Saturday, December 24, 2011

एक बालकथा

गोष्ट तशी फार जुनी नाही. अगदी अलिकडची. गेल्या साठ वर्षांपूर्वीची. आटपाट नगरातल्या एका ब्राह्मणाच्या ब्राह्मणीला तीन पुत्रांपाठी एक कन्यारत्न झालं. ते म्हणजे अस्मादिक, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असणारच. माझी आई म्हणायची की, मी जन्मले तेव्हा माझ्या अंगात फारसं रक्त नव्हतं म्हणे. (कोण रे ते खुसू खुसू हसतय?) अगदी कमी वजनाची होते म्हणे मी. अर्थात ती सगळी कसर मी पुढे भरूऊऊऊऊऊऊऊऊऊऊन काढली ती गोष्ट वेगळी. पण हे कमी रक्त असण्याचा संबंध तिने माझे केस पांढरे असण्याशी जोडला. आणि लोकांनाही ती तसंच सांगू लागली अर्थात मलाही ते खरं वाटून मीही कोणी माझ्या केसांबद्दल विचारलं तर तसंच सांगू लागले. पण ब-याच वर्षांनंतर माझ्या लक्षात आलं की केसांच्याबाबतीत आपण आपल्या वडलांवर गेलो आहोत. म्हणजे असं की साहित्य, कला, क्रीडा यांची आवड, चार लोकात गा असं सांगितलं तर आजूबाजूच्या लोकांना पळापळ करायला लागणार नाही इतपत (आणि इतपतच) गोड गळा या गोष्टी जशा त्यांनी आपल्याला दिल्या तशीच ही भेट आपल्याला दिली आहे. त्यामुळे यात आपला काही दोष नसून ही "वंशपरंपरेने" लाभलेली विरासत आहे समजून मी निश्चिंत झाले. पण आईचं ह्रदय. त्याला कोण समजावणार? आणि तिने मनाची समजूत घातलीच तरी आजूबाजूच्या बायाबापड्या तिला थोड्याच सोडणार? "वैनी, काय तरी उपाय करा बरं का, न्हाय तर पुरीला कायमची घरात ठेवून घ्याची येळ ईल." एक सईबाईला भिववून सोडी. "क्यास पिकल्यात म्हंजी पोरीला डोकं कमीच असनार. दर वरसाला पास झाली तरी घोडं न्हालच म्हनायचं की." "तर वो, त्यात या आजकालच्या पोरी फ्याशनी कराय पायजेत. केसाला त्याल म्हनून लावाय नगं. "असं करुन आईला बिचारीला भंडावून सोडत. मग तीही आपापल्या परीने माझे पांढरे केस झाकायचे प्रयत्न करी. एका बाईने तिला सल्ला दिला की, एका विशिष्ट प्रकारची केरसुणी जाळून त्याची काळीकुट्ट राख (एरवी राख पांढरट असते, पण या जातीच्या केरसुणीची राख काळी व्हायची.) खोबरेल तेलात खलवून डोक्याला लावा. बघा, केस काळे होतात की नाही. आई बिचारी लागली कामाला. बाजारात जाऊन केरसुणी आणून ती जाळली. आणि तिने ते मलम तयार केलं. माझे काळेभोर केस बघून तिच्या चेह-यावर जो अवर्णनीय आनंद पसरला, तो आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण खरी गंमत तर पुढेच आहे. ते मलम लावलं की मला मात्र माझं डोकं संभाळता संभाळता पुरेवाट व्हायची. कारण जरा जरी कोणाचा हात माझ्या डोक्याला लागला तरी तो काळा व्हायचा. अखेर माझ्या आरडा ओरड्याला कंटाळून तिने हा उद्योग बंद केला. कदाचित तिलाही त्यातला फोलपणा जाणवला असावा. मी साधारण नववीत असताना आमच्या घरासमोर एक मालुताई रहात होत्या. त्या एक दिवशी आईला म्हणाल्या, बाजारात एक नवीन औषध आलय. ती पावडर पाण्यात खलवून ब्रशने केसाला लावायची आणि वाळल्यावर केस धुवायचे. थोडक्यात म्हणजे तो एक डाय होता. संजिवनी बुटी सापडल्यावर हनुमानाला व्हावा तसा आनंद आईला झाला. (उपमा चुकली वाटतं, खैर, मतलब समझो) उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर हा डाय लावून मी शाळेत गेल्यानंतर खोटं वाटेल, पण खरं सांगते, मला पहायला शाळेतल्या मुली मधल्या सुट्टीत माझ्या वर्गाच्या दारात लोटल्या होत्या. त्यांच्या आश्चर्ययुक्त प्रश्नांना माझं (अर्थात आईने पढवलेलं) उत्तर तयार होतच. "अग, माझ्या आईचे वडील वैद्य आहेत ना, त्यांनी एक औषध शोधून काढलय ते तेल लावल्यामुळे माझे केस असे झाले." माझे आजोबा वैद्य होते आणि पंचक्रोशीत नावजलेले होते हे सत्य होतं पण त्याबरोबरच दुसरं सत्य असं होतं की ते कोकणात रहात असल्याने त्यांच्या "औषधाची" छाननी कोणीही करु शकणार नव्हतं. त्यामुळे लग्न होईपर्यंत मी आरामात "मून अन्ड स्टार" या डायने माझे केस काळे करू लागले.
पुढे मग ’गोदरेज’ माझा कायमचा डाय झाला आणि "वैनी तुमचे केस किती लांबसडक आणि काळेभोर आहेत नाही?" अशा कौतुकालाही मी पात्र ठरले. पण कालान्तराने दर महिन्याच्या महिन्याला या लपंडावाचा कंटाळा येऊ लागला. जवळजवळ पंचवीस वर्षं डाय लावल्यामुळे डोक्याची कातडी नाजुक झाली. सतत खाजू लागली. हे रंगकाम नको वाटू लागलं. पण धीर होत नव्हता. नव-याचा सल्ला घेतला. त्याला बापड्याला तरुण असतानाही केसांच्या रंगांमुळे काही फरक पडत नव्हता. आता तर त्याचं म्हणणं असं होतं की, केस तुझे, तर ते कसे असावे हे ठरवायचा अधिकार फक्त तुझा आहे. बस्स! एक साक्षात्कारच झाला मला. मनाची बंधनं गळून पडली आणि ठरवलं. अभी नहीं और कभी नहीं. ते सहा महिने म्हणजे माझ्या द्रूश्टीने नाही तरी लोकांच्या नजरेने भयंकरच गेले असणार. कारण डोक्यावर वाढून नवे आलेले पांढरे केस, डाय न केल्यामुळे झालेले तांबूस केस आणि नैसर्गिक असलेले काळे केस असे तीन रंग दिसत असल्याने मैत्रिणी कळवळून परत केस काळे करायचा सल्ला द्यायला लागल्या. पण माझा बाणेदारपणा त्यामुळे मुळीच कमी झाला नाही केसाची लांबी एकदम कमी करुन टाकली आणि त्याचं फळ मला सात -आठ महिन्यात मिळालं. सगळं डोकं पांढ-या केसांनी भरुन गेलं. पूर्वी राठ लागणा-या केसांचं रुपान्तर मऊ मऊ कापसात झालं. आणि बघणा-याच्या नजरेत खुषीची दाद मिळू लागली. लहान मुलं केसातून हात फिरवत "आजी तुझे केस किती मऊ आहेत ग," असं लाडिकपणे म्हणतात तेव्हा मी भरुन पावते, आणि माझ्या समवयस्क मैत्रिणी "किती छान दिसतात ग तुझे केस. आम्हाला पण करावेसे वाटतात पण धीर होत नाही." असं म्हणतात तेव्हा मी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. खरोखर आज साठीला आलेल्या आमच्या पिढीला किती तरी बंधनांना निष्कारणच बळी पडावं लागलं. कोण जाड म्हणून, कोणाचं रुप तर कोणाचा रंग त्यांचं बालपण करपवून गेला. प्रत्येक ठिकाणी लोक काय म्हणतील ही भीती. आणि त्या द्डपणामुळे मनात नसतानाही काही गोष्टी रुढी पाळव्या लागत असत. एकदा ती बंधनं तोडली की आनंदच आनंद! आजची पिढी या दडपणाखाली वावरत नाही. मस्तपैकी केस रंगवून घेते आणि वर अभिमानाने सांगते. "आय अ‍म वर्थ इट".

बचपनके दिन

माझिया माहेरा जा असं म्हणताना माझ्या डोळ्यापुढं येते ती कोल्हापुरातली खासबाग. त्यातलं "राज अंजुमन ताज" असं नाव धारण करणारी बी. नांद्रेकर या जुन्या जमान्यातल्या एका गाजलेल्या नटाची भली मोठी वास्तू आणि एकापुढे एक अशी भली मोठी तीन मैदानं असलेला खासबागेचा परिसर. इथेच माझं लहानपण गेलं. त्या वेळी सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सातनंतर रहाण्याचं ठिकाण म्हणजे घर, अशी समस्त गल्लीकर बच्चे कंपनीची धारणा असल्याने उरलेला वेळ मैदानावर धुडगुस घालण्यात जायचा. लपंडाव, लगोरी, साखळी, बशीबोल, दगड का माती, उन का सावली असे आजच्या पिढीला अगम्य असलेले खेळ खेळण्यात आमचा वेळ कसा जायचा ते कळतही नव्हतं. तीनही मैदानं सकाळ संध्याकाळ मुला मुलींनी ओसंडून वाहत असत. कोल्हापूर ही कलानगरीबरोबरच क्रीडानगरीही असल्यामुळे खेळ खेळणं ही श्वासोच्छ्वासाइतकीच सहज गोष्ट वाटायची आम्हाला. घर किंवा मैदान अशी दोनच ठिकाणं चुकल्या पिराला शोधायला उपयोगी असायची. पंचगंगा नदीवर पोहायला जाणं, हा एक आनंदाचा भाग असायचा. घरापासून चारेक किलोमीटरवर असलेल्या नदीवर चालत जायचं आणि पोहून परत चालत यायचं म्हणजे भरपूर भूक लागायची. मग आईने केलेल्या गरम गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा आणि खोब-याची लसूण घालून केलेली चटणी. अहाहा! मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतय, मला ते पुढच्या ताटात दिसतय अशी अवस्था व्हायची.
वेगवेगळ्या दिवसातले खेळ वेगवेगळे असायचे. श्रावणात सगळ्यांच्या बागांमध्ये फुलं, पत्री बहरून आलेली असे आणि पूजेसाठी त्यांची गरजही असे. त्यामुळे बागेतल्या निसरड्या जागा चुकवत, मधूनच झाडावरुन पडणारे भले मोठे लांबलचक केसांचे सुरवंट चुकवत फुलं, पत्री गोळा करणं हा एक आनंद सोहळाच असे. त्यावेळी बागेच्या कुंपणाला मेंदीसारखीच दिसणारी पण मोठी पानं असणारी झुडपं वापरत. त्याचं नाव माहीत नाही, पण आम्ही त्याला "मेंदा" म्हणत असू. त्याला पांढ-या रंगाची नाजूक फुलं येत. ती गोळा करून आम्ही त्याचे वेणीसारखे गुंफून गजरे करत असू आणि केसात माळत असू. शिवाय गुलबक्षी, बुच यांच्या फुलांच्या वेण्याही करायच्या असल्यामुळे ती गोळा करतानाही बराच वेळ सत्कारणी लागायचा. गुलबक्षीच्या फुलांचा आणखी एक उपयोग म्हणजे हात रंगवणे. मेंदी गोळा करा, मग एखाद्या मैत्रिणीच्या आईकडे लाडीगोडी लावून वरवंटा, पाटा मिळवा आणि त्यावर मेंदी वाटा मग हातावर मेंदीचे गोळे ठेवा. या सगळ्यात खूप वेळ आणि शक्ती जात असल्यामुळे पाच सहा वर्षाच्या वयात गुलबक्षी आमच्या मदतीला धावून येत असे. तसे आमचे खेळ सगळे पाना फुलांच्या सोबतीनेच होत. म्हणजे असं की, रस्त्याच्या कडेला, बागेच्या कडेला रान गवत, वनस्पती उगवत. त्यात एक आळूच्या पानांसारखी पानं असणारी पण आकाराने अगदी चिमुकली अशी पानं असत. ती आमच्यासाठी आळूची भाजी असे. त्यालाच केळ्यासारखी दिसणारी चिमुकली फळं लागत ती आम्ही "भाजीवाली, भाजीवाली" खेळताना विकायला ठेवत असू आणि घरच्या लोकांना ती कंपल्सरी "विकत" घ्यावी लागत.रस्त्याच्या कडेला उगवणारी भगव्या रंगाच्या फुलांची घाणेरी आणि त्याला लागणारी काळ्या रंगाची फळं. त्यांना आम्ही कांगुण्या म्हणत असू. ती गोड फळं येता जाता तोंडात टाकायला फार मजा यायची. बाभळीची पिवळीधमक फुलं कानात घालून नटताना बाभळीचे काटेही पायात घुसत. आता आठवलं की गंमत वाटते, पण आमच्या खेळातल्या बहुतेक वस्तू फुकटच्या असत, तशीच आमची औषधही फुकटचीच असत. म्हणजे खेळताना ब-याच वेळा पडायला व्हायचं आणि पडेल तो वाढेल अशीच धारणा त्या काळी असल्याने आमच्या आयाही "कुठे धडपडलात" असं आदरार्थी बहुवचन वापरुन लागलेल्या ठिकाणी हळद थापून आम्हाला परत खेळायला पिटाळत. क्वचित पाठीवर फारतर एखादी "प्रेमळ थाप" बसे. पण तेही टाळायचं असल्यास आमच्याकडे सब दुखोंकी एक दवा होती. ती म्हणजे "दगडी पाला". म्हणजे टणटणीचा पाला. त्याला पिवळ्या रंगाची फुलं येत. ती आम्ही "म्हातारे, म्हातारे, पैसा देतेस का मुंडकं उडवू" असं म्हणत टिचकीने उडवत असू. असा हा भीषण क्रूर खेळ आम्ही हसत हसत का खेळत असू हे एक कोडच वाटतं. तर हा दगडीपाला रस्त्याच्याकडेला कुठेही उगवायचा. त्यामुळे सहजच उपलब्ध असायचा. मग एखादा चपटा दगड शोधला जायचा. तो धुवून त्यावर दगडीपाला ठेवला जायचा. दुस-या दगडाने ठेचून त्याचा रस काढून तो जखमेवर पिळला जायचा. यात आम्ही ना कधी दगडीपाला धुतला ना कधी ठेचायचा दगड धुतला ना जखम ना आमचे हात. देव तारी त्याला कोण मारी हेच खरं! आणि आता दुखणा-या गुडघ्यांना बाम चोळताना हे सगळं आठवताना बरं वाटतं हेही तितकंच खरं. पण त्याचबरोबर काही प्रासंगिक औषधोपचारांनाही आम्हाला दर महिन्याला सामोरं जायला लागायचच. एक म्हणजे एरंडेल तेल पिण्याचा मासिक कार्यक्रम असायचा. ते अतिशय शुध्द स्वरुपात असल्यामुळे त्याला एक प्रकारचा भयानक वास येत असे. त्यात ते तेल. आजच्या मुलांना कल्पनाच येणार नाही त्याच्या चवीची. बरं, पोटातल्या जंत मारण्यासाठी हे पिणं आवश्यकच आहे अशी समस्त आयांची ठाम समजूत असल्याने महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी सकाळी घराघरातून "पी लवकर. गीळ चटकन. गीळ म्हणते ना" असे दरडावणीचे आणि "नको ना ग आई" असे आर्त की काय म्हणतात तसे आवाज घुमत असत. मग दिवसभर "कोठा" साफ केल्यानंतर दुपारी गळून अंथरूणावर पडल्यानंतर थोडासा वरणभात मिळत असे. मला तर अजूनही तो एरंडेलाचा मोठा चमचा, लिंबाची फोड, लोणच्याची फोड असा सरंजाम आठवला तरी "भावना" होते. इतक्या वर्षांनंतरही! दुसरा एक अत्याचार म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात कांदे किसून डोक्यावर थापले जात आणि डोकं फडक्याने बांधून दिवसभर घरात डांबून ठेवलं जाई. किसलेल्या कांद्याचं पाणी डोळ्यात जाई. डोळ्याची