Thursday, January 11, 2018

कवडसा

कवडसा 
आज इन्स्टाग्रामवर एक फोटो पहाताना त्या फोटोत उन्हाचा एक कवडसा दिसला . उन्हाच्या पट्ट्यात चमकणारे ते धुळीचे कण पहाताना माझं मन कुलकर्ण्याच्या स्वयंपाकाघरात  गेलं .कुलकर्णी आमचे खासबागेतले , म्हणजे कोल्हापुरातले शेजारी . अण्णा  घरातले कर्ते  पुरुष . अक्का त्यांच्या पत्नी. अन्ना  मला फारसे आठवत नाहीत. कारण ते बहुधा शेतीच्या  कामासाठी गावाकडे असायचे. अक्का मुलांच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात   असायच्या.पण अण्णा घरी आले कि घरातलं वातावरण एकदम टेन्स असायचं. अण्णाना  पाणी द्या , चहा द्या. असं सारखं चालायचं .शिवाय अण्णा मुलांची झाडाझडती घ्यायचे ते वेगळंच .त्यामुळे तेवढे दिवस मी ते घर वर्ज करायची . वय तरी किती होतं माझं ? फारतर सहा सात वर्षांचं .पण मी सारखी त्यांच्या घरात पडीक असायची. त्या घरात माझ्या वयाचा रवी होता , बाळू थोडा मोठा होता .एखाद दुस_या वर्षांनी. रोहिणी उर्फ शिट्टी दोन वर्षांनी लहान . मुख्य म्हणजे मीना आणि बेबी . होत्या . त्यातली मीना माझ्या विशेष आवडीची होती . कारण आमच्या घरात तीन भाऊ होते आणि तेही माझ्यापेक्षा १७ , १५ , आणि ८ वर्षांनी मोठे . आपापल्या मित्रात दंग असलेले .आई बिचारी खोबरं खवा , खोबरं वाटा ,रस काढा आणि माशाचे वेगेवेगळे प्रकार करा यात गढलेली असायची, त्यामुळे माझी बहिणीची भूक कुलकर्णींच्या घरात भागायची . माझी पाच पेडी वेणी घालायला मला मीना  लागायची . बांगड्यांचे फुटके तुकडे आगीवर वाकवून तोरण करताना किंवा पांढरी शुभ्र रांगोळी चितारताना मीनाला गप्पा मारायला मी लागायची ..
कुलकर्ण्याच्या घराच्या आठवणी माझ्या घराइतक्याच मला चिकटलेल्या आहेत . कारण आमच्या दोघांच्या घराची भिंत सामाईक होती . आमच्या दोन्ही घरात जमीन अस्मानाचा फरक होता . आमच्या घरात स्वयंपाकघर सोडल्यास सगळीकडे लख्ख उजेड असायचा. विजेचे दिवे होते . पण हे घर फिकट उजेडात कायम गूढतेच पांघरूण पांघरून असायचं . संध्याकाळच्या  वेळी कंदिलाच्या काचा पुसून दिवाबत्ती केली की ते घर अधिकच गूढ वाटायचं  मग मी घरी पटकन सटकायची . त्यांचं स्वयंपाकघर अधिकच अंधार होतं . आपण आमच्या घरात नसलेल्या कितीतरी गोष्टी तिथे होत्या . आत शिरल्या शिरल्या उजव्या बाजूला झोपाळा होता . त्यावर गोधडीच उसं करून ठेवलेल असायचं . पांघरायला पासोडीची घडी ठेवलेली असायची. त्या सगळ्याला धुवट वास येत असायचा . उजव्या कोप-यात चूल मांडलेली असायची .तिच्या बरोब्बर वर उजेड येण्यासाठी काच बसवलेली असायची . त्या गवाक्षातून उन्हाचा कवडसा अक्कांच्या भाकरी थापायच्या परातीवर पडलेला असायचा . पितळी  परातीचा प्रकाश आणि अक्कांचा हिरव्या बांगड्यांनी  लखलखणारा गोरापान हात माझ्या स्मरणात अगदी कोरून बसला आहे .त्यांचा हात हलायचा आणि कवडशातले धुळीचे कण हलायचे . आपले बिलोरी रंग घेऊन नाचायचे . मी कितीदातरी तो कवडसा पकडायचा प्रयत्न केलेला मला लख्खच आठवतंय . स्वयम्पाकघरातल्या झोपाळ्यामागे एका घडवंचीवर धान्याची पोती रचून ठेवलेली असायची . त्यातल्या तांदळाचा सुगंध सगळीकडे पसरलेला असायचा .बहुधा एक कणगीही होती शेजारी . त्यात ज्वारी भरलेली असायची . शिवाय अण्णा गावाहून येताना गावाकडचा भाजीपाला , गुळाच्या ढेपा , शेंगाची पोती  ,आणायचे . हे सगळं सामान बैलगाडीतून उतरवलं जायचं , तेव्हा रवी बाळू शिट्टी ज्या अभिमानाने आत बाहेर करत असायचे , ते बघून " माझे बापू मेडिकल रीप्रेझेटेटीव्ह का झाले ? " असा एक असुयाभरा प्रश्न माझ्या बापुडवाण्या चेह-य वर उमटायचाच .
कुलकर्णी चं घर अगदी टिपिकल गावाकडच्या ब्राहमणाचं  होतं . सडा  रांगोळी , देवपूजा , वैश्वदेव , श्रावणी , नवरात्र , सोवळं ओवाळ पाळीच्या चार दिवसात बाजूला बसणं आणि आपला वारा जरी विटाशीच्या बाजूला गेला तरी " लागशील , " शिवाशील " असा चोरट्या आवाजात गजर करणं  या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या आणि यातली एकही गोष्ट आमच्या घरात नसल्यामुळे लहानपणी मला या सर्वाचं प्रचंड कुतूहल होतं . माझी आई याला नाक मुरडायची. " जग खंय  चल्लासा आणि हे खंय चाल्लेसत अस म्हणायची  पण या सगळ्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं होतं जे मला मोहवत होतं . लक्ष्मीपूजना दिवशी पाण्यावर कोळशाची  पूड टाकून त्यावर पांढरीशुभ्र  लक्ष्मी चितारण असो , देव दिवाळीला शेणाची गोपूर , गोधन निर्माण करणं असो किंवा श्रावणात कहाण्या वाचण असो त्यांनी माझं बालविश्व गुढतेने भारून टाकल होतं . शिवाय त्यांच्याकडे गावाहून यल्लमाला सोडलेली  कमरेपर्यंत जाड जट असलेली कपाळावर भंडारा लावणारी बाई यायची किंवा लाल अलवण नेसणारी चोळी न घालणारी , केशवपन केलेली आजीही यायची आणि त्या गुढतेचं रिंगण अधिक गडद व्हायचं .वयाची पहिली आठ दहा वर्षं मी त्या वातावरणात एकरूप झाले होते . पण मोठं वय झाल्यावर या सगळ्यापासून मी आपोआपच वेगळी होत गेले . पण आता वाटतं लहानपणी त्यांच्या कलेने मला एक लखलखता कवडसाही दिला रंगीबेरंगी रजकणांचं नर्तन दाखवणारा ........        .. 

No comments: