Wednesday, February 7, 2024

डेकोरेशन

डेकोरेशन
आज फारा दिवसांनी हॉलचं डेकोरेशन बदललं. म्हणजे काय तर मनीप्लांटच्या नाजूक डहाळ्या असलेले नाजूकसाजूक पॉटस् इकडून तिकडे हलवले. चिण्णुकल्या मनीप्लांटना उलंउलसं पाणी घातलं. तरी एक कप्पा रिकामा उरलाच. मग ड्रावरमधल्या पिशव्या उचकल्या. तर त्यात मॉर्टी जिराफ एका बाजूला मान वळवून आणि सिंह ( बहुधा त्याचं नाव  अँँलेक्स असावं ) मागच्या दोन पायावर आणि पुढचे दोन पाय हातासारखे उभारून उभा दिसला. पटकन त्या दोघाना उचललं, ओढणीनं पुसलं. आणि त्या कप्प्यात ठेवून दिलं. किती आनंद दिला होता त्यांनी आम्हा दोघांना. आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझा नातू.( आता तो मिसरूड फुटायच्या वयात आहे ) तो बालवाडीतून आला, कपडे बदलले की मी जेवायचं ताट वाढेपर्यंत आजोबांची ड्यूटी खुर्च्या जोडून पडदे सोडून हॉलचा सिनेमा हॉल करायचा. मग आम्ही दोघे टीव्हीवर लहान मुलांच्या सीडीज बघायला मोकळे.त्यातली एक मादागास्कर. त्यातले दोन जिवलग मित्र मॉर्टी आणि अँलेक्स. त्या दोघांची जोडी बघितल्यावर मला तो सगळा माहोल तर आठवलाच पण सगळ्या बालमैत्रिणी आठवल्या. त्यांच्याबरोबर घालवलेले सुखद क्षण आठवले.मन अगदी अळुमाळू झालं. उचललं दोघांना आणि ठेवलं त्या कप्प्यात. आता कप्पा भरल्यासारखा वाटला.त्या दोघांमुळेपण आणि आठवणींनीसुध्दा !
आणि हॉलचं डेकोरेशन म्हणजे तरी काय ?आपल्या डोळ्यांना ,मनाला सुखवणारी सजावट.तशी ती झालीच  की !



No comments: