Wednesday, October 22, 2014

भाषा कोल्हापुरी

परवा आम्ही मैत्रिणी जमून एका मैत्रिणीकडे गेलो होतो. सगळ्या ६५च्या घरातल्या.एकाच शाळेतल्या. आणि मुख्य म्हणजे कोल्हापूरच्या.मैत्रिणीचा मुलगा सैन्यात कर्नल.त्याला शौर्य पदक मिळालं म्हणून आम्ही तिच्याकडे जमलो होतो, त्याचं अभिनंदन करायला. पण दुर्दैवाने तिथे गेल्यापासूनच माझी तब्येत बिघडली . मी मुलाला फोन करून बोलावून घेतलं आणि घरी परतले.संध्याकाळपासून मैत्रिणींचे  एक एक फोन यायला सुरवात झाली.
पहिला फोन, " काय हाय का अजून ? काय कुठ गेल्ता वर तोंड करून चावायला? काळजी घ्या वय झालय आपलं. डॉकटर कड जावून या.काय?"
दुसरा फोन, " असं कसं काय झालं ग ? आता श्यानपना करू नका, ते डॉकटरला शिक्षणाला लइ खर्च आलाय म्हणे तेव्हा जरा त्याला मदत करा पैसे फेडायला म्हणे."
तिसरा फोन, " हं कुठवर आलाय ?  आता बास. डॉकटर काय देतोय ते घ्यायचं आणि गप कोप-यात कुत्र्यासारखं पडून -हायच ."
हा कोलापुरी प्रेमाचा झटका आणि चटका पण. सरळ म्हणून बोलायचंच नाही. या माझ्या गेल्या ५० वर्षांच्या मैत्रिणी.
काही ठिकाणी बरेच दिवस आपल्या आवडत्या मैत्रिणी भेटल्या नाहीत की  माणसं प्रेमानं विचारतात, " का ग , कुठे होतीस इतके दिवस? बरी आहेस ना? " आमच्या मैत्रिणी विचारणार, " काय कुठं बेल घालत हिंडत हुता? " प्रेम तेच. काळजी तीच. पण अंदाज निराला.
कोल्हापूर. राकट, रांगड. मिरचीच्या ठेच्यासारख झणझणीत. प्रत्येक गावाचे काही विशिष्ट शब्द असतात. भाषेचा एक लहेजा असतो. परवा बागेत बसले होते. बाकावर माझ्याच वयाची एक बाई बसली होती. तिचा नातू आजी पाणी दे म्हणून आला. त्याला पाणी पाजून ती प्रेमाने म्हणाली, " शिस्तीत खेळा जावा.  ( म्हणजे नीट खेळ जा. आणि कडंन जावा म्हणजे रस्त्यात नीटबघून जा  ) ' मला उचंबळूनच आलं. म्हटलं तुमी ( लक्षात घ्या, तुमी, तुम्ही नव्हे,) कोलापुरच्या  काय?  तर बाईपण एकदम चमकली. तुमाला कस कळलं? तर म्हटलं तुमी जावा म्हटला की  नाही त्यावरून. मग एकमेकींची चौकशी करता करता आम्ही आमच्या शाळेत पोचलो  आणि लहानपणीच्या फुलपाखरी पंखांनी आमची संध्याकाळ रंगीन करून टाकली.बोलता बोलता  बाई हसली आणि म्हणाली, " भाषेवरून कळतयच हो गाव. मी परवा रिक्षावाल्याला म्हटलं, एवडा पत्ता शोधून द्या बाबा. केव्हापासून हुडकायला लागलोय. तसा तो हसला आणि म्हणाला, काय बाई, कोलापुराच्या काय तुमी? इकड पुण्यात शोधतोय म्हणतात नव्हे?'.कोल्हापूर कर्नाटकाच्याजवळ असल्याने कानडी हेल आणि शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात. सगळे आदरार्थी बहुवचन. तू जा असं नाहीच. तुमी जावा. माझ कोल्हापुरी बोलणं सुधारायचा आईचा सतत निष्फळ प्रयत्न असायचा. जावा म्हटलं की लगेच ती वैतागून म्हणायची जावा की नणंदा? जा म्हणावं. पण माझं म्हणणं असायचं की  कशाला बदलायचं?परक्या नागरी लोकात असतच आपल्याला शुध्द औपचारीक बोलायचं. मग अंतरातल्या  माणसांसमोर अंतरीचीच  भाषा ओठी येऊ द्यावी ना? कसं मोकळं मोकळं वाटतं . खर ना?.    

