Friday, March 28, 2014

करके देखो अच्छा लागता है !

आयुष्य किती सोपं आहे असं वाटतंय आज. नेहमीसारखीच सकाळ. नेहमीचाच दिनक्रम. वेगळं असं काहीच नाही. पण तरीही आज मन प्रसन्न आहे. हलकं हलकं वाटतंय. कारण आज मी माझ्या मनाचं ऐकलय.
नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडले.आमच्या सोसायटीला लागून जो रस्ता जातो तो गोलाकार फिरून परत सोसायटीपाशीच येतो.खूप माणसं त्या रस्त्यावरून सकाळच्या वेळी चकरा मारत असतात.मीही दोन चकरा पूर्ण करून चालले होते.समोर रस्ता झाडणा-या मावशी रस्ता झाडत होत्या. धूळ नाकात जाऊ नये म्हणून मी ओढणी नाकाला लावून पटापट पाय उचलत होते.एवढ्यात मावशींनी मला हटकलं, " ताई, एक सांगायचं होतं. " मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे फक्त एक नजर टाकली .थोड्या अजीजीने त्या  म्हणाल्या, " ताई, तुमच्या बागेतला कचरा तुमच्या बागेतच जिरवा की.आता कॉर्पोरेशनचे लोक पानं घेत नाहीत .मग आम्ही कुठं टाकायचा सांगा बरं?" मीही तिला म्हटलं, " मावशी अहो, या आधीही मी साठवत होते हो कचरा, पण आमच्या बागेत ना वाळवी फार आहे. वाळवीच औषधही घातलय. पण परत परत होते. काय करणार? पण मी बघते हं ." अर्थात मी हे करणार नव्हतेच. कारण दोनदा माझे प्रयोग फसले होते.
पण घरातली कामं उरकता उरकता माझं मन त्या मावशींच्या  शब्दांचा विचार करत होतं. आणि मग काम आटोपून आंघोळीला जाण्यापूर्वी मी बागेत गेले.कुंड्यातल्या झाडांना पाणी घातल्यानंतर बाग झाडून सगळी आंब्याची पानं मी वाफ्यातल्या रोपांच्या मुळाशी पसरून दिली. खरं तर  शेजारच्यांनी दोन्ही घरांच्या सीमेवर हे झाड लावलं आहे आणि "फुले का पडती शेजारी" न्यायाने सगळी पानं आमच्या अंगणात आणि आंबे त्यांच्या  दारात अशी परिस्थिती आहे. पण  तरीही मला आज  शेजा-यांना मनोमन शिव्या घालाव्याशा  वाटल्या नाहीत.. सगळी पानं टाकल्यानंतर मी बागेकडे पाहिलं तर ती चक्क माझ्याकडे बघून डोळे मिचकावून हसली.तेव्हापासून माझा दिवस मस्त चालला आहे.
काही दिवसांपूर्वी टी . व्ही वर एक जाहिरात लागायची. एका लहान मुलीला  दुर्धर आजार झालेला असतो आणि तिला सतत रक्ताची गरज लागत असते. कोणी ना कोणी रक्त देत असतं. पण त्या मुलीला मात्र कोणी  रक्त दिलं हे माहित नसल्याने ती भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानत असते. तिच्या निरागसपणामुळे हेलावलेला एक तरुण तिच्यासाठी रक्तदान करतो तेव्हा त्याच्या चेह-यावरचं हसू आपल्याला हेच सांगत असतं, " करके देखो अच्छा लागता है !"
 आयुष्याच्या धकाधकीत आपण इतके बेभानपणे गरगरतोय की साध्या साध्या गोष्टी ज्या करायला फारच थोडे कष्ट आपल्याला पडणार आहेत त्या करायलाही आपण अनुत्सुक असतो. पण थोडी स्वत:ला रोजच्या घाण्यातून ढील दिली तर जो आनंद मिळतो तो अनमोल असतो असंच आज वाटतंय मला.करनेके बाद जर इतना अच्छा लागणार असेल तर देर किस बातकी जो  दिलसे करना है वो करके देखो अच्छा  नाही तर बहुतही अच्छा लगेगा !  

Saturday, March 22, 2014

आजोळ

आजोबा आजी हे शब्दच इतके मऊ  आहेत की ते उच्चारताच मन  लहान होऊन जात. आजी आजोबा , मग ते बाबाचे आई वडील असोत किंवा आईचे. ते नातवंडावर माया आणि फक्त मायाच करणार. बाबाचे आईवडील जवळचअसतात. त्यामुळे त्यांचा सहवास रोजचाच असतो. पण आईचे आई वडील दुसरीकडे रहातात त्यामुळे त्यांच्या मनातलं प्रेम कोंडून राहिलेलं असतं त्यामुळे नातवंड आली की ती माया उधळून दिली जाते.कारण लेक कधीतरी माहेरी येणार. थोडेच दिवस राहणार आणि आपल्या घरी परतणार . त्यामुळे आपल्याकडे आहे तितके दिवस मजा करायची हाच बेत आजोळच्या माणसांनी ठरवलेला असतो.त्यामुळे कोणालाही विचारलं तर आम्ही आजोळी कशी मजा केली हे सांगताना १० वर्षांच्या चिंटूपासून ते ६० वर्षांच्या चिंतोपंतां पर्यंत सगळ्यांचे डोळे आजोळच्या आठवणींनी लकाकत  असतात.
माझं आजोळ कोकणात. आम्ही रहात होतो देशावर. ६० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधनं फारशी नव्हती आणि लोकही आतासारखे उठसूट गावाला जात नसत. त्यामुळे मी आजोळी फारतर चार पाचदा गेले असेन.पण आजही तो लाल डब्याचा घाटातला प्रवास आठवला की माझ्या पोटात कससच व्हायला लागतं. गाडी लागलेली असूनही माहेरच्या हवेने सुखावल्याने परकरी पोर झालेली माझी आई वाटेत दिसलेल्या प्रत्येक माणसाशी आसुसून बोलत असायची आणि ती माणसंही "  गो इंदू कधी आयलस? बरा असा मा? "अशी सुरवात करून बोलत रहात. गळून गेलेली ५-६ वर्षांची  मी आईचा ओचा ओढत घरी चलण्याविषयी  लकडा लावत असे.. रस्ता तरी डांबरी नाही, तरी निदान मातीचा असावा. तर तोही रेतीचा. समुद्रकिना-यावरची वाळू. पाय टाकला की भसकन पोटरीपर्यंत पाय  आत जायचा.दुतर्फा माडाची झाडं. पण त्यावेळी ते सौंदर्य वगैरे कळायचं नाही. कधी एकदा घरात जाऊन पाणी पितो असं झालेलं असायचं. घराला फाटक वगैरे नसायचं पण एक भला मोठा  वासा आडवा घातलेला असायचा.तो ओलांडून बरंच चाललं की घराची पडवी यायची. तिथल्या कट्ट्यावर मी बसकण मारायची आणि सूर काढायची. " गे वोगी रव. रडतास कित्याक? " विचारत आजी पुढे यायची. माझा सूर आणखी चढायचा. आणि एक आवाज यायचा, " कोण रडतासा तां?" की माझा आवाज बंद. आई हाताला धरून मागील दारी न्यायची, हात पाय धुवून आम्ही परत बाहेर येईतो त्या दमदार आवाजाने  पुढच्या मांगरातल्या  माणसाला बोलावून माडावर चढवलेलं असायचं.  मी तोंड उघडं ठेवून माकडासारख झाडावर चढणा-या त्या माणसाकडे बघत असायची आणि शहाळ तोंडाला लावून निम्मं पाणी अंगावर सांडत पाणी पीत असायची. तो दमदार आवाजाचा माणूस म्हणजे माझे मामा  आणि माझी आई हसत  काहीतरी बोलत असायचे.
दुस-या दिवसापासून माझी आईला भूणभूण  सुरु व्हायची घरी जाऊ या म्हणून. कारण तिथे खेळायला कोणीच नसायचं. सगळीकडे शांतता. घरं लांब लांब . माणूस दिसायचा नाही. सकाळी आजोबा म्हणजे नाना देवासाठी फुलं काढत, पण त्यांनी कधी ये फुलं काढू या असं म्हटल्याचं आठवत नाही. आजी तिच्या कामात. आंघोळीला पाणी तापव.सकाळच्या न्याहारीला पेजेचे तांदूळ उकडत लाव असं तिचं  काहीबाही चालू असायचं. मामा वेळेवर ( समुद्रकिना-यावर) त्यांची सुरुची बाग होती तिकडे जायचं आणि येताना ' बाजार " ( मासे) आणायचे म्हणून  निघायचे.आई कामाला येणा-या इम्दुकडून पोट चोळून घेत गजली करत असायची. माझं रडकं तोंड बघून आई " जा जरा जनग्याकडे" म्हणून बाहेर हाकलायची.मग माझ्यात उत्साह संचारायचा.
