Sunday, January 21, 2018

दाणे

दाणे 
आमच्या मैत्रिणी म्हणजे अफलातून आहेत. आता सत्तरी आली तरी डोक्यातून काहीतरी विचित्र कल्पना निघत असतात. त्या दिवशी असंच झालं . कोशिम्बिरीत दाण्याचं कूट  घालावं  की खोबरं असा विषय चालला होता तरविजी म्हणाली की  दाणे या विषयाची किती माहिती तुम्हाला आहे ते बघू या. म्हणजे लागला की  नाही डोक्याला भुंगा.                                                                                                                                     
दाणे  म्हटलं तर विचार करायला  हवा की  शें गदाणे की ज्वारीचे दाणे की बाजरीचे दाणे ? बरं शेंगदाणे म्हटलं तर कच्चे दाणे की  भाजलेले दाणे ? आता कच्चे दाणे म्हटलं तरी दडपे पोह्यात किंवा कांदे पोह्यात तेलात तळून घातलेले दाणे की  चाकवतात किंवा अळूच्या फतफत्यात भिजवून घातलेले दाणे  ? बरं भाजलेले दाणे म्हणावं तर चिवड यातून  वेचून खाल्लेल्या खमंग दाण्याची चव जिभेवर घोळणार आणि त्याचा वेळी असे दाणे वेचून खाल्ल्याबद्दल आईने पाठीत दिलेला रपाटा  आठवून तीच जीभ दाताखाली येणार.आणि पाठ हुळहुळणार ते वेगळंच. मीठ घालून उकडलेल्या शेंगा फोडताना पिचीक्कन मिठाचं पाणी डोळ्यात जातं आणि डोळे चुरचुरतात ,' पण त्या दाण्यांची थोडी खारट , थोडी मातकट चव म्हणजे मस्तच !पण काहींना लोखंडाच्या कढईत खमंग भाजलेले दाणे खाणं म्हणजे परमानंद वाटतो. किंवा कच्चे दाणे  आणि गूळ वाटीत घेवून गोष्टीचं पुस्तक वाचता वाचता खाल्लेल्या दाणे गुळाची चव लोणावळा दाणे चिकीपेक्षाही भारी वाटते. शिवाय दाण्याचे दोन भाग करून आत गूळ  भरून भावलीच्या लग्नात बनवलेले लाडू तर उच्च कोटीचेच  असतात. या सगळ्या दाणे प्रकाराला आपल्या बालपणीचा स्वाद असतो आणि निरागस आनंदाचं वेष्टन ! नाहीतर मग असतातच मोठेपणी "  दाण्याचं  कूट अंमळ  कमीच झालं होतं हो ! "किंवा " आग ' उद्याचं उपासाचं  लक्षात आहे ना? नाहीतर वेंधळ्यासारखी खिचडी करायच्या ऐन वखताला घेशील दाणे भाजायला . " किंवा " अहो , उद्या अगदी साधा बेत करा बरं का . गरम गरम भाकरी , लोणी दाण्याची चटणी मिरचीचा खर्डा आणि साइचं दही." असेही दाने  भेटीला येतात .कि  मग घ्या विरजण लावायला , लसून सोलायला, खलबत्त्यात दाणे कुटायला आणि पाठवा पिंट्याला  गिरणीत ज्वारी दळून आणायला . अशी ऑरडर सोडणा-या पुरूषांच बरं असतं .त्यांना काय मित्र जमवून बेसन पिठात घोळवून तळलेले शेंगदाणे ग्लासातल्या सोनेरी पेयाबरोबर तोंडात टाकत शाम और भी  हसीन ,रंगीन करायला काय जातंय ?                                                                                                                                                 
ज्वारी बाजरी आणि गव्हाचे पण दाणेच असतात आणि कणसाचेही दाणेच असतात . पावसाळी हवेत निखा-यावर भाजलेलं कोवळ कणीस मीठ लिंबू चोळून दातात घुसवल की पावसातल कंच हिरव ओलेपण अंगाला वेढून येतं , किंवा हिवाळ्याची धुक्यात लपेटलेली गार शिरशिरी लोकरीच्या कपड्यातूनही आत शिरून अंगावर काटा फुलवते . आता मक्याच्या कणसाचे दाणे किंवा किसून त्याचा उपमा करा किंवा बटाटयाच्या संगतीनं त्याचं पेटीस  करा किंवा सूप करून डाएटची जागा भरा हे सगळे तद्दन शहरी प्रकार .
मटारच्या दाण्याबद्दलही  मला  तेच वाटतं  . शेतातले वेलीवरचे कोवळे मटार बाजारात आले की ,उपम्यात , पोह्यात शिरून त्यांची चव वाढवतात हे खरच , पण त्याबरोबरच मटार उसळ ब्रेड  ,मटार भात ,मटार करंज्या बनून आपल्या मेजावानीच  ताटही सजवतात . पण वेलावरून तोडून तोंडात टाकलेल्या मटार दाण्याची सर त्याला नाही .                                                                                                                                             
कुठल्याही वस्तूशी आपल्या आंबट गोड आठवणी जडलेल्या असतात . दाणे ते काय एवढासा शब्द . पण त्याच्या अर्थात एवढी विविधता दडलेली असेल आणि ती इतकी अनंददायक असेल असं वाटलं होतं का आपल्याला ? शिवाय अक्षरही मोत्याच्या दाण्यासारखं  असलं तरच वाचणार ना कोणीही ? 
इति दाणे पुराण समाप्त  !   

Thursday, January 11, 2018

कवडसा

कवडसा 
आज इन्स्टाग्रामवर एक फोटो पहाताना त्या फोटोत उन्हाचा एक कवडसा दिसला . उन्हाच्या पट्ट्यात चमकणारे ते धुळीचे कण पहाताना माझं मन कुलकर्ण्याच्या स्वयंपाकाघरात  गेलं .कुलकर्णी आमचे खासबागेतले , म्हणजे कोल्हापुरातले शेजारी . अण्णा  घरातले कर्ते  पुरुष . अक्का त्यांच्या पत्नी. अन्ना  मला फारसे आठवत नाहीत. कारण ते बहुधा शेतीच्या  कामासाठी गावाकडे असायचे. अक्का मुलांच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात   असायच्या.पण अण्णा घरी आले कि घरातलं वातावरण एकदम टेन्स असायचं. अण्णाना  पाणी द्या , चहा द्या. असं सारखं चालायचं .शिवाय अण्णा मुलांची झाडाझडती घ्यायचे ते वेगळंच .त्यामुळे तेवढे दिवस मी ते घर वर्ज करायची . वय तरी किती होतं माझं ? फारतर सहा सात वर्षांचं .पण मी सारखी त्यांच्या घरात पडीक असायची. त्या घरात माझ्या वयाचा रवी होता , बाळू थोडा मोठा होता .एखाद दुस_या वर्षांनी. रोहिणी उर्फ शिट्टी दोन वर्षांनी लहान . मुख्य म्हणजे मीना आणि बेबी . होत्या . त्यातली मीना माझ्या विशेष आवडीची होती . कारण आमच्या घरात तीन भाऊ होते आणि तेही माझ्यापेक्षा १७ , १५ , आणि ८ वर्षांनी मोठे . आपापल्या मित्रात दंग असलेले .आई बिचारी खोबरं खवा , खोबरं वाटा ,रस काढा आणि माशाचे वेगेवेगळे प्रकार करा यात गढलेली असायची, त्यामुळे माझी बहिणीची भूक कुलकर्णींच्या घरात भागायची . माझी पाच पेडी वेणी घालायला मला मीना  लागायची . बांगड्यांचे फुटके तुकडे आगीवर वाकवून तोरण करताना किंवा पांढरी शुभ्र रांगोळी चितारताना मीनाला गप्पा मारायला मी लागायची ..
कुलकर्ण्याच्या घराच्या आठवणी माझ्या घराइतक्याच मला चिकटलेल्या आहेत . कारण आमच्या दोघांच्या घराची भिंत सामाईक होती . आमच्या दोन्ही घरात जमीन अस्मानाचा फरक होता . आमच्या घरात स्वयंपाकघर सोडल्यास सगळीकडे लख्ख उजेड असायचा. विजेचे दिवे होते . पण हे घर फिकट उजेडात कायम गूढतेच पांघरूण पांघरून असायचं . संध्याकाळच्या  वेळी कंदिलाच्या काचा पुसून दिवाबत्ती केली की ते घर अधिकच गूढ वाटायचं  मग मी घरी पटकन सटकायची . त्यांचं स्वयंपाकघर अधिकच अंधार होतं . आपण आमच्या घरात नसलेल्या कितीतरी गोष्टी तिथे होत्या . आत शिरल्या शिरल्या उजव्या बाजूला झोपाळा होता . त्यावर गोधडीच उसं करून ठेवलेल असायचं . पांघरायला पासोडीची घडी ठेवलेली असायची. त्या सगळ्याला धुवट वास येत असायचा . उजव्या कोप-यात चूल मांडलेली असायची .तिच्या बरोब्बर वर उजेड येण्यासाठी काच बसवलेली असायची . त्या गवाक्षातून उन्हाचा कवडसा अक्कांच्या भाकरी थापायच्या परातीवर पडलेला असायचा . पितळी  परातीचा प्रकाश आणि अक्कांचा हिरव्या बांगड्यांनी  लखलखणारा गोरापान हात माझ्या स्मरणात अगदी कोरून बसला आहे .त्यांचा हात हलायचा आणि कवडशातले धुळीचे कण हलायचे . आपले बिलोरी रंग घेऊन नाचायचे . मी कितीदातरी तो कवडसा पकडायचा प्रयत्न केलेला मला लख्खच आठवतंय . स्वयम्पाकघरातल्या झोपाळ्यामागे एका घडवंचीवर धान्याची पोती रचून ठेवलेली असायची . त्यातल्या तांदळाचा सुगंध सगळीकडे पसरलेला असायचा .बहुधा एक कणगीही होती शेजारी . त्यात ज्वारी भरलेली असायची . शिवाय अण्णा गावाहून येताना गावाकडचा भाजीपाला , गुळाच्या ढेपा , शेंगाची पोती  ,आणायचे . हे सगळं सामान बैलगाडीतून उतरवलं जायचं , तेव्हा रवी बाळू शिट्टी ज्या अभिमानाने आत बाहेर करत असायचे , ते बघून " माझे बापू मेडिकल रीप्रेझेटेटीव्ह का झाले ? " असा एक असुयाभरा प्रश्न माझ्या बापुडवाण्या चेह-य वर उमटायचाच .
कुलकर्णी चं घर अगदी टिपिकल गावाकडच्या ब्राहमणाचं  होतं . सडा  रांगोळी , देवपूजा , वैश्वदेव , श्रावणी , नवरात्र , सोवळं ओवाळ पाळीच्या चार दिवसात बाजूला बसणं आणि आपला वारा जरी विटाशीच्या बाजूला गेला तरी " लागशील , " शिवाशील " असा चोरट्या आवाजात गजर करणं  या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या आणि यातली एकही गोष्ट आमच्या घरात नसल्यामुळे लहानपणी मला या सर्वाचं प्रचंड कुतूहल होतं . माझी आई याला नाक मुरडायची. " जग खंय  चल्लासा आणि हे खंय चाल्लेसत अस म्हणायची  पण या सगळ्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं होतं जे मला मोहवत होतं . लक्ष्मीपूजना दिवशी पाण्यावर कोळशाची  पूड टाकून त्यावर पांढरीशुभ्र  लक्ष्मी चितारण असो , देव दिवाळीला शेणाची गोपूर , गोधन निर्माण करणं असो किंवा श्रावणात कहाण्या वाचण असो त्यांनी माझं बालविश्व गुढतेने भारून टाकल होतं . शिवाय त्यांच्याकडे गावाहून यल्लमाला सोडलेली  कमरेपर्यंत जाड जट असलेली कपाळावर भंडारा लावणारी बाई यायची किंवा लाल अलवण नेसणारी चोळी न घालणारी , केशवपन केलेली आजीही यायची आणि त्या गुढतेचं रिंगण अधिक गडद व्हायचं .वयाची पहिली आठ दहा वर्षं मी त्या वातावरणात एकरूप झाले होते . पण मोठं वय झाल्यावर या सगळ्यापासून मी आपोआपच वेगळी होत गेले . पण आता वाटतं लहानपणी त्यांच्या कलेने मला एक लखलखता कवडसाही दिला रंगीबेरंगी रजकणांचं नर्तन दाखवणारा ........        ..