Tuesday, August 25, 2020

रुणझुणत्या पाखरा

 पुण्याहून कोल्हापूरला जाताना पेठ नाका ओलांडला की उजव्या हाताला एक टेकाड लागतं .४०  ,४५ , वर्षांपूर्वी ते एक छोटं टेकाड होतं, आता त्याने चांगल बाळसं धरलय.तर तेव्हा त्यावर एक छोटुकलं देऊळ होतं. त्यावरची भगवी पताका फडफडताना दिसली की कोल्हापूर जवळ आलं, माझ्या माहेरची हद्द सुरु झाली म्हणून माझं मन फुलून  यायचं . पुढे रस्त्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट जणू काही माझ्या घरातलीच आहे, असं  वाटायला लागायचं . टेकाड मागे टाकून जरा पुढे गेलं की डाव्या बाजूला दोन रस्ते घरंगळत शेतात घुसायचे. तिथे लालचुटुक मिरच्या उन खात रस्त्यावर लोळत असायच्या. जरा पुढे गेलं की उफणलेल्या धान्याची रास  उन खात असायची. दोन्ही बाजूला उसाची शेतं डोलत असायची.त्यांचा हिरवा रंग डोळ्यांना गारवा द्यायचा. बैलगाडीतून कडबा घेऊन चाललेले केरुनाना ,पांडूमामा,दुधाची किटली मोटारसायकलला लावून वेगाने जाताना तंबाखूची पिचकारी टाकणारा संपत, फताड्या शिंगांच्या म्हशीवर बसून म्हशी हाकणारा बबन्या , रस्त्यात आडवं आलेलं मेंढ्याचं  खांड हुर्र , हुर्र  करून हाकणारा विरुबाबा सगळे सगळे मला माझे सोयरे वाटायला लागायचे .  

सासर आणि माहेर यात बारा तासांचं अंतर. मुलांच्या शाळा एप्रिलमध्ये संपायच्या .मुलांचे वडील साखर कारखान्यात कामाला. तेव्हा हंगाम सुरु असेल तर तो संपेपर्यत थांबायला लागायचं. कारण एवढ्या लांब मुलांना घेऊन मी अबला कशी जाणार? असा प्रश्न वडीलधा-यांना पडायचा.माझ्या मनातलं पाखरू तर जानेवारीपासूनच रुण झुणायाला लागायचं. आणि माहेरच्या वाटेने ओढ घेऊ लागायचं. पण मी एकटीने  इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हणजे सशाच्या शिंगाइतकंच दुर्लभ. पण एकदा हंगाम जूनपर्यंत चालणार होता ,तेव्हां माझी झालेली दयनीय अवस्था बघू घराच्यानीच  मला तिकीट काढून दिलं.सबंध प्रवासभर मी म्हणजे भेटीलागी जीवा लागलीसे आस या उन्मनी अवस्थेत. जम्बो आईस्क्रीमची फ्याक्तरी दिसल्यावर तर डोळ्यातून घळाघळा अश्रू. मुल कावरीबावरी. ते सगळ बघून समोरच्या म्हातारीने तर गहीवरच घातला. " पोरी, आपल्या हातात काय न्हाई लेकी, त्थाची विच्छा. "तेव्हा गडबडीनं तिला खरी परिस्थिती सांगितली. तर म्हातारी आपले मिश्री लावलेले काळे दात दाखवत मनापासून हसली आणि माझा अलाबला करत मनापासून म्हणाली, दोन लेकरं झाल्यावरबी  म्हयेराचा एवडा सोस बरा न्हवं लेकी. " आता तिला काय सांगू कि माझ्या माहेराचीच नव्हे तर अख्या कोल्हापूरचीच ओढ मला लागलेली असते. शिष्टाचाराचे कोरडे नमस्कार मागे टाकून प्रेमाच्या कडकडीत मिठीला, " किती दिवसांनी भेटलीस ग नाल्ल्याक" असा गावरान झटका घ्यायला माहेरीच यावं लागतं आणि तेही बिनओळखीच्या ,अनोळखी नव्हे हं  , बिनवळखीच्या बाईलाही लेकी म्हणाना-या आणि तिच्या चेहर्यावरून मायेने हात फिरवणा-या मावशी, काकी आणि मामीच्या  कोल्हापुरात.

Sunday, August 9, 2020

पुस्तक आणि कव्हर

परवा टी . व्हीवर  एक जाहिरात बघितली. त्यामध्ये एका माणसाला एका खेडेवजा गावातली जागा आपल्या कारखान्यासाठी पसंत पडते , पण इथे आपल्याला कामासाठी लागणारा निष्णात अधिकारीवर्ग मिळेल की नाही यासाठी तो साशंक असतो. त्याच वेळी एक पांढरे शुभ्र कपडे घातलेली स्मार्ट मुलगी येऊन म्हणते , "Dont judge a book by its cover."अर्थात ती साबणाची जाहिरात असते हे सांगायला नकोच.
नंदिनीच्याबाबतीत माझं असंच झालं. आमचा आठजणीचा ग्रुप आहे. मधून मधून कुठेतरी भेटतो, बाहेर जातो, मजा करतो. आता सगळ्या सत्तरीच्या बाया. .त्यात आता जबाबदारी कसलीच नाही. त्यामुळे सतत काही ना काही चालू असतं.कुठे जायचं असलं की एका विशिष्ट ठिकाणी आम्ही जमतो आणि रिक्षाने पुढे जातो. सगळ्या जमल्या की  मग नंदिता आणि सुमन घरंगळत येताना दिसतात. एकमेकीशी गप्पा मारत पाऊल टाकू की नको असा विचार करत त्या चालत असतात. एरवीही नंदिताच बोलणं हळूच. ती एकटीच असते. नवरा सोळा वर्षापूर्वी गेला. मुली अमेरिकेत. त्यामुळे तिची काळजी घेणं आपलं परम कर्तव्य आहे असं आमच्यापैकी प्रत्येकीलाच वाटायचं . मग रोज तिला आम्ही नाना प्रश्न विचारात असू. स्वयंपाक काय केला इथपासून पैशाच्या  व्यवहारापर्यंत सगळं सगळं आम्ही तिला सांगत असू. एखाद्या दिवशी आली नाही तर फोन करत असू. नंतर तिची आणि माझी जरा जास्त घसट वाढली . मग अधिक घरगुती गप्पा सुरु झाल्या. तेव्हा कळलं की नवरा असताना तिच्या एका मुलीचं लग्न झालं पण दुसरीचं मात्र नवरा गेल्यानंतर ठरलं .मुलगी अमेरिकेत. तिथलाच भारतीय मुलगा . लग्न आमच्या गावीच करायचं होतं . कार्यालय  ठरलं तयारी झाली.आणि नवरादेवाकडून असं कळवण्यात आलं की , काही कारणामुळे त्याला कंपनी भारतात यायला रजा देऊ शकत नाही. ही इकडे एकटी कारण मोठी मुलगीही अमेरिकेत. तिने एकटीने कार्यालायाचं बुकिंग रद्द करण्यापासून सगळी कामं निपटली. एकटी अमेरिकेला गेली. तिथे मोठ्या मुलीच्या मदतीने धाकटीचं लग्न लावून दिलं. हे कळल्यावर मला वाटलं , आकर्षक कव्हर  नसलं तरी आतली कथा आकर्षक असू शकते.
आमची दुसरी एक मैत्रीण आहे. प्रचंड हुशार. संत वचनं तोंडपाठ. सगळ्यांना अत्यंत प्रेमाने सल्ले देते. वयानेही  मोठी असल्याने सगळे तिला मानही देतात. ती एकदा फोनवर मला म्हणाली , मला भयंकर भीती वाटते पुढे काय होईल याची. मला नवल वाटलं, इतक संतसाहित्याचं  वाचन . सगळ्यांना तत्त्वज्ञान  सांगतात आणि यांची अशी का बरं अवस्था ?  पण मग जाणवलं की माणूस बाहेर जसा असतो तसाच आतही असेल असं नाही. माणूस वाचण्याची मला आवड आहे. मला माणसं वाचता येतात असा अभिमान होता. पण या दोन पुस्तकांनी तो धुळीला मिळवला . पण आता खूण गाठ बांधली आहे की  कव्हर वरून  पुस्तकाचं परीक्षण करायला जायचं नाही. त्यासाठी त्याच्या अंतरंगात डोकावायचं , चाळायचं नाही वरवर, मन लावून वाचायचं, संदर्भ बघायचे  आणि मगच परीक्षण करायचं. कारण आधी कधी पुस्तकाची कव्हर्स फसवी असतात, कितीही आकर्षक आणि अनाकर्षक असली तरीही.     

Tuesday, August 4, 2020

भांडी

आपल्याला कधी काळी स्वयंपाकघरातल्या भांडयाबद्दल इतकं प्रेम वाटेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. खरं तर स्वयंपाकघरात मी काम करेन ,चांगले चुंगले पदार्थ करून खायला घालेन हे मला सशाच्या शिंगाइतकंचअसंभव वाटत होतं. ४६ वर्षांपूर्वी लग्नानंतर कोरी पाटी घेऊन मी गृहप्रवेश केला आणि केवळ आईचं नाव खराब होऊ नये म्हणून सासूबाईंच्या हाताखाली उमेदवारी सुरु केली.तीही एक डोळा कथा कादंबरीच्या पुस्तकावर डोळा ठेवून. आमची आई म्हणायची , पाण्यात पडलं की पोहता येतं, पण तोवर खूप पाणी नाका तोंडात जातं हेही खरं. पण त्याची गंमत परत कधी तरी. त्याचा परिणाम असा झाला की लोकांना चक्क आवडायला लागलं मी केलेलं. अर्थात एवढं घुसळल्यावर इतकं लोणी तर येणारच ना?
पण अजूनही मला स्वयंपाकघर हे आपलं कार्यक्षेत्र  वाटत नव्हतं. मुलं म्हणाली आई बेसनाचा लाडू हवा, लाडू तयार. नवरा म्हणाला मिसळ केली नाही बरेच दिवसात, घाला मटकी भिजत असा मामला होता सगळा. नाहीतर एकेक बायका बघावं तेव्हा आज काय बुंदी पाडल्या उद्या काय दहीवडे केले असे एकमेकाशी काहीही संबंध नसलेले पदार्थ करत असतात. करोत बापड्या.त्यामुळे स्वयंपाकघराशी काही माझी नाळ जुळली नव्हती. आमची भूमिका आपली मदतनिसाची.त्यामुळे भांडयाबद्दल  काय ममत्व असणार ? रुखवतातली सोडल्यास भांडी सासूबाई आजेसासुबाईची  होती. त्यामुळे काडी काडी जमवून संसार केला असंही नव्हतं.मग भांड याबद्दल जिव्हाळा कसा बरं वाटणार ?पुढे सून आल्यावरही तिला सांगितलंकी बाई यातलं काय मोडीत टाकायचं तर टाक आणि तुझ्या आवडीची भांडी घे. त्यामुळे आता तीन पिढयांची  भांडी घरात सुखनैव नांदता हेत..मधेच कुठेतरी मी घेतलेली ग्लास , मिसळणाचा  डबा  असे फुटकळ जिन्नस लुडबुडतात.
आपल्यात स्त्रीसुलभ भावनांची उणीव तरी आहे किंवा आपण अलिप्ततेने संसार केला या विचारांचा फुगा दोन दिवसांपूर्वी फुटला.म्हणजे काय झालं , मी सकाळी चहा करायला ओट्याकडे उभी राहिले आणि ओट्यावर पितळेचा एक चकचकीत चमचा दिसला.  बघितलं तर ते करंजीच्या कडा  कापायचं  कातण होतं . पाठीमागून आवाज आला ," आई आपल्याकडे होतं ना असं ? ते हरवलं तर आजी किती दिवस बेचैन होती. मी आणलं चोरबाजारातून.. "खरच असंच होतं ते कातण. फक्त चमचा जरा खोलगट होता. त्या कातान्यावरून हात फिरवताना डोळे जरा चुरचुरलेच माझे.
तशी सासूबाईंच्या वेलची काही दुधाची पातेली काही वेळण्या सांडशी आहेत घरात.दुधाच्या वेळण्या आमटीवर झाकलेल्या चालायच्या नाहीत त्यांना आणि सांडशी ही.त्यावेळी पोरवयात हे सव्यापसव्य करताना वैताग यायचा, पण आता ती भांडी हाताळताना त्या आठवणींचे कणच हातात येतात. आपल्या डोक्यावर किती सुंदर छत्र होतं त्याची  जाणीव होते.आमच्याकडे कोकणातली एक विळी पण आहे. आडाळो  म्हणतात त्याला कोकणीत. धारपण  कोकणी माणसासारखीच आहे.  नवी नवरी असताना खूप वेळा शाहिस्तेखान होण्याची पाळी आली होती माझ्यावर तिच्यामुळे. दोन वर्षांपूर्वी ती विळी  ठेवत असताना निसटली. फरशीवर ती आदळू नये म्हणून मी ती पकडली तर कुठे? पात्याला. आता आजेसासूबाईंनी " चुकीला माफी नाही " म्हणून असा हात कापला कि हाताला तीन टाके घालावे लागले. मला मात्र त्यांनी मारलेला तो फटकाच वाटला. " गे सुने दिसणा नाय कि काय तुका ? लक्ष खंय होता ? "
आता मला जाणवतंय कि या भांद्यांनी  माझा अलिप्तपणा हळू हळू मोडीत काढलाय. मला त्यांच्यात सामावून घेतलाय. किती आठवणी आहेत त्यांच्या !नेहमीपेक्षा  वेगळा  एक डाव प्रश्नचिन्हासारखा  आहे, तो आम्ही फक्त ताकालाच वापरतो. प्रत्येक भांद्याच एकेका पदार्थाशी नातं जुळलेलं आहे. ते मी आता नीटच समजून घेतलाय. आता मी भांदयाशी  बोलतेसुध्दा. म्हणजे धुतलेल्या ताटल्या गळायला तिरक्या करुन  ठेवताना पडायला लागल्या तर मी त्यांना दटावतेही, "पडू नका, काम वाढवू नका ग बायांनो." पालथ्या वाटयाची   उतरंड रचताना तर प्रत्येक वातीला सांगावं लागतं , " शाबास !"कधी कधी पातेली ठेवताना त्यावरचं नवर्याचं नाव आईंच दिसतं आणि तरुणपणी त्याच्याबरोबर घातलेला वाद आठवतो , " भांड्यावर  तुझं नाव का  आईंच का नाही ? " हसू येतं  मला. हळुवारपणे मी भांडी ठेवते.४६  वर्षांच्या सहवासाने त्यांचं अचेनत्व आता निमालेल असतं.       

Wednesday, April 1, 2020

फक्त आठ मिनिटांचा व्हिडिओ

" आई इकडे बघ " असं म्हणून लेकीने मोबाईलचा  व्हिडिओ मोड सुरु केलाआणी  स्क्रीनवर वाळलेल्या गवताची पायवाट, आजूबाजूला अस्ताव्यस्त वाढलेली वड  चिंचेची झाडं , काटेरी झुडपं दिसायला लागली .आमची गुलाब , जाई जुई  मोगरा कुंदा ची रोपटी पोटात घेऊन , "झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उमलाया  म्हणत.
साखर कारखाना बंद पडला तेव्हा पोटासाठी गाव सोडलं त्याला खूपच दिवस झाले होते. तेव्हा दहावीत असलेली मुलं आता करती सवरती झाली होती. मग इतक्या वर्षांनी आपल्या लहानपणी च्या आठवणी जागवाव्यात असं .वाटल्यामुळे सगळी हरिगावला जमली होती. स्क्रीनवर मागचा चौक दिसत होता. , म्हणजे ही  मागच्या दारातून आत शिरली वाटतं. म्हणजे मनाबाई जिथे भांडी घासायची ती जागा कुठे गेली ? पण मोबाइल आता मुळच्या  पिवळ्या पण आता ३१ पावसाळे अंगावर घेऊन काळ्या रंगाचे धब्बे आणि कोळीष्टक ,धूळ यांनी माखलेल्या  भिंतीवरून  फिरत होता.
" अग , या कोप-यात आपला बंब  होता नाही ?काशिनाथ संध्याकाळी घरी जाताना पाण्याने भरायचा आणि खाली वीस, गोवरी, लाकडं भरून जायचा .सकाळी आला की  बंब पेटवायचा" . माझं स्मरणरंजन सुरु झालं. " हो ग. आणि धूर झाला की  ब्लोअर फिरवायचा." लेकीचा दुजोरा .
मोबाईल धुळकट पायरीवरून मागच्या पडवीत शिरला . अजून कठडा शाबूत दिसतोय .. यावरच चढून एकदा मी शेजारणीला हाक मारली होती, माझा विळ्याने कापलेला रक्तबंबाळ  हात दाखवून दवाखान्यात नेण्यासाठी एरवी लेकीच्याच उपयोगाचा होता तो, त्यावर चढून पेरूच्या झाडापर्यंत पोचण्यासाठी , मैत्रिणीशी गुजगोष्टी करायला दोन घरांच्या  मधल्या भिंतीवर चढण्यासाठी .त्यालालागून एक भली मोठी संदुक होती लाकडी. त्यात मोटार दुरुस्तीचे पाने , पोलिश पेपर, वायर्स आणखी काय काय राम जाणे होतं. ती माझ्या नव-याची अमानत होती. संदुकीला लागून एक मोठं कपाट  होतं. त्यात चुन्याची निवळी , भाजलेल्या जखमेवर लावायची पावडरचा पत्र्याचा डबा, वर्षभरासाठी केलेल्या लिंबाच्या सरबताचे काचेचे रंगीत बुधले,गव्हापासून रव्यापर्यंतच्या लाकडी चाळण्या उदरात घेऊन उभं होतं आणि त्याच्या पायाशी एक मोठं जातं.  पण ओढायला एकदम हलकं. त्याची पुसटशी खूणही धुळीने पुसून टाकली होती. कोप-यातली लाकडी संदूक , सायकल , माठ , पाणी काढायचा दुंगा आपणच ३१ वर्षांपूर्वी कोणाकोणाला देऊन टाकलं होतं त्यामुळे क्यामे-याने फिरवलेल्या नजरेला त्यांच्या खुणा कशा दिसणार होत्या?
" आई  हा आपला ओटा  बघ ," स्वयंपाकघरातून हाक आली.
" हो ग , पण उजवीकडचा कट्टा कुठं दिसत नाही ग." कितीही नाही म्हटलं तरी आवाज कातर होऊ पहातच होता . त्याला दडपून म्हटलं; " आणि इथे आपला पाटा वरवंटा होता बघ , नंतर तो ओट्यावर ठेवला. "आपल्याला लक्षात येत नाही , पण कितीतरी गोष्टी आपल्या मनात दडून बसलेल्या असतात .
देवघरातला देव्हारा , दत्ताची मोठी तसवीर ,पूजेला येणा-या गुरुजींच्या हवाली केली होती निघताना . पण तिथली तीन ताळी , देवघराची अख्खी एक भिंत व्यापणारी  लाकडी मांडणी कोणी नेली? वरच्या फळीवर सात आठ पितळी  चकचकीत डबे होते आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ते लाडू चिवडा चकली वड्या  यांनी भरलेले असत. मधल्या कप्प्यात गुरुजींचा कद घडी करून ठेवलेला. कारण ते कारखान्यातून येत ,धोतर बदलून कद नेसत आणि देवांची पूजा करत. पुढे तांदळाचे , डाळीचे मोठा मोठे डबे आणि खालच्या कप्प्यात चीनी मातीच्या उंचच उंच बरण्या. त्यात वर्षाची चिंच ....बागेतच झाड होतं, हळद... बागेतच लावलेली, आणि मीठ... हे मात्र एम. गोकुळदासच्या दुकानातून आणलेलं , भरून ठेवलेलं असायचं . ते मोठे डबे , बरण्या वेगवेगळ्या घरातलं सामान बनून राहिल्या होत्या आम्ही गाव सोडतानाच . पण तीन तीनदा हात जोडत डोळे मिटून देवापुढे नतमस्तक होणारे सासरे , " ऐकलात , देवासमोर आठ पाना वाढलीसत . बरोबर असा काय बघतात ?" असं कंबर दाबत विचारणा-या , घामेजलेल्या , सोवळं नेसलेल्या सासूबाईचे मला का भास होताहेत बरं त्या जागी ?
पुढच्या जेवणाच्या खोलीतलं टेबल , खुर्च्या , स्टूल , बादली आम्ही गाव सोडताना बरोबरच घेतलं होतं. पण आजमितीला त्यातल्या खुर्च्याच काय त्या साथ देताहेत.
इतक  होईस्तोवर बाईसाहेब पोचल्या की बेडरूममध्ये. या मोबाईलला भिंतीवरची धूळ नि माती दाखवण्यातच काय मजा येतेय बाई ?  भिंतीवरची दिनदार्शिका , त्यावर काही विशिष्ट दिवसासमोरच काढलेल्या चांदण्या , भिंतीला टेकून असलेलं टेबल, त्यावरची बाळाची दुधाची बाटली , कपाटाला तारेत अडकवालेली बिलं , काहीच कसं दिसत नाही ?
" हा मधला प्यासेज , हा आजोबांच्या खोलीपुढचा बाहेर उघडणारा दरवाजा. बघते आहेस ना आई ? "लेकीचं उसनं अवसानही सरतयस वाटतंय , आवाज बदललाय तिचा.
" हो ग , आणि आजोबांच्या खोलीला बसवलेली जाळीपण आहे बघ अजून." माझीही तिला साथ. पण तोपर्यत लेक  गेटकडे पोचालीसुध्दा . तिला समोरचा रस्ता , तिच्या बालमित्राचं घर दाखवायची घाई झाली होती. दूरवर जाणारा रस्ता आजही झाडीने आच्छादलेला दिसत होता , पण ती सूनियोजित लावलेली आंबा , जांभूळ, नीलमोहोर अशी झाडं नव्हती तर वा-याबरोबर कशीतरी उडून आलेल्या बीजातून अंकुरलेली वेडीवाकडी वाढलेली झाड  होती . चिंचेची, बाभळीची आणि कसली कसलीतरी. स्क्रीनवर तो उदास वाटणारा रस्ता मिनिटभर दिसला आणि त्याने डोळे मिटले. ते काही क्षणाचं शुटींग आमच्या बत्तीस वर्षांच्या संसाराचे रंग घेऊन आलं होतं!