Friday, January 16, 2015

शहाणपण देगा देवा

ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे विचारवंत येतात. त्यांच्या चेह-याच्या मागे तेजाच वलय वगैरे असतं. आणि आपण आदराने त्यांचं पुण्यस्मरण करतो. त्यांची शिकवण विनित भावाने वाचतो. आचरणात किती आणतो तो भाग वेगळा. पण हे विचारवंत एखाद्या दूरस्थ ता-यासारखे वाटतात मला. त्यांची ती दुर्बोध शब्दातली वचनं  मन उल्हासित करण्याऐवजी मला तरी गोंधळून टाकतात. खर सांगायचं तर मला inferiority complex देतात. कारण लहानणापासून वाचन म्हटलं तर कथा, कादंब-या आणि कविताच. आणि मोठे दोघेही बंधू म्हणजे वाईच्या विश्वकोशात आपापल्या विषयावर लेख लिहिणारे. त्यामुळे घरात कला आणि शास्त्र या दोनही विषयातले ग्रंथ भरलेले असायचे. आणि मी मात्र त्यांच्यावरची धूळ झटकण्याशिवाय  इतर कशासाठीही त्यांना हात लावत नसे. त्यामुळे शास्त्रवाला भाऊ चिडून चिडून मला फटकारायचा. " अशी पुस्तकं म्हणजे बांडगुळ "आहेत. काहीतरी वैचारीक वाच." त्यामुळे मी ती " बांडगुळ " तो समोर नसेल तेव्हा लोळत आणि समोर असेल तेव्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन वाचत असे.
विनोदाचा भाग सोडून देऊ या , पण मला आता वयाच्या ६६व्या वर्षी असं वाटायला लागलाय की ज्ञानाचे दोन प्रकार असतात . एक माहितीचं ज्ञान आणि दुसरं जीवनाचं ज्ञान. ज्याला आपण चातुर्य किवा साध्या भाषेत शहाणपण म्हणतो ते ज्ञान. माहिती तंत्रज्ञान मानवजातीच्या विकासासाठी गरजेचं आहे याबद्दल दुमत असायचं कारण नाही , पण " शहाणपण "मानवजातीच्या मानसिक आरोग्यासाठी जरुरीचं आहे हेही तितकच खरं.
आता हा असा वैचारिक किडा मला का बरं चावला असेल ? त्याला कारण आमच्या यमु आजी. वय वर्ष ८९. एकदम उत्साहाचा झरा. ज्या तन्मयतेने ज्ञानेश्वरी दासबोध वाचतील त्याचं तन्मयतेने दोन तीन तास रमीही मांडायला जातील.  बोलण्याची शैली अशी खुमासदार की त्यांच्या आयुष्यातल्या गंभीर प्रसंगांचही  विनोदी नाटुकल्यात रुपांतर व्हावं. तर अशा या यमु आजीचं  वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर  आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी  गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही  लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला  नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा  सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही  दुखवलं नाही. 
आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी  फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ?  घशाशी येणारा आवंढा गिळत  यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची  ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही  नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.
मला माणसं वाचायला आवडतात. त्यांच्या पुस्तकाची पानं मला खूप काही समृध्द करतात. इथेही मला माझं  खुजेपण दिसतं, पण त्याने मी निराश होत नाही.मला inferiority complex  येत नाही.कारण मला माहीत असतं मी मला त्यांच्या पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करू शकते. म्हणून मला ग्रंथात जे सापडत नाही ते  माणसात सापडतं . त्यांचे अनुभव मला अधिकाधिक शहाणं करतात. आणि तसंही अंतिम तत्वापर्यंत   पोचेतो  आपण अधिकाधिक विशुध्द होणं चांगलच ना? 

Saturday, January 3, 2015

नाताळ

गोष्ट साधारण १९५९ -६० मधली. तेव्हा मी पाचवीत असेन. शाळेला नाताळची सुट्टी लागायची. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला  सगळ्या शाळाभर एकच विनोद, हल्लीच्या भाषेत पी जे फिरत असायचा. बाई किंवा सर सुट्टीचा अभ्यास द्यायचे आणि बजावून सांगायचे, " सगळा अभ्यास पूर्ण व्हायलाच पाहिजे कारण अभ्यास "पुढच्या वर्षी "बघणार आहे मी."  कोणी शिक्षक कविता पाठ करायला सांगायचे. परत तेच डायलॉग  " कविता पाठ करायला वर्ष आहे.पुढच्या वर्षी म्हणून घेणार आहे ". अखेर आम्हालाही त्या "पुढच्या "वर्षीची इतकी सवय व्हायची की शाळा सुटल्यावर निघताना निरोपाचा धपका मैत्रिणीच्या  पाठीत मारताना जरा जास्तच जोरात मारला जायचां आणि आम्हीही एकमेकींना " आता आपली भेट पुढच्या वर्षी" असं हसत हसत सांगायचो .घरी गेल्यावर रात्री झोपताना मी आईला " मी आता पुढच्या वर्षीच उठणार" असं सांगून घाबरवून सोडलं होतं, पण भैय्याने " ए यडे  आज २४ आहे. तू काय १ तारखेपर्यंत झोपणार की  काय? " असं खवचटपणाने ( जो बहिणीशी बोलताना सगळ्याच भावांचा भाव असतो ( अरे अरे, वा वा काय जमलय वाक्य.)  विचारल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला . मग मी नेहमीप्रमाणे " ए आई , भैय्या  बघ की  कसा करतोय " असं ओरडून सूड घेतला होता.
लहानपणी आम्हाला नाताळाची सुट्टी असायची. ख्रिसमसची नाही.कारण मराठी भाषा आणि मराठी शिक्षक. पुढे ८वी ९वीत गेल्यावर त्याच स्पष्टीकरणही बाईच्या  तोंडून ऐकायला मिळालं होतं आणि तेच पुढे कितीतरी वर्षं मनात ठसलं होतं. बाई  म्हणाल्या होत्या , "या सणाला नाताळ म्हणतात कारण  त्या काळात गोरे लोक ताळतंत्र  सोडून वागतात, पण त्यांना कोणी काही म्हणत नाही. पाहिजे तेवढी दारू पिली तरी चालते. कितीही मास खाल्ल तरी चालतं." आणि हे सगळं बाई इतकं वेडवाकडं  तोंड करून सांगायच्या की  कित्येक वर्षं माझ्या डोळ्यासमोर " गोरे" लोक एका हातात दारूचा बुधला आणि दुस-या हातात चघळायला  हाडूक घेऊन रस्त्यावरून चाललेत आणि त्यांना कोणी रागावत नाही असं  चित्र येत असे. त्यात परत बाईनी चोरट्या स्वरात आम्हाला आणखी एक भयंकर सत्य(?) या सणाबद्दल सांगितलं  होतं की  ३१ तारखेला रात्री दिवे घालवतात आणि बरोबर १२ वाजता दिवे आल्यावर कोणीही कोणाचाही मुका घेतला तरी चालतो. हे आम्ही लाजरं हसू  दाबत गो-यामो-या होत ऐकलं होतं आणि त्याचं वेळी ठरवून टाकलं होतं की  काहीही झालं तरी नाताळच्या  वेळी इंग्लंडला जायचं नाही आणि असा प्रसंग ओढवून घ्यायचा नाही. कारण तेव्हा कोणीही तिथल्या गो-यांना रागावत  नाही..येशू ख्रिस्ताची जन्मकथा किंवा  जीवन ,त्याचा उदात्त संदेश फार नंतर कळला पण तेव्हा नाताळ म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सण  एवढच माहीत होतं. नाताळबाबाची  पोतडी आणि त्याची मध्यरात्री आपल्या घराला मिळणारी भेट ही  तर समजलेली गोष्ट होती. पण तेव्हाही नाताळबाबा ख्रिश्चनाच्यात असणार आपल्यात कशाला येणार असंच वाटत असे.आणि मोठ्या माणसांना जरी माहिती असायची तरी आपल्याही घरात मोजा टागावा आणि मुलांना त्याची मौज लुटू द्यावी हा विचारही नव्हता. कारण त्यावेळी मुलच कॉलेजला जाईपर्यंत पायात चपला घालत नव्हती तिथे नाताळ बाबासाठी  मोजा कोण कशाला आणतय.? ती गमंत आम्ही आमच्या मुलांसाठी केली आणि परत बालपण अनुभवलं, त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद बघून.!

Thursday, January 1, 2015

नववर्षाच्या शुभेच्छा

वाटलं होतं आजची सकाळ  थोडी  वेगळी असेल
किलाबिलता  सोनेरी पक्षी मखमालीवर बसलेला दिसेल
असेल त्याच्या डोईवर चमचमता तुरा
मधोमध बसवला असेल लखलखता हिरा

पेपरवाल्याने पेपर टाकला
दुधाच्या पिशव्या बास्केटमध्ये पडल्या
भाजीची फोडणी कुकरची  शिट्टी
पोळपाटाची खटखट
सुरु झाली आजही रोजचीच लगबग

 
किलकिले डोळे ताणून चष्मा शोधला
कुरकुरती हाडं गोळा करायला जरा वेळच लागला
एक घोट थायरॉईसाठी
 एक घोट पोटासाठी
कुशीवर वळा
 मान सांभाळा
 हलकेच चाला घेऊन काठी
 
स्वर्गीचा पक्षी, त्याचा सोनेरी तुरा
 गडगडत गेला लखलखता हिरा

 
 दार उघडून बाहेर येताच पडली समोर दाणकन उडी
" अरे  अरे पडेन ना झाले मी मोडकी मथाडी " ( म्हातारी )

HAPPY NEW YEAR KUKULI  HAPPY NEW YEAR
खळाळता झरा , सोनेरी किरण घेऊन आले त्याचे कोवळे  स्वर
किलाबिलता पक्षी माझ्या कवेत आला
माझी संथ सकाळ सोनेरी करत राहिला !
सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय: