नै नों मे बदरा छा ये
शांत वातावरणात गाण्याच्या लकेरी उमटत होत्या. नैनोमे बदरा छाये , बिजलीसी चमके हाये , ऐ सेमे सजन मोहे गारवा लगाये..... दूरवर पसरलेल्या अंधारात डोळे घुसवून कशाचा तरी ठाव घेत असलेली तिची नजर किंचीतशी गढूळली. गारवा च्या तानेला अडखळून हातातल्या हिंदकळलेल्या ग्लासमधून तिने एक सिप घेतला. त्या तानेत विरघळत तिने आपला आवाज त्या तानेत गुंफला. प्रेम दिवानी हुं मैं , परियोकी रानी हुं मैं ...... तिचं शरीर स्वरांच्या हिंदोळ्यावर भिरभिरणारं मोरपीस बनलं . कानाशी गुदगुल्या करणारं . अतीव सुखानं तिने डोळे मिटले. पहात असलेलं स्वप्न डोळ्यातच बंदिवान करण्यासाठी . .....त्याच वेळीत्याच वेळी दंडातून उठणारी काळ ओठातून बाहेर पडू नये म्हणून तिने दात ओठावर रोवला. " come on baby , Everybody is waiting for you. पार्टी मधेच सोडून तू निघून आलीस . मुद्दाम तुझ्यासाठी ठेवलंय ना गाणं ? मि . माखीजा , शेट्टी, कपूर साब all are there. so you should be by my side now to entertain them. come baby come. " दंडावरची बोटं अधिकच आक्रमक होऊन दंडात रुतली. एक नकळतशी लालसर रेघ नखांनी दंडावर उमटवत ....त्या थंड डोळ्यांनी शरीरावर उमटलेला शहारा लपवत तिने आपले डोळे त्या डोळ्यांना भिडवले . एका घोटात ग्लास रिकामा केला. त्याचा हात झटकून ती निघाली. थोड्या वेळापूर्वी पापण्यांच्या कडेशी येऊन ओठंगलेला थेंब पुसायची तसदीही न घेता ती खोलीच्या बाहेर आली .गारवा देणा-या अंधारातून डोळे दिपवणा-या रखरखाटात . स्वरांचं गारुड मात्र तिने खोलीतच सोडून दिलं आठवणींच्या विळख्यात ........