Friday, September 21, 2012

नावात काय आहे

नावात काय आहे असं कोण्या एका महान लेखकाने म्हटलं आहे असं मी म्हणणार नाही कारण ते वाक्य शेक्स्पीयरने म्हटलय हे मला माहीत आहे. आता या वाक्याच्या जनकाचच नाव माहीत नसेल तर या वाक्याला काय अर्थ आहे? कारण या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. नावातच सगळं दडलेलं आहे, असं मला मनापासून वाटतं. म्हणजे असं की, गुलाबाला टरबूज म्हटलं तर नाकाला सुगंध जाणवणार नाही आणि हाताला काटे टोचणार नाहीत. हो की नाही ?नावामुळेच तर निर्गुणातून सगुणात जाता येतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आमच्या नातवाने केलेलं आमचं नामकरण .वयाच्या दुस-या वर्षी त्याचा आपला साधा सोपा फ़ंडा होता. जो माणूस आपल्याकडे बघून काहीतरी परत परत म्हणतो ते बहुधा त्याचं नाव असावं.म्हणजे नानू अशी हाक मारणारे ते नानूआबा आणि कुकुली असं म्हणणारी ती कुकुली. म्हणजे काय झालं ,आम्ही दोघे लपाछपी खेळत होतो. मी लपून त्याला कधी कूक कूक म्हणत होते तर, कधी कुकुली. तेव्हा ही आजी आपली कुकुली, असं त्याच्या मनाने घेतलं आणि हे बाळ आपल्याला आआआआआजी अशी गोड हाक मारणार अशा सुखस्वप्नात असलेली मी झाले कुकुली. पण या नावाने मला एक सत्य मात्र जाणवून दिलं. कारण एकदा हा मला " कुकुली मला घे" असं सांगत असताना शेजारच्या माणसाने ऐकलं आणि तो म्हणाला, " अरे, आजी कशी कुकुली, तू कुकुला".म्हणजे अरे देवा, हा माझा नातूही मला कुकुली समजतो की काय इतरांप्रमाणे? अवघड आहे. आधीच सगळ्या भावंडात मी शेंडेफ़ळ. तीनही बंधूत आणि अस्मादिकात बरंच अंतर. त्यामुळे साठी ओलांडली तरी मी त्यांच्यासाठी लहानच. पण नातवासाठीही मी "कुकुली"?

तसं बघायला गेलं तर माणसाला बरीच नावं आपोआप चिकटतात. आई म्हणायची " खुम्पष्टुल किंवा खुळग्या." म्हणजे काही तरी हट्ट केला की रागवणं दूरच, पण वरील नावाने सम्बोधायची ती आणि बापू म्हणायचे तायू.तीन भावातली एकटी लेक. लेक म्हणून लाडकी होते ना मी त्यांची. आता नावात काय आहे म्हटलं तर आईवडलांचं प्रेम आहे ना, जे आपल्या अंतिम क्षणापर्यंत टवटवीत राहतं. माझी लेक मला म्हणते मदर इंडिया तर लेक म्हणतो, म्हातारी लई भारी हाय.आणि मी अशी म्हातारी वयाच्या ४०व्या वर्षापासूनच झालेय. या दोन्ही नावातला ओलावा कळायला आईच व्हायला हवं असं नाही ना? म्हणून मला मनापासून वाटतं की, नावात खूप काही असतं. फ़क्त ते जाणवतं नाव देणा-याला ( ठेवणा-याला नव्हे ) आणि घेणा-याला.

Friday, September 7, 2012

शिक्षक दिन

हा दिवस उजाडला की, मला माझ्या जीवनात आलेल्या काही शिक्षकांची आठवण हमखास येते. सगळ्या असं म्हणता येणार नाही. कारण आपल्या मनावर कोणाचा प्रभाव पडेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे एकाच वेळी एकाच शाळेत शिकणा-या आम्हा मैत्रिणींच्या आठवणीत वेगवेगळे शिक्षक आहेत.पण मी शिक्षक दिनाबद्दल सांगणार आहे ते वेगळ्याच भावनेने. म्हणजे हे एक प्रकारचं कन्फ़ेशनच आहे म्हणा ना.

