गतजीवनात फेरफटका मारताना साधारणपणे आपल्याला आपले आई - वडील , भाऊ - बहीण , मित्र - मैत्रिणी आठवतात. त्यांच्या सहवासात घालवलेले बरे वाईट क्षण आपण परत अनुभवतो., मनातल्या मनात . पण आपल्या घरच्या मोलकरणी किंवा इतर सेवा पुरवणारे लोक , दारावर येणारे भिकारी , बहुरूपी , फकीर यांनीही आपल्या मनाचा छोटासा का होईना कोपरा व्यापलेला असतो असं माझ्या मनात आलं आणि मग लहानपणापासून भेटलेल्या अशा कितीतरी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या .
कोल्हापूरला माझ्या लहानपणी एक म्हातारीशी मोलकरीण होती. ती आठवण्याचं कारण मोठ गमतीदार आहे. आमच्या गल्लीत आम्ही खूप मुली होतो . मग मध्येच कधीतरी साड्या नेसायचं ठरायचं . माझी आई नेसायची नौवारी साडी. ती ७ - ८ वर्षांच्या मुलीला कशी नेसवता येणार ? मग माझ रडणं आणि आईच करवादण असा जंगी कार्यक्रम चालायचा . त्या कार्यक्रमाला ही मोलकरीणही ( तिच नाव आठवत नाही आता मला ) हजर असली तर आईला म्हणायची , " दमा हो वैनी , उगा कावू नगासा लेकराला . मी नेशिवतो लुगड .आना हिकडं ." मग ती काय जादू करायची नकळे . पण पोटावर नि-यांचं भलमोठ केळं वागवत आणि नि-यांचा बोंगा संभाळत मी मैत्रीणीत मिसळायचे . तशीच आमच्या शेजारच्या कुलकर्ण्याकडे एक जोगतीण यायची . तिचं भंडारा लावलेल कपाळ, कमरेपर्यंत आलेले जटेचे केस , मधूनच दात विचकायची सवय असलेला तिचा चेहरा मला स्पष्ट आठवतो . आता तिच्याबद्दल कणव वाटते , पण तेव्हा तिची भीती वाटायची .ती गोष्टी मात्र मस्त सांगायची .आपल्या गावरान भाषेत कथेतली पात्रं ती हुबेहूब उभी करायची .लोकसाहित्याची आवड कदाचित तिच्यामुळे माझ्यात रुजली असावी . परटीणबाई आमचे कपडे धुवायची , पण आईला बाहेरच्या जगात आजूबाजूला चाललेल्या घटनांची माहिती पुरवणं हाही तिच्या कामाचाच भाग असावा बहुधा. तसंही ६० वर्षांपूर्वी घरातच जुंपलेल्या स्त्रियांना अशा " मैत्रिणी " असणं गरजेचच नव्हत का ? परटीणबाईचे मालक दर दिवाळीला पटका बांधून बायको बरोबर ओवाळणी मागायला यायचा . भल्या पहाटे . आणि परटीणबाई पुरुष माणसांना तेल लावायची. ( जे आमच्या घराच्या कोणाही पुरुषाने कधीच लावून घेतलं नाही . ) या परटाच आमच्या मागच्याच गल्लीत दुकान होत . तिथे कपडे आणायला गेल तर कधी कधी तो कोळशाची इस्त्री पेटवत असायचा . हळू फुंकर घालून निखारे फुलवायचा . कधी राख उडायची तर कधी ठिणग्या . तापलेली इस्त्री आधीच पाणी मारून ठेवलेल्या कपड्यांवरून चुरचुरत फिरायला लागली की कपड्यांच रूप पालटायच आणि एक खमंग वास दरवळायचा मस्तपैकी .
आमच्या शाळेत बापू , केशव आणि बक्षु नावाचे तीन प्यून होते . ही सगळी मंडळी कोल्हापूरच्या दरबारी खिदमतीत मुरलेली होती. त्यामुळे त्यांचं बोलणं मार्दवपूर्ण , हसणं मंद असायचं . त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम असायचं . पण बक्षु दिसायला भयंकर आणि वागायला तुसडा होता . त्यामुळे आमच्या लेखी तो " बक्षा " होता . त्याच्याशी संपर्क शक्यतो टाळला जायचा .
पुढे कॉलेजात दत्तू , गणपत आणि तयाप्पा असे ती प्यून होते . एकजात सगळे भगवा फेटा ( कोल्हापुरात याला पटका म्हणतात.) बांधणारे पाठीवर शेमला सोडणारे आणि धोतर नेसणारे होते . ही गोष्ट ५० वर्षांपूर्वीची आहे. तयाप्पा खूप प्रेमळ होता. तो वारला तेव्हा कॉलेजातली मुलं मुली रडली होती. त्याची मुलगी सुबक वाकळ ( गोधडी ) शिवायची . एकसारखे टाके बघत रहावेसे असत. ती माझी मैत्रीण होती. तिचं शिवण मला खूप काही शिकवून गेलं . तरुण वयात दत्तू पहिलवान होता . उंचापुरा राकट दत्तू बघूनच पोर गपगार व्हायची . एकदा तर त्याने कॉ लेजच्या ग्राउंडवर कोण्या मुलाने शिवी दिली म्हणून आधी त्याला चांगला तुडवला आणि त्याची चड्डी काढून घरी पाठवला होता. वर दम दिला. " जा ___ -___, चड्डी न्याला तुज्या बाला पाठिव . " त्यामुळे दत्तू आमचा आधार होता. शिवाय स्पोर्टस् डिपार्ट्मेंट्चा एक प्यून होता . तो आमच्या सामन्यांच्या आधी पायाला असा मसाज करायचा की पायाला पंख फुटायचे. पण हे करताना नजर खाली आणि स्पर्श सात्विक . मर्यादा , सभ्यतेचा तो आदर्श होता .
लग्न झाल्यावर सासरी काशीनाथ , वाल्हा, दगडू भेटले. पण त्यातल्या दगडूने मनात घर केलं . दगडूमामा घरातलेच एक व्यक्ती होते . नव्या सुनेला सासूचा रोष सहन करावा लागू नये म्हणून ते सतत मला सुचना करत आणि तेही शहाणपणाचा कुठलाच अभिनिवेश न बाळगता . " लहान्या बाई , बाईना ताकात लोणी राहिलेलं आवडत नाही . लोणी निपटून काढा . लहान्या बाई दादाना ढोबली मिरचीची भाजी पीठ पेरून आवडते. "अशा त्याच्या सतत सुचना असत . स्वयंपाक, शिवणकाम , बाजारहाट , व्यापार सगळ्यात तो निष्णात होता . अदबशीर आणि मृदु . मनाबाई कलाबाई , शांताबाई सगळ्यांनी प्रेमच दिलं . माझ्या मुलांना खेळवलं दुखाण्या खुपण्यात रिझवल . शांताबाई तर आमच्या मुलांना न्हाऊ माखू घालणारी यशोदाच होती . ह्या सगळ्यांच्या लुगड्याचा शेव आमच्या अंगणी झुलला हे आमचं भाग्यच . ह्यांनी जात्यावर बसून ओव्या म्हटल्या , गाणी गायली . खिनभर टेकून आपल्या संसाराची चित्तरकथा सांगितली.ह्यांच्या लुगड्याला गावाच्या काळ्या आईचा वास होता .नागरी शिष्टाचारापेक्षा वेगळी आपुलकी होती.
आणखी आठवतात ते दोघेजण . एक भिकारी दारी येऊन सुरात ओरडायचा , "म्हातारीला दात नाही . शिरा वाढा . " त्याला आम्ही तेव्हा हसायचो. पण आता वाटतं की दुर्दैवाच्या फे-यात अडकलेलां तो कोणी तालेवार होता की काय ? दुसरा एक फकीर होता. झोळीत मोरपिसांचा मोरचेल एका हातात कटोरा आणि दुस-या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या पट्ट्या . त्या वाजवून तो सुरेख नाद करायचा.. आपण जर त्याला कधी " बाबा , माफ करो " अस म्हटलं तर म्हणायचा , " देगा उसका भला , न देगा उसकाभी भला. "
कुठे गेली ही असली माणसं ? की फक्त आठवणीतले आभास होते ते ?