Friday, September 21, 2012

नावात काय आहे

नावात काय आहे असं कोण्या एका महान लेखकाने म्हटलं आहे असं मी म्हणणार नाही कारण ते वाक्य शेक्स्पीयरने म्हटलय हे मला माहीत आहे. आता या वाक्याच्या जनकाचच नाव माहीत नसेल तर या वाक्याला काय अर्थ आहे? कारण या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. नावातच सगळं दडलेलं आहे, असं मला मनापासून वाटतं. म्हणजे असं की, गुलाबाला टरबूज म्हटलं तर नाकाला सुगंध जाणवणार नाही आणि हाताला काटे टोचणार नाहीत. हो की नाही ?नावामुळेच तर निर्गुणातून सगुणात जाता येतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आमच्या नातवाने केलेलं आमचं नामकरण .वयाच्या दुस-या वर्षी त्याचा आपला साधा सोपा फ़ंडा होता. जो माणूस आपल्याकडे बघून काहीतरी परत परत म्हणतो ते बहुधा त्याचं नाव असावं.म्हणजे नानू अशी हाक मारणारे ते नानूआबा आणि कुकुली असं म्हणणारी ती कुकुली. म्हणजे काय झालं ,आम्ही दोघे लपाछपी खेळत होतो. मी लपून त्याला कधी कूक कूक म्हणत होते तर, कधी कुकुली. तेव्हा ही आजी आपली कुकुली, असं त्याच्या मनाने घेतलं आणि हे बाळ आपल्याला आआआआआजी अशी गोड हाक मारणार अशा सुखस्वप्नात असलेली मी झाले कुकुली. पण या नावाने मला एक सत्य मात्र जाणवून दिलं. कारण एकदा हा मला " कुकुली मला घे" असं सांगत असताना शेजारच्या माणसाने ऐकलं आणि तो म्हणाला, " अरे, आजी कशी कुकुली, तू कुकुला".म्हणजे अरे देवा, हा माझा नातूही मला कुकुली समजतो की काय इतरांप्रमाणे? अवघड आहे. आधीच सगळ्या भावंडात मी शेंडेफ़ळ. तीनही बंधूत आणि अस्मादिकात बरंच अंतर. त्यामुळे साठी ओलांडली तरी मी त्यांच्यासाठी लहानच. पण नातवासाठीही मी "कुकुली"?

तसं बघायला गेलं तर माणसाला बरीच नावं आपोआप चिकटतात. आई म्हणायची " खुम्पष्टुल किंवा खुळग्या." म्हणजे काही तरी हट्ट केला की रागवणं दूरच, पण वरील नावाने सम्बोधायची ती आणि बापू म्हणायचे तायू.तीन भावातली एकटी लेक. लेक म्हणून लाडकी होते ना मी त्यांची. आता नावात काय आहे म्हटलं तर आईवडलांचं प्रेम आहे ना, जे आपल्या अंतिम क्षणापर्यंत टवटवीत राहतं. माझी लेक मला म्हणते मदर इंडिया तर लेक म्हणतो, म्हातारी लई भारी हाय.आणि मी अशी म्हातारी वयाच्या ४०व्या वर्षापासूनच झालेय. या दोन्ही नावातला ओलावा कळायला आईच व्हायला हवं असं नाही ना? म्हणून मला मनापासून वाटतं की, नावात खूप काही असतं. फ़क्त ते जाणवतं नाव देणा-याला ( ठेवणा-याला नव्हे ) आणि घेणा-याला.

3 comments:

Unknown said...

नावा कशावरून ठरत!

फार पूर्वी आम्ही बोरीस काका अणि बोरीस काकु होतो

माझा भाच्चा मला टकलु मामा म्हणतो; टकलु मामा का तर त्याच्या मुंजीमध्ये माझ्या मांडीवर बसून त्याच चमन केल होत;आणि त्या थेअरी प्रमाणे टकली मामी ओघानी आल.

माझा दूसरा भच्चा मला मिशी मामा म्हणतो. आता तो मामीला काय म्हणतो हे सांगणे नको.

हे सर्व झाले लहान मुलांचे. ती काय निरागस देवा घरची फुल. काटे असलेली का होइना पण गुलाबाची फुल.

मोठी झाली की शिंग फुटतात. कोणाला मस्का मारायचा हे पक्क कळत. त्यमुळे मोठ्या भाचरांचा मी शकुनी मामा आणि मामी म्हणे e-Mami.

Unknown said...
This comment has been removed by the author.
Chaitra said...

खाजगी नावांनी नातं आणखी गहिरं होत आणि एक खाजगी आठवण तयार करतं. गुलजारच्या गाण्यात आहे ना..."भुले हुए नामों से कोई तो बुलाए" तसं त्या नावासाठीही मग मन आतुर होत रहातं