Thursday, March 15, 2007

आईपण

कितीही नको म्हटलं तरी तू मला आठवत राहतेस तशी
औषधाच्या दुकानाच्या पायरीशी
औषधाच्याच साइड इफ़ेक्टविषयी बोलत असलेली !
पण खरच का तू औषधाविषयी होतीस बोलत ?
वरवर वाटणारं सुसंगत ?
मीही टाळत होते तुझ्या डोळ्यात पहाणं
घाबरत होते आत डोकावणं !
कारण मग
दिसल्या असत्या मला खोल भोवर्‍यातल्या
खदखदत्या उष्ण चिळकांड्या,
लक्तरं सुन्न मनाची ,
अन विखुरलेल्या घरट्याच्या काड्या !
कदाचित उसनं अवसान टाकून पळतही सुटले असते सैरावैरा,
पण मग बोलू लागलो, तर हललीसशी वाटलीस जरा जरा
ऐकवू लागलीस
नाद रुमझुमत्या पैंजणांचे,
साद चिमण चार्‍याचे!
मी फ़क्त वाट पहात होते
उरी कोंडल्या तुफ़ानाची,
बांध पडल्या उधाणाची !
पण तू उभी, घट्ट पाय रोवून
श्वेत कफ़नात विखुरलेलं आईपण गाडून
थरथरत्या ओठांवर दात दाबून
छिन्न "धर्म"पुत्रासाठी!
केवळ त्याच्याचसाठी !

2 comments:

prabhavati said...

फ़ार सुरेख कविता ! अर्थगर्भ !चिंतनीय !

Radhika said...

आता मला या कवितेच्या विषयाविषयी सांगितल पाहिजे. ही कविता आहे माझ्या मैत्रिणीबद्दल. तिची आठ महिन्याची गरोदर मुलगी अपघातात जागेवरच गेली आणि जावई कमरेखालून लुळा झाला. पण आपलं दु:ख बाजूला ठेवून ती जावयाला आधार द्यायला खंबीरपणे उभी राहिली.