जनाग्या आमच्या घराच्या मागच्या बाजूला जरा दूर रहायची तिच्या झोपडीच्या बाहेर विड्यांच्या पानांचा वेल  असायचा. मी आले की तिच्या प्रेमाला भरतं यायचं. इम्दुचा शहरात रवनारा चेडू म्हणून तिला माझं फारच अप्रूप होतं. त्याचा फायदा घेऊन मीही तिच्याकडून लाड करून घ्यायची. तिच्याकडेच मला जास्त मोकळं वाटायचं . एकदा मला आठवतं मी माझ्या शहरात रहाण्याच्या जोरावर तिच्याकडून गार वाटावं म्हणून कानात तेल घालण्याऐवाजी पाणी घालून घेतलं होतं आणि माझे वडील असंच घालतात म्हणून थाप मारली होती. ती बिचारी " नुको  आवशीक कळला तर रागवात तुका 'असं  कळवळून सांगत होती आणि मी अधिकाधिक खुश होत होते. रात्री कान ठणकायला लागल्यानंतर माझ्याबरोबर तिचाही उध्दार झाला तो वेगळाच.
दुस-यांदा मी गेले तेव्हा सातवीत होते. प्रवास, गाडीचा आणि घरापर्यंतचा जरी तोच असला तरी आजूबाजूला बघण्याची नजर आली होती. त्यामुळे बाजारातून येताना बोंडू, काजी, करवंद यांची रंगसंगती लक्ष वेधून घेत होती. बाळा सोनाराशी बोलत आई थांबली तरी त्यांच्या गप्पा ऐकताना मजा वाटत होती. घरी आल्यावर  दारातच बांधलेल्या गुरांकडे बघावसं वाटत होतं. घरी आल्या आल्या आमच्या इम्दुने "काय हा पसारा" म्हणत घर झाडायला हातात खराटा  घेतल्यावर कामवाल्या इम्दुने " काय गे घरातला काम कमी पडला म्हणून हय आयल्याबरोबर झाडूक लागलास की काय' म्हटल्यावर त्यांची गंमत  कळून हसू आलं होतं. हळू हळू मला माझं आजोळ कळू लागलं होतं.
माझ्या भावंडाच्या आजोळच्या आठवणी वेगळ्या आहेत. ते माझ्यापेक्षा १६-१७ वर्षांनी मोठे असल्यामुळे आणि त्यांचं काही शिक्षण तिथेच झाल्याने शिवाय ते मुलगे असल्याने एकटेही जाऊ शकत असल्याने त्यांना तिथला  सहवास अधिक आहे. ते तिथल्या समुद्रात पोहलेत. घराभोवतालची बाग त्यांनी लाटेने पाणी उपसून शिंपली आहे. ( लाट म्हणजे विहिरीवर एक जाड बांबू आडवा टाकलेला असतो.एका उभ्या वाशाच्या टोकाला काहीलीसारखी  एक मोठी कढई लावलेली असते. आडव्या बांबूवर चालत जाऊन कढईत पाणी भरून वाशाच्या मदतीने पाणी काढतात आणि बागेत सोडतात )  त्यांचं मोठी आई, नानांशी संवाद आहेत(होते ). माझं तसं नव्हतं. मला तिथली भाषा, त्यांचं वागणं अगम्य वाटायचं   पण तिथली झाडं मन मोहून टाकायची..( जरी रात्री दोन माड एकमेकांना घासून आवाज करत तेव्हा त्या कंदिलाच्या उजेडात माझी बोबडी वळत होती तरीही) तिथल्या वातावरणात पानांचा एक वेगळाच वास भरून राहिलेला असायचा. तिथल्या गरम पाण्याला धुराचा एक वेगळाच वास असायचा. तिथल्या गाजेला वेगळीच साद होती. तिथल्या टपो-या मोगा-याला  वेगळाच सुगंध  असायचा.
मी माझ्या मुलांच्या आजोळी जायची तेव्हा त्यांचे मामा मामी, भावंड दारात उभी राहून वाट बघत असायची. आरडा ओरडा दंगा यांनी घर गजबजून जायचं. माझ्या नणदेची मुलं जेव्हा आमच्याकडे यायची तेव्हाही हीच परिस्थिती असायची. आणि आता माझा नातू रोज त्याच्या आजोळी जातो तरीही  परिस्थिती बदललेली नाही. माझ्या नव-याला आवडणारे पदार्थ त्याला खायला घालायला  त्याची त्याच गावात रहाