नंदिनीच्याबाबतीत माझं असंच झालं. आमचा आठजणीचा ग्रुप आहे. मधून मधून कुठेतरी भेटतो, बाहेर जातो, मजा करतो. आता सगळ्या सत्तरीच्या बाया. .त्यात आता जबाबदारी कसलीच नाही. त्यामुळे सतत काही ना काही चालू असतं.कुठे जायचं असलं की एका विशिष्ट ठिकाणी आम्ही जमतो आणि रिक्षाने पुढे जातो. सगळ्या जमल्या की मग नंदिता आणि सुमन घरंगळत येताना दिसतात. एकमेकीशी गप्पा मारत पाऊल टाकू की नको असा विचार करत त्या चालत असतात. एरवीही नंदिताच बोलणं हळूच. ती एकटीच असते. नवरा सोळा वर्षापूर्वी गेला. मुली अमेरिकेत. त्यामुळे तिची काळजी घेणं आपलं परम कर्तव्य आहे असं आमच्यापैकी प्रत्येकीलाच वाटायचं . मग रोज तिला आम्ही नाना प्रश्न विचारात असू. स्वयंपाक काय केला इथपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत सगळं सगळं आम्ही तिला सांगत असू. एखाद्या दिवशी आली नाही तर फोन करत असू. नंतर तिची आणि माझी जरा जास्त घसट वाढली . मग अधिक घरगुती गप्पा सुरु झाल्या. तेव्हा कळलं की नवरा असताना तिच्या एका मुलीचं लग्न झालं पण दुसरीचं मात्र नवरा गेल्यानंतर ठरलं .मुलगी अमेरिकेत. तिथलाच भारतीय मुलगा . लग्न आमच्या गावीच करायचं होतं . कार्यालय ठरलं तयारी झाली.आणि नवरादेवाकडून असं कळवण्यात आलं की , काही कारणामुळे त्याला कंपनी भारतात यायला रजा देऊ शकत नाही. ही इकडे एकटी कारण मोठी मुलगीही अमेरिकेत. तिने एकटीने कार्यालायाचं बुकिंग रद्द करण्यापासून सगळी कामं निपटली. एकटी अमेरिकेला गेली. तिथे मोठ्या मुलीच्या मदतीने धाकटीचं लग्न लावून दिलं. हे कळल्यावर मला वाटलं , आकर्षक कव्हर नसलं तरी आतली कथा आकर्षक असू शकते.
आमची दुसरी एक मैत्रीण आहे. प्रचंड हुशार. संत वचनं तोंडपाठ. सगळ्यांना अत्यंत प्रेमाने सल्ले देते. वयानेही मोठी असल्याने सगळे तिला मानही देतात. ती एकदा फोनवर मला म्हणाली , मला भयंकर भीती वाटते पुढे काय होईल याची. मला नवल वाटलं, इतक संतसाहित्याचं वाचन . सगळ्यांना तत्त्वज्ञान सांगतात आणि यांची अशी का बरं अवस्था ? पण मग जाणवलं की माणूस बाहेर जसा असतो तसाच आतही असेल असं नाही. माणूस वाचण्याची मला आवड आहे. मला माणसं वाचता येतात असा अभिमान होता. पण या दोन पुस्तकांनी तो धुळीला मिळवला . पण आता खूण गाठ बांधली आहे की कव्हर वरून पुस्तकाचं परीक्षण करायला जायचं नाही. त्यासाठी त्याच्या अंतरंगात डोकावायचं , चाळायचं नाही वरवर, मन लावून वाचायचं, संदर्भ बघायचे आणि मगच परीक्षण करायचं. कारण आधी कधी पुस्तकाची कव्हर्स फसवी असतात, कितीही आकर्षक आणि अनाकर्षक असली तरीही.
No comments:
Post a Comment