Saturday, March 22, 2014

आजोळ

आजोबा आजी हे शब्दच इतके मऊ  आहेत की ते उच्चारताच मन  लहान होऊन जात. आजी आजोबा , मग ते बाबाचे आई वडील असोत किंवा आईचे. ते नातवंडावर माया आणि फक्त मायाच करणार. बाबाचे आईवडील जवळचअसतात. त्यामुळे त्यांचा सहवास रोजचाच असतो. पण आईचे आई वडील दुसरीकडे रहातात त्यामुळे त्यांच्या मनातलं प्रेम कोंडून राहिलेलं असतं त्यामुळे नातवंड आली की ती माया उधळून दिली जाते.कारण लेक कधीतरी माहेरी येणार. थोडेच दिवस राहणार आणि आपल्या घरी परतणार . त्यामुळे आपल्याकडे आहे तितके दिवस मजा करायची हाच बेत आजोळच्या माणसांनी ठरवलेला असतो.त्यामुळे कोणालाही विचारलं तर आम्ही आजोळी कशी मजा केली हे सांगताना १० वर्षांच्या चिंटूपासून ते ६० वर्षांच्या चिंतोपंतां पर्यंत सगळ्यांचे डोळे आजोळच्या आठवणींनी लकाकत  असतात.
माझं आजोळ कोकणात. आम्ही रहात होतो देशावर. ६० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधनं फारशी नव्हती आणि लोकही आतासारखे उठसूट गावाला जात नसत. त्यामुळे मी आजोळी फारतर चार पाचदा गेले असेन.पण आजही तो लाल डब्याचा घाटातला प्रवास आठवला की माझ्या पोटात कससच व्हायला लागतं. गाडी लागलेली असूनही माहेरच्या हवेने सुखावल्याने परकरी पोर झालेली माझी आई वाटेत दिसलेल्या प्रत्येक माणसाशी आसुसून बोलत असायची आणि ती माणसंही "  गो इंदू कधी आयलस? बरा असा मा? "अशी सुरवात करून बोलत रहात. गळून गेलेली ५-६ वर्षांची  मी आईचा ओचा ओढत घरी चलण्याविषयी  लकडा लावत असे.. रस्ता तरी डांबरी नाही, तरी निदान मातीचा असावा. तर तोही रेतीचा. समुद्रकिना-यावरची वाळू. पाय टाकला की भसकन पोटरीपर्यंत पाय  आत जायचा.दुतर्फा माडाची झाडं. पण त्यावेळी ते सौंदर्य वगैरे कळायचं नाही. कधी एकदा घरात जाऊन पाणी पितो असं झालेलं असायचं. घराला फाटक वगैरे नसायचं पण एक भला मोठा  वासा आडवा घातलेला असायचा.तो ओलांडून बरंच चाललं की घराची पडवी यायची. तिथल्या कट्ट्यावर मी बसकण मारायची आणि सूर काढायची. " गे वोगी रव. रडतास कित्याक? " विचारत आजी पुढे यायची. माझा सूर आणखी चढायचा. आणि एक आवाज यायचा, " कोण रडतासा तां?" की माझा आवाज बंद. आई हाताला धरून मागील दारी न्यायची, हात पाय धुवून आम्ही परत बाहेर येईतो त्या दमदार आवाजाने  पुढच्या मांगरातल्या  माणसाला बोलावून माडावर चढवलेलं असायचं.  मी तोंड उघडं ठेवून माकडासारख झाडावर चढणा-या त्या माणसाकडे बघत असायची आणि शहाळ तोंडाला लावून निम्मं पाणी अंगावर सांडत पाणी पीत असायची. तो दमदार आवाजाचा माणूस म्हणजे माझे मामा  आणि माझी आई हसत  काहीतरी बोलत असायचे.
दुस-या दिवसापासून माझी आईला भूणभूण  सुरु व्हायची घरी जाऊ या म्हणून. कारण तिथे खेळायला कोणीच नसायचं. सगळीकडे शांतता. घरं लांब लांब . माणूस दिसायचा नाही. सकाळी आजोबा म्हणजे नाना देवासाठी फुलं काढत, पण त्यांनी कधी ये फुलं काढू या असं म्हटल्याचं आठवत नाही. आजी तिच्या कामात. आंघोळीला पाणी तापव.सकाळच्या न्याहारीला पेजेचे तांदूळ उकडत लाव असं तिचं  काहीबाही चालू असायचं. मामा वेळेवर ( समुद्रकिना-यावर) त्यांची सुरुची बाग होती तिकडे जायचं आणि येताना ' बाजार " ( मासे) आणायचे म्हणून  निघायचे.आई कामाला येणा-या इम्दुकडून पोट चोळून घेत गजली करत असायची. माझं रडकं तोंड बघून आई " जा जरा जनग्याकडे" म्हणून बाहेर हाकलायची.मग माझ्यात उत्साह संचारायचा.
जनाग्या आमच्या घराच्या मागच्या बाजूला जरा दूर रहायची तिच्या झोपडीच्या बाहेर विड्यांच्या पानांचा वेल  असायचा. मी आले की तिच्या प्रेमाला भरतं यायचं. इम्दुचा शहरात रवनारा चेडू म्हणून तिला माझं फारच अप्रूप होतं. त्याचा फायदा घेऊन मीही तिच्याकडून लाड करून घ्यायची. तिच्याकडेच मला जास्त मोकळं वाटायचं . एकदा मला आठवतं मी माझ्या शहरात रहाण्याच्या जोरावर तिच्याकडून गार वाटावं म्हणून कानात तेल घालण्याऐवाजी पाणी घालून घेतलं होतं आणि माझे वडील असंच घालतात म्हणून थाप मारली होती. ती बिचारी " नुको  आवशीक कळला तर रागवात तुका 'असं  कळवळून सांगत होती आणि मी अधिकाधिक खुश होत होते. रात्री कान ठणकायला लागल्यानंतर माझ्याबरोबर तिचाही उध्दार झाला तो वेगळाच.
दुस-यांदा मी गेले तेव्हा सातवीत होते. प्रवास, गाडीचा आणि घरापर्यंतचा जरी तोच असला तरी आजूबाजूला बघण्याची नजर आली होती. त्यामुळे बाजारातून येताना बोंडू, काजी, करवंद यांची रंगसंगती लक्ष वेधून घेत होती. बाळा सोनाराशी बोलत आई थांबली तरी त्यांच्या गप्पा ऐकताना मजा वाटत होती. घरी आल्यावर  दारातच बांधलेल्या गुरांकडे बघावसं वाटत होतं. घरी आल्या आल्या आमच्या इम्दुने "काय हा पसारा" म्हणत घर झाडायला हातात खराटा  घेतल्यावर कामवाल्या इम्दुने " काय गे घरातला काम कमी पडला म्हणून हय आयल्याबरोबर झाडूक लागलास की काय' म्हटल्यावर त्यांची गंमत  कळून हसू आलं होतं. हळू हळू मला माझं आजोळ कळू लागलं होतं.
माझ्या भावंडाच्या आजोळच्या आठवणी वेगळ्या आहेत. ते माझ्यापेक्षा १६-१७ वर्षांनी मोठे असल्यामुळे आणि त्यांचं काही शिक्षण तिथेच झाल्याने शिवाय ते मुलगे असल्याने एकटेही जाऊ शकत असल्याने त्यांना तिथला  सहवास अधिक आहे. ते तिथल्या समुद्रात पोहलेत. घराभोवतालची बाग त्यांनी लाटेने पाणी उपसून शिंपली आहे. ( लाट म्हणजे विहिरीवर एक जाड बांबू आडवा टाकलेला असतो.एका उभ्या वाशाच्या टोकाला काहीलीसारखी  एक मोठी कढई लावलेली असते. आडव्या बांबूवर चालत जाऊन कढईत पाणी भरून वाशाच्या मदतीने पाणी काढतात आणि बागेत सोडतात )  त्यांचं मोठी आई, नानांशी संवाद आहेत(होते ). माझं तसं नव्हतं. मला तिथली भाषा, त्यांचं वागणं अगम्य वाटायचं   पण तिथली झाडं मन मोहून टाकायची..( जरी रात्री दोन माड एकमेकांना घासून आवाज करत तेव्हा त्या कंदिलाच्या उजेडात माझी बोबडी वळत होती तरीही) तिथल्या वातावरणात पानांचा एक वेगळाच वास भरून राहिलेला असायचा. तिथल्या गरम पाण्याला धुराचा एक वेगळाच वास असायचा. तिथल्या गाजेला वेगळीच साद होती. तिथल्या टपो-या मोगा-याला  वेगळाच सुगंध  असायचा.
मी माझ्या मुलांच्या आजोळी जायची तेव्हा त्यांचे मामा मामी, भावंड दारात उभी राहून वाट बघत असायची. आरडा ओरडा दंगा यांनी घर गजबजून जायचं. माझ्या नणदेची मुलं जेव्हा आमच्याकडे यायची तेव्हाही हीच परिस्थिती असायची. आणि आता माझा नातू रोज त्याच्या आजोळी जातो तरीही  परिस्थिती बदललेली नाही. माझ्या नव-याला आवडणारे पदार्थ त्याला खायला घालायला  त्याची त्याच गावात रहाणारी आजी धावत पळत घेऊन यायची. हे काही मी अनुभवलं नाही. पण तरीही मला माझ्या आजोळची वेगळीच ओढ लागते. एखाद्या इंग्लीश सिनेमातल्या हिरोसारखा माझा राकट मामा अबोलपणे माझे विहिरीत पडलेले कपडे काढायला उतरलेला आठवतो. नाना च्या देवघरातल्या फुलांचा सुगंध माझ्या नाकाला जाणवतो. कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेली माझी मोठी आई आठवते. तिच्याबरोबर माडाच्या झावळयांचे हीर काढता काढता गप्पा मारत बिडीचे झुरके मारणारी पणग्या आठवते. माझे लाड पुरवणारी जनग्या आठवते. आजोळ आजोळ म्हणजे तरी काय असतं? एक उबदार पांघरूण असतं. बालपण जपणारं !  

1 comment:

mannab said...

आजोळाविषयी तुम्ही लिहिलेला एकेक शब्द कुणीही मान्य करील असे तुम्ही लिहिले आहे आणि त्यातल्या त्यात तुमचे आजोळ तर कोकणातले म्हणून मला उगीचच आपलेपणा वाटला. तरी एकेक वर्णन खूप आत्मीयतेने लिहिल्यामुळे समोर बघतोय असे वाटते.
मंगेश नाबर