Tuesday, April 10, 2007

गोष्टी आठवणीतल्या....३

१ली ते ४थी या चार वर्गाना मिळून दोन शिक्षक होते. कुलकर्णीबाई विधवा होत्या. नऊवारी लुगडं, पांघरून घेतलेला पदर. कपाळावर हिरवं गोंदण.दुसरे तारदाळकरगुरुजी. धोतर, कोट टोपी या वेषातले. ते मुख्याध्यापक असल्याने ४थीला शिकवत. आम्ही ४थीत गेल्यानंतर पहि्ल्याच दिवशी त्यांनी आम्हाला बजावलं होतं, 'मला गुरुजी म्हणायचं. सर म्हणाला तर थोबाड फ़ोडीन. ' आमच्या काळी ' समजावून ' देण्याची हीच पध्दत लोकमान्य होती. पण कधी कधी खुशीत असले, आणि कोणी ' स---र ' अशी हाक मारली की हसत हसत म्हणत, ' सर, सर, झाडावर, घराच्या कोलावर ".[ या ओळी असलेला खारुताईचा धडा आम्हाला १लीत होता.]
४थीत गेल्यावर शाईची दोत आणि टाक या प्रकाराची एक भर आमच्या दप्तरात पडली.त्यातली शाईची दोत हातात धरून न्यावी लागे. शिवाय शाईचा ठिपका पडला तर टिपण्यासाठी गुलाबी रंगाचा टिपकागद बरोबर बाळगावा लागे. माझे वडिल लिहून झालं की त्यावर समुद्राकाठची रेती त्यावर भुरभुरत आणि कागद झटकत. ती रेती वर्गात नेऊन तशी झटकायची हे माझं एक (अधुरं) स्वप्न होतं तेव्हाचं..लिहिताना टाक शाईत योग्य प्रमाणात बुडवायचा, कागदावर योग्य प्रंमाणात दाब देऊन लिहायच या प्रकारात उजव्या हाताची पाची बोटं शाईने बरबटून निघत. ती मात्र डोक्यावरून हात फ़िरवून केसांना पुसायची असत. त्यामुळे पेपर लिहिताना प्रत्येकीचा हात थोड्या थोड्या वेळाने डोक्याकडे . यात शाईचा भाग किती आणि नशिबाला दोष देण्यासाठी किती ते निकालाच्या दिवशी कळे. परिक्षेचे पेपरही घरीच शिवलेले असत.दोन आखीव ताव अर्धे दुमडून मधोमध एक टाका घालून शिवलेले असत., आणि खालचा भाग ब्लेडने किंवा पेपरकटरने कापलेला असे. पहिल्या पानाच्या उजव्या कोप‍य़ात वडिल भावंडाकडून 'सुवाच्य' अक्षरात नाव घालून घेतलं की परिक्षेची तयारी पूर्ण होत असे. मला मात्र एका ठिकाणी बसून पेपर सोडवणे ही शिक्षाच वाटे. शक्य तितक्या लवकर त्या बिलामतीतून सुटका करून घ्यायची माझी इच्छा असे. मला आठवतं एकदा येत असूनसुध्दा कंटाळा आला या सबबीवर मी पेपर टाकून घरी आले होते, तेव्हा भडकलेल्या भावाला समजावताना मला पोटाशी धरून आई हसत म्हणाली होती," जाऊ दे रे, मार्कांचं काय एवढं ? तिला समजलय ना ? मग झालं तर.! " धन्य ती माता! अशी आई सगळ्यांना मिळो. पण आज लक्षात येतय की त्यामुळेच मी साहित्य, कला, खेळ या सर्वात रुची घेऊ शकले. त्या वेळचे संस्कार आजही उमलून येतात भुईचाफ़्यासारखे! अंतरंग भेदून. अंतरंगानजिकच, अंतरंग सुगंधित करणारे!

Monday, April 9, 2007

गोष्टी आठवणीतल्या....२

एम. एल. जी. हायस्कूलच्या परिसरातच एम. एल. जी. ची प्राथमिक शाळा होती. माझं नाव घालायला बरोबर कोण आलं होतं ते आठवत नाही, पण आठवतं ते हे की, हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेच्या ओफ़िसच्या बाहेरचा जिना उतरून मी आणि माझ्याबरोबरच प्रवेश घेतलेली सुनिती कामत हातात हात घालून प्राथ मिक शाळेकडे पळत सुटलो होतो. वर्गातही आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो. नव्या को‍या पुस्तकावर दोन्ही बाजूने भाकरी थापल्यासारखे हात वाजवत मी तिला काहीतरी सांगण्यात इतकी गुंग झाले होते की, वर्ग सुरु झाल्याची घंटा कधी झाली आणि तारदाळकर गुरुजी वर्गात कधी आले ते मला समजलच नाही. आणि कळलं तेव्हा त्यांची पाच बोटं माझ्या गालावर उमटली होती आणि वर्गात सन्नाटा की काय तो पसरला होता. आपल्या मालकीचं 'गुरु ' समजण्यासाठी गुराखी त्याच्या पाठीवर डाग देतात ना, तसा तो छाप माझ्या गालावर बसला आणि माझा शाळेतला प्रवेश ख‍य़ा अर्थाने नोंदवला गेला.त्या काळी मुलांना बसण्यासाठी गुळगुळीत पोलिश केलेले पाटवजा फ़ळ्या असत. त्यावर बसून दप्तर फ़ळीखाली सरकवून द्यायचं. दप्तर म्हणजे तरी काय, तर एक पुस्तक मराठीचं, एक ' गणोबाच' एक गोष्टीरुप इतिहासाचं आणि पाटी. पाटीचे प्रकार तरी किती!दगडी, पत्र्याची, जोडपाटी, मण्यांची. त्यातले शेवटचे दोन प्रकार असणं हे बालजगतातलं फ़ारच श्रीमंती थाटाचं आणि असुयेचं प्रकरण असायचं. पाटीवर लिहिण्यासाठी दुधी पेन्सिल आणि पुसण्यासाठी फ़डक्याचा एक ओला बोळा आणि एक कोरडा बोळा. वर्गात पाटीची स्वच्छता दोन प्रकारानी व्हायची. पहिली डायरेक्ट मेथड. लाव पाटीला जीभ आणि ठेव विद्यादेवी सरस्व तीला जिभेवर. पण दोन चार वेळा शिक्षकांनी ' हस्तक्षेप ' केल्यानंतर मुली आपसुक दुस‍‍या प्रकाराकडे वळत.या प्रकारात बोळा इतका भिजवायचा की आपल्याबरोबर आणखीही चार पाट्या भिजल्या पाहिजेत. मग त्या वाळवण्यासाठी ' मंत्रजागर ' सुरु. " कावळ्या, कावळ्या पाणी घाल, चिमणी, चिमणी वारा घाल."आता कावळा सतत पाणी घालत राहिला [ आणि तो ते आणणार कुठून ?]तर चिमणीने पंखाने कितीही वारा घातला तरी पाटी वाळणार कशी, हा विचार तेव्हा आमच्या चिमुकल्या डोक्यात येत नसे. त्यामुळे पाटी लवकर वाळावी म्हणून आमचा आवाज इतका वाढायचा की, ' पाट्या काढा ' असं सांगून शेजारच्या वर्गातली गणितं तपासायला गेलेल्या बाई हातात पट्टी घेऊन धावत आल्याच पाहिजेत. मग त्यांच्या पट्टीच्या दांडपट्ट्यात 'ओल्या'बरोबर 'सुके'ही जळायचं ती गोष्ट वेगळी. ही झाली पाटीची दैनंदिन स्वच्छता.साप्ताहिक स्वच्छता म्हणजे दिवाळीच रासन्हाणच ! प्रथम आईकडून कोळशाचा मोठ्ठा तुकडा मागून घ्यायचा. आणि तांब्याभर पाणी. मग फ़्रोकचा घेर गच्च आवळून स्वत: पाटावर नीट बसायचं आणि फ़रशीवर पाटी. थेंब थेंब पाणी पाटीवर टाकत सहाणेवर गंधाचं खोड घासावं तसा कोळसा पाटीवर घासत रहायचं. मग पाटी तिरकी करून वाळत ठेवायची. आणि मग काळी पाटी आणि त्याहून काळे हात धुण्यासाठी बंबभर पाण्याचा स त्या ना श ! एवढ्यावर कुठलं भागायला ? पाटीची लाकडी चोकट उजळवण्यासाठी ब्लेडचं पान घेऊन ते उलट सुलट फ़िरवून असं घासायचं की त्याची परिणती बोट कापण्यात आणि आईच्या गडगडाटासह बोटाला चिंधी बाम्धण्यात व्हायची .
draft