प्रचंड चुरचुर होई. पण तेही चांगलच असे. कारण त्यामुळे डोळे स्वछ होतात आणि म्हातारपणी चष्मा लागत नाही "म्हणे". पण ही म्हातारपणाची लहानपणी केलेली तरतूद पुढे उपयोगी पडली नाही आणि लागायचा तेव्हा चष्मा लागला ती गोष्ट वेगळी. परत केसांना येणारा कांद्याचा वास पुढे महिनाभर डोकं उठवी (ज्याच्या डोक्यावर घातलेला असे त्याचं स्वत:चं आणि घरच्यांचं ते वेगळच.) मुलींना आणखी एका दिव्याला सामोरं जावं लागायचं ते म्हणजे केसात झालेल्या उवांचा नि:पात करणं. तेव्हा सगळ्याच मुलींचे केस लांब असत. मग पावसात भिजले म्हणून म्हणा, किंवा घामाने भिजले म्हणून म्हणा, पण केसातले "हत्ती घोडे" काढण्याचं साप्ताहिक काम असे. त्यासाठी बारीक दातांची एक फणी असे. तिने प्रथम डोक्याची सालटी काढेपर्यंत केस विंचरले जात. त्यानेही भागले नाही तर मग शिपिचंदन नावाचं एक भगव्या रंगाचं केमिकल मिळत असे. ते विषारी असे, पण उवांवर रामबाण उपाय. ते केसाला लवून आंघोळ घातली जाई. शिपिचंदन आंघोळ करताना डोळ्यात गेलं तर आंधळेपण येईल या भीतीने डोळे इतके घट्त दाबून धरले जात की काही काळापुरतं खरच आंधळेपण आल्यागत गत होई. मग पुढे लायसिल आल्यानंतर आणि छोट्या केसांची चलती झाल्यामुळे समस्त महिलावर्गाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
पण या हालांबरोबरच लहानपण म्हणजे एक स्वप्नांचा देश होता. निदान साठ वर्षांपूर्वी तरी तो तसा असायचा. कारण बहुतेक वाचायची पुस्तकंही आम्हाला राक्षस, प-या अशांच्याच प्रदेशातून हिंडवून आणायची. चांदोबा हे तेव्हाचं अगदी बालप्रिय मासिक. त्यातली चित्रं दाक्षिणात्य पध्दतीची असायची.त्यातल्या गोष्टी बोधपर असल्या तरी एकंदर कल्पनेच्या जगातल्या असायच्या. त्यामुळे तेव्हा वेगवेगळ्या समजुतींचा आमच्या मनावर पगडा असायचा. त्यातली एक गोष्ट म्हणजे रस्त्यावर रेघ ओढली आणि त्यावर गाईचा पाय पडला तर आपली आई मरते. त्यामुळे खेळताना बाऊन्डरीज आखताना मैदानावरच्या मातीत काटकीने किंवा दगडाने आखलेली रेघ पुसल्याशिवाय कोणीच घरी परतत नसे. चुकून जर रेघ पुसायची राहिली तर जिवाच्या आकांताने कुण्या मैत्रिणीला सोबत घेऊन परत मैदानावर जाऊन ती रेघ पुसल्याशिवाय आम्हाला चैन पडत नसे. दुसरं म्हणजे उंब-यावर बसून शिंकलं तर मामा मरतो. अरे, काय हे? सगळे अपशकुन आपले आईकडच्या बाजूच्याच लोकांना. पण आम्ही या समजुतींना टरकून असायचो हे नक्की. चुकून जरी त्यांचं उल्लंघन आमच्या हातून झालं तर देवळात जाऊन रावणेश्वरापुढे नाक घासल्याशिवाय आमच्या जीवाला समाधान मिळत नसे. हळू हळू काळाबरोबर जगाच्या व्यवहाराची जाणीव व्हायला लागली. मनाची निरागसता कमी व्हायला लागली आणि या सगळ्या गोष्टी आठवल्या की हा असला वेडेपणा आपणच करत होतो का असं वाटायला लागलं. पण तरीही हा असला वेडेपणा आठवताना मनाला एक प्रकारचा थंडावा का मिळतो बरं? आणि अंगावरुन मोरपीस फिरवल्यागत कोवळेपणा ?