Thursday, December 5, 2013

चढत जाणाऱ्या इमारतीला आणि खचत जाणाय्रा आभाळालाही

माझ्या गल्लीच्या पूर्वेकडचा एका बंगला हल्लीचा मेला.
त्याच्या  सभोवतालची बाग, बागेबाहेर उभे अशोकाचे वृक्ष
जे वादळी पावसाळया रात्री भुतासारखे झुलत,
केव्हाच दगड विटा मातीखाली दफन झाले.
मी........ माझ्या बागेतल्या झोपाळ्यावर झुलत
रोज साठवते डोळ्यात एक एक मजला चढताना
त्यांच्या स्लॅबला टेकू देणारे वेड्यावाकड्या गाठींचे बांबू
इतक्या लांबूनही घुसतात माझ्या डोळ्यात
सोलवटतो डोळा...... आतल्या सूक्ष्म रक्तपेशींनाही
घासत जातात ते, उन्मत्तपणे.. उद्दामपणे
मी?   मी हताश..
पहात रहाते निळ्या आभाळाचा एक एक तुकडा हरवताना
मातकट, धुरकट, दणकट इमारतीमागे चिणला जाताना
भिंतीमागे इंचा इंचाने दिसेनाशी होणाऱ्या अनारकलीसारखा .
आठवत राहते

माझ्या घराच्या पायरीवरून , चहाच्या घोटा घोटाबरोबर
अंगभर लपेटून घेतलेली  रक्तवर्ण उजळत जाणारी पूर्वा
नि:शब्द झावळ्यांनी केलेला संवाद .....

पटवत राहते स्वत:ला
उजळतील दिवे त्या बहुमजली इमारतीतही
गरागरा फिरणाय्रा पंख्यामागेही असेल पूर्वेकडून येणारी झुळूक
पण .....पण
वेडं मन मानत नाही
ते मात्र बसतं तो दिसेनासा होणारा आकाशाचा तुकडा  कवटाळून !