Wednesday, April 4, 2007

गोष्टी आठवणीतल्या

काही काही लोकांना आपल्या खूप लहानपणीची आठवण असते.अगदी दीड दोन वर्षापासूनची. पण मला मात्र वयाची पहिली ५ वर्षं आठवत नाहीत.आठवते ती खासबागेतली माझी पहिली शाळा. राधाकृष्णाच्या देवळाजवळची.घराच्या अगदी जवळ. खर तर सगळ्यात जवळची म्हणजे प्रायव्हेट हायस्कूल. कारण या शाळेच्या मागच्या गल्लीत अगदी शेवटी आमचं घर होतं. पण ती मुलांची शाळा असल्यामुळे तिचा उपयोग नव्हता. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल तशी लांब(?) होती ५ वर्षाच्या मुलीच्या मानाने. म्हणजे आमची पूर्ण गल्ली पार करून उजवीकडे वळलं की प्रायव्हेट हायस्कूल. तिथून पुढे गेलं की डाव्या हाताला पॅलेस थिएटर. त्याला डावीकडे ठेवून वळलं की कुस्त्यांचं मैदान. या मैदानावरून डावीकडून मंगळवार पेठेतून येणारा आडवा रस्ता देवल क्लबकडे जात होता.या रस्त्यावर रहदारी असायची. आता कोल्हापूरसारख्या शहरात ५०-५५ वर्षापूर्वी रहदारी ती काय असणार ? एखादा टांगा, काही सायकली, किंवा क्वचित एखादी मोटार.पण हा "रहदारीचा" रस्ता ओलांडून आपली बाळी शाळेत कशी जाणार ही काळजी माझ्या आईपेक्षा माझ्या वडलांना अधिक वाटत असल्याने त्यांनी माझं नाव जवळच्याच " अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल" मध्ये इयत्ता पहिलीत घातलं. या शाळेच्या बाहेर एक उंबराचं भलं मोठं झाड. दुपारच्या वेळेला टांगा, बैलगाड्या सोडून गाडीवान झाडाखाली शिदोरी सोडत. झाडालगत देऊळ, देवळाच्या मागे लागूनच 'अहिल्यादेवीचं ' पटांगण होतं . पटांगण ओलांडून गेलं की शाळेच्या उम्च दगडी पायर्‍या लागत. त्या चढून गेलं की शाळेचा व्हरांडा. समोर काही वर्ग, डाव्या बाजूला जिना. जिन्याच्या सुरवातीला शाळेची पितळी घंटा. वरही काही वर्ग होते. या शाळेत मी एकच वर्ष होते, त्यामुळे या शाळेच्या आठवणी फ़ारशा नाहीत. मात्र एक सर आठवतात, उंच धिप्पाड. नेहमी झब्बा पाय़जमा या वेषात असत. तेच पी. टी. घेत आणि संगीतही. या दोन विषयांची सांगड ते कशी काय घालत होते असं मला आज वाटतं. तेव्हा मात्र त्यांना बघितल की जाम भीती वाटायची. भला मोठ राक्षस आपल्याला मटकावायला आलाय की काय असं वाटायचं. आणखी भीतीदायक व्यक्ती होत्या ,त्या म्हणजे शाळेच्या मधल्या सुट्टीत पोत्यात चणे कुरमुरे विकणारा गंगाराम आणि आमसोलं विकणारा एक गोरा भुरका म्हातारा. गंगारामची चुरमुर्‍याची भट्टी होती मंगळवार पेठेत. काळ्यारोम गंगारामचा खालचा ओठ भलताच जाड होता आणि लोंबतही असे. त्यामुळे तो कितीही मवाळपणे बोलला तरीही हा आपल्याला मारणार असंच वाटायच मग जरा मोठी झाल्यावर लक्षात आल की गंगाराम अतिशय प्रेमळ आणि माणसांचा भुकेला आहे. दुसरा तो सुकामली विकणारा म्हातारा. फ़णसपोळी, आंब्याची साटं, असा कोकणचा मेवा पोत्यात घालून बिचारा विकत फ़िरायचा.तर तो त्याच पोत्यात मुलींना घालून पळवून नेतो आणि " काय तर करून लांब तिकडं विकून टाकतो म्हणे, पाआआप !" असं मोठ्या मुलींकडून [इयत्ता ४थी] ऐकायला मिळत असल्यामुळे त्याचा आवाज ऐकू आला की माझी पाचावर धारण बसत असे. याच मुली त्याच्याचकडून काहीबाही विकत घ्यायच्या तेव्हा तर त्या मला उच्च कोटीच्या वीरांगनाच वाटायच्या. आईला या माणसाबद्दलची माझी भीती सांगितल्यानम्तर तिनेही फ़ारसं लक्ष दिल नाही, ते बहुधा याच विचाराने असावं की या भीतीने तरी आपली मुलगी शाळा सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर पडायची नाही.त्यामुळे शनिवारच्या सकाळच्या शाळेच्या वेळेत सगळ्या मुली कोवळ्या उन्हात उंबरं गोळा करत असत तरीही आम्ही मात्र लक्ष्मण रेषेच्या आतच !
पण पहिली होता होता आईच्या लक्षात आलं की या शाळेत राहून आपल्या मुलीचा शैक्षणिक आलेख फ़ारसा उंचवण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा तिने मला महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये घालण्याविषयी वडिलांचं मन वळवलं. माझ्या आजूबाजूला राहणार्‍या बहुतेक सगळ्या मुली याच शाळेत जात असल्यामुळे त्या आपल्या मुलीला नीट शाळेत नेतील आणि आणतील असा भरवसाही तिला वाटला असावाआणि दुसरीपासून मला महाराणी लक्ष्मीबाई च्या प्राथ्मिक [ ज्याचा उच्चार मी किती तरी दिवस प्रार्थमिक असा करत होते आणि त्याचा संबंध प्रार्थनेशी जोडत होते] शाळेत दाखल झाले . माझं " पालकत्व " शेजारी राहणार्‍या निडसोशीकरींच्या मीना , बेबी या मुलींनी आणि मागच्या गल्लीतल्या सरिताने आनंदाने पत्करलं नंतर नंतर तर मी सरिताचं ' शेपूट ' म्हणून तिच्या मैत्रिणीत ओळखली जावू लागले.
कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे इथल्या शाळांची नावम राजघराण्यातल्या स्त्री- पुरुषांच्या नावावरून ठेवली गेलेली होती. १९५० च्या सुमाराला कोल्हापुरात अहिल्यादेवी, महाराणी लक्ष्मीबाई, पद्माराजे, जिजामाता, ताराराणी अशा मुलींच्या आणि प्रायव्हेट , विद्यापीठ, राजाराम, आयर्विन अशा मुलांच्या नावाजलेल्या शाला होत्या. म. ल. ग. हायस्कूलाअमच्या घरापासून फ़ार तर अर्ध्या फ़र्लांगावर होती. शाला राजवाड्याच्या परिसरातच असल्यामुळे शाळेभोवती उंचच उंच भिम्त भांधलेली होती. बाम्धकामही राजवाड्याच्या धाटणीचं होतं कदाचित तो पूर्वी राजवाड्याचाच भाग असावा. शाळेचं मागचं फ़ाटक आणि राजाराम कोलेजचं मागचं फ़ाटक एकच होतं. त्या फ़ाटकाजवळ प्राथमिक शाळा होती. २री ते ४थी या काळात त्या फ़ाटकाकडे पडणारी बुचाची फ़ुलं वेचण्यासाठी आमच्यात अहमहमिका लागायची,पण पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या फ़ाटकाकडे जाणं म्हणजे " अव्वा, तिथ जाऊन राजारामची पोरं बघायची असणार" असा शिक्का आपल्यावर पडेल ही धास्ती असल्याने ते " निषिध्द क्षेत्र " मानलं जाऊ लागलं. तशीही आमची ' मास पी. टी. ' पहाण्यासाठी ' राजाराम' ची काही टवाळ पोरं तिथे उभी असायची, त्यामुळे मोठ्या मुलीम्च्या मनात त्या फ़ाटकाबद्दल थोडी हुरहुरयुक्त उत्सुकता असायची.काही धीट मुली आमच्या शाळेच्या खडूस प्यून ' बक्षू' ची नजर चुकवून तिथे एक फ़ेरी मारून येत, पन्ण अशा मुली बाकीच्या पापभिरू मुलींच्या ब्लेकलिस्टवर असत. पण ती नंतरची गोष्ट. आधी म. ल. ग. हायस्कूलच्या प्राथमिक शाळेविषयी.

Monday, March 19, 2007

गुढीपाडवा

आज मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस ! रोजच्यासारखाच उगवलेला,पण डोळे उघडल्याबरोबर पहिली जाणीव झाली की आज पाडवा.बाहेर चांगलच उजाडलेलं होतं. ताडकन पांघरूण बाजूला करून उठले तर दुस‍र्‍या क्षणी जाणवलं की गडबड करण्याची काहीच गरज नाही. आज सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. परत पांघरूण अंगावर ओढून डोळे मिटले, पण पापणीच्या आत ५० वर्षांपूर्वीची गुढी डोलू लागली.
तेव्हा या वेळपावेतो सगळ्यांच्या दारात गुढी उभी राहिलेली असे. काय शामत होती सणाच्या दिवशी "इतक्या " उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्याची ? कारण "ज्ञान, संपत्ती आरोग्य," मिळवण्यासाठी " लवकर निजे आणि (मुख्य म्हणजे) लवकर उठे "हा साधा, सोपा, सरळ मार्गच त्या काळी मोठ्या माणसांना माहीत होता. त्यामुळे लवकर उठल्याखेरीज गत्यंतर नसायचं. एरवी त्याचं फ़ारसं काही वाटायचं नाही, पण गुढीपाडव्याला मात्र एकदम दुपार उजाडली तर काय बहार होईल हाच विचार मनात असायचा. कारण दात धुतले न धुतले तोच आई कडुलिंबाची पानं घेऊन तयारच असायची.प्रथम ती चावायची, मगच गोड खायला मिळायचं ( ही सवलत मी शेंडेफ़ळ असल्यामुळे फ़क्त मलाच असायची, मोठ्या भावंडाना ती पानं गिळावीही लागायची.) त्यामुळे नववर्षाची सुरवात "आई, नको ना ग, पुढच्या वर्षी नकी खाईन ' याच वाक्याने व्हायची हे ठरलेलं.
पण एवढं सोडलं तर मग मात्रं धमाल! दारासमोरचं अंगण , खर तर रस्ताच, झाडणे, शेणसडा घालणे आणि मग रांगोळी. आपली रांगोळी सगळ्यांच्या आधी घालून व्हावी हे त्या दिवसातलं माझं स्वप्न होतं. पण शेजारच्या अक्का पहाटेच उठून रांगोळी घालून तयार असत आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या मुलीही. परत वर मला रांगोळीत मदत करायला तयार ! ओळीत सडा घालून रांगोळीने सजलेली ती अंगणं बघताना आतून कुठून तरी पारिजातकाचं फ़ूल उमलल्यागत सुरेख वाटायचं.मग गुढी उभारायची गडबड . सूर्याच्या कोवळ्या उन्हात रंगीबेरंगी खणांनी नटलेल्या,माळांनी सजलेल्या गुढ्या 'चैत्राच्या' आगमनाची ललकारी देत असायच्या. त्यांचे सोनेरी खण उन्हात झळाळून उठायचे. नवीन कपडे घालून , हातात नवीन वर्खाच्या बांगड्या झळकवत, वेणीचं नव्या रिबिनीच फ़ूल चाचपत मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालून गुढ्या बघताना सकाळ कधी सरायची कळतच नसे.घराघरातून पक्वान्नांचे गोड वास आणि तळणाचे सुगंध यायला लागले की पळत घर गाठायची घाई उडायची.
आज 'तो' पाडवा आठवून वाईट वाटतय का असं मी (डो्ळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली.ते हसून म्हणालं " वाईट काय वाटायचं त्यात ? प्रत्येक वे्ळचे नियम वेगळे, प्रत्येक वे्ळच्या गमती वेगळ्या.तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय ना , मग आवर.मस्त पैकी चहा घे कपात ओतून , बस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्र, कारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून.त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडच आहे ?मग 'ती' गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे ?

Thursday, March 15, 2007

आईपण

कितीही नको म्हटलं तरी तू मला आठवत राहतेस तशी
औषधाच्या दुकानाच्या पायरीशी
औषधाच्याच साइड इफ़ेक्टविषयी बोलत असलेली !
पण खरच का तू औषधाविषयी होतीस बोलत ?
वरवर वाटणारं सुसंगत ?
मीही टाळत होते तुझ्या डोळ्यात पहाणं
घाबरत होते आत डोकावणं !
कारण मग
दिसल्या असत्या मला खोल भोवर्‍यातल्या
खदखदत्या उष्ण चिळकांड्या,
लक्तरं सुन्न मनाची ,
अन विखुरलेल्या घरट्याच्या काड्या !
कदाचित उसनं अवसान टाकून पळतही सुटले असते सैरावैरा,
पण मग बोलू लागलो, तर हललीसशी वाटलीस जरा जरा
ऐकवू लागलीस
नाद रुमझुमत्या पैंजणांचे,
साद चिमण चार्‍याचे!
मी फ़क्त वाट पहात होते
उरी कोंडल्या तुफ़ानाची,
बांध पडल्या उधाणाची !
पण तू उभी, घट्ट पाय रोवून
श्वेत कफ़नात विखुरलेलं आईपण गाडून
थरथरत्या ओठांवर दात दाबून
छिन्न "धर्म"पुत्रासाठी!
केवळ त्याच्याचसाठी !

Wednesday, March 7, 2007

निरोप

तुझ्या भल्या थोरल्या बॅगेवरची पिवळी रिबन बांधून झाली असेल तर जरा थांब,
क्षणभर मागे वळून बघ.
रिबन घट्ट बांधली आहे, हे तुला माहीत आहे,
यादीबरहुकूम सामान भरलय हेही तुला नीटच आठवतय,
उगीच रिबिनीच्या फ़ुलाशी चाळा करत राहू नकोस
तुझ्या अस्वस्थ हालचालींना लगडल्या आहेत
आतापर्यंतच्या आठवणी...
आजूबाजूचा अबोल आश्वस्त वावर...
समंजस उबारा !
ज--रा थांब आणि मागे बघ.
तुझ्या मागेच तर आहे मी
तुला आवडणार्‍या लाडवाच्या, थालीपिठाच्या आणखी कशाकशाच्या पुड्या घेवून,
तुझ्या कपड्याच्या चळती ठेवत---
तुझ्या पुस्तकांचा ढीग सावरत---
उगीचच इकडून तिकडे फ़िरत.
म्हणूनच म्हणते आता हा लपंडाव थांबवूया
ये माझ्या मुला, आपण मोकळे होवूया !
झरणार्‍या आसवात वाहू दे उरात कोंडलेला वियोग
परस्पराविना काढायच्या दिवसांचा बागुलबुवा.
ये माझ्या बाळा पदरा आड झाकून घेऊ दे तुला
मांडीवरच्या जावळाचा स्पर्श साठवून घेऊ दे मला.
मग उद्या डोळ्यात सूर्य साठवून निघशील तू तेजाकडे
त्यावेळीही मी मागे असेन तुझ्या
माझी संध्याकाळ ओंजळीत घेऊन !

Monday, March 5, 2007

कारखाना बंद पडल्यानंतर

फ़ारा दिवसांनी भेटलास मित्रा, तुझं स्वागत असो !
बैस ऐसपैस, जरा पाठ टेक
मधल्या काळातल्या काही कथा, काही व्यथा
ऐकव आणि ऐक !
अर्ध्या वयापर्यंतचे आपले धागे, एकत्रच तर होते विणलेले
गर्द पोपटी चैतन्याने भारलेले, अन सोनेरी तेजाने लखलखलेले !
सरळ सुरळीत चालू राहती वाट ,
तर कदाचित बदललाही असता आयुष्याचा घाट.
भेटलो असतो आपण शुभ्र माथ्याने, थरथरत्या मानेने.
केल्या असत्या गोष्टी , मुला नातवंडांच्या
किंवा आपापल्या निव्रुत्ती समारंभाच्या !
मित्रा, हसलाससा खिन्नसा ?
अजूनही आठवतो कारे तुला
एक एक दिवा मावळता अंधुकसा ?
बंद घरातला एकेक कवडसा?
गाडी घुंगरांच्या किणकिणाटात फ़रपटत जाणाया सावल्या मूकशा ?
बघ, अजूनही हात थरथरतोय तुझा
अरे, खूप वर्षं झाली मित्रा,
जागत्या जागेचा मसणवटा होवून
पांगली बघ माणसं आपली
गोणत्या बोचक्यात आपलं जग भरून
ओठ मिटले उमासे मागे ठेवून !
शांत हो मित्रा,
घामेजलेला हात पूस आणि पाणावलेले डोळेही, जमलं तर.
खरं आहे तुझं
वारा सुटतोच असा कधी कधी धूळ उडवत......
आणि मित्रा, नको येऊस परत
बोलू लागतात रे मूक वेदना,
अद्न्याताच्या अंधाराने भयभीत डोळे
सुकत चाललेल्या जखमा उसवत,
दबल्या आठवणींना चालवत.
जड जातं रे सावरायला
आपलं उखडलेपण रोवायला
अवघड जातं रे मित्रा, खरंच अवघड जातं
शीळ घालतं रानपाखरू परत आत कोंडायला !