पुण्याहून कोल्हापूरला जाताना पेठ नाका ओलांडला की उजव्या हाताला एक टेकाड लागतं .४० ,४५ , वर्षांपूर्वी ते एक छोटं टेकाड होतं, आता त्याने चांगल बाळसं धरलय.तर तेव्हा त्यावर एक छोटुकलं देऊळ होतं. त्यावरची भगवी पताका फडफडताना दिसली की कोल्हापूर जवळ आलं, माझ्या माहेरची हद्द सुरु झाली म्हणून माझं मन फुलून यायचं . पुढे रस्त्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट जणू काही माझ्या घरातलीच आहे, असं वाटायला लागायचं . टेकाड मागे टाकून जरा पुढे गेलं की डाव्या बाजूला दोन रस्ते घरंगळत शेतात घुसायचे. तिथे लालचुटुक मिरच्या उन खात रस्त्यावर लोळत असायच्या. जरा पुढे गेलं की उफणलेल्या धान्याची रास उन खात असायची. दोन्ही बाजूला उसाची शेतं डोलत असायची.त्यांचा हिरवा रंग डोळ्यांना गारवा द्यायचा. बैलगाडीतून कडबा घेऊन चाललेले केरुनाना ,पांडूमामा,दुधाची किटली मोटारसायकलला लावून वेगाने जाताना तंबाखूची पिचकारी टाकणारा संपत, फताड्या शिंगांच्या म्हशीवर बसून म्हशी हाकणारा बबन्या , रस्त्यात आडवं आलेलं मेंढ्याचं खांड हुर्र , हुर्र करून हाकणारा विरुबाबा सगळे सगळे मला माझे सोयरे वाटायला लागायचे .
सासर आणि माहेर यात बारा तासांचं अंतर. मुलांच्या शाळा एप्रिलमध्ये संपायच्या .मुलांचे वडील साखर कारखान्यात कामाला. तेव्हा हंगाम सुरु असेल तर तो संपेपर्यत थांबायला लागायचं. कारण एवढ्या लांब मुलांना घेऊन मी अबला कशी जाणार? असा प्रश्न वडीलधा-यांना पडायचा.माझ्या मनातलं पाखरू तर जानेवारीपासूनच रुण झुणायाला लागायचं. आणि माहेरच्या वाटेने ओढ घेऊ लागायचं. पण मी एकटीने इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हणजे सशाच्या शिंगाइतकंच दुर्लभ. पण एकदा हंगाम जूनपर्यंत चालणार होता ,तेव्हां माझी झालेली दयनीय अवस्था बघू घराच्यानीच मला तिकीट काढून दिलं.सबंध प्रवासभर मी म्हणजे भेटीलागी जीवा लागलीसे आस या उन्मनी अवस्थेत. जम्बो आईस्क्रीमची फ्याक्तरी दिसल्यावर तर डोळ्यातून घळाघळा अश्रू. मुल कावरीबावरी. ते सगळ बघून समोरच्या म्हातारीने तर गहीवरच घातला. " पोरी, आपल्या हातात काय न्हाई लेकी, त्थाची विच्छा. "तेव्हा गडबडीनं तिला खरी परिस्थिती सांगितली. तर म्हातारी आपले मिश्री लावलेले काळे दात दाखवत मनापासून हसली आणि माझा अलाबला करत मनापासून म्हणाली, दोन लेकरं झाल्यावरबी म्हयेराचा एवडा सोस बरा न्हवं लेकी. " आता तिला काय सांगू कि माझ्या माहेराचीच नव्हे तर अख्या कोल्हापूरचीच ओढ मला लागलेली असते. शिष्टाचाराचे कोरडे नमस्कार मागे टाकून प्रेमाच्या कडकडीत मिठीला, " किती दिवसांनी भेटलीस ग नाल्ल्याक" असा गावरान झटका घ्यायला माहेरीच यावं लागतं आणि तेही बिनओळखीच्या ,अनोळखी नव्हे हं , बिनवळखीच्या बाईलाही लेकी म्हणाना-या आणि तिच्या चेहर्यावरून मायेने हात फिरवणा-या मावशी, काकी आणि मामीच्या कोल्हापुरात.