Saturday, May 19, 2007

पियाका घर --हरेगाव

हरेगाव ! बेलापूर हा महाराष्ट्रातला पहिला खाजगी साखर कारखाना. तेथील अधिकार्‍यांसाठी व कामगारांसाठी बांधलेली वसाहत म्हणजे हरेगाव. ए, बी, सी, डी अशा टाइपच्या घरात विभागलेली. एक वाडी, दोन वाडी, पाच वाडी, आठ वाडी अशा वाड्यांनी वेढलेली. जगप्रसिध्द आर्किटेक्ट बोधे यांच्या आखीव रेखीव बांधकामात बंदिस्त झालेली.अस समजलं की वारणानगरचे तात्यासाहेब कोरे आपल्या कारखान्याच्या वसाहतीचं बांधकाम सुरु करण्यापूर्वी इथली वसाहत बघून गेले होते. ए टाइपचे बंगले ४ बेडरूम्सचे होते, बी टाइपचे २ बेडरूमचे तर सी टाइपचे १ बेडरूमचे होते. एक नंबर बंगला व डायरेक्टर्स बंगलो हे एक वेगळच प्रकरण होतं. आधीच अमचं दिशाज्ञान दिव्य, त्यात ते गर्द झाडीत लपलेले बंगले ओळखणं म्हणजे घरच्यांना एक गमतीचा विषय झाला होता.कोल्हापूरचं घर म्हणजे पायर्‍या संपल्या की रस्ता या प्रकारचं असल्यामुळे मागे पुढे लाम्बरुंद बागा ही माझ्या दृष्टीने एक अद्घुतरम्य गोष्टच होती.इथलं सगळं आयुष्य कारखान्याच्या भोंग्याला बाण्धलेलं होतं. सकाळी साडेसात्तच्या भोंग्याला माझे सासरे घराबाहेर पडत . १,२ मिनिटांच्या अंतराने त्यांच्या वेळचे सगळे सिनियर्स निघत. ८ च्या सुमाराला दुसरी फ़ळी , म्हणजे माझ्या नव‍याच्या वयोगटाचे लोक, निघत. त्यातही काहीजण त्या ढेंगभर अंतरासाठी सायकलचा वापर करत. १२ वाजता परत येताना मात्र सगळे एकदम बाहेर . परत २ च्या भोंग्याला हाच प्रकार. मोठ्यांची वाट लहानांनी अनुसरावी. मात्र साडेपाचच्या भोंग्याला ' पळा पळा कोण पुढे पळे तो'.एकम्दरीत एक संथ साध आयुष्य म्हणजे हरेगाव. कारखान्यात जायच्या यायच्या वेळी जी काही मनुष्यजातीच्या अस्तित्वाची जाणीव होई तेवढीच. एरवी सारे कसे शांत शांत !आता आठवलं की हसू येतं, पण शहरात वेगवेगळ्या उद्योगात सतत मग्न असलेल्या मला त्या शांत वातावरणात रुळायला फ़ारसा त्रास कसा झाला नाही ? की स्त्रीला कोणत्याही परिस्थितीशी पटकन जुळवून घ्यायचं नैसर्गिक वरदान असतं ? की तिच्या मनावर तसं बिंबवलेलं असतं ? कोण जाणे, पण एकंदरीत नववधु ची भूमिका मी मनापासून एन्जॉय करत होते खरी.म्हणजे असं की आम्ही दोघे सम्ध्याकाळी फ़िरायला बाहेर पडलो की आजूबाजूच्या मुली ' वहिनीला' बघायला गर्दी करत. त्यातली एकजण एकदा ' मेड फ़ॉर इच अदर ' म्हणून हसली. एरवी मी 'थॅंक्यु ' म्हणून आणखीही पी जे. टाकला असता पण नव्या नवरीने अधोमुख, मितभाषी असाव हे पार कण्वापासून बजावल गेलेल असल्यामुळे मी आपली शाम्तच राहिले. पण पुढे ओळख झाल्यावर या माझ्या ' नणदा ' मला चिडवायच्या, " वहिनी, आम्हाला वाटलं हो्तं तुम्ही अगदी गरीब आहात , पण तुम्ही म्हनजे लई भारी आहात हं " काय करणार स्वभावाला औषध नाही. आणखी एक म्हणजे हरिगावात सगळे मोठे लोक काका, काकी आणि त्यापेक्षा लहान दादा वहिनी असत. त्यामुळे एका मोठ्ठ्या कुटुंबाचच वातावरण तिथे होतं. आणि त्याची सुरवात दुसर्‍या दिवसापासूनच झाली.
दुसर्‍या दिवशी आम्हा सासू, सुनेचे नवरे कामावर गेल्यानंतर दर ५ मिनिटाम्नी दारावरची बेल वाजत होती. नवी नवरी असल्यामुळे डोअरकीपिंगशिवाय मला दुसरं काहीच काम नव्हतं,. येणारी व्यक्ती ' बाई आहेत ? ' असं अगदी अदबीनं विचारायची. मग मी सासूबाईंना बोलावलं की् ती व्यक्ती त्यांच्याशी कुजबुजत काही तरी बोलायची. मग त्या हसत माझ्याकडे वळून म्हणायच्या, ' अरे, मग तूच दे ना लहान्या बाईंना. ' मी बुचकळ्यात की या लहान्या बाई कोण . तोपर्यंत त्या व्यक्तीने माझे पाय घट्ट पकडलेले असायचे आणि ' 'अहो असं काय, ' असं म्हणेपर्यंत पायावर डोकं टेकलेलं असायचं. झटकन उठून स्टीलची वाटी, ताटली, पेला असं काहीतरी माझ्या हातात कोंबून लाजून उभी असायची. सासूबाई डोळ्यांनी खुणावायच्या, 'असू दे.' ' मला फ़ार ओशाळल्यागत व्हायचं. पण जस जशी तिथे रुळत गेले तस तसं कळत गेलं की ही माणसं यायची ते केवळ रेडकर साहेबाची सून बघायला. कारण रेडकर साहेबाने त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती. प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. आपल्या घरातल्याच पोराचं लगीन होवून नवी नवरी घरी आली आहे आणि आपण तिचं स्वागत करायचं आहे हीच एक आपुलकीची भावना त्यामागे असायची. खर साम्गायचं तर हरेगावातले पहिले १५ दिवस आम्ही दोघे घरी जेवलोच नाही. अगदी मॅनेजरपासून सामान्य कामगारापर्यंत सगळ्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो. आणि त्या बायांचं ते अलबला करणं, पुरुषांचं अदबीनं बोलणं हे सगळं मला एखाद्या जुन्या मराठी सिनेमाचाच भाग असल्याप्रमाणे वाटायला लागलं होतं.
ही कारखान्याची वसाहत असल्यामुळे सगळं आयुष्यच भोंग्याच्या वेळांशी बांधलेलं असे. जेव्हा 'सीझन ' चालू नसे, तेव्हा आयुष्य अगदी संथ असे. सकाळी ब्रेकफ़ास्ट घेऊन कारखान्यात जावं, जेवायला १२ वाजता घरी यावं. वामकुक्षी करून २ वाजता परत जावं ते साडेपाच वाजता चहा खाणं करायला परत घरी. सहा, साडेसहाला फ़िरायला किंवा जिमखान्यात खेळायला बाहेर पडावं आणि आठ, साडेआठला परत घरी. बायका महिलामंडळ, भजनीमंडळ यात जीव रमवत, अधिका‍यांच्या बायका ब्रिज , टेबलटेनिस खेळायला जिमखान्यात जमत. सगळा माहोल अगदी एखाद्या समारंभासारखा असे. मुलांना संभाळायला खात्याचे कामगार असत. तेच घरी स्वयंपाकही करत. निदान स्वयंपाकात मदत करत. रात्री १० वाजता जिमखाना बंद होई आणि सगळ्या बंगल्यांवर झाडांची गर्द छाया पसरून राही, निस्तब्ध!
सीझन चालू झाला की वातावरण एकदम बदले,---
draft

5 comments:

Radhika said...
This comment has been removed by the author.
Chaitra said...

छान लिहिलंयस. म्हणजे माहित असलेल्याच गोष्टी तुझ्या perspective मधून वाचताना मजा वाटतेय. मला नेहमी वाटतं, आजोबांच्या काळातलं हरेगाव म्हणजे proper colonial ethos असलेलं गाव होतं. तुमच्या काळातलं सगळं feudal आणि मी जे लहानपणी पाहिलं ते गावाचं democratization. तुमच्या काळात सहजतेनं साहेबाची चाकरी करणा~या कामगारांना माझ्या लहानपणी काहीसं आत्मभान आलं. म्हणजे at least त्यांच्या generation nextला तरी. त्यांच्या बदलत्या द्रुष्टीकोनाची आणि त्या बदलाकडे पहाणा~या जुन्या पीढीच्या द्रुष्टीकोनाचीही मी साक्षीदार आहे. तेव्हाच ते सगळं कळलं होतं असं नाही, पण त्या आठवणींचं माझं असं एक interpretation आहे. म्हणजे मी जर कधी लिहिलं हरेगावविषयी तर ते transition पकडेन. तूही पकडशील पण मला भारताच्या सामाजीक-आर्थीक स्थित्यंतरांशी corresponding असे हरेगावमधले बदल लिहुन काढायचेत. अर्थातच जेव्हा केव्हा सवड होईल तेव्हा!
आत्ता waiting for your next post!!!

Meghana Bhuskute said...

ऍज युज्वल मस्तच! इतके दिवस कमेण्ट लिहायचा आळस करत होते... गंभीरपणे आठवणीत रमताना मिश्कील होणं मस्त जमतं तुम्हाला!

Tulip said...

राधिका.. तुमचं लिखाण आवडलं कारण ते साध, सरळ, अत्यंत अकृत्रीम शैलीतलं, ते प्रसंग, ठिकाणं, ती माणसं आणि त्यांच्यातली तु डोळ्यांपुढे सुरेखपणे उभं रहातं हे झालंच पण मला त्यामुळे माझ्या लहानपणातल्या दिवसांतला एक खूप मागे पडून अल्मोस्ट विस्मरणात गेलेला काळाचा एक लहानसा तुकडा आठवला. माझे बाबा मी साधारण दहा-बारा वर्षांची होईपर्यंत भारतातल्या अनेक लहानमोठ्या(मोस्ट्ली लहानच) ठिकाणी त्यांच्या भाषेत ’डॉक्टरकी’करत फ़िरायचे. महाराष्ट्रच नाही तर अगदी बिहार,ओरीसा पासून तामीळनाडू, उत्तरप्रदेश मधल्या अनेक गावांत. काही ठिकाणी ते फ़ॅमिलीसकट जायचे. तिथे रहातानाच्या, तिथल्या त्या दिवसांतल्या आत्तापर्यंत अस्पष्ट, आहेत की नाही मनात हेही आठवत नसणा-या अनेक गोष्टी तुझं लिहिलेलं वाचल्यावर चक्क लख्खं आठवयला लागल्या. ज्या निट डोळ्यापुढे उभ्या रहात नाहीयेत त्या आठवणी आत आईशी बोलून आठवून पहाव्याशा वाटायला लागल्या. माझ्या आईच्या त्याकाळातल्या आठवणीपण कदाचित तुझ्यासारख्याच असतील ह्याची खात्री वाटली. विशेषत: "डॉक्टरां’नी तपासलं, त्यांच्या औषधाने बरं वाटलं म्हणून कृतद्न्यता व्यक्त करायला घरी येऊन असंच पायावर डोकं ठेवणारी त्या गांवातली ती ’लोकं’ मला आठवल्यापासून.
मला वाईट वाटतय तुझं लिखाणं, तुझा ब्लॉग मी आत्तापर्यंत आधी कां वाचला नव्हता? कशामुळे राहून गेलं होता माहीत नाही.
(मी वयाने लहान असूनही तुला ’तु’ म्हंटल्याबद्दल क्षमस्व. पण लहानपणातल्या आठवणींशी तुझ्या शब्दांच्या माध्यमातून जोडलं गेल्याने जवळीक वाटली. pls. don't mind :D)

Mohan Wankar said...

ही जुनी पोस्ट आहे पण हरिगावबद्दल कधीही वाचले तरी हरिगावच्या जुन्या आठवणी उजळून निघतात. हरिगावचे वातावरण हे एक मजेशीर मिश्रण होते. Cosmopolitan वातावरण असुनसुद्धा जुन्याची कास न सोडलेले असे हे गाव होते. लोकांना एकमेकाबद्दल अतिशय प्रेम होते. अजुनही कोणी हरिगावचे भेटले तर अत्यानंद होतो. हरिगावच्या आठवणींना उजाला दिल्याबद्दल धन्यवाद.