Saturday, October 3, 2009

अजि म्या झाले आजी आज !

गाडी निकेतच्या घराच्या जवळ जवळ लागली तसं तसं मन आणखी आणखी उचंबळायला लागलं. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा तसं मला फ़क्त सावळे सुंदर रुप मनोहर दिसायला लागलं. मी आजी होऊनही आता दोन अडीच महिने झाले होते, पण अजून ते " फील" आललं नव्हतं. म्हणजे मी कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे सगळ्या गोष्टी करत होते, म्हणजे स्वेटर विणत होते, अंगडी टोपडी शिवत होते, बाळलेण्याचे प्रकार निरखत होते, पण मनात समाधान नव्हतं. मनातली हुरहूर कसली होती ते गाडीतून उतरून निकेतच्या घराच्या दारात उभी राहिल्यानंतर कळलं. आतापर्यंत सगुण निर्गुण भक्तीच्या वादात मी बहुधा निर्गुण भक्तीच्या बाजूने होते, पण या वेळी मात्र विठ्ठलाला उराउरी भेटायचा ध्यास वारकरी का घेतात ते कळलं. दार उघडलं आणि "अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. त्या चिमुकल्या गाठोड्याला उराशी घट्ट कवटाळावं अशी सर्वांगातून उर्मी सळसळत गेली. पण......
एक तर २४ तासांचा प्रवास, त्यात आम्ही स्वाइन फ़्लू च्या आगारातून ( पुण्यपत्तन) आलेलो आणि भरीस भर म्हणजे माझ्याशेजारी बसलेली कोरियन मुलगी सगळ्या प्रवासभर सीटवर मान टेकून झोपली होती ती फक्त टिश्यू पेपर नाकाला लावून त्यांचा बोळा बाजूला टाकण्यापुरतीच उठत होती. म्हणजे तिथोनही सर्दीचा प्रसाद मिळण्याची शक्यता होतीच. त्यामुळे पंढरपूरला जावून कळसाचं दर्शन घेऊन परतणा-या वारक-यासारखी मी आंघोळीसाठी बाथरुमकडे वळले.
बस्स! आता मी खरी आजी झाले. उराशी उबदार मुटकुळं, त्याचं चिमुकलं डोकं आपल्या खांद्याजवळ आणि आपले डोळे आनंदाने मिटलेले. हाच तो क्षण, ज्यासाठी आपण धावत आलो. आमच्या शेजारच्या निमोणकरकाकूंच्या नातवाला भेटायला गेले असता त्या नातवाला कवटाळून अशाच उद्गारल्या होत्या, "आईपेक्षा आजी होणं किती सुखाचं असतं नाही? आई असताना ज्या सुखाला मुकलो त्या सुखाची आता भरपाई करता येते." तेव्हा वाटलं, अगदी त्यांच्या चेह-यावरचे कृतार्थतेचे भाव बघूनही असं वाटलं, की आई होण्याच्या सुखाची कशाची तुलना कशी होऊ शकेल? पण आंघोळ करून आल्यावर मल्हारला छातीशी कवटाळल्यावर पटलं, आजी या हाकेत जगातला सगळ्यात मोठा आनंद दडलेला आहे.

2 comments:

भानस said...

अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!
उराशी उबदार मुटकुळं, त्याचं चिमुकलं डोकं आपल्या खांद्याजवळ आणि आपले डोळे आनंदाने मिटलेले. हाच तो क्षण..........इतका निखळं व निर्व्याज सुखाचा ठेवा दुसरा असूच शकत नाही.आई झाल्यावर वेळेअभावी,जबाबदा~यांत अडकून ज्या सुखाला मुकलो त्याची काहीशी भरपाई नक्कीच होऊ शकेल.मल्हारला अनेक आशिर्वाद.

Shubhada said...

:)mastaaa vatla............