Wednesday, June 27, 2007

एक वर्तुळ पूर्ण झालं

श्रीरामपूरमध्ये मुलाच्या मित्राचं लग्न होतं आणि श्रीरामपूरपासून ८ कि. मी. वर हरिगाव आहे. आता पुण्याहून इतक्या लांब आल्यानंतर हरिगावला भेट देण्याची इच्छा होणं अगदी स्वाभाविक होतं. कारण हरिगाव आणि आमचं सगळ्यांचच, म्हणजे आम्ही, नवरदेवाकडची मण्डळी आणि जमलेल्यांपैकी बहुसंख्य व‍र्‍हाडी मंडळीच हरिगावशी आतडं जुळलेलं होतं. हरिगाव म्हणजे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरजवळचं बेलापूर शुगर कंपनी जिथे ६४ -६५ वर्षं दिमाखाने वसली, नांदली आणि १९ वर्षांपूर्वी जिला टाळं लागल्यानंतर जिथली माणसं आपापल्या संसारानिशी रानभैरी झाले ते गाव. अक्षत पडल्यानंतर हरिगावला जाण्याचा विचार बोलून दाखवताच सगळ्याम्नी कळवळून कळकळीचा सल्ला दिला, " कशाला जाताय ? नाही बघवणार तुम्हाला. उगं रडत परताल. आता काय उरलय तिथं ? सगळं उजाड झालय. नका जाऊ. "पण ते तर होणं नव्हतं. किंबहुना लग्नाला इतक्या लाम्ब येण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. गेली १९ वर्षं तिथल्या परिस्थितीबद्दल इतक्याजणांकडून इतकं ऐकलं होतं, की मन त्या सगळ्याला सामोरं जायची तयारी करून होतं.गाडी श्रीरामपूरहून हरिगावच्या रस्ताला लागली आणि आमचा रिप व्हऍन विंकल झाला. सतत हरिगाव - श्रीरामपूर ये जा करून ज्या रस्त्याचा कण न कण ओळखीचा आहे असं वाटत होतं, तो रस्ता वाढलेल्या वस्तीमुळे अनोळखी वाटायला लागला होता. नेवासा फ़ाट्याकडून गाडी हरिगावच्या रस्त्याला लागली आणि डाव्या बाजूला छोट्या मोठ्या घरांच्या समोरच्या बागा बघून मन उल्हासित झालं. वाकड्या लिंबाच्या वळणावरून पुढे गेल्यानंतर दुतर्फ़ा हिरवीगार झाडं खडी ताजीम देत होती.पूर्वी हा उघडा बोडका माळ होता. आता त्यावर ४, ५ मोर फ़िरताना दिसत होते. लोक उगीचच जुन्या आठवणीत रमतात आणि नव्याचा स्वीकार करत नाहीत असेही विचार मनात यायला लागले आणि ध्यानीमनी नसताना कोणीतरी फ़ाडकन कानसुलात द्यावी तसं झालं. " पाच खोल्या" या नावाने ओळखली जाणारी चाळ बॉम्ब स्फ़ोटात उध्वस्त व्हावी तशी फ़क्त भिंतींच्या रुपात उभी होती. दारं, खिडक्या, छप्पर काही काही शिल्लक उरलं नव्हतं. तिथे राहणारी एक एक माणसं आठवायला लागली. खरच होतं लोक म्हणत होते ते. उरी बाळगलेल्या जखमा नख लावून उसवायची काय गरज होती, असा विचार मनात येईतो गाडी हरळी गे्टमधून कॉलनीत शिरली. हरळी गेटवरचं कारंजं केव्हाच नामशेष झालं होतं.१९ वर्षांच्या धुळीखाली हरळ गाडली गेली होती. इथेच आम्ही मैत्रीणी, आमच्या सासवा, मुलं संध्याकाळचा वेळ घालवत होतो. सुख दु:खाच्या गोष्टी बोलत होतो.
गाडी आम्ही रहात असलेल्या बंगल्यासमोर आली.फ़ाटक उघडून आत जाण्याचा प्रष्नच नव्हता.कारण फ़ाटक जाग्यावर नव्हतं, कंपाऊंडच्या तारा नव्हत्या. पण हे आम्ही ऐकूनच होतो, की हरिगावात राहिलेल्या लोकांनी जळणासाठी बंगल्यांची फ़ाटकं , खिडक्या उचकटून नेल्या, तारा भंगारात विकल्या.त्यासाठी त्यांना तरी कोणत्या तोंडाने दोष देणार ? भुकेपुढे प्रतिसृष्टी निर्माण करणार्‍या विश्वामित्राचा पाड लागला नाही तर सर्वस्व गमावून भांबावलेल्या कामगारांचा काय दोष ? हे एक वेळ समजून घेतलं तरी दारातली आंब्याची, चिकू , जांभळाची झाडंही दिसेनात. ज्या आंब्याखाली मुलं लहानाची मोठी झाली, ज्याची सुमधुर फ़ळं सगळ्या हरिगावाने खाल्ली ते आंब्याचं झाड समूळ नाहिसं झालं होतं.पुढेपासून मागेपर्यंत पारध्याने एक एक पाखरू नेम धेरून टिपावं तशी झाडं नाहिशी झाली होती. आंबा, रामफ़ळ सीताफ़ळ, चिकू, माड, आवळा सगळे सगळे नाहिसे झाले होते. उरला होता एक जमिनीचा मोकळा तुकडा.बोरी चिंच, काटेरी झुडपं यांनी गुंतलेला आणि मध्ये धुळीची पुटं चढलेला बंगला, आमचं घर., आणि किलकिल्या दारांना डोळी लावून आत डोकावून पाहणारे आम्ही. न रहावून लेकीने खिडकीत तोंड खुपसून हाक मारली, " आजोबा, आजोबा ".तिच्या वेडेपणाला आम्ही मोठी माणसं हसलो, पण आतून सगळेजणच आपल्या गजबजलेल्या भूतकाळाला साद घालत होतो, मनातल्या मनात.त्या क्षणी एखादी दैवी शक्ती आम्हाला मिळाली असती तर आमच्यापैकी प्रत्येकाने कालचक्र २० वर्षंमागे नेलं असतं.हरिगावातल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही फ़िरलो,. काही ठिकाणी कामगारवस्तीत जाग होती तर काही ठिकाणी पडझड झाली होती.नियोजनशून्य , बेपर्वा निष्ठूर राजकारणात बळी गेलेल्या आमच्या निसर्गरम्य साध्यासुध्या जीवनाचं कलेवर पाठीवर घेऊनच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.कोणाचं कुठे कसं आणि काय चुकलं याचे मनाशी हिशेब करत.निष्फ़ळ हिशेब.
हा सगळा प्रसंग मी माझ्या अमेरिकेतल्या लेकाला सांगत होते. कधी आवाज भरून येत होता, तर कधी स्वरात हताश कोरडेपणा होता. तोही बारीकसारीक तपशील विचारत होता. अचानक त्याने प्रष्न विचारला, " आई, तुम्ही हरिगावात किती वाजता होता ? "
" साधारण दुपारी ३- ४ च्या सुमाराला. का रे ? "
" आई, अग, त्याच वेळी मला स्वप्न पडलं की मी आणि बाबा आपल्या शेजारच्या घरात हरिगावला उभे आहोत. मला जाग आली तेव्हा इकडे पहाटेचे ४ वाजले होते."
म्हणजे आम्ही ज्यावेळी हरिगावात होतो तेव्हा हजारो मैलांवरून मनाने तोही आमच्याबरोबर होता. अखेर कुठेही गेलो, तरी आपली मुळं जिथे घट्ट रोवलेली असतात, ती माती आपल्याला साद घालतेच.
draft