गवताच्या पात्यावरच्या टपो-या थेंबान
हळूच विचारलं , " येतेस का माळरानावर फिरायला ? "
गुडघ्यातून उठणारी कळ जिरवत मी म्हटलं ,
" हात मेल्या , माझं वय का आहे उंडारायचं ?/ "पानाच्या टोकावरून तोल सावरत थेंब म्हणाला ,
" माझ्याकडेतरी कुठे वेळ आहे ?
आत्ता जाईन मी मातीत मुरून . "
मग ठरवलं ,
जाउयाच ओल्या वा-यात विरून.
परतल्यावरही लावता येईल दुख-या गुडघ्यांना महानारायण तेल !
पाऊस नादावतो
पावसाचाही एक नाद असतो
जीव ज्याने नादावतो.
ऐलतीरा पैलतीरी हलकेच सांधवतो !
पावसाचा नाद एक
गुज मनी जागवतो ,
पानोपानी चिंब एक
अलगुज कान्हा वाजवतो !
थांब वेड्या थांब थोडा
आवरी बेधुंद धारा.
अवलिया तू अनाहता रे
सावरु दे माझ्या मनाला !