मागे वळून पाहता आज लक्षात येतं ते हे की ५० वर्षांपूर्वीचे आमचे शिक्षक सगळेच आपापल्या विषयात निष्णात होते. शिकवायचेही ते मनोभावे. पण वांदा होता तो आमच्यातच. ते जे शिकवायचे ते आम्ही मनोभावे शिकत नव्हतो ना.  वर्गात जे शिकवतात त्यापेक्षा आपल्याला जास्त समजतं ही एक भावना मनात असायची की काय कोण जाणे, पण वर्ग चालू असताना शक्यतो टिवल्या बावल्या करणारा आणि इतरांना हसवून त्यांचे लक्ष विचलीत करणारा आम्हा मुलींचा एक छोटासा ग्रुप होता. शिवाय आम्ही सगळ्याच अभ्यासात, खेळात, करमणुकीच्या कार्यक्रमातही पुढे असू. त्यामुळे आमच्या या उद्योगांकडे इतरही कौतुकाने बघत असत. पण डी. जी. कुलकर्णीसर, तुम्ही फ़ार त्रास करून घेत होतात स्वत:ला.उद्विग्न चेह-याने हातातलं डस्टर समोरच्या टेबलावर इतक्या जोराने आपटत होतात की कोणत्याही क्षणी ते तुटेल असं वाटायचं. त्यावेळी तो तुमचा चेहरा एखादा क्षण मनात अपराधी भावना उमटवायचा पण दुस-या क्षणी परत पहिले पाढे पंचावन्न.पण सर, तुमचं ते काशीला शिकून आलेलं हिंदी उच्चारण आजही मनात जसच्या तसं ताजं आहे. ( डी. जी.सर बनारस विद्यापीठाचे पदवीधारक होते). इंग्रजीच्या सावंतबाई तर आम्हाला किती वेळा वर्गातून बाहेर काढत असत त्याला सुमारच नसे. ( फ़क्त आम्ही काहीजणीच आंगठे धरायच्या शिक्षेतून वगळले जात असू. कारण इतरांपेक्षा इंग्रजीत वासरात लंगडी गाय) पण बाई, डोक्यावरचा पदर सावरत तुमची ठेंगणी मूर्ती " वन्स आय सा अ लितिल बर्ड कम होप होप होप" म्हणायला लागली की आमच्या डोळ्यासमोर तो इवलासा पक्षी साकारच व्हायचा बाई.आणि पक्षाचं उड्या मारणं दाखवण्यासाठी तुम्ही चक्क वर्गात उड्या मारायचात. आणि असंच एकदा वर्गाबाहेर काढलं असता थोड्या वेळाने मन विरघळून तुम्ही आत बोलावलं असता मी तुम्हाला बाणेदारपणाने (?) उत्तर दिलं होतं, तासभर बाहेर उभं रहायला सांगितलं आहे तर मी तासभर उभी राहणार. आणि तुम्ही रागाने लाल झाला होतात.पण तुम्ही कधीच हा नाठाळपणा लक्षात ठेवला नाहीत आणि शाळा सोडून जाताना जवळ घेऊन " खूप मोठी हो" असं म्हटलत. आणि घा-या डोळ्याचे टेरर दाबकेसर. सायन्स शिकवायचे ते. त्यांच्या खोलीसमोरुन जायच्या कल्पनेनेच आमचे पाय थरथरायला लागायचे. पण ११वीत असताना मी केलेलं संभाजीचं काम बघून मुदाम बोलावणं पाठवलं त्यांनी. मी इकडे आपले १०० अपराध कधी कधी झाले हा हिशेब करत लटपटत त्यांच्या खोलीच्या दारात पोचून त्यांच्या गर्जनेची वाट बघत असताना मिश्कील शब्द कानी आले, "य़ा संभाजीराजे" वर्ग बुडवून नाटकाची तालीम केल्याबद्दल हे उपरोधिक बोलण असावं असं समजून मी खाली मान घालून उभी तर " अप्रतिम काम केलत .संभाजीराजे मूर्तिमंत उभे केलेत " हे शब्द कानी आले.त्यांची ही कौतुकाची थाप पुढे नाटकं बसवताना ( आमची महिलामंडळाची का असेनात , )उपयोगी पडली.

पुढे आम्ही कॊलेजात असताना गप्पा मारत असताना नवीन आलेल्या मुलीला माझी ओळख करुन देताना दुसरी मैत्रीण म्हणाली, " ही आमच्याच शाळेत होती. ही ११वी पास झाल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी सत्यनारायणाची पूजा केली." असेलही कदाचित. अडनेड्या वयातला नासमजपणा होता तो. पण त्या नकळत्या वयात न कळत संस्कार झालेच होते. ते पुढे उपयोगी आले. नोकरीच्या काळात वर्गात मुलांना शिकवताना लक्षात आलं हे काम आपल्याला आवडतय. त्यांना विषय समजावून देताना जाणवायला लागलं हे खूप वर्षांपूर्वी असंच घडलय. विषय समजल्यानंतर त्यांचे उजळलेले चेहरे बघताना एक प्रकारचा आनंद वाटायला लागला. विशेषत: कर्णबधीर किंवा अंध मुलं मोठी झाल्यानंतर आनंदाने येऊन आपल्या लग्नाचं आमंत्रण देतात, रस्त्यातच वाकून नमस्कार करतात, तेव्हा माझ्या गुरुजनांनो, मी फ़क्त आकाशाकडे बघते. वाटतं, तुम्ही कदाचित तिथून माझ्याकडे बघून मिष्किलपणे हसत असाल. कारण तो नमस्कार तुमच्यासाठीच असतो हे मला माहीत असतं .

Sunday, September 2, 2012

आठवणींच्या फेरफटक्याचं वास्तव

गत काळाच्या स्मरणात गुंगून जाणं प्रत्येकालाच आवडतं. मलाही.त्या आठवणी बालपणीच्या असोत, तरुणपणीच्या किंवा संसाराच्या सुरवातीच्या काळाच्या. कटु आठवणी बहुधा कोणी आठवत बसत नाही. कारण त्या मनाला क्लेशच देतात. अशा आठवणी थोड्या फ़ार प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण त्या उगाळत बसून आपला आज कटु करु नये याच भान प्रत्येकाला जरी नाही तरी बरेचजणांना असतं. त्यामुळे आठवणींचा फ़ेरफ़टका हा सुखद आठवणींचा असतो असं इथे मानलेलं आहे.

