Wednesday, April 1, 2020

फक्त आठ मिनिटांचा व्हिडिओ

" आई इकडे बघ " असं म्हणून लेकीने मोबाईलचा  व्हिडिओ मोड सुरु केलाआणी  स्क्रीनवर वाळलेल्या गवताची पायवाट, आजूबाजूला अस्ताव्यस्त वाढलेली वड  चिंचेची झाडं , काटेरी झुडपं दिसायला लागली .आमची गुलाब , जाई जुई  मोगरा कुंदा ची रोपटी पोटात घेऊन , "झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उमलाया  म्हणत.
साखर कारखाना बंद पडला तेव्हा पोटासाठी गाव सोडलं त्याला खूपच दिवस झाले होते. तेव्हा दहावीत असलेली मुलं आता करती सवरती झाली होती. मग इतक्या वर्षांनी आपल्या लहानपणी च्या आठवणी जागवाव्यात असं .वाटल्यामुळे सगळी हरिगावला जमली होती. स्क्रीनवर मागचा चौक दिसत होता. , म्हणजे ही  मागच्या दारातून आत शिरली वाटतं. म्हणजे मनाबाई जिथे भांडी घासायची ती जागा कुठे गेली ? पण मोबाइल आता मुळच्या  पिवळ्या पण आता ३१ पावसाळे अंगावर घेऊन काळ्या रंगाचे धब्बे आणि कोळीष्टक ,धूळ यांनी माखलेल्या  भिंतीवरून  फिरत होता.
" अग , या कोप-यात आपला बंब  होता नाही ?काशिनाथ संध्याकाळी घरी जाताना पाण्याने भरायचा आणि खाली वीस, गोवरी, लाकडं भरून जायचा .सकाळी आला की  बंब पेटवायचा" . माझं स्मरणरंजन सुरु झालं. " हो ग. आणि धूर झाला की  ब्लोअर फिरवायचा." लेकीचा दुजोरा .
मोबाईल धुळकट पायरीवरून मागच्या पडवीत शिरला . अजून कठडा शाबूत दिसतोय .. यावरच चढून एकदा मी शेजारणीला हाक मारली होती, माझा विळ्याने कापलेला रक्तबंबाळ  हात दाखवून दवाखान्यात नेण्यासाठी एरवी लेकीच्याच उपयोगाचा होता तो, त्यावर चढून पेरूच्या झाडापर्यंत पोचण्यासाठी , मैत्रिणीशी गुजगोष्टी करायला दोन घरांच्या  मधल्या भिंतीवर चढण्यासाठी .त्यालालागून एक भली मोठी संदुक होती लाकडी. त्यात मोटार दुरुस्तीचे पाने , पोलिश पेपर, वायर्स आणखी काय काय राम जाणे होतं. ती माझ्या नव-याची अमानत होती. संदुकीला लागून एक मोठं कपाट  होतं. त्यात चुन्याची निवळी , भाजलेल्या जखमेवर लावायची पावडरचा पत्र्याचा डबा, वर्षभरासाठी केलेल्या लिंबाच्या सरबताचे काचेचे रंगीत बुधले,गव्हापासून रव्यापर्यंतच्या लाकडी चाळण्या उदरात घेऊन उभं होतं आणि त्याच्या पायाशी एक मोठं जातं.  पण ओढायला एकदम हलकं. त्याची पुसटशी खूणही धुळीने पुसून टाकली होती. कोप-यातली लाकडी संदूक , सायकल , माठ , पाणी काढायचा दुंगा आपणच ३१ वर्षांपूर्वी कोणाकोणाला देऊन टाकलं होतं त्यामुळे क्यामे-याने फिरवलेल्या नजरेला त्यांच्या खुणा कशा दिसणार होत्या?
" आई  हा आपला ओटा  बघ ," स्वयंपाकघरातून हाक आली.
" हो ग , पण उजवीकडचा कट्टा कुठं दिसत नाही ग." कितीही नाही म्हटलं तरी आवाज कातर होऊ पहातच होता . त्याला दडपून म्हटलं; " आणि इथे आपला पाटा वरवंटा होता बघ , नंतर तो ओट्यावर ठेवला. "आपल्याला लक्षात येत नाही , पण कितीतरी गोष्टी आपल्या मनात दडून बसलेल्या असतात .
देवघरातला देव्हारा , दत्ताची मोठी तसवीर ,पूजेला येणा-या गुरुजींच्या हवाली केली होती निघताना . पण तिथली तीन ताळी , देवघराची अख्खी एक भिंत व्यापणारी  लाकडी मांडणी कोणी नेली? वरच्या फळीवर सात आठ पितळी  चकचकीत डबे होते आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ते लाडू चिवडा चकली वड्या  यांनी भरलेले असत. मधल्या कप्प्यात गुरुजींचा कद घडी करून ठेवलेला. कारण ते कारखान्यातून येत ,धोतर बदलून कद नेसत आणि देवांची पूजा करत. पुढे तांदळाचे , डाळीचे मोठा मोठे डबे आणि खालच्या कप्प्यात चीनी मातीच्या उंचच उंच बरण्या. त्यात वर्षाची चिंच ....बागेतच झाड होतं, हळद... बागेतच लावलेली, आणि मीठ... हे मात्र एम. गोकुळदासच्या दुकानातून आणलेलं , भरून ठेवलेलं असायचं . ते मोठे डबे , बरण्या वेगवेगळ्या घरातलं सामान बनून राहिल्या होत्या आम्ही गाव सोडतानाच . पण तीन तीनदा हात जोडत डोळे मिटून देवापुढे नतमस्तक होणारे सासरे , " ऐकलात , देवासमोर आठ पाना वाढलीसत . बरोबर असा काय बघतात ?" असं कंबर दाबत विचारणा-या , घामेजलेल्या , सोवळं नेसलेल्या सासूबाईचे मला का भास होताहेत बरं त्या जागी ?
पुढच्या जेवणाच्या खोलीतलं टेबल , खुर्च्या , स्टूल , बादली आम्ही गाव सोडताना बरोबरच घेतलं होतं. पण आजमितीला त्यातल्या खुर्च्याच काय त्या साथ देताहेत.
इतक  होईस्तोवर बाईसाहेब पोचल्या की बेडरूममध्ये. या मोबाईलला भिंतीवरची धूळ नि माती दाखवण्यातच काय मजा येतेय बाई ?  भिंतीवरची दिनदार्शिका , त्यावर काही विशिष्ट दिवसासमोरच काढलेल्या चांदण्या , भिंतीला टेकून असलेलं टेबल, त्यावरची बाळाची दुधाची बाटली , कपाटाला तारेत अडकवालेली बिलं , काहीच कसं दिसत नाही ?
" हा मधला प्यासेज , हा आजोबांच्या खोलीपुढचा बाहेर उघडणारा दरवाजा. बघते आहेस ना आई ? "लेकीचं उसनं अवसानही सरतयस वाटतंय , आवाज बदललाय तिचा.
" हो ग , आणि आजोबांच्या खोलीला बसवलेली जाळीपण आहे बघ अजून." माझीही तिला साथ. पण तोपर्यत लेक  गेटकडे पोचालीसुध्दा . तिला समोरचा रस्ता , तिच्या बालमित्राचं घर दाखवायची घाई झाली होती. दूरवर जाणारा रस्ता आजही झाडीने आच्छादलेला दिसत होता , पण ती सूनियोजित लावलेली आंबा , जांभूळ, नीलमोहोर अशी झाडं नव्हती तर वा-याबरोबर कशीतरी उडून आलेल्या बीजातून अंकुरलेली वेडीवाकडी वाढलेली झाड  होती . चिंचेची, बाभळीची आणि कसली कसलीतरी. स्क्रीनवर तो उदास वाटणारा रस्ता मिनिटभर दिसला आणि त्याने डोळे मिटले. ते काही क्षणाचं शुटींग आमच्या बत्तीस वर्षांच्या संसाराचे रंग घेऊन आलं होतं!