Wednesday, May 30, 2007

हरिगावातले सण

मी लग्न होवून हरेगावला आले तेव्हा कारखान्याचा सरता काळ सुरू झाला होता आणि आपल्या हातातून वाळू सरकून जातेय हे फ़ार थोड्यांच्या लक्षात येत होतं. वरवर सगळं पूर्वीसारखंच चालू होतं. संध्याकाळी वाड्यांवरून डल्लॉप गाड्या जिमखान्यात येत, खेळणार्‍यांच्या आरोळ्या उठत, पण प्रमाण कमी होत होतं.पूर्वी जशी खेळायला टे. टे. चं टेबल मिळण्यासाठी किंवा बॅडमिंटनसाठी कोर्ट मिळण्यासाठी भांडणं होत, तसा काही प्रकार उरला नव्हता. पण तरीही हरेगावी दिवस म्हणजे झाडाच्या शेंड्यावरचे पोपटच भासत होते. तसेच उत्फ़ुल्ल. मग भले ते जग केवळ अधिकारीवर्गाचं का असेना.

जिमखान्यात चैत्राचं महिला मंडळाचे हळदीकुंकू, कांदेनवमी असे कार्यक्रम उत्साहाने साजरे होत होते. शे-सव्वाशे बायका आणि त्यांची मुलं जमून नुसती धम्माल करत.. पण सगळ्यात उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशचतुर्थी, दसरा आणि संक्रांत. त्या दिवसात म्हणजे आमच्या घरी जत्रा उसळत असे. माझे सासरे हे कारखाना सुरु झाल्यापासूनच तिथं कामाला होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणार्‍यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणपती सार्वजनिक असला तरी आमच्याकडे घरात लगबग आणि राबता चालूच राही. गणपतीच्या पूजेसाठी रोज सकाळी घरातून तबक जात असे. त्यात ठेवण्यासाठी सासूबाई सुरेख हार करत. कधी जाईचे, कधी जुईचे, कधी दुर्वांचे... अनंत चतुर्दशीला सगळ्या गावाला घरचा पंचखाद्याचा प्रसाद असे. त्यादिवशी गणपतीची मिरवणूक फ़र्लांगभर अंतरावर आलली की सास~यांची गडबड सुरू होई, ' बाई, (ते सासूबाईंना बाई म्हणत, आणि त्यांच्याशी कोकणीत बोलत) सगळां ठेवलसस मा ? प्रसाद ठेवलस ना भरपूर, गुरुजी येतीत आत्ता. काशीनाथ, चल लवकर दारात उभा रहा लवकर.' नुसता गोंधळ उडवून देत.

दसरा आणि संक्रांतीला तर ते आणि सासूबाई संध्याकाळी ५ वाजताच सगळं आटपून बसत . पध्दत अशी की दसर्‍याला लहानांनी सोनं लुटायचं आणि संक्रांतीला मोठ्यांनी तिळगूळ द्यायचा. मग बेलापूर गावातून ४, ५ किलो रेवड्या आणि किलो दोन किलो तिळगूळ आणला जायचा. रेवड्या भाऊंनी द्यायच्या आणि तिळगूळ सासूबाईंनी. पहिले भाऊंच्या खात्यातले हमाल यायचे ५ वाजता. मग जी रांग सुरू व्हायची ती रात्री १० वाजेपर्यंत. साधारण ७च्या सुमाराला म्हणजे फ़ुल्ल मारामारीच. फ़ाटकाकडे वाल्हा उभा असायचा. कारण वात्रट मुलं एकमेकांचे शर्ट घालून २,२ ३,३ वेळा रेवड्या न्यायला यायची. मग वाल्हाचा आरडाओरडा " ईईए ए, आल्ता न तू मघा, उजुक का आला रे ****." की आतून कोणीतरी वाल्हाला आठवण करून देत असे की आज ' ति्ळगूळ घ्या गोड बोला "चा सण आहे. मग थोडा वेळ शांतता असे. काही हमाल बायकांना, नव्या सुनेला घेऊन येत. मग त्या आत माजघरात येऊन बसत... नव्या नवरीला नाव घेण्याचा आग्रह होई. काही बायका अगदी आगगाडीसारखी लांबलचक नाव घेत. साधारण ९ पर्यंत हा कल्ला असे आणि मग अधिकारीवर्गाची दुसरी फ़ळी येत असे. त्यांच्यासाठी तिळाचे लाडू घरी केलेले असत. त्यापुढे जेवण आणि जेवतानाही कोण आलं कोण नाही याची चर्चा चालू असे. दसर्‍यालाही याच नाटकाचा प्रयोग असे, पण फ़रक एवढाच की घरात ढीगभर आपट्याची पानं जमा होत आणि दुसर्‍या दिवशी काशीनाथला आपट्याची पानं झाडावी लागत.

Friday, May 25, 2007

सीझन

साधारणपणे दसर्‍याच्या सुमाराला कारखान्याचा बॉयलर पेटवला जात असेआणि त्या दिवशी पूजा अर्चा करून समारंभाने गव्हाणीत ऊस टाकला जात असे. कारखान्याचा सीझन चांगला चालण्यावर सगळ्यांचं पोट अवलंबून असल्याने सगळा अधिकारीवर्ग सपत्निक हजर असे. आपल्याच घरातल्या समारंभाचा उत्साह सगळ्यांच्या देहबोलीतून ओसंडत असे. आता जाणवतं ते हे की या अशा समारंभाला कामगारवर्गाच्या बायका मात्र उपस्थित नसत. खर तर त्यांचं पोट तर जास्त प्रमाणात कारखान्यावर अवलम्बून होतं. पण काही काही गोष्टी आपण ' तशी पध्दत नाही ' म्हणून दुर्लक्ष करतो त्यातली ही एक . आमचे गुरुजीही मस्तच होते. कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून इतर देवतांना आवाहन करतानाच ते " शुगरदेवताय नम: " म्हणून मोकळे होत.कारखान्याचा सीझन चालू झाला की सगळं वातावरणच बदलून जाई. पहाट दुपार, रात्र अशा पाळ्यात पुरषांचं आयुष्य आणि देवा ब्राह्मणासमक्ष हाताला हात लावून 'मम ' म्हटलेलं असल्यामुळे त्यांचे डबे करण्यात आणि त्यांची झोपमोड होवू नये म्हणून मुलांचं ध्वनिप्रदुषण रोखण्यात बायकांचं आयुष्य गुंतून जाई. पोरांची अवस्था म्हणजे " ह्यो कोन बाबा आपल्या घरात रोज येतो ग आई, ' अशी होवून जाई. कारण बाबा घरी तेव्हा पोरं शाळेत आणि पोरं घरी तेव्हा बाबा एक तर झोपलेला किंवा कारखान्यात.
सीझन सुरू झाला की कारखान्याचा परिसर एकदम गजबजून जाई. कारखान्यासाठी लागणारा ऊस घेवून येणार्‍या डल्लॉप गाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण [ बैलगाडीला डनलॉप टायर्स लावले की डल्लाप गाडी होते.] ऊस लेबर वाहून नेणार्‍या ट्रक्सचा फ़रफ़राट, वातावरणात भरून राही. साखरेची पोती, बगॅसचे गठ्ठे वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या वॅगन्स छोट्या रुळांवरून थेट श्रीरामपूरहून कारखान्याच्या दारात उभ्या रहात. रस्त्यांच्या कडाम्ना ऊस तोडणी कामगारांच्या त्रिकोणी आकाराच्या तट्ट्याच्या झोपड्या उभ्या रहात. अगदी पहाटे किंवा सांजला त्यांच्या चुलीतला जाळ ढणढणत राही, भाकरी आणि कोरड्यास करायला. संध्याकाळ कधी कधी दारू प्यालेल्या बाप्यांच्या गुरगुराटात आणि मार खाणार्‍या बायांच्या कलकलाटात मिसळून जाई. सगळीकडे रसाचा गोड वास आणि नवीन माणसाचं डोकं उठवणारा मळीचा दर्प दरवळत राही. पुरुषांच्या बोलण्यात क्रशिंग, रिकव्हरी असे शब्द वारंवार येऊ लागत.
कारखान्याचा सीझन सुरू झाला की घरातली बायका मुलं खूष असत.कारण आपली आणि आजूबाजूच्या शेजीबाईंचे मुलं घेऊन कारखाना बघायला जाणं हा एक मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झालेला असे. मग मुलांनी आतली अजस्त्र मशिन्स भयचकीत चेह्र्‍याने न्याहाळण , पोटभर रस पिणं गरम गरम साखरेचा बोकणा भरून खिदळणं हे सगळं सगळं बरेच दिवस चर्चा करायला पुरत असे. आमच लग्न ठरल्यानंतर पुण्यात आम्ही भेटल्यानंतर माझे पाय रसवंतीगृहाकडे वळत असत.कारण कोल्हापूरला असली न्हाई ती झेण्गटं नव्हती, कारन" रस कुट असा पितात व्हय ? सरळ रसाचा तांब्याच एका दमात रिकामा करायचा असतोय की राव, " ही कोल्हापुरची विचारधारा तेव्हा होती. पण मी कितीही लाडिकपणे " आपण रस पिवू या ? " असं विचारलं तरी " तू घे ना मी सोबत करतो " असं उत्तर यायचं मग मीही मनातल्या मनात " अरसिक किती हा मेला " असं म्हणत उघड " नको राहू दे तुला नको तर आपण दुसरं काही तरी घेऊ" असं म्हणत असे. पण पहिला सीझन सुरू झाल्यानम्तर नवर्‍याच्या नकाराचं कारण लक्षात आलं. सहा महिने रसाच्या वासात डुंबत राहिल्यानंतर तो तरी बापडा परत रस कसा पिणार ?
पण हळू हळू ३,४ महिन्यांनंतर याचाही थकवा यायचा. मुलांच्या वार्षिक परिक्षा झालेल्या असायच्या आणि मीही कारखान्याचा सीझन कधी सम्पतो आनि आपण मुलाम्च्या मामाच्या गावाला कधी निघतो याची वात बघायला लागायची, मुलांच्या बरोबरीने !
draft

Sunday, May 20, 2007

शब्द

पारिजातकाचा सडा,
कधी पाणोठ्याचा जलघडा,
तोरड्यांची रुमझुम,
कधी कंकणांची किणकिण,
पहाटेचा पक्षीरव,
कधी सायसाखरेची कव !
करी प्रतोदाचा वार,
प्रत्यंचेचा टणत्कार,
दर्पाचा बुभुत्कार,
कधी विखारी फ़ुत्कार !
शब्द जहरीला डंख ,
कधी तेजाळला पंख !
रती मदनाचा संग,
कधी अनंग नि:संग !
शब्दा शब्दानेच बने मना मनाचा साकव
शब्द जोडे अन तोडे नीट ध्यानामधी ठेव !

Saturday, May 19, 2007

पियाका घर --हरेगाव

हरेगाव ! बेलापूर हा महाराष्ट्रातला पहिला खाजगी साखर कारखाना. तेथील अधिकार्‍यांसाठी व कामगारांसाठी बांधलेली वसाहत म्हणजे हरेगाव. ए, बी, सी, डी अशा टाइपच्या घरात विभागलेली. एक वाडी, दोन वाडी, पाच वाडी, आठ वाडी अशा वाड्यांनी वेढलेली. जगप्रसिध्द आर्किटेक्ट बोधे यांच्या आखीव रेखीव बांधकामात बंदिस्त झालेली.अस समजलं की वारणानगरचे तात्यासाहेब कोरे आपल्या कारखान्याच्या वसाहतीचं बांधकाम सुरु करण्यापूर्वी इथली वसाहत बघून गेले होते. ए टाइपचे बंगले ४ बेडरूम्सचे होते, बी टाइपचे २ बेडरूमचे तर सी टाइपचे १ बेडरूमचे होते. एक नंबर बंगला व डायरेक्टर्स बंगलो हे एक वेगळच प्रकरण होतं. आधीच अमचं दिशाज्ञान दिव्य, त्यात ते गर्द झाडीत लपलेले बंगले ओळखणं म्हणजे घरच्यांना एक गमतीचा विषय झाला होता.कोल्हापूरचं घर म्हणजे पायर्‍या संपल्या की रस्ता या प्रकारचं असल्यामुळे मागे पुढे लाम्बरुंद बागा ही माझ्या दृष्टीने एक अद्घुतरम्य गोष्टच होती.इथलं सगळं आयुष्य कारखान्याच्या भोंग्याला बाण्धलेलं होतं. सकाळी साडेसात्तच्या भोंग्याला माझे सासरे घराबाहेर पडत . १,२ मिनिटांच्या अंतराने त्यांच्या वेळचे सगळे सिनियर्स निघत. ८ च्या सुमाराला दुसरी फ़ळी , म्हणजे माझ्या नव‍याच्या वयोगटाचे लोक, निघत. त्यातही काहीजण त्या ढेंगभर अंतरासाठी सायकलचा वापर करत. १२ वाजता परत येताना मात्र सगळे एकदम बाहेर . परत २ च्या भोंग्याला हाच प्रकार. मोठ्यांची वाट लहानांनी अनुसरावी. मात्र साडेपाचच्या भोंग्याला ' पळा पळा कोण पुढे पळे तो'.एकम्दरीत एक संथ साध आयुष्य म्हणजे हरेगाव. कारखान्यात जायच्या यायच्या वेळी जी काही मनुष्यजातीच्या अस्तित्वाची जाणीव होई तेवढीच. एरवी सारे कसे शांत शांत !आता आठवलं की हसू येतं, पण शहरात वेगवेगळ्या उद्योगात सतत मग्न असलेल्या मला त्या शांत वातावरणात रुळायला फ़ारसा त्रास कसा झाला नाही ? की स्त्रीला कोणत्याही परिस्थितीशी पटकन जुळवून घ्यायचं नैसर्गिक वरदान असतं ? की तिच्या मनावर तसं बिंबवलेलं असतं ? कोण जाणे, पण एकंदरीत नववधु ची भूमिका मी मनापासून एन्जॉय करत होते खरी.म्हणजे असं की आम्ही दोघे सम्ध्याकाळी फ़िरायला बाहेर पडलो की आजूबाजूच्या मुली ' वहिनीला' बघायला गर्दी करत. त्यातली एकजण एकदा ' मेड फ़ॉर इच अदर ' म्हणून हसली. एरवी मी 'थॅंक्यु ' म्हणून आणखीही पी जे. टाकला असता पण नव्या नवरीने अधोमुख, मितभाषी असाव हे पार कण्वापासून बजावल गेलेल असल्यामुळे मी आपली शाम्तच राहिले. पण पुढे ओळख झाल्यावर या माझ्या ' नणदा ' मला चिडवायच्या, " वहिनी, आम्हाला वाटलं हो्तं तुम्ही अगदी गरीब आहात , पण तुम्ही म्हनजे लई भारी आहात हं " काय करणार स्वभावाला औषध नाही. आणखी एक म्हणजे हरिगावात सगळे मोठे लोक काका, काकी आणि त्यापेक्षा लहान दादा वहिनी असत. त्यामुळे एका मोठ्ठ्या कुटुंबाचच वातावरण तिथे होतं. आणि त्याची सुरवात दुसर्‍या दिवसापासूनच झाली.
दुसर्‍या दिवशी आम्हा सासू, सुनेचे नवरे कामावर गेल्यानंतर दर ५ मिनिटाम्नी दारावरची बेल वाजत होती. नवी नवरी असल्यामुळे डोअरकीपिंगशिवाय मला दुसरं काहीच काम नव्हतं,. येणारी व्यक्ती ' बाई आहेत ? ' असं अगदी अदबीनं विचारायची. मग मी सासूबाईंना बोलावलं की् ती व्यक्ती त्यांच्याशी कुजबुजत काही तरी बोलायची. मग त्या हसत माझ्याकडे वळून म्हणायच्या, ' अरे, मग तूच दे ना लहान्या बाईंना. ' मी बुचकळ्यात की या लहान्या बाई कोण . तोपर्यंत त्या व्यक्तीने माझे पाय घट्ट पकडलेले असायचे आणि ' 'अहो असं काय, ' असं म्हणेपर्यंत पायावर डोकं टेकलेलं असायचं. झटकन उठून स्टीलची वाटी, ताटली, पेला असं काहीतरी माझ्या हातात कोंबून लाजून उभी असायची. सासूबाई डोळ्यांनी खुणावायच्या, 'असू दे.' ' मला फ़ार ओशाळल्यागत व्हायचं. पण जस जशी तिथे रुळत गेले तस तसं कळत गेलं की ही माणसं यायची ते केवळ रेडकर साहेबाची सून बघायला. कारण रेडकर साहेबाने त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती. प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. आपल्या घरातल्याच पोराचं लगीन होवून नवी नवरी घरी आली आहे आणि आपण तिचं स्वागत करायचं आहे हीच एक आपुलकीची भावना त्यामागे असायची. खर साम्गायचं तर हरेगावातले पहिले १५ दिवस आम्ही दोघे घरी जेवलोच नाही. अगदी मॅनेजरपासून सामान्य कामगारापर्यंत सगळ्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो. आणि त्या बायांचं ते अलबला करणं, पुरुषांचं अदबीनं बोलणं हे सगळं मला एखाद्या जुन्या मराठी सिनेमाचाच भाग असल्याप्रमाणे वाटायला लागलं होतं.
ही कारखान्याची वसाहत असल्यामुळे सगळं आयुष्यच भोंग्याच्या वेळांशी बांधलेलं असे. जेव्हा 'सीझन ' चालू नसे, तेव्हा आयुष्य अगदी संथ असे. सकाळी ब्रेकफ़ास्ट घेऊन कारखान्यात जावं, जेवायला १२ वाजता घरी यावं. वामकुक्षी करून २ वाजता परत जावं ते साडेपाच वाजता चहा खाणं करायला परत घरी. सहा, साडेसहाला फ़िरायला किंवा जिमखान्यात खेळायला बाहेर पडावं आणि आठ, साडेआठला परत घरी. बायका महिलामंडळ, भजनीमंडळ यात जीव रमवत, अधिका‍यांच्या बायका ब्रिज , टेबलटेनिस खेळायला जिमखान्यात जमत. सगळा माहोल अगदी एखाद्या समारंभासारखा असे. मुलांना संभाळायला खात्याचे कामगार असत. तेच घरी स्वयंपाकही करत. निदान स्वयंपाकात मदत करत. रात्री १० वाजता जिमखाना बंद होई आणि सगळ्या बंगल्यांवर झाडांची गर्द छाया पसरून राही, निस्तब्ध!
सीझन चालू झाला की वातावरण एकदम बदले,---
draft

Wednesday, May 9, 2007

नैहर छुटोही जाय

हरिगांव हे दोन अडिचशे उंबर्‍यांचं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आहे याची १९७३ सालापर्यंत मला खरच कल्पना नव्हती.पण माझे तीळ तांदूळ या गावचे आहेत हे माझ्या निकटवर्तीयांना समजलं, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, " बघ ग बाई, नगर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष, डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पाणी आणायला भटकावं लागेल हां. " अशी होती. पण ' सावरे अयजय्यो ' च्या त्या काळात डोक्यावरचा हंडा उतरायला साजण असणार ही कल्पनाच मनाला गुदगुल्या करत होती.कोल्हापूरसारख्या हिरव्यागार गावातून टळटळीत उन्हात प्रवास करून श्रीरामपूरच्या रखरखीत बस स्थानकावर मी पोचले तेव्हा दुपार ढळत होती. अजून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या साखरकारखान्याच्या वसाहतीत आम्हाला जायच होतं. कारखान्याची जीप काही कामासाठी श्रीरामपुरात आली होती, तीच आम्हाला मुक्कामी घेऊन जाणार होती. इथल्या बस स्थानकावर आल्यावर मला समजलं की ज्या हरिगावचा मुरलीरव मला इथवर खेचून घेऊन आला होता, ते ' हरि'गाव नसून 'हरे'गाव आहे. त्यामुळे प्रवासाचा चिकटा अंगावर आणि कुठे येऊन पडलो ही ठुसठुस मनात घेऊन ' हरे राम ' म्हणत हरेगावला जाणार्‍या जीपमध्ये बसण्याखेरीज गत्यंतर नव्हतं.
श्रीरामपूर संपता संपता रस्त्यावरचा प्रकाश विरळ होवू लागला. वाटेवर अंधुक अम्धुकसे दिवे मिणमिणायला लागले.गाडी हरेगावकडे जाणार्‍या रस्त्यावरून दणदणायला लागलीआणि बघता बघता मिट्ट अंधार झाला. त्या निर्मनुष्य रस्त्यावरच्या अंधाराचं मनावर दडपण यायला लागलं. नवर्‍याचा उल्हासलेला आवाज कानाशी गुणगुणत होता, " हा वाकडा लिंब, इथे मोठा दरोडा पडला होता. ही तीन वाडी, हा ब्राह्मणगाव फ़ाटा, हे स्टाफ़ क्वार्टर, हे हरळीगेट आणि हे----'असं म्हणत कोपर कुशीत घुसल आणि आवाजातल ' डाबर हनी ' वाढलं तेव्हा लक्षात आलं की आपलं घर आ-----ल. नपेक्षा मिट्ट अम्धारात, जीपच्या दिव्याच्या झोतात, वाकड्या लिंबापासून हरळीगे्टपर्यंत सगळीच ठिकाणं माझ्या दृष्टीने सारखीच ' प्रेक्षणीय' होती. जीपमधून उतरता उतरता व्हरांड्यातल्या स्वच्छ प्रकाशात मला दिसली ती पिवळ्या भिंतीवरची हिरवीगार मनीप्लांट आणि जाणवला प्रवास करून थकलेल्या मनाला तजेला देणारा मोगर्‍याचा सुगंध. आता हेच ' आपलं ' घर ही खूण मनावर एक गंधित मोहोर उमटवून गेली.
सकाळ झाली आणि अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना दिसला मागील दारी सळसळणारा पिंपळ. ताडकन उठून खिडकीतून डोकावले तर चिंच, पिंपळ, उंबर एकाच खोडातून आकाशाकडे झेपावलेले. असच झाड रेडकरांच्या मूळगावी, रेडीला, आहे हे समजल्यावर आपल्या सासरचे कोणी आदि पुरुष छत्र धरून आहेत की काय अशी भावना जागी झाली. पुढच्या दारी आंबा, जाम्भूळ, यांची सावली. ट्विन बंगल्यांची सीमारेषा ठरवणार्‍या तारेला लागून मोगर्‍याची रांग.बागेत गुलाब , जाई, जुई, कुंद, चमेली , अबोली यांचा बहर.रामफ़ळ , सीताफ़ळ, आवळा, नारळ, विलायती चिंच . ही सगळी रेलचेल क्षणा क्षणाला डोळे विस्फ़ारायला लावत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही उंच वृक्ष सावली धरून हवेतला उकाडा कमी करण्याचा प्रयत्न करत होते. सम्पूर्ण कॉलनीतल्या लांबरुंद बागा आणि आखीव रेखीवपणा बघून आपण "कुठे" येऊन पडलो ही खंत केव्हाच पुसली गेली. कारखान्याच्या या 'बी' टाइपच्या बंगल्यात मी ७३ मध्ये रहायला आले आणि आयुष्याची १७ वर्षं, कारखाना बम्द पडल्यावर पोटासाठी गाव सोडेपर्यंत, तिथेच राहिले.
draft