Thursday, April 30, 2009

झावळ्या

खिडकीतून दिसणा-या नारळाच्या झावळ्या इतक्या सुंदर दिसत असतील हे मला इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही याचं आश्चर्य वाटतय। कारण नारळाच्या झावळांचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं आहे।आमच्या घरासमोर एक घर मुनिश्वरांचं। त्यांनी दारातच नारळाचं झाड लावलेलं होतं। रात्रीच्यावेळी, विशेषत: चांदण्या रात्री त्या झावळ्या अशा काही झळाळून निघायच्या , की वाटायचं म्यानातून निधणा-या तलवारी अशाचतळपत असतील।त्या शांत रात्री वा-यावर डुलणा-या चमकणा-या झावळ्या न्याहाळताना मनात गूढ देशीचे राजपुत्र शस्त्रागारात आपल्या या तलवारी न्यायला कोणत्याही क्षणी येतील असं वाटत रहायचं.
शिरोड्याला, आजोळी गेलं की, सगळीकडे नारळाचीच झाडं। गेल्या गेल्या मामांनी कोणातरी बाबल्याला किंवा पांडग्याला नारळाच्या झाडावर चढवून शहाळी काढवून घेतलेली असत। खास बहिणीच्या, भाचरांच्या स्वागतासाठी। शहाळ्याचं पाणी पिताना आठवत रहायची ती झाडाची उंची आणि इतक्या उंचीवरून डोलणा-या झावळ्या! मग आईशी गजाली करायला पणग्या किंवा जनग्या किंवा नानीबाय यायची , कोणी बागेतलीच झावळी ओढून आणायची आणि सुख - दु:खाच्या देवाण घेवाणीबरोबरच झावळीचे हीर साळून भलेमोठे खराटे तयार व्हायचे.
शिरोड्यालाच ओसरीवर बसलं की बागेत डावीकडे दोन माड गळामिठी घालून बसलेले होते। दिवसभराची कामं आटपून मामा आणि आई बसलेले असत। मिणमिणते कंदील आजूबाजूचा अंधार आणखीनच गडद करत असायचे। वा-याबरोबर ते माडही किंचितसे डोलायचे आणि त्यांचा करकर आवाज माझं बाल- काळीज कातरत जायचा। उंचच उंच माड राक्षसात बदलून जायचे आणि मामांना चेष्टा करायला स्फ़ुरण चढायचं। " इंदू असा काय गो तुजा चेडू, माडाक भिता? मगे रात्री देवचार बघलो तर काय करीत?'' नुसत्या कल्पनेनेच माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं ।पण रात्र सरल्यानंतर तेच माड सकाळी झावळ्या डोलवत उभे असयायचे तेव्हा मात्र एखाद्या खोडकर मुलासारखे वाटायचे।
माझ्या घराच्या दारात बसलं की समोर माडाची झाडंच झाडं आहेत। पुण्यासारख्या शहरात प्रत्येकाने आपल्या बागेत एखाद दुसरं तरी नारळाचं झाड लावलेलंच आहे। त्या झाडांच्या हिरव्यागार झावळ्या दिवसाच्या कोणत्याही वेळी बघितल्या तरी मनाला सोबत करत असतात। सकाळी हातात चहाचा कप घेऊन वर्तमानपत्रात डोकावत असावं, आणि सहज म्हणून समोर नजर टाकावी तर सूर्यकिरणाचं कोवळेपण घेऊन शेजारी खेळणं घेऊन स्वत:तच रमलेल्या छोट्या मुलासारख्या त्या झावळ्या माझ्याही मनात एक कोवळीक पसरून देतात। दुपारच्यावेळी जेवणानंतर बडिशेप चघळत सहज नजर टाकावी तर " काय आवरलं का? माझंपण आत्ताच आटपलं, पण आज कामवाली आली नाही ना, त्यामुळे भांडी घासायचीत'' असं साम्गणा-या शेजीबाईसारख्या त्या झावळ्या मला पुढच्या कामाला बळ देतात। एखाद्या संध्याकाळी कातर झालेल्या मनाला आपल्या नि:शब्द हेलकाव्यातून गोंजारतात। कधीकधी एखादी वाळलेली झावळी खाली कोसळते, आवाज होतो, पण तो ऐकताच जाणवतं की थोड्याच वेळात बाजूच्या झोपडपट्टीतून सावळ्यामामा येऊन तिला उचलून नेईल , रस्त्याच्या कडेला बसून तिची पानं साळेल, त्याचे हात सराईतपणे त्या हिरांचा खराटा करण्यात गुंततील, ... तेवढेच दहा रुपये मिळतील त्याच्या घरच्या मीठ मिरचीला !