Saturday, December 24, 2011

बचपनके दिन

माझिया माहेरा जा असं म्हणताना माझ्या डोळ्यापुढं येते ती कोल्हापुरातली खासबाग. त्यातलं "राज अंजुमन ताज" असं नाव धारण करणारी बी. नांद्रेकर या जुन्या जमान्यातल्या एका गाजलेल्या नटाची भली मोठी वास्तू आणि एकापुढे एक अशी भली मोठी तीन मैदानं असलेला खासबागेचा परिसर. इथेच माझं लहानपण गेलं. त्या वेळी सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सातनंतर रहाण्याचं ठिकाण म्हणजे घर, अशी समस्त गल्लीकर बच्चे कंपनीची धारणा असल्याने उरलेला वेळ मैदानावर धुडगुस घालण्यात जायचा. लपंडाव, लगोरी, साखळी, बशीबोल, दगड का माती, उन का सावली असे आजच्या पिढीला अगम्य असलेले खेळ खेळण्यात आमचा वेळ कसा जायचा ते कळतही नव्हतं. तीनही मैदानं सकाळ संध्याकाळ मुला मुलींनी ओसंडून वाहत असत. कोल्हापूर ही कलानगरीबरोबरच क्रीडानगरीही असल्यामुळे खेळ खेळणं ही श्वासोच्छ्वासाइतकीच सहज गोष्ट वाटायची आम्हाला. घर किंवा मैदान अशी दोनच ठिकाणं चुकल्या पिराला शोधायला उपयोगी असायची. पंचगंगा नदीवर पोहायला जाणं, हा एक आनंदाचा भाग असायचा. घरापासून चारेक किलोमीटरवर असलेल्या नदीवर चालत जायचं आणि पोहून परत चालत यायचं म्हणजे भरपूर भूक लागायची. मग आईने केलेल्या गरम गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा आणि खोब-याची लसूण घालून केलेली चटणी. अहाहा! मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतय, मला ते पुढच्या ताटात दिसतय अशी अवस्था व्हायची.
वेगवेगळ्या दिवसातले खेळ वेगवेगळे असायचे. श्रावणात सगळ्यांच्या बागांमध्ये फुलं, पत्री बहरून आलेली असे आणि पूजेसाठी त्यांची गरजही असे. त्यामुळे बागेतल्या निसरड्या जागा चुकवत, मधूनच झाडावरुन पडणारे भले मोठे लांबलचक केसांचे सुरवंट चुकवत फुलं, पत्री गोळा करणं हा एक आनंद सोहळाच असे. त्यावेळी बागेच्या कुंपणाला मेंदीसारखीच दिसणारी पण मोठी पानं असणारी झुडपं वापरत. त्याचं नाव माहीत नाही, पण आम्ही त्याला "मेंदा" म्हणत असू. त्याला पांढ-या रंगाची नाजूक फुलं येत. ती गोळा करून आम्ही त्याचे वेणीसारखे गुंफून गजरे करत असू आणि केसात माळत असू. शिवाय गुलबक्षी, बुच यांच्या फुलांच्या वेण्याही करायच्या असल्यामुळे ती गोळा करतानाही बराच वेळ सत्कारणी लागायचा. गुलबक्षीच्या फुलांचा आणखी एक उपयोग म्हणजे हात रंगवणे. मेंदी गोळा करा, मग एखाद्या मैत्रिणीच्या आईकडे लाडीगोडी लावून वरवंटा, पाटा मिळवा आणि त्यावर मेंदी वाटा मग हातावर मेंदीचे गोळे ठेवा. या सगळ्यात खूप वेळ आणि शक्ती जात असल्यामुळे पाच सहा वर्षाच्या वयात गुलबक्षी आमच्या मदतीला धावून येत असे. तसे आमचे खेळ सगळे पाना फुलांच्या सोबतीनेच होत. म्हणजे असं की, रस्त्याच्या कडेला, बागेच्या कडेला रान गवत, वनस्पती उगवत. त्यात एक आळूच्या पानांसारखी पानं असणारी पण आकाराने अगदी चिमुकली अशी पानं असत. ती आमच्यासाठी आळूची भाजी असे. त्यालाच केळ्यासारखी दिसणारी चिमुकली फळं लागत ती आम्ही "भाजीवाली, भाजीवाली" खेळताना विकायला ठेवत असू आणि घरच्या लोकांना ती कंपल्सरी "विकत" घ्यावी लागत.रस्त्याच्या कडेला उगवणारी भगव्या रंगाच्या फुलांची घाणेरी आणि त्याला लागणारी काळ्या रंगाची फळं. त्यांना आम्ही कांगुण्या म्हणत असू. ती गोड फळं येता जाता तोंडात टाकायला फार मजा यायची. बाभळीची पिवळीधमक फुलं कानात घालून नटताना बाभळीचे काटेही पायात घुसत. आता आठवलं की गंमत वाटते, पण आमच्या खेळातल्या बहुतेक वस्तू फुकटच्या असत, तशीच आमची औषधही फुकटचीच असत. म्हणजे खेळताना ब-याच वेळा पडायला व्हायचं आणि पडेल तो वाढेल अशीच धारणा त्या काळी असल्याने आमच्या आयाही "कुठे धडपडलात" असं आदरार्थी बहुवचन वापरुन लागलेल्या ठिकाणी हळद थापून आम्हाला परत खेळायला पिटाळत. क्वचित पाठीवर फारतर एखादी "प्रेमळ थाप" बसे. पण तेही टाळायचं असल्यास आमच्याकडे सब दुखोंकी एक दवा होती. ती म्हणजे "दगडी पाला". म्हणजे टणटणीचा पाला. त्याला पिवळ्या रंगाची फुलं येत. ती आम्ही "म्हातारे, म्हातारे, पैसा देतेस का मुंडकं उडवू" असं म्हणत टिचकीने उडवत असू. असा हा भीषण क्रूर खेळ आम्ही हसत हसत का खेळत असू हे एक कोडच वाटतं. तर हा दगडीपाला रस्त्याच्याकडेला कुठेही उगवायचा. त्यामुळे सहजच उपलब्ध असायचा. मग एखादा चपटा दगड शोधला जायचा. तो धुवून त्यावर दगडीपाला ठेवला जायचा. दुस-या दगडाने ठेचून त्याचा रस काढून तो जखमेवर पिळला जायचा. यात आम्ही ना कधी दगडीपाला धुतला ना कधी ठेचायचा दगड धुतला ना जखम ना आमचे हात. देव तारी त्याला कोण मारी हेच खरं! आणि आता दुखणा-या गुडघ्यांना बाम चोळताना हे सगळं आठवताना बरं वाटतं हेही तितकंच खरं. पण त्याचबरोबर काही प्रासंगिक औषधोपचारांनाही आम्हाला दर महिन्याला सामोरं जायला लागायचच. एक म्हणजे एरंडेल तेल पिण्याचा मासिक कार्यक्रम असायचा. ते अतिशय शुध्द स्वरुपात असल्यामुळे त्याला एक प्रकारचा भयानक वास येत असे. त्यात ते तेल. आजच्या मुलांना कल्पनाच येणार नाही त्याच्या चवीची. बरं, पोटातल्या जंत मारण्यासाठी हे पिणं आवश्यकच आहे अशी समस्त आयांची ठाम समजूत असल्याने महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी सकाळी घराघरातून "पी लवकर. गीळ चटकन. गीळ म्हणते ना" असे दरडावणीचे आणि "नको ना ग आई" असे आर्त की काय म्हणतात तसे आवाज घुमत असत. मग दिवसभर "कोठा" साफ केल्यानंतर दुपारी गळून अंथरूणावर पडल्यानंतर थोडासा वरणभात मिळत असे. मला तर अजूनही तो एरंडेलाचा मोठा चमचा, लिंबाची फोड, लोणच्याची फोड असा सरंजाम आठवला तरी "भावना" होते. इतक्या वर्षांनंतरही! दुसरा एक अत्याचार म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात कांदे किसून डोक्यावर थापले जात आणि डोकं फडक्याने बांधून दिवसभर घरात डांबून ठेवलं जाई. किसलेल्या कांद्याचं पाणी डोळ्यात जाई. डोळ्याची प्रचंड चुरचुर होई. पण तेही चांगलच असे. कारण त्यामुळे डोळे स्वछ होतात आणि म्हातारपणी चष्मा लागत नाही "म्हणे". पण ही म्हातारपणाची लहानपणी केलेली तरतूद पुढे उपयोगी पडली नाही आणि लागायचा तेव्हा चष्मा लागला ती गोष्ट वेगळी. परत केसांना येणारा कांद्याचा वास पुढे महिनाभर डोकं उठवी (ज्याच्या डोक्यावर घातलेला असे त्याचं स्वत:चं आणि घरच्यांचं ते वेगळच.) मुलींना आणखी एका दिव्याला सामोरं जावं लागायचं ते म्हणजे केसात झालेल्या उवांचा नि:पात करणं. तेव्हा सगळ्याच मुलींचे केस लांब असत. मग पावसात भिजले म्हणून म्हणा, किंवा घामाने भिजले म्हणून म्हणा, पण केसातले "हत्ती घोडे" काढण्याचं साप्ताहिक काम असे. त्यासाठी बारीक दातांची एक फणी असे. तिने प्रथम डोक्याची सालटी काढेपर्यंत केस विंचरले जात. त्यानेही भागले नाही तर मग शिपिचंदन नावाचं एक भगव्या रंगाचं केमिकल मिळत असे. ते विषारी असे, पण उवांवर रामबाण उपाय. ते केसाला लवून आंघोळ घातली जाई. शिपिचंदन आंघोळ करताना डोळ्यात गेलं तर आंधळेपण येईल या भीतीने डोळे इतके घट्त दाबून धरले जात की काही काळापुरतं खरच आंधळेपण आल्यागत गत होई. मग पुढे लायसिल आल्यानंतर आणि छोट्या केसांची चलती झाल्यामुळे समस्त महिलावर्गाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
पण या हालांबरोबरच लहानपण म्हणजे एक स्वप्नांचा देश होता. निदान साठ वर्षांपूर्वी तरी तो तसा असायचा. कारण बहुतेक वाचायची पुस्तकंही आम्हाला राक्षस, प-या अशांच्याच प्रदेशातून हिंडवून आणायची. चांदोबा हे तेव्हाचं अगदी बालप्रिय मासिक. त्यातली चित्रं दाक्षिणात्य पध्दतीची असायची.त्यातल्या गोष्टी बोधपर असल्या तरी एकंदर कल्पनेच्या जगातल्या असायच्या. त्यामुळे तेव्हा वेगवेगळ्या समजुतींचा आमच्या मनावर पगडा असायचा. त्यातली एक गोष्ट म्हणजे रस्त्यावर रेघ ओढली आणि त्यावर गाईचा पाय पडला तर आपली आई मरते. त्यामुळे खेळताना बाऊन्डरीज आखताना मैदानावरच्या मातीत काटकीने किंवा दगडाने आखलेली रेघ पुसल्याशिवाय कोणीच घरी परतत नसे. चुकून जर रेघ पुसायची राहिली तर जिवाच्या आकांताने कुण्या मैत्रिणीला सोबत घेऊन परत मैदानावर जाऊन ती रेघ पुसल्याशिवाय आम्हाला चैन पडत नसे. दुसरं म्हणजे उंब-यावर बसून शिंकलं तर मामा मरतो. अरे, काय हे? सगळे अपशकुन आपले आईकडच्या बाजूच्याच लोकांना. पण आम्ही या समजुतींना टरकून असायचो हे नक्की. चुकून जरी त्यांचं उल्लंघन आमच्या हातून झालं तर देवळात जाऊन रावणेश्वरापुढे नाक घासल्याशिवाय आमच्या जीवाला समाधान मिळत नसे. हळू हळू काळाबरोबर जगाच्या व्यवहाराची जाणीव व्हायला लागली. मनाची निरागसता कमी व्हायला लागली आणि या सगळ्या गोष्टी आठवल्या की हा असला वेडेपणा आपणच करत होतो का असं वाटायला लागलं. पण तरीही हा असला वेडेपणा आठवताना मनाला एक प्रकारचा थंडावा का मिळतो बरं? आणि अंगावरुन मोरपीस फिरवल्यागत कोवळेपणा ?

2 comments:

Chaitra said...

I've heard many of these stories from you. Similar corresponding stories are part of my childhood memory also. It was nice to have gone down the memory lane...and keep writing! Don't disappear! People do not post comment does not mean they do not read...Post the link on your facebook profile

Neelam.jadhav said...

Mast watle wachun