तर हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग.बरेच दिवसांनंतर आम्ही नातेवाईक मंडळी जमलो होतो. त्यामुळे आठवणींना उजाळा देणं हे ओघाने आलंच. किंबहुना अशा आठवणी एकमेकांबरोबर अनुभवण्यासाठीच तर आपल्याला आपल्या माणसांना भेटण्याची ओढ वाटत असते. त्या दिवशीही तसच झालं. रात्र संपली पण बोलायाचे उरले अशी अवस्था झाली. या सगळ्या गप्पात आमच्या हरिगावचा विषय निघणं अपरिहार्यच.( हरिगाव म्हणजे साखर कारखान्याची एक टुमदार वसाहत.२० वर्षांपूर्वी तो कारखाना बंद पडला आणि सगळे पोटासाठी पांगले) मग तिथल्या फ़ळबागा, शांत वातावरण, हाताखाली मुबलक नोकर असल्याने आरामाचं आयुष्य. तिथला जिमखाना, जिमखान्यातले गाण्याचे जलसे, नाटकांच्या तालमी, खेळाच्या स्पर्धा, जेवणावळी, शुध्द हवा. एक ना अनेक.विषयांना तोटा नव्हता. प्रत्येक विषयावर प्रत्येकाकडे आठवणींचा साठा होता. जमलेल्यातल्या कोणाचा जन्म , बालपण हरिगावचं होतं, तर कोणी लग्नानंतर तिथे गेलेलं होतं, पण प्रत्येकाचा चेहरा त्या आठवणींनी उजळून निघाला होता.ही गोष्ट झाली पहिल्या पिढीची. पण त्याचं दुस-या पिढीला काय? " झालं, भेटले एकत्र की घुसले हरिगावात. काय सोनं लागलय त्या हरिगावला कोण जाणे" असं अगदी आंबट चेह-याने मुलांनी आपापल्या आईवडलांना विचारुन हरिगावातून बाहेर काढण्यासाठी एक खेळ शोधून काढला आणि मुलांचा विरस नको म्हणून त्यांच्या आईवडिलांनी "हाय कंबख्त तूने पीही नहीं" असा शायराना शेरा मारुन खेळात भाग घेण्याची तयारी दाखवली. खेळ होता ठराविक वेळात आपल्या आवडीचे पान, फ़ूल, रंग, गाव, सिनेमा वगैरे वगैरे लिहायचं.पहिली पिढी विरुध्द दुसरी पिढी. अक्षर होतं " ". वेळ संपल्यानंतर कागद गोळा केले गेले. प्रत्येक कागदावरची नवं वाचण्याचा कार्यक्रम सुरु झाला. आवडत्या गावाचं नाव वाचायची वेळ आल्यानंतर मुलं एक सुरात ओरडली "हरिगाव".पण वाचणा-याच्या चेह-यावर संभ्रम. कारण पहिल्या पिढीच्या २९ कागदांवर हरिहरेश्वरपासून हरिद्वारपर्यंत नावं होती पण एकाही कागदावर हरिगावचं नाव नव्हतं.

मग प्रश्न पडतो, आपण जे स्मरणरंजनात आकंठ बुडतो ते ढोंग असतं की काय? कारण या सत्य घटनेनंतर मलाही धक्का बसला होताच, पण बराच विचार केल्यावर लक्षात आलं की गत काळातल्या आठवणी अत्तराच्या कुपीसारख्या आपण मनाच्या कप्प्यात ठेवतो हे खरंच असतं पण आजच्या वास्तवानेही आपल्याला स्वत:त सामावून घेतलेलं असतं. अगदी एकरुपतेनं. एकतानतेनं.कालच्या आठवणी आपल्या आजचा आधार असतो ...............आणि आज उद्याचा. म्ह्णून तर हा प्रवाह निर्वेधपणे पुढे चालू रहातो. तुम्हाला काय वाटतं?

Saturday, September 1, 2012

जगरहाटीचा दुसरा धडा

नवं वर्ष सुरु झालं तसं सगळ्यांच्याच पोटात गोळा आला होता. आजीच्या पोटात तर कबुतरं उडायला लागली होती. आता नव्या शाळेच्या समोरच मोठ्या मुलांची शाळा. म्हणजे ती सगळी गर्दी बघून हा घाबरला म्हणजे अवघडच जाणार. पण पहिल्या दिवशी हा घरी आला तोच उड्या मारत. स्वारी शाळेवर, तिथल्या जुजुवर, घसरगुंडीवर बेहद खूष होती. तिथल्या टीचर सगळ्यात बेशट होत्या. "कालन त्या हातावर स्टार काढून देतात. कधी लेड तल कधी ब्लू." मग रोज शाळेत वेगवेगळ्या गमती व्हायला लागल्या आणि सगळं आबादीआबाद आहे असं वाटत असतानाच एके दिवशी ह्याने शाळा आवडत नसल्याचं जाहीर केलं. आता शाळेत रुळला रुळला असं वाटेपर्यंत काय बिघडलं कोणालाच उमजेना. म्हणजे असं की, नवीन शाळा, नवा गणवेष, नवीन टीचर, नवनव्या गमती असं सगळं असताना एक दिवस त्याने शाळेत न जाण्याचाच धोशा धरला. सकाळी प्रभातीचा राग "शालेत नाही ज्यायच्यं...." आणि संध्यासमयीही तीच आलापी "श्यालेत जायचं नाही...." कधी द्रुत तर कधी विलंबित. पण चीज एकच. सगळे हवालदिल. आबांच्या मते, त्याची झोप पुरी होत नाही, म्हणून तो कंटाळत असणार. अर्थात याला आजीचा दुजोराच. "होय रे बाबा, आणि सारखा लोळतोच तो. एकदा चांगल्या दागदरला दाखवून आणा." आई, बाबा आपापल्या परीनी प्रयत्नशील. नवीन खेळणं, भूर फ़िरायला घेऊन जाणं ही सगळी आमिषं दखवून झाली. सगळी खेळणी, पुस्तकं शेजारच्या बाळाला देऊन टाकायची ही धमकीही देऊन झाली. म्हशी घेऊन जावं लागेल आणि हम्माची शी काढावी लागेल असा धाकही दाखवून झाला, पण परिणाम शून्य. अखेर त्याने रडत रडत शाळेला न जाण्याचं कारण सांगितलं. "तो मुलगा मालतो." शाहनिशा करण्यासाठी आई शाळेत. टीचरच्या मते, तो मुलगा खराच खोडकर आहे, म्हणून त्याला सगळ्यात पुढे बसवलं जातं. पण त्याने ह्याला प्रत्यक्ष मारलेलं नाही. आमचं लक्ष आहे. टीचरशी बोलून आई बाहेर आली तर हा लालबुंद होऊन जोराजोरात ओरडतो आहे. "तू मला माललश तर व्हेल माशा येऊन तुला खाऊन टाकेल." आणि तो दुसरा मुलगा ह्याच्याकडे बघत बघत पळून चालला होता. "अरे चाललय काय तुझं? का ओरडतो आहेस? आणि कोणाला ?’ आईने न रहावून विचारलं, डोळ्याच्या कडेला साठलेलं पाणी पुसत हा म्हणाला, "तू म्हनाली होतीश ना घाबलू नको, म्हनून मी त्याला ओलडलो आणि तो पलाला." ह्याच्या चेह-यावरचं लोभसवाणं हसू आत्ताच टिपून घ्यायची उर्मी दाबताना आईला फ़ार फ़ार प्रयास पडले

Saturday, January 14, 2012

जगरहाटीचा पहिला धडा

साठ वर्षांपूर्वी मूल पाच वर्षांचं झालं की, त्याला कुठल्यातरी शाळेत अडकवून टाकण्याचा विचार घरात सुरु व्हायचा. शाळा शक्यतो घराच्याजवळ असावी हा एकच निकष लावला जायचा किंवा जवळपास रहाणारी बरीचशी मुलं त्या शाळेत जाणारी असावीत अशी माफक अपेक्षा ठेवली जायची. अर्थात त्यामागे, कळपातलं मेंढरु आपोआप योग्य ठिकाणी पोचतं, हा अनुभव कामी यायचा.
काळ बदलत रहाण्याचं आपलं काम करत रहातॊ. साठ वर्षांपूर्वीचं मूल वाढतं, संसारात पडतं, आणि आपल्यासारख्याच क्रमाने करायच्या गोष्टी आपल्या मुलांबाबतही करत रहातं.तीसपस्तीस वर्षं उलटलेली असतात. परत कालचक्राने तोच फेरा घेतलेला असतो. पण आता गोष्टी खूपच बदलेल्या असतात. साठ वर्षांपूर्वीचं मूल आता आजी झालेलं असतं आणि तीस वर्षांपूर्वीचं मूल बाबा. आजी खुषीत. नातवाच्या बाललीलात दंग. वर्षांना काय त्याचं ? ती आपली पुढे पुढे सरतच असतात.बघता बघता नातू चक्क दोन वर्षांचा होतो आणि घरात वेगवेगळ्या शाळांच्या नावांची चर्चा सुरु होते. हे काय नवं आक्रित ? आजीला वाटतं. अजून चांगली अडीच वर्षं आहेत. आता तर सहा वर्षं पूर्ण झाल्याखेरीज शाळेत घेत नाहीत. आतापासूनच काय हा गोंधळ? असा मनात आलेला विचार मनातच ठेवून आजी नातवाला गोगलगाय दाखवण्यात, पानांवरचे कोवळ्या उन्हात चमकणारे दवबिंदू दाखवण्यात दंग असते.नातूही बापडा त्याला दिसणा-या नानो, एस्टेलो, आल्टो, औडी अशा गाड्या आजीला दाखवण्यात दंग असतो. डम्पर, ट्रक यातला फरक समजावून देत असतो." अग, कुकुली, पोकलेन आणि क्लेन(क्रेन) वेगली अशते" असं दटावत असतो.मजेत दिवस चाललेले असतात. आई आणि बाबा मात्र वेगवेगळ्या शाळांची माहिती मित्रांकडून, शाळेच्या माहितीपत्रकातून, इंटरनेटवरून मिळवण्यात दंग असतात.
आणि अखेर एक दिवस असा उजाडतो की त्या दिवशीच्या आई बाबाच्या आनंदाची तुलना फक्त " आर्किमेडिज"च्या "युरेका"शीच होऊ शकेल. बहुगुणी, आखुडशिंगी, अशी घराच्या जवळची एक शाळा सापडते. आई बाबा त्या शाळेत जाऊन पैसेही भरुन आलेले असतात. किती ते विचारायचं नाही. कारण आकडा ऐकून आकडी यायची वेळ येते हे आजीला आणि आबांना वारंवार माहीत झालेलं असतच. तरीही ’ पडिले वळण इंद्रिया’ असं असल्यामुळे ती लेकाला विचारतेच आणि लेकाला कळवळून म्हणतेच, " अरे, काय रे हे ? या हिशेबाने म्हटलं तर तुमचं शिक्षण फुकटच म्हणायला पाहिजे की रे.’ लेकही नेहमीच्याच धीरगंभीरपणानं सांगतो, " आई, ही तर सुरवात आहे." नातूही खुष असतो. कारण तोही नवा ’युलिफोर्म’, खाऊचा डबा, नवं दप्तर या सगळ्या गडबडीत असतो.आजी मात्र काय बाई तरी एकेक फ्याडं’ असं मनाशीच पुटपुटत असते.मनातल्या मनात एवढसं पोर, कसं राहील शाळेत म्हणत उदास होत असते.
दिवाळी संपते. शाळेचा पहिला दिवस. युनिफोर्ममध्ये पिल्लू अगदी साजरं दिसत असतं. नवे बूट, पाठीवर दप्तर, हातात पाण्याची लालचुटुक बाटली ’ मी शालेत चालले " असं अख्ख्या गल्लीला सांगत पिल्लू स्कूटरवर बसून निघतं आणि आजीच्या डोळ्यासमोर मात्र पिल्लाच्या बाबाने त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचं नाही म्हणून घातलेला धिंगाणा उभा राहतो. पाचदहा मिनिटात स्वारी परत येणार आणि " कुकुली गाड्या बघायला चल" म्हणत हाताला धरुन नेणार या विश्वासाने आजी पटकन आंघोळ उरकून घ्यायच्यामागे लागते. तासाभराने पिल्लू येतं ते नाचतच. कारण शाळेच्या बागेत भरपूर गाड्या खेळायला ठेवलेल्या असतात, घोडा, हत्ती वगैरे प्राण्यांचं तोंड असलेल्या. त्यामुळे तर नातवाची चंगळच झालेली असते.शाळा म्हणजे गाड्या असं समीकरण झाल्यामुळे पुढचे आठ दिवस सकाळी आठ वाजल्यापासूनच " शालेत जाऊ या" असा धोषा लावून नातू सगळ्यांना भंडावून सोडत असतो.
आठ दिवसांची रंगीत तालीम पुरेशी झालीसं वाटून शाळेच्या " आत" जाण्याचा कार्यक्रम नवव्या दिवशी ठेवलेला असतो. एकेक पिल्लू आत जाताना आकांत सुरु करतं आणि नातवाचं आणि त्याला सोबत म्हणून बसलेल्या आजीचंही धैर्य खचायला लागतं. नातू आरडाओरडा करुन आपला निषेध व्यक्त करु शकत असतो पण आजी मात्र तटस्थपणाचा मुखवटा सांभाळता सांभाळता जेरीला आलेली असते. अर्धा तासच ’आत’ बसायचं असतं, पण त्या वेळानंतर ’बाहेर ’ आलेल्या सगळ्या पिल्लांची अवस्था ’ गाई पाण्यावर काय म्हणुनि गेल्या’ अशी झालेली असते. आजीच्या गाई तर पाण्यावर जाऊन परत येऊन आता त्या पाण्याची वाफ व्हायला लागलेली असते. नातवाला छातीशी कवटाळून घरी आल्यानंतार आजीने घोषणा करुन टाकते, " मी त्याला पोचवायला मुळीच जायची नाही. काही बिघडत नाही आणखी वर्षाने शाळेत गेला तरी."म्हणजे आता आजी आणि नातू दोघंही एका बाजूला आणि इतर घर दुस-या बाजूला.मग दुस-या दिवसापासून आई कंबर कसते आणि घरातली सकाळच मुळी " शालेत नाही जायच्यं’ या भूपाळीने आणि " बघ, आज तुला डब्यात गंमत देणार आहे, आज तुला शाळेतून आल्यावर चाकलेट देणार आहे" अशा ख्यालापासून सुरु होऊन अखेर " सगळे हसतील, तुला हम्मा आणून देऊ या. तू हम्माबरोबर जा. रस्त्यावर हम्मा शेण टाकते ते गोळा करावं लागेल" अशा ध्रुपद धमाराने याचा शेवट होई. नातवाची यालाही संमती असते. फक्त तो " हम्माला डायपर घालू या का? म्हनजे तिची शी लश्त्यावल पडनार नाही" असा मौलिक सल्ला देऊन आईच्या रागातली हवा काढून टाकतो. पण अखेर " बरं , तू आत जाऊ नको. बागेत खेळ. " असं करता करता " नीलाक्षी टीचर असल्या तर आत जा" इथपर्यंत मानसिक तयारी करण्यात आई यशस्वी होते.
मग एक दिवशी आजी आणि नातू स्कूटरवरुन शाळेला निघतात. आपल्या धडधडणा-या छातीचे ठोके नातवाला ऐकू येऊ नयेत म्हणून आजी चेहरा हसरा करुन नातवाशी काहीतरी गमतीदार बोलण्याचा प्रयत्न करत असते. नातू आपल्याच नादात रस्त्यावरच्या गाड्या बघण्यात दंग.शाळेच्या फाटकाशी आल्यावर तर आजीला आपले पायही थरथरताहेत अशी सूक्ष्म जाणीव होते आणि घशालाही कोरड पडलीय की काय असं पुसटसं वाटायला लागतं. नातू आता फाटकापासून उलटा फिरणार, आपल्या कमरेला विळखा घालणार आणि भोकाड पसरणार या भयाने ती गळाठून जात. पण पाच मिनिटं झाली तरीही काहीच आवाज येई ना म्हटल्यावर , पोरगं पळालं की काय या विचाराने ती दचकते तर नातू तिच्याकडेच पहात असतो. तिची नजर त्याच्या नजरेला भिडताच तो म्हणातो, " कुकुली, माजं दप्तल दे ना. मी न ललता आत जानाल आहे.आज आमी भालतमाताकी जय अशं मोठ्यंदा म्हननार हाये’
पाठीवर चिमुकलं दप्तर घेऊन जाणा-या पाठमो-या नातवाकडे पहाताना आजीचे डोळे जरासे चुरचुरतात.जगरहाटीचा पहिला धडा नातवाने किती लवकर गिरवला या विचाराने ती किंचित हसते, पण परतीच्या वाटेवर ती मुकाटच असते आणि रोज पटकन संपणारी वाट आज सरता सरत नसते.