Thursday, October 1, 2009

मल्हारवारी

अमेरिकन पोर्टरच्यामागून आम्ही एका प्रचंड दाराकडे आलो, सामानाची ट्रॉली पुढे झाली, दार उघडलं, वा-याचा एक शहारा उठवणारा झोत अंगावर आला. दारातून पाऊल पुढे टाकलं आणि आता लिहितानाही आठवत नाही की मी धावत पुढे गेले, की तो पुढे धावला, पण तरळत्या पाण्याच्या पडद्यापुढे त्याचा हसरा, जग जिंकल्याचा आनंद झाल्यासारखा चेहरा होता आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. तसाच तो बाबांच्याही मिठीत क्षणभर विसावला आणि सामान हातात घेऊन पुढे चालू लागला, त्याच्या मागून आम्ही, त्या प्रचंडपणाने भांबावलेले.
अमेरिकेला जाणं हे आम्हा दोघांनाही किंचितही आकर्षक वाटत नव्हतं. त्यासाठी लोक आम्हाला अगदी मूर्खात नाही तरी वेड्यात काढत होते, पण २२-२४ तास प्रवास करून तिथे जावं असं आम्हा दोघांनाही वाटत नव्हतं. यात विलासला एवढा वेळ बसायचं, ते आपल्याला झेपेल की नाही ही चिंता असायची तर बंद जागेत बसणं म्हणजे साक्षात मरणाला आमंत्रण ही माझी तीव्र भावना. म्हणून तर निकेत लास वेगसला असतानाही आम्ही त्याची विनवणी धुडकावून लावलेली होती. पण आता गोष्ट वेगळी होती. आता आम्ही बढती मिळून आजी - आजोबा होणार होतो आणि आताच्या अलिखित नियमाप्रमाणे आम्हाला जावं लागणार होतं. आणि तिथेच तर वांदे होते. आपण बाबा होणार हे कळल्यापासूनच निकेतने माझा मेंदू धुवायला सुरवात केली होती. त्याचं बोलणं संपेपर्यंत मला पटत होतं की बंद खोलीत काहीही होत नाही, श्वास नेहमीसारखाच करता येतो, पण त्यासाठी सिनेमाला जा, ए सी गाडीतून प्रवास कर हे उपाय करून बघायची वेळ आली की माझं भिजलं मांजर व्हायचं. प्रथम प्रथम हसण्यावारी नेणारा नवराही मनातून हबकला. परस्पर फोनवर लेकाला म्हणायला लागला, "अरे, कराल का तुम्ही मेनेज? अवघड वाटतय बुवा." पण आमची मुलं हार मारणारी नाहीतच. त्यांनी हळूहळू खिंड लढवायला सुरवात केली. कारण मदतीपेक्षा आपण इथे कसे राहतो, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आईवडिलांबरोबर शेअर करायची त्यांची आस होती. आणि ती त्याच्या बहिणीला कळत होती. आम्हाला कळत असून काय उपयोग? कारण वळत नव्हती. अखेर सायकोलोजिस्टसबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलेले व्यायाम करून, औषधं घेऊन मन तर तयार झालं आणि १० सप्टेंबरची तिकिटं हातात पडली. दरम्यानच्या काळात येणार हे माहीतच असलेला आमचा नातू आला, सगळ्यांची गडबड उडवत आधीच आणि मग जाण्याचे खरे वेध लागले.
मुंबई विमानतळावर जाण्यापूर्वी कितीही कान बंद करून ऐकलं तरी विमानप्रवासाबद्दल भरपूर मौलिक माहिती गोळा झाली होती त्यामुळे विमानतळावर पोचल्यावर त्यातल्या बहुतेक सगळ्या सूचना आम्ही विसरलो होतो आणि हम करेसो कायदा या न्यायाने सामान चेक इन करा म्हणजे तुम्हाला ओझं वहायला नको हे कानाआड टाकून नवरा भरायचे फॉर्म आणायला गेला आणि मी सामानाच्या डोंगराआड उभी राहून "अरे, किती ही गोरी माणसे एकदम पहायला मिळतात बरे" म्हणत नव-याची वाट बघत एका कोप-यात उभी. पण नंतर ३५ वर्षांच्या संसाराच्या शहाणपणाच्या जोरावर तगून आम्ही विमानात जायच्या रांगेत उभे राहिलो. सिक्युरिटी चेकनंतर चालतोय, चालतोय. आता जिना येणार त्यावर चढून आम्ही विमानात प्रवेश करणार, आणि आमच्या तरुणपणाच्या काळातल्यासारखी हवाईसुंदरी आम्हाला अभिवादन करून आमची सीट दाखवणार असा आम्ही विचार करत असतानाच आम्ही चालत असलेली बोळकांडी संपली तिथे दारात दोन छानशा प-या आणि एक भलामोठा परा हसून आमचं स्वागत करत असलेले दिसले. हा धक्का एवढा मोठा होता की आपण कोरियन विमानात पोचलो, हे समजलंच नाही. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी विमान किती मोठं आहे हे पाहून घेतलं. म्हणजे अगदी यष्टी नाही, तेव्हा काळजी नको. अर्थात मन:शांन्तीच्या गोळ्या मला चांगलच धीट बनवत होत्याच. तेवढ्यात नव-याने सामान जागेवर ठेवलं आणि आम्ही स्थानापन्न झालो. मग मात्र आम्ही सगळी मोठेपणाची जोखडं झुगारून दिली, नेहमी प्रवास करणारे आपल्याला हसतील की काय हा विचारही मुंबई विमानतळावरच सोडून दिला आणि बाहेर बघायला लागलो, लहान मुलांच्या निरागसतेने! कितीतरी विमानं उभी होती आणि आम्ही अगदी हे वडिंग्याला, हे कवठेमहांकाळला, हे कुडित्र्याला या थाटात ते कुठल्या देशाचं आहे ते न्याहाळत होतो..
पण आम्हाला फार वेळ मिळालाच नाही, कारण एक गोरी गोरी काळ्याभोर डोळ्याची परी आमच्याजवळ झुकून अगम्य इंग्रजीत आम्हाला पट्टा बांधायला सांगत होती. त्या सगळ्याच पोरींचं बोलणं म्हणजे कारवारी हेलात एखाद्या प्रेमळ म्हातारीने "पट्टा बांधतेस का बाळा?" विचारावं असं मधाळ वाटत होतं. त्यांचा चटपटीतपणा, अदबीने वाकून बोलण्याची पध्दत (भले ती कमावलेली का असेना) आणि हसरा चेहरा मनाला सुखवत होता. झगमगणारी मुंबई सोडून आम्ही अंतराळात झेप घेतली, आणि खाण्या - जेवण्याचा तोबरा सुरु झाला. निघतानाच वजनाचा विचार करायचा नाही हा आम्हा दोघात ठराव झालेला असल्याने समोर येईल ते परब्रह्म उदरात न्यायचं काम आम्ही इमाने एतबारे केलं, विमानप्रवासात काहीच करायचं नसल्याने आणि सक्तीची झोप घ्यायची असल्याने पडदे सरकवून डोळे मिटण्याखेरीज काहीच काम नव्हतं. पण विमानप्रवासात मुरलेल्या मुरब्बींनी सांगितलेलं ऐनवेळेला विसरले असतेतरमात्र माझ्यासारखी करंटी मीच म्हणावं लागलं असतं. विमानात आम्ही घड्याळाची वेळ बदलली नव्हती ती याच कारणाने. सकाळ होतेय हे जाणवताच मी वर्ग चालू असताना बाईंच्या नकळत लिमलेटची गोळी तोंडात टाकावी त्याच खोडकरपणाने पडदा हळूच सरकवला. (हळूच म्हणण्याचं कारण म्हणजे, जरा आत उजेड आला की त्या परीचं खाष्ट हेडमास्तरीणीत रुपांतर व्हायचं. त्यातल्या त्यात जरबेचा आवाज काढायचा ती प्रयत्न करायची जो प्रत्यक्षात तितकाच मधाळ असायचा, "दोन्त ओपन, अदर पिपल आर स्लीपिंग"). आम्ही उंचावर होतो आणि खाली आकाशात लाल रंगाची उधळण चाललेली होती, ती केवळ दैवी होती, केवळ दैवी. त्यानंतर मला तो चाळाच लागला, हळूच पडदा सरकवला की आपण पुढे आणि खाली आपल्यामागून कापूस पिंजून ढीग करावे तसे ढग पांढरेशुभ्र, तेजस्वी. कुठे लाबलचक पट्टा. कुठे वेगवेगळे आकार. डोळ्याचं पारणं फिटावं आणि आपण आपल्याला भाग्यवान समजावं असेच ते देखावे होते.
सेऊलपासून विमानप्रवासाला आम्ही सरावल्यासारखे झालो होतो आणि पुढे १२ तास काढायचे हे मनाला पटवत होतो. पण हे विमान पहिल्यापेक्षा मोठं असल्याने प्याशिंजरंही जादा होती, आणि कोरियन असली तरी सगळीकडे स्वभाव सारखेच असल्याने त्यांचं निरिक्षण करतानाही मजा येत होती. त्यामुळे विमान सॅनफ्रॅन्सिस्कोला कधी पोचलं ते जाणवलंही नाही.
आता सामान घेतलं की झालं असा विचार करत पट्ट्याजवळ आलो तर तिथे ही गर्दी. शोधतोय, शोधतोय, दोनदा पट्टा समोरून गेला तरीही लाल पिवळ्या रिबिनींची खूण कुठे दिसेना. गेल्या वाटतं आपल्याही ब्यागा अमिताभसारख्या. आता कुठल्या चितळ्यांच्या बाकरवड्या आणि कुठली आंबा बर्फी असा विचार करत असताताच तिथेच दुसरा पट्टा असल्याची मौलिक माहिती कळली आणि आमच्या ब्यागाही भूमीवर आलेल्या दिसल्या. आपली आंबलेली कंबर आणखी ओझं सहन करू शकणार नाही याची खात्री असल्याने नव-याने पोर्टर शोधला आणि आम्ही विमानतळाबाहेर आलो. सगळी सूत्रं मुलाने आपल्या हाती घेतली, सामान गाडीत टाकलं आणि सारथ्य करता करता तो वडिलांना त्यांच्या आवडीची माहिती देऊ लागला. म्हणजे रस्त्यांची नावं समोरून चाललेल्या गाड्यांचे मेक. पण वडलांनी एक अनपेक्षित प्रश्न विचारून त्याची मतीच गुंग केली. "अरे, झोपलेला असेल की जागा असेल रे मल्हार यावेळी?".
त्याच विचारात असलेल्या माझ्या मनात आलं, "पुरुषही बदलतो तर आजोबा झाल्यावर!" आम्हा दोघांकडे हसून एक कटाक्ष टाकून मुलाने गाडी चालवण्याकडे लक्ष दिलं कारण त्यालाही आपल्या मुलाला आपले आई वडील दाखवण्याची तितकीच ओढ लागली होती!

4 comments:

Shubhada said...

dear mami, agadi tumchya barobar majha pravaas zala . majhya pahilya pravasachi pan aathvan zali aani niket aani tumchi bhet poornapane anubhavli. aata malharchya bhetichi vaat baghte.
shubhada

simple.com said...
This comment has been removed by the author.
simple.com said...

Hello Kaku ! Tumchya masta miskhil shailitun tumchi Malharvaari chi suruvaat zakas ekdum.. ata tumchya chashmyatun america pahayche utsukata vadhli aahe..

Abhijit Bathe said...

परत एकदा कमेंट.
अनिल अवचट जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत आले तेव्हा यायच्या आधी त्यांनी अमेरिकेत असलेल्या बऱ्याच मित्रांशी गप्पा वगैरे मारुन माहिती जमवली होती. सगळ्या मित्रांनी वेगवेगळी आणि बरीच माहिती दिली, पण एक सल्ला मात्र आवर्जुन दिला कि - बाबा रे, काहीही कर पण अमेरिकेवर पुस्तक लिहु नको. आणि नाही लिहिणार नाही लिहिणार करत त्यांनी शेवटी ’अमेरिका’ नावाचं पुस्तक लिहिलंच. तसंच येणारे पालक अमेरिकेबद्दल लिहित असतातंच पण माझ्या आई बाबांना आमच्या बरोबर राहुन काय (काय) वाटलं असेल याची बरीच कल्पना तुमचे ’अमेरिका’ लेख वाचुन येतिए.

लगे रहो!!