Tuesday, April 10, 2007

गोष्टी आठवणीतल्या....३

१ली ते ४थी या चार वर्गाना मिळून दोन शिक्षक होते. कुलकर्णीबाई विधवा होत्या. नऊवारी लुगडं, पांघरून घेतलेला पदर. कपाळावर हिरवं गोंदण.दुसरे तारदाळकरगुरुजी. धोतर, कोट टोपी या वेषातले. ते मुख्याध्यापक असल्याने ४थीला शिकवत. आम्ही ४थीत गेल्यानंतर पहि्ल्याच दिवशी त्यांनी आम्हाला बजावलं होतं, 'मला गुरुजी म्हणायचं. सर म्हणाला तर थोबाड फ़ोडीन. ' आमच्या काळी ' समजावून ' देण्याची हीच पध्दत लोकमान्य होती. पण कधी कधी खुशीत असले, आणि कोणी ' स---र ' अशी हाक मारली की हसत हसत म्हणत, ' सर, सर, झाडावर, घराच्या कोलावर ".[ या ओळी असलेला खारुताईचा धडा आम्हाला १लीत होता.]
४थीत गेल्यावर शाईची दोत आणि टाक या प्रकाराची एक भर आमच्या दप्तरात पडली.त्यातली शाईची दोत हातात धरून न्यावी लागे. शिवाय शाईचा ठिपका पडला तर टिपण्यासाठी गुलाबी रंगाचा टिपकागद बरोबर बाळगावा लागे. माझे वडिल लिहून झालं की त्यावर समुद्राकाठची रेती त्यावर भुरभुरत आणि कागद झटकत. ती रेती वर्गात नेऊन तशी झटकायची हे माझं एक (अधुरं) स्वप्न होतं तेव्हाचं..लिहिताना टाक शाईत योग्य प्रमाणात बुडवायचा, कागदावर योग्य प्रंमाणात दाब देऊन लिहायच या प्रकारात उजव्या हाताची पाची बोटं शाईने बरबटून निघत. ती मात्र डोक्यावरून हात फ़िरवून केसांना पुसायची असत. त्यामुळे पेपर लिहिताना प्रत्येकीचा हात थोड्या थोड्या वेळाने डोक्याकडे . यात शाईचा भाग किती आणि नशिबाला दोष देण्यासाठी किती ते निकालाच्या दिवशी कळे. परिक्षेचे पेपरही घरीच शिवलेले असत.दोन आखीव ताव अर्धे दुमडून मधोमध एक टाका घालून शिवलेले असत., आणि खालचा भाग ब्लेडने किंवा पेपरकटरने कापलेला असे. पहिल्या पानाच्या उजव्या कोप‍य़ात वडिल भावंडाकडून 'सुवाच्य' अक्षरात नाव घालून घेतलं की परिक्षेची तयारी पूर्ण होत असे. मला मात्र एका ठिकाणी बसून पेपर सोडवणे ही शिक्षाच वाटे. शक्य तितक्या लवकर त्या बिलामतीतून सुटका करून घ्यायची माझी इच्छा असे. मला आठवतं एकदा येत असूनसुध्दा कंटाळा आला या सबबीवर मी पेपर टाकून घरी आले होते, तेव्हा भडकलेल्या भावाला समजावताना मला पोटाशी धरून आई हसत म्हणाली होती," जाऊ दे रे, मार्कांचं काय एवढं ? तिला समजलय ना ? मग झालं तर.! " धन्य ती माता! अशी आई सगळ्यांना मिळो. पण आज लक्षात येतय की त्यामुळेच मी साहित्य, कला, खेळ या सर्वात रुची घेऊ शकले. त्या वेळचे संस्कार आजही उमलून येतात भुईचाफ़्यासारखे! अंतरंग भेदून. अंतरंगानजिकच, अंतरंग सुगंधित करणारे!

3 comments:

Chaitra said...
This comment has been removed by the author.
Chaitra said...

छानच लिहिलंयस! मोठ्याई म्हणजे एकदम सहीच बाई होती ग! आधी लिहिलेलं बरंचसं ऐकलेलं होतं पण हे पेपर अर्धा सोडून यायचीस म्हणजे अतीच झालं. बापूंनी फारंच लाडवलेलं होतं. पण याचा अर्थ आमच्यातली tenacity ही शिरोडकर familyची देण नसून रेडकर familyची आहे. (मोठ्याई म्हणजे आजगावकर ना मुळची!!!) नाही का? ............................................................................................................................................................................
sorry कधीतरी संधी मिळते ती सोडून कसे बर चालेल!!! हा! हा! हा!

prabhavati said...

हा भागही छानच झालाय.आणि हे विशेषच छान ! :
धन्य ती माता! अशी आई सगळ्यांना मिळो. पण आज लक्षात येतय की त्यामुळेच मी साहित्य, कला, खेळ या सर्वात रुची घेऊ शकले. त्या वेळचे संस्कार आजही उमलून येतात भुईचाफ़्यासारखे! अंतरंग भेदून. अंतरंगानजिकच, अंतरंग सुगंधित करणारे!

आपल्यावर जे संस्कार झाले, आता वाटतं, आपण करू शकलो का इतकं आपल्या मुलांवर ?की ती मिडियाच्या आहारी जास्त गेली ? कुणास ठाऊक !