनी मोठी होती. तिचं नाव मात्र घरावर नाही याचं आम्हाला लहानपणी फ़ार वाईट वाटायचं, आणि शुक्रिया आबांची नावडती मुलगी आहे असं आम्हीच मनाशी पक्कं ठरवून ती समोर नसताना फ़ार हळहळायचो. आता आबांनी घर बांधलं तेव्हा 'शुक्रिया'चा जन्मच झाला नसेल तर तिच नाव घरावर कसं असणार ही गोष्ट आमच्या चिमुकल्या डोक्यात काही येत नसे.आम्ही आबांच्या घरातील भाडेकरु होतो. आणखी ३ भाडेकरु आणि आबांचं स्वत:चं घर मिळून नांद्रेकरांचं घर होत असे. या सगळ्या घरांना मध्ये चौक होता, आणि प्यायचं पाणी भरण्यासाठी समाईक नळ तिथेच होता. शिवाय बाथरूमही चौकातच होती आणि बाथरूममध्ये स्वतंत्र नळ होता. अशा घरांना पूर्वीच्या पध्द्तीप्रमाणे समाईक संडासही होता. आमच्या घराला लागूनच , म्हणजे चालत गेलं तर २ सेकंदात आणि पळत गेलं तर १/२ सेकंदात पोचू अशा अंतरावर खासबाग नावाचं मैदान होतं, जे आम्हा मुलाम्चं दुसरं घर होतं, त्या मैदानाच्या नावावरून त्या भागाचं नाव खासबाग असं पडलं होतं.याभागात बर्‍याच नामवंत मंडळींची घरं होती, आणि ती सगळी मंडळी इतकी मोठी आहेत याची जाणीव लहानपणी आम्हाला नव्हती. आता आमचे घरमालक म्हणजे शुक्रियाचे आबा हे १९३०_ १९५० या काळातले फ़ार मोठे नट होते हे मला बर्‍याच वर्षांनंतर त्यांचे मीनाकुमारी , निम्मी, नर्गिस यांच्याबरोबरचे फ़ोटो बघितल्यानंतर कळलं. तसे तर आमच्या अवतीभोवती सरिताचे अण्णा,[जुन्या काळचे प्रसिध्द नट विष्णुपंत जोग ],बकुळाबाईंचे मिष्टर[ भालजी पेंढारकर], भालजी पेंढारकरांची सर्वात मोठी बायको लीलाबाई [मिस लीला] अण्णांकडे येणारे त्यांचे मित्र दादा साळवी, मांगोर्‍यांच्या समोरच्या घरात येणारा अरुण सरनाईक,शकून मासूरकरची मैत्रीण उमा [उमा नटी] हे सतत वावरतच असायचे, पण त्यांचं ग्लॅमरचं वलय आमच्या डोळ्यावर कधीच आलं नाही.खासबागेच्या ग्राऊंडवर धुडगूस घातल्यानंतर आम्ही सगळ्या मुली सरिताच्या घरी झोपाळ्यावर बसून झोके घेत गाण्याच्या भेंड्या खेळत असू. सरिताची आई जानकीकाकू गोड गळ्याच्या होत्या. त्याही कधी कधी अण्णा नसले तर गाणं म्हणत.कधी कधी संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळेला अण्णांच्या पहाडी आवाजातल्या ताना कानावर पडत. भालजी पेंढारकरांकडच्या , म्हणजे बकुळाबाईंकडच्या घरगुती समारंभासाठी उमा नटून थटून पण डोक्यावर पदर आणि नजर खा्ली , हातात क्रोशाच्या रुमालाने झाकलेलं ता्ट घेऊन जाताना दि्से. लीलाबाई रस्त्याने निघाल्या की कोणीतरी योगिनी शुभ्र वेषात निघाल्यासारखं वाटे.शाळेत आमच्या मागे दोन वर्षं असलेली माया जाधव सायकल वरून गोखले कॉलेजला जाताना दिसे. ती सगळी कोल्हापुरातल्या उच्चभ्रू लोकांची वस्ती होती, पण हे लोक आपल्या खाजगी आयुष्यात अगदी मध्यम वर्गीय मूल्य जपणारे असल्यामुळे बाकीच्या जनसामान्यात मिसळून गेलेले असत.
तर मी ज्या घरात लहानाची मोठी झाले, ती दुमजली आणि चार खोल्या असलेलं होतं. पुढे गॅलरी, मागे गच्ची. या गच्चीत एका कोपर्‍यात आई बंबात घालायसाठी कोळशाची खर आणि शेण कालवून त्याचे बंबगोळे करून वाळवत असे. तिथेच बाजूला शेणाच्या गवर्‍या [कोल्हापुरी भाषेत 'शेण्या' ] पोत्यात भरून ठेवलेल्या असत. आणि उरलेल्या जागेत तिने आणि भैय्याने देवदारी खोक्यात वेगवेगळी फ़ुलझाडं लावलेली असत.संध्याकाळच्या वार्‍यात ति्थे बसून गोष्टीचं पुस्तक वाचायला मजा येत असे.पुढच्या बाजूला गॅलरी होती.एका कोपर्‍यात छोटीशी मोरी होती, आणि दुसर्‍या कोपर्‍यात कोळशाचं भलं मोठं पिंप. यामधली जागा भैय्याची स्टडीरूम. त्याने तिथे बल्ब लावून घेतला होता.पिंपाच्या शेजारच्या शेल्फ़वर त्याच्या नोटस, पुस्तकं. ११वीत असताना मीही हट्टाने त्याच्या पायाशी बिछाना घालून अभ्यास करत असे.जेमतेम १० वाजेपर्यंत डोळे ताणून वाचल्यानंतर अंथरुणाला पाठ टेकली की चांदण्यांनी भरलेलं आकाश खुणावायला लागायच, समोरच्या मुनिश्वरांच्या बागेतल्या नारळाच्या झावळ्या मंद डोलायला लागायच्या आणि त्या सगळ्यांना पांघरून डोळे जड व्हायला लागायचे.मला आता आश्चर्य वाटतं, की अशा अडचणी , जागेच्या, गोंगाटाच्या, आमच्या अभ्यासात अडथळे का आणू शकल्या नाहीत. खालून रस्त्यावरून रहदारीचे आवाज,ग्राऊंडवरून खेळताना मारलेल्या आरोळ्या, काही काही कळायचं नाही पुस्तक उघडल्यावर.सगळं जग जणू विरून जायचं आणि उरायचं फ़क्त पुस्तकातलं जग, मग ते अभ्यासाचं असो की गोष्टीचं !
आमच्या या घराला दोन मजले होते, वर दोन खोल्या, खाली दोन खोल्या.. शिवाय एखाद्या हॉलसारखा भला मोठा माळा, ज्यात भैय्या आणि त्याचे मित्र शिडी लावून चढायचे, आणि दोनच माणसं उभी राहतील अशा गच्चीत उभे राहून पतंगाची काटा काटी करायचे.वरच्या मजल्यावरची सगळी कपाटं , लॉफ़्टस, वरच्या माळ्याचा काही भाग पुस्तकांनी भरलेला असायचा. महाभारताच्या खंडापासून पी. जी. वुडहाऊसपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तकं ठासून भरलेली असायची. शिवाय बंगाली , गुजराथी भाषेतील साहित्य, शास्त्रीय विषयांची असा भरणाही त्यात असायचा. माझे वरचे दोन्ही भाऊ वाईच्या विश्वकोषात लिहिणारे असल्यामुळे त्यांच्यापुढे माझं वाचन म्हणजे लिंबू टिंबूतली बी च. पण वरच्या मजल्यावरच्या पुढच्या खोलीत सगळे काही ना काही वाचत असताना मी बाराखडी काढत बसलेली मला अगदी स्वच्छ आठवतय.पुढे मोठी झाल्यावर माझीही लायब्ररी झाली. जिन्याच्या वरच्या कपाटावर एक माणूस आरामात झोपेल इतकी जागा होती,तिथे खाकी कव्हर घातलेली आणि कॅलेंडरचे आकडे कोपर्‍यात चिकटवलेली, चांदोबा, गोट्या, रॉबिन हुड, सानेगुरुजींच्या गोड गोष्टी अशी कितीतरी पुस्तकं मी नीट रचून ठेवलेली असत.पुस्तकांवर माणसांप्रमाणे प्रेम करायला या घराने मला शिकवलं . अर्थात माझ्या मुलांच्या मते तो साने गुरुजींच्या 'बोर 'गोष्टींचा परिणाम आहे. जनरेशन गॅप, दुसरं काय ? असो.
तर साम्गायची गोष्ट अशी की वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठी दोन ठिकाणी वाकडा जिना होता. त्याच्या खालून तिसर्‍या पायरीजवळ भिंतीत एक खिडकी होती.पायरीवर बसून बशीत खाणं घेवून पुस्तक वाचत तिथे बसायला खूप मजा येत असे. जिन्याखाली जास्तीचं सामान असायचं आणि पुढे डायनिंग टेबल आणल्यानंतर लाल लाल लाकडी पाटही तिथेच गेले. पण एकदा आम्हा मुलांचा गणपती बसवण्यासाठी सगळं सामान काढून 'कैलास पर्वतावर गणपती' असा सीनही आम्ही जिन्याखाली केला होता. डायनिंग टेबलचे ड्रॉवर्स कपड्यांनी खच्चून भरलेले असायचे आणि बापू कामासाठी गावाला गेले की भैय्या आणि त्याचे मित्र टेबलावर टेबल टेनिसही खेळत. किंवा भैय्या रात्री त्यावर झोपेही.आमचं स्वयंपाकघर मात्र अंधारं होतं. दिवसा ही तिथे बल्ब लावावा लागे. दार होतं, पण ते समाईक चौकात उघडत असल्याने बहुधा बम्दच असायचं.स्वयंपाक चुलीवर चालायचा. चूल सारवणं, तिला पोतेरं देणं, दुसर्‍या दिवशीसाठी ती भरून ठेवणं हे कितीही " एथनिक" वाटलं तरी तेव्हा न जाणवलेले आईचे कष्ट आज मनाला वेदना देतात. आयुष्य हे असंच असतं. एकमेकींना मदत करत ते हसत खेळत पार पाडायचं असतं, हे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला आपल्या वागणुकीनेच दाखवून दिलं. बाहेरचे पदार्थ खाणं हे छचोरपणाचं मानलं जात असल्याने आणि वेगवेगळे पदार्थ करणं स्त्रीच्या स्त्रीत्वाचं प्रमुख लक्षण मानल गेल्यामु्ळे रोजचं वाटण घाटण ही तर सामान्य गोष्ट होती, पण विशेष खटाटोपाचे जिन्नसही या बायका सहजपणे करत. [ की त्यांना करावे लागतच ? ] मला माझ्या लहानपणीची आई आठवते ती चुलीच्या धगीने लाल झालेली, कमरेला खो्चलेल्या सोदन्याने [फ़डकं ] घाम पुसणारी, आणि तरीही शांत. या सगळ्या कामातही विणकाम भरतकाम वाचन करण्यासाठीचा वेळ ती कुठून काढायची ते तीच जाणे.
आमच्या या घराला फ़रशीची जमीन नव्हती, तर मातीची जमीन होती. दर आठ दिवसांनी ती सारवायला लागायची. आणि दर चार महिन्यांनी ती उलायची, म्हणजे तिचे पोपडे निघायचे. मग उलथन्याने ते काढायचे. जमिनीवर पाणी मारायचं आणि मग ती शे्णसडा घालून केरसुणीने सारवून घ्यायची. अशी ती सुस्नात झालेली जमीन खोलीच्या चार कोपर्‍यात शुभदर्शक रांगोळी घालून वर हळदीकुंकू घातलं की गरत्या सवाशिणीसारखी उजळून निघायची.
या घराची एकच का्ळीकुट्ट बाजू होती, ती म्हणजे संडास. पूर्वीच्या काळचे टोपलीचे संडास आणि संपूर्ण तोंड फ़डक्याने बाम्धून डोक्यावरून मैला वाहून नेणारे भंगी लहानपणी दिसले की मळमळायला लागायचं आणि घृणेने मान फ़िरवली जायची, कळत्या वयात ते दृश्य आठवलं की त्यांच्या नशिबातल्या नरकयातना बघून शरमेने डोळे पा्णवायचे आणि मान खाली झुकायची.
आमच्या घरमालकाम्चे मुलगे कर्ते झाल्यावर त्यांनी घराचा कायापालट करायचं ठरवलं. घरात फ़रशी घालून शिवाय प्रत्येकी स्वतंत्र फ़्लशचे संडास, घरातच नळ . मात्र भाडं महिना ४० रुपयावरून १०० रुपयावर जाणार होतं. एवढं भाडं देवून अंधार्‍या घरात राहण्यापेक्षा नव्या वस्तीत रहावं हा बायकांचा विचार पुरषांनाही पटला आणि आम्ही सागरमाळावर रहायला गेलो, पण पाण्याच्या टंचाईमुळे तेही घर ६ महिन्यातच आम्ही सोडलं आणि संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत रहायला गेलो. तिथे मात्र मी लग्न होईपर्यंत राहीले.
draft

Wednesday, April 18, 2007

कॉलेज

१९६५ च्या जून महिन्यात ११वीच्या परिक्षेचा निकाल लागला, आणि कॉलेजात जाण्याची तयारी सुरु झाली. त्या काळी कॉलेजच्या निवडीत कोल्हापुरात दोनच कॉलेजेसना प्राधान्य असायचं. राजाराम आणि गोखले. राजाराम आमच्या शाळेला लागून असल्यामुळे त्या वास्तूबद्दल प्रचंड आपुलकी आणि कुतुहल होतं. डिग्री मिळवायची आणि लग्न करून संसाराला लागायचं हेच इतर बहुसंख्य , म्हणजे जवळ जवळ सगळ्याच , मुलींप्रमाणे माझंही ध्येय असल्यामुळे कॉलेजात जावून काही भव्य दिव्य करायचय असंही ठरवलं नव्हतं.शाळेच्या आखीव रेखीव चाकोरीतून सुटून एक स्वच्छंद फ़ुलपाखरी जग बघायचं हाच कॉलेजात जाण्याचा मुख्य हेतू असायचा.अभ्यास ही तदनुषंगाने येणारी अपरिहार्य गोषट असल्याने कोणीच त्याचा बाऊ करत नसे. त्यामुळे कॉलेज लाइफ़ एन्जॉय करण्यासाठी आर्टसला जाणं हा उत्तम पर्याय होता. त्यासाठी लागणा‍र्‍या चार वह्या, पेन ,सगळ्याच साड्यांवर मॅचिंग होईल अशी काळ्या रंगाची पर्स, वेगवेगळ्या आकाराची कानातली, लांबलचक माळा, ५, ६ लेटेस्ट फ़ॅशनच्या साड्या यांची खरेदी मी मे महिन्यातच उरकलेली होती.शिवाय वह्या छातीशी धरून एक वेणी पुढे घेऊन चालायची प्रॅक्टीसही बर्‍यापैकी झालेली होती.११ वीला प्रथम श्रेणी आणि राष्ट्रीय पातळीवर शहराचं प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळे गोखले आणि राजाराम या दोन्ही कॉलेजात सन्मानपूर्वक प्रवेश मिळत होता. मी राजारामचा पर्याय निवडला.
त्यावेळी राजाराम कॉलेज गावातल्या भवानीमातेच्या मंदिराच्या परिसरात, ज्याला भवानी मंडप असं ओळखलं जातं, भरत असे. कॉलेजची मूळ इमारत ही राजवाड्याचाच एक भाग असल्याने त्या बांधकामाचा प्रभाव कॉलेजच्या इमारतींवर होता. ती काळ्या दगडाची इमारत उन्हाळ्यातही थंडगार वाटायची.कॉलेजचं पोर्च हा मुलांसाठी ' आरक्षित ' भाग असल्याने आणि तिथे आजी सदस्यांबरोबर आजीव सदस्यांचेही वास्तव्य असल्याने तो भाग मुलींसाठी 'निषिध्द क्षेत्र ' होतं. कॉलेजच्या दारातून आत शिरलं की, मुलींच्या माना ज्या खाली जात, त्या वर्गात शिरलं कीच वर होतं.पहिल्या वर्षी मुली पोर्च समोरून जाताना ' आता कोणत्याही क्षणी मुलांचा घाला होईल ' या भीतीने वाघ मागे लागलेल्या मेंढरासारख्या थरथरत, पळत सुटत . एखाद्या मुलाने शीळ घातली तर किंवा बाण मारला तर ? या भीतीने त्यांची गाळण उडत असे. बहुसंख्य मुली केवळ मुलींसाठी असलेल्या शाळेतून आलेल्या असल्याने दबावाखाली असत आणि मुलंही सहशिक्षणाला सरावलेली नसल्याने दबाव झुगारायला उत्सुक असत. मुलामुलींनी एकत्र उभं राहून गप्पा मारणं ही फ़ारच दूरची गोष्ट होती.त्यामुळे वेगवेगळे 'सजातीय ' घोळके करून 'विजातीय ' धृवावर लक्ष ठेवणं एवढाच 'रोमॅंटिसिझम ' मुलं करू शकत होती. काही फ़ारच धीट मुलं, मुली निघाल्या की छातीवर हात ठेवून छातीत कळ आल्यासारखा चेहरा करून आपल्या दिलाचे हजार तुकडे झाल्याचं सुचवत असत आणि मुलीही मुमताज , साधना, शर्मिला, जया जेवढ्या लाजू शकतील तितपत लाजून त्याला दाद देत असत. अशाही परिस्थितीत नोटस मागण्याच्या बहाण्याने प्रेमप्रकरणं फ़ुलत असत, पण फ़ारच थोड्याम्ची परिणती लग्नात होत असे. कारण विवाह जरी स्वर्गात ठरव्ला जात असला तरी, त्याचे सर्वाधिकार आकाशातल्या बापाने आपल्या पृथ्वीवरच्या बापाला दिलेले आहेत मुलींच्या मनात चांगलंच ठसलेलं किंवा ठसवलेलं असे. त्यामुळे कॉलेजच्या दुसर्‍या वर्षापासून एक एक पान गळावया लागून शेवटच्या वर्षी बहुसंख्य पानं गळायच्या बेताला आलेली असत. परिक्षेच्या मांडवातून लग्नाच्या मांडवात हाच त्या काळच्या वडिलधार्‍यांचा नारा असे
.कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या गेलं की दोन्ही कोपर्‍यातल्या मेघडंबर्‍यातून रंकाळा तलावापर्यंतचा भाग दिसत असे. खाली पाहिलं तर भवानी मंडपाचा भाग , के. एम. टी. च्या बसेसच्या थांब्याचा भाग सोडल्यास मोकळाच दिसत असे. त्यामुळे एक खानदानीपणा त्या भागाला होता. आमच्या कॉलेजला लागूनच त्या भागात येण्यासाठी एक दगडी कमान होती. त्याच्या दोन्ही बाजूला हत्ती झुलताना मी पाहिलेले आहेत. कमानीच्या वर सनई चौघडावाले बसलेले असत. महाराजांची मोटार लांबवरून येताना दिसली की ते वाजवायला सुरवात करत. अंबाबाईचं देऊळही जवळ असल्याने दुपारी आरतीच्या वेळी घाटी दरवाज्यावरची घंटा वाजू लागे. या सगळ्यामुळे आपण एका पावन ऐतिहासिक परिसरात वावरत आहोत ही भावना मनाला सुखवत असे. ऑफ़ पिरियडला भवानीमातेच्या मंदिराच्या गारव्याला गप्पा मारत बसणं किंवा अंबाबाईच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या दुकानात बांगड्या पर्सेस , कानातली, गळ्यातली, वेगवेगळ्या रंगांच्या गंधाच्या, कुंकवाच्या बाटल्या खरेदी करणंहा मुलींचा स्त्रीसुलभ टाइमपास असे, तर काही अंतर ठेवून ' जेथे जाशी तेथे मी तुझा सांगाती ' असं [मनातल्या मनात ] म्हणत मुलाम्चे घोळकेही मुलींच्या मागून फ़िरत असत.आजच्या तरुण पिढीला हे सगळं हास्यास्पद वाटत असेल, पण यामागचं कारण त्यावेळचं सामाजिक बंधन असे. मुलामुलींनी एकत्र गप्पा मारत उभं रहाणं जिथे शिष्टसंमत नव्हतं तिथे मैत्री ही फ़ारच दूरची गोष्ट. त्यामुळे मुलींची भूमिका बहुधा बावरलेल्या हरिणीची असे, व मुलगे आपल्या 'टेरिटरी'तल्या मुलींच्या रक्षणकर्त्याच्या थाटात वावरायचे. पोषाख आचरण याबाबतीत अधिकांश मुलं मुली दबावाखाली असत. पण तारुण्यसुलभ बंडखोरीमुळे त्यातून पळवाटही काढत. म्हणजे मुलगी ११ वीत गेली की ती साडीत शिरे. काही काही घरात तर ८वीपासूनच मुली साडी नेसू लागत. काही किंचित फ़ॅशनेबल मुली कॉलेजात आल्यानंतरही स्कर्ट ब्लाऊज घालत,आणि घरून निघताना गुडघ्याच्या खाली असलेला स्कर्ट लेडिजरूम मध्ये आलं की नेफ़्याकडे दुमडून लांडा करून हेलनसारख्या चालत वर्गात जात. साडीवाल्या मुलीम्ची गत आणखी न्यारी, न्यारी !घरून निघताना बिचार्‍या साधीसुधी साडी नेसून पदर दोन्ही खाम्द्यावर पांघरून निघत आणि लेडिजरूमच्या आरशासमोर आल्या की तोच पदर लाम्ब करून कमरेभोवती गच्च दोन फ़ेरे देऊन डाव्या हातावर पंख्यासारखा झुलवत तासाला निघत.आम्ही ११वीत असताना 'गीत गाया पत्थरोंने ' नावाच्या सिनेमात राजश्री नावाच्या नटीने कटिवस्त्र नाभीखाली खेचून शिवाय नाभीत चमकता खडा घातला होता. त्यामुळे अगदी खडा जरी नाही तरी बर्‍याच कॉलेजकन्यकांनी हे नाभीदर्शन उचलून धरलेलं होतं.अशा या मुली पदर फ़डकवत निघाल्या की पोर्चमधून " चुनरी संभाल गोरी, उडी चली जाय रे, मार ना दे डंख कोई नजर कोई हाय ! " असा कोरस उमटला नाही तरच नवल.ही सगळी छेडखानी, रुपेरी पडद्यावरची भ्रष्ट नक्कल, जिच्यावरून चाले ती आरामात असे, आणि पाहणार्‍याला घाम फ़ुटे.पुढे मग आम्ही कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेल्यानंतर जया भादुरी नावाची एक साधीशी मुलगी रुपेरी पडद्यावर अवतरली आणि सगळ्या आयांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण मुलींनी पदराचे पंखे मिटले,पदर दोन्ही खांद्यावरून पांघरून आले. केसाम्चा सैलसर शेपटा पाठीवर झुलू लागला. कपाळावरचा साधना कट जावून केसांचे भले मोठे आकडे कानामागे झुलू लागले .कपाळावर गंधाची टिकली, कानात साध्याशा रिंग्ज, सुती काठा पदराच्या कलकत्ता साड्या अशा वेषात मुली कॉलेजला जावू लागल्याने आया धन्य धन्य झाल्या.मुलांना बिचार्‍यांना फ़ारसे काही पर्यायच नव्हते.त्यातल्या त्यात राजेश खन्नाने आपलं वाढतं पोट झाकण्यासाठी सुरु केलेला ' गुरु शर्ट ' हीच त्यांची फ़ॅशनची कमाल पातळी होती. कदाचित त्यामुळेच की काय आजचे ६०- ६५ चे आजोबा टी शर्ट मध्ये दिसतात.
१९६७ च्या सुमाराला राजाराम कॉलेज भवानी मंडपातून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरानजिकच्या स्वत:च्या जागेत गेलं, पण उघड्या बोडक्या माळावरची ती वास्तू आम्हाला कधी आपलीशी वाटलीच नाही.अजूनही आमचं कॉलेज म्हटलं की गावातलं कॉलेजच डोळ्यापुढे येतं.कॉलेजच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला निबंध भित्तीपत्रकात पाहताना वाटलेला अभिमान आनंद संकोच मी इथेच अनुभवला. कॉलेजच्या निवडणुकीत लेडिज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी माझ्यापेक्षा मोठ्या ३, ३ मुलींना हरवल्यानंतर विजयाचा जल्लोष आम्ही मैत्रिणींनी इथेच केला.आंतर विद्यापीठ खोखो स्पर्धेसाठी आम्हा नऊजणींपैकी सातजणी निवडल्या गेल्यानंतर ताठ मानेने याच कॉलेजच्या फ़ाटकातून प्रवेश केला.कॉलेज मॅगेझिनमधल्या माझ्या लेखाला वर्णनात्मक ललित लेखन या विभागात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पोर्चमधून झालेला टाळ्यांचा कडकडाट इथेच मी अंगावरचे रोमांच लपवत ऐकला.खो खो च्या अंतिम सामन्यात कमरेच्या हाडाला मार बसून रक्तबंबाळ झाले असतानाही सर्वाधिक गडी खांबावर टिपण्याचा मान मिळवला तोही भवानी मंडपातल्या कॉलेजमध्ये असतानाच.या कॉलेजने माझं व्यक्तिमत्व फ़ुलवलं.वरवर आक्रमक भासणारं पण अंतर्यामी हळुवार असं मन दिलं. नाव कमवायची संधी दिली.
ते दिवसच तसे होते, " झोपाळ्यावाचूनि झुलायचे ! "

Wednesday, April 11, 2007

हायस्कूल

प्राथमिक शाळेत असताना हायस्कूलच्या मुली युनिफ़ोर्ममध्ये फ़िरताना पाहून ' देवा, मी मोठी कधी होणार' असा ध्यास लागलेला असायचा. त्यामुळे ५वीत गेल्यानंतर भला थोरला वर्ग बघून आकाश ठेंगणं झालं. बसायला बाक, एका बाकावर दोनच मुली, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक. त्यामुळे आपण आता मोठे झालो आहोत आणि ३री, ४थीच्या मुली ' चिल्ली पिल्ली ' आहेत ही भावना प्रबळ झाली.त्याकाळी बहुतेक शाळांचा गणवेष म्हणजे निळा स्कर्ट आणि पांढरा कोलरवाला ब्लाऊज असा असे. फ़क्त रिबिनीचा रंग वेगवेगळा असे. दोन वेण्या व्यवस्थित तेल लावून घट्ट करकचून घातलेल्या, आणि त्याही अर्ध्या दुमडून वर बांधलेल्या., रिबिनीची फ़ुलं एकसारखी दिसतील अशा ! तेव्हा नायलोन हा प्रकार नवीनच बाजारात आला होता. त्याच्या तीन बोटं रुंदीच्या रिबन्स दोन वार लागत. कापलेल्या रिबिनीची टोकं उसवू नयेत म्हणून ती धावदोरा, हेम घालून शिवावी लागत. आता पिवळ्या रंगाची रिबन आणि पांढरा धावदोरा ही रंगसंगती वरच्या वर्गातल्या काही ' कलाकार ' मुलींना पटत नसे. आणि गरज ही शोधाची जननी असल्यामुळे त्यांना असं आढळून आलं की पेट्त्या उदबत्तीचं टोक रिबिनीच्या कडेवरून अलगद फ़िरवलं की तिथले धागे जळतात आणि उसवत नाहीत.मग काय , उचल उदबत्ती, की जाळ रिबिनीचं टोक असा प्रकार सुरु झाला. शिवाय काही मुलींनी उदबत्तीच्या टोकाने फ़ुलाच्या पाकळीसारखी चार भोकं पाडून कलाकुसरही केली होती. आता होती काय गोची, गणवेष तपासायचं काम पी. टी. च्या कुलकर्णीबाईंकडे [ प्राथमिकच्या नव्हे ] होतं. त्यांची एक पध्दत होती. मुलींना मारण्याच्या अगदी विरुध्द होत्या त्या. ' चुकलेल्या' मुलीच्या शेजारी येऊन त्या उभ्या रहायच्या. प्रेमळ आवाजात चूक कबूल आहे का ते विचारायच्या आणि मुलीने थरथरत 'कुबूल' म्हटलं की त्याच क्षणी तिच्या कानाची पाळी आपल्या बोटांच्या चिमटीत धरून अशी काही दाबायच्या की ती मुलगी पुढचे चार दिवस हातात कानाची पाळी धरूनच फ़िरली पाहिजे. मला वाटतं ' चुकलं, चुकलं " म्हणून कानाच्या पाळीला हात लावतात ना, ती पध्दत प्रथम सुरु करणारी व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी असली पाहिजे. ... तर या रिबन प्रकरणी बाई अशा खवळल्या की , ना सुनवाई, ना तारीख , एकदम फ़ैसला ! दिसलं टोक जाळलेलं की सरळ कानाचा टोकालाच हात. दुस‍याच दिवशी सगळ्या क्रांतीकारी मुलींच्या रिबिनीची टोकं परत धावदोर्‍यात.त्या काळी साधारणपणे परित्यक्ता, विधवा स्त्रियांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जे पर्याय उपलब्ध होते त्यातला शिक्षिकेची नोकरी हा सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठेचा पर्याय मानला जायचा. तसे दुसर्‍याच्या घरी स्वयंपाक करणे, शिवणकाम, नर्सिंग हेही पर्याय असत, पन वरील कारणाने मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया हा पर्याय निवडीत. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेतही अशा श्क्षिकांचे प्रमाण अधिक होते. स्वत;च्या खाजगी आयुष्यातल्या कटू अनुभवांमुळे त्यांच्या प्रतिक्रिया कधी कधी कडवट होत असाव्यात असं आता वाटतं, पण त्या सर्वांनी आपापले विषय आम्हाला समरसून उत्क्रुष्ट शिकवले.त्या वेळचे शिक्षक, बहुतांश शिक्षक आपापल्या विषयात पारंगत असत. बहुतेकाम्ना आपला विषय खुलवून शिकवण्याची हातोटी होती. त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांत आदरयुक्त दरारा असे. त्यांच्या हातातली छडी हेच एकमेव कारण त्यामागे नसे.तर त्यांनी साहित्याचे , विज्ञानाचे अंतरंग आमच्यापुढे उलगडण्यात कोणतीही कसर सोडलेली नसे, हे असे. अर्थात बालसुलभ उतावळेपणामुळे आम्ही त्यांना त्रास देण्यात , दंगा करण्यात धन्यता मानली तरीही त्यातूनही जे ज्ञान आमच्यापर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले ते आम्हाला आजही उपयोगी पडत आहे. पुढे स्वत: शिकवताना विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगताना कधी कधी लख्खकन जान्णवून जायचं, अरे, ही आपली 'स्टाइल' सावंतबाईंसारखी / कुलकर्णीसरांसारखी आहे शिक्षक आपल्याला नकळत जन्मभराची शिदोरी देतात. आपण क्षणभर त्यांच्या आठवणीने गहिवरतो.एखाद्या उदास क्षणी त्यांची त्रास दिल्याबद्दल मनोमनी क्षमाही मागतो, पण त्याच क्षणी आपल्याला जाणवलेलं असतं,की कालचक्र उलट फ़िरून आपल्याला ' सुधारायची' संधी मिळाली तरी आपण परत तसेच वागू. हे म्हणजे वासराने गाईला दिलेल्या ढुशा असतात. त्याविना वासराला पिण्याचं समाधान नाही, आणि गाईला पान्हा फ़ुटत नाही..शिक्षक आणि विद्यार्थी यात इतकं जवळीकतेचं नातं निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या हेही असावं असं मला वाटतं.वर्गात ३५ -४० मुली असल्याने शिक्षक सगळ्यांना ओळखत ते त्यांच्या घरगुती पार्श्वभूमीसह. आमचे शिक्षक कितीही वर्षांनी भेटले तर त्यांना नमस्कार करताना आमचा ऊर अभिमानाने भरून यायचाच, पण शाळेचे प्यून भेटले तरी त्यांची खुशाली विचारल्याविना पाय पुढे पडायचा नाही.या शाळएने मनुष्य म्हणून जगण्याला लागणारे संस्कार भरभरून दिले, अभ्यासाच्या परिक्षातून, खेळाच्या स्पर्धातून आणि शाळा सुटल्यावर केलेल्या नाटकाच्या तालमीतूनही.
१९६५ ला ११वीची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाल्यानंतर कोणत्या कोलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हा प्रश्न उभा रहिला.तेव्हा गोखले, आणि राजाराम असे दोनच उत्तम पर्याय कला आणि विज्ञान शाखेकडे जाणार्‍यांसाठी उपलब्ध होते. बहुताम्श मुली कला शखेचा पर्याय निवडत.आम्ही काही मुली आंतरराज्य स्पर्धा खेळलो असल्याने आम्हाला गोखले कोलेजकडून सन्मानपूर्वक आमंत्रणही मिळालं होतं.वडिलांचं म्हणणं मी गोखले कोलेजला जावं असं होतं. यामध्ये कोलेज खेळाडू म्हणून चारी वर्षांची फ़ी माफ़ करणार होतच, पण त्याबरोबर खेळाची शिष्यव्रुत्तीही देणार होतं, हे होतच, पण दुसरं कारण म्हणजे कोलेज घरापासून ३ मि. च्या अंतरावर होतं. आता मात्र त्यांची काळजी फ़ारच वाढली असावी. आपल्या सुकुमार [!] राजस बाळीला पळवून नेण्यासाठी जागोजाग घोडे तयार ठेवून राजकुमार तयारीत अशी दुष्टस्वप्नं त्यांना पडत असावीत.मीही बाणेदारपणे ' जाईन तर राजारामला नाहीतर शिकणार नाही" असं उत्तर दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. आणि मी तरी काय करणार ? माझाही नाईलाज होता. गेले वर्षभर शाळा आणि कोलेज यामधलं ' ते' फ़ाटक खुणावत होतं ना मला डोळे मिचकावून ! त्यामुळे जून १९६५ ला मी अधिकृतपणे ' राजारामियन ' झाले. प्रथम वर्षासठी मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी लागणार्‍या गुणांसह ! d
draft

Tuesday, April 10, 2007

गोष्टी आठवणीतल्या....३

१ली ते ४थी या चार वर्गाना मिळून दोन शिक्षक होते. कुलकर्णीबाई विधवा होत्या. नऊवारी लुगडं, पांघरून घेतलेला पदर. कपाळावर हिरवं गोंदण.दुसरे तारदाळकरगुरुजी. धोतर, कोट टोपी या वेषातले. ते मुख्याध्यापक असल्याने ४थीला शिकवत. आम्ही ४थीत गेल्यानंतर पहि्ल्याच दिवशी त्यांनी आम्हाला बजावलं होतं, 'मला गुरुजी म्हणायचं. सर म्हणाला तर थोबाड फ़ोडीन. ' आमच्या काळी ' समजावून ' देण्याची हीच पध्दत लोकमान्य होती. पण कधी कधी खुशीत असले, आणि कोणी ' स---र ' अशी हाक मारली की हसत हसत म्हणत, ' सर, सर, झाडावर, घराच्या कोलावर ".[ या ओळी असलेला खारुताईचा धडा आम्हाला १लीत होता.]
४थीत गेल्यावर शाईची दोत आणि टाक या प्रकाराची एक भर आमच्या दप्तरात पडली.त्यातली शाईची दोत हातात धरून न्यावी लागे. शिवाय शाईचा ठिपका पडला तर टिपण्यासाठी गुलाबी रंगाचा टिपकागद बरोबर बाळगावा लागे. माझे वडिल लिहून झालं की त्यावर समुद्राकाठची रेती त्यावर भुरभुरत आणि कागद झटकत. ती रेती वर्गात नेऊन तशी झटकायची हे माझं एक (अधुरं) स्वप्न होतं तेव्हाचं..लिहिताना टाक शाईत योग्य प्रमाणात बुडवायचा, कागदावर योग्य प्रंमाणात दाब देऊन लिहायच या प्रकारात उजव्या हाताची पाची बोटं शाईने बरबटून निघत. ती मात्र डोक्यावरून हात फ़िरवून केसांना पुसायची असत. त्यामुळे पेपर लिहिताना प्रत्येकीचा हात थोड्या थोड्या वेळाने डोक्याकडे . यात शाईचा भाग किती आणि नशिबाला दोष देण्यासाठी किती ते निकालाच्या दिवशी कळे. परिक्षेचे पेपरही घरीच शिवलेले असत.दोन आखीव ताव अर्धे दुमडून मधोमध एक टाका घालून शिवलेले असत., आणि खालचा भाग ब्लेडने किंवा पेपरकटरने कापलेला असे. पहिल्या पानाच्या उजव्या कोप‍य़ात वडिल भावंडाकडून 'सुवाच्य' अक्षरात नाव घालून घेतलं की परिक्षेची तयारी पूर्ण होत असे. मला मात्र एका ठिकाणी बसून पेपर सोडवणे ही शिक्षाच वाटे. शक्य तितक्या लवकर त्या बिलामतीतून सुटका करून घ्यायची माझी इच्छा असे. मला आठवतं एकदा येत असूनसुध्दा कंटाळा आला या सबबीवर मी पेपर टाकून घरी आले होते, तेव्हा भडकलेल्या भावाला समजावताना मला पोटाशी धरून आई हसत म्हणाली होती," जाऊ दे रे, मार्कांचं काय एवढं ? तिला समजलय ना ? मग झालं तर.! " धन्य ती माता! अशी आई सगळ्यांना मिळो. पण आज लक्षात येतय की त्यामुळेच मी साहित्य, कला, खेळ या सर्वात रुची घेऊ शकले. त्या वेळचे संस्कार आजही उमलून येतात भुईचाफ़्यासारखे! अंतरंग भेदून. अंतरंगानजिकच, अंतरंग सुगंधित करणारे!

Monday, April 9, 2007

गोष्टी आठवणीतल्या....२

एम. एल. जी. हायस्कूलच्या परिसरातच एम. एल. जी. ची प्राथमिक शाळा होती. माझं नाव घालायला बरोबर कोण आलं होतं ते आठवत नाही, पण आठवतं ते हे की, हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेच्या ओफ़िसच्या बाहेरचा जिना उतरून मी आणि माझ्याबरोबरच प्रवेश घेतलेली सुनिती कामत हातात हात घालून प्राथ मिक शाळेकडे पळत सुटलो होतो. वर्गातही आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो. नव्या को‍या पुस्तकावर दोन्ही बाजूने भाकरी थापल्यासारखे हात वाजवत मी तिला काहीतरी सांगण्यात इतकी गुंग झाले होते की, वर्ग सुरु झाल्याची घंटा कधी झाली आणि तारदाळकर गुरुजी वर्गात कधी आले ते मला समजलच नाही. आणि कळलं तेव्हा त्यांची पाच बोटं माझ्या गालावर उमटली होती आणि वर्गात सन्नाटा की काय तो पसरला होता. आपल्या मालकीचं 'गुरु ' समजण्यासाठी गुराखी त्याच्या पाठीवर डाग देतात ना, तसा तो छाप माझ्या गालावर बसला आणि माझा शाळेतला प्रवेश ख‍य़ा अर्थाने नोंदवला गेला.त्या काळी मुलांना बसण्यासाठी गुळगुळीत पोलिश केलेले पाटवजा फ़ळ्या असत. त्यावर बसून दप्तर फ़ळीखाली सरकवून द्यायचं. दप्तर म्हणजे तरी काय, तर एक पुस्तक मराठीचं, एक ' गणोबाच' एक गोष्टीरुप इतिहासाचं आणि पाटी. पाटीचे प्रकार तरी किती!दगडी, पत्र्याची, जोडपाटी, मण्यांची. त्यातले शेवटचे दोन प्रकार असणं हे बालजगतातलं फ़ारच श्रीमंती थाटाचं आणि असुयेचं प्रकरण असायचं. पाटीवर लिहिण्यासाठी दुधी पेन्सिल आणि पुसण्यासाठी फ़डक्याचा एक ओला बोळा आणि एक कोरडा बोळा. वर्गात पाटीची स्वच्छता दोन प्रकारानी व्हायची. पहिली डायरेक्ट मेथड. लाव पाटीला जीभ आणि ठेव विद्यादेवी सरस्व तीला जिभेवर. पण दोन चार वेळा शिक्षकांनी ' हस्तक्षेप ' केल्यानंतर मुली आपसुक दुस‍‍या प्रकाराकडे वळत.या प्रकारात बोळा इतका भिजवायचा की आपल्याबरोबर आणखीही चार पाट्या भिजल्या पाहिजेत. मग त्या वाळवण्यासाठी ' मंत्रजागर ' सुरु. " कावळ्या, कावळ्या पाणी घाल, चिमणी, चिमणी वारा घाल."आता कावळा सतत पाणी घालत राहिला [ आणि तो ते आणणार कुठून ?]तर चिमणीने पंखाने कितीही वारा घातला तरी पाटी वाळणार कशी, हा विचार तेव्हा आमच्या चिमुकल्या डोक्यात येत नसे. त्यामुळे पाटी लवकर वाळावी म्हणून आमचा आवाज इतका वाढायचा की, ' पाट्या काढा ' असं सांगून शेजारच्या वर्गातली गणितं तपासायला गेलेल्या बाई हातात पट्टी घेऊन धावत आल्याच पाहिजेत. मग त्यांच्या पट्टीच्या दांडपट्ट्यात 'ओल्या'बरोबर 'सुके'ही जळायचं ती गोष्ट वेगळी. ही झाली पाटीची दैनंदिन स्वच्छता.साप्ताहिक स्वच्छता म्हणजे दिवाळीच रासन्हाणच ! प्रथम आईकडून कोळशाचा मोठ्ठा तुकडा मागून घ्यायचा. आणि तांब्याभर पाणी. मग फ़्रोकचा घेर गच्च आवळून स्वत: पाटावर नीट बसायचं आणि फ़रशीवर पाटी. थेंब थेंब पाणी पाटीवर टाकत सहाणेवर गंधाचं खोड घासावं तसा कोळसा पाटीवर घासत रहायचं. मग पाटी तिरकी करून वाळत ठेवायची. आणि मग काळी पाटी आणि त्याहून काळे हात धुण्यासाठी बंबभर पाण्याचा स त्या ना श ! एवढ्यावर कुठलं भागायला ? पाटीची लाकडी चोकट उजळवण्यासाठी ब्लेडचं पान घेऊन ते उलट सुलट फ़िरवून असं घासायचं की त्याची परिणती बोट कापण्यात आणि आईच्या गडगडाटासह बोटाला चिंधी बाम्धण्यात व्हायची .
draft

Wednesday, April 4, 2007

गोष्टी आठवणीतल्या

काही काही लोकांना आपल्या खूप लहानपणीची आठवण असते.अगदी दीड दोन वर्षापासूनची. पण मला मात्र वयाची पहिली ५ वर्षं आठवत नाहीत.आठवते ती खासबागेतली माझी पहिली शाळा. राधाकृष्णाच्या देवळाजवळची.घराच्या अगदी जवळ. खर तर सगळ्यात जवळची म्हणजे प्रायव्हेट हायस्कूल. कारण या शाळेच्या मागच्या गल्लीत अगदी शेवटी आमचं घर होतं. पण ती मुलांची शाळा असल्यामुळे तिचा उपयोग नव्हता. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल तशी लांब(?) होती ५ वर्षाच्या मुलीच्या मानाने. म्हणजे आमची पूर्ण गल्ली पार करून उजवीकडे वळलं की प्रायव्हेट हायस्कूल. तिथून पुढे गेलं की डाव्या हाताला पॅलेस थिएटर. त्याला डावीकडे ठेवून वळलं की कुस्त्यांचं मैदान. या मैदानावरून डावीकडून मंगळवार पेठेतून येणारा आडवा रस्ता देवल क्लबकडे जात होता.या रस्त्यावर रहदारी असायची. आता कोल्हापूरसारख्या शहरात ५०-५५ वर्षापूर्वी रहदारी ती काय असणार ? एखादा टांगा, काही सायकली, किंवा क्वचित एखादी मोटार.पण हा "रहदारीचा" रस्ता ओलांडून आपली बाळी शाळेत कशी जाणार ही काळजी माझ्या आईपेक्षा माझ्या वडलांना अधिक वाटत असल्याने त्यांनी माझं नाव जवळच्याच " अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल" मध्ये इयत्ता पहिलीत घातलं. या शाळेच्या बाहेर एक उंबराचं भलं मोठं झाड. दुपारच्या वेळेला टांगा, बैलगाड्या सोडून गाडीवान झाडाखाली शिदोरी सोडत. झाडालगत देऊळ, देवळाच्या मागे लागूनच 'अहिल्यादेवीचं ' पटांगण होतं . पटांगण ओलांडून गेलं की शाळेच्या उम्च दगडी पायर्‍या लागत. त्या चढून गेलं की शाळेचा व्हरांडा. समोर काही वर्ग, डाव्या बाजूला जिना. जिन्याच्या सुरवातीला शाळेची पितळी घंटा. वरही काही वर्ग होते. या शाळेत मी एकच वर्ष होते, त्यामुळे या शाळेच्या आठवणी फ़ारशा नाहीत. मात्र एक सर आठवतात, उंच धिप्पाड. नेहमी झब्बा पाय़जमा या वेषात असत. तेच पी. टी. घेत आणि संगीतही. या दोन विषयांची सांगड ते कशी काय घालत होते असं मला आज वाटतं. तेव्हा मात्र त्यांना बघितल की जाम भीती वाटायची. भला मोठ राक्षस आपल्याला मटकावायला आलाय की काय असं वाटायचं. आणखी भीतीदायक व्यक्ती होत्या ,त्या म्हणजे शाळेच्या मधल्या सुट्टीत पोत्यात चणे कुरमुरे विकणारा गंगाराम आणि आमसोलं विकणारा एक गोरा भुरका म्हातारा. गंगारामची चुरमुर्‍याची भट्टी होती मंगळवार पेठेत. काळ्यारोम गंगारामचा खालचा ओठ भलताच जाड होता आणि लोंबतही असे. त्यामुळे तो कितीही मवाळपणे बोलला तरीही हा आपल्याला मारणार असंच वाटायच मग जरा मोठी झाल्यावर लक्षात आल की गंगाराम अतिशय प्रेमळ आणि माणसांचा भुकेला आहे. दुसरा तो सुकामली विकणारा म्हातारा. फ़णसपोळी, आंब्याची साटं, असा कोकणचा मेवा पोत्यात घालून बिचारा विकत फ़िरायचा.तर तो त्याच पोत्यात मुलींना घालून पळवून नेतो आणि " काय तर करून लांब तिकडं विकून टाकतो म्हणे, पाआआप !" असं मोठ्या मुलींकडून [इयत्ता ४थी] ऐकायला मिळत असल्यामुळे त्याचा आवाज ऐकू आला की माझी पाचावर धारण बसत असे. याच मुली त्याच्याचकडून काहीबाही विकत घ्यायच्या तेव्हा तर त्या मला उच्च कोटीच्या वीरांगनाच वाटायच्या. आईला या माणसाबद्दलची माझी भीती सांगितल्यानम्तर तिनेही फ़ारसं लक्ष दिल नाही, ते बहुधा याच विचाराने असावं की या भीतीने तरी आपली मुलगी शाळा सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर पडायची नाही.त्यामुळे शनिवारच्या सकाळच्या शाळेच्या वेळेत सगळ्या मुली कोवळ्या उन्हात उंबरं गोळा करत असत तरीही आम्ही मात्र लक्ष्मण रेषेच्या आतच !
पण पहिली होता होता आईच्या लक्षात आलं की या शाळेत राहून आपल्या मुलीचा शैक्षणिक आलेख फ़ारसा उंचवण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा तिने मला महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये घालण्याविषयी वडिलांचं मन वळवलं. माझ्या आजूबाजूला राहणार्‍या बहुतेक सगळ्या मुली याच शाळेत जात असल्यामुळे त्या आपल्या मुलीला नीट शाळेत नेतील आणि आणतील असा भरवसाही तिला वाटला असावाआणि दुसरीपासून मला महाराणी लक्ष्मीबाई च्या प्राथ्मिक [ ज्याचा उच्चार मी किती तरी दिवस प्रार्थमिक असा करत होते आणि त्याचा संबंध प्रार्थनेशी जोडत होते] शाळेत दाखल झाले . माझं " पालकत्व " शेजारी राहणार्‍या निडसोशीकरींच्या मीना , बेबी या मुलींनी आणि मागच्या गल्लीतल्या सरिताने आनंदाने पत्करलं नंतर नंतर तर मी सरिताचं ' शेपूट ' म्हणून तिच्या मैत्रिणीत ओळखली जावू लागले.
कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे इथल्या शाळांची नावम राजघराण्यातल्या स्त्री- पुरुषांच्या नावावरून ठेवली गेलेली होती. १९५० च्या सुमाराला कोल्हापुरात अहिल्यादेवी, महाराणी लक्ष्मीबाई, पद्माराजे, जिजामाता, ताराराणी अशा मुलींच्या आणि प्रायव्हेट , विद्यापीठ, राजाराम, आयर्विन अशा मुलांच्या नावाजलेल्या शाला होत्या. म. ल. ग. हायस्कूलाअमच्या घरापासून फ़ार तर अर्ध्या फ़र्लांगावर होती. शाला राजवाड्याच्या परिसरातच असल्यामुळे शाळेभोवती उंचच उंच भिम्त भांधलेली होती. बाम्धकामही राजवाड्याच्या धाटणीचं होतं कदाचित तो पूर्वी राजवाड्याचाच भाग असावा. शाळेचं मागचं फ़ाटक आणि राजाराम कोलेजचं मागचं फ़ाटक एकच होतं. त्या फ़ाटकाजवळ प्राथमिक शाळा होती. २री ते ४थी या काळात त्या फ़ाटकाकडे पडणारी बुचाची फ़ुलं वेचण्यासाठी आमच्यात अहमहमिका लागायची,पण पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या फ़ाटकाकडे जाणं म्हणजे " अव्वा, तिथ जाऊन राजारामची पोरं बघायची असणार" असा शिक्का आपल्यावर पडेल ही धास्ती असल्याने ते " निषिध्द क्षेत्र " मानलं जाऊ लागलं. तशीही आमची ' मास पी. टी. ' पहाण्यासाठी ' राजाराम' ची काही टवाळ पोरं तिथे उभी असायची, त्यामुळे मोठ्या मुलीम्च्या मनात त्या फ़ाटकाबद्दल थोडी हुरहुरयुक्त उत्सुकता असायची.काही धीट मुली आमच्या शाळेच्या खडूस प्यून ' बक्षू' ची नजर चुकवून तिथे एक फ़ेरी मारून येत, पन्ण अशा मुली बाकीच्या पापभिरू मुलींच्या ब्लेकलिस्टवर असत. पण ती नंतरची गोष्ट. आधी म. ल. ग. हायस्कूलच्या प्राथमिक शाळेविषयी.

Monday, March 19, 2007

गुढीपाडवा

आज मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस ! रोजच्यासारखाच उगवलेला,पण डोळे उघडल्याबरोबर पहिली जाणीव झाली की आज पाडवा.बाहेर चांगलच उजाडलेलं होतं. ताडकन पांघरूण बाजूला करून उठले तर दुस‍र्‍या क्षणी जाणवलं की गडबड करण्याची काहीच गरज नाही. आज सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. परत पांघरूण अंगावर ओढून डोळे मिटले, पण पापणीच्या आत ५० वर्षांपूर्वीची गुढी डोलू लागली.
तेव्हा या वेळपावेतो सगळ्यांच्या दारात गुढी उभी राहिलेली असे. काय शामत होती सणाच्या दिवशी "इतक्या " उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्याची ? कारण "ज्ञान, संपत्ती आरोग्य," मिळवण्यासाठी " लवकर निजे आणि (मुख्य म्हणजे) लवकर उठे "हा साधा, सोपा, सरळ मार्गच त्या काळी मोठ्या माणसांना माहीत होता. त्यामुळे लवकर उठल्याखेरीज गत्यंतर नसायचं. एरवी त्याचं फ़ारसं काही वाटायचं नाही, पण गुढीपाडव्याला मात्र एकदम दुपार उजाडली तर काय बहार होईल हाच विचार मनात असायचा. कारण दात धुतले न धुतले तोच आई कडुलिंबाची पानं घेऊन तयारच असायची.प्रथम ती चावायची, मगच गोड खायला मिळायचं ( ही सवलत मी शेंडेफ़ळ असल्यामुळे फ़क्त मलाच असायची, मोठ्या भावंडाना ती पानं गिळावीही लागायची.) त्यामुळे नववर्षाची सुरवात "आई, नको ना ग, पुढच्या वर्षी नकी खाईन ' याच वाक्याने व्हायची हे ठरलेलं.
पण एवढं सोडलं तर मग मात्रं धमाल! दारासमोरचं अंगण , खर तर रस्ताच, झाडणे, शेणसडा घालणे आणि मग रांगोळी. आपली रांगोळी सगळ्यांच्या आधी घालून व्हावी हे त्या दिवसातलं माझं स्वप्न होतं. पण शेजारच्या अक्का पहाटेच उठून रांगोळी घालून तयार असत आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या मुलीही. परत वर मला रांगोळीत मदत करायला तयार ! ओळीत सडा घालून रांगोळीने सजलेली ती अंगणं बघताना आतून कुठून तरी पारिजातकाचं फ़ूल उमलल्यागत सुरेख वाटायचं.मग गुढी उभारायची गडबड . सूर्याच्या कोवळ्या उन्हात रंगीबेरंगी खणांनी नटलेल्या,माळांनी सजलेल्या गुढ्या 'चैत्राच्या' आगमनाची ललकारी देत असायच्या. त्यांचे सोनेरी खण उन्हात झळाळून उठायचे. नवीन कपडे घालून , हातात नवीन वर्खाच्या बांगड्या झळकवत, वेणीचं नव्या रिबिनीच फ़ूल चाचपत मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालून गुढ्या बघताना सकाळ कधी सरायची कळतच नसे.घराघरातून पक्वान्नांचे गोड वास आणि तळणाचे सुगंध यायला लागले की पळत घर गाठायची घाई उडायची.
आज 'तो' पाडवा आठवून वाईट वाटतय का असं मी (डो्ळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली.ते हसून म्हणालं " वाईट काय वाटायचं त्यात ? प्रत्येक वे्ळचे नियम वेगळे, प्रत्येक वे्ळच्या गमती वेगळ्या.तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय ना , मग आवर.मस्त पैकी चहा घे कपात ओतून , बस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्र, कारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून.त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडच आहे ?मग 'ती' गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे ?

Thursday, March 15, 2007

आईपण

कितीही नको म्हटलं तरी तू मला आठवत राहतेस तशी
औषधाच्या दुकानाच्या पायरीशी
औषधाच्याच साइड इफ़ेक्टविषयी बोलत असलेली !
पण खरच का तू औषधाविषयी होतीस बोलत ?
वरवर वाटणारं सुसंगत ?
मीही टाळत होते तुझ्या डोळ्यात पहाणं
घाबरत होते आत डोकावणं !
कारण मग
दिसल्या असत्या मला खोल भोवर्‍यातल्या
खदखदत्या उष्ण चिळकांड्या,
लक्तरं सुन्न मनाची ,
अन विखुरलेल्या घरट्याच्या काड्या !
कदाचित उसनं अवसान टाकून पळतही सुटले असते सैरावैरा,
पण मग बोलू लागलो, तर हललीसशी वाटलीस जरा जरा
ऐकवू लागलीस
नाद रुमझुमत्या पैंजणांचे,
साद चिमण चार्‍याचे!
मी फ़क्त वाट पहात होते
उरी कोंडल्या तुफ़ानाची,
बांध पडल्या उधाणाची !
पण तू उभी, घट्ट पाय रोवून
श्वेत कफ़नात विखुरलेलं आईपण गाडून
थरथरत्या ओठांवर दात दाबून
छिन्न "धर्म"पुत्रासाठी!
केवळ त्याच्याचसाठी !

Wednesday, March 7, 2007

निरोप

तुझ्या भल्या थोरल्या बॅगेवरची पिवळी रिबन बांधून झाली असेल तर जरा थांब,
क्षणभर मागे वळून बघ.
रिबन घट्ट बांधली आहे, हे तुला माहीत आहे,
यादीबरहुकूम सामान भरलय हेही तुला नीटच आठवतय,
उगीच रिबिनीच्या फ़ुलाशी चाळा करत राहू नकोस
तुझ्या अस्वस्थ हालचालींना लगडल्या आहेत
आतापर्यंतच्या आठवणी...
आजूबाजूचा अबोल आश्वस्त वावर...
समंजस उबारा !
ज--रा थांब आणि मागे बघ.
तुझ्या मागेच तर आहे मी
तुला आवडणार्‍या लाडवाच्या, थालीपिठाच्या आणखी कशाकशाच्या पुड्या घेवून,
तुझ्या कपड्याच्या चळती ठेवत---
तुझ्या पुस्तकांचा ढीग सावरत---
उगीचच इकडून तिकडे फ़िरत.
म्हणूनच म्हणते आता हा लपंडाव थांबवूया
ये माझ्या मुला, आपण मोकळे होवूया !
झरणार्‍या आसवात वाहू दे उरात कोंडलेला वियोग
परस्पराविना काढायच्या दिवसांचा बागुलबुवा.
ये माझ्या बाळा पदरा आड झाकून घेऊ दे तुला
मांडीवरच्या जावळाचा स्पर्श साठवून घेऊ दे मला.
मग उद्या डोळ्यात सूर्य साठवून निघशील तू तेजाकडे
त्यावेळीही मी मागे असेन तुझ्या
माझी संध्याकाळ ओंजळीत घेऊन !

Monday, March 5, 2007

कारखाना बंद पडल्यानंतर

फ़ारा दिवसांनी भेटलास मित्रा, तुझं स्वागत असो !
बैस ऐसपैस, जरा पाठ टेक
मधल्या काळातल्या काही कथा, काही व्यथा
ऐकव आणि ऐक !
अर्ध्या वयापर्यंतचे आपले धागे, एकत्रच तर होते विणलेले
गर्द पोपटी चैतन्याने भारलेले, अन सोनेरी तेजाने लखलखलेले !
सरळ सुरळीत चालू राहती वाट ,
तर कदाचित बदललाही असता आयुष्याचा घाट.
भेटलो असतो आपण शुभ्र माथ्याने, थरथरत्या मानेने.
केल्या असत्या गोष्टी , मुला नातवंडांच्या
किंवा आपापल्या निव्रुत्ती समारंभाच्या !
मित्रा, हसलाससा खिन्नसा ?
अजूनही आठवतो कारे तुला
एक एक दिवा मावळता अंधुकसा ?
बंद घरातला एकेक कवडसा?
गाडी घुंगरांच्या किणकिणाटात फ़रपटत जाणाया सावल्या मूकशा ?
बघ, अजूनही हात थरथरतोय तुझा
अरे, खूप वर्षं झाली मित्रा,
जागत्या जागेचा मसणवटा होवून
पांगली बघ माणसं आपली
गोणत्या बोचक्यात आपलं जग भरून
ओठ मिटले उमासे मागे ठेवून !
शांत हो मित्रा,
घामेजलेला हात पूस आणि पाणावलेले डोळेही, जमलं तर.
खरं आहे तुझं
वारा सुटतोच असा कधी कधी धूळ उडवत......
आणि मित्रा, नको येऊस परत
बोलू लागतात रे मूक वेदना,
अद्न्याताच्या अंधाराने भयभीत डोळे
सुकत चाललेल्या जखमा उसवत,
दबल्या आठवणींना चालवत.
जड जातं रे सावरायला
आपलं उखडलेपण रोवायला
अवघड जातं रे मित्रा, खरंच अवघड जातं
शीळ घालतं रानपाखरू परत आत कोंडायला !

Thursday, February 22, 2007

वय वाढताना

वयाची एक गंमतच असते. ते कधी वाढतं ते कळतच नाही. म्हणजे " अरे, किती मोठी झाली, एवढीशी होती ! " हे वाक्य मी आता आता ऐकल्यासारखं वाटत होतं पण लक्षात आलं की त्यालाही ४५ , ५० वर्षं झाली. मग अजूनही उडत्या चालीची गाणी ऐकताना पाय ठेका का धरतात ? एखाद्या " मासाहारी " विनोदाला खळखळून दाद का द्यावीशी वा्टते ? चार समवयस्क मैत्रिणी भेटल्यावर एखादीची " खेचण्यात" कोलेजच्या दिवसाइतकीच मजा येते. अजूनही मानसिक वय ३५ च्या पुढे गेलय असं वाटतच नाही. हे कसं काय ?
पण आपण अस म्हटलं तरी जग हे लक्षात ठेवतच. अगदी दारात येणारा भाजीवालासुध्दा "आजी, " म्हणायला लागतो आणि कोणाला त्यात काहीही गैर वाटत नाही हे विशेष. पहिल्या पहिल्याने मी दुसया कोणाला तरी असेल म्हणून दुर्लक्ष केलं , पण शेजारच्या षोडशीने हाताला धरून , "आजी, भाजीवाला तुम्हाला बोलावतोय." म्हणून आजीपणावर शिक्का मोर्तबच करून टाकलं. नंतर अर्धा तास माझ्या कानातून गरम वाफ़ा येत होत्या, पण आता मात्र सरावले. आजी म्हटलं की ती मीच हे पटकन लक्षात यायला लागलं. तरी मन अजून माने ना ही अंदरकी बात है !
आमच्या नातीही गमतीदार. गावाला निघताना सगळ्या मोठ्यांना नमस्कार करत माझ्यापर्यंत येतील आणि मिठी मारतील , म्हणतील, तुला कशाला नमस्कार? तुला तर आमच्यापेक्षा जास्त नवे सिनेमे माहीत आहेत आणि नट सुध्दा. तू तर आमच्या एवढीच आहेस.
पण आता त्याना सांगणार आहे, अग, आजी आता खरच म्हातारी झाली. परवा दिवे आगरच्या समुद्र किनायावर समुद्र लाटे लाटेने फ़ुटत होता. पोरासोरांच्या आरडा ओरड्याने किनारा दणाणला होता, समुद्राची गाज ऐकू आली की उचंबळून स्वत:ला लाटेवर झोकून देणारी मी, शांतपणे किनायावरून चालत होते, पाण्यात पावलंही न भिजवता, एक टक आकाशातले रंग न्याहळत,एखाद्या मित्राला खूप वर्षानंतर भेटावं आणि मधल्या विरहाने आतला रस आटून जावा तसं समुद्राला फ़क्त भेटून परत फ़िरले, मी कोरडी.
म्हणून म्हटलं वयाचं काही कळतच नाहे, कधी वाढलं ते समजतच नाही !

Wednesday, February 21, 2007

सागर

सागर सतत बोलवत असतो
कोवळ्या उन्हाच्या चमचमत्या लाटात
सिंदबादच्या गल्बताला
रत्नजडीत संदुकेला
एकडोळ्या चाच्याला
दूर क्षितिजावर झुलवत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !
उधाणलेल्या लाटांनी,
उसळणाया तुषारांनी,
मत्त धुंद गाजेनी,
चिंब आवेगाने खुणावत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !
अस्ताच्या रक्तवर्ण मित्रासह,
काजळणाया धूम्रवर्ण नभासह,
किनायाशी फ़ुटणाया फ़ेनपुष्पासह
थोपटत शांतवत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !

Sunday, February 4, 2007

अंधार सर्वसाक्षी

अंधार गर्भवासी,
अंधार बीजरक्षी!
अंधारल्या उबदार कोषी,
पहुडल्या रक्तपेशी
स्पर्शण्या उन्मुक्त प्राची,वाट पाहती उद्याची!
अंधार सर्वसाक्षी
अंधार सर्वभक्षी !
अंधारल्या कालकोठी,
विसावल्या विदीर्ण पेशी
आसावल्या भयभीत नेत्री, वाट पाहती उद्याची!

कातरवेळी

Radhika
दिव्याच्या उजे्डाचा एक एक ठिपका, अंधार अधिकच गडद करत जातो,
पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त, रिक्तसं होत जातं,
दारात उभी राहते मायमाउली, बाहू पसरून पिलासाठी!
' एक घास काऊचा, एक चिऊचा
साथीला विळखा उबदार मायेचा."
उसळे तरंग काळजात परतल्या बाळपावलांसाठी !
दिव्याच्या उजेडाचा एक एक ठिपका, अंधार अधिकच गडद करत जातो,
पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त रिक्तसं होत जातं,
दारात उभी राहते मायमाउली , बाहू पसरून पिलासाठी !
"रंग विलोल नेत्रांनी, धुंद मत्त गात्रांनी,"
दडपे कल्लोळ काळजात परत फ़िरल्या बाळपावलासाठी !

delete

सोबती

अंधारही कधी कधी सखा बनतो, बंद पापणी आडचे अश्रू टिपून घेतो.
सुसाटणाया वायात,
भिरभिरणाया पाचोळ्यात,
गरगरणाया चक्रात
अंधारच सोबतीला येतो.
अशा वेळी दारं खिडक्या बंद कराव्यात, हवं तर गदद पडदेही सो्डावेत
गरगरणारं चक्र,
भिरभिरणारा पाचोळा
सुसाटणारा वारा
सगळं बाहेर ठेवावं
आत फ़क्त निस्तब्ध अंधार आणि साथीला विरह गंधार!
मग उधळून द्यावं स्वत:ला अश्रूवाटे नि:शंकपणे
खात्री असते

सोबतीचा अंधार टिपून घेइल अश्रू अलगद ह्ळूवारपणे
कारण... तेव्हाही तोच होता ना साथीला
सुसाटणाया वायात
भिरभिरणाया पाचोळ्यात
गरगरणाया चक्राच्या तप्त रंगोत्सवात !

Wednesday, January 24, 2007

काही सूर काही नाद

आवाजाचं, गंधाचं आपल्या स्म्रुतीशी नातं असतं. रोजच्या धावपळीत ते लक्षातही येत नाही, पण असा अचानक एखादा क्षण येतो, त्या आवाजाने मनाची तार झंकारते, आणि वढाय मन कुठल्या कुठे जाऊन पोचतं. त्या दिवशी पडद्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजाने माझी गत अशीच झाली.त्याचं काय झालं, लेकीकडे गेले होते, सकाळच्या गार वायाने झोप चाळवली. पडदाही थोडा हलला असावा.कारण एक वेगळीच किणकिण कानावर आली. झोपाळलेल्या डोळ्यांनीच समोर बघितलं. पूर्व उजळली होती कानात मघाची किण किण होती, पण कसली ते कळत नव्हतं. परत तोच आवाज आला. हे म्हणजे खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणीचा फ़ोन यावा आणि तिचा चेहरा धूसरपणे तरळत रहावा तसं झालं. डोळ्यावरची झोप उडवून नीट पाहिलं, सकाळच्या मंद वायाने पडदा हलत होता आणि पडद्याला लावलेले घुंगरू वाजत होते. नेहमीचे छोटे घुंगरू नव्हेत, बैलांच्या गळ्यात असतात तसे भले थोरले पितळेचे घुंगरू. त्या आवाजाने आणि सकाळच्या झुळकीने माझं मन परकया पोरीगत धावत माहेरी, कोल्हापूरला पोचले.कोल्हापूर हे शहर, गूळ, कुस्त्या, फ़ताड्या शिंगांच्या म्हशी, यासाठी जसं प्रसिध्द आहे तसं माझ्या लहानपणी , म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी दारात म्हशी पिळून घेण्याबद्दलही प्रसिध्द होतं. म्हणजे काय तर जवळपासची २-४ घर मिळून एक गवळी ठरवायचे. त्याने एका कोणाच्यातरी दारात म्हैस घेऊन यायचं आणि तिथेच म्हस पिळून दूध काढून द्यायचं. सगळाच संस्थानी खाक्या. तसा आमचा दूधवाला होता मधू आणि त्याची आई ' लक्क्षुंबाई'. दोघांपैकी कोणीतरी एकजण तांबडं फ़ुटता फ़ुटता दारात हजर. 'दोअईध' अशी त्याची आरोळी आली की समोरच्या मालुताई, शेजारच्या अक्का, वरच्या मजल्यावरच्या जाधवमामी आपापली भांडी घेऊन लगबगीनं यायच्या. मधूने म्हस पान्हवायला घेतली की अक्का हमखास म्हणणारच, " मधू, चरवी नीट पालथी करायचं बघ हं का ! नाहीतर तिरकी धरून वाटीभर पाणी घालचील बग." यावर मधूही मिशीला पीळ देत म्हणनार, " काय अक्का, इतकी वर्सं दूध घालायलोय तरी अजून विश्वास इना होय तुमास्नी ? काय एवड्या तेवड्यानं माडी बांदनार हाय काय ?" त्यावर जाधवमामीही त्याला चिडवायच्या, " कुनाला दक्कल माडी बांदतोस का बंगला ते! आमाला वास्तुकाला बोलीव म्हंजी जालं. ' चरवीत धारेचं पहिलं चुळुक वाजलं म्हणेपर्यंत चरवी दुधानं भरून जायची अणि धारोष्ण दूध प्रत्येकीच्या पातेल्यात मापाप्रमाणे ओतलं जायचं.तसं तुम्ही कधी डोंगरमाथ्यावर गेलाय ? गाडी वळणावळणाने वरवर चढता चढता आसमंताशी आपण कणाकणाने एकरूप व्हायला लागतो. गाडी बंद करून आपण जर विसावतो, सभोवार असते नि:शब्द शांतता! अस्पष्टशी कुठेतरी दुसरी गाडी वर चढते असं वाटत असतं, पण बाकी वेढून असते ती फ़क्त निरव शांती. अशा वेळी दूर झा्डीत कोणी एक पक्षी शीळ घालत असतो. शांतता चिरत तो स्वरांचा बाण आपल्या उरात घुसतो, अगदी " काबुलीवाल्याच्या ' ऐ मेरे प्यारे वतन' च्या अरेबिक सुरावटीसारखा.कधी घेतला आहे असा अनुभव ?आणखी एका आवाजाचा अनुभव मात्र मी कल्पनेतच घेतला आहे. नाताळातल्या नाताळबाबाच्या हो हो हो अशा आरोळीचा. आधीच जगाच्या एका थंड टोकाकडून नाताळबाबा रेनडियरच्या गाडीतून आपल्या घरी येणार ही कल्पनाच किती रोमांचक ! त्यात आणखी गंमत म्हणजे तो आपल्यासाठी गिफ़्ट आणणार !मला तर हा लाल डगल्याचा लाल टोपीवाला नाताळबाबा माझ्या आजोबांसारखाच वाटतो. कोकणातून ५ - ६ तासांचा प्रवास करून हे १०० वर्षांचे आजोबा जेव्हा टांग्यातून आमच्या दारात उतरत, तेव्हा त्यांचे मुळचे धुवट पांढरे कपडेही कोकणचा लाल मातीने लालेलाल झालेले असत. कारण ५०, ६० वर्षांपूर्वी कोकणात कुठली आली आहे डांबरी सडक ? पण त्यांना बघून त्यांचं सामान घ्यायला आम्ही पुढे धावलो की त्यांच्या चेहयावरही तसंच प्रेमळ हसू असे. आणि मग हात पाय धुतल्यावर ट्रंकेतू्न फ़णसपोळी, खाजं, साटं असं काही आमच्या हातावर ठेवताना त्यांचे डोळे चाळशीमागून मिष्कीलपणे लुकलुक त.किती नाद, किती स्वर आपण मनात साठवून ठेवलेले असतात ते आपल्यालाच माहीत नसतं. कधीतरी तार झंकारते आणि आनंदाची वलयं उठतात, आपल्याला वास्तवापासून दूर नेतात .... परत वास्तवात आनंदाने परतण्यासाठी !
draft

Sunday, January 21, 2007

शून्यातून शून्याकडे

महाराष्ट्राच्या नकाशात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपासून आठ कि. मी. अंतरावरील हरेगाव हा छोटासा ठिपका. दुष्काळी भागातील कमी पावसावर जगणारी शेतीभाती करून इथला शेतकरी जीव जगवत असतो. अशा या भागात विसाव्या शतकाच्या दुसया दशकाच्या आसपास महाराष्ट्रातला पहिला साखरकारखाना उभा राहिला. भंडारदरा धरणाच्या पाण्याचा वापर करून इथे ऊस पिकवण्याची जिद्द काही तरुणांनी मनाशी बाळगली आणि स्थानिक शेतकर्यांना हाताशी धरून त्यांना ऊस लागवडीचे शिक्षण देण्यास सुरवात केली.जावाहून 'पुष्ट उष्ट जावा ' बियाणे आणून ऊस लागवडीला प्रारंभ झाला आणि पाहता पाहता हरेगाव येथे 'बेलापूर कंपनी लिमिटेड ' उभी राहिली. लोकमान्य टिळकांचे भाचे कै. महाजन हे या साखरकारखान्याचे पहिले इस्टेट मनेजर होते. पुण्यातील शेतकी महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता. त्यांनी आपले द्यान स्वजनहितार्थ वापरले.छोट्या छोट्या चाळवजा घरात राहून इथला अधिकारी वर्ग शेतकर्याण्ना शेतीचे अद्यावत द्यान देऊ लागला. कारखान्यातील तांत्रिकी माहिती सांगू लागला. कारखान्याने चांगलेच मूळ धरले. जो शेतकरी शेतीवर कशीबशी गुजराण करत होता, त्याला कारखान्यामुळे कामधेनूच दारात आल्यागत झाले.कारखान्यात काम करून कामगार चार पैसे कमवू लागला.१९५४ साली जगप्रसिध्द वास्तुशास्त्रद्य जे. जे. बोधे यांच्या आराखड्यानुसार सुप्रसिध्द शापुरजी पालनजी आणि कंपनीने कारखान्याची दिमाखदार वसाहत उभी केली. एक नंबर बंगला कारखान्याच्या ब्रिटिश मनेजरसाठी असे,. अनेक खोल्या असलेली ही इमारत सभोवार देशी विदेशी फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या बगिच्यात एखाद्या गढीप्रमाणे शोभत असे. डायरक्टरचा बंगला, मनेजरचा बंगला व इतर वरिष्ठ अधिकार्यांचे बंगले म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्क्रूष्ट नमुने होते.ए., बी, सी, डी अशा टाइपमध्ये विभागलेल्या या सुबक , रेखीव वसाहतीवर उंच उंच व्रुक्षांनी सावली धरली होती. मध्यभागी जिमखाना होता. त्यामध्ये होणाया टेबल टेनिस, बडमिंटन यांच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू भाग घेत असत.
draft

Saturday, January 20, 2007

ज्याच त्याचा बोधिसत्व

राजपुत्र सिध्दार्थ बोधिव्रुक्षाखाली बसला आणि त्याचा भगवान बुध्द झाला. आपण सामान्य माणसं, पण मला वाटतं बोधिव्रुक्ष हे आत्मद्यानाचं प्रतीक मानलं तर आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक बोधी असतो साध्या साध्या घटनांतून तो आपल्याला अशी अनुभूती देतो की एका अनमिक आनंदाने मन भरून येतं.
मी तेव्हा एका संस्थेमध्ये शिकवण्याचं काम करत होते. मे महिन्याची सुट्टी संपून मी रोजच्या वाटेने निघाले. दुतर्फ़ा शेतं असलेल्या वाटेने चालत मी नेहमीच्या वळणावर आले. मनात सुट्तीतल्या गमतीचे विचार होते तसेच भेटणाया सहकायांची ओढही होती. वळण पार करून मी समोर बघितलं, --- वाहनांना पाठीवर घेऊन रस्ता नेहमीच्या वेगाने पळत होता.त्या क्षणी माझं मन एक सेकंद, फ़क्त एक सेकंद अवाक होवून थबकलं, आणि एका अगम्य अनुभूतीनं भरून आलं. रस्ता नेहमीसारखाच धावत होता, मी न येण्याने त्यात काही फ़रक पडला नव्हता. आता ही गोष्ट खरतर क्लेशकारक वाटायला हवी, पण त्या वेळी माझं मन आनंदाने भरून आलं मस्त मजेत मी तो रस्ता पार केला.
दुसरी घटना घडली तेव्हा माझ्या आईला जावून वर्ष झालं होतं. सकाळपासून तिच्या आठवणींनी डोळे ओलावत होते, हुंदके रिचवता रिचवता घसा दुखायला लागला होता. मनाशी येत होतं ,आज मी माहेरी असते तर मोठ्या भावाच्या गळ्यात पडून रडले असते. त्याच्या खांद्याच्या आधाराने मी मला सावरलं असतं. त्याचा हात पाठावरून फ़िरला असता तर ' आई, आई ' असं आक्रंदणाया मनाला दिलासा मिळाला असता
पण त्याच क्षणी मनात एका जाणीवेची धारदार सुरी फ़िरली, " अरे, माझ्यापेक्षा १५, १६ वर्षांनी ते मोठे असले म्हणून काय झालं, त्यांच्याही मनात एक पोरकं मूल आक्रंदत असेलच की !"माझ्या मनातलं वादळ निमाल आणि मी मोठ्या बहिणीच्या मायेनं ,आईच्या आठवणी जागवणारं पत्र लिहायला घेतलं
या सगळ्या घटना १२ १५ वर्षांपूर्वीच्या. आता तर आयुष्याच्या संध्याकाळी असे कितीतरी प्रसंग आठवतात आणि त्यांचा वेगळाच अर्थ दिसू लागतो, पण कोणत्याच प्रसंगातून पश्चात्तापाची भावना येत नाही हे किती भाग्य !

Monday, January 8, 2007

तप

आज मी रेणू गावस्करांना भेटले. तुळशीबागेजवळच्या पंतांचा गोट म्हणून ओळखल्या जाणाया भागातल्या एका इमारतीत त्या वेश्याच्या मुलांसाठी शाळा चालवतात. एका भागात बालवाडी, दुसया भागात कार्यालय अशी माण्डणी होती. अतिशय साधे कपडे घातलेल्या बायका आपल्या मुलांना नेण्यासाठी आलेल्या होत्या. कुठलाही भपका नसलेलं ते कार्यालय , आजूबाजूचा परिसर पाहून, काहीतरी उदात्त करण्यासाठी आसुसलेलं माझं मन एकदम खचलं. धीर एकवटून मी त्यांना माझ्या येण्याच कारण साम्गितलं. त्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज होती, आणि ते काम करण्याची माझी इच्छा होती. रेणूताईनी या विचाराचं स्वागतच केलं, पण त्यांनी माझा उतरलेला चेहरा, भरून आलेले डोळे बघितले आणि मडक्याच कच्चेपण ओळखलं त्याना दुसर्या भागातही शिक्षकाची गरज होतीच, तेव्हा तिथे मी काम करावं असं त्यानी सुचवलं
बोलण्याच्या ओघात त्या आपले २५ वर्षांचे अनुभव सांगत होत्या. प्रथम तर त्या वेश्या वस्तीतच एखाद्या गोणपाटावर बसून शिकवायच्या.मुलाना सांगायच्या, एवढ्या भागात थुंकू नका म्हणजे मला इथे बसून शिकवता येइल. एखादी बाई आजारी आहे म्हणून तिला औषधपाणी करत रहावं तर काही दिवसातच तिच्या मरणाची बातमी कळायची. किती गोष्टी ऐकताना माझं पांढरपेशी मन फ़ाटत होतं,पण त्या शांतपणे सांगत होत्या. मी हा माझा मूर्खपणा आहे हे जाणवत असतानाही त्याना म्हटलं, केवल सहनुभूती दाखवणं हा यावरचा मार्ग नाही हे मला कळतं पण... त्यावर त्या हसून म्हणाल्या, तोच तुमच्या माझ्यात फ़रक आहे, कुठेही केव्हाही जाण्यात मला संकोच वाटला नाही, कुठलीच गोष्ट करायला मी मागेपुढे पाहिलं नाही. आज माझ्या अनुभवाला आलं की गेल्या २५ वर्षात माझ्या उघड्या पर्स मधून एकदाच२५ रुपये गेले तर ते वस्तीने दुसया दिवशी चोर पकडून परत केले. इथे मला " साखर " आहे म्हणून बिन साखरेचा चहा आवर्जून दिला जातो आणि " आप टीचर हो, तो आपको यहा कुछ नही होगा " हा दिलासाही मिळतो. हा सगळा संवाद मी कदाचित पुस्तकात वाचला असता तर एक सुस्कारा सोडून मी पान उलटल असतं, कदाचित याला एक दर्प आहे असंही वाटल असतं पण आज पोटात ढवळलं, त्या शांत हसया चेहयामागची तपष्चर्या जाणवली आणि आपलं खुजेपणही !