Tuesday, August 21, 2007

उंच उभारलेले हात

कोल्हापुरच्या बालसंकुलाला भेट द्यायला जाताना मन द्विधा मनस्थितीत होतं. सिनेमात बघि्तलेले अनाथाश्रम, तिथल्या पायरीवर बाळ ठेऊन चेहरा पदरा आड लपवत जाणाया नायिका हे डोक्यात इतकं भिनलेलं होतं की इतकं वय झालं तरी एक मन त्यातून बाहेर पडायला तयार नव्हतं.दुसरं निबर झालेलं मन अगदी व्यावहारिक पातळीवर या सगळ्याचा विचार करत होतं.रिक्षातून उतरताना दिसली ती इमारत नेहमीच्या शाळेसारखीच वाटली. म्हणजे मधोमध थोडीशी मोकळी जागा, ध्वजारोहणाचा खांब, आणि भोवताली दगडी इमारती. आम्हाला पाहून स्टाफ़ची थोडी जलद हालचाल झाली . बंधूंनी त्यांची कामं आटोपली आणि इमारतीचा फ़ेरफ़टका मारायला आम्ही दोघी बहिणी त्यांच्यामागून निघालो. पहिलीच खोली तान्ह्या बाळांची होती. पाय क्षणभर थबकले. भाच्यांचे शब्द आठवले, " आत्या, फ़ार कसं तरी होतं ग, तिथे जाऊन. " पण आतून स्वागताला तिथल्या बाई दारात येऊन उभ्या होत्या. आत पाऊल टाकताच दिसले ते सगळ्या खोलीभर झुलणारे पाळणे आणि त्यात डोलणारं बालब्रह्म. कुणी मुठी चोखतय, कुणी डोळे मिटून स्वप्नरंजनात मग्न, तर कुणी कुशीवर वळून पोटाची सोय अलगद तोंडात पडते का ते शोधण्यात गुंग. काळ्यासावळ्या निरागसतेला एक सामाजिक बंधनाची करुण किनार झुलत होती पाळ्ण्याच्या लयीत.दुसरी खोली थोड्या मोठ्या मुलांची होती. आत पाऊल टाकताच डोळ्यासमोर आले ते छोटे छोटे हात. ब्रह्मांड आठवलं. पायात शिशाचे गोळे उतरले.दाही दिशा लोपल्या. डोळ्यासमोर फ़क्त चिमुकले हात, उंचावलेले. एकाला हाताशी धरावं तर दुसरा हाताशी झोंबतो, कुणा एकाने तर पायाला मिठीच मारली.त्याला उचलून कडेवर घेतलं तर त्याने गालावर पाप्या घेऊन गाल ओला करून टाकला. घशाशी येणारा हुंदका परतवत त्याला घट्ट छातीशी आवळत बसकण मारली.मागून पुढून सगळ्या बाजूंनी त्या छोट्या हातांनी मी वेढली गेले. मग कुणाला मांडीवर बसवून तर कुणाला शेजारी बसवून " आपडी थपडी" खेळले तर कुणाशी डोळे झाकून " बुवाआआअ भो: " केलं. निघायची वेळ झाली तरी गळामिठी सुटेना. पण मग त्यांच्या बाई बोलल्या, " चला, सोडा त्यांना, कामाला जायचय त्यांना. " लगेच हात सुटले. एका बाजूला सगळी बाळं गोळा झाली. " मी मग येते हां " असं म्हटल्यावर हात टा टा करायला हलले. क्षणापूर्वी चमकलेले डोळे परत निर्विकार झाले.खोलीच्या दारातून बाहेर पडताना दहा पंधरा मिनिटांचा तो वात्सल्याचा रंग पाठीला चटके देत होता. मोठ्यांच्या सामाजिक नीतिमत्तेच्या दबावाखाली भरडलं जात असलेलं बालपण , मूकपणे वाट पहात होतं मोकळा श्वास मिळण्याची.
घरी परताना एक गोष्ट जाणवली ती ही की, २ ३ वषांची मुलं बोलत नव्हती. आप्पाला विचारलं तर त्यानं साम्गितलेलं सत्य हे की, त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं. त्यामुळे दत्तक गेल्यानंतर बोलू लागणारी ती मुलं ऐकू शकत असली तरी बोलू शकत नव्हती.आपल्या घरात बाळाचं आगमन झाल्या दिवसापासून सगळेजण त्याच्याभोवती गोळा होऊन बडबड करत असतो. इथे एवढी मोठी मुलं कुणी बोलायला नाही म्हणून मुकी ?आपण आपल्या मनाशी समाजसेवेचे काही ठोकताळे बांधलेले आहेत असं मला वाटायला लागलं. त्या मुलांना खाऊ दिला, कपडे दिले, वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या की आपलं काम संपत नाही. या छोट्या मुलांना त्याची काय मातबरी ? त्यांचे डोळे आसुसलेले असतात मायेचं माणूस बघायला, कान लागलेले असतात छातीतल्या ठोक्याचं अंगाईगीत ऐकत झोपण्याकडे,हात शोधत असतात आधार. मला वाटतं , की हे सगळं या मुलांना दिलं पाहिजे, त्यांची मूळ गरज आहे ती मायेच्या उबेची. त्यांच्याशी बोलण्याची. त्यांना जवळ घेण्याची. आपल्या आठवड्यातला एक तास आपण त्यांना देऊ शकणार नाही का ? मात्र भावनेच्या भरात हो म्हणू नका. कारण कोणतीही गोष्ट करताना आपण चार वेळा जाऊन ती मग करणं बंद करणार असू तर ती न करणं चांगलं. कारण कुणालाही आशा लावून सोडून देणं हे अधिक निश्ठूरपणाचं आहे. विचार करा, आपले लहानपणाचे दिवस आठवा. क्षणभर आई दिसली नाही तर आपली होणारी हालत आठवा, कदाचित तुमची पावलं तुमच्या गावातल्या बालसंकुलाकडे वळतील, त्या उभारलेल्या हातांना अलगद मिठीत घेण्यासाठी.

draft