कपड्यांचं कपाट --------गच्च भरलेलं, ओथंबलेलं , फुटून बाहेर येऊ घातलेलं
कपडे लागतात तसेही ----- बाहेरचे, घरातले, हळदीकुंकवाचे आणि " सवाई"चेही
कपडे असतात वेगवेगळे ----धुवून सुरकुत्या काढून घडी घातलेले कॉटनचे
चमकत्या रंगाचे नायालोनचे
परंपरागत खादीचे
केवडा घालून जपलेले रेशमाचेही !
पण मग कधीतरी
कॉटनचे धागे विरतात
नायलोनची चमक ओसरते
खादीचा रंग उडतो
रेशमालाही कसर लागते.
मग मात्र
कॉटनला रफू करावं लागतं
रेशमाला मागून पुढून ऊन द्यावं लागतं
रंग उडल्या खादीचं काय करायचं हा प्रश्न असतोच
नायलोनला मात्र एक गरम इस्त्री पुरते.
नात्यांचंही तसंच असतं
त्यांनाही अधून मधून कोवळ ऊन द्यावं लागतं
विरलेले धागे जोडावे लागतात
कधी कधी ठिगळ लावून झाकावेही लागतात !
कपाटाचं एक बरं असतं ते बापडं लाकडी असतं
मन मात्र आसुसतं
कॉटनच्या उबेसाठी
मऊसूत सोनसळी रेशामासाठी
आणि रंग उडाल्या खादीसाठीही !
No comments:
Post a Comment