Thursday, October 15, 2009

हॅलोविन

कुपरटिनोला येऊन दोन दिवस झाले होते आणि मी " अय्या, किती छान, किती वेगळं " या मूडमध्ये असल्याने पानांचे आकार, फ़ुलांचे रंग, माणसं, रहदारीचे नियम, फ़ूटपाथ सगळं सगळं मला म्हणजे देवाच्या बागेत फिरणा-या ईव्ह इतकच नवं नवं होतं.त्यामुळे काही खरेदीसाठी एका मॉलमध्ये शिरताना दारात, शेल्व्हजवर सगळीकडे भोपळेच भोपळे दिसल्यावर मी स्वानंदीला विचारलं, " बाई ग, म्हातारी भोपळ्यात बसून लेकीकडे गेली ही आपली गोष्ट इकडे माहीत आहे का? " सासूने केलेल्या इनोदावर जेवढा प्रतिसाद देता येईल तितका देऊन तिने नम्रपणे सांगितलं, " काकू, आता हॅलोविन आहे ना, त्याची तयारी म्हणून हे भोपळे आहेत."
आत गेल्यावर भोपळ्यांच्या जोडीला वाळलेल्या पाचटाच्या मोठ मोठ्या जुडग्या उभ्या केल्या होत्या शिवाय " Happy Harvest " अशा पाट्याही विकायला होत्या.हा सण म्हणजे सुगी झाल्यानंतरचा सण असावा असं म्हणून मी मॉलमध्ये हिंडायला लागले. तर एका शेल्फ़वर कवट्या, हाडं, कोळ्याची जाळी, सुनसान बंगलीसारखी बंगली असलं काय काय विकायला ठेवलेलं दिसलं " आता काय करु या कर्माला " असं मनात मी म्हणतेय तर माझ्यामागून अमेरिकन ऍक्सेंटमध्ये कोणीतरी काहीतरी बोलायला लागलं . कोण बोलतय म्हणून बघायला वळले तर बेशुध्द पडायचीच राहिले. कारण माझ्यामागे एक सहा फ़ुटी भूत, काळ्या वेषात, दात विचकून, आपले लाल लाल डोळे रोखून बोलत होतं. चालता चालता माझाच धक्का लागून तो सांगाडा बोलायला लागला होता. आणि तो सांगाडा कवट्या सगळं हॅलोविनसाठीच होतं.
म्हणजे हॅलोविन हा सण सुगीचा सण आहे की भुताखेतांचा. काही समजेना.कारण इकडे निकेत स्वानंदी मल्हारसाठी हॅलोविनचे ड्रेस बघत होते ते किती छान होते. अगदी नवजात बाळापासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंतचे पोषाख दुकाना दुकानातून दिमाखाने झळकत होते. आणि हे कवट्या बिवट्या म्हणजे अगदीच कसंतरी वाटत होतं. अखेर आपल्या पितरपाठासारखं गेलेल्या लोकांसाठीचा दिवस असावा अशी मनाची समजूत घातली आणि मॉलमधून बाहेर पडले.
मल्हारसाठी ऑन लाइन बघितलेल्या केळं, वाटाणा, अळी, फ़ुलपाखरु, माकड, अस्वल अशा अनेकानेक पोषाखातून अखेर भोपळ्याची निवड झाली आणि आम्ही प्रत्यक्ष खरेदीसाठी " Babies r us" नावाच्या दुकानात जायला निघालो. त्याआधी एक हॅलोविन नावाच्या दुकानात कदाचित अधिक व्हरायटी मिळेल असं वाटल्याने तिकडे वळलो. दाराशी गेल्यावरच आत जावं की नाही असं वाटावं असा प्रकार होता. आत सगळं धुरकट वातावरण होतं. बाळ आणि त्याचे आई वडील आत शिरल्यामुळे मीही धीर एकवटून आत शिरले. म्हटलं कसल्या दुकानात आलो आपण . सगळीकडे धूर सोडून वातावरण निर्मिती केली होती. भुतांचे मोठ मोठे सांगाडे सगळीकडे उभे. कोयता, सुरा, चक्क त्रिशूळ, तलवार आणि जी जी म्हणून शस्त्र असतील ती विकण्यासाठी ठेवलेली होती.त्यावर रक्त सांडलेलं होत. जोडीला भूतबंगले होतेच. त्यातला हिडीस भाग असा की छोटी छोटी रांगती बाळं केली होती आणि त्यांची तोंडं रक्ताने बरबटलेली होती. म्हणजे तशी रंगवलेली होती. जमिनीवर रिमोट होते .त्यावर पाय दाबला की एखादं भूत कबरीतून खदखद हसत उठत होतं तर कोणी दात विचकत होतं.सुन्न होऊन आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. प्रत्येकाच्या चेह-यावर हाच भाव होता की आधी कल्पना असती तर या दुकानात गेलोच नसतो.मी घरी येताच रामरक्षा म्हणून मल्हारला देवापुढचा अंगारा लावला.
या सगळ्या प्रकाराने माझी उत्सुकता चाळवली आणि मी जाळं उघडलं त्यात मला मिळालेली माहिती अशी की, celtic ही जमात ३०० देवांची पूजा करायची, पण त्यांचा मुख्य देव सूर्य होता. त्यामुळे सूर्य प्रभावशाली असताना Beltane सण आणि सूर्यावर मात करणा-या Samhain या म्रुत्युदेवतेचा सण असे त्यांचे दोन मुख्य सण असत. या जमातीचा भुता खेतांवर विश्वास होता.Samhain हा देव आदल्या वर्षी मरण पावलेल्या evil spirits ना आपल्या घरी भेट द्यायला पाठवतो अशी समजूत असल्याने भुतांना प्रसन्न करण्यासाठी खेड्यात घराबाहेर खाणं ठेवलं जाऊ लागलं आजच्या Trick or Treat चं मूळ त्यात असावं किंवा भुतांना घाबरवण्यासाठी त्यांच्यासारखाच पोषाख केला की भुतांपासून सुटका होईल अशीही एक समजूत. पण नंतर रोमन व ख्रिश्चन लोकांच्या संपर्काने यात खूप बदल झाले आणि हा दिवस सुगीचा सण म्हणूनही साजरा केला जाऊ लागला.
गेला महिनाभर अनेक घरांच्याबाहेर भोपळे टांगून ठेवलेले दिसतात. भुतांच्या आकाराची बुजगावणी, पाचटाच्या पेंड्या बागेत दिसतात. आता ३१ तारखेला लहान मुलं वेगवेगळे पोषाख करूनलोकांच्या घराची दारं ठोठावतील आणि घरातल्या माणसांना घाबरवून त्यांच्याकडून कॅंडीज उकळतील.मोठी मुलं भीतिपट बघतील. मोठी माणसं , मुलं पार्ट्या करून आपली पार्टी जास्स्तीजास्त भीतिदायक कशी होईल याची आखणी करतील.
मला हे सगळं बघितल्यावर असं वाटलं की आपल्या आणि पाश्चिमात्यांच्या आचारात जरी फ़रक असला तरी त्यात काही साम्यस्थळही आहेत. फ़रक असा की आपणही पितरपाठात गेलेल्या माणसांच्या नावाने जेवण घालतो, पण त्यात भीतीची, दुष्ट शक्ती ही भावना नसून त्यांची पुण्याई आपल्या पाठी असावी ही आदराची भावना असते. दुसरं असं की मी बघितलेल्या त्या भीतीदायक दुकानात ७ - ८ वर्षांची मुलं रिमोटवर उड्या मारून भुतांना कबरीतून बिनदिक्कत उठवत होती. ५ वर्षाची मुलगी आपल्याला कोणतं शस्त्र हवं ते निवडत होती.
साम्य असं वाटलं की आपल्याकडेही पितरपाठात भोपळ्याला महत्त्व असतं आणि इथेही भोपळे टांगून ठेवलेले असतात. विचार केला की मानवी इतिहासाची मजा वाटते हे खरं!

No comments: