Saturday, November 29, 2014

जाग .......एका रविवारची

मी माझ्या घराच्या खिडकीशी बसलेय. सकाळचे साडेपाच वाजलेत. रविवार आहे. खर तर मला इतक्या लवकर उठायची काही गरज नाही पण आदतसे मजबूर . रोजची  उठण्याची हीच वेळ असते, त्यामुळे आपोआप  जाग येतेच. पण आज रविवार आहे. सगळं घर गाढ झोपेत आहे. सश्याच्या गतीने पळू पाहणा-या रविवारला बंद पापण्याआड पकडून पहात अंगावरच्या रजईत लपेटून  घेताहेत. पण मी जागी आहे. नुसतीच जागी नाही तर मस्त चहाचा कप घेऊन खिडकीशी बसले आहे.
बाहेरही सगळं शांत आहे. अंधाराचं गडदपण मंद होत चाललय.थंडीची झुळूक अंगावर बारीक काटा फुलवतेय खरी,पण तीही हवीहवीशी वाटतेय. समोरच्या घरातल्या आजी नव्वदीच्या उंबरठ्याशी आलेल्या , ओटयाशी  वाकून काहीतरी करताहेत ते मला माझ्या खिडकीतून दिसतंय. चहा करताहेत त्या.आता थोड्याच वेळात आपला वाफाळता कप घेऊन त्या बाहेर बाल्कनीत येतील. अंगाची जुडी करून सकाळची ही वेळ चहाच्या एकेका घोटाबरोबर अंगात मुरवत खुर्चीत बसून रहातील.
शेजारचं फाटक वाजलं. आता हळूच फाटक उघडलं जाईल. परत हळूच कडी घातली जाईल. शेजारच्या वहिनी फिरायला बाहेर पडतील. फिरायचं निमित्त असतं खर तर . त्या दूध आणायला बाहेर पडतील.पण सतत या दबावाखाली असतील की आपल्या फाटक उघडण्यामुळे कोणाची झोपमोड तर झाली नाही ना?
अजूनही अंधाराला उजाळा मिळालेला नाही. दूर कुठेतरी एखादी रिक्षा शांततेला उसवू पाहतेय.पण अजूनही घराघरातले दिवे झोपलेत. बाहेर नारळाच्या झावळ्या थंडीला अंगावर खेळू देताहेत. निस्तबद्धतेने. आजोबाने अंगाशी झटणा-या नातवाला न्याहाळावं तशा .
पक्षी उठलेत. पावसाळ्यात आपल्या सवंगड्याना साद घालणारे छोटे छोटे पक्षी आता गायब झालेत त्यामुळे फक्त कावाळ्याचा आवाज आणि मधेच कुठे तरी टीटयांवचा स्वर ऐकू येतोय. आता अंधाराला माघार घ्यावीच लागणार आहे कारण पूर्वेला दिशा उजळायला लागली आहे. झावाळयाही त्याचं समंजसपणे दिवसाला सामोर जाण्याच्या तयारीत आहेत. शेगड्या पेटवून चहाचं आधाण ठेवल्याचेही आवाज यायला लागलेत. रस्ता जागा झालाय. फिरायला जाणा-यांची चाहूल यायला लागलीय. मंद धुक्यात तरल पहाटेला कुशीत घेऊन तिचा निरोप घेऊ पहाणारा अंधार दिसेनासा झालाय आणि महानगरी आठवड्याचा शेवटचा दिवस मुठीत पकडायला जागी होतेय , येणा-या आठवड्याच्या deadlines calculate करत.   

Saturday, November 22, 2014

देवाबद्दलची माझी संकल्पना

काय असत की, एका ठराविक वयानंतर  माणसाला आपल्या वेगवेगळ्या संकल्पना तपासून पाहण्याचा नाद लागतो. लहानपणी हे असले विचार मनात येणं अशक्यच. पराकोटीच्या हुशार किंवा अलौकिक व्यक्तिंबाबतच  असली वैचारिक चर्चा संभवते. आणि आपण तर सर्व सामान्य. तरुण वयात आपली जी काही बरी वाईट मत असतात ती ठाम तयार झालेली असतात.शिवाय भवसागराच्या लाटा नाका तोंडात जाऊन जाऊन दमछाक होत असते . त्या लाटा परतावण्यातच  निम्मी शक्ती खर्च होत असते.पण वय वाढल्यावर ( अग बयो , म्हण की म्हातारपणी ) वेळच वेळ. जी काही मदतनीसाची भूमिका असते ती पार पाडल्यानंतर वेळच वेळ. अशा वेळी मनात उन पावसाचा लपंडाव चालू असतो. तो कधी सुखद असतो तर कधी त्याला कातरतेची किनार असते. अर्थात ती क्षणभरच. कारण गेलेले दिवस परत येत नाहीत हे आता मनाने स्वीकारलेलच असतं.
लहानपणाची हीच तर गम्मत असते. निरागसपणा अजून मनात भरलेला असतो. सगळं जग ( म्हणजे आजूबाजूचे शेजारी , शाळेतल्या मैत्रिणी आणि शिक्षक ह्यापरत वेगळं जग असतं कुठे लहानपणी ?) चमत्कारानेच भारलेल असतं या वयात. अर्थात आता "असे" असंच म्हणावं लागेल. कारण आताची मुलं शास्त्रीय युगातली असल्यामुळे ज्या गोष्टी आम्ही डोळे मिटून मान्य करत होतो त्या गोष्टीतल्या तृटी  सहजपणे शोधून त्यावरची उपाययोजनाही ते आपल्याला अशा सहजतेने सुचवतात की वाल्मिकी आणि व्यासांनी ह्यांच्या पायाशी बसून story telling चे धडे घ्यावेत.
पण आमच्या लहानपणी सगळ्या जगाची तीन भागात वाटणी झालेली होती. पैकी देव हे चांगले असल्याने ते आकाशात, माणूस अर्थात पृथ्वीवर आणि राक्षस ( ज्यांचं काढताच लपायची सगळ्यात सेफ जागा म्हणजे आईच्या पदराखाली ) हे पाताळात. बरं देवही तेहेतीस कोटी .वेगवेगळी शक्ती असल्याने वेगवेगळ्या संकटात त्यांचा धावा केला जायचा. म्हणजे परीक्षेत अडचण तर देवी सरस्वती. बुद्धी तर अर्थातच देवा श्रीगणेशा. शक्तीसाठी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आणि भूत प्रेत समंधादीसाठी रामरक्षा आणि भीमरूपी यांचा  डबल  डोस असायचा शिवाय या सगळ्या देवांची वस्ती गाईच्या पोटात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यामुळे दिसेल त्या गाईला हात लावून आम्ही मैत्रिणी पुण्याचा अखंड संचय करून ठेवत असू. कारण देवांच्या वस्तीत स्वर्ग आणि नरक अशीही एक विभागणी असायची. स्वर्गात गेलं तर प्रश्नच नाही. आपण फक्त कल्पवृक्षाखाली बसायचं आणि अमृत पीत रहायचं. कारण त्या अप्सरांच्या नाचात वगैरे आम्हाला रस नव्हता. पण नरकात जाऊन पापणीच्या केसाने मीठ गोळा करायच किंवा कढईत उकळत्या तेलात पडायचं म्हणजे अंमळ कठीणच होतं. असो. गेले ते दिवस आणि उरल्या त्या त्यांच्या निरागस आठवणी. चेह-यावर स्मितरेषा उमटवणा-या .
घरातलं बुद्धिवादी वातावरण, वाचनाने दिलेली व्यापक दृष्टी यामुळे देवाबद्दलची संकल्पना बदलायला लागली. देव मूर्तीत नसून माणसात आहे, याचं भान येऊ लागलं. पण तरीही संत वाचनातला भक्तभाव मनाला लुभावत होताच. संतांसाठी देवाने रूप धारण करावं, जनाई ला दळू कांडू लागावं, नरहर सोनाराला कमरपटटया साठी माप देताना कधी शंकर तर कधी विठ्ठलाचं रूप दाखवाव आणि सर्व देव एकच आहेत हे पटवावं. दामाजीपंतासाठी बादशहापुढे " तुमच्या महाराचा मी महार" म्हणावं , एकनाथा घरी पाणक्या श्रीखंड्या बनून पाणी भरावं यातला romanticism मनाला स्पर्शून जात होताच.  पण काही मिळवण्यासाठी उपास कर, कुठलतरी स्त्रोत ५० वेळा वाच किंवा अमुक देवळाला अनवाणी पायाने प्रदक्षिणा घाल हे फारच हास्यास्पद वाटायचं. आयुष्यात अनेक कसोटीचे प्रसंग आले. पुढे अंध:कार असावा वाट दिसेनाशी झाली. त्यावेळी " परमेश्वरा" अशी आर्त हाकही ओठी आली पण ती ठेच लागल्यावर " आई ग...' ओठी आलं तितक्याच सहजतेची होती. जखमा धुवून पुसून आपणच मलमपट्टी करायची आहे हे माहीतच होतं.
वयानुसार भाबडेपणा अधिकाधिक कमी होत गेला. पण त्याचबरोबर तरुण वयात देव देव करणा-यांबद्दल जे कुत्सित उपहासाने बोललं जात होतं ते बंद झालं. आपल्याच आयुष्यात अगदी तरुण वयात आपणही काही  जीवघेण्या प्रसंगात देवाला साकडं घातलं होतं, ते पूर्ण केलं होतं, हे आठवू लागलं. म्हाता-या सासूला बर वाटावं म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निमुटपणे केल्या होत्या. क्वचित प्रसंगी मनाला न पटणा-या गोष्टी शिष्टाचार म्हणूनही केल्या होत्या त्या व्यक्तीच्या दुख-या मनाला आधार मिळावा मानूनही केल्या होत्या हे सगळं आठवलं मग लक्षात आलं,. मनुष्य काही गोष्टी जनरेटयामुळे करतो, मनुष्याला अशा वेळी नेहमीच त्याविरुध्द दंड थोपटता येतातच असं नाही. जोवर त्या समाजाला घातक नसतात तोवर तिकडे कानाडोळा करणच श्रेयस्कर अस् वाटायला लागलं. एकप्रकारची क्षमाशीलता सहानुभूतीची अनुभूती मनात यायला लागली. देवाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न तरी यापेक्षा वेगळा काय असणार, नाही का?  आणि देवत्व म्हणजे तरी काय ? मनाची शुध्दता, आणि वृत्तीची निरागसता. हो ना?    

Friday, November 14, 2014

मल्हारबरोबर वाढताना

मल्हार तीन वर्षाचा होईपर्यंत माझं तसं बरं चाललं होतं. म्हणजे मी आजी आणि तो माझा नातू इतक स्पष्ट आमचं नातं होतं. मी त्याला काऊ चिउच्या गोष्टी सांगाव्यात भरवावं, जोजवावं. त्यानेही आपल्या बाळमुठीत माझं बोट पकडून मला त्र्यैलोक्याच साम्राज्य द्यावं. कसं मस्त चाललं होतं आमचं.पण मग तो वाढताना जाणवलं ते वेगळंच
 माझ्या पिढीच्या अनेक आज्याप्रमाणे  मीही ठरवलं होतं की जे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत डोळसपणे करू शकलो नाही ते नातवाच्या बाबतीत करायचं. म्हणजे आपल्या संसाराच्या धबडग्यात आपण मुलं वाढवतो असं आपल्याला वाटतं, पण ती खरं तर आपल्याला बघत आपणच वाढतात. तसं आजी झाल्यावर होत नाही. नातवंडाबरोबर घालवलेला क्षण न क्षण आनंददायी असतोच पण तो आपलीही वाढ करत असतो अस आता मला सतत वाटत असतं .
मल्हार लहान असताना मी सतत त्याच्याशी बोलत असायची. वेगवेगळी गाणी गुणगुणत असायची. तोही टकामका बघत ऐकायचा असं वाटायचं  पण त्यापेक्षाही त्या गाण्यांचे सूर,त्यांचा अर्थ त्याच्या आत आत कुठेतरी अधिक स्पष्ट रीतीने उमटतोय असं जाणवत रहायचं. दोन दिवसापूर्वीची गोष्ट. गाण  ऐकायचं असं मल्हार म्हणाला म्हणून एक कासेट लावली. तल्लीनतेने बसून त्याने पूर्ण ऐकली. परत दुस-या दिवशी " कालच्या आजीचं गाणं लाव म्हणून त्याने काढली ती कासेट किशोरी अमोणकरांची होती.
  जेव्हा मल्हार इतक्या लहान वयात मराठी भाषा समृ ध्दपणाने वापरतो तेव्हा खूप आनंद होतो.म्हणजे त्या दिवशी तो मावशीला तुझ्या घरी येतोय म्हणून सांगत होता. वर म्हणाला की" तूच फार दिवस भेटला नाहीस म्हणून भेटायला ये अशी गयावया करत होतीस ना म्हणून येतो." मध्ये तर सतत त्याला " कुहू" चावल्यासारखा कविताच करायचा. मराठी यमक जुळवून काहीतरी म्हणायचा आणि वर मला सांगायचा, " अरे, कविता झाली की रे."मल्हारच्या लेखी स्त्री पुरुष सगळेच " अरे " असतात.
 तो अगदी २ वर्षाचा असल्यापासून आम्ही दोघंही जवळच्या बागेत सकाळी जात असतो.तिथेही त्याला गवतावरचे दवबिंदू दाखव हिरव्या कोवळ्या गवताची , वाळलेल्या गवताशी रंगसंगती दाखव  रंगीबेरंगी फुलं , आकाशातले रंग , पक्षांची माळ दाखव  असे आमचे उद्योग  चालायचे.गम्मत म्हणजे  तो जेव्हा स्वानंदीबरोबर  कपड्याच्या दुकानात जातो तेव्हा आपले कपडे स्वत; पसंत करतो आणि ते खरच छान असतात. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट अशी की आमच्या बागेतल्या झोपाळ्यावर बसून तो ज्या एकतानतेने झोके घेतो ते बघत रहाण्यासारखं असतं .
आजी झाल्यावर मला असं वाटतं की मूल थोडं मोठं झालं की त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघितलं जायला पाहिजे. मी आई असतानाही माझ्या मुलांवर ती लहान असताना कोणत्याच बाबतीत दडपशाही  केली असं मला स्वत:ला वाटत नाही. कारण तशी तर माझ्यावरही माझ्या आईवडिलांनी केली नाही. पण मला वाटतं तेव्हा नकळत का होईना माझा दृष्टीकोन पालकत्वाच्या superiorityचा होता. म्हणजे ह्यांना काय समजतंय , ह्यांना शहाणं करून जगात रहाण्यायोग्य करणं, त्यासाठी त्यांची सर्वतोपरीने "काळजी " घेणं हे आई म्हणून माझं परम कर्तव्य आहे असा एक भाव होता. त्यामुळे त्यांच्यापरतं मला ( आजही ) दुसरं जग प्रिय नसलं तरीही आजी झाल्यावर एक फरक झाला तो हा की त्या बालजीवाचं म्हणणं " चिमखडे चमकदार  बोल " या सदरात न  घेता त्यावरही विचार केला जावा.ह्याचं एक उदाहरण म्हणजे संध्याछाया पडल्यानंतर सकल जोडप्यांचा वेळ जाण्यासाठी उगीचच वाद घालणं हा एक आवडीचा उद्योग असतो.( गरजूंनी आजूबाजूला  चौकशी करावी).कारण होतं काय की इतकी वर्षं एकत्र काढल्यानंतर नवरा बायकोला आणि बायको नव-याला संपूर्ण कंगो-यानिशी ओळखत असते.त्यामुळे एकमेकांच्या बोलण्यातला between the lines अर्थ ते चांगलेच जाणून असतात. पण मल्हार ३ वर्षांचा असताना एकदा ( बहुधा तोः तोच प्रयोग परत परत पाहून वैतागून ) मला म्हणाला, " कुकुली तू आणि आबा सारखे का भांडता? " त्या क्षणी मला फार फार वाईट वाटलं आणि त्यापेक्षाही जाणवलं ते हे की अरे, हे बाळ  आता मोठं झालं की . त्यानंतरआम्ही वेळ घालवायचे अन्य मार्ग शोधले.हे सांगणे नलगे.हे आई असताना कदाचित वेगळं घडलं असतं . त्यामुळे माझ्यासमोर केवळ मल्हारच वाढत नाही मीही वाढतेय. आणि ते निश्चितच आनंददायी आहे.एका अटळ सत्याकडे जाण्याच्या वाटेवर अंगावरची एकेक पुटं गळून पडावी आणि आत आत काहीतरी कोमल उमलत जावं पाकळी पाकळीनं तसं वाटतंय . 

Saturday, November 1, 2014

मल्हारची पहिली परदेशवारी

साधारण 2 महीन्यापूर्वी मल्हार ( वय वर्षे ५) म्हणाला, आम्ही तिघे गावाला जाणार आहोत. मला वाटलं नेहमीप्रमाणे कुठेतरी फिरायला जाणार असतील. मग आपणच उचंबळून म्हणाला, " अमेरिकेला." काहीतरी गम्मत करतोय असं वाटून मीही गमतीत ," चला बाई यावेळी आम्हीपण येणार" असं म्हणून त्याला चिडवलं. तर रात्री निकेतने सांगितलं की  त्याला आणि स्वानंदीला  त्यांच्या कंपनीच्या कामासाठी अमेरिकेला जावं लागणार आहे आणि मल्हार एकटा  राहणार नाही त्यामुळे त्यालाही घेऊन जायचं आहे.मग दोन महिने मल्हारला त्याच्या नकळत न्याहाळण ही एक मेजवानीच होती.
पहिली चुणूक जेवायच्यावेळी दिसली. मल्हारला जेवताना टी व्ही. बघायला आवडतं. जेवताना मुलांनी टी.व्ही  बघू नये हा योग्य दंडक कोणत्याच लहान नातवंडाच्या आजीकडून ( अर्थात काही सन्माननीय अपवाद  वगळता ) पाळला जात नाही. याचं कारण वयपरत्वे त्यांची थकलेली गात्रं . मल्हार  जेवताना १दिवस टी . व्ही  बघतो  १ दिवस बागेत झोपाळ्यावर बसतो. १ दिवस पुस्तक वाचतो . (म्हणजे मी वाचून दाखवते. ) तर एक दिवस फर्मान निघालं, " कुकुली , आता रोज टी .व्ही च बघायचा." म्हटलं , का रे बाबा? तर म्हणे, अग, आता मी अमेरिकेत जाणार ना, तर मला इंग्लीश कळायला नको का?  मनात आलं, लहान असो की मोठा, प्रत्येकाला त्याची त्याची टेन्शन्स असतात. मग पुढचा महिना आमच्या घरी इंग्लीश विम्ग्लीशच चालू होतं.आम्ही पूर्वी बुध्दिबळ  खेळत होतो, पण आता मला त्याच्याबरोबर चेस खेळावं लागायचं. राजा, राणी हत्ती घोडे प्यादी जावून् त्यांची  इंग्लीश नावं पाठ करता करता मला सारखाच चेक मेट पत्करायला लागू लागला. " कुकुली, give वरणभात no चपाती " किंवा "i take आंबापोळी to eat. hungry." अशी चमकदार वाक्यही तो मधून मधून पेरू लागला.प्रत्यक्षात तो मराठीत आणि माझ्या भावाची नात अमेरिकन इंग्लीशमध्ये एकमेकांशी   व्यवस्थित "बडबडले". ह्याने तर अमेरिकन मुलांना " खेळायला येता का ? " असं  विचारून पळवूनच लावलं .
ह्याची पुढची पायरी म्हणजे ज्ञानाचा अखंड स्त्रोत. आधीही आमच्या या  " ज्ञानाने" अगदी धिरड्याचे पीठ गुठळ्या  न होऊ देता कसे ढवळावे याच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकापासून कुठल्याशा काळातले डायनोसोरच्या "भीषण" नावापर्यंत माहिती देऊन आम्हाला भंडावून सोडलं होतच. त्यातच आता अमेरीका वारीची भर पडली. " कुकुली, तिथे पोचायला दोन दिवस लागतात. बसलं की लगेच पोचत नाही ". ही  वर जोर. बहुधा ऐकलेली माहिती परत घोकल्यामुळे लक्षात राहते याचा तो वस्तुपाठच असावा. " आणि दोन दिवस आपण पारोशी असतो." असंही तो तोंड वेडंवाकड करून सांगायला लागला. प्रत्यक्ष निघण्याच्या दिवशी साधारण सेनापती बापट मार्गावर त्याला भूक लागल्यामुळे त्याने त्याच्या वेगळ्या डब्यातली पोळीची गुंडाळी संपवली .पुणे मुंबई . हायवेचे दिवे बघून त्याला मुंबई आल्याचा आनंद झाला. त्यामुळे त्याच्या बाबाला  भीती वाटली की  लोणावळा येता येता हा बहुधा अमेरिका आली म्हणून गाडीतून उतरणार.पण पुढचा प्रवास अगदी सुरळीत झाला. ज्याची भीती वाटत होती त्या विमानातल्या " शी "सकट. फक्त अमेरीकेबद्दलच त्याचं पाहिलं मत असं  की  " हे लोक पाणी इतकं  गार करून पितात की  त्याची चव जाते. "
अमेरिकेत काय बघायचं ते  त्याचं भारतातच पक्कं  ठरलं  होतं. त्यामुळे पोलर बेअर . पेंग्विन ,वगैरे भारतातल्या प्राणिसंग्रहात न  दिसणारे प्राणी बघायला मिळाल्याचं सांगताना त्याचे लकाकणारे डोळे बघायचा आनंद वेगळाच होता. आणि पू , टिगर ह्यांना त्याने मारलेली मिठी आणि संतांनी विठोबाला दिलेलं आलिंगन यात फार काही अंतर असेल असं  मला वाटत नाही. फक्त ज्या डायानोसोरना बघायला तो उत्साहाने गेला तो भीमकाय डायनोसोर त्याच्यासमोर येऊन ओरडला आणि आपल्या तोंडातला  सरडा त्याने त्याच्या अंगावर टाकला, तेव्हा त्याच्याच भाषेत सांगायचं तर त्याची चड्डी " हिरवी निळी काळी पिवळी" व्हायला आली होती. पण तेवढ्यात त्याला त्या प्राण्याच्या आतल्या माणसाचे पाय दिसल्यामुळे पुढील समरप्रसंग टळला.डायनोसोरच खर फोसिल हातात धरायला मिळाल्यामुळे आमचा हा भावी पेलेंटोलोजीस्ट  धन्य धन्य जाहला.
२० दिवसानंतर पहाटे गाडीतून उतरून आपल्या घराकडे बघताना त्याच्या चेह-यावर जे भाव होते ते बघून मीच उचंबळून आले. माझा हा जन्माने अमेरिकन नागरिक मनाने भारतीयच आहे याचा फार फार आनंद झाला. जसा ५वर्षांपूर्वी त्याचे आईवडील त्या मोहमयी दुनियेला दूर सारून आपल्या माणसांच्या ओढीने हातात त्याचं ९ महिन्याचं मुटकुळ घेऊनपरत  भारतात  आले होते तेव्हा झाला होता तसाच.