Wednesday, February 7, 2024
डेकोरेशन
Sunday, September 11, 2022
दुसरेपण
Monday, September 5, 2022
संवाद गणेशाशी
Tuesday, August 25, 2020
रुणझुणत्या पाखरा
पुण्याहून कोल्हापूरला जाताना पेठ नाका ओलांडला की उजव्या हाताला एक टेकाड लागतं .४० ,४५ , वर्षांपूर्वी ते एक छोटं टेकाड होतं, आता त्याने चांगल बाळसं धरलय.तर तेव्हा त्यावर एक छोटुकलं देऊळ होतं. त्यावरची भगवी पताका फडफडताना दिसली की कोल्हापूर जवळ आलं, माझ्या माहेरची हद्द सुरु झाली म्हणून माझं मन फुलून यायचं . पुढे रस्त्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट जणू काही माझ्या घरातलीच आहे, असं वाटायला लागायचं . टेकाड मागे टाकून जरा पुढे गेलं की डाव्या बाजूला दोन रस्ते घरंगळत शेतात घुसायचे. तिथे लालचुटुक मिरच्या उन खात रस्त्यावर लोळत असायच्या. जरा पुढे गेलं की उफणलेल्या धान्याची रास उन खात असायची. दोन्ही बाजूला उसाची शेतं डोलत असायची.त्यांचा हिरवा रंग डोळ्यांना गारवा द्यायचा. बैलगाडीतून कडबा घेऊन चाललेले केरुनाना ,पांडूमामा,दुधाची किटली मोटारसायकलला लावून वेगाने जाताना तंबाखूची पिचकारी टाकणारा संपत, फताड्या शिंगांच्या म्हशीवर बसून म्हशी हाकणारा बबन्या , रस्त्यात आडवं आलेलं मेंढ्याचं खांड हुर्र , हुर्र करून हाकणारा विरुबाबा सगळे सगळे मला माझे सोयरे वाटायला लागायचे .
सासर आणि माहेर यात बारा तासांचं अंतर. मुलांच्या शाळा एप्रिलमध्ये संपायच्या .मुलांचे वडील साखर कारखान्यात कामाला. तेव्हा हंगाम सुरु असेल तर तो संपेपर्यत थांबायला लागायचं. कारण एवढ्या लांब मुलांना घेऊन मी अबला कशी जाणार? असा प्रश्न वडीलधा-यांना पडायचा.माझ्या मनातलं पाखरू तर जानेवारीपासूनच रुण झुणायाला लागायचं. आणि माहेरच्या वाटेने ओढ घेऊ लागायचं. पण मी एकटीने इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हणजे सशाच्या शिंगाइतकंच दुर्लभ. पण एकदा हंगाम जूनपर्यंत चालणार होता ,तेव्हां माझी झालेली दयनीय अवस्था बघू घराच्यानीच मला तिकीट काढून दिलं.सबंध प्रवासभर मी म्हणजे भेटीलागी जीवा लागलीसे आस या उन्मनी अवस्थेत. जम्बो आईस्क्रीमची फ्याक्तरी दिसल्यावर तर डोळ्यातून घळाघळा अश्रू. मुल कावरीबावरी. ते सगळ बघून समोरच्या म्हातारीने तर गहीवरच घातला. " पोरी, आपल्या हातात काय न्हाई लेकी, त्थाची विच्छा. "तेव्हा गडबडीनं तिला खरी परिस्थिती सांगितली. तर म्हातारी आपले मिश्री लावलेले काळे दात दाखवत मनापासून हसली आणि माझा अलाबला करत मनापासून म्हणाली, दोन लेकरं झाल्यावरबी म्हयेराचा एवडा सोस बरा न्हवं लेकी. " आता तिला काय सांगू कि माझ्या माहेराचीच नव्हे तर अख्या कोल्हापूरचीच ओढ मला लागलेली असते. शिष्टाचाराचे कोरडे नमस्कार मागे टाकून प्रेमाच्या कडकडीत मिठीला, " किती दिवसांनी भेटलीस ग नाल्ल्याक" असा गावरान झटका घ्यायला माहेरीच यावं लागतं आणि तेही बिनओळखीच्या ,अनोळखी नव्हे हं , बिनवळखीच्या बाईलाही लेकी म्हणाना-या आणि तिच्या चेहर्यावरून मायेने हात फिरवणा-या मावशी, काकी आणि मामीच्या कोल्हापुरात.
Sunday, August 9, 2020
पुस्तक आणि कव्हर
Tuesday, August 4, 2020
भांडी
पण अजूनही मला स्वयंपाकघर हे आपलं कार्यक्षेत्र वाटत नव्हतं. मुलं म्हणाली आई बेसनाचा लाडू हवा, लाडू तयार. नवरा म्हणाला मिसळ केली नाही बरेच दिवसात, घाला मटकी भिजत असा मामला होता सगळा. नाहीतर एकेक बायका बघावं तेव्हा आज काय बुंदी पाडल्या उद्या काय दहीवडे केले असे एकमेकाशी काहीही संबंध नसलेले पदार्थ करत असतात. करोत बापड्या.त्यामुळे स्वयंपाकघराशी काही माझी नाळ जुळली नव्हती. आमची भूमिका आपली मदतनिसाची.त्यामुळे भांडयाबद्दल काय ममत्व असणार ? रुखवतातली सोडल्यास भांडी सासूबाई आजेसासुबाईची होती. त्यामुळे काडी काडी जमवून संसार केला असंही नव्हतं.मग भांड याबद्दल जिव्हाळा कसा बरं वाटणार ?पुढे सून आल्यावरही तिला सांगितलंकी बाई यातलं काय मोडीत टाकायचं तर टाक आणि तुझ्या आवडीची भांडी घे. त्यामुळे आता तीन पिढयांची भांडी घरात सुखनैव नांदता हेत..मधेच कुठेतरी मी घेतलेली ग्लास , मिसळणाचा डबा असे फुटकळ जिन्नस लुडबुडतात.
आपल्यात स्त्रीसुलभ भावनांची उणीव तरी आहे किंवा आपण अलिप्ततेने संसार केला या विचारांचा फुगा दोन दिवसांपूर्वी फुटला.म्हणजे काय झालं , मी सकाळी चहा करायला ओट्याकडे उभी राहिले आणि ओट्यावर पितळेचा एक चकचकीत चमचा दिसला. बघितलं तर ते करंजीच्या कडा कापायचं कातण होतं . पाठीमागून आवाज आला ," आई आपल्याकडे होतं ना असं ? ते हरवलं तर आजी किती दिवस बेचैन होती. मी आणलं चोरबाजारातून.. "खरच असंच होतं ते कातण. फक्त चमचा जरा खोलगट होता. त्या कातान्यावरून हात फिरवताना डोळे जरा चुरचुरलेच माझे.
तशी सासूबाईंच्या वेलची काही दुधाची पातेली काही वेळण्या सांडशी आहेत घरात.दुधाच्या वेळण्या आमटीवर झाकलेल्या चालायच्या नाहीत त्यांना आणि सांडशी ही.त्यावेळी पोरवयात हे सव्यापसव्य करताना वैताग यायचा, पण आता ती भांडी हाताळताना त्या आठवणींचे कणच हातात येतात. आपल्या डोक्यावर किती सुंदर छत्र होतं त्याची जाणीव होते.आमच्याकडे कोकणातली एक विळी पण आहे. आडाळो म्हणतात त्याला कोकणीत. धारपण कोकणी माणसासारखीच आहे. नवी नवरी असताना खूप वेळा शाहिस्तेखान होण्याची पाळी आली होती माझ्यावर तिच्यामुळे. दोन वर्षांपूर्वी ती विळी ठेवत असताना निसटली. फरशीवर ती आदळू नये म्हणून मी ती पकडली तर कुठे? पात्याला. आता आजेसासूबाईंनी " चुकीला माफी नाही " म्हणून असा हात कापला कि हाताला तीन टाके घालावे लागले. मला मात्र त्यांनी मारलेला तो फटकाच वाटला. " गे सुने दिसणा नाय कि काय तुका ? लक्ष खंय होता ? "
आता मला जाणवतंय कि या भांद्यांनी माझा अलिप्तपणा हळू हळू मोडीत काढलाय. मला त्यांच्यात सामावून घेतलाय. किती आठवणी आहेत त्यांच्या !नेहमीपेक्षा वेगळा एक डाव प्रश्नचिन्हासारखा आहे, तो आम्ही फक्त ताकालाच वापरतो. प्रत्येक भांद्याच एकेका पदार्थाशी नातं जुळलेलं आहे. ते मी आता नीटच समजून घेतलाय. आता मी भांदयाशी बोलतेसुध्दा. म्हणजे धुतलेल्या ताटल्या गळायला तिरक्या करुन ठेवताना पडायला लागल्या तर मी त्यांना दटावतेही, "पडू नका, काम वाढवू नका ग बायांनो." पालथ्या वाटयाची उतरंड रचताना तर प्रत्येक वातीला सांगावं लागतं , " शाबास !"कधी कधी पातेली ठेवताना त्यावरचं नवर्याचं नाव आईंच दिसतं आणि तरुणपणी त्याच्याबरोबर घातलेला वाद आठवतो , " भांड्यावर तुझं नाव का आईंच का नाही ? " हसू येतं मला. हळुवारपणे मी भांडी ठेवते.४६ वर्षांच्या सहवासाने त्यांचं अचेनत्व आता निमालेल असतं.
Wednesday, April 1, 2020
फक्त आठ मिनिटांचा व्हिडिओ
साखर कारखाना बंद पडला तेव्हा पोटासाठी गाव सोडलं त्याला खूपच दिवस झाले होते. तेव्हा दहावीत असलेली मुलं आता करती सवरती झाली होती. मग इतक्या वर्षांनी आपल्या लहानपणी च्या आठवणी जागवाव्यात असं .वाटल्यामुळे सगळी हरिगावला जमली होती. स्क्रीनवर मागचा चौक दिसत होता. , म्हणजे ही मागच्या दारातून आत शिरली वाटतं. म्हणजे मनाबाई जिथे भांडी घासायची ती जागा कुठे गेली ? पण मोबाइल आता मुळच्या पिवळ्या पण आता ३१ पावसाळे अंगावर घेऊन काळ्या रंगाचे धब्बे आणि कोळीष्टक ,धूळ यांनी माखलेल्या भिंतीवरून फिरत होता.
" अग , या कोप-यात आपला बंब होता नाही ?काशिनाथ संध्याकाळी घरी जाताना पाण्याने भरायचा आणि खाली वीस, गोवरी, लाकडं भरून जायचा .सकाळी आला की बंब पेटवायचा" . माझं स्मरणरंजन सुरु झालं. " हो ग. आणि धूर झाला की ब्लोअर फिरवायचा." लेकीचा दुजोरा .
मोबाईल धुळकट पायरीवरून मागच्या पडवीत शिरला . अजून कठडा शाबूत दिसतोय .. यावरच चढून एकदा मी शेजारणीला हाक मारली होती, माझा विळ्याने कापलेला रक्तबंबाळ हात दाखवून दवाखान्यात नेण्यासाठी एरवी लेकीच्याच उपयोगाचा होता तो, त्यावर चढून पेरूच्या झाडापर्यंत पोचण्यासाठी , मैत्रिणीशी गुजगोष्टी करायला दोन घरांच्या मधल्या भिंतीवर चढण्यासाठी .त्यालालागून एक भली मोठी संदुक होती लाकडी. त्यात मोटार दुरुस्तीचे पाने , पोलिश पेपर, वायर्स आणखी काय काय राम जाणे होतं. ती माझ्या नव-याची अमानत होती. संदुकीला लागून एक मोठं कपाट होतं. त्यात चुन्याची निवळी , भाजलेल्या जखमेवर लावायची पावडरचा पत्र्याचा डबा, वर्षभरासाठी केलेल्या लिंबाच्या सरबताचे काचेचे रंगीत बुधले,गव्हापासून रव्यापर्यंतच्या लाकडी चाळण्या उदरात घेऊन उभं होतं आणि त्याच्या पायाशी एक मोठं जातं. पण ओढायला एकदम हलकं. त्याची पुसटशी खूणही धुळीने पुसून टाकली होती. कोप-यातली लाकडी संदूक , सायकल , माठ , पाणी काढायचा दुंगा आपणच ३१ वर्षांपूर्वी कोणाकोणाला देऊन टाकलं होतं त्यामुळे क्यामे-याने फिरवलेल्या नजरेला त्यांच्या खुणा कशा दिसणार होत्या?
" आई हा आपला ओटा बघ ," स्वयंपाकघरातून हाक आली.
" हो ग , पण उजवीकडचा कट्टा कुठं दिसत नाही ग." कितीही नाही म्हटलं तरी आवाज कातर होऊ पहातच होता . त्याला दडपून म्हटलं; " आणि इथे आपला पाटा वरवंटा होता बघ , नंतर तो ओट्यावर ठेवला. "आपल्याला लक्षात येत नाही , पण कितीतरी गोष्टी आपल्या मनात दडून बसलेल्या असतात .
देवघरातला देव्हारा , दत्ताची मोठी तसवीर ,पूजेला येणा-या गुरुजींच्या हवाली केली होती निघताना . पण तिथली तीन ताळी , देवघराची अख्खी एक भिंत व्यापणारी लाकडी मांडणी कोणी नेली? वरच्या फळीवर सात आठ पितळी चकचकीत डबे होते आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ते लाडू चिवडा चकली वड्या यांनी भरलेले असत. मधल्या कप्प्यात गुरुजींचा कद घडी करून ठेवलेला. कारण ते कारखान्यातून येत ,धोतर बदलून कद नेसत आणि देवांची पूजा करत. पुढे तांदळाचे , डाळीचे मोठा मोठे डबे आणि खालच्या कप्प्यात चीनी मातीच्या उंचच उंच बरण्या. त्यात वर्षाची चिंच ....बागेतच झाड होतं, हळद... बागेतच लावलेली, आणि मीठ... हे मात्र एम. गोकुळदासच्या दुकानातून आणलेलं , भरून ठेवलेलं असायचं . ते मोठे डबे , बरण्या वेगवेगळ्या घरातलं सामान बनून राहिल्या होत्या आम्ही गाव सोडतानाच . पण तीन तीनदा हात जोडत डोळे मिटून देवापुढे नतमस्तक होणारे सासरे , " ऐकलात , देवासमोर आठ पाना वाढलीसत . बरोबर असा काय बघतात ?" असं कंबर दाबत विचारणा-या , घामेजलेल्या , सोवळं नेसलेल्या सासूबाईचे मला का भास होताहेत बरं त्या जागी ?
पुढच्या जेवणाच्या खोलीतलं टेबल , खुर्च्या , स्टूल , बादली आम्ही गाव सोडताना बरोबरच घेतलं होतं. पण आजमितीला त्यातल्या खुर्च्याच काय त्या साथ देताहेत.
इतक होईस्तोवर बाईसाहेब पोचल्या की बेडरूममध्ये. या मोबाईलला भिंतीवरची धूळ नि माती दाखवण्यातच काय मजा येतेय बाई ? भिंतीवरची दिनदार्शिका , त्यावर काही विशिष्ट दिवसासमोरच काढलेल्या चांदण्या , भिंतीला टेकून असलेलं टेबल, त्यावरची बाळाची दुधाची बाटली , कपाटाला तारेत अडकवालेली बिलं , काहीच कसं दिसत नाही ?
" हा मधला प्यासेज , हा आजोबांच्या खोलीपुढचा बाहेर उघडणारा दरवाजा. बघते आहेस ना आई ? "लेकीचं उसनं अवसानही सरतयस वाटतंय , आवाज बदललाय तिचा.
" हो ग , आणि आजोबांच्या खोलीला बसवलेली जाळीपण आहे बघ अजून." माझीही तिला साथ. पण तोपर्यत लेक गेटकडे पोचालीसुध्दा . तिला समोरचा रस्ता , तिच्या बालमित्राचं घर दाखवायची घाई झाली होती. दूरवर जाणारा रस्ता आजही झाडीने आच्छादलेला दिसत होता , पण ती सूनियोजित लावलेली आंबा , जांभूळ, नीलमोहोर अशी झाडं नव्हती तर वा-याबरोबर कशीतरी उडून आलेल्या बीजातून अंकुरलेली वेडीवाकडी वाढलेली झाड होती . चिंचेची, बाभळीची आणि कसली कसलीतरी. स्क्रीनवर तो उदास वाटणारा रस्ता मिनिटभर दिसला आणि त्याने डोळे मिटले. ते काही क्षणाचं शुटींग आमच्या बत्तीस वर्षांच्या संसाराचे रंग घेऊन आलं होतं!
Sunday, January 21, 2018
दाणे
दाणे म्हटलं तर विचार करायला हवा की शें गदाणे की ज्वारीचे दाणे की बाजरीचे दाणे ? बरं शेंगदाणे म्हटलं तर कच्चे दाणे की भाजलेले दाणे ? आता कच्चे दाणे म्हटलं तरी दडपे पोह्यात किंवा कांदे पोह्यात तेलात तळून घातलेले दाणे की चाकवतात किंवा अळूच्या फतफत्यात भिजवून घातलेले दाणे ? बरं भाजलेले दाणे म्हणावं तर चिवड यातून वेचून खाल्लेल्या खमंग दाण्याची चव जिभेवर घोळणार आणि त्याचा वेळी असे दाणे वेचून खाल्ल्याबद्दल आईने पाठीत दिलेला रपाटा आठवून तीच जीभ दाताखाली येणार.आणि पाठ हुळहुळणार ते वेगळंच. मीठ घालून उकडलेल्या शेंगा फोडताना पिचीक्कन मिठाचं पाणी डोळ्यात जातं आणि डोळे चुरचुरतात ,' पण त्या दाण्यांची थोडी खारट , थोडी मातकट चव म्हणजे मस्तच !पण काहींना लोखंडाच्या कढईत खमंग भाजलेले दाणे खाणं म्हणजे परमानंद वाटतो. किंवा कच्चे दाणे आणि गूळ वाटीत घेवून गोष्टीचं पुस्तक वाचता वाचता खाल्लेल्या दाणे गुळाची चव लोणावळा दाणे चिकीपेक्षाही भारी वाटते. शिवाय दाण्याचे दोन भाग करून आत गूळ भरून भावलीच्या लग्नात बनवलेले लाडू तर उच्च कोटीचेच असतात. या सगळ्या दाणे प्रकाराला आपल्या बालपणीचा स्वाद असतो आणि निरागस आनंदाचं वेष्टन ! नाहीतर मग असतातच मोठेपणी " दाण्याचं कूट अंमळ कमीच झालं होतं हो ! "किंवा " आग ' उद्याचं उपासाचं लक्षात आहे ना? नाहीतर वेंधळ्यासारखी खिचडी करायच्या ऐन वखताला घेशील दाणे भाजायला . " किंवा " अहो , उद्या अगदी साधा बेत करा बरं का . गरम गरम भाकरी , लोणी दाण्याची चटणी मिरचीचा खर्डा आणि साइचं दही." असेही दाने भेटीला येतात .कि मग घ्या विरजण लावायला , लसून सोलायला, खलबत्त्यात दाणे कुटायला आणि पाठवा पिंट्याला गिरणीत ज्वारी दळून आणायला . अशी ऑरडर सोडणा-या पुरूषांच बरं असतं .त्यांना काय मित्र जमवून बेसन पिठात घोळवून तळलेले शेंगदाणे ग्लासातल्या सोनेरी पेयाबरोबर तोंडात टाकत शाम और भी हसीन ,रंगीन करायला काय जातंय ?
ज्वारी बाजरी आणि गव्हाचे पण दाणेच असतात आणि कणसाचेही दाणेच असतात . पावसाळी हवेत निखा-यावर भाजलेलं कोवळ कणीस मीठ लिंबू चोळून दातात घुसवल की पावसातल कंच हिरव ओलेपण अंगाला वेढून येतं , किंवा हिवाळ्याची धुक्यात लपेटलेली गार शिरशिरी लोकरीच्या कपड्यातूनही आत शिरून अंगावर काटा फुलवते . आता मक्याच्या कणसाचे दाणे किंवा किसून त्याचा उपमा करा किंवा बटाटयाच्या संगतीनं त्याचं पेटीस करा किंवा सूप करून डाएटची जागा भरा हे सगळे तद्दन शहरी प्रकार .
मटारच्या दाण्याबद्दलही मला तेच वाटतं . शेतातले वेलीवरचे कोवळे मटार बाजारात आले की ,उपम्यात , पोह्यात शिरून त्यांची चव वाढवतात हे खरच , पण त्याबरोबरच मटार उसळ ब्रेड ,मटार भात ,मटार करंज्या बनून आपल्या मेजावानीच ताटही सजवतात . पण वेलावरून तोडून तोंडात टाकलेल्या मटार दाण्याची सर त्याला नाही .
Thursday, January 11, 2018
कवडसा
कुलकर्णी चं घर अगदी टिपिकल गावाकडच्या ब्राहमणाचं होतं . सडा रांगोळी , देवपूजा , वैश्वदेव , श्रावणी , नवरात्र , सोवळं ओवाळ पाळीच्या चार दिवसात बाजूला बसणं आणि आपला वारा जरी विटाशीच्या बाजूला गेला तरी " लागशील , " शिवाशील " असा चोरट्या आवाजात गजर करणं या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या आणि यातली एकही गोष्ट आमच्या घरात नसल्यामुळे लहानपणी मला या सर्वाचं प्रचंड कुतूहल होतं . माझी आई याला नाक मुरडायची. " जग खंय चल्लासा आणि हे खंय चाल्लेसत अस म्हणायची पण या सगळ्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं होतं जे मला मोहवत होतं . लक्ष्मीपूजना दिवशी पाण्यावर कोळशाची पूड टाकून त्यावर पांढरीशुभ्र लक्ष्मी चितारण असो , देव दिवाळीला शेणाची गोपूर , गोधन निर्माण करणं असो किंवा श्रावणात कहाण्या वाचण असो त्यांनी माझं बालविश्व गुढतेने भारून टाकल होतं . शिवाय त्यांच्याकडे गावाहून यल्लमाला सोडलेली कमरेपर्यंत जाड जट असलेली कपाळावर भंडारा लावणारी बाई यायची किंवा लाल अलवण नेसणारी चोळी न घालणारी , केशवपन केलेली आजीही यायची आणि त्या गुढतेचं रिंगण अधिक गडद व्हायचं .वयाची पहिली आठ दहा वर्षं मी त्या वातावरणात एकरूप झाले होते . पण मोठं वय झाल्यावर या सगळ्यापासून मी आपोआपच वेगळी होत गेले . पण आता वाटतं लहानपणी त्यांच्या कलेने मला एक लखलखता कवडसाही दिला रंगीबेरंगी रजकणांचं नर्तन दाखवणारा ........ ..
Wednesday, October 4, 2017
थेंब खुणावतो
गवताच्या पात्यावरच्या टपो-या थेंबान
हळूच विचारलं , " येतेस का माळरानावर फिरायला ? "
गुडघ्यातून उठणारी कळ जिरवत मी म्हटलं ,
" हात मेल्या , माझं वय का आहे उंडारायचं ?/ "पानाच्या टोकावरून तोल सावरत थेंब म्हणाला ,
" माझ्याकडेतरी कुठे वेळ आहे ?
आत्ता जाईन मी मातीत मुरून . "
मग ठरवलं ,
जाउयाच ओल्या वा-यात विरून.
परतल्यावरही लावता येईल दुख-या गुडघ्यांना महानारायण तेल !
पाऊस नादावतो
पावसाचाही एक नाद असतो
जीव ज्याने नादावतो.
ऐलतीरा पैलतीरी हलकेच सांधवतो !
पावसाचा नाद एक
गुज मनी जागवतो ,
पानोपानी चिंब एक
अलगुज कान्हा वाजवतो !
थांब वेड्या थांब थोडा
आवरी बेधुंद धारा.
अवलिया तू अनाहता रे
सावरु दे माझ्या मनाला !
Thursday, September 28, 2017
नै नों मे बदरा छा ये
शांत वातावरणात गाण्याच्या लकेरी उमटत होत्या. नैनोमे बदरा छाये , बिजलीसी चमके हाये , ऐ सेमे सजन मोहे गारवा लगाये..... दूरवर पसरलेल्या अंधारात डोळे घुसवून कशाचा तरी ठाव घेत असलेली तिची नजर किंचीतशी गढूळली. गारवा च्या तानेला अडखळून हातातल्या हिंदकळलेल्या ग्लासमधून तिने एक सिप घेतला. त्या तानेत विरघळत तिने आपला आवाज त्या तानेत गुंफला. प्रेम दिवानी हुं मैं , परियोकी रानी हुं मैं ...... तिचं शरीर स्वरांच्या हिंदोळ्यावर भिरभिरणारं मोरपीस बनलं . कानाशी गुदगुल्या करणारं . अतीव सुखानं तिने डोळे मिटले. पहात असलेलं स्वप्न डोळ्यातच बंदिवान करण्यासाठी . .....त्याच वेळीत्याच वेळी दंडातून उठणारी काळ ओठातून बाहेर पडू नये म्हणून तिने दात ओठावर रोवला. " come on baby , Everybody is waiting for you. पार्टी मधेच सोडून तू निघून आलीस . मुद्दाम तुझ्यासाठी ठेवलंय ना गाणं ? मि . माखीजा , शेट्टी, कपूर साब all are there. so you should be by my side now to entertain them. come baby come. " दंडावरची बोटं अधिकच आक्रमक होऊन दंडात रुतली. एक नकळतशी लालसर रेघ नखांनी दंडावर उमटवत ....त्या थंड डोळ्यांनी शरीरावर उमटलेला शहारा लपवत तिने आपले डोळे त्या डोळ्यांना भिडवले . एका घोटात ग्लास रिकामा केला. त्याचा हात झटकून ती निघाली. थोड्या वेळापूर्वी पापण्यांच्या कडेशी येऊन ओठंगलेला थेंब पुसायची तसदीही न घेता ती खोलीच्या बाहेर आली .गारवा देणा-या अंधारातून डोळे दिपवणा-या रखरखाटात . स्वरांचं गारुड मात्र तिने खोलीतच सोडून दिलं आठवणींच्या विळख्यात ........
Thursday, June 18, 2015
आठवणीतली माणसं अशीही
आमच्या शाळेत बापू , केशव आणि बक्षु नावाचे तीन प्यून होते . ही सगळी मंडळी कोल्हापूरच्या दरबारी खिदमतीत मुरलेली होती. त्यामुळे त्यांचं बोलणं मार्दवपूर्ण , हसणं मंद असायचं . त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम असायचं . पण बक्षु दिसायला भयंकर आणि वागायला तुसडा होता . त्यामुळे आमच्या लेखी तो " बक्षा " होता . त्याच्याशी संपर्क शक्यतो टाळला जायचा .
पुढे कॉलेजात दत्तू , गणपत आणि तयाप्पा असे ती प्यून होते . एकजात सगळे भगवा फेटा ( कोल्हापुरात याला पटका म्हणतात.) बांधणारे पाठीवर शेमला सोडणारे आणि धोतर नेसणारे होते . ही गोष्ट ५० वर्षांपूर्वीची आहे. तयाप्पा खूप प्रेमळ होता. तो वारला तेव्हा कॉलेजातली मुलं मुली रडली होती. त्याची मुलगी सुबक वाकळ ( गोधडी ) शिवायची . एकसारखे टाके बघत रहावेसे असत. ती माझी मैत्रीण होती. तिचं शिवण मला खूप काही शिकवून गेलं . तरुण वयात दत्तू पहिलवान होता . उंचापुरा राकट दत्तू बघूनच पोर गपगार व्हायची . एकदा तर त्याने कॉ लेजच्या ग्राउंडवर कोण्या मुलाने शिवी दिली म्हणून आधी त्याला चांगला तुडवला आणि त्याची चड्डी काढून घरी पाठवला होता. वर दम दिला. " जा ___ -___, चड्डी न्याला तुज्या बाला पाठिव . " त्यामुळे दत्तू आमचा आधार होता. शिवाय स्पोर्टस् डिपार्ट्मेंट्चा एक प्यून होता . तो आमच्या सामन्यांच्या आधी पायाला असा मसाज करायचा की पायाला पंख फुटायचे. पण हे करताना नजर खाली आणि स्पर्श सात्विक . मर्यादा , सभ्यतेचा तो आदर्श होता .
लग्न झाल्यावर सासरी काशीनाथ , वाल्हा, दगडू भेटले. पण त्यातल्या दगडूने मनात घर केलं . दगडूमामा घरातलेच एक व्यक्ती होते . नव्या सुनेला सासूचा रोष सहन करावा लागू नये म्हणून ते सतत मला सुचना करत आणि तेही शहाणपणाचा कुठलाच अभिनिवेश न बाळगता . " लहान्या बाई , बाईना ताकात लोणी राहिलेलं आवडत नाही . लोणी निपटून काढा . लहान्या बाई दादाना ढोबली मिरचीची भाजी पीठ पेरून आवडते. "अशा त्याच्या सतत सुचना असत . स्वयंपाक, शिवणकाम , बाजारहाट , व्यापार सगळ्यात तो निष्णात होता . अदबशीर आणि मृदु . मनाबाई कलाबाई , शांताबाई सगळ्यांनी प्रेमच दिलं . माझ्या मुलांना खेळवलं दुखाण्या खुपण्यात रिझवल . शांताबाई तर आमच्या मुलांना न्हाऊ माखू घालणारी यशोदाच होती . ह्या सगळ्यांच्या लुगड्याचा शेव आमच्या अंगणी झुलला हे आमचं भाग्यच . ह्यांनी जात्यावर बसून ओव्या म्हटल्या , गाणी गायली . खिनभर टेकून आपल्या संसाराची चित्तरकथा सांगितली.ह्यांच्या लुगड्याला गावाच्या काळ्या आईचा वास होता .नागरी शिष्टाचारापेक्षा वेगळी आपुलकी होती.
आणखी आठवतात ते दोघेजण . एक भिकारी दारी येऊन सुरात ओरडायचा , "म्हातारीला दात नाही . शिरा वाढा . " त्याला आम्ही तेव्हा हसायचो. पण आता वाटतं की दुर्दैवाच्या फे-यात अडकलेलां तो कोणी तालेवार होता की काय ? दुसरा एक फकीर होता. झोळीत मोरपिसांचा मोरचेल एका हातात कटोरा आणि दुस-या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या पट्ट्या . त्या वाजवून तो सुरेख नाद करायचा.. आपण जर त्याला कधी " बाबा , माफ करो " अस म्हटलं तर म्हणायचा , " देगा उसका भला , न देगा उसकाभी भला. "
कुठे गेली ही असली माणसं ? की फक्त आठवणीतले आभास होते ते ?
Sunday, February 1, 2015
मुक्काम तामसतीर्थ
म्हणजे त्याचं असं झालं ,२६ जानेवारी २०१५ हा दिवस नेमका सोमवारी आला. म्हणजे दुग्धशर्करा योग किंवा हल्लीच्या भाषेत म्हणावं तर सोनेपे सुहागां. घरात जर सोमवार ते शुक्रवार दिवसाचे १८ ,-१८ तास राबणारी मुलं असतील आणि त्यांचं मुल जर शाळेत झेंडावंदनाला गेलंच पाहिजे या वयापर्यंत पोचल नसेल तर ते या संधीचा फायदा घेणारच.त्यामुळे आपण सर्वांनी कोकणात जावं असं मुलांनी ठरवलं आणि आम्ही ८जणं ,अर्रर्रर्र मुख्य माणूस मोजायचं राहिलच, मल्हारसह ( वय वर्ष ५ ) ताम्हिणीमार्गे लाडघरच्या दिशेने कूच करते झालो.
कोकणाची एक रानभूल आहे. तिथली झाडी , तिथली माती , आणि तिथला सहस्त्रबाहू उभारून मंद्र स्वरात बोलावणारा समुद्र. नारळी पोफळीच हिरवगार गारुड हळूहळू रक्तात पसरायला लागत. मन अगदी आतून आतून शांत शांत व्हायला लागत आणि फेसाळत्या लाटांनी किना-यावर धडका मारणारा समुद्र दिसला की जीवाचा जिवलग सखा भेटल्यागत एक झपूर्झा सुरु होते मनात. प्रथम फक्त पावलं भिजवायची आहेत असं मनाशी ठरवून किना-या किना-याने दबकत चालायला सुरवात करावी तर लाटांच्या लडिवाळपणाने आपल्या पायाखालची वाळू कधी सरकते ते कळतच नाही. फक्त पावलं भिजवणा-या लाटा आपल्या मस्तकावर कधी तुषार उडवायला लागतात तेही उमजत नाही. मग सारा आसमंत विरून जातो. एकापाठोपाठ येणा-या लाटा , क्षितीजापर्यंत पसरलेलं पाणी,आणिक्षितिजापल्याड जाणारं क्षणोक्षणी रंग बदलणारं आणि त्याचं रंगात पाण्यालाही रंगवून टाकणारं सूर्यबिंब. हे सगळं सर्वांगाने आपल्यात साठवून ठेवणारे आपण एक बिंदू. त्या एकतानतेत ऐकू येणारी समुद्राची गाज.
हे सगळं अनुभवायला आम्ही तामसतीर्थाला ( लाडघर ) पोचलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते. बंगल्याचे फाटक उघडून उभे होते बंगल्याचे मालक यशोधन बाळ . शिडशिडीत अंगकाठी, ६ फुटावर उंची प्रथमदर्शनी डोळ्यात भरली. बंगल्याचं नाव होतं " गाज ". आल्या क्षणापासून गृहस्थाने आमचा ताबाच घेतला. तरुतलीच खुर्च्या मांडलेल्या असल्याने क्षणभर विसावा घेऊ असं ठरवणारे आम्ही बराच वेळ तिथेच रेंगाळलो. खोलीतून फ्रेश होऊन खाली आलो तर वाफाळत जेवण आमची वाट बघत होतं. आणि मग होतो तितके दिवस हाच अनुभव आला. रसना आणि क्षुधा तृप्त करणारं साधच पण रुचकर जेवण. ज्याला आपलेपणाचा वास होता. पहिल्या दिवशी आल्या आल्या यशोधन बाळाच बोलणं ऐकून " अरे देवा , किती बोलतो हां माणूस" असं वाटलं खरं, पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं बोलणं " किती छान बोलतात हे " इथवर कधी येऊन पोचलं ते कळलंच नाही. ओळख नसताना माणसं वेगळी भासतात आणि नंतर ती सहवासाने उलगडायला लागली की वेगळीच वाटतात. माझी सासू म्हणायची " पंक्तीत जेवल्याशिवाय आणि संगतीक रवल्याशिवाय माणसा कळणत नाय ! " यशोधन बाळांच बोलणं, मधूनच स्वत:बद्दल माहिती देणं आल्या आल्या व्यावसायिकतेचा भाग वाटला पण जसा जसा सहवास (तुटपुंजा का असेना.) मिळू लागला,तस तसं या माणसाचं " निखळपण " लक्षात यायला लागल. मुळात हा त्यांचा व्यवसाय नाही. मुलं मार्गी लागल्यानंतर आपल्याला आलेली पोकळी भरून काढण्यासाठी अर्पिता बाळांनी शोधलेला हा त्यांचा छंद आहे. आलेल्या अतिथीला खाऊ घालून तृप्त करणं . हे मानसिक समाधान त्यांना लाभावं म्हणून यशोधन आपल्या सिनेमाच्या शुटीगमधून वेळ काढून त्यांच्या मदतीला येतात. मग तिथे व्यावसायिकतेला वाव कुठून असणार ? त्यामुळे मग आमच्या संध्याकाळच्या मैफिलीत आपणहून सामील होऊनचित्रपट व्यवसायातले किंवा पत्रकारीतेतले असो , किस्से साभिनय सांगताना त्यांच्या चेह-यावर एक आपुलकीचा भाव असायचा. आणि हे सगळं दुस-याच्या खासागीपाणावर (space ) अतिक्रमण होऊ न देता .त्याचं आपुलकीने त्यांनी सकाळी गरम पाण्याच्या बादल्या जिना चढून खोलीत स्वत: आणून दिल्यां. नाहीतर साधारणपणे अशा ठिकाणी " कामाची बाई आल्यानंतर चहा आणि आंघोळीच पाणी मिळेल " असं कोरड उत्तर मिळण्याचाच अनुभव आपल्याला असतो. पण इथे म्हणजे घरच्या कार्याला नातेवाईक आलेत आणि त्यांची सरबराई चाललीय हाच भाव. त्यामुळे याशोधनानी स्वत: मासे करून आम्हाला खाऊ घातले आणि खाल्ल्यानंतर कळलं की ते स्वत: मासे खात नाहीत. आणि याना साथ मिळाली आहे तीही समानधर्मा आहे. अर्पिता बाळानीही आमचे म्हणजे अगदी लाडच केले. एकही पदार्थ परत पानात repeat झाला नाही. घरगुती जेवण , प्रेमाने केलेलं . तेही सर्दीने डोकं जड झालेलं असताना आणि कमरेत उसण भरलेली असताना.आजच्या व्यावहारिक जगात कदाचित याला वेडेपणा म्हणत असतील, कदाचित कशाला, निश्चितपणे. पण या वेडेपणामुळेच तिथे उतरणारे लोक त्यांचे कुटुंबीय बनतात . अर्पिता बाळाच्या शब्दात " extended family "
Friday, January 16, 2015
शहाणपण देगा देवा
Saturday, January 3, 2015
नाताळ
लहानपणी आम्हाला नाताळाची सुट्टी असायची. ख्रिसमसची नाही.कारण मराठी भाषा आणि मराठी शिक्षक. पुढे ८वी ९वीत गेल्यावर त्याच स्पष्टीकरणही बाईच्या तोंडून ऐकायला मिळालं होतं आणि तेच पुढे कितीतरी वर्षं मनात ठसलं होतं. बाई म्हणाल्या होत्या , "या सणाला नाताळ म्हणतात कारण त्या काळात गोरे लोक ताळतंत्र सोडून वागतात, पण त्यांना कोणी काही म्हणत नाही. पाहिजे तेवढी दारू पिली तरी चालते. कितीही मास खाल्ल तरी चालतं." आणि हे सगळं बाई इतकं वेडवाकडं तोंड करून सांगायच्या की कित्येक वर्षं माझ्या डोळ्यासमोर " गोरे" लोक एका हातात दारूचा बुधला आणि दुस-या हातात चघळायला हाडूक घेऊन रस्त्यावरून चाललेत आणि त्यांना कोणी रागावत नाही असं चित्र येत असे. त्यात परत बाईनी चोरट्या स्वरात आम्हाला आणखी एक भयंकर सत्य(?) या सणाबद्दल सांगितलं होतं की ३१ तारखेला रात्री दिवे घालवतात आणि बरोबर १२ वाजता दिवे आल्यावर कोणीही कोणाचाही मुका घेतला तरी चालतो. हे आम्ही लाजरं हसू दाबत गो-यामो-या होत ऐकलं होतं आणि त्याचं वेळी ठरवून टाकलं होतं की काहीही झालं तरी नाताळच्या वेळी इंग्लंडला जायचं नाही आणि असा प्रसंग ओढवून घ्यायचा नाही. कारण तेव्हा कोणीही तिथल्या गो-यांना रागावत नाही..येशू ख्रिस्ताची जन्मकथा किंवा जीवन ,त्याचा उदात्त संदेश फार नंतर कळला पण तेव्हा नाताळ म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सण एवढच माहीत होतं. नाताळबाबाची पोतडी आणि त्याची मध्यरात्री आपल्या घराला मिळणारी भेट ही तर समजलेली गोष्ट होती. पण तेव्हाही नाताळबाबा ख्रिश्चनाच्यात असणार आपल्यात कशाला येणार असंच वाटत असे.आणि मोठ्या माणसांना जरी माहिती असायची तरी आपल्याही घरात मोजा टागावा आणि मुलांना त्याची मौज लुटू द्यावी हा विचारही नव्हता. कारण त्यावेळी मुलच कॉलेजला जाईपर्यंत पायात चपला घालत नव्हती तिथे नाताळ बाबासाठी मोजा कोण कशाला आणतय.? ती गमंत आम्ही आमच्या मुलांसाठी केली आणि परत बालपण अनुभवलं, त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद बघून.!
Thursday, January 1, 2015
नववर्षाच्या शुभेच्छा
किलाबिलता सोनेरी पक्षी मखमालीवर बसलेला दिसेल
असेल त्याच्या डोईवर चमचमता तुरा
मधोमध बसवला असेल लखलखता हिरा
पेपरवाल्याने पेपर टाकला
दुधाच्या पिशव्या बास्केटमध्ये पडल्या
भाजीची फोडणी कुकरची शिट्टी
पोळपाटाची खटखट
सुरु झाली आजही रोजचीच लगबग
किलकिले डोळे ताणून चष्मा शोधला
कुरकुरती हाडं गोळा करायला जरा वेळच लागला
एक घोट थायरॉईसाठी
एक घोट पोटासाठी
कुशीवर वळा
मान सांभाळा
हलकेच चाला घेऊन काठी
स्वर्गीचा पक्षी, त्याचा सोनेरी तुरा
गडगडत गेला लखलखता हिरा
दार उघडून बाहेर येताच पडली समोर दाणकन उडी
" अरे अरे पडेन ना झाले मी मोडकी मथाडी " ( म्हातारी )
HAPPY NEW YEAR KUKULI HAPPY NEW YEAR
खळाळता झरा , सोनेरी किरण घेऊन आले त्याचे कोवळे स्वर
किलाबिलता पक्षी माझ्या कवेत आला
माझी संथ सकाळ सोनेरी करत राहिला !
सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:
Friday, December 5, 2014
आमचा प्रवास........ टुकटुक गाव ते नॉर्थ पोल व्हाया कोथरूड
"काय झालं? " माझा चिंतातूर प्रश्न.
" अरे, काय नाही रे, पेट्रोल संपल. काटा लालकडे आलाय. आता काय करायचं? " नाही म्हटलं तरी स्वाराला जरा चिंता वाटलीच.
" बघा, मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला निघताना पेट्रोल बघा म्हणून. " सवयीप्रमाणे मीही सुनावून घेतलं. नातू झाला म्हणून काय झालं, तोही भावी ' पुरुष'च.
"थांबा हो. घाबरू नका. आत्ता पेट्रोल आणतो." स्वार आपल्या पुरुषत्वाला जागून मला धीर देते झाले. पटकन खाली उतरून हातातलं हेंडेल उंचावून त्यांनी खणायला सुरवात केली आणि बघता बघता अर्जुनाने बाण मारल्यावर जमिनीतून पाण्याचं कारंज उसळून भीष्माच्या तोंडात पडावं तशी पेट्रोलची धार रस्त्यातून उसळून गाडीच्या टाकीत पडू लागली. धन्य झाले मी, कारण असा " अरब "आमच्या घराण्यात जन्माला आला. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. कारण आमच्या टुकटुक गावातून निघून आम्ही कोथरूडला पोचण्यातच बराच वेळ गेला होता. त्यामुळे आम्ही आमची गाडी चायनाकडे वळवली. कारण तिकडच्या पांडाना आम्हाला बांबू द्यायचे होते बरीच शोधाशोध केल्यावर आम्हाला पांडा सापडले. ते कॉटखालच्या सामानाच्या टबमध्ये ( खर म्हणजे ते त्याच घर होतं. ) दाटीदाटीनं बसले होते. मी बेबिजना पानं आणि बिग पांडाजना बांबु दिले. एका बाजूला झुकल्यामुळे दुखणा-य कमरेवरून हात फिरवताना मनात एक अंधुकशी आशा होती की आता परत कोथरुडमार्गे टुकटुक गावी जायचं. पण ५ वर्षांच्या सहवासानेही मी नातवाला ओळखलं नव्हतं हेच खरं. कारण आता आम्हाला अमेरिकेला जाऊन लायब्ररीचं पुस्तक परत करायचं होतं मग पुढे ( कि वर ?) नॉर्थ पोलला जाऊन पोलर बेअरला मासे द्यायचे होते. निघताना माझ्या मोबाईलच्या तळहाताएवढ्या पाऊचमध्ये एका कप्प्यात बांबू आणि दुस-यात मासे घातले होते ते मी विसरलेच होते. तिथून निघताना मला पुढच्या बाजूने पोलर बेअरची माहिती उडत उडत ऐकू येत होती. पण त्यातलं आता एवढच आठवतंय की येताना एक पोलर बेअर आणायचा आहे आणि खोलीएवढा फ्रीज घ्यायला बाबाला सांगायचं आहे.त्यात तो ठेवायचा आहे. मला चिंता एवढीच की माझ्या पाउचमध्ये पोलर बेअर मावला नाही तर मला कोल्हापूरला जाऊन एक मोठ्ठी पिशवी विकत घ्यायला लागून परत व्हाया कोथरूड नॉर्थ पोलला यावं लागेल की काय ? . /
Saturday, November 29, 2014
जाग .......एका रविवारची
बाहेरही सगळं शांत आहे. अंधाराचं गडदपण मंद होत चाललय.थंडीची झुळूक अंगावर बारीक काटा फुलवतेय खरी,पण तीही हवीहवीशी वाटतेय. समोरच्या घरातल्या आजी नव्वदीच्या उंबरठ्याशी आलेल्या , ओटयाशी वाकून काहीतरी करताहेत ते मला माझ्या खिडकीतून दिसतंय. चहा करताहेत त्या.आता थोड्याच वेळात आपला वाफाळता कप घेऊन त्या बाहेर बाल्कनीत येतील. अंगाची जुडी करून सकाळची ही वेळ चहाच्या एकेका घोटाबरोबर अंगात मुरवत खुर्चीत बसून रहातील.
शेजारचं फाटक वाजलं. आता हळूच फाटक उघडलं जाईल. परत हळूच कडी घातली जाईल. शेजारच्या वहिनी फिरायला बाहेर पडतील. फिरायचं निमित्त असतं खर तर . त्या दूध आणायला बाहेर पडतील.पण सतत या दबावाखाली असतील की आपल्या फाटक उघडण्यामुळे कोणाची झोपमोड तर झाली नाही ना?
अजूनही अंधाराला उजाळा मिळालेला नाही. दूर कुठेतरी एखादी रिक्षा शांततेला उसवू पाहतेय.पण अजूनही घराघरातले दिवे झोपलेत. बाहेर नारळाच्या झावळ्या थंडीला अंगावर खेळू देताहेत. निस्तबद्धतेने. आजोबाने अंगाशी झटणा-या नातवाला न्याहाळावं तशा .
पक्षी उठलेत. पावसाळ्यात आपल्या सवंगड्याना साद घालणारे छोटे छोटे पक्षी आता गायब झालेत त्यामुळे फक्त कावाळ्याचा आवाज आणि मधेच कुठे तरी टीटयांवचा स्वर ऐकू येतोय. आता अंधाराला माघार घ्यावीच लागणार आहे कारण पूर्वेला दिशा उजळायला लागली आहे. झावाळयाही त्याचं समंजसपणे दिवसाला सामोर जाण्याच्या तयारीत आहेत. शेगड्या पेटवून चहाचं आधाण ठेवल्याचेही आवाज यायला लागलेत. रस्ता जागा झालाय. फिरायला जाणा-यांची चाहूल यायला लागलीय. मंद धुक्यात तरल पहाटेला कुशीत घेऊन तिचा निरोप घेऊ पहाणारा अंधार दिसेनासा झालाय आणि महानगरी आठवड्याचा शेवटचा दिवस मुठीत पकडायला जागी होतेय , येणा-या आठवड्याच्या deadlines calculate करत.
Saturday, November 22, 2014
देवाबद्दलची माझी संकल्पना
लहानपणाची हीच तर गम्मत असते. निरागसपणा अजून मनात भरलेला असतो. सगळं जग ( म्हणजे आजूबाजूचे शेजारी , शाळेतल्या मैत्रिणी आणि शिक्षक ह्यापरत वेगळं जग असतं कुठे लहानपणी ?) चमत्कारानेच भारलेल असतं या वयात. अर्थात आता "असे" असंच म्हणावं लागेल. कारण आताची मुलं शास्त्रीय युगातली असल्यामुळे ज्या गोष्टी आम्ही डोळे मिटून मान्य करत होतो त्या गोष्टीतल्या तृटी सहजपणे शोधून त्यावरची उपाययोजनाही ते आपल्याला अशा सहजतेने सुचवतात की वाल्मिकी आणि व्यासांनी ह्यांच्या पायाशी बसून story telling चे धडे घ्यावेत.
पण आमच्या लहानपणी सगळ्या जगाची तीन भागात वाटणी झालेली होती. पैकी देव हे चांगले असल्याने ते आकाशात, माणूस अर्थात पृथ्वीवर आणि राक्षस ( ज्यांचं काढताच लपायची सगळ्यात सेफ जागा म्हणजे आईच्या पदराखाली ) हे पाताळात. बरं देवही तेहेतीस कोटी .वेगवेगळी शक्ती असल्याने वेगवेगळ्या संकटात त्यांचा धावा केला जायचा. म्हणजे परीक्षेत अडचण तर देवी सरस्वती. बुद्धी तर अर्थातच देवा श्रीगणेशा. शक्तीसाठी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आणि भूत प्रेत समंधादीसाठी रामरक्षा आणि भीमरूपी यांचा डबल डोस असायचा शिवाय या सगळ्या देवांची वस्ती गाईच्या पोटात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यामुळे दिसेल त्या गाईला हात लावून आम्ही मैत्रिणी पुण्याचा अखंड संचय करून ठेवत असू. कारण देवांच्या वस्तीत स्वर्ग आणि नरक अशीही एक विभागणी असायची. स्वर्गात गेलं तर प्रश्नच नाही. आपण फक्त कल्पवृक्षाखाली बसायचं आणि अमृत पीत रहायचं. कारण त्या अप्सरांच्या नाचात वगैरे आम्हाला रस नव्हता. पण नरकात जाऊन पापणीच्या केसाने मीठ गोळा करायच किंवा कढईत उकळत्या तेलात पडायचं म्हणजे अंमळ कठीणच होतं. असो. गेले ते दिवस आणि उरल्या त्या त्यांच्या निरागस आठवणी. चेह-यावर स्मितरेषा उमटवणा-या .
घरातलं बुद्धिवादी वातावरण, वाचनाने दिलेली व्यापक दृष्टी यामुळे देवाबद्दलची संकल्पना बदलायला लागली. देव मूर्तीत नसून माणसात आहे, याचं भान येऊ लागलं. पण तरीही संत वाचनातला भक्तभाव मनाला लुभावत होताच. संतांसाठी देवाने रूप धारण करावं, जनाई ला दळू कांडू लागावं, नरहर सोनाराला कमरपटटया साठी माप देताना कधी शंकर तर कधी विठ्ठलाचं रूप दाखवाव आणि सर्व देव एकच आहेत हे पटवावं. दामाजीपंतासाठी बादशहापुढे " तुमच्या महाराचा मी महार" म्हणावं , एकनाथा घरी पाणक्या श्रीखंड्या बनून पाणी भरावं यातला romanticism मनाला स्पर्शून जात होताच. पण काही मिळवण्यासाठी उपास कर, कुठलतरी स्त्रोत ५० वेळा वाच किंवा अमुक देवळाला अनवाणी पायाने प्रदक्षिणा घाल हे फारच हास्यास्पद वाटायचं. आयुष्यात अनेक कसोटीचे प्रसंग आले. पुढे अंध:कार असावा वाट दिसेनाशी झाली. त्यावेळी " परमेश्वरा" अशी आर्त हाकही ओठी आली पण ती ठेच लागल्यावर " आई ग...' ओठी आलं तितक्याच सहजतेची होती. जखमा धुवून पुसून आपणच मलमपट्टी करायची आहे हे माहीतच होतं.
वयानुसार भाबडेपणा अधिकाधिक कमी होत गेला. पण त्याचबरोबर तरुण वयात देव देव करणा-यांबद्दल जे कुत्सित उपहासाने बोललं जात होतं ते बंद झालं. आपल्याच आयुष्यात अगदी तरुण वयात आपणही काही जीवघेण्या प्रसंगात देवाला साकडं घातलं होतं, ते पूर्ण केलं होतं, हे आठवू लागलं. म्हाता-या सासूला बर वाटावं म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निमुटपणे केल्या होत्या. क्वचित प्रसंगी मनाला न पटणा-या गोष्टी शिष्टाचार म्हणूनही केल्या होत्या त्या व्यक्तीच्या दुख-या मनाला आधार मिळावा मानूनही केल्या होत्या हे सगळं आठवलं मग लक्षात आलं,. मनुष्य काही गोष्टी जनरेटयामुळे करतो, मनुष्याला अशा वेळी नेहमीच त्याविरुध्द दंड थोपटता येतातच असं नाही. जोवर त्या समाजाला घातक नसतात तोवर तिकडे कानाडोळा करणच श्रेयस्कर अस् वाटायला लागलं. एकप्रकारची क्षमाशीलता सहानुभूतीची अनुभूती मनात यायला लागली. देवाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न तरी यापेक्षा वेगळा काय असणार, नाही का? आणि देवत्व म्हणजे तरी काय ? मनाची शुध्दता, आणि वृत्तीची निरागसता. हो ना?
Friday, November 14, 2014
मल्हारबरोबर वाढताना
माझ्या पिढीच्या अनेक आज्याप्रमाणे मीही ठरवलं होतं की जे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत डोळसपणे करू शकलो नाही ते नातवाच्या बाबतीत करायचं. म्हणजे आपल्या संसाराच्या धबडग्यात आपण मुलं वाढवतो असं आपल्याला वाटतं, पण ती खरं तर आपल्याला बघत आपणच वाढतात. तसं आजी झाल्यावर होत नाही. नातवंडाबरोबर घालवलेला क्षण न क्षण आनंददायी असतोच पण तो आपलीही वाढ करत असतो अस आता मला सतत वाटत असतं .
मल्हार लहान असताना मी सतत त्याच्याशी बोलत असायची. वेगवेगळी गाणी गुणगुणत असायची. तोही टकामका बघत ऐकायचा असं वाटायचं पण त्यापेक्षाही त्या गाण्यांचे सूर,त्यांचा अर्थ त्याच्या आत आत कुठेतरी अधिक स्पष्ट रीतीने उमटतोय असं जाणवत रहायचं. दोन दिवसापूर्वीची गोष्ट. गाण ऐकायचं असं मल्हार म्हणाला म्हणून एक कासेट लावली. तल्लीनतेने बसून त्याने पूर्ण ऐकली. परत दुस-या दिवशी " कालच्या आजीचं गाणं लाव म्हणून त्याने काढली ती कासेट किशोरी अमोणकरांची होती.
जेव्हा मल्हार इतक्या लहान वयात मराठी भाषा समृ ध्दपणाने वापरतो तेव्हा खूप आनंद होतो.म्हणजे त्या दिवशी तो मावशीला तुझ्या घरी येतोय म्हणून सांगत होता. वर म्हणाला की" तूच फार दिवस भेटला नाहीस म्हणून भेटायला ये अशी गयावया करत होतीस ना म्हणून येतो." मध्ये तर सतत त्याला " कुहू" चावल्यासारखा कविताच करायचा. मराठी यमक जुळवून काहीतरी म्हणायचा आणि वर मला सांगायचा, " अरे, कविता झाली की रे."मल्हारच्या लेखी स्त्री पुरुष सगळेच " अरे " असतात.
तो अगदी २ वर्षाचा असल्यापासून आम्ही दोघंही जवळच्या बागेत सकाळी जात असतो.तिथेही त्याला गवतावरचे दवबिंदू दाखव हिरव्या कोवळ्या गवताची , वाळलेल्या गवताशी रंगसंगती दाखव रंगीबेरंगी फुलं , आकाशातले रंग , पक्षांची माळ दाखव असे आमचे उद्योग चालायचे.गम्मत म्हणजे तो जेव्हा स्वानंदीबरोबर कपड्याच्या दुकानात जातो तेव्हा आपले कपडे स्वत; पसंत करतो आणि ते खरच छान असतात. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट अशी की आमच्या बागेतल्या झोपाळ्यावर बसून तो ज्या एकतानतेने झोके घेतो ते बघत रहाण्यासारखं असतं .
आजी झाल्यावर मला असं वाटतं की मूल थोडं मोठं झालं की त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघितलं जायला पाहिजे. मी आई असतानाही माझ्या मुलांवर ती लहान असताना कोणत्याच बाबतीत दडपशाही केली असं मला स्वत:ला वाटत नाही. कारण तशी तर माझ्यावरही माझ्या आईवडिलांनी केली नाही. पण मला वाटतं तेव्हा नकळत का होईना माझा दृष्टीकोन पालकत्वाच्या superiorityचा होता. म्हणजे ह्यांना काय समजतंय , ह्यांना शहाणं करून जगात रहाण्यायोग्य करणं, त्यासाठी त्यांची सर्वतोपरीने "काळजी " घेणं हे आई म्हणून माझं परम कर्तव्य आहे असा एक भाव होता. त्यामुळे त्यांच्यापरतं मला ( आजही ) दुसरं जग प्रिय नसलं तरीही आजी झाल्यावर एक फरक झाला तो हा की त्या बालजीवाचं म्हणणं " चिमखडे चमकदार बोल " या सदरात न घेता त्यावरही विचार केला जावा.ह्याचं एक उदाहरण म्हणजे संध्याछाया पडल्यानंतर सकल जोडप्यांचा वेळ जाण्यासाठी उगीचच वाद घालणं हा एक आवडीचा उद्योग असतो.( गरजूंनी आजूबाजूला चौकशी करावी).कारण होतं काय की इतकी वर्षं एकत्र काढल्यानंतर नवरा बायकोला आणि बायको नव-याला संपूर्ण कंगो-यानिशी ओळखत असते.त्यामुळे एकमेकांच्या बोलण्यातला between the lines अर्थ ते चांगलेच जाणून असतात. पण मल्हार ३ वर्षांचा असताना एकदा ( बहुधा तोः तोच प्रयोग परत परत पाहून वैतागून ) मला म्हणाला, " कुकुली तू आणि आबा सारखे का भांडता? " त्या क्षणी मला फार फार वाईट वाटलं आणि त्यापेक्षाही जाणवलं ते हे की अरे, हे बाळ आता मोठं झालं की . त्यानंतरआम्ही वेळ घालवायचे अन्य मार्ग शोधले.हे सांगणे नलगे.हे आई असताना कदाचित वेगळं घडलं असतं . त्यामुळे माझ्यासमोर केवळ मल्हारच वाढत नाही मीही वाढतेय. आणि ते निश्चितच आनंददायी आहे.एका अटळ सत्याकडे जाण्याच्या वाटेवर अंगावरची एकेक पुटं गळून पडावी आणि आत आत काहीतरी कोमल उमलत जावं पाकळी पाकळीनं तसं वाटतंय .