धनत्रयोदिशी२०१४

आज धनत्रयोदशी साल २०१४ . सन १९४९ ते १९५५च्या धनत्रयोदशा (?) काही मला आठवत नाहीत. कारण तेव्हा माझं वय ५च्या आत होतं.पण नंतर  मात्र आठवतात ते वेगवेगळे वास. गोड, तिखट, भाजलेले तळलेले. ते कसे निर्माण होतात त्याच्याशी माझ्या बाल मनाला काहीच देणं घेणं नसायचं कारण त्यापेक्षाही महत्त्वाची कामं असायची. ती म्हणजे  जवळच्या ग्राउडमधून  उलथन्याने खणून खणून अंगणासाठी माती आणायची ती थोपटून थोपटून गुळगुळीत करायची आणि मग त्यावर सुरेख रांगोळी काढायची. प्रत्यक्षात मात्र यातलं प्रत्येक काम मी भावाकडून करून घेत असे. वडलांना नाव सांगेन असा दम देऊन ज्याची मला आता फारच लाज वाटते. पण आता माझ्या ६६व्या आणि त्याच्या ७४व्या वर्षी त्याचा काय उपयोग? पण अशा डयांबीसपणाची  मला ६व्या दिवाळीतच चांगलीच शिक्षा मिळाली होती. म्हणजे झालं काय की  क्वचितच दिसणारं मुंगुस रस्त्यावरून जात होतं आणि ते बघायला बापुंनी मला वरच्या माडीवरून हाक मारली. उरलेली रांगोळी पूर्ण करायचा हुकुम सोडून मी जिन्याकडे धावले आणि पायरीवरून पाय घसरला आणि अशी आपटले की  दात ओठात घुसला आणि त्याची खूण अजून माझ्या  ओठावर आहे.अर्थात याचा भावाने फायदा असा घेतला कि तुला ही  बाप्पाने शिक्षा दिलेली आहे आणि हे असंच चालू ठेवलास तर बघ पुढे काय काय होईल ते असं सांगून त्याने वेठबिगारीतून कायमची मान सोडवून घेतली आणि तो केवळ अपघात होता हे मला पटेपर्यंत तो कॉलेजात गेला होता. असो.पण हे आठवायचं कारण म्हणजे मी आज ५० ,५५ वर्षानंतर  दारात रांगोळी काढली.
आज धनत्रयोदशी , साल २०१४. आकाशदिव्या तले दिवे, ,  दिव्यांच्या माला ,चमचमणा-या, डोळे मिचकावून गुंगी आणणा-या माला सगळ्या घरांवर लटकलयात अगदी माझ्यासुध्दा .
दूर क्षितिजावर एकच दिवा नव्हे पणती मिणमिणतेय. आकाशदिव्यामधली, तुळशीच्या रोपाजवळची, घराच्या पाय-यावरची..पणतीतल्या तेलाच्या साथीने मंद तेवणा-या त्या ज्योतीभोवतीच गूढ  तरल वातावरण नजरबंदी करत असत आणि आत आत कुठतरी शांत गारवा झिरपत असतो.   राग येतोय त्या विजेच्या माळाचा? अजिबात नाही. त्रास होतोय फटाक्यांच्या लडीचा ? कधी कधी. मग आज मन हुरहुरताय का? अंगणात सारवलेल्या शेणाचा वास का येतोय /? पहाटेच्या वेळी आपल्या वाट्याचे लवंगी फटाके उडवणं-या मित्र मैत्रिणीचे उजळलेले  चेहरे का तरळताहेत डोळ्यासमोर?  कोण सांगू शकेल कारण ?
कदाचित दिव्यांच्या लखलखाटात आपल्या तळहाताएवढया यंत्रावर लिहिणा-या ब्लोगरला सांगता येईल.
कारण  कदाचित त्याच्याही ब्लोगची सुरवात अशीच असेल, "आज धनात्रायोदिशी साल २११४...'