Sunday, April 29, 2007

काही क्षण ... दिवेआगरचे


पोरांचं आपलं बर असतं. आदल्या रात्री ठरवतात, चला, उद्या अलाण्या फ़लाण्या ठिकाणी जावून भटकून येऊ या. मग सकाळी उठून ब्रेकफ़ास्ट घेताना [ तोही सावकाश उठून ] घोषणा, "पटकन आटपा, आपल्याला अलाण्या फ़लाण्या ठिकाणी फ़िरायला जायचं आहे. दोन तासात निघू. जमलं तर हॉल्ट करू, नाही तर रात्री उशीरा परतू. " अरे पण मेल्या, पोळ्याची बाई, कामवाली येणार उशिरा, तिला निरोप द्यायला नको ? शिवाय बाबांची पूजा आणि देवाचं वाचायलाच तासभर लागेल. कसं आटपणार ? पण या असल्या चिल्लर प्रश्नांची उत्तरं त्याने आधीच तयार ठरवलेली असतात. आम्ही कितीही आरडाओरडा केला, तरी आमचं सामान आणि ब्लडप्रेशर सावरत तो स्टिअरिंग पकडून कुठल्या गाण्याची सी डी लावायची ते बायकोबरोबर ठरवत मिष्किल हसत बसलेला असतो.
या पार्श्वभूमीवर आमची दिवेआगरची ट्रिप अगदी वेगळीच होती.आज जावू या की उद्या जाणं सोईचं होईल हे ठरवण्यातच दोन महिने गेले. मग हाच दिवस प्रयाणाला योग्य आहे अशी आमची खात्री पटली आणि आम्ही निघालो.गाडी धावत होती आणि प्रथमच जाणीव झाली की काही तरी चुकतय. काय ते समजत नाही, पण कुछतरी गडबड छे.हां, गाण्याचा ठेका चुकतोय आणि मान पुढे मागे लचकत हलण्याऐवजी आडवी डोलतेय समेवर !म्हणजे " क्रेझी किया रे " ऐवजी चक्क भजनी ठेका.... इंद्रायणी काठी. असं होणं सहाजिकच होतं कारण गाडीतली चारी डोकी ज्येष्ठ नागरिक. मी , माझा चक्रधर नवरा, त्याची बहीण आणि तिचा नवरा. गाडी जसजशी गाव सोडून घाटाच्या दिशेने पळायला लागली, तसं गाडीतला डेकही बंद झाला आणि स्रुरू झाली रंगांची उधळण करणार्‍या निसर्गाची संगत आणि त्याच्याच संगीताची साथ.
ताम्हिणी घाटात गेल्यानंतर एका वळणावर खोल दरी आहे. चारी बाजूनी उतरत उतरत डोंगराचं पाणी मधल्या खळग्यात मुरून पाचू फ़ुलवत होतं. पावसाळ्यात खळाळणारे प्रवाह फ़ेनफ़ुलं उधळत असतीलही, पण जानेवारीत मात्र तो उतार जरा रक्तदाब वाढवणाराच वाटला. अर्थात कुणाच्या रक्तदाबाच्या, कुणाच्या मधुमेहाच्या गोळ्या घ्यायच्या असल्याने ब्रेकफ़ास्ट करणं गरजेचं होतं.अल्युमिनियम फ़ॉइलमध्ये गुंडाळलेली प्रत्येकाच्या वाटणीची सॅंडविचेस एका हातात आणि थर्मासमधल्या कॉफ़ीचा वाफ़ाळता मग दुसर्‍या हातात घेऊन प्रत्येकाने आपापल्या सोईची जागा पकडली आणि भोवतालच्या हिरवाईत जो तो गुंगून गेला, एक मूक संवाद साधत !पुढच्या प्रवासात कुठे रक्तवर्ण कुंकुमासारखा पलाश भेटत राहिला तर कुठे गुलाबीसर फ़ुलांच्या डहाळ्या लगटत राहिल्या. साथीला कधी कधी लता, कधी आशा तर कधी किशोर तर कधी तलत.
दिवेआगरच्या बापटांच्या अंगणात हातपाय धुवून खुर्चीत विसावतोय न विसावतोय तोच, " कवा आलासा ? काय च्या पानी घेनार का जेवनार एकदम ? " असं विचारायला आल्यागत जोरदार को कोच को ऐकू आल आणि त्याच्यामागून मान लगालगा करत मातीतले दाणे , किडे शोधत ३ -४ कोंबड्या आणि त्यांची पिलावळ. माहेरच्या गावाला घेऊन जाणारं ते कुटुंब बघून दिवेआगर मला एकदम आपलसच वाटल. मस्तपैकी शेणाने सारवलेली जमीन बघूनही खुर्चीवर बसणं हा करंटेपणाच होता. त्यामुळे आखडलेल्या पायांना जमिनीवर पसरून भिंतीला टेकून समोरच्या कोंबड्या आणि पिले बघण्यात दंग झाले. मान किती म्हणजे किती चटा चटा हलवावी त्या बायांनी की मलाच माझ्या स्पॉंडिलिसिसची आठवण व्हावी. कोंबडेबुवा मात्र कंपाऊंडच्या भिंतीवरून मान तोर्‍यात उडवत ' कुटुंबावर" नजर ठेवून होते. रस्त्यात माणूस नाही की काणूस नाही. निरव शाम्तता. बापटांच्याकडच्या जेवणाने तृप्त होवून बाकीची मंडळी वामकुक्षी घेत असताना मी माझी खुर्ची पोफ़ळीच्या झाडाखाली हलवली. झाडांखालची जमीन ओलसर होती. आदल्या दिवशी पाणी दिलेलं असावं बहुतेक .टपकन एक पोफ़ळ खाली पडलं. उचललं आणि दर्शनाने[ केअर टेकर बाईचं इतक सुंदर नाव मी प्रथमच ऐकलं.] ठेवलेल्या टोपलीत टाकलं.आणखी दोनचार झाडांच्या बुंध्यांशी लुडबुड केल्यावर आणखी काही पोफ़ळी सापडल्या. दर्शना, अग, गेली कुठे ही असं म्हणत पुढे चालले तर शेजारच्या घराच्या परसदारी दिसली. ' काय करतेस ग ' म्हटलं तर म्हणे, ' पोफ़ळी चिरून वाळायला टाकतो ' बघू तरी कशी चिरतात ते म्हणून बसले तर मुलाणेके मामू का कोंबडं कापायचा सुरा असतो तसं पातं असलेली विळी. आता मागे सरायचं नाही असं ठरवून हात घातला. ' आजी नको हां, हात कापात.' आजीने दोन तीन पोफ़ळं चिरली आणि माघार घेतली. बाकीच्या मुली खसा खसा चिरत होत्या. अशी सालं काढलेली पोफ़ळं २ -३ महिनी ऊन खात पडतील तेव्हा कुठे त्यांची खडखडीत सुपारी होते, आणि सुपारीला भावही चांगला, ३५० रु. किलो.
संध्याकाळी दिवेआगरच्या समुद्रकिनार्‍यावर जाताना वाटेतच एका देवळाचं बांधकाम चालू होतं. राजस्थानी धाटणीचं लाल दगडाचं देऊळ सुम्दर होतं, पण मला मात्र आणखी ५ वर्षांनंतरची तिथली बजबजपुरी डोळ्यापुढे आली आणि मन खट्टू झालं. नितान्त सुंदर निसर्गाचा , अशी धार्मिक ' दुकानं ' थाटून माणूस का विध्वंस करतो ? समुद्राच्या उधाणलेल्या लाटात, एका लयीत वाजणार्‍या गाजेत , दूरवर पसरलेल्या अथाम्ग जलाशयात , रंगांची उधळण करत त्याच पाण्यात मिसळून जाणार्‍या सूर्यबिंबात असणार्‍या दिव्यत्वाचा स्पर्श माणसाला का पुरेसा होत नाही ? अशा विचारांनी मन खट्टू झालं

समुद्रकिनार्‍यावर गेल्यानंतर त्या अथांग सागराला बघताना किती रुपं आठवावी त्याची. लहानपणी शिरोड्याला , आजोळी गेलं की त्याच्या वाळूत पाय खुपसून चालताना किती वाळू उडवत होतो. सगळ्यांच्या हातात हात गुंफ़ून लाटेबरोबर पायाखालची वाळू सरकताना जोराने किंचाळायची चढाओढच लागायची. वाळू भरलेले ओले कपडे घालून मागच्या दारी विहिरीवर जावून आंघोळ केल्याशिवाय आजी घरात पाऊल टाकू द्यायची नाही.किती आठवणी घेऊन त्याच्याशी संवाद करत फ़ेर्‍या मारल्या , मात्र यावेळी पाय मात्र कोरडेच राहिले.
अंधार पडताच रस्त्यावरचे मिणमिणते दिवे थेट बालपणातच घेऊन गेले. अशा दिव्यातच आम्ही वाढलो होतो. उजेडापेक्षा अंधार गडद करणारे दिवे आणि रस्त्यावर आखलेल्या लोकांच्या घरातल्या उजेडाच्या चौकोनांनी आम्हा सगळ्यांना लहानच करून टाकलं. कदाचित संध्याकाळी " सुवर्ण गणपती "च्या मंदिरात म्हटलेल्या आरतीचा आणि अगदी हात जोडून आणि पहिलीतल्या पोरांसारखे डोळे मिटून " मना सज्जाना भक्तीपंथेचि जावे " म्हटलेल्याचाही परिणाम असावा तो.
पण दिवेआगरने खोलवर दडलेली सुरावट छेडली खरी !
समुद्र हा माझा आतल्या गाभ्यातला सखा आहे. तो मला अशी खट्टू होवून जाऊ देणार होता थोडाच ?आदल्या दिवसाची कसर दुसर्‍या दिवशी भरून निघाली. दिवेआगर ते श्रीवर्धन हा सकाळी केलेला प्रवास आणि दिवेआगर ते दिघी हा संध्याकळी केलेला प्रवास म्हणजे केवळ अविस्मरणीय ! रुसलेल्या छोट्या बहिणीला मोठ्या भावाने वेगवेगळ्या भेटी देवून मनवावं तसा वा्टला तो समुद्र मला ! गाडी एखाद्या वळणावर वळली की खाली खोलवर तो असा काही चमचमत उसळत असायचा की त्या त्याच्या नर्तनाच्या खोडकर लाटा आपल्याही हृदयातून उसळाव्यात. झाडीतून त्याचं मंद सम्गीत खुलवत रहायचं. म्हणायचं, बघ, माझ्यापासून दूर तू जाऊच कशी शकतेस ? मी आहे इथेच. चल , शोध मला. आणि आपणही नटखट मुरलीधराला शोधणार्‍या गोपींच्या आतुरतेने त्याला शोधत रहावं तर अचानक त्याचा अथांग जलाशय बाहू पसरून खुणावत रहायचा. एके ठिकाणी कधी न पाहिलेल्या पांढर्‍याशुभ्र रंगात समुद्र डोलताना दिसला आणि जवळ गेल्यावर लक्षात आलं की शेकडो बगळे भक्ष्याच्या प्रतिक्षेत ' बकध्यान ' लावून पाण्यात लाटेवर झुलताहेत.
संध्याकाळचा दिवेआगर ते दिघी हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देवून गेला. विशेषत: नानवलीहून दूरवर समुद्रात वसलेला जंजिरा पाहताना कोणत्याही क्षणी किल्ल्यात हालचाली सुरु होतील असं वाटावं इतका तो जिवंत वाटत होता.
या सगळ्या क्षणांनी जो जिवंतपणा रसरसून आतपर्यंत झिरपत गेला तो खूप दिवस तसाच रहाणार होता हे नक्की !

draft

Thursday, April 26, 2007

क्षमा

तापलेल्या रस्त्यावरून सोलवटलेले पाय ओढत तुझ्या दाराशी आल्यावर
क्षणभर थांबून समोर सहज पाहिलं, तर
काटेरी मुकुटात जखडलेला दिसलास तू भिंतीवर
कललेली मान सावरत
रक्ताळलेले हात पेलत !
तुझं वेदनेनं कल्लोळलेलं शरीर
दौडवीत गेली अदीम थरथर
" वेदनेतून उमटलेला मायेचा हुंकार
रक्तातून घुमलेला क्षमेचा तत्कार
असावे बहुधा मिथक खोटे
थोडे रचलेले , थोडे लुटुपुटीचे!"
धुमसणार्‍या कराल तप्त लोंढ्याला थोपवत भिडवला तुझ्या डोळ्याशी डोळा,
,दाबलं पाऊल काट्यासह चिळकाम्ड्या उडवत चळचळा.
एक थंड लहर लपेटत चालली अंग भर
" देवा , क्षमा कर तू ह्याला ,खरच क्षमा कर!
क्षमेचा अर्थ उमगण्यासाठी तरी क्षमा कर !"
ठिबकणार्‍या रक्तातून,चरचरणार्‍या जखमेतून
हसलास तू कष्टाने,
" अग्नीने दाह द्यावा,
जलाने तो शांतवावा.
चाले तो जैसे ज्याचे मन
जल बन तू लेकरा, जल बन"
विरली वेदना विरले चराचर
नुरली वंचना , नुरले जहर............. !

वळून पाऊल टाकताना बाहेर, जाणवलं तू आहेस पाठी
,आधाराला देऊन क्षमेची काठी.
अर्थ जाणवला तुझ्या वचनाचा थोडासा ,
समजलाससं वाटलं तू जराजरासा !
draft

Monday, April 23, 2007

चंद्र अमेरिकेतला

दारात उभी राहून चंद्र न्याहाळताना वाटलं,
अमेरिकेतला चंद्र कसा दिसेल?
लखलखत्या दिव्यांच्या साथीला
आकाशाची थोडीतरी किनार असेल?
लेकाला विचारलं," बाबा रे ,असतो तरी कसा तो ?
दिसण्याने त्याच्या जीव तुझा सुखावतो ? "
तर म्हणाला, "आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.
आता बघावसं वाटल, तरी टाळतोच ती कल्पना,
वाटतं, कदाचित नसेल ना मागे शिक्का ' मेड इन चायना ?' "

Sunday, April 22, 2007

खासबागेतलं घर

आजवरच्या आयुष्यात जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या घरात राहण्याचा योग आला, पण आयुष्याची पहिली १९ वर्षं ज्या घरात काढली, ते घर गैरसोईचं होतं असं आज वाटलं, तरीही तेच सर्वात प्रिय वाटतं. ते घर म्हणजे कोल्हापुरातलं खासबाग या भागातलं " राज अंजुमन ताज " अशा भारी भक्कम नावाचं बी. नांद्रेकरांचं घर. घराच्या नावातले ३ शब्द हे त्यांच्या ३ मुलांची नावं होती. त्यांची ४थी मुलगी ' शुक्रिया' आमच्यापेक्षा ३- ४ वर्षांनी मोठी होती. तिचं नाव मात्र घरावर नाही याचं आम्हाला लहानपणी फ़ार वाईट वाटायचं, आणि शुक्रिया आबांची नावडती मुलगी आहे असं आम्हीच मनाशी पक्कं ठरवून ती समोर नसताना फ़ार हळहळायचो. आता आबांनी घर बांधलं तेव्हा 'शुक्रिया'चा जन्मच झाला नसेल तर तिच नाव घरावर कसं असणार ही गोष्ट आमच्या चिमुकल्या डोक्यात काही येत नसे.आम्ही आबांच्या घरातील भाडेकरु होतो. आणखी ३ भाडेकरु आणि आबांचं स्वत:चं घर मिळून नांद्रेकरांचं घर होत असे. या सगळ्या घरांना मध्ये चौक होता, आणि प्यायचं पाणी भरण्यासाठी समाईक नळ तिथेच होता. शिवाय बाथरूमही चौकातच होती आणि बाथरूममध्ये स्वतंत्र नळ होता. अशा घरांना पूर्वीच्या पध्द्तीप्रमाणे समाईक संडासही होता. आमच्या घराला लागूनच , म्हणजे चालत गेलं तर २ सेकंदात आणि पळत गेलं तर १/२ सेकंदात पोचू अशा अंतरावर खासबाग नावाचं मैदान होतं, जे आम्हा मुलाम्चं दुसरं घर होतं, त्या मैदानाच्या नावावरून त्या भागाचं नाव खासबाग असं पडलं होतं.याभागात बर्‍याच नामवंत मंडळींची घरं होती, आणि ती सगळी मंडळी इतकी मोठी आहेत याची जाणीव लहानपणी आम्हाला नव्हती. आता आमचे घरमालक म्हणजे शुक्रियाचे आबा हे १९३०_ १९५० या काळातले फ़ार मोठे नट होते हे मला बर्‍याच वर्षांनंतर त्यांचे मीनाकुमारी , निम्मी, नर्गिस यांच्याबरोबरचे फ़ोटो बघितल्यानंतर कळलं. तसे तर आमच्या अवतीभोवती सरिताचे अण्णा,[जुन्या काळचे प्रसिध्द नट विष्णुपंत जोग ],बकुळाबाईंचे मिष्टर[ भालजी पेंढारकर], भालजी पेंढारकरांची सर्वात मोठी बायको लीलाबाई [मिस लीला] अण्णांकडे येणारे त्यांचे मित्र दादा साळवी, मांगोर्‍यांच्या समोरच्या घरात येणारा अरुण सरनाईक,शकून मासूरकरची मैत्रीण उमा [उमा नटी] हे सतत वावरतच असायचे, पण त्यांचं ग्लॅमरचं वलय आमच्या डोळ्यावर कधीच आलं नाही.खासबागेच्या ग्राऊंडवर धुडगूस घातल्यानंतर आम्ही सगळ्या मुली सरिताच्या घरी झोपाळ्यावर बसून झोके घेत गाण्याच्या भेंड्या खेळत असू. सरिताची आई जानकीकाकू गोड गळ्याच्या होत्या. त्याही कधी कधी अण्णा नसले तर गाणं म्हणत.कधी कधी संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळेला अण्णांच्या पहाडी आवाजातल्या ताना कानावर पडत. भालजी पेंढारकरांकडच्या , म्हणजे बकुळाबाईंकडच्या घरगुती समारंभासाठी उमा नटून थटून पण डोक्यावर पदर आणि नजर खा्ली , हातात क्रोशाच्या रुमालाने झाकलेलं ता्ट घेऊन जाताना दि्से. लीलाबाई रस्त्याने निघाल्या की कोणीतरी योगिनी शुभ्र वेषात निघाल्यासारखं वाटे.शाळेत आमच्या मागे दोन वर्षं असलेली माया जाधव सायकल वरून गोखले कॉलेजला जाताना दिसे. ती सगळी कोल्हापुरातल्या उच्चभ्रू लोकांची वस्ती होती, पण हे लोक आपल्या खाजगी आयुष्यात अगदी मध्यम वर्गीय मूल्य जपणारे असल्यामुळे बाकीच्या जनसामान्यात मिसळून गेलेले असत.
तर मी ज्या घरात लहानाची मोठी झाले, ती दुमजली आणि चार खोल्या असलेलं होतं. पुढे गॅलरी, मागे गच्ची. या गच्चीत एका कोपर्‍यात आई बंबात घालायसाठी कोळशाची खर आणि शेण कालवून त्याचे बंबगोळे करून वाळवत असे. तिथेच बाजूला शेणाच्या गवर्‍या [कोल्हापुरी भाषेत 'शेण्या' ] पोत्यात भरून ठेवलेल्या असत. आणि उरलेल्या जागेत तिने आणि भैय्याने देवदारी खोक्यात वेगवेगळी फ़ुलझाडं लावलेली असत.संध्याकाळच्या वार्‍यात ति्थे बसून गोष्टीचं पुस्तक वाचायला मजा येत असे.पुढच्या बाजूला गॅलरी होती.एका कोपर्‍यात छोटीशी मोरी होती, आणि दुसर्‍या कोपर्‍यात कोळशाचं भलं मोठं पिंप. यामधली जागा भैय्याची स्टडीरूम. त्याने तिथे बल्ब लावून घेतला होता.पिंपाच्या शेजारच्या शेल्फ़वर त्याच्या नोटस, पुस्तकं. ११वीत असताना मीही हट्टाने त्याच्या पायाशी बिछाना घालून अभ्यास करत असे.जेमतेम १० वाजेपर्यंत डोळे ताणून वाचल्यानंतर अंथरुणाला पाठ टेकली की चांदण्यांनी भरलेलं आकाश खुणावायला लागायच, समोरच्या मुनिश्वरांच्या बागेतल्या नारळाच्या झावळ्या मंद डोलायला लागायच्या आणि त्या सगळ्यांना पांघरून डोळे जड व्हायला लागायचे.मला आता आश्चर्य वाटतं, की अशा अडचणी , जागेच्या, गोंगाटाच्या, आमच्या अभ्यासात अडथळे का आणू शकल्या नाहीत. खालून रस्त्यावरून रहदारीचे आवाज,ग्राऊंडवरून खेळताना मारलेल्या आरोळ्या, काही काही कळायचं नाही पुस्तक उघडल्यावर.सगळं जग जणू विरून जायचं आणि उरायचं फ़क्त पुस्तकातलं जग, मग ते अभ्यासाचं असो की गोष्टीचं !
आमच्या या घराला दोन मजले होते, वर दोन खोल्या, खाली दोन खोल्या.. शिवाय एखाद्या हॉलसारखा भला मोठा माळा, ज्यात भैय्या आणि त्याचे मित्र शिडी लावून चढायचे, आणि दोनच माणसं उभी राहतील अशा गच्चीत उभे राहून पतंगाची काटा काटी करायचे.वरच्या मजल्यावरची सगळी कपाटं , लॉफ़्टस, वरच्या माळ्याचा काही भाग पुस्तकांनी भरलेला असायचा. महाभारताच्या खंडापासून पी. जी. वुडहाऊसपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तकं ठासून भरलेली असायची. शिवाय बंगाली , गुजराथी भाषेतील साहित्य, शास्त्रीय विषयांची असा भरणाही त्यात असायचा. माझे वरचे दोन्ही भाऊ वाईच्या विश्वकोषात लिहिणारे असल्यामुळे त्यांच्यापुढे माझं वाचन म्हणजे लिंबू टिंबूतली बी च. पण वरच्या मजल्यावरच्या पुढच्या खोलीत सगळे काही ना काही वाचत असताना मी बाराखडी काढत बसलेली मला अगदी स्वच्छ आठवतय.पुढे मोठी झाल्यावर माझीही लायब्ररी झाली. जिन्याच्या वरच्या कपाटावर एक माणूस आरामात झोपेल इतकी जागा होती,तिथे खाकी कव्हर घातलेली आणि कॅलेंडरचे आकडे कोपर्‍यात चिकटवलेली, चांदोबा, गोट्या, रॉबिन हुड, सानेगुरुजींच्या गोड गोष्टी अशी कितीतरी पुस्तकं मी नीट रचून ठेवलेली असत.पुस्तकांवर माणसांप्रमाणे प्रेम करायला या घराने मला शिकवलं . अर्थात माझ्या मुलांच्या मते तो साने गुरुजींच्या 'बोर 'गोष्टींचा परिणाम आहे. जनरेशन गॅप, दुसरं काय ? असो.
तर साम्गायची गोष्ट अशी की वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठी दोन ठिकाणी वाकडा जिना होता. त्याच्या खालून तिसर्‍या पायरीजवळ भिंतीत एक खिडकी होती.पायरीवर बसून बशीत खाणं घेवून पुस्तक वाचत तिथे बसायला खूप मजा येत असे. जिन्याखाली जास्तीचं सामान असायचं आणि पुढे डायनिंग टेबल आणल्यानंतर लाल लाल लाकडी पाटही तिथेच गेले. पण एकदा आम्हा मुलांचा गणपती बसवण्यासाठी सगळं सामान काढून 'कैलास पर्वतावर गणपती' असा सीनही आम्ही जिन्याखाली केला होता. डायनिंग टेबलचे ड्रॉवर्स कपड्यांनी खच्चून भरलेले असायचे आणि बापू कामासाठी गावाला गेले की भैय्या आणि त्याचे मित्र टेबलावर टेबल टेनिसही खेळत. किंवा भैय्या रात्री त्यावर झोपेही.आमचं स्वयंपाकघर मात्र अंधारं होतं. दिवसा ही तिथे बल्ब लावावा लागे. दार होतं, पण ते समाईक चौकात उघडत असल्याने बहुधा बम्दच असायचं.स्वयंपाक चुलीवर चालायचा. चूल सारवणं, तिला पोतेरं देणं, दुसर्‍या दिवशीसाठी ती भरून ठेवणं हे कितीही " एथनिक" वाटलं तरी तेव्हा न जाणवलेले आईचे कष्ट आज मनाला वेदना देतात. आयुष्य हे असंच असतं. एकमेकींना मदत करत ते हसत खेळत पार पाडायचं असतं, हे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला आपल्या वागणुकीनेच दाखवून दिलं. बाहेरचे पदार्थ खाणं हे छचोरपणाचं मानलं जात असल्याने आणि वेगवेगळे पदार्थ करणं स्त्रीच्या स्त्रीत्वाचं प्रमुख लक्षण मानल गेल्यामु्ळे रोजचं वाटण घाटण ही तर सामान्य गोष्ट होती, पण विशेष खटाटोपाचे जिन्नसही या बायका सहजपणे करत. [ की त्यांना करावे लागतच ? ] मला माझ्या लहानपणीची आई आठवते ती चुलीच्या धगीने लाल झालेली, कमरेला खो्चलेल्या सोदन्याने [फ़डकं ] घाम पुसणारी, आणि तरीही शांत. या सगळ्या कामातही विणकाम भरतकाम वाचन करण्यासाठीचा वेळ ती कुठून काढायची ते तीच जाणे.
आमच्या या घराला फ़रशीची जमीन नव्हती, तर मातीची जमीन होती. दर आठ दिवसांनी ती सारवायला लागायची. आणि दर चार महिन्यांनी ती उलायची, म्हणजे तिचे पोपडे निघायचे. मग उलथन्याने ते काढायचे. जमिनीवर पाणी मारायचं आणि मग ती शे्णसडा घालून केरसुणीने सारवून घ्यायची. अशी ती सुस्नात झालेली जमीन खोलीच्या चार कोपर्‍यात शुभदर्शक रांगोळी घालून वर हळदीकुंकू घातलं की गरत्या सवाशिणीसारखी उजळून निघायची.
या घराची एकच का्ळीकुट्ट बाजू होती, ती म्हणजे संडास. पूर्वीच्या काळचे टोपलीचे संडास आणि संपूर्ण तोंड फ़डक्याने बाम्धून डोक्यावरून मैला वाहून नेणारे भंगी लहानपणी दिसले की मळमळायला लागायचं आणि घृणेने मान फ़िरवली जायची, कळत्या वयात ते दृश्य आठवलं की त्यांच्या नशिबातल्या नरकयातना बघून शरमेने डोळे पा्णवायचे आणि मान खाली झुकायची.
आमच्या घरमालकाम्चे मुलगे कर्ते झाल्यावर त्यांनी घराचा कायापालट करायचं ठरवलं. घरात फ़रशी घालून शिवाय प्रत्येकी स्वतंत्र फ़्लशचे संडास, घरातच नळ . मात्र भाडं महिना ४० रुपयावरून १०० रुपयावर जाणार होतं. एवढं भाडं देवून अंधार्‍या घरात राहण्यापेक्षा नव्या वस्तीत रहावं हा बायकांचा विचार पुरषांनाही पटला आणि आम्ही सागरमाळावर रहायला गेलो, पण पाण्याच्या टंचाईमुळे तेही घर ६ महिन्यातच आम्ही सोडलं आणि संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत रहायला गेलो. तिथे मात्र मी लग्न होईपर्यंत राहीले.
draft

Wednesday, April 18, 2007

कॉलेज

१९६५ च्या जून महिन्यात ११वीच्या परिक्षेचा निकाल लागला, आणि कॉलेजात जाण्याची तयारी सुरु झाली. त्या काळी कॉलेजच्या निवडीत कोल्हापुरात दोनच कॉलेजेसना प्राधान्य असायचं. राजाराम आणि गोखले. राजाराम आमच्या शाळेला लागून असल्यामुळे त्या वास्तूबद्दल प्रचंड आपुलकी आणि कुतुहल होतं. डिग्री मिळवायची आणि लग्न करून संसाराला लागायचं हेच इतर बहुसंख्य , म्हणजे जवळ जवळ सगळ्याच , मुलींप्रमाणे माझंही ध्येय असल्यामुळे कॉलेजात जावून काही भव्य दिव्य करायचय असंही ठरवलं नव्हतं.शाळेच्या आखीव रेखीव चाकोरीतून सुटून एक स्वच्छंद फ़ुलपाखरी जग बघायचं हाच कॉलेजात जाण्याचा मुख्य हेतू असायचा.अभ्यास ही तदनुषंगाने येणारी अपरिहार्य गोषट असल्याने कोणीच त्याचा बाऊ करत नसे. त्यामुळे कॉलेज लाइफ़ एन्जॉय करण्यासाठी आर्टसला जाणं हा उत्तम पर्याय होता. त्यासाठी लागणा‍र्‍या चार वह्या, पेन ,सगळ्याच साड्यांवर मॅचिंग होईल अशी काळ्या रंगाची पर्स, वेगवेगळ्या आकाराची कानातली, लांबलचक माळा, ५, ६ लेटेस्ट फ़ॅशनच्या साड्या यांची खरेदी मी मे महिन्यातच उरकलेली होती.शिवाय वह्या छातीशी धरून एक वेणी पुढे घेऊन चालायची प्रॅक्टीसही बर्‍यापैकी झालेली होती.११ वीला प्रथम श्रेणी आणि राष्ट्रीय पातळीवर शहराचं प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळे गोखले आणि राजाराम या दोन्ही कॉलेजात सन्मानपूर्वक प्रवेश मिळत होता. मी राजारामचा पर्याय निवडला.
त्यावेळी राजाराम कॉलेज गावातल्या भवानीमातेच्या मंदिराच्या परिसरात, ज्याला भवानी मंडप असं ओळखलं जातं, भरत असे. कॉलेजची मूळ इमारत ही राजवाड्याचाच एक भाग असल्याने त्या बांधकामाचा प्रभाव कॉलेजच्या इमारतींवर होता. ती काळ्या दगडाची इमारत उन्हाळ्यातही थंडगार वाटायची.कॉलेजचं पोर्च हा मुलांसाठी ' आरक्षित ' भाग असल्याने आणि तिथे आजी सदस्यांबरोबर आजीव सदस्यांचेही वास्तव्य असल्याने तो भाग मुलींसाठी 'निषिध्द क्षेत्र ' होतं. कॉलेजच्या दारातून आत शिरलं की, मुलींच्या माना ज्या खाली जात, त्या वर्गात शिरलं कीच वर होतं.पहिल्या वर्षी मुली पोर्च समोरून जाताना ' आता कोणत्याही क्षणी मुलांचा घाला होईल ' या भीतीने वाघ मागे लागलेल्या मेंढरासारख्या थरथरत, पळत सुटत . एखाद्या मुलाने शीळ घातली तर किंवा बाण मारला तर ? या भीतीने त्यांची गाळण उडत असे. बहुसंख्य मुली केवळ मुलींसाठी असलेल्या शाळेतून आलेल्या असल्याने दबावाखाली असत आणि मुलंही सहशिक्षणाला सरावलेली नसल्याने दबाव झुगारायला उत्सुक असत. मुलामुलींनी एकत्र उभं राहून गप्पा मारणं ही फ़ारच दूरची गोष्ट होती.त्यामुळे वेगवेगळे 'सजातीय ' घोळके करून 'विजातीय ' धृवावर लक्ष ठेवणं एवढाच 'रोमॅंटिसिझम ' मुलं करू शकत होती. काही फ़ारच धीट मुलं, मुली निघाल्या की छातीवर हात ठेवून छातीत कळ आल्यासारखा चेहरा करून आपल्या दिलाचे हजार तुकडे झाल्याचं सुचवत असत आणि मुलीही मुमताज , साधना, शर्मिला, जया जेवढ्या लाजू शकतील तितपत लाजून त्याला दाद देत असत. अशाही परिस्थितीत नोटस मागण्याच्या बहाण्याने प्रेमप्रकरणं फ़ुलत असत, पण फ़ारच थोड्याम्ची परिणती लग्नात होत असे. कारण विवाह जरी स्वर्गात ठरव्ला जात असला तरी, त्याचे सर्वाधिकार आकाशातल्या बापाने आपल्या पृथ्वीवरच्या बापाला दिलेले आहेत मुलींच्या मनात चांगलंच ठसलेलं किंवा ठसवलेलं असे. त्यामुळे कॉलेजच्या दुसर्‍या वर्षापासून एक एक पान गळावया लागून शेवटच्या वर्षी बहुसंख्य पानं गळायच्या बेताला आलेली असत. परिक्षेच्या मांडवातून लग्नाच्या मांडवात हाच त्या काळच्या वडिलधार्‍यांचा नारा असे
.कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या गेलं की दोन्ही कोपर्‍यातल्या मेघडंबर्‍यातून रंकाळा तलावापर्यंतचा भाग दिसत असे. खाली पाहिलं तर भवानी मंडपाचा भाग , के. एम. टी. च्या बसेसच्या थांब्याचा भाग सोडल्यास मोकळाच दिसत असे. त्यामुळे एक खानदानीपणा त्या भागाला होता. आमच्या कॉलेजला लागूनच त्या भागात येण्यासाठी एक दगडी कमान होती. त्याच्या दोन्ही बाजूला हत्ती झुलताना मी पाहिलेले आहेत. कमानीच्या वर सनई चौघडावाले बसलेले असत. महाराजांची मोटार लांबवरून येताना दिसली की ते वाजवायला सुरवात करत. अंबाबाईचं देऊळही जवळ असल्याने दुपारी आरतीच्या वेळी घाटी दरवाज्यावरची घंटा वाजू लागे. या सगळ्यामुळे आपण एका पावन ऐतिहासिक परिसरात वावरत आहोत ही भावना मनाला सुखवत असे. ऑफ़ पिरियडला भवानीमातेच्या मंदिराच्या गारव्याला गप्पा मारत बसणं किंवा अंबाबाईच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या दुकानात बांगड्या पर्सेस , कानातली, गळ्यातली, वेगवेगळ्या रंगांच्या गंधाच्या, कुंकवाच्या बाटल्या खरेदी करणंहा मुलींचा स्त्रीसुलभ टाइमपास असे, तर काही अंतर ठेवून ' जेथे जाशी तेथे मी तुझा सांगाती ' असं [मनातल्या मनात ] म्हणत मुलाम्चे घोळकेही मुलींच्या मागून फ़िरत असत.आजच्या तरुण पिढीला हे सगळं हास्यास्पद वाटत असेल, पण यामागचं कारण त्यावेळचं सामाजिक बंधन असे. मुलामुलींनी एकत्र गप्पा मारत उभं रहाणं जिथे शिष्टसंमत नव्हतं तिथे मैत्री ही फ़ारच दूरची गोष्ट. त्यामुळे मुलींची भूमिका बहुधा बावरलेल्या हरिणीची असे, व मुलगे आपल्या 'टेरिटरी'तल्या मुलींच्या रक्षणकर्त्याच्या थाटात वावरायचे. पोषाख आचरण याबाबतीत अधिकांश मुलं मुली दबावाखाली असत. पण तारुण्यसुलभ बंडखोरीमुळे त्यातून पळवाटही काढत. म्हणजे मुलगी ११ वीत गेली की ती साडीत शिरे. काही काही घरात तर ८वीपासूनच मुली साडी नेसू लागत. काही किंचित फ़ॅशनेबल मुली कॉलेजात आल्यानंतरही स्कर्ट ब्लाऊज घालत,आणि घरून निघताना गुडघ्याच्या खाली असलेला स्कर्ट लेडिजरूम मध्ये आलं की नेफ़्याकडे दुमडून लांडा करून हेलनसारख्या चालत वर्गात जात. साडीवाल्या मुलीम्ची गत आणखी न्यारी, न्यारी !घरून निघताना बिचार्‍या साधीसुधी साडी नेसून पदर दोन्ही खाम्द्यावर पांघरून निघत आणि लेडिजरूमच्या आरशासमोर आल्या की तोच पदर लाम्ब करून कमरेभोवती गच्च दोन फ़ेरे देऊन डाव्या हातावर पंख्यासारखा झुलवत तासाला निघत.आम्ही ११वीत असताना 'गीत गाया पत्थरोंने ' नावाच्या सिनेमात राजश्री नावाच्या नटीने कटिवस्त्र नाभीखाली खेचून शिवाय नाभीत चमकता खडा घातला होता. त्यामुळे अगदी खडा जरी नाही तरी बर्‍याच कॉलेजकन्यकांनी हे नाभीदर्शन उचलून धरलेलं होतं.अशा या मुली पदर फ़डकवत निघाल्या की पोर्चमधून " चुनरी संभाल गोरी, उडी चली जाय रे, मार ना दे डंख कोई नजर कोई हाय ! " असा कोरस उमटला नाही तरच नवल.ही सगळी छेडखानी, रुपेरी पडद्यावरची भ्रष्ट नक्कल, जिच्यावरून चाले ती आरामात असे, आणि पाहणार्‍याला घाम फ़ुटे.पुढे मग आम्ही कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेल्यानंतर जया भादुरी नावाची एक साधीशी मुलगी रुपेरी पडद्यावर अवतरली आणि सगळ्या आयांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण मुलींनी पदराचे पंखे मिटले,पदर दोन्ही खांद्यावरून पांघरून आले. केसाम्चा सैलसर शेपटा पाठीवर झुलू लागला. कपाळावरचा साधना कट जावून केसांचे भले मोठे आकडे कानामागे झुलू लागले .कपाळावर गंधाची टिकली, कानात साध्याशा रिंग्ज, सुती काठा पदराच्या कलकत्ता साड्या अशा वेषात मुली कॉलेजला जावू लागल्याने आया धन्य धन्य झाल्या.मुलांना बिचार्‍यांना फ़ारसे काही पर्यायच नव्हते.त्यातल्या त्यात राजेश खन्नाने आपलं वाढतं पोट झाकण्यासाठी सुरु केलेला ' गुरु शर्ट ' हीच त्यांची फ़ॅशनची कमाल पातळी होती. कदाचित त्यामुळेच की काय आजचे ६०- ६५ चे आजोबा टी शर्ट मध्ये दिसतात.
१९६७ च्या सुमाराला राजाराम कॉलेज भवानी मंडपातून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरानजिकच्या स्वत:च्या जागेत गेलं, पण उघड्या बोडक्या माळावरची ती वास्तू आम्हाला कधी आपलीशी वाटलीच नाही.अजूनही आमचं कॉलेज म्हटलं की गावातलं कॉलेजच डोळ्यापुढे येतं.कॉलेजच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला निबंध भित्तीपत्रकात पाहताना वाटलेला अभिमान आनंद संकोच मी इथेच अनुभवला. कॉलेजच्या निवडणुकीत लेडिज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी माझ्यापेक्षा मोठ्या ३, ३ मुलींना हरवल्यानंतर विजयाचा जल्लोष आम्ही मैत्रिणींनी इथेच केला.आंतर विद्यापीठ खोखो स्पर्धेसाठी आम्हा नऊजणींपैकी सातजणी निवडल्या गेल्यानंतर ताठ मानेने याच कॉलेजच्या फ़ाटकातून प्रवेश केला.कॉलेज मॅगेझिनमधल्या माझ्या लेखाला वर्णनात्मक ललित लेखन या विभागात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पोर्चमधून झालेला टाळ्यांचा कडकडाट इथेच मी अंगावरचे रोमांच लपवत ऐकला.खो खो च्या अंतिम सामन्यात कमरेच्या हाडाला मार बसून रक्तबंबाळ झाले असतानाही सर्वाधिक गडी खांबावर टिपण्याचा मान मिळवला तोही भवानी मंडपातल्या कॉलेजमध्ये असतानाच.या कॉलेजने माझं व्यक्तिमत्व फ़ुलवलं.वरवर आक्रमक भासणारं पण अंतर्यामी हळुवार असं मन दिलं. नाव कमवायची संधी दिली.
ते दिवसच तसे होते, " झोपाळ्यावाचूनि झुलायचे ! "

Wednesday, April 11, 2007

हायस्कूल

प्राथमिक शाळेत असताना हायस्कूलच्या मुली युनिफ़ोर्ममध्ये फ़िरताना पाहून ' देवा, मी मोठी कधी होणार' असा ध्यास लागलेला असायचा. त्यामुळे ५वीत गेल्यानंतर भला थोरला वर्ग बघून आकाश ठेंगणं झालं. बसायला बाक, एका बाकावर दोनच मुली, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक. त्यामुळे आपण आता मोठे झालो आहोत आणि ३री, ४थीच्या मुली ' चिल्ली पिल्ली ' आहेत ही भावना प्रबळ झाली.त्याकाळी बहुतेक शाळांचा गणवेष म्हणजे निळा स्कर्ट आणि पांढरा कोलरवाला ब्लाऊज असा असे. फ़क्त रिबिनीचा रंग वेगवेगळा असे. दोन वेण्या व्यवस्थित तेल लावून घट्ट करकचून घातलेल्या, आणि त्याही अर्ध्या दुमडून वर बांधलेल्या., रिबिनीची फ़ुलं एकसारखी दिसतील अशा ! तेव्हा नायलोन हा प्रकार नवीनच बाजारात आला होता. त्याच्या तीन बोटं रुंदीच्या रिबन्स दोन वार लागत. कापलेल्या रिबिनीची टोकं उसवू नयेत म्हणून ती धावदोरा, हेम घालून शिवावी लागत. आता पिवळ्या रंगाची रिबन आणि पांढरा धावदोरा ही रंगसंगती वरच्या वर्गातल्या काही ' कलाकार ' मुलींना पटत नसे. आणि गरज ही शोधाची जननी असल्यामुळे त्यांना असं आढळून आलं की पेट्त्या उदबत्तीचं टोक रिबिनीच्या कडेवरून अलगद फ़िरवलं की तिथले धागे जळतात आणि उसवत नाहीत.मग काय , उचल उदबत्ती, की जाळ रिबिनीचं टोक असा प्रकार सुरु झाला. शिवाय काही मुलींनी उदबत्तीच्या टोकाने फ़ुलाच्या पाकळीसारखी चार भोकं पाडून कलाकुसरही केली होती. आता होती काय गोची, गणवेष तपासायचं काम पी. टी. च्या कुलकर्णीबाईंकडे [ प्राथमिकच्या नव्हे ] होतं. त्यांची एक पध्दत होती. मुलींना मारण्याच्या अगदी विरुध्द होत्या त्या. ' चुकलेल्या' मुलीच्या शेजारी येऊन त्या उभ्या रहायच्या. प्रेमळ आवाजात चूक कबूल आहे का ते विचारायच्या आणि मुलीने थरथरत 'कुबूल' म्हटलं की त्याच क्षणी तिच्या कानाची पाळी आपल्या बोटांच्या चिमटीत धरून अशी काही दाबायच्या की ती मुलगी पुढचे चार दिवस हातात कानाची पाळी धरूनच फ़िरली पाहिजे. मला वाटतं ' चुकलं, चुकलं " म्हणून कानाच्या पाळीला हात लावतात ना, ती पध्दत प्रथम सुरु करणारी व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी असली पाहिजे. ... तर या रिबन प्रकरणी बाई अशा खवळल्या की , ना सुनवाई, ना तारीख , एकदम फ़ैसला ! दिसलं टोक जाळलेलं की सरळ कानाचा टोकालाच हात. दुस‍याच दिवशी सगळ्या क्रांतीकारी मुलींच्या रिबिनीची टोकं परत धावदोर्‍यात.त्या काळी साधारणपणे परित्यक्ता, विधवा स्त्रियांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जे पर्याय उपलब्ध होते त्यातला शिक्षिकेची नोकरी हा सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठेचा पर्याय मानला जायचा. तसे दुसर्‍याच्या घरी स्वयंपाक करणे, शिवणकाम, नर्सिंग हेही पर्याय असत, पन वरील कारणाने मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया हा पर्याय निवडीत. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेतही अशा श्क्षिकांचे प्रमाण अधिक होते. स्वत;च्या खाजगी आयुष्यातल्या कटू अनुभवांमुळे त्यांच्या प्रतिक्रिया कधी कधी कडवट होत असाव्यात असं आता वाटतं, पण त्या सर्वांनी आपापले विषय आम्हाला समरसून उत्क्रुष्ट शिकवले.त्या वेळचे शिक्षक, बहुतांश शिक्षक आपापल्या विषयात पारंगत असत. बहुतेकाम्ना आपला विषय खुलवून शिकवण्याची हातोटी होती. त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांत आदरयुक्त दरारा असे. त्यांच्या हातातली छडी हेच एकमेव कारण त्यामागे नसे.तर त्यांनी साहित्याचे , विज्ञानाचे अंतरंग आमच्यापुढे उलगडण्यात कोणतीही कसर सोडलेली नसे, हे असे. अर्थात बालसुलभ उतावळेपणामुळे आम्ही त्यांना त्रास देण्यात , दंगा करण्यात धन्यता मानली तरीही त्यातूनही जे ज्ञान आमच्यापर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले ते आम्हाला आजही उपयोगी पडत आहे. पुढे स्वत: शिकवताना विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगताना कधी कधी लख्खकन जान्णवून जायचं, अरे, ही आपली 'स्टाइल' सावंतबाईंसारखी / कुलकर्णीसरांसारखी आहे शिक्षक आपल्याला नकळत जन्मभराची शिदोरी देतात. आपण क्षणभर त्यांच्या आठवणीने गहिवरतो.एखाद्या उदास क्षणी त्यांची त्रास दिल्याबद्दल मनोमनी क्षमाही मागतो, पण त्याच क्षणी आपल्याला जाणवलेलं असतं,की कालचक्र उलट फ़िरून आपल्याला ' सुधारायची' संधी मिळाली तरी आपण परत तसेच वागू. हे म्हणजे वासराने गाईला दिलेल्या ढुशा असतात. त्याविना वासराला पिण्याचं समाधान नाही, आणि गाईला पान्हा फ़ुटत नाही..शिक्षक आणि विद्यार्थी यात इतकं जवळीकतेचं नातं निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या हेही असावं असं मला वाटतं.वर्गात ३५ -४० मुली असल्याने शिक्षक सगळ्यांना ओळखत ते त्यांच्या घरगुती पार्श्वभूमीसह. आमचे शिक्षक कितीही वर्षांनी भेटले तर त्यांना नमस्कार करताना आमचा ऊर अभिमानाने भरून यायचाच, पण शाळेचे प्यून भेटले तरी त्यांची खुशाली विचारल्याविना पाय पुढे पडायचा नाही.या शाळएने मनुष्य म्हणून जगण्याला लागणारे संस्कार भरभरून दिले, अभ्यासाच्या परिक्षातून, खेळाच्या स्पर्धातून आणि शाळा सुटल्यावर केलेल्या नाटकाच्या तालमीतूनही.
१९६५ ला ११वीची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाल्यानंतर कोणत्या कोलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हा प्रश्न उभा रहिला.तेव्हा गोखले, आणि राजाराम असे दोनच उत्तम पर्याय कला आणि विज्ञान शाखेकडे जाणार्‍यांसाठी उपलब्ध होते. बहुताम्श मुली कला शखेचा पर्याय निवडत.आम्ही काही मुली आंतरराज्य स्पर्धा खेळलो असल्याने आम्हाला गोखले कोलेजकडून सन्मानपूर्वक आमंत्रणही मिळालं होतं.वडिलांचं म्हणणं मी गोखले कोलेजला जावं असं होतं. यामध्ये कोलेज खेळाडू म्हणून चारी वर्षांची फ़ी माफ़ करणार होतच, पण त्याबरोबर खेळाची शिष्यव्रुत्तीही देणार होतं, हे होतच, पण दुसरं कारण म्हणजे कोलेज घरापासून ३ मि. च्या अंतरावर होतं. आता मात्र त्यांची काळजी फ़ारच वाढली असावी. आपल्या सुकुमार [!] राजस बाळीला पळवून नेण्यासाठी जागोजाग घोडे तयार ठेवून राजकुमार तयारीत अशी दुष्टस्वप्नं त्यांना पडत असावीत.मीही बाणेदारपणे ' जाईन तर राजारामला नाहीतर शिकणार नाही" असं उत्तर दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. आणि मी तरी काय करणार ? माझाही नाईलाज होता. गेले वर्षभर शाळा आणि कोलेज यामधलं ' ते' फ़ाटक खुणावत होतं ना मला डोळे मिचकावून ! त्यामुळे जून १९६५ ला मी अधिकृतपणे ' राजारामियन ' झाले. प्रथम वर्षासठी मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी लागणार्‍या गुणांसह ! d
draft

Tuesday, April 10, 2007

गोष्टी आठवणीतल्या....३

१ली ते ४थी या चार वर्गाना मिळून दोन शिक्षक होते. कुलकर्णीबाई विधवा होत्या. नऊवारी लुगडं, पांघरून घेतलेला पदर. कपाळावर हिरवं गोंदण.दुसरे तारदाळकरगुरुजी. धोतर, कोट टोपी या वेषातले. ते मुख्याध्यापक असल्याने ४थीला शिकवत. आम्ही ४थीत गेल्यानंतर पहि्ल्याच दिवशी त्यांनी आम्हाला बजावलं होतं, 'मला गुरुजी म्हणायचं. सर म्हणाला तर थोबाड फ़ोडीन. ' आमच्या काळी ' समजावून ' देण्याची हीच पध्दत लोकमान्य होती. पण कधी कधी खुशीत असले, आणि कोणी ' स---र ' अशी हाक मारली की हसत हसत म्हणत, ' सर, सर, झाडावर, घराच्या कोलावर ".[ या ओळी असलेला खारुताईचा धडा आम्हाला १लीत होता.]
४थीत गेल्यावर शाईची दोत आणि टाक या प्रकाराची एक भर आमच्या दप्तरात पडली.त्यातली शाईची दोत हातात धरून न्यावी लागे. शिवाय शाईचा ठिपका पडला तर टिपण्यासाठी गुलाबी रंगाचा टिपकागद बरोबर बाळगावा लागे. माझे वडिल लिहून झालं की त्यावर समुद्राकाठची रेती त्यावर भुरभुरत आणि कागद झटकत. ती रेती वर्गात नेऊन तशी झटकायची हे माझं एक (अधुरं) स्वप्न होतं तेव्हाचं..लिहिताना टाक शाईत योग्य प्रमाणात बुडवायचा, कागदावर योग्य प्रंमाणात दाब देऊन लिहायच या प्रकारात उजव्या हाताची पाची बोटं शाईने बरबटून निघत. ती मात्र डोक्यावरून हात फ़िरवून केसांना पुसायची असत. त्यामुळे पेपर लिहिताना प्रत्येकीचा हात थोड्या थोड्या वेळाने डोक्याकडे . यात शाईचा भाग किती आणि नशिबाला दोष देण्यासाठी किती ते निकालाच्या दिवशी कळे. परिक्षेचे पेपरही घरीच शिवलेले असत.दोन आखीव ताव अर्धे दुमडून मधोमध एक टाका घालून शिवलेले असत., आणि खालचा भाग ब्लेडने किंवा पेपरकटरने कापलेला असे. पहिल्या पानाच्या उजव्या कोप‍य़ात वडिल भावंडाकडून 'सुवाच्य' अक्षरात नाव घालून घेतलं की परिक्षेची तयारी पूर्ण होत असे. मला मात्र एका ठिकाणी बसून पेपर सोडवणे ही शिक्षाच वाटे. शक्य तितक्या लवकर त्या बिलामतीतून सुटका करून घ्यायची माझी इच्छा असे. मला आठवतं एकदा येत असूनसुध्दा कंटाळा आला या सबबीवर मी पेपर टाकून घरी आले होते, तेव्हा भडकलेल्या भावाला समजावताना मला पोटाशी धरून आई हसत म्हणाली होती," जाऊ दे रे, मार्कांचं काय एवढं ? तिला समजलय ना ? मग झालं तर.! " धन्य ती माता! अशी आई सगळ्यांना मिळो. पण आज लक्षात येतय की त्यामुळेच मी साहित्य, कला, खेळ या सर्वात रुची घेऊ शकले. त्या वेळचे संस्कार आजही उमलून येतात भुईचाफ़्यासारखे! अंतरंग भेदून. अंतरंगानजिकच, अंतरंग सुगंधित करणारे!

Monday, April 9, 2007

गोष्टी आठवणीतल्या....२

एम. एल. जी. हायस्कूलच्या परिसरातच एम. एल. जी. ची प्राथमिक शाळा होती. माझं नाव घालायला बरोबर कोण आलं होतं ते आठवत नाही, पण आठवतं ते हे की, हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेच्या ओफ़िसच्या बाहेरचा जिना उतरून मी आणि माझ्याबरोबरच प्रवेश घेतलेली सुनिती कामत हातात हात घालून प्राथ मिक शाळेकडे पळत सुटलो होतो. वर्गातही आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो. नव्या को‍या पुस्तकावर दोन्ही बाजूने भाकरी थापल्यासारखे हात वाजवत मी तिला काहीतरी सांगण्यात इतकी गुंग झाले होते की, वर्ग सुरु झाल्याची घंटा कधी झाली आणि तारदाळकर गुरुजी वर्गात कधी आले ते मला समजलच नाही. आणि कळलं तेव्हा त्यांची पाच बोटं माझ्या गालावर उमटली होती आणि वर्गात सन्नाटा की काय तो पसरला होता. आपल्या मालकीचं 'गुरु ' समजण्यासाठी गुराखी त्याच्या पाठीवर डाग देतात ना, तसा तो छाप माझ्या गालावर बसला आणि माझा शाळेतला प्रवेश ख‍य़ा अर्थाने नोंदवला गेला.त्या काळी मुलांना बसण्यासाठी गुळगुळीत पोलिश केलेले पाटवजा फ़ळ्या असत. त्यावर बसून दप्तर फ़ळीखाली सरकवून द्यायचं. दप्तर म्हणजे तरी काय, तर एक पुस्तक मराठीचं, एक ' गणोबाच' एक गोष्टीरुप इतिहासाचं आणि पाटी. पाटीचे प्रकार तरी किती!दगडी, पत्र्याची, जोडपाटी, मण्यांची. त्यातले शेवटचे दोन प्रकार असणं हे बालजगतातलं फ़ारच श्रीमंती थाटाचं आणि असुयेचं प्रकरण असायचं. पाटीवर लिहिण्यासाठी दुधी पेन्सिल आणि पुसण्यासाठी फ़डक्याचा एक ओला बोळा आणि एक कोरडा बोळा. वर्गात पाटीची स्वच्छता दोन प्रकारानी व्हायची. पहिली डायरेक्ट मेथड. लाव पाटीला जीभ आणि ठेव विद्यादेवी सरस्व तीला जिभेवर. पण दोन चार वेळा शिक्षकांनी ' हस्तक्षेप ' केल्यानंतर मुली आपसुक दुस‍‍या प्रकाराकडे वळत.या प्रकारात बोळा इतका भिजवायचा की आपल्याबरोबर आणखीही चार पाट्या भिजल्या पाहिजेत. मग त्या वाळवण्यासाठी ' मंत्रजागर ' सुरु. " कावळ्या, कावळ्या पाणी घाल, चिमणी, चिमणी वारा घाल."आता कावळा सतत पाणी घालत राहिला [ आणि तो ते आणणार कुठून ?]तर चिमणीने पंखाने कितीही वारा घातला तरी पाटी वाळणार कशी, हा विचार तेव्हा आमच्या चिमुकल्या डोक्यात येत नसे. त्यामुळे पाटी लवकर वाळावी म्हणून आमचा आवाज इतका वाढायचा की, ' पाट्या काढा ' असं सांगून शेजारच्या वर्गातली गणितं तपासायला गेलेल्या बाई हातात पट्टी घेऊन धावत आल्याच पाहिजेत. मग त्यांच्या पट्टीच्या दांडपट्ट्यात 'ओल्या'बरोबर 'सुके'ही जळायचं ती गोष्ट वेगळी. ही झाली पाटीची दैनंदिन स्वच्छता.साप्ताहिक स्वच्छता म्हणजे दिवाळीच रासन्हाणच ! प्रथम आईकडून कोळशाचा मोठ्ठा तुकडा मागून घ्यायचा. आणि तांब्याभर पाणी. मग फ़्रोकचा घेर गच्च आवळून स्वत: पाटावर नीट बसायचं आणि फ़रशीवर पाटी. थेंब थेंब पाणी पाटीवर टाकत सहाणेवर गंधाचं खोड घासावं तसा कोळसा पाटीवर घासत रहायचं. मग पाटी तिरकी करून वाळत ठेवायची. आणि मग काळी पाटी आणि त्याहून काळे हात धुण्यासाठी बंबभर पाण्याचा स त्या ना श ! एवढ्यावर कुठलं भागायला ? पाटीची लाकडी चोकट उजळवण्यासाठी ब्लेडचं पान घेऊन ते उलट सुलट फ़िरवून असं घासायचं की त्याची परिणती बोट कापण्यात आणि आईच्या गडगडाटासह बोटाला चिंधी बाम्धण्यात व्हायची .
draft

Wednesday, April 4, 2007

गोष्टी आठवणीतल्या

काही काही लोकांना आपल्या खूप लहानपणीची आठवण असते.अगदी दीड दोन वर्षापासूनची. पण मला मात्र वयाची पहिली ५ वर्षं आठवत नाहीत.आठवते ती खासबागेतली माझी पहिली शाळा. राधाकृष्णाच्या देवळाजवळची.घराच्या अगदी जवळ. खर तर सगळ्यात जवळची म्हणजे प्रायव्हेट हायस्कूल. कारण या शाळेच्या मागच्या गल्लीत अगदी शेवटी आमचं घर होतं. पण ती मुलांची शाळा असल्यामुळे तिचा उपयोग नव्हता. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल तशी लांब(?) होती ५ वर्षाच्या मुलीच्या मानाने. म्हणजे आमची पूर्ण गल्ली पार करून उजवीकडे वळलं की प्रायव्हेट हायस्कूल. तिथून पुढे गेलं की डाव्या हाताला पॅलेस थिएटर. त्याला डावीकडे ठेवून वळलं की कुस्त्यांचं मैदान. या मैदानावरून डावीकडून मंगळवार पेठेतून येणारा आडवा रस्ता देवल क्लबकडे जात होता.या रस्त्यावर रहदारी असायची. आता कोल्हापूरसारख्या शहरात ५०-५५ वर्षापूर्वी रहदारी ती काय असणार ? एखादा टांगा, काही सायकली, किंवा क्वचित एखादी मोटार.पण हा "रहदारीचा" रस्ता ओलांडून आपली बाळी शाळेत कशी जाणार ही काळजी माझ्या आईपेक्षा माझ्या वडलांना अधिक वाटत असल्याने त्यांनी माझं नाव जवळच्याच " अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल" मध्ये इयत्ता पहिलीत घातलं. या शाळेच्या बाहेर एक उंबराचं भलं मोठं झाड. दुपारच्या वेळेला टांगा, बैलगाड्या सोडून गाडीवान झाडाखाली शिदोरी सोडत. झाडालगत देऊळ, देवळाच्या मागे लागूनच 'अहिल्यादेवीचं ' पटांगण होतं . पटांगण ओलांडून गेलं की शाळेच्या उम्च दगडी पायर्‍या लागत. त्या चढून गेलं की शाळेचा व्हरांडा. समोर काही वर्ग, डाव्या बाजूला जिना. जिन्याच्या सुरवातीला शाळेची पितळी घंटा. वरही काही वर्ग होते. या शाळेत मी एकच वर्ष होते, त्यामुळे या शाळेच्या आठवणी फ़ारशा नाहीत. मात्र एक सर आठवतात, उंच धिप्पाड. नेहमी झब्बा पाय़जमा या वेषात असत. तेच पी. टी. घेत आणि संगीतही. या दोन विषयांची सांगड ते कशी काय घालत होते असं मला आज वाटतं. तेव्हा मात्र त्यांना बघितल की जाम भीती वाटायची. भला मोठ राक्षस आपल्याला मटकावायला आलाय की काय असं वाटायचं. आणखी भीतीदायक व्यक्ती होत्या ,त्या म्हणजे शाळेच्या मधल्या सुट्टीत पोत्यात चणे कुरमुरे विकणारा गंगाराम आणि आमसोलं विकणारा एक गोरा भुरका म्हातारा. गंगारामची चुरमुर्‍याची भट्टी होती मंगळवार पेठेत. काळ्यारोम गंगारामचा खालचा ओठ भलताच जाड होता आणि लोंबतही असे. त्यामुळे तो कितीही मवाळपणे बोलला तरीही हा आपल्याला मारणार असंच वाटायच मग जरा मोठी झाल्यावर लक्षात आल की गंगाराम अतिशय प्रेमळ आणि माणसांचा भुकेला आहे. दुसरा तो सुकामली विकणारा म्हातारा. फ़णसपोळी, आंब्याची साटं, असा कोकणचा मेवा पोत्यात घालून बिचारा विकत फ़िरायचा.तर तो त्याच पोत्यात मुलींना घालून पळवून नेतो आणि " काय तर करून लांब तिकडं विकून टाकतो म्हणे, पाआआप !" असं मोठ्या मुलींकडून [इयत्ता ४थी] ऐकायला मिळत असल्यामुळे त्याचा आवाज ऐकू आला की माझी पाचावर धारण बसत असे. याच मुली त्याच्याचकडून काहीबाही विकत घ्यायच्या तेव्हा तर त्या मला उच्च कोटीच्या वीरांगनाच वाटायच्या. आईला या माणसाबद्दलची माझी भीती सांगितल्यानम्तर तिनेही फ़ारसं लक्ष दिल नाही, ते बहुधा याच विचाराने असावं की या भीतीने तरी आपली मुलगी शाळा सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर पडायची नाही.त्यामुळे शनिवारच्या सकाळच्या शाळेच्या वेळेत सगळ्या मुली कोवळ्या उन्हात उंबरं गोळा करत असत तरीही आम्ही मात्र लक्ष्मण रेषेच्या आतच !
पण पहिली होता होता आईच्या लक्षात आलं की या शाळेत राहून आपल्या मुलीचा शैक्षणिक आलेख फ़ारसा उंचवण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा तिने मला महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये घालण्याविषयी वडिलांचं मन वळवलं. माझ्या आजूबाजूला राहणार्‍या बहुतेक सगळ्या मुली याच शाळेत जात असल्यामुळे त्या आपल्या मुलीला नीट शाळेत नेतील आणि आणतील असा भरवसाही तिला वाटला असावाआणि दुसरीपासून मला महाराणी लक्ष्मीबाई च्या प्राथ्मिक [ ज्याचा उच्चार मी किती तरी दिवस प्रार्थमिक असा करत होते आणि त्याचा संबंध प्रार्थनेशी जोडत होते] शाळेत दाखल झाले . माझं " पालकत्व " शेजारी राहणार्‍या निडसोशीकरींच्या मीना , बेबी या मुलींनी आणि मागच्या गल्लीतल्या सरिताने आनंदाने पत्करलं नंतर नंतर तर मी सरिताचं ' शेपूट ' म्हणून तिच्या मैत्रिणीत ओळखली जावू लागले.
कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे इथल्या शाळांची नावम राजघराण्यातल्या स्त्री- पुरुषांच्या नावावरून ठेवली गेलेली होती. १९५० च्या सुमाराला कोल्हापुरात अहिल्यादेवी, महाराणी लक्ष्मीबाई, पद्माराजे, जिजामाता, ताराराणी अशा मुलींच्या आणि प्रायव्हेट , विद्यापीठ, राजाराम, आयर्विन अशा मुलांच्या नावाजलेल्या शाला होत्या. म. ल. ग. हायस्कूलाअमच्या घरापासून फ़ार तर अर्ध्या फ़र्लांगावर होती. शाला राजवाड्याच्या परिसरातच असल्यामुळे शाळेभोवती उंचच उंच भिम्त भांधलेली होती. बाम्धकामही राजवाड्याच्या धाटणीचं होतं कदाचित तो पूर्वी राजवाड्याचाच भाग असावा. शाळेचं मागचं फ़ाटक आणि राजाराम कोलेजचं मागचं फ़ाटक एकच होतं. त्या फ़ाटकाजवळ प्राथमिक शाळा होती. २री ते ४थी या काळात त्या फ़ाटकाकडे पडणारी बुचाची फ़ुलं वेचण्यासाठी आमच्यात अहमहमिका लागायची,पण पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या फ़ाटकाकडे जाणं म्हणजे " अव्वा, तिथ जाऊन राजारामची पोरं बघायची असणार" असा शिक्का आपल्यावर पडेल ही धास्ती असल्याने ते " निषिध्द क्षेत्र " मानलं जाऊ लागलं. तशीही आमची ' मास पी. टी. ' पहाण्यासाठी ' राजाराम' ची काही टवाळ पोरं तिथे उभी असायची, त्यामुळे मोठ्या मुलीम्च्या मनात त्या फ़ाटकाबद्दल थोडी हुरहुरयुक्त उत्सुकता असायची.काही धीट मुली आमच्या शाळेच्या खडूस प्यून ' बक्षू' ची नजर चुकवून तिथे एक फ़ेरी मारून येत, पन्ण अशा मुली बाकीच्या पापभिरू मुलींच्या ब्लेकलिस्टवर असत. पण ती नंतरची गोष्ट. आधी म. ल. ग. हायस्कूलच्या प्राथमिक शाळेविषयी.