Monday, September 1, 2008

कल्पित आणि सत्य

रोज सकाळी ६.२० पर्यंत आम्ही दोघे फ़िरण्यासाठी घराबाहेर पडतो. ठराविक मार्गानेच फिरायला जातो. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खोदकामामुळे रस्ता बदलावा लागला तरच दुसरा रस्ता पकडतो. अन्यथा आखीव रेखीव कॉलनीतून बाहेर पडून पुढच्या महामार्गावरच्या रहदारीवर एक डोळा ठवून चालण्याची कसरत आता आम्हाला जमू आणि आवडूही लागली आहे.
पूर्वी आमच्या कॉलनीच्या एका बाजूला सडक आणि दुस-या बाजूला शेतांचे लहान - मोठे तुकडे पसरलेले होते. आम्ही त्या शेतांमधून जाणा-या रस्त्यावरून फिरणं पसंत करत असू. आमच्याप्रमाणेच त्या रस्त्यावरून फिरण्यासाठी लोक मुद्दामहून यायचे, अगदी महामार्गाच्या पलिकडच्या कॉलनीतूनही. झाडांच्या सळसळत्या फांद्यांखालून जाताना, कधी काळ्याभोर शेतात स-या पाडलेल्या पाहताना, कधी वितभर रोपट्यांमधून खुरपणी - भांगलणी चाललेली पाहतानातर कधी एखाद्या शेतामधून उसाचे तुरे डोलताना पाहताना पन्नास पावलांपलिकडचा कर्णकटू आवाजांचा धबधबा विसरायला होतो म्हणायचे. सकाळच्या रामप्रहरी इथून जाताना त्यांच्या मनाच्या गाभ्यात एक हिरवा चाफा उमलायचा त्याचा सुगंध त्यांना दिवसभर प्रसन्न ठेवायचा.
कालान्तराने शरीराने शहरात पण मनात आपलं " गाव " जपणा-या त्या माणसाचा एकछत्री अंमल संपला आणि वावराच्या प्रत्येक तुकड्याभोवती तारेचं कुंपण आलं. नव्या पिढीचं काळ्या आईत काही आतडं गुंतलं नव्हतं, त्यामुळे पटापट त्या जागांवर वेगवेगळ्या सोसायट्यांचे फलक लागले. कदाचित आमच्या सोसायटीचा जन्मही असाच झाला असावा. काळाची ती गरज होती. त्याप्रमाणे सर्व घडत होतं.
हळूहळू एकेका वावरातली काळीभोर माती सिमेंटखाली झाकली जाऊ लागली. खडी, सिमेंट यांच्या ढिगांनी, कॉंक्रीट मिक्सरच्या घरघराटाने कॉंक्रीटची घमेली एका हातातून दुस-या हातात आणि तिथून पुढे तिस-या चौथ्या, पाचव्या आणि वरवर जाणा-या पुढच्यांच्या हातात जाताना उठणा-या आरोळ्यांनी, होणा-या ओरड्याने , शांत बेटासारखं आपलं अस्तित्व टिकवून धरणारा आमचा भाग मुख्य महामार्गाशी अलगद जोडला गेला. हे होत असताना छोट्या छोट्या बंगल्यांपासून थोडं हात राखून का होईना पण तुरळक झोपड्या उभ्या राहिल्या. अनिवार्यपणे .. या झोपड्यांतले आईवडील समोरच चाललेल्या बांधकामात गुंतलेले असत, देवानं पदरी दिलेलं दान देवाच्याच भरवंशावर सोडून. रोज सकाळी फिरायला जाताना त्या कच्च्याबच्च्यातली कोणी गोधडीत गुरफटून झोपलेली दिसत तर कोणी आपल्या अम्माच्या मागे मागे लुडबुडताना दिसत.
त्या दिवशीही नेहमीची रपेट आटोपून येत असताना रस्त्याच्या कडेला, फूटपाथला टेकून एक स्कूटर दिसली. स्कूटरस्वार एक पाय फूटपाथवर आणि दुसरा रस्त्यावर टेकवून पुढे झुकला होता आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन - चार वर्षांच्या मुलीचे गालगुच्चे घेत होता. मुलीच्या डोक्याचं शिप्तर, अंगावरचा फाटका, मळकट फ्रॉक बघून ती जवळच्या झोपडीतली असणार हे कळत होतं. मुलगी बाळसेदार आणि लोभस होती. एखाद्या ब-या घरात जन्मली असती तर "सोनुली" "छकुली" "साजिरी" म्हणून मिरवली असती.
"चढ पटकन" असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच मुलगी टुणकन उडी मारून स्कूटरवर चढली आणि हँडलवर हात ठेवून उभी राहिली. "हं , दाब " असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच तिने बटन दाबलं आणि पीप, पीप चा आवाज ऐकताच खुषीने मान डोलावत हसली. दुस-या क्षणाला स्कूटरस्वाराने स्कूटरला वेग दिला. सगळा दोन मिनिटांचा मामला. एक नजर त्या जोडीकडे टाकून मी पुढे सरकले. आणि स्कूटरस्वाराचं चित्र मेंदूवर उमटल्याने दचकून थबकले. चुरगळलेले कपडे, टापसलेला चेहरा, त्यावर दाढीमिशांचं जंगल. पाऊल पुढे टाकवेना. डोळ्यापुढे भीषण चित्रं यायला लागली. आणि त्या पोरीचा निष्पाप चेहरा. काहीच न सुचून मी नव-याकडे पाहिलं. त्याचाही चेहरा गंभीर दिसत होता. अरे देवा, म्हणजे मला जे वाटतय तेच त्यालाही वाटातय की काय ? आता मात्र मला धीर धरवेना.
त्या मुलीच्या आईच्या बेपर्वा वागण्याबद्दल तिला झापावं म्हणून मी वळले तर नव-याने हाताला धरून अडवलं आणि लांबवर बोट दाखवून म्हणाला, "तो बघ आला.'' तो स्कूटरस्वार दिसताच डोक्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. सैलावलेल्या मनाने तिकडे पहात राहिले. नवराही तणावरहित आवाजात म्हणाला, "बरं झालं आला ते. मी तेवढ्यात स्कूटरचा नंबरही बघून घेतला होता.'' एवढं होईतो स्कूटर जवळ आली. मुलगी उतरली आणि त्याचवेळी झोपडीच्या बाजूने एक दीडेक वर्षाचं पोर, अंगात फक्त सदरा आणि कमरेला करदोटा अडकवलेलं, मातीच्या ढेकळातून वाट काढत हात उभारून स्कूटरकडे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो स्कूटरस्वार त्याच्याकडे पाहून हसत होता.
" हुश्श! " म्हणून चालायला लागतानाच एक विचार मनात विजेसारखा घुसला. कुठून कुठे आलो आपण. काळ्या मातीबरोबरच बापाचं वात्सल्यही सिमेंटखाली गाडलं आपण !

Thursday, July 10, 2008

मन

कधी कधी मन सैरभैर होतं आणि काहीही करायला नकार देतं. मग अशा वेळी काय करायचं? मनाला मोकळं सोडून द्यायचं. त्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्यायचं. मग ते उधळतं कधी लहानपणाचे धागे उसवत तर कधी एकदम शेवटाचे पाश कवटाळू पहात. मन असं का करतं? कोण जाणे ! आता या क्षणी काहीही करायचं नाही आहे मला ....... असं म्हणता म्हणता मागच्या आठवड्यातला एक समारंभ नजरेसमोर येतोय. कदाचित सांगता सांगता मन जाग्यावर येईल.
कोल्हापूरजवळ सादळेमादळेनजिक "निसर्ग " म्हणून एक ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसवलेलं. हिरव्यागार वनराजीनं वेढलेलं. शुध्द हवेचं. रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं. तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवायला कंटाळला असाल तर मस्तपैकी बैलगाडीत बसून जेवा ना! म्हणजे बैठक घोंगडं अंथरलेली आणि पाठ टेकायला दोन्ही बाजूला बैलगाडीची चाकं टेकवलेली. जेवण मस्तपैकी गावरान ( अर्थात "दोन्ही" प्रकारचं) एका भिंतीवर पितळेचा सगळा जुन्या पध्दतीचा संसार मांडलेला ( जो रात्री पोत्यात भरून ठेवला जातो) आणि भिंतीवर खाली घरकामात रंगलेल्या बायका रंगवलेल्या .. कुणी दळतेय तर कुणी भाकरी थापतेय. रोजच्या कुकरच्या शिटीपासून आणि फ्रिजच्या भाजीपासून दूर घेऊन जाणारं वातावरण ताजतवानं करतं आपल्याला!
आता थोडे कामाचे विचार येऊ लागलेत मनात. पण इतक्यात नाही उठायचं . अजून थोड्या गप्पा. कोल्हापूरपासून २० - २५ मिनिटांच्या अंतरावर काडसिध्देश्वराचा मठ आहे, कण्हेरी या ठिकाणी. या ठिकाणी एक खेडं वसवलं आहे मठाच्या वतीने . पण या खेड्यात माणसं रहात नाहीत, राहतात पुतळे, आणि ते घडवणारे कर्नाटकातले कारागीर, ज्यांनी शिल्पकलेचा ५ वर्षाचा अभ्यास केला आहे. एका वेसवजा कमानीतून २५ रुपयांचं तिकीट काढून तुम्ही आत शिरता आणि छोट्या छोट्या घरांच्या खेड्यातच प्रवेश करता. खेडं खोलगटात वसलेलं आहे आणि त्याची रचना पूर्वीच्या खेड्याप्रमाणे केली आहे. बारा बलुतेदार आपापल्या घरात बसून आपापले व्यवसाय करताहेत आणि हे पुतळे आहेत याची पूर्वकल्पना असूनही आपण दरवेळी एखाद्या पुतळ्याला माणूस समजून फ़सतो. इथे आपल्याला गवंडी, सुतार, लोहार, चांभार, सोनार, तेली बुरुड, कोरवी, नालबंद, न्हावी, कासार, कोळी, शिंपी, तराळ भेटतातच पण वतनदार, वैद्य, पंचांग सांगणारा ब्राह्मण चावडीवर वाद मिटवणारे पंच, कीर्तन करणारे प्रवचनकार इतकंच नव्हे तर जीव तोडून भुंकणारी कुत्रीही भेटतात. पाटावर शेवया कराणा-या बायका दिसतात तशी गोधडी शिवणारी आजीही दिसते. बैलगाडीत बसून सासरी चाललेल्या मुलीचे अश्रू पुसायला आपले हात पुढे होतात आणि त्याच वेळी तिच्या गाडीमागून खांद्यावर सामानाचं गाठोडं घेऊन निघालेला बाप आणि घराच्या अंगणातून निरोप देणारी आई बघून घशाशी आलेला आवंढा परतवायला त्रास होतो. प्रत्येक पुतळा म्हणजे मूर्तीमंत शिल्प. कासारणीकडे बांगड्या भरणारी लेकुरवाळी बाळाला पाजतेय तर बाळ हात लांब करून तिच्या मंगळसूत्राशी खेळतय. तिच्या पायातली साखळी जमिनीवर लोळतेय. दागदागिने, पेहराव, चेहरे घरातलं सामानसुमान, ते ठेवण्याची पद्धत यांचा इतका बारकाईने विचार केला आहे की "वा! सुंदर! अप्रतीम!" याशिवाय आपण काही बोलूच शकत नाही.
खेड्यापासून थोडं लांब शेतं आहेत. मधल्या पायवाटेनं गेलं की सुरवातीला पाणवठा, पुढे कुरणात गाई, म्हशी, बक-या चरत आहेत तर डाव्या बाजूला एका शेतात नांगरणी चालली आहे तर दुस-या शेतात कुळवणी चालली आहे. कुठे शेतकरीदादा मोटेनं शेताला पाणी पाजतोय तर कुठे खळ्यावर मळणी, उफणणीची धामधूम चालली आहे. हे सगळं इतकं खरं आणि वास्तव की म्हशीच्या डोक्यावरच्या कावळ्यासकट आणि पाठीवरच्या पोरासह, शेताच्या बांधावरच्या म्हातारबाबासह प्रत्येक शिल्प आपली दाद घेऊन जातं. म्हणजे पुतळे बघून त्यांना लाला म्हणायचं की गनपा, मालक म्हणायचं की हनम्या हे आपण समजू शकतो. एकदा तरी ह्या खेड्याला भेट द्यावी आणि परत आलं की आपल्या माणसांना घेऊन परत जायचं अशी खूण मनाशी बांधावी असं वाटायला लावलेलं हे खेडं!
मन म्हटल्यावर ल क्षात आलं की खरचं मनाला कधी कधी असं स्वैर सोडून दिल्यावरच ते ताळ्यावर येतं. म्हणून म्हटलं कधी कधी मन तुमचं ऐकेनासं झालं की त्याला खेचू नका, असंच मोकळं सोडून द्या, भटकू दे त्याला हवं तसं थोड्या वेळानं आपोआपच ते परत येतं आपल्या जागी. कानात वारं शिरल्यावर हुंदडून परत आईला ढुसण्या देणा-या वासरागत!

Wednesday, September 5, 2007

बोरिस जोशी

अखेर शेवटी काल बोरिस जोशीच्या नावाआधी कै लागलं. ते लागणार हे गेले २ महिने दिसतच होतं. ह्ळू हळू ज्या पध्द्तीने त्याची तब्येत ढसळत होती ते पाह्ता हे घडणार हे सगळेजणच समजून होते. नाही तर त्या आधी सकाळ संध्याकाळ तो फ़िरायला जायचा. म्हणजे कोंणी ना कोणी त्याला घेऊनच जायचं त्यामुळे त्याचाही नाईलाज व्हायचा. नपेक्षा शक्य तो जागा न सोडावी हा त्याचा मानस असायचा. फ़िरायला जातानाही त्याची शान बघून घ्यावी. हा म्हणजे मागच्या जन्मी कोणी बडा सरकारी अधिकारी असल्यासारखा इकडे तिकडे ढुंकूनही बघणार नाही. आपण मारे" काय बोरुनाना, फ़िरायला चालला वाटतं " असं मोठ्या प्रेमानं विचारावं तर रावसाहेब दुसरीकडेच बघणार." मेल्या, आता घरातली माणसं बाहेर गेली की हाक मार, मग साम्गते तुला" असं चिडून म्हणावं की नाईलाजाने नजर टाकल्यासारखं करणार. पण एकंदरीत अविर्भाव उपकार केल्याचा.
बारा वर्षांपूर्वी एके दिवशी समोरच्या जोशांच्याकडे जेव्हा एक कापसाचं बंडल चार पायावर दुडदुडायला लागलं तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांनीच तिकडे धाव घेतली. विशेषत: शाळकरी निकेतने पळता पळता पुढे जाणार्‍या बाबांकडे जो कटाक्ष टाकला होता तो स्वच्छ वाचता येत होता, " आपण पाळू या म्हटलं तर नको म्हणतात आणि आता कशाला पळताहेत ?" त्या पिलाभोवती भोवती करताना सुरवातीला कितीदातरी शाळेची वेळ टळून जात असे. कारण निकेत , निनादला त्याला अगदी 'पोलिसी कुत्रा ' करायचं असायचं. त्यामुळे त्यांनी त्याच्या " शिक्षणाची "सगळी जबाबदारी शिरावर घेतलेली असायची.बोरुही फ़ेकलेला चेंडू आणणं जोरात पळणं या सगळ्या कसरतीत बालसुलभ उत्साहाने भाग घ्यायचा. कधी कधी तर मोहनने पळवत तळजाईवर नेलं तर चक्क पळत जायचा. [ अर्थात तळजाईवर जाईपर्यंत तो स्कूटरवर बसायचा हे उघडच आहे] कालांतराने बोरिसचं वेळापत्रक संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी शुभदावर आली आणि ती एक ओघाने येणारी गोष्ट झाली ते वेगळं. त्यामुळे त्याला शिस्त लावताना बोरिसने शुभदाचे किती फ़टके खाल्ले असतील ते बोरिसच जाणे ! पण त्या फ़टक्यांचा धाक अखेरपर्यंत होता. शेवटी शेवटी एक गावठी कुत्रं बोरिसच्या दारावरून चालालं होतं , चक्क मान वर करून. किंचित किलकिलं रहिलेल्या दारातून बोरिसनं ते बघितलं, " बूढा हुवा तो क्या हुवा, शेर कभी घास नहीं खाता " या अविर्भावत तो लंगडतच त्याच्यावर चाल करून गेला आणि ' आई ' मारणार म्हणून दारातच दबून उभा राहिला. अर्थात आजारी असल्यामुळे शिक्षा झाली नाही तो भाग वेगळा. आजी आणि दादांनी केवळ नातवंडांच्या प्रेमाखातरच त्या ' राक्षसा'ला घरात घ्यायला परवानगी दिलेली असल्यामुळे आणि बोरिस मोठा होता होता खरोखरच 'राक्षस ' दिसू लागल्यामुळे त्याला फ़िरवणे हा प्रकार त्या दोघाम्नाही शक्य नव्हता. त्यामुळे बोटीवरून सुटीला आला की मोहन, शाळा क्लास यातून वेळ मिळाला की नेहा, निनाद यांना बोरिस फ़िरवून आणायचा. इतर वेळी बोरिस आणि त्याची "आई." मग अशा वेळी मला जोर चढे, " बघा, आधी नाचतात पाळू या म्हणून आणि मग सगळी जबाबदारी पडते घरच्या बाईवर." बोरिस तसा शांत स्वभावाचा किंवा आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे की काय पण कुणाकडे फ़ारसं लक्ष द्यायचा नाही. त्याने नुसती मान वर करून भुंकणार्‍या कुत्र्याकडे बघितलं तरी त्या कुत्र्याची बोलती बंद होवून शेपूट पायात जात असे. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे राळ्यांचा सोनू. बोरिस फ़िरायला निघाला की सोनू भुंकून भुंकून तोंडाला फ़ेस आणत असे. पण बोरिस शांत. पण एकदा त्याच्याही अंगात दीवारमधला अमिताभ संचारला होता की काय न कळे, गळ्यातल्या पट्ट्यासकट राळ्यांच्या घरात शिरून त्याने सोनूला असा लोळवला की अखेरपर्यंत बोरीस दिसला की सोनू आज्ञाधारक दासाच्या भूमिकेत शिरायचा. योगायोग म्हणजे बोरिस जाण्याआधी एक दिवस सोनु ' गेला.'
बोरिस आमच्या दोन्ही घरात विभागला गेला होता. म्हणजे जोशी मंडळी बाहेर गेली की बोरीसचं पालकत्व आमच्याकडे असायचं. घर बंद झालं की अर्ध्या तासातच त्याच्या हाका सुरू होत. आपण जरा दुर्लक्ष केलं की बंद दाराला नखांनी खाजवून तो आपला निषेध व्यक्त करी.दार उघडलं की घराभोवती एक फ़ेरी मारली की त्याचं समाधान होई. मग परत तो आत जायला तयार ! कोणी पाहुणा आला आणि त्याला बाल्कनीत कोंडलं आणि फ़ाटक उघडून पाहुणे बाहेर पडलेले दिसले की हा दार ढकलत रहायचा आत घेण्यासाठी.लहान असताना किरकिर्‍या मुलासारखा बराच वेळ त्याचं भुंकणं चालायचं. मोठा झाल्यावर संध्याकाळच्या सिरियल्स लागल्या की याला ' नरडं ' साफ़ करायची हुक्की येत असे. त्यासाठी त्याने आम्हा सगळ्यांच्या शिव्या खाल्लेल्या होत्या. अपवाद मणजे निनाद आणि विलास. ही दोन माणसं त्याने काहीही केलं तरी यशोदेनं कान्ह्याच्या बाललीलांकडे बघावं तशी बघायची.
हळू हळू आजींच्या राक्षसाचं " बोरु " त कधी रुपांतर झालं ते त्यांनाही कळलं नाही. इतकं की दादू, बबी सारखं हे नातवंडही आजींकडून गुपचुप लाड करून घ्यायला लागलं.आणि आम्हाला तर कितीजणांनी "आपल्या शत्रूपक्षा"त टाकलं असणार.
वय झालं की माणसांसारखीच कुत्र्यांनाही दुखणी होतात हे नवच ज्ञान आम्हाला झालं. शेपटाला झालेली जखम इतकी प्राणघातक असेल असा संशयही येऊ नये इतक्या पटकन बोरुनानांची तब्येत ढासळत गेली. तसंही आपल्या हिशेबाने त्यांचं वय ७५ झालच होतं. आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको असं म्हटल्यासारखं त्याने आपला मुक्काम बेसमेंटमध्ये हलवला. अगदीच आठवण झाली की तो वर घरात जाई.पण अखेर अर्ध्या अंगातली शक्ती पूर्णपणे गेल्याने त्याला एक पायरीही चढवेना. आपली अखेर कळल्यासारखा तो शेवटच्या दिवसाची वाट पहात पडून राहू लागला.त्याच्या यातना न बघवून त्याला अखेर इच्छामरण दिलं .
आज तो मते फ़ार्ममधल्या जोशांच्या बागेत चिरविश्रांती घेतोय. या जगात कुठलीच गोष्ट विनाश पावत नाही; ती संपूर्णपणे नाहीशी होत नाही. त्याला पुरलेल्या ठिकाणी त्याची आठवण म्हणून लावलेलं झाड वर्षभरात वाढेल. त्याच्या पानांचं हिरवेपण , फ़ुलांचा सुगंध जीवनाचं गाणं गात राहतील. त्या झाडाच्या पारावर बसून गप्पा मारताना मध्येच बोरुची आठवण निघेल. त्याच्या खोड्यांना हसताना प्रत्येकाच्या मनात त्याच्या वेगवेगळ्या आठवणी जाग्या होतील, पण त्या सगळ्या आनंदगान गाणार्‍या असतील, नक्कीच !

Tuesday, August 21, 2007

उंच उभारलेले हात

कोल्हापुरच्या बालसंकुलाला भेट द्यायला जाताना मन द्विधा मनस्थितीत होतं. सिनेमात बघि्तलेले अनाथाश्रम, तिथल्या पायरीवर बाळ ठेऊन चेहरा पदरा आड लपवत जाणाया नायिका हे डोक्यात इतकं भिनलेलं होतं की इतकं वय झालं तरी एक मन त्यातून बाहेर पडायला तयार नव्हतं.दुसरं निबर झालेलं मन अगदी व्यावहारिक पातळीवर या सगळ्याचा विचार करत होतं.रिक्षातून उतरताना दिसली ती इमारत नेहमीच्या शाळेसारखीच वाटली. म्हणजे मधोमध थोडीशी मोकळी जागा, ध्वजारोहणाचा खांब, आणि भोवताली दगडी इमारती. आम्हाला पाहून स्टाफ़ची थोडी जलद हालचाल झाली . बंधूंनी त्यांची कामं आटोपली आणि इमारतीचा फ़ेरफ़टका मारायला आम्ही दोघी बहिणी त्यांच्यामागून निघालो. पहिलीच खोली तान्ह्या बाळांची होती. पाय क्षणभर थबकले. भाच्यांचे शब्द आठवले, " आत्या, फ़ार कसं तरी होतं ग, तिथे जाऊन. " पण आतून स्वागताला तिथल्या बाई दारात येऊन उभ्या होत्या. आत पाऊल टाकताच दिसले ते सगळ्या खोलीभर झुलणारे पाळणे आणि त्यात डोलणारं बालब्रह्म. कुणी मुठी चोखतय, कुणी डोळे मिटून स्वप्नरंजनात मग्न, तर कुणी कुशीवर वळून पोटाची सोय अलगद तोंडात पडते का ते शोधण्यात गुंग. काळ्यासावळ्या निरागसतेला एक सामाजिक बंधनाची करुण किनार झुलत होती पाळ्ण्याच्या लयीत.दुसरी खोली थोड्या मोठ्या मुलांची होती. आत पाऊल टाकताच डोळ्यासमोर आले ते छोटे छोटे हात. ब्रह्मांड आठवलं. पायात शिशाचे गोळे उतरले.दाही दिशा लोपल्या. डोळ्यासमोर फ़क्त चिमुकले हात, उंचावलेले. एकाला हाताशी धरावं तर दुसरा हाताशी झोंबतो, कुणा एकाने तर पायाला मिठीच मारली.त्याला उचलून कडेवर घेतलं तर त्याने गालावर पाप्या घेऊन गाल ओला करून टाकला. घशाशी येणारा हुंदका परतवत त्याला घट्ट छातीशी आवळत बसकण मारली.मागून पुढून सगळ्या बाजूंनी त्या छोट्या हातांनी मी वेढली गेले. मग कुणाला मांडीवर बसवून तर कुणाला शेजारी बसवून " आपडी थपडी" खेळले तर कुणाशी डोळे झाकून " बुवाआआअ भो: " केलं. निघायची वेळ झाली तरी गळामिठी सुटेना. पण मग त्यांच्या बाई बोलल्या, " चला, सोडा त्यांना, कामाला जायचय त्यांना. " लगेच हात सुटले. एका बाजूला सगळी बाळं गोळा झाली. " मी मग येते हां " असं म्हटल्यावर हात टा टा करायला हलले. क्षणापूर्वी चमकलेले डोळे परत निर्विकार झाले.खोलीच्या दारातून बाहेर पडताना दहा पंधरा मिनिटांचा तो वात्सल्याचा रंग पाठीला चटके देत होता. मोठ्यांच्या सामाजिक नीतिमत्तेच्या दबावाखाली भरडलं जात असलेलं बालपण , मूकपणे वाट पहात होतं मोकळा श्वास मिळण्याची.
घरी परताना एक गोष्ट जाणवली ती ही की, २ ३ वषांची मुलं बोलत नव्हती. आप्पाला विचारलं तर त्यानं साम्गितलेलं सत्य हे की, त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं. त्यामुळे दत्तक गेल्यानंतर बोलू लागणारी ती मुलं ऐकू शकत असली तरी बोलू शकत नव्हती.आपल्या घरात बाळाचं आगमन झाल्या दिवसापासून सगळेजण त्याच्याभोवती गोळा होऊन बडबड करत असतो. इथे एवढी मोठी मुलं कुणी बोलायला नाही म्हणून मुकी ?आपण आपल्या मनाशी समाजसेवेचे काही ठोकताळे बांधलेले आहेत असं मला वाटायला लागलं. त्या मुलांना खाऊ दिला, कपडे दिले, वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या की आपलं काम संपत नाही. या छोट्या मुलांना त्याची काय मातबरी ? त्यांचे डोळे आसुसलेले असतात मायेचं माणूस बघायला, कान लागलेले असतात छातीतल्या ठोक्याचं अंगाईगीत ऐकत झोपण्याकडे,हात शोधत असतात आधार. मला वाटतं , की हे सगळं या मुलांना दिलं पाहिजे, त्यांची मूळ गरज आहे ती मायेच्या उबेची. त्यांच्याशी बोलण्याची. त्यांना जवळ घेण्याची. आपल्या आठवड्यातला एक तास आपण त्यांना देऊ शकणार नाही का ? मात्र भावनेच्या भरात हो म्हणू नका. कारण कोणतीही गोष्ट करताना आपण चार वेळा जाऊन ती मग करणं बंद करणार असू तर ती न करणं चांगलं. कारण कुणालाही आशा लावून सोडून देणं हे अधिक निश्ठूरपणाचं आहे. विचार करा, आपले लहानपणाचे दिवस आठवा. क्षणभर आई दिसली नाही तर आपली होणारी हालत आठवा, कदाचित तुमची पावलं तुमच्या गावातल्या बालसंकुलाकडे वळतील, त्या उभारलेल्या हातांना अलगद मिठीत घेण्यासाठी.

draft

Wednesday, June 27, 2007

एक वर्तुळ पूर्ण झालं

श्रीरामपूरमध्ये मुलाच्या मित्राचं लग्न होतं आणि श्रीरामपूरपासून ८ कि. मी. वर हरिगाव आहे. आता पुण्याहून इतक्या लांब आल्यानंतर हरिगावला भेट देण्याची इच्छा होणं अगदी स्वाभाविक होतं. कारण हरिगाव आणि आमचं सगळ्यांचच, म्हणजे आम्ही, नवरदेवाकडची मण्डळी आणि जमलेल्यांपैकी बहुसंख्य व‍र्‍हाडी मंडळीच हरिगावशी आतडं जुळलेलं होतं. हरिगाव म्हणजे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरजवळचं बेलापूर शुगर कंपनी जिथे ६४ -६५ वर्षं दिमाखाने वसली, नांदली आणि १९ वर्षांपूर्वी जिला टाळं लागल्यानंतर जिथली माणसं आपापल्या संसारानिशी रानभैरी झाले ते गाव. अक्षत पडल्यानंतर हरिगावला जाण्याचा विचार बोलून दाखवताच सगळ्याम्नी कळवळून कळकळीचा सल्ला दिला, " कशाला जाताय ? नाही बघवणार तुम्हाला. उगं रडत परताल. आता काय उरलय तिथं ? सगळं उजाड झालय. नका जाऊ. "पण ते तर होणं नव्हतं. किंबहुना लग्नाला इतक्या लाम्ब येण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. गेली १९ वर्षं तिथल्या परिस्थितीबद्दल इतक्याजणांकडून इतकं ऐकलं होतं, की मन त्या सगळ्याला सामोरं जायची तयारी करून होतं.गाडी श्रीरामपूरहून हरिगावच्या रस्ताला लागली आणि आमचा रिप व्हऍन विंकल झाला. सतत हरिगाव - श्रीरामपूर ये जा करून ज्या रस्त्याचा कण न कण ओळखीचा आहे असं वाटत होतं, तो रस्ता वाढलेल्या वस्तीमुळे अनोळखी वाटायला लागला होता. नेवासा फ़ाट्याकडून गाडी हरिगावच्या रस्त्याला लागली आणि डाव्या बाजूला छोट्या मोठ्या घरांच्या समोरच्या बागा बघून मन उल्हासित झालं. वाकड्या लिंबाच्या वळणावरून पुढे गेल्यानंतर दुतर्फ़ा हिरवीगार झाडं खडी ताजीम देत होती.पूर्वी हा उघडा बोडका माळ होता. आता त्यावर ४, ५ मोर फ़िरताना दिसत होते. लोक उगीचच जुन्या आठवणीत रमतात आणि नव्याचा स्वीकार करत नाहीत असेही विचार मनात यायला लागले आणि ध्यानीमनी नसताना कोणीतरी फ़ाडकन कानसुलात द्यावी तसं झालं. " पाच खोल्या" या नावाने ओळखली जाणारी चाळ बॉम्ब स्फ़ोटात उध्वस्त व्हावी तशी फ़क्त भिंतींच्या रुपात उभी होती. दारं, खिडक्या, छप्पर काही काही शिल्लक उरलं नव्हतं. तिथे राहणारी एक एक माणसं आठवायला लागली. खरच होतं लोक म्हणत होते ते. उरी बाळगलेल्या जखमा नख लावून उसवायची काय गरज होती, असा विचार मनात येईतो गाडी हरळी गे्टमधून कॉलनीत शिरली. हरळी गेटवरचं कारंजं केव्हाच नामशेष झालं होतं.१९ वर्षांच्या धुळीखाली हरळ गाडली गेली होती. इथेच आम्ही मैत्रीणी, आमच्या सासवा, मुलं संध्याकाळचा वेळ घालवत होतो. सुख दु:खाच्या गोष्टी बोलत होतो.
गाडी आम्ही रहात असलेल्या बंगल्यासमोर आली.फ़ाटक उघडून आत जाण्याचा प्रष्नच नव्हता.कारण फ़ाटक जाग्यावर नव्हतं, कंपाऊंडच्या तारा नव्हत्या. पण हे आम्ही ऐकूनच होतो, की हरिगावात राहिलेल्या लोकांनी जळणासाठी बंगल्यांची फ़ाटकं , खिडक्या उचकटून नेल्या, तारा भंगारात विकल्या.त्यासाठी त्यांना तरी कोणत्या तोंडाने दोष देणार ? भुकेपुढे प्रतिसृष्टी निर्माण करणार्‍या विश्वामित्राचा पाड लागला नाही तर सर्वस्व गमावून भांबावलेल्या कामगारांचा काय दोष ? हे एक वेळ समजून घेतलं तरी दारातली आंब्याची, चिकू , जांभळाची झाडंही दिसेनात. ज्या आंब्याखाली मुलं लहानाची मोठी झाली, ज्याची सुमधुर फ़ळं सगळ्या हरिगावाने खाल्ली ते आंब्याचं झाड समूळ नाहिसं झालं होतं.पुढेपासून मागेपर्यंत पारध्याने एक एक पाखरू नेम धेरून टिपावं तशी झाडं नाहिशी झाली होती. आंबा, रामफ़ळ सीताफ़ळ, चिकू, माड, आवळा सगळे सगळे नाहिसे झाले होते. उरला होता एक जमिनीचा मोकळा तुकडा.बोरी चिंच, काटेरी झुडपं यांनी गुंतलेला आणि मध्ये धुळीची पुटं चढलेला बंगला, आमचं घर., आणि किलकिल्या दारांना डोळी लावून आत डोकावून पाहणारे आम्ही. न रहावून लेकीने खिडकीत तोंड खुपसून हाक मारली, " आजोबा, आजोबा ".तिच्या वेडेपणाला आम्ही मोठी माणसं हसलो, पण आतून सगळेजणच आपल्या गजबजलेल्या भूतकाळाला साद घालत होतो, मनातल्या मनात.त्या क्षणी एखादी दैवी शक्ती आम्हाला मिळाली असती तर आमच्यापैकी प्रत्येकाने कालचक्र २० वर्षंमागे नेलं असतं.हरिगावातल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही फ़िरलो,. काही ठिकाणी कामगारवस्तीत जाग होती तर काही ठिकाणी पडझड झाली होती.नियोजनशून्य , बेपर्वा निष्ठूर राजकारणात बळी गेलेल्या आमच्या निसर्गरम्य साध्यासुध्या जीवनाचं कलेवर पाठीवर घेऊनच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.कोणाचं कुठे कसं आणि काय चुकलं याचे मनाशी हिशेब करत.निष्फ़ळ हिशेब.
हा सगळा प्रसंग मी माझ्या अमेरिकेतल्या लेकाला सांगत होते. कधी आवाज भरून येत होता, तर कधी स्वरात हताश कोरडेपणा होता. तोही बारीकसारीक तपशील विचारत होता. अचानक त्याने प्रष्न विचारला, " आई, तुम्ही हरिगावात किती वाजता होता ? "
" साधारण दुपारी ३- ४ च्या सुमाराला. का रे ? "
" आई, अग, त्याच वेळी मला स्वप्न पडलं की मी आणि बाबा आपल्या शेजारच्या घरात हरिगावला उभे आहोत. मला जाग आली तेव्हा इकडे पहाटेचे ४ वाजले होते."
म्हणजे आम्ही ज्यावेळी हरिगावात होतो तेव्हा हजारो मैलांवरून मनाने तोही आमच्याबरोबर होता. अखेर कुठेही गेलो, तरी आपली मुळं जिथे घट्ट रोवलेली असतात, ती माती आपल्याला साद घालतेच.
draft

Wednesday, May 30, 2007

हरिगावातले सण

मी लग्न होवून हरेगावला आले तेव्हा कारखान्याचा सरता काळ सुरू झाला होता आणि आपल्या हातातून वाळू सरकून जातेय हे फ़ार थोड्यांच्या लक्षात येत होतं. वरवर सगळं पूर्वीसारखंच चालू होतं. संध्याकाळी वाड्यांवरून डल्लॉप गाड्या जिमखान्यात येत, खेळणार्‍यांच्या आरोळ्या उठत, पण प्रमाण कमी होत होतं.पूर्वी जशी खेळायला टे. टे. चं टेबल मिळण्यासाठी किंवा बॅडमिंटनसाठी कोर्ट मिळण्यासाठी भांडणं होत, तसा काही प्रकार उरला नव्हता. पण तरीही हरेगावी दिवस म्हणजे झाडाच्या शेंड्यावरचे पोपटच भासत होते. तसेच उत्फ़ुल्ल. मग भले ते जग केवळ अधिकारीवर्गाचं का असेना.

जिमखान्यात चैत्राचं महिला मंडळाचे हळदीकुंकू, कांदेनवमी असे कार्यक्रम उत्साहाने साजरे होत होते. शे-सव्वाशे बायका आणि त्यांची मुलं जमून नुसती धम्माल करत.. पण सगळ्यात उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशचतुर्थी, दसरा आणि संक्रांत. त्या दिवसात म्हणजे आमच्या घरी जत्रा उसळत असे. माझे सासरे हे कारखाना सुरु झाल्यापासूनच तिथं कामाला होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणार्‍यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणपती सार्वजनिक असला तरी आमच्याकडे घरात लगबग आणि राबता चालूच राही. गणपतीच्या पूजेसाठी रोज सकाळी घरातून तबक जात असे. त्यात ठेवण्यासाठी सासूबाई सुरेख हार करत. कधी जाईचे, कधी जुईचे, कधी दुर्वांचे... अनंत चतुर्दशीला सगळ्या गावाला घरचा पंचखाद्याचा प्रसाद असे. त्यादिवशी गणपतीची मिरवणूक फ़र्लांगभर अंतरावर आलली की सास~यांची गडबड सुरू होई, ' बाई, (ते सासूबाईंना बाई म्हणत, आणि त्यांच्याशी कोकणीत बोलत) सगळां ठेवलसस मा ? प्रसाद ठेवलस ना भरपूर, गुरुजी येतीत आत्ता. काशीनाथ, चल लवकर दारात उभा रहा लवकर.' नुसता गोंधळ उडवून देत.

दसरा आणि संक्रांतीला तर ते आणि सासूबाई संध्याकाळी ५ वाजताच सगळं आटपून बसत . पध्दत अशी की दसर्‍याला लहानांनी सोनं लुटायचं आणि संक्रांतीला मोठ्यांनी तिळगूळ द्यायचा. मग बेलापूर गावातून ४, ५ किलो रेवड्या आणि किलो दोन किलो तिळगूळ आणला जायचा. रेवड्या भाऊंनी द्यायच्या आणि तिळगूळ सासूबाईंनी. पहिले भाऊंच्या खात्यातले हमाल यायचे ५ वाजता. मग जी रांग सुरू व्हायची ती रात्री १० वाजेपर्यंत. साधारण ७च्या सुमाराला म्हणजे फ़ुल्ल मारामारीच. फ़ाटकाकडे वाल्हा उभा असायचा. कारण वात्रट मुलं एकमेकांचे शर्ट घालून २,२ ३,३ वेळा रेवड्या न्यायला यायची. मग वाल्हाचा आरडाओरडा " ईईए ए, आल्ता न तू मघा, उजुक का आला रे ****." की आतून कोणीतरी वाल्हाला आठवण करून देत असे की आज ' ति्ळगूळ घ्या गोड बोला "चा सण आहे. मग थोडा वेळ शांतता असे. काही हमाल बायकांना, नव्या सुनेला घेऊन येत. मग त्या आत माजघरात येऊन बसत... नव्या नवरीला नाव घेण्याचा आग्रह होई. काही बायका अगदी आगगाडीसारखी लांबलचक नाव घेत. साधारण ९ पर्यंत हा कल्ला असे आणि मग अधिकारीवर्गाची दुसरी फ़ळी येत असे. त्यांच्यासाठी तिळाचे लाडू घरी केलेले असत. त्यापुढे जेवण आणि जेवतानाही कोण आलं कोण नाही याची चर्चा चालू असे. दसर्‍यालाही याच नाटकाचा प्रयोग असे, पण फ़रक एवढाच की घरात ढीगभर आपट्याची पानं जमा होत आणि दुसर्‍या दिवशी काशीनाथला आपट्याची पानं झाडावी लागत.

Friday, May 25, 2007

सीझन

साधारणपणे दसर्‍याच्या सुमाराला कारखान्याचा बॉयलर पेटवला जात असेआणि त्या दिवशी पूजा अर्चा करून समारंभाने गव्हाणीत ऊस टाकला जात असे. कारखान्याचा सीझन चांगला चालण्यावर सगळ्यांचं पोट अवलंबून असल्याने सगळा अधिकारीवर्ग सपत्निक हजर असे. आपल्याच घरातल्या समारंभाचा उत्साह सगळ्यांच्या देहबोलीतून ओसंडत असे. आता जाणवतं ते हे की या अशा समारंभाला कामगारवर्गाच्या बायका मात्र उपस्थित नसत. खर तर त्यांचं पोट तर जास्त प्रमाणात कारखान्यावर अवलम्बून होतं. पण काही काही गोष्टी आपण ' तशी पध्दत नाही ' म्हणून दुर्लक्ष करतो त्यातली ही एक . आमचे गुरुजीही मस्तच होते. कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून इतर देवतांना आवाहन करतानाच ते " शुगरदेवताय नम: " म्हणून मोकळे होत.कारखान्याचा सीझन चालू झाला की सगळं वातावरणच बदलून जाई. पहाट दुपार, रात्र अशा पाळ्यात पुरषांचं आयुष्य आणि देवा ब्राह्मणासमक्ष हाताला हात लावून 'मम ' म्हटलेलं असल्यामुळे त्यांचे डबे करण्यात आणि त्यांची झोपमोड होवू नये म्हणून मुलांचं ध्वनिप्रदुषण रोखण्यात बायकांचं आयुष्य गुंतून जाई. पोरांची अवस्था म्हणजे " ह्यो कोन बाबा आपल्या घरात रोज येतो ग आई, ' अशी होवून जाई. कारण बाबा घरी तेव्हा पोरं शाळेत आणि पोरं घरी तेव्हा बाबा एक तर झोपलेला किंवा कारखान्यात.
सीझन सुरू झाला की कारखान्याचा परिसर एकदम गजबजून जाई. कारखान्यासाठी लागणारा ऊस घेवून येणार्‍या डल्लॉप गाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण [ बैलगाडीला डनलॉप टायर्स लावले की डल्लाप गाडी होते.] ऊस लेबर वाहून नेणार्‍या ट्रक्सचा फ़रफ़राट, वातावरणात भरून राही. साखरेची पोती, बगॅसचे गठ्ठे वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या वॅगन्स छोट्या रुळांवरून थेट श्रीरामपूरहून कारखान्याच्या दारात उभ्या रहात. रस्त्यांच्या कडाम्ना ऊस तोडणी कामगारांच्या त्रिकोणी आकाराच्या तट्ट्याच्या झोपड्या उभ्या रहात. अगदी पहाटे किंवा सांजला त्यांच्या चुलीतला जाळ ढणढणत राही, भाकरी आणि कोरड्यास करायला. संध्याकाळ कधी कधी दारू प्यालेल्या बाप्यांच्या गुरगुराटात आणि मार खाणार्‍या बायांच्या कलकलाटात मिसळून जाई. सगळीकडे रसाचा गोड वास आणि नवीन माणसाचं डोकं उठवणारा मळीचा दर्प दरवळत राही. पुरुषांच्या बोलण्यात क्रशिंग, रिकव्हरी असे शब्द वारंवार येऊ लागत.
कारखान्याचा सीझन सुरू झाला की घरातली बायका मुलं खूष असत.कारण आपली आणि आजूबाजूच्या शेजीबाईंचे मुलं घेऊन कारखाना बघायला जाणं हा एक मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झालेला असे. मग मुलांनी आतली अजस्त्र मशिन्स भयचकीत चेह्र्‍याने न्याहाळण , पोटभर रस पिणं गरम गरम साखरेचा बोकणा भरून खिदळणं हे सगळं सगळं बरेच दिवस चर्चा करायला पुरत असे. आमच लग्न ठरल्यानंतर पुण्यात आम्ही भेटल्यानंतर माझे पाय रसवंतीगृहाकडे वळत असत.कारण कोल्हापूरला असली न्हाई ती झेण्गटं नव्हती, कारन" रस कुट असा पितात व्हय ? सरळ रसाचा तांब्याच एका दमात रिकामा करायचा असतोय की राव, " ही कोल्हापुरची विचारधारा तेव्हा होती. पण मी कितीही लाडिकपणे " आपण रस पिवू या ? " असं विचारलं तरी " तू घे ना मी सोबत करतो " असं उत्तर यायचं मग मीही मनातल्या मनात " अरसिक किती हा मेला " असं म्हणत उघड " नको राहू दे तुला नको तर आपण दुसरं काही तरी घेऊ" असं म्हणत असे. पण पहिला सीझन सुरू झाल्यानम्तर नवर्‍याच्या नकाराचं कारण लक्षात आलं. सहा महिने रसाच्या वासात डुंबत राहिल्यानंतर तो तरी बापडा परत रस कसा पिणार ?
पण हळू हळू ३,४ महिन्यांनंतर याचाही थकवा यायचा. मुलांच्या वार्षिक परिक्षा झालेल्या असायच्या आणि मीही कारखान्याचा सीझन कधी सम्पतो आनि आपण मुलाम्च्या मामाच्या गावाला कधी निघतो याची वात बघायला लागायची, मुलांच्या बरोबरीने !
draft