Thursday, June 18, 2015

आठवणीतली माणसं अशीही

गतजीवनात फेरफटका मारताना साधारणपणे आपल्याला आपले आई - वडील , भाऊ - बहीण , मित्र - मैत्रिणी आठवतात. त्यांच्या सहवासात घालवलेले बरे वाईट क्षण आपण परत अनुभवतो., मनातल्या  मनात . पण आपल्या घरच्या मोलकरणी किंवा इतर सेवा पुरवणारे लोक  , दारावर येणारे भिकारी , बहुरूपी , फकीर यांनीही आपल्या मनाचा छोटासा का होईना कोपरा व्यापलेला असतो असं माझ्या  मनात आलं आणि मग लहानपणापासून भेटलेल्या अशा कितीतरी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या .
कोल्हापूरला माझ्या लहानपणी एक म्हातारीशी मोलकरीण होती. ती आठवण्याचं कारण मोठ गमतीदार आहे. आमच्या गल्लीत आम्ही खूप मुली होतो . मग मध्येच कधीतरी साड्या नेसायचं ठरायचं . माझी आई नेसायची नौवारी साडी. ती ७ - ८ वर्षांच्या मुलीला कशी नेसवता येणार ? मग माझ रडणं आणि आईच करवादण  असा जंगी कार्यक्रम चालायचा . त्या कार्यक्रमाला ही मोलकरीणही ( तिच नाव आठवत नाही आता मला ) हजर असली तर आईला म्हणायची , " दमा हो वैनी , उगा कावू नगासा लेकराला . मी नेशिवतो लुगड .आना  हिकडं ." मग ती काय जादू करायची नकळे . पण पोटावर नि-यांचं भलमोठ केळं  वागवत आणि नि-यांचा बोंगा संभाळत  मी मैत्रीणीत मिसळायचे . तशीच आमच्या शेजारच्या कुलकर्ण्याकडे एक जोगतीण यायची . तिचं भंडारा लावलेल कपाळ, कमरेपर्यंत आलेले जटेचे केस , मधूनच दात विचकायची सवय असलेला तिचा चेहरा मला स्पष्ट आठवतो . आता तिच्याबद्दल कणव वाटते , पण तेव्हा तिची भीती वाटायची .ती गोष्टी मात्र मस्त सांगायची .आपल्या गावरान भाषेत कथेतली पात्रं ती हुबेहूब उभी करायची .लोकसाहित्याची आवड कदाचित तिच्यामुळे माझ्यात रुजली असावी . परटीणबाई आमचे कपडे धुवायची , पण आईला बाहेरच्या जगात आजूबाजूला चाललेल्या घटनांची माहिती पुरवणं हाही तिच्या कामाचाच भाग असावा बहुधा. तसंही ६० वर्षांपूर्वी घरातच जुंपलेल्या स्त्रियांना अशा " मैत्रिणी " असणं गरजेचच नव्हत का ? परटीणबाईचे मालक दर दिवाळीला पटका बांधून बायको बरोबर ओवाळणी मागायला यायचा . भल्या पहाटे . आणि परटीणबाई पुरुष माणसांना तेल लावायची. ( जे आमच्या घराच्या कोणाही पुरुषाने कधीच लावून घेतलं नाही . ) या परटाच आमच्या मागच्याच गल्लीत दुकान होत . तिथे कपडे आणायला गेल तर कधी कधी तो कोळशाची इस्त्री पेटवत असायचा . हळू फुंकर घालून निखारे फुलवायचा . कधी राख उडायची तर कधी ठिणग्या  . तापलेली इस्त्री आधीच पाणी मारून ठेवलेल्या कपड्यांवरून चुरचुरत फिरायला  लागली की  कपड्यांच रूप पालटायच आणि एक खमंग वास दरवळायचा मस्तपैकी .
आमच्या शाळेत बापू , केशव आणि बक्षु नावाचे तीन प्यून होते . ही सगळी मंडळी कोल्हापूरच्या दरबारी खिदमतीत मुरलेली होती. त्यामुळे त्यांचं बोलणं मार्दवपूर्ण , हसणं मंद असायचं . त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम असायचं . पण बक्षु दिसायला भयंकर आणि वागायला तुसडा होता . त्यामुळे आमच्या लेखी तो " बक्षा " होता . त्याच्याशी संपर्क शक्यतो टाळला जायचा .
पुढे कॉलेजात दत्तू , गणपत आणि तयाप्पा असे ती प्यून होते . एकजात सगळे भगवा फेटा ( कोल्हापुरात याला पटका  म्हणतात.) बांधणारे पाठीवर शेमला सोडणारे आणि धोतर नेसणारे होते . ही  गोष्ट ५० वर्षांपूर्वीची आहे. तयाप्पा खूप प्रेमळ होता. तो वारला तेव्हा कॉलेजातली मुलं मुली रडली होती. त्याची मुलगी सुबक वाकळ ( गोधडी ) शिवायची . एकसारखे टाके बघत रहावेसे असत. ती माझी मैत्रीण होती. तिचं शिवण मला खूप काही शिकवून गेलं . तरुण वयात दत्तू पहिलवान होता . उंचापुरा राकट दत्तू  बघूनच पोर गपगार व्हायची . एकदा तर त्याने कॉ लेजच्या ग्राउंडवर कोण्या मुलाने शिवी दिली म्हणून आधी त्याला चांगला तुडवला आणि त्याची चड्डी काढून घरी पाठवला होता. वर दम दिला. " जा ___ -___, चड्डी न्याला तुज्या बाला पाठिव . " त्यामुळे दत्तू आमचा आधार होता. शिवाय स्पोर्टस्  डिपार्ट्मेंट्चा एक प्यून होता . तो आमच्या सामन्यांच्या आधी पायाला असा मसाज करायचा की  पायाला पंख फुटायचे. पण हे करताना नजर खाली आणि स्पर्श सात्विक . मर्यादा , सभ्यतेचा तो आदर्श होता .
लग्न झाल्यावर सासरी काशीनाथ , वाल्हा, दगडू भेटले. पण त्यातल्या दगडूने मनात घर केलं . दगडूमामा घरातलेच एक व्यक्ती होते . नव्या सुनेला सासूचा रोष सहन करावा लागू नये म्हणून ते सतत मला सुचना करत आणि तेही  शहाणपणाचा कुठलाच अभिनिवेश न बाळगता . " लहान्या बाई , बाईना ताकात  लोणी राहिलेलं आवडत नाही . लोणी निपटून काढा . लहान्या बाई दादाना ढोबली मिरचीची भाजी पीठ पेरून आवडते. "अशा त्याच्या सतत सुचना असत . स्वयंपाक, शिवणकाम , बाजारहाट , व्यापार सगळ्यात तो निष्णात होता . अदबशीर आणि मृदु . मनाबाई कलाबाई , शांताबाई सगळ्यांनी प्रेमच दिलं . माझ्या मुलांना खेळवलं दुखाण्या  खुपण्यात  रिझवल . शांताबाई तर आमच्या मुलांना न्हाऊ माखू घालणारी यशोदाच होती . ह्या सगळ्यांच्या लुगड्याचा शेव आमच्या अंगणी झुलला हे आमचं भाग्यच . ह्यांनी जात्यावर बसून ओव्या म्हटल्या , गाणी गायली . खिनभर टेकून आपल्या संसाराची चित्तरकथा सांगितली.ह्यांच्या लुगड्याला  गावाच्या काळ्या  आईचा वास होता .नागरी शिष्टाचारापेक्षा वेगळी  आपुलकी होती.
आणखी आठवतात ते दोघेजण . एक भिकारी दारी येऊन सुरात ओरडायचा , "म्हातारीला दात नाही . शिरा वाढा . " त्याला आम्ही तेव्हा हसायचो. पण आता वाटतं की  दुर्दैवाच्या फे-यात अडकलेलां तो कोणी तालेवार होता की  काय ? दुसरा एक फकीर होता. झोळीत  मोरपिसांचा मोरचेल एका हातात कटोरा आणि दुस-या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या पट्ट्या . त्या वाजवून तो सुरेख नाद करायचा.. आपण जर त्याला कधी " बाबा , माफ करो " अस म्हटलं तर म्हणायचा , " देगा उसका भला , न देगा उसकाभी भला. "
कुठे गेली ही असली माणसं ? की फक्त आठवणीतले आभास होते ते ?        

Tuesday, February 24, 2015

अघळपघळ गप्पा

नव्या रूतूची चाहूल वातावरणातूनच मिळते. थंडीच्या दिवसात सकाळचे साडेपाच म्हणजे साखरझोपेचीच वेळ. त्यावेळी अंगावरचं जाड पांघरून बाजूला करून अंथरूण  सोडणा-याला खरतरं शौर्यपदकच द्यायला पाहिजे, पण आता बघाव तर बाहेरच्या गडदपणात थोडीशी पांढूरकी छटा मिसळलेली असते. थंडीतल गुडीगुप्प वातावरण आता नसत. वेगवेगळ्या आवाजात पक्षीजन  जनांना उठवत असतात. ( खर तर पिल भुकेने चीवचीवाट  करत असतात आणि आया करवादत असतात, " थांबा रे जरा. बाबा येईलच आता किडे घेऊन. पण आपली मनुष्यजात. सर्वश्रेष्ठ प्राणीमात्र. तेव्हा सर्व चराचर आपल्यासाठीच. हा आपला समज असल्याने पक्षीपण आपल्यालाच उठवायला गाणं गाताहेत असा आपला समज) असो. पण मस्त वाटत ना असं जाग व्हायला? तर हा आताचा वातावरणातला बदल सुखद असतो. म्हणजे झोपताना पंखा १ वर आणि पहाटे  अंगावर पातळ दुलई ( रजई  नव्हे)
उन्हं चढायला लागली तरी अजून सनकोट आणि  मोज्यांची  चलती सुरु झालेली नाही, पण दुपारच्यावेळी मात्र उसाचा ताजा रसस गल्लोगल्ली फिरायला लागलाय. आमच्या लहानपणी गु-हाळाशिवाय रस मिळायचा नाही . त्यामुळे त्याची अपूर्वाई होती. आणि कोल्हापूरचे गु-हाळवाले मामा " हं  एवडयान काय हुतंय. येवडा तांब्या संपवल्याबिगर उटायच नाही पावन " असा प्रेमळ आग्रह करायचे आणि पावन पण अनमान न करता ती रसाची चरवी फस्त करून गरम गरम सायीचा गुळ दाताखाली दाबायचे.
शिमगा झाला की ऊन पेटायला लागत. शिमगा. होली नव्हे.शिमग्याला होळी पेटवायची. होळीसाठी लाकडं गव-या चोरून आणायची परंपरा ( ? ) होती. नाहीतर दारोदार फिरून मागायची अमक्या तमक्या देवाच्या नावान ५ शेणी असं दारात जाऊन ओरडायच मग घरची गृहिणी पुढच संकट ओळखून गव-या आणून द्यायची. कारण न दिल्यास घरधन्याच्या नावान बोंब मारली जायची आणि रात्रीची पळवापळवी ती वेगळीच. कोल्हापुरी भाषेत गव-या म्हणजे शेणी. एकदम योग्य नाव. शेणापासून  गोल गोल भाकरीसारख्या आकाराच्या करतात आणि उन्हात वाळवतात त्या शेण्या  त्या विकायला यायच्या तेव्हा त्याचं माप असं असायचं. २० शेण्याचा १फड आणि भाव ५ फडाचा असायचा. म्हणजे रुपयाला ५ फड (  १०० शेणी ) आणि वर ५ शेणी. कारण मापटयावर चिपट  म्हणजे मापभर धान्य घेतल तर त्यावर मुठभर धान्य तसच दिल जायचं. १ शेर दुध घेतलं की वाटीभर वर घालायचा गवळी. शाळेचा परीक्षेचा अभ्यास उन्हामुळे आलेल्या झापडीतूनच व्हायचा आंणी मग उन्हाळ्याची सुट्टी.    मग घर ही   जागां फक्त जेवायचं आणि झोपायचं ठिकाण बनायचं.आयांच्या भाषेत गिळायच आणि पासल पडायचं ठिकाण. सकाळ मुलांच्या गोटया  विटीदांडू  सुरपारंब्या यात जायचा. मुली जिबली ठिक्करपाणी ... सहा चौकोन आखून फरशीच्या तुकड्याने खेळायच्या किंवा दोरीच्या उडया. पण दुपारी मात्र कोणा एकीकडे जमायचं. जिची आई प्रचंड कनवाळू असायची तिच्याकडे.मग पत्ते, गजगे बिट्ट्या काचाकवड्या यांचे डाव रंगायचे. गजगे म्हणजे सागरगोटे विकायला कोंगटीणी  यायच्या ओरडत, " काय बिब सुया कंगव गजग घ्येता का बाईईईईईई मग भाकरी देऊन तिच्याकडून गजगे घ्यायचे. गोल गुळगुळीत निळसर झाक असलेले राखाडी  गजगे .किती फुकट होती ना आमची खेळणी! हातात घालायच्या काचेच्या बांगड्या फुटल्या की ते तुकडे काचाकवड्या खेळायला घ्यायचे. त्याचा पट म्हणजे बसायचा लाकडी पाट  उलटा करून त्यावर खडूने आखायचा. त्याचे फासे म्हणजे चिंचेचे  चिंचोके. ते मधोमध फोडले की झालं. पांढरी बाजू वर की  ४ आणि काळी बाजू वर कि  ८.पण त्याबरोबर राखणीच पण काम असायचं. पापडाच, धान्याच वाळवण अंगणात गच्चीत असायचं. पापडाच्या लाट्या तेलात बुडवून खायला मिळणार या आशेने हे खेळ आम्ही आडोशाला बसून खेळत असू आम्ही वयाच्या ८ -१० वर्षापर्यत . मग या खेळांची जागा पुस्तकांनी घेतली आणि हे खेळ आम्हालाही बालिश वाटू लागले.  

Friday, February 6, 2015

बदलातली गम्मत

          बसल्याबसल्या भूतकाळात रमण्याचच वय असल्यामुळे केव्हाही काहीही आठवत राहत. म्हणजे  कधी एकदम शाळा आठवते तर कधी एकदम सासरी महिलामंडळाची बसवलेली नाटकच आठवतात. कशाचा कशाशी संबंध नसतो. पण वेळ बरा जातो. तसही आपण टी.व्ही वरच्या सिरीयल्स बघतोच ना, त्यांचा तरी........जाऊ दे विषयांतर नको. मला सांगायची गम्मत आहे ती वेगळीच. काल मल्हार ग्राउंडवर खेळताना जरासा घसरला. थोडस खरचटलं. पण आल्या आल्या कुरुक्षेत्रावर लढून अंगभर जखमा घेऊन राहुटीत परतलेल्या योध्यागत दारातूनच त्याने पुकारलं." कुकुली मी खेळताना पडलो. " आमच्या ५ वर्षांच्या सहवासाने मीही खूप गोष्टी शिकलेली असल्याने स्वरात भरपूर काळजी आणून प्रेमाने त्याला विचारलं, " कुठे कुठे बघू" कदाचित माझ्या चष्म्याचा नंबर बदलला असावा त्यामुळे मला खूप बारकाईने बघितल्यावर एक पुसटशी लालसर रेघ त्याच्या पोटरीवर दिसली.ताबडतोब डेटोल लावून धुवून कार्टुनवाल ब्यांडेड लावून द्यायला त्याच्या आईला सांगून मी माझा जीव वाचवला. कारण मागे एकदा " अरे, पडल्याशिवाय तू वाढणार कसा? " असा प्रश्न विचारायचा वेडेपणा मी केल्यामुळे पुढे दोन तास घरात धुमशान चाललेलं होतं. अर्थात आम्हीही याच्या एवढे लहान असताना आईकडून असे लाड करून घेतले होतेच की . पण खर सांगायचं तर आमचे बरेचेसे " पराक्रम "आम्ही बाहेरच्या बाहेरच निस्तरत असू . म्हणजे खेळताना ब-यापैकी लागलं तर रस्त्याच्या कडेला टनटनीचा पाला उगवलेला असायचा. रस्ता मातीचा असल्याने जवळपास दगडानाही तोटा नसायचा त्यातलाच एक सपाटसा दगड शोधायचा दुसरा लहान दगड घ्यायचा. दोन्ही दगड फु फु करून " स्वच्छ " करायचे आणि दगडावर टणट णीचा पाला कुटून त्याचा रस जखमेवर पिळला की  पुढचा डाव खेळायला आम्ही मोकळे . या पाल्याला आम्ही दगडीपाला  म्हणत असू आणि त्याला लागणारी पिवळी लहान फुलं " म्हातारे म्हातारे पैसा देतेस का मुंडकं उडवू " असं विचारून टीचकीने फूल तोडत असू. जिच फूल लांब जाईल ती जिंकली.(" मुले ही  देवाघरची फुले " असं  कोणी   बर म्हणून ठेवलय? ) असो. आणि फारच रक्त भळभळा  यायला लागलं तर आई हळदीची पूड जखमेवर दाबायची आणि जुनेर फाडून त्याची पट्टी बांधायची. लग्नानंतर विळीवर भाजी चिरताना  बोट कापल तेव्हा नव-याने विचारलं, titanus कधी घेतल होत आणि माझ नकारार्थी उत्तर ऐकून विचित्र चेहरा करून दवाखान्यात नेल होत. ते माझ पाहिलं इंजेक्शन .
             किती बदललय ना सारं!  मल्हारची घरभर पसरलेली खेळणी बघून आमचे खेळायचे प्रकार आठवून हसू येतं . आता मल्हार डायनोसोरबरोबर खेळतो तसा त्याचा भातुकालीचाही खेळ आहे आणि एक बिट्टू नावाचा बाहुलाही. पण आमच्या लहानपणी आम्ही फक्त भातुकलीनेच  खेळायचो. शिवाय मैदानावर पकडापकडी साखळी, दगड का माती असे बिनसाधानाचेच  खेळ असायचे. पण इतर काही खेळायची साधनं असतात आणि ती आपल्यालाही मिळू शकतील ही कल्पनाच नसल्याने आयुष्य मजेत चाललं होत. म्हणजे अगदी पावसाळ्यात  दिवे ( वीज ) गेले तरी हातांचे वेगवेगळे आकार करून त्याच्या सावल्या कंदिलाच्या प्रकाशात भिंतीवर पाहण्यातही मजा यायची किंवा अंधा-या खोलीतून भैय्याने डोळ्याच्या पापण्या उलट्या करून लाल पांढरे डोळे  दाखवत दात विचकले की बोबडीही वळायची.
           शाळेत जायचं चालत. कॉलेजामध्ये जायचं चालत. सिनेमा नाटकाला जायचं चालत. आता ज्यां दोन पट्ट्य़ाच्या चपला ( स्लीपर ) आपण घरात घालतो त्या त्यावेळी अगदी इन थिंग होती. पावसाळ्यात त्यामुळे घसरायला व्हायचं आणि कपड्यावर मागून चिखलाच स्प्रे पेंटिंग  व्हायचं तरीही त्या चपला पायात असणं म्हणजे लई भारी. कारण कितीकांना कॉलेजात जाईपर्यंत पायात घालायला चपलाही नसत. आणि ही गोष्ट अगदी सधन कुटुंबातही असे. कारण " पोरासोरांना" चपला काय करायच्यात हा त्यामागचा विचार होता.
          काल बदलतोच. आतापर्यंत कुठे लक्षात आला हा बदल. कारण आतापर्यंत आम्हीही त्या प्रवाहाचा एक भागच होतो ना. पण आता पोहता पोहता पाठीवर झोपून वरच नील आकाश न्याहाळाव आणि त्याचवेळी पाठीखालच्या लाटांनी पाठीला गुदगुल्या करत जोजवाव तस काहीस हे वय झालेलं असत. त्यामुळे आजूबाजूचे बदल पाहताना आपल्यातलाही बदल न्याहाळावा आणि इतके वेगवेगळे म्हणजे अगदी शेणाने सारवलेल्या जमिनीपासून संगमरवरी फ्लोअरपर्यंतचे  ( त्याला जमीन म्हणणं म्हणजे  2 dm ना !)  आणि दोन पायांच्या बग्गीपासून आकाशात उडणा-या उडनखटोल्याच सुख अनुभवायला मिळाल्याबद्दल त्या परमेश्वराचे  आभार मानावे हेच खर आणि बरही !
                    

Sunday, February 1, 2015

मुक्काम तामसतीर्थ

खर  तर मला आता यशोधन बाळ  नावाच्या माणसाबद्दल लिहिलच पाहिजे . गेले दोन दिवस या ना त्या प्रसंगात त्याची आठवण येतेय. हे म्हणजे फारच झालं. फक्त दोन दिवसांची त्यांची माझी ओळख. त्यातही सहवास म्हटला तर फार तर सगळा मिळून चार सहा तासांचा. आणि तरीही हा माणूस आठवावा म्हणजे जरा अतीच होतंय. पण काही माणसं असतातच अशी. थोड्या सहवासानेही लक्षात राहणारी
म्हणजे त्याचं असं झालं ,२६ जानेवारी २०१५ हा दिवस नेमका सोमवारी आला. म्हणजे दुग्धशर्करा योग किंवा हल्लीच्या भाषेत म्हणावं तर सोनेपे सुहागां. घरात जर सोमवार ते शुक्रवार दिवसाचे १८ ,-१८ तास राबणारी मुलं असतील आणि त्यांचं मुल जर शाळेत झेंडावंदनाला गेलंच पाहिजे या वयापर्यंत पोचल नसेल तर ते या संधीचा फायदा घेणारच.त्यामुळे आपण सर्वांनी कोकणात जावं  असं मुलांनी ठरवलं आणि आम्ही ८जणं ,अर्रर्रर्र मुख्य माणूस मोजायचं राहिलच, मल्हारसह ( वय वर्ष ५ ) ताम्हिणीमार्गे लाडघरच्या दिशेने कूच करते झालो.
    कोकणाची एक रानभूल आहे. तिथली झाडी , तिथली माती , आणि तिथला सहस्त्रबाहू उभारून मंद्र स्वरात बोलावणारा समुद्र. नारळी पोफळीच हिरवगार गारुड हळूहळू रक्तात पसरायला लागत. मन अगदी आतून आतून शांत शांत व्हायला लागत आणि फेसाळत्या लाटांनी किना-यावर धडका मारणारा समुद्र दिसला की जीवाचा जिवलग सखा भेटल्यागत एक झपूर्झा सुरु होते मनात. प्रथम फक्त पावलं भिजवायची आहेत असं मनाशी ठरवून किना-या किना-याने दबकत चालायला सुरवात करावी तर लाटांच्या लडिवाळपणाने आपल्या पायाखालची वाळू कधी सरकते ते कळतच नाही. फक्त पावलं भिजवणा-या लाटा आपल्या मस्तकावर कधी तुषार उडवायला लागतात तेही उमजत नाही. मग सारा आसमंत विरून जातो. एकापाठोपाठ येणा-या लाटा , क्षितीजापर्यंत पसरलेलं पाणी,आणिक्षितिजापल्याड जाणारं क्षणोक्षणी रंग बदलणारं आणि त्याचं रंगात पाण्यालाही रंगवून टाकणारं सूर्यबिंब. हे सगळं सर्वांगाने आपल्यात साठवून ठेवणारे आपण एक बिंदू. त्या एकतानतेत ऐकू येणारी समुद्राची गाज.
    हे सगळं अनुभवायला आम्ही तामसतीर्थाला ( लाडघर ) पोचलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते. बंगल्याचे  फाटक  उघडून उभे होते बंगल्याचे मालक यशोधन बाळ . शिडशिडीत अंगकाठी, ६ फुटावर उंची प्रथमदर्शनी डोळ्यात भरली. बंगल्याचं नाव होतं " गाज ". आल्या क्षणापासून गृहस्थाने आमचा ताबाच घेतला. तरुतलीच खुर्च्या मांडलेल्या असल्याने क्षणभर विसावा घेऊ असं ठरवणारे आम्ही बराच वेळ तिथेच रेंगाळलो. खोलीतून फ्रेश होऊन खाली आलो तर वाफाळत जेवण आमची वाट बघत होतं. आणि मग होतो तितके दिवस हाच अनुभव आला. रसना आणि क्षुधा तृप्त करणारं साधच पण रुचकर जेवण. ज्याला आपलेपणाचा वास होता. पहिल्या दिवशी आल्या आल्या यशोधन बाळाच बोलणं  ऐकून " अरे देवा , किती बोलतो हां माणूस" असं वाटलं खरं, पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं बोलणं " किती छान बोलतात हे " इथवर कधी येऊन पोचलं  ते कळलंच  नाही. ओळख नसताना माणसं वेगळी भासतात आणि नंतर ती सहवासाने उलगडायला लागली की  वेगळीच वाटतात. माझी सासू म्हणायची " पंक्तीत जेवल्याशिवाय आणि संगतीक रवल्याशिवाय माणसा कळणत नाय ! " यशोधन बाळांच बोलणं, मधूनच स्वत:बद्दल माहिती देणं आल्या आल्या  व्यावसायिकतेचा भाग  वाटला पण जसा जसा सहवास (तुटपुंजा का असेना.) मिळू लागला,तस तसं या माणसाचं " निखळपण " लक्षात यायला लागल. मुळात हा त्यांचा व्यवसाय नाही. मुलं मार्गी लागल्यानंतर आपल्याला आलेली पोकळी भरून काढण्यासाठी अर्पिता बाळांनी शोधलेला हा त्यांचा छंद आहे. आलेल्या अतिथीला खाऊ घालून तृप्त करणं . हे मानसिक समाधान त्यांना लाभावं म्हणून  यशोधन आपल्या सिनेमाच्या शुटीगमधून  वेळ काढून त्यांच्या मदतीला येतात. मग तिथे व्यावसायिकतेला वाव कुठून असणार ?  त्यामुळे  मग आमच्या संध्याकाळच्या   मैफिलीत आपणहून सामील होऊनचित्रपट व्यवसायातले किंवा पत्रकारीतेतले असो , किस्से साभिनय सांगताना त्यांच्या चेह-यावर एक आपुलकीचा भाव असायचा. आणि हे सगळं दुस-याच्या खासागीपाणावर (space ) अतिक्रमण होऊ न देता .त्याचं आपुलकीने त्यांनी सकाळी गरम पाण्याच्या बादल्या जिना चढून खोलीत स्वत: आणून दिल्यां. नाहीतर साधारणपणे अशा ठिकाणी " कामाची बाई आल्यानंतर  चहा आणि आंघोळीच पाणी मिळेल " असं कोरड उत्तर मिळण्याचाच अनुभव आपल्याला असतो. पण इथे म्हणजे घरच्या कार्याला नातेवाईक आलेत आणि त्यांची सरबराई चाललीय हाच भाव. त्यामुळे याशोधनानी स्वत: मासे करून आम्हाला खाऊ घातले आणि खाल्ल्यानंतर कळलं की  ते स्वत: मासे खात नाहीत. आणि याना साथ मिळाली आहे तीही समानधर्मा आहे. अर्पिता बाळानीही आमचे म्हणजे अगदी लाडच केले. एकही पदार्थ परत पानात repeat झाला नाही. घरगुती जेवण , प्रेमाने केलेलं . तेही सर्दीने डोकं जड झालेलं असताना आणि कमरेत उसण  भरलेली असताना.आजच्या व्यावहारिक जगात कदाचित याला वेडेपणा म्हणत असतील, कदाचित कशाला, निश्चितपणे. पण या वेडेपणामुळेच तिथे उतरणारे लोक त्यांचे कुटुंबीय बनतात . अर्पिता बाळाच्या शब्दात " extended family "              

Friday, January 16, 2015

शहाणपण देगा देवा

ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे विचारवंत येतात. त्यांच्या चेह-याच्या मागे तेजाच वलय वगैरे असतं. आणि आपण आदराने त्यांचं पुण्यस्मरण करतो. त्यांची शिकवण विनित भावाने वाचतो. आचरणात किती आणतो तो भाग वेगळा. पण हे विचारवंत एखाद्या दूरस्थ ता-यासारखे वाटतात मला. त्यांची ती दुर्बोध शब्दातली वचनं  मन उल्हासित करण्याऐवजी मला तरी गोंधळून टाकतात. खर सांगायचं तर मला inferiority complex देतात. कारण लहानणापासून वाचन म्हटलं तर कथा, कादंब-या आणि कविताच. आणि मोठे दोघेही बंधू म्हणजे वाईच्या विश्वकोशात आपापल्या विषयावर लेख लिहिणारे. त्यामुळे घरात कला आणि शास्त्र या दोनही विषयातले ग्रंथ भरलेले असायचे. आणि मी मात्र त्यांच्यावरची धूळ झटकण्याशिवाय  इतर कशासाठीही त्यांना हात लावत नसे. त्यामुळे शास्त्रवाला भाऊ चिडून चिडून मला फटकारायचा. " अशी पुस्तकं म्हणजे बांडगुळ "आहेत. काहीतरी वैचारीक वाच." त्यामुळे मी ती " बांडगुळ " तो समोर नसेल तेव्हा लोळत आणि समोर असेल तेव्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन वाचत असे.
विनोदाचा भाग सोडून देऊ या , पण मला आता वयाच्या ६६व्या वर्षी असं वाटायला लागलाय की ज्ञानाचे दोन प्रकार असतात . एक माहितीचं ज्ञान आणि दुसरं जीवनाचं ज्ञान. ज्याला आपण चातुर्य किवा साध्या भाषेत शहाणपण म्हणतो ते ज्ञान. माहिती तंत्रज्ञान मानवजातीच्या विकासासाठी गरजेचं आहे याबद्दल दुमत असायचं कारण नाही , पण " शहाणपण "मानवजातीच्या मानसिक आरोग्यासाठी जरुरीचं आहे हेही तितकच खरं.
आता हा असा वैचारिक किडा मला का बरं चावला असेल ? त्याला कारण आमच्या यमु आजी. वय वर्ष ८९. एकदम उत्साहाचा झरा. ज्या तन्मयतेने ज्ञानेश्वरी दासबोध वाचतील त्याचं तन्मयतेने दोन तीन तास रमीही मांडायला जातील.  बोलण्याची शैली अशी खुमासदार की त्यांच्या आयुष्यातल्या गंभीर प्रसंगांचही  विनोदी नाटुकल्यात रुपांतर व्हावं. तर अशा या यमु आजीचं  वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर  आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी  गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही  लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला  नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा  सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही  दुखवलं नाही. 
आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी  फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ?  घशाशी येणारा आवंढा गिळत  यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची  ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही  नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.
मला माणसं वाचायला आवडतात. त्यांच्या पुस्तकाची पानं मला खूप काही समृध्द करतात. इथेही मला माझं  खुजेपण दिसतं, पण त्याने मी निराश होत नाही.मला inferiority complex  येत नाही.कारण मला माहीत असतं मी मला त्यांच्या पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करू शकते. म्हणून मला ग्रंथात जे सापडत नाही ते  माणसात सापडतं . त्यांचे अनुभव मला अधिकाधिक शहाणं करतात. आणि तसंही अंतिम तत्वापर्यंत   पोचेतो  आपण अधिकाधिक विशुध्द होणं चांगलच ना? 

Saturday, January 3, 2015

नाताळ

गोष्ट साधारण १९५९ -६० मधली. तेव्हा मी पाचवीत असेन. शाळेला नाताळची सुट्टी लागायची. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला  सगळ्या शाळाभर एकच विनोद, हल्लीच्या भाषेत पी जे फिरत असायचा. बाई किंवा सर सुट्टीचा अभ्यास द्यायचे आणि बजावून सांगायचे, " सगळा अभ्यास पूर्ण व्हायलाच पाहिजे कारण अभ्यास "पुढच्या वर्षी "बघणार आहे मी."  कोणी शिक्षक कविता पाठ करायला सांगायचे. परत तेच डायलॉग  " कविता पाठ करायला वर्ष आहे.पुढच्या वर्षी म्हणून घेणार आहे ". अखेर आम्हालाही त्या "पुढच्या "वर्षीची इतकी सवय व्हायची की शाळा सुटल्यावर निघताना निरोपाचा धपका मैत्रिणीच्या  पाठीत मारताना जरा जास्तच जोरात मारला जायचां आणि आम्हीही एकमेकींना " आता आपली भेट पुढच्या वर्षी" असं हसत हसत सांगायचो .घरी गेल्यावर रात्री झोपताना मी आईला " मी आता पुढच्या वर्षीच उठणार" असं सांगून घाबरवून सोडलं होतं, पण भैय्याने " ए यडे  आज २४ आहे. तू काय १ तारखेपर्यंत झोपणार की  काय? " असं खवचटपणाने ( जो बहिणीशी बोलताना सगळ्याच भावांचा भाव असतो ( अरे अरे, वा वा काय जमलय वाक्य.)  विचारल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला . मग मी नेहमीप्रमाणे " ए आई , भैय्या  बघ की  कसा करतोय " असं ओरडून सूड घेतला होता.
लहानपणी आम्हाला नाताळाची सुट्टी असायची. ख्रिसमसची नाही.कारण मराठी भाषा आणि मराठी शिक्षक. पुढे ८वी ९वीत गेल्यावर त्याच स्पष्टीकरणही बाईच्या  तोंडून ऐकायला मिळालं होतं आणि तेच पुढे कितीतरी वर्षं मनात ठसलं होतं. बाई  म्हणाल्या होत्या , "या सणाला नाताळ म्हणतात कारण  त्या काळात गोरे लोक ताळतंत्र  सोडून वागतात, पण त्यांना कोणी काही म्हणत नाही. पाहिजे तेवढी दारू पिली तरी चालते. कितीही मास खाल्ल तरी चालतं." आणि हे सगळं बाई इतकं वेडवाकडं  तोंड करून सांगायच्या की  कित्येक वर्षं माझ्या डोळ्यासमोर " गोरे" लोक एका हातात दारूचा बुधला आणि दुस-या हातात चघळायला  हाडूक घेऊन रस्त्यावरून चाललेत आणि त्यांना कोणी रागावत नाही असं  चित्र येत असे. त्यात परत बाईनी चोरट्या स्वरात आम्हाला आणखी एक भयंकर सत्य(?) या सणाबद्दल सांगितलं  होतं की  ३१ तारखेला रात्री दिवे घालवतात आणि बरोबर १२ वाजता दिवे आल्यावर कोणीही कोणाचाही मुका घेतला तरी चालतो. हे आम्ही लाजरं हसू  दाबत गो-यामो-या होत ऐकलं होतं आणि त्याचं वेळी ठरवून टाकलं होतं की  काहीही झालं तरी नाताळच्या  वेळी इंग्लंडला जायचं नाही आणि असा प्रसंग ओढवून घ्यायचा नाही. कारण तेव्हा कोणीही तिथल्या गो-यांना रागावत  नाही..येशू ख्रिस्ताची जन्मकथा किंवा  जीवन ,त्याचा उदात्त संदेश फार नंतर कळला पण तेव्हा नाताळ म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सण  एवढच माहीत होतं. नाताळबाबाची  पोतडी आणि त्याची मध्यरात्री आपल्या घराला मिळणारी भेट ही  तर समजलेली गोष्ट होती. पण तेव्हाही नाताळबाबा ख्रिश्चनाच्यात असणार आपल्यात कशाला येणार असंच वाटत असे.आणि मोठ्या माणसांना जरी माहिती असायची तरी आपल्याही घरात मोजा टागावा आणि मुलांना त्याची मौज लुटू द्यावी हा विचारही नव्हता. कारण त्यावेळी मुलच कॉलेजला जाईपर्यंत पायात चपला घालत नव्हती तिथे नाताळ बाबासाठी  मोजा कोण कशाला आणतय.? ती गमंत आम्ही आमच्या मुलांसाठी केली आणि परत बालपण अनुभवलं, त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद बघून.!

Thursday, January 1, 2015

नववर्षाच्या शुभेच्छा

वाटलं होतं आजची सकाळ  थोडी  वेगळी असेल
किलाबिलता  सोनेरी पक्षी मखमालीवर बसलेला दिसेल
असेल त्याच्या डोईवर चमचमता तुरा
मधोमध बसवला असेल लखलखता हिरा

पेपरवाल्याने पेपर टाकला
दुधाच्या पिशव्या बास्केटमध्ये पडल्या
भाजीची फोडणी कुकरची  शिट्टी
पोळपाटाची खटखट
सुरु झाली आजही रोजचीच लगबग

 
किलकिले डोळे ताणून चष्मा शोधला
कुरकुरती हाडं गोळा करायला जरा वेळच लागला
एक घोट थायरॉईसाठी
 एक घोट पोटासाठी
कुशीवर वळा
 मान सांभाळा
 हलकेच चाला घेऊन काठी
 
स्वर्गीचा पक्षी, त्याचा सोनेरी तुरा
 गडगडत गेला लखलखता हिरा

 
 दार उघडून बाहेर येताच पडली समोर दाणकन उडी
" अरे  अरे पडेन ना झाले मी मोडकी मथाडी " ( म्हातारी )

HAPPY NEW YEAR KUKULI  HAPPY NEW YEAR
खळाळता झरा , सोनेरी किरण घेऊन आले त्याचे कोवळे  स्वर
किलाबिलता पक्षी माझ्या कवेत आला
माझी संथ सकाळ सोनेरी करत राहिला !
सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय: