कधी कधी मन सैरभैर होतं आणि काहीही करायला नकार देतं. मग अशा वेळी काय करायचं? मनाला मोकळं सोडून द्यायचं. त्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्यायचं. मग ते उधळतं कधी लहानपणाचे धागे उसवत तर कधी एकदम शेवटाचे पाश कवटाळू पहात. मन असं का करतं? कोण जाणे ! आता या क्षणी काहीही करायचं नाही आहे मला ....... असं म्हणता म्हणता मागच्या आठवड्यातला एक समारंभ नजरेसमोर येतोय. कदाचित सांगता सांगता मन जाग्यावर येईल.
कोल्हापूरजवळ सादळेमादळेनजिक "निसर्ग " म्हणून एक ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसवलेलं. हिरव्यागार वनराजीनं वेढलेलं. शुध्द हवेचं. रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं. तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवायला कंटाळला असाल तर मस्तपैकी बैलगाडीत बसून जेवा ना! म्हणजे बैठक घोंगडं अंथरलेली आणि पाठ टेकायला दोन्ही बाजूला बैलगाडीची चाकं टेकवलेली. जेवण मस्तपैकी गावरान ( अर्थात "दोन्ही" प्रकारचं) एका भिंतीवर पितळेचा सगळा जुन्या पध्दतीचा संसार मांडलेला ( जो रात्री पोत्यात भरून ठेवला जातो) आणि भिंतीवर खाली घरकामात रंगलेल्या बायका रंगवलेल्या .. कुणी दळतेय तर कुणी भाकरी थापतेय. रोजच्या कुकरच्या शिटीपासून आणि फ्रिजच्या भाजीपासून दूर घेऊन जाणारं वातावरण ताजतवानं करतं आपल्याला!
आता थोडे कामाचे विचार येऊ लागलेत मनात. पण इतक्यात नाही उठायचं . अजून थोड्या गप्पा. कोल्हापूरपासून २० - २५ मिनिटांच्या अंतरावर काडसिध्देश्वराचा मठ आहे, कण्हेरी या ठिकाणी. या ठिकाणी एक खेडं वसवलं आहे मठाच्या वतीने . पण या खेड्यात माणसं रहात नाहीत, राहतात पुतळे, आणि ते घडवणारे कर्नाटकातले कारागीर, ज्यांनी शिल्पकलेचा ५ वर्षाचा अभ्यास केला आहे. एका वेसवजा कमानीतून २५ रुपयांचं तिकीट काढून तुम्ही आत शिरता आणि छोट्या छोट्या घरांच्या खेड्यातच प्रवेश करता. खेडं खोलगटात वसलेलं आहे आणि त्याची रचना पूर्वीच्या खेड्याप्रमाणे केली आहे. बारा बलुतेदार आपापल्या घरात बसून आपापले व्यवसाय करताहेत आणि हे पुतळे आहेत याची पूर्वकल्पना असूनही आपण दरवेळी एखाद्या पुतळ्याला माणूस समजून फ़सतो. इथे आपल्याला गवंडी, सुतार, लोहार, चांभार, सोनार, तेली बुरुड, कोरवी, नालबंद, न्हावी, कासार, कोळी, शिंपी, तराळ भेटतातच पण वतनदार, वैद्य, पंचांग सांगणारा ब्राह्मण चावडीवर वाद मिटवणारे पंच, कीर्तन करणारे प्रवचनकार इतकंच नव्हे तर जीव तोडून भुंकणारी कुत्रीही भेटतात. पाटावर शेवया कराणा-या बायका दिसतात तशी गोधडी शिवणारी आजीही दिसते. बैलगाडीत बसून सासरी चाललेल्या मुलीचे अश्रू पुसायला आपले हात पुढे होतात आणि त्याच वेळी तिच्या गाडीमागून खांद्यावर सामानाचं गाठोडं घेऊन निघालेला बाप आणि घराच्या अंगणातून निरोप देणारी आई बघून घशाशी आलेला आवंढा परतवायला त्रास होतो. प्रत्येक पुतळा म्हणजे मूर्तीमंत शिल्प. कासारणीकडे बांगड्या भरणारी लेकुरवाळी बाळाला पाजतेय तर बाळ हात लांब करून तिच्या मंगळसूत्राशी खेळतय. तिच्या पायातली साखळी जमिनीवर लोळतेय. दागदागिने, पेहराव, चेहरे घरातलं सामानसुमान, ते ठेवण्याची पद्धत यांचा इतका बारकाईने विचार केला आहे की "वा! सुंदर! अप्रतीम!" याशिवाय आपण काही बोलूच शकत नाही.
खेड्यापासून थोडं लांब शेतं आहेत. मधल्या पायवाटेनं गेलं की सुरवातीला पाणवठा, पुढे कुरणात गाई, म्हशी, बक-या चरत आहेत तर डाव्या बाजूला एका शेतात नांगरणी चालली आहे तर दुस-या शेतात कुळवणी चालली आहे. कुठे शेतकरीदादा मोटेनं शेताला पाणी पाजतोय तर कुठे खळ्यावर मळणी, उफणणीची धामधूम चालली आहे. हे सगळं इतकं खरं आणि वास्तव की म्हशीच्या डोक्यावरच्या कावळ्यासकट आणि पाठीवरच्या पोरासह, शेताच्या बांधावरच्या म्हातारबाबासह प्रत्येक शिल्प आपली दाद घेऊन जातं. म्हणजे पुतळे बघून त्यांना लाला म्हणायचं की गनपा, मालक म्हणायचं की हनम्या हे आपण समजू शकतो. एकदा तरी ह्या खेड्याला भेट द्यावी आणि परत आलं की आपल्या माणसांना घेऊन परत जायचं अशी खूण मनाशी बांधावी असं वाटायला लावलेलं हे खेडं!
मन म्हटल्यावर ल क्षात आलं की खरचं मनाला कधी कधी असं स्वैर सोडून दिल्यावरच ते ताळ्यावर येतं. म्हणून म्हटलं कधी कधी मन तुमचं ऐकेनासं झालं की त्याला खेचू नका, असंच मोकळं सोडून द्या, भटकू दे त्याला हवं तसं थोड्या वेळानं आपोआपच ते परत येतं आपल्या जागी. कानात वारं शिरल्यावर हुंदडून परत आईला ढुसण्या देणा-या वासरागत!
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
कधी कधी मन सैरभैर होतं आणि काहीही करायला नकार देतं. मग अशा वेळी काय करायचं? मनाला मोकळं सोडून द्यायचं. त्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्यायचं. मग ते उधळतं कधी लहानपणाचे धागे उसवत तर कधी एकदम शेवटाचे पाश कवटाळू पहात. मन असं का करतं? कोण जाणे ! आता या क्षणी काहीही करायचं नाही आहे मला ......
किती अचूक !
एकंदर लेखच सुंदर !
Post a Comment