Friday, October 3, 2008

नवरात्र

पितरपाठ सरता सरता आमच्या शाळेत स्टाफरुमच्या शेजारच्या जिन्याखालच्या खोलीची साफसफाई सुरु होई आणि आम्हाला शाळेतल्या शारदोत्सवाचे वेध लागत. घटस्थापनेच्या दिवशी छान नटून थटून शाळेत जावं तर समोरच्या दृश्यानं मन प्रसन्न होई. शाळेच्या प्रवेशदाराजवळ हिरवेगार रसरशीत केळीचे खुंट बांधलेले असत. प्रवेशदाराच्याचजवळच्या व्हरांड्यात सनई - चौघडावाले येऊन सज्ज असत. संपूर्ण ग्राऊंड पाणी मारून, रांगोळी घालून सजलेले असे. सगळं वातावरणच मंगलमय, आल्हाददायक असे. शाळेच्या मुख्याध्यापिका शारदादेवीची पूजा करत, आरती होई. बाई शारदेची, पर्यायाने विद्येची उपासना कशी करावी हे कळकळीने सांगत. मग खिरापत घेऊन आपापल्या वर्गात जाण्याऐवजी आम्ही रांगेने आमच्या चित्रकलेच्या वर्गात जमत असू. (हा वर्ग खूपच मोठा असल्यामुळे आमच्या शाळेचे सगळे कार्यक्रम इथेच होत असत.) जेरेशास्त्र्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी! वर्षानुवर्षे शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी आमच्या शाळेत जेरेशास्त्र्यांचं प्रवचन असे. समोर बसलेल्या मुलींना समजेल अशा सोप्या रीतीनं जेरेशास्त्री प्रवचन करीत. लहानपणी त्यांची धीरगंभीर, तेज:पुंज मूर्ती मनात इतकी ठसली होती की, पुढे कित्येक वर्षं गोष्टीच्या पुस्तकात "विद्वान ब्राह्मण" असा उल्लेख आला की, माझ्या डोळ्यासमोर हमखास जेरेशास्त्र्यांची मूर्ती येत असे. दुस-या दिवसापासून नवरात्रीचे दिवस क्रीडा, भाषण, गायन, नाट्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांनी गजबजून जाई.
कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईचं नवरात्र सुरु होई. अंबाबाईची रोज षोडषोपचारे विविध प्रकारची पूजा बांधली जाई. आजही बांधली जाते. या पूजेने सजलेली, विलक्षण तेजाने उजळून निघालेली देवीची मूर्ती पाहण्यासाठी देवालयाचा परिसर गजबजून जाई. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून बायाबापड्या दर्शनाला येत. मंदिराच्या परिसरातच एकमेकींना हळदीकुंकू लावत. नवीन लग्न झालेल्या पोरीबाळींची चेष्टा मस्करी करत. घरच्या धन्याला, लेकराबाळांना उदंड आयुष्याचं दान आईकडे मागत. आंबाबाईची मूर्ती डोळ्यात साठावत माघारी परतत. जाणकार लोक देवी जिथे प्रगट झाली त्या स्वयंभू स्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय रहात नसत. रात्री अंबाबाईसमोर नामवंत गायक, वादक आपली "सेवा" रुजू करत आणि करवीरवासी रसिक त्यात न्हाऊन चिंब होत.
पाचव्या माळेला म्हणजे ललितापंचमीला त्र्यंबुली यात्रा किंवा टेंबलाबाईची जत्रा असे. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी. बहिणीच त्या, भांडल्या एके दिवशी कशावरून तरी. टेंबलाई रुसली आणि गावाबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. काही दिवसांच्या अबोल्यानंतर अंबाबाईला चैन पडेना. ती निघाली बहिणीची समजूत काढायला. ललितापंचमीच्या दिवशी अंबाबाईची पालखी वाजत गाजत टेंबलाईच्या टेकडीवर जाते. दुपारी बारा वाजता टेंबलाईच्या देवळाच्या प्रांगणात दोघी बहिणी भेटतात. त्यावेळी कोहळा फ़ोडला जातो. त्याचा एखादातरी तुकडा मिळावा यासाठी भाविकांची झुंबड उडते.
राजघराण्याच्या खाजगी भवानीमाता मंदिरात हे नवरात्र सुरु होतं. भवानीमाता शिवछत्रपतींचं कुलदैवत. त्यांच्या वंशजांची एक गादी कोल्हापुरात असल्यामुळे या नवरात्राला एक वेगळच खानदानी क्षात्रतेजाचं वलय आहे. इथेही गर्दी असते; पण अंबाबाईच्या देवळाच्या मानाने कमी. देवळामधली राजगादी, शाहूमहाराजांचा भव्य पुतळा, त्यांनी मारलेला आणि पेंढा भरून ठेवलेला गवा रेडा या सगळ्यामुळे मंदिरात एक अदबशीर शांतता असे. या देवीलाही रोज वेगवेगळ्या प्रकारे सजवले जाई. दरबारी गायक, वादक देवीपुढे सेवा रुजू करत. देवळात आलेल्या बायाबापड्या देवीनंतर महाराजांच्या गादीपुढे, शाहूमहाराजांच्या पुतळ्यापुढेमाथा टेकतच; पण या लोकांच्या राजाने प्रजेच्या मनात इतकं आदराचं स्थान मिळवलं होतं की, त्याने मारलेल्या गव्याचीही हळदीकुंकवाने त्या पूजा करीत. ही रणरागिणी भवानीमाता क्षत्रियांचं दैवत असल्यामुळे नऊ दिवस देवीपुढच्या चौकात तलवारीच्या एका फटक्यात बकरं मारलं जाई.
या मोठ्या उत्सवाबरोबरच आणखी एक उत्सव सुरु होई तो आम्हा मुलींचा. कोल्हापुरी भाषेत हादगा म्हणजे भोंडला. मुलगी साधारण पाच वर्षांची झाली की हादगा मांडला जाई तो ती सोळा वर्षांची होईपर्यंत. म्हणजे हादगा हा सण कुमारिकांचा मानला जाई. हस्त नक्षत्र लागले की याची सुरवात होई आणि नक्षत्र संपले की हा बोळवला जाई. म्हणजे हादगा १५ दिवस आणि १६व्या दिवशी बोळवण! हादग्याचा एक कागद मिळे. त्यावर एकमेकांसमोर तोंड करून सोंडेची कमान करून हत्ती असत. वर अंबारी सजलेली असे. बाजूला मुली फ़ुगडी घालत असलेल्या, बायका नटून थटून पूजेला चाललेल्या असत. हा कागद घटस्थापनेच्या दिवशी घरातल्या भिंतीवर चिकटवला जाई. त्याला चुरमु-याची, भिजवलेल्या शेंगदाण्यांची, गव्हाच्या ओंब्यांची, फुलांची आणि मुख्य म्हणजे सोळा प्रकारच्या फळांची माळ घातली जाई. आमच्या लहानपणी ब-याचशा घरांना भल्या मोठ्या बागा असत आणि त्या फळाफुलांने बहरलेल्या असत. मग घटस्थापनेच्या आदल्या दिवशी, शाळा सुटल्यावर सगळ्यांच्या बागा धुंडाळायचा एक कार्यक्रमच असे. जास्तीजास्त फळं मिळवण्यासाठी आमचा आटापिटा चाले. कुठे घरातल्या काकींना "पटवून" तर कुठे कुंपणाची तार वर करून गुपचुपबागेत शिरून तर कुठे "माझ्यातला एक पेरू तुला देते, तुझ्याकडचं एक केळं मला देतीस काय?'' अशा गंभीर वाटाघाटी करून फळं जमवली जात. या सगळ्या माळांनी सजलेला कागद भिंतीवर चिकटला की धन्य धन्य होई. मग सोळा दिवस पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याभोवती फ़ेर धरून नाचताना, लोकगीतातून साकारलेली या मातीची गाणी, या मातीतली गाणी गाताना मन झपूर्झा घेत रोज वेगळी खिरापत आणि तिची संख्याही चढत्या भाजणीने. रोज नवी गाणी आणि एकेक वाढत जात असलं तरी सुरवात मात्र "ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा'' अशी गणेशाला साकडं घालूनच होई. आता विचार करताना वाटतं की, आपल्या या शेतीप्रधान देशातला हा सृजनाचाच एक उत्सव असावा. सोळाव्या दिवशी हादगा बोळवायचा असल्याने त्या दिवशी तर साखरखोब-यापासून लाडूकरंजीपर्यंत सर्व प्रकारची खिरापत तर असेच पण साटो-या- कोल्हापुरी भाषेत सारनो-या, खांडवी/खांतोळी, वाटली डाळ/मोकळं तिखट, आणि मटकी उसळ यांचा समावेश असावाच लागे. एवढे सगळे पदार्थ असल्यामुळे प्रत्येकीचा हादगा वेगवेगळ्या दिवशी बोळवला जाई. मात्र हादग्याला दिवाळीचे दिवे दिसता कामा नये असा अलिखित दंडक असे "नाहीतर आंधळं व्हायला हुतय बाई'' याभितीनं भराभर हादगा बोळवण्यासाठी मुली आपापल्या आयांच्यामागे लागत. आता लक्षात येत ते हे की, पूर्वी सगळे फराळाचे प्रकार घरीच आणि मुबलक प्रमाणात करायचे असल्यामुळे त्या गडबडीत हादग्याचं प्रकरण नको म्हणून कुणीतरी हे आंधळेपणाचं पिल्लू सोडलेलं असावं.
हादगा संपला की चार दिवस हुरहूर वाटे पण लहान वयात दिवाळीच्या किल्ल्याचं, रांगोळीचं, फराळचं आणि मुख्य म्हणजे सटीसामाशी मिळणा-या नव्या कपड्यांचं आकर्षण त्यावर मात करी आणि आम्ही दिवाळीचे बेत करण्यात रंगून जात असू.
आजही नवरात्र असंच साजरं होत असत. काही किरकोळ फ़रक झालेही असतील, कारण कोल्हापूर सोडूनही ३५ वर्षं झाली. पण मला खात्री आहे आजच्या मुलींनाही हे उत्सव तितकेच आपले वाटत असतील. कारण वरचं आवरण बदललं तरी आतला गाभा भारतीय मनाचा आहे, तसाच लख्ख आणि निखळ!