Sunday, September 11, 2022

दुसरेपण

दुसरेपण 
 पुस्तक वाचता वाचता का कोण जाणे कुंदाताई आठवल्या. खरं तर पुस्तकातल्या व्यक्तीरेखेशी त्यांचं काहीच साधर्म्य नव्हतं. तरीही त्या आठवल्या. आमच्या घरासमोरच रहायच्या त्या. मोठं घर होतं त्यांचं. दारापुढे बाग मागे भलंमोठं परसू. आमच्या गावात परडं म्हणतं त्याला. अण्णा ,त्यांचे यजमान, गावात शाळेत हेडमास्तर होते. घरचा जमीनजुमला होता. एकंदरीत सुखवस्तु ,किंबहुना सधन घर होतं ते. कुंदाताईंची नात माझ्याबरोबरीची ,दोन वर्षांनी लहान होती माझ्यापेक्षा. तरीही मी त्यांना कुंदाताई म्हणतअसे. नातीमुळे त्यांच्या घरी माझा मुक्त संचार असे. 
कुंदाताईंना दोन सुना. मोठा मुलगा अण्णांच्या पहिल्या बायकोचा होता. ती कुंदाताईंची बहीणच होती. ती वारल्यानंतर अण्णांनी कुंदाताईंशी लग्न केलं., मुलाला आई हवी म्हणून. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी अशी लग्न सर्रास होत असत. म्हणजे बायको गेली की " मुलासाठी " किंवा पहिलीला मूल झालं नाही की" वंशवृद्धीसाठी "किंवा बायको गेली की " स्वतः साठी ",विवाह होत असत आणि त्यात कोणाला काही गैर वाटत नसे.
 अण्णांच्या आणि कुंदाताईंच्या वयात ब-यापैकी अंतर होतं .हे आत्ता जाणवतय तेव्हा लहानपणी काही कळण्याचं वय नव्हतं.
तसा कुंदाताईंचा सगळ्या घरावर वचक होता. इतर सर्व बायकांप्रमाणे त्याही घरासाठी करायच्या ,करवून घ्यायच्या पण तरीही त्या वेगळ्या होत्या. चापूनचोपून नेसलेल्यालुगडयाला हिंगाचा वास नव्हता की हळदीचा डाग..रोज संध्याकाळी अण्णा यायच्या सुमाराला तोंड धुवून पावडर लावून त्या तयार होत .अंबाड्यात बागेतलं फूलही माळलेलं असे.  गल्लीतल्या इतर बायका हे सगळं अभावानेच करत.गंमत म्हणजे त्यांच्या घरी खूप मासिकं असत वाचायला. कुंदाताई लायब्ररीच्या मेंबर होत्या. आमचं घरही पुस्तकांनी, ,मराठी ,इंग्रजी, खचाखच भरलेलं असे. मासिकं पाक्षिकं, साप्ताहिकंही असत पण इंग्रजी. मालूताईंकडे मात्र जी मासिकं असत ती  मला आमच्या घरी मिळण्याची सुतराम शक्यता नसे. त्यामुळे जाणिवा उमलण्याच्या त्या वयात त्यांच्या घरी माझ्या फे-या फार वाढल्या होत्या. आपण मासिक चाळतो आहोत हे दाखवत हवा तो मजकूर वाचायचं कसब मला बेमालूम जमायला लागलं होतं. पुढे आम्ही घर बदललं. गावाबाहेर लांब रहायला गेलो आणि कुंदाताई नावाचं कोणी माझ्या आयुष्यात होतं हेही धूसर होत गेलं.
आता गतायुष्याचे चौकोन जोडताना लहानपणी बघितलेल्या कुंदाताई , काळ्या नव-याला सामोरं जाणा-या कलाकार विमलाक्का, सवतीची मुलं मूकपणे संभाळणा-या सातवळेकरवहिनी  आमच्या काकींना फक्त नारळ आणि एक रुपयावर करून घेतलय हे सस्मित ऐकणा-या सौंदर्यवती जातककाकी आठवल्या आणि वाटून गेलं की त्या ख-याच होत्या की त्यांच्याच सावल्या ? स्वतःला त्या माहेरीच सोडून आलेल्या होत्या की आपण कोणालातरी सोडून आलोय याचीही त्यांना जाणीव नव्हती ? समवयस्क जोडीदाराचं स्वप्न त्यांनी कधी बघितलं तरी असेल का ? तेव्हा हे कळत नव्हतं, आणि या वयात कळतं तर पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा वारंवार पुसताना सांगावं लागतं , "वयोमानानुसार पाणी येतं डोळ्यात अकारणच."
मृणालिनी






Monday, September 5, 2022

संवाद गणेशाशी

बा गजानना ,किती दूरवर आणलंस तू, 
की एक निरागस रिंगण पुरं करवलंस तू ? कदाचित दुसराच पर्याय खरा असावा बुद्धी मंता
पण मग एक  नकळती हुरहूर का बरं ? 
लहानपणी तुझ्या आगमनाचा अर्थ फक्त सुगंध असायचा ,
उदबत्तीचा , फुलांचा ,उदाचा ,कापराचा आणि
खमंग गूळचुनाचाही !
पण मग बदलत गेलं रे पुढे सगळं , 
या सगळ्यांना दडपणाच्या किनारी ने वेढलं
तुझ्या येण्याच्या आनंदावर तुझं" नीट " झालं" पाहिजे"नी मात केली बघ.
रागावला असतास कारे तू थोडं डावं उजवं झालं असतं तर ,दयाघना ?

"आनंदकंद मज घरी पाहुणा यापरते दूजे सुख ते काय
आंधळ्याच्या गाई देव राखी म्हणूनि करवूनि घेशी ही जाण होय !


आता परत ते सुगंध जाणवताहेत नाकाला
- लंबोदरा ,एकदंता तुझा चेहरा  अधिकच मिश्किल  असतो झालेला
मातेभोवती गोल फिरून पृथ्वीप्रदक्षिणेची पैज जिंकल्यावर झाला होता तसा !
होय रे बाप्पा तसाच खोडकर .
तुझं सांगणं झिरपत जातं माझ्यात
आणि वहात रहातं  डोळ्यातून !
मृणालिनी