Monday, March 5, 2007

कारखाना बंद पडल्यानंतर

फ़ारा दिवसांनी भेटलास मित्रा, तुझं स्वागत असो !
बैस ऐसपैस, जरा पाठ टेक
मधल्या काळातल्या काही कथा, काही व्यथा
ऐकव आणि ऐक !
अर्ध्या वयापर्यंतचे आपले धागे, एकत्रच तर होते विणलेले
गर्द पोपटी चैतन्याने भारलेले, अन सोनेरी तेजाने लखलखलेले !
सरळ सुरळीत चालू राहती वाट ,
तर कदाचित बदललाही असता आयुष्याचा घाट.
भेटलो असतो आपण शुभ्र माथ्याने, थरथरत्या मानेने.
केल्या असत्या गोष्टी , मुला नातवंडांच्या
किंवा आपापल्या निव्रुत्ती समारंभाच्या !
मित्रा, हसलाससा खिन्नसा ?
अजूनही आठवतो कारे तुला
एक एक दिवा मावळता अंधुकसा ?
बंद घरातला एकेक कवडसा?
गाडी घुंगरांच्या किणकिणाटात फ़रपटत जाणाया सावल्या मूकशा ?
बघ, अजूनही हात थरथरतोय तुझा
अरे, खूप वर्षं झाली मित्रा,
जागत्या जागेचा मसणवटा होवून
पांगली बघ माणसं आपली
गोणत्या बोचक्यात आपलं जग भरून
ओठ मिटले उमासे मागे ठेवून !
शांत हो मित्रा,
घामेजलेला हात पूस आणि पाणावलेले डोळेही, जमलं तर.
खरं आहे तुझं
वारा सुटतोच असा कधी कधी धूळ उडवत......
आणि मित्रा, नको येऊस परत
बोलू लागतात रे मूक वेदना,
अद्न्याताच्या अंधाराने भयभीत डोळे
सुकत चाललेल्या जखमा उसवत,
दबल्या आठवणींना चालवत.
जड जातं रे सावरायला
आपलं उखडलेपण रोवायला
अवघड जातं रे मित्रा, खरंच अवघड जातं
शीळ घालतं रानपाखरू परत आत कोंडायला !

7 comments:

prabhavati said...

जड जातं रे सावरायला
आपलं उखडलेपण रोवायला
अवघड जातं रे मित्रा, खरंच अवघड जातं
शीळ घालतं रानपाखरू परत आत कोंडायला !


farach surekh kavita, visheshatha, varachya concluding oli ! Bhavagarbha.

Chaitra said...

लक्षात आलं कधी लिहीली असशील ते!हरिगावची माणसं नुसती भेटून गेली तर एव्हढा त्रास होतो, खरंच पुन्हा तिकडे जाणं, दरवाजे उखडलेली आपली भग्नावस्थेतली घरं पहाणं झेपेल? काही ना काही कारणांनी जाणं टळतंय तेच बरं नाही का? की लहानपणी दुधाचा दात पडायला लागला की तिथे जीभ लावायची नाही, दुखतं, दात तिरका येतो हे सांगूनही जीभ तिथेच जात रहाते...वेदनेतलं सुखं घेण्यासाठी ....तशीच तिथे जायची ओढही आहे का? ...
मग वाटतं जे गमावलं ते सुंदर असलं तरी जे मिळवलंय तेही काही कमी सुंदर नाही. म्हणजे "ठेविले अनंते तैसेचि रहावे" या वृत्तीने नाही म्हणत तर खरंच...आज जे काही ते तसं घडलं नसतं जर आपण हरिगावलाच असतो तर.. म्हणजे ऑरकूटही नसतं आणि हजारो मैलावरच्या माणसांशी गप्पाही नसत्या.
अशा विचाराने तो दुखरेपणा जातो. संदर्भबिंदू तोच रहातो... मात्र कालच्या संदर्भात आज achievement वाटायला लागतो... नाही का?

Radhika said...

गायत्री, एका उद्गार चिन्हात तुझ्या सगळ्या भावना पोचवल्यास.फ़ार सुंदर ! आभार.
आभारी आहे, प्र्भा, हे उखडलेपण जे आपलं गाव सोडून येतात, त्या सगळ्यांनाच जाणवतं.
चैत्रा, बरोबर ओळखलस. पण ही वेदना, एका जागत्या जगाच्या नष्ट होण्याची आहे. मी आहे त्या परिस्थितीत नेहमीच सुखी असते.कारण दार बम्द झालं तर खिडकी किलकिली होते यावर माझा विश्वास आहे.खूप छान वाटल.

कोहम said...

sundar...

Manasi said...

yach nave in general ch tuachya likhanat tatasthpana/trayastha drushtikon janawato..difficult to carry that thing..kharach sundar lihilay!

Asawari said...

loved chaitra tai's comment :) need i say more????

Radhika said...

आभारी आहे कोहम, मानसी, आसावरी !