Sunday, October 4, 2009

आमचं फिरणं

निकेतच्या घराच्या भल्यामोठ्या खिडकीतून सुंदर झाडी दिसते. समोरच्या बाजूला एका कंपनीचं भलं मोठं आवार आहे, आणि तिथेही जागेच्या विपुलतेमुळे हिरवळ आणि भली मोठी झाडी आहे. अशा रस्त्यावरून फेरफटका मारायला कोणाला आवडणार नाही बरें? त्यात आणखी चाकलेट, आइसक्रिम वगैरे मोहमयी वस्तूंच्या सहवासात असताना तर हे फ़िरणं एक कर्तव्यच ठरत नाही का आपलें? तर असो.
तर सुप्रभाती म्हणजे सकाळी सात साडे सातच्या सुमारास मी आणि विलास घराबाहेर पडतो. जिना उतरून खाली आलं की थोडी बाग आहे. एक फ़ाटक आहे (ते आतल्या बाजूने तुम्ही उघडू शकता, पण बाहेरून आत येताना मात्र ठरलेले आकडे फ़िरवावे लागतात) ते उघडून बाहेर आलं की या कॉम्प्लेक्सचं आवार. डावीकडे वळून रस्त्याला लागा आणि परत डावीकडे वळून चालालला लागा, पण पदपथावरून. मग तुम्ही कुपरटिनो चौकात येता. त्या चौकात सिग्नल्स आहेत. पादचा-यांसाठी अणि वाहनधारकांसाठी. (हे म्हणजे जरा लईच हुतय.) त्या सिग्नल्सपर्यंत पोचायला एक २५ पावलांची जागा आहे. आपण त्या लेनमधून जात असताना डावीकडून जर एखादी गाडी आली तर तिचा मालक, "माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा आणि रस्ता ओलांडा सरकार" असा चेहरा करून वाट बघत रहातो. थेट पुण्याहून आल्यामुळे तर हे सौजन्य फ़ारच जाणवतं. चौकात एक आपल्या कमरेच्या उंचीइतका खांब आहे आणि त्याला एक बटन आहे. ते दाबून आपण चौकात जरा निरिक्षण करत उभं रहायचं आपल्याला असं थांबून रहायची सवय नसल्याने प्रथम ऑकवर्ड आणि नंतर इरिटेटिंग वाटतं, पण मग सवय होते. ठराविक वेळाने समोरच्या बाजूचा लाल हात नाहिसा होऊन चालणारा पंढरा माणूस येतो की आपण पळा रे पळा म्हणोन चालायला सुरवात करायची. कारण आपल्या हातात (की पायात?) २० सेकंद असतात. तेवढ्यात आपण रस्ता ओलांडायचा असतो. ही पध्दत रहदारीच्याच चौकात असते असं नाही तर निर्मनुष्य चौकातही हा नियम पाळला जातो. हा चौक ओलांडला की आपण मोठ्या झाडांनी केलेल्या हिरव्यागार कमानीत येतो. उजव्या बाजूला नीट कापलेली हिरवळ, तिला लागून असलेली उंचच उंच झाडं, आणि डाव्या बाजूला वाहता रस्ता. त्यामुळे विलासचं तोंड डावीकडे तर मी उजवीकडे बघत. वाटेत दोन ठिकाणी बाक आहेत पण ते बसण्यासाठी नसून बसने जाणा-या लोकांसाठी आहेत. या बाकांची गंमत म्हणजे, त्यातल्या काही बाकावर लिहिलेलं असतं, "A seat in the past". आणि त्या बाकावर चित्रं रंगवलेली असतात जुन्या काळातली. एका बाकावर आहे, "J. W. Shaw Grocery Shop 1890" दुस-या एका बाकावर लिहिलय, "Red Star Laundry. 1860" तिस-याएका बाकावर लिहिलय, "A cable car in the street". वाचता वाचता माझ्याभोवतीची ती मोठी ऑफ़िसेस, त्या भरधाव धावणा-या गाड्या नाहिशाच झाल्या आणि जुन्या इंग्रजी सिनेमात बघितलेले स्त्री - पुरुष कोणी चालत, कोणी कोणी घोडागाडीतून तर कोणी केबलकारमधून जाताना दिसायला लागले. २०० वर्षांपूर्वी इथेही हिरवीगार शेतं असतील, स्वस्थ शांत ग्रामीण आयुष्य माणसं जगत असतील हे जाणवून वेगळंच वाटायला लागलं, म्हणजे आपल्या सेझ सारखं इथेही शहरीकरण होऊन ती माणसं नुकसानभरपाई घेऊन यंत्रांच्या घरघराटात हरवली हे जाणवून मन उदास झालं. मला तर त्या न बघितलेल्या जे. डब्लू शॉ चे वंशज कुठे काय करत असतील असं वाटून मन त्यांच्यासाठी क्षणभर हळवंही झालं, पण जुनं गेलं तरी जे काही नवं झालय, ते मनाला सुखवणारं गारवा देणारें आहे, हे नक्कीच. म्हणजे आपण "a m c" मॉलच्या बाजूने गेलो आणि तिथल्या पुलावर उभे राहिलो तर खालच्या फ़्री वे वरून जाणा-या गाड्यांचा वेग आपल्याच अंगातून निघाला आहे की काय असं वाटतं, पण त्याचबरोबर रस्त्याच्या दुभाजकावर लावलेले फ़ुलांचे ताटवे मनाला आल्हादही देतात.
आम्ही चालत जातो तो रस्ता वुल्फ़ रोड आणि त्याच्या पुढच्या चौकात एक ली नावाचा डेंटिस्ट आहे. मी त्याच्या घरावर सोन्याची कौलं आहेत का ते रोज बघत असते. तिथून आम्ही परत उजवीकडे वळतो. आता रस्त्याच्या दुस-या बाजूला घरं आहेत, त्यांच्या आवारात फ़ुलझाडं आहेत. त्याला कुंपण नाही पण फ़ुलं सुखरुप असतात. एका घराबाहेरचा भलामोठा निवडुंग पूर्णपणे लाल फ़ुलांनी फ़ुललेला आहे. एका घराबाहेर वेगवेगळ्या गुलाबांची दाटी आहे. एका घराबाहेर माशाच्या आकाराचा कापडाचा, निळ्या गुलाबी रंगाचा आकाशदिवा टांगलेला आहे. एका घराबाहेर बोनसाय केल्यासारखी झाडं छाटली आहेत तर दुस-या घराबाहेर तसलीच झाडं भलं मोठं जात्याचं पाळं, अर्थात हिरवंगार, ठेवल्यासारखी छाटणी केली आहे. त्या रस्त्यावरच्या चौकात परत उजवीकडे वळलं की आम्ही मेमरी हॉस्पिटलच्या रस्त्याला लागतो. हा रस्ताही सुरेख आहे. तिथे चिंचेच्या आकाराची पानं आहेत आणि त्यांच्या टोकाला दवबिंदू लटकावेत तसे गोल आहेत. तिथून टोकाला जाऊन आम्ही परत फ़िरतो.
या सगळ्या फ़िरण्यात आम्हाला फ़ूटपाथवर एक भलीमोठी म्हातारी आखूड स्कर्टमध्ये, एक सडपातळ मुलगा अर्धी चड्डी आणि हातकाप्या (स्लीव्हलेस) बनियनमध्ये आणि एक ठीकठाक माणूस त्याच्या कुत्र्यासह दिसतो. शिवाय एक काळा कावळा आणि दोन तितक्याच काळ्या खारीपण दिसतात या रस्त्यावर. नाहीतर हम और हमारी तनहाई, (जी आम्ही एन्जॉय करतो) अक्सर बातें करते है, तुम सब होते तो हम ऐसा करते, वैसा करते!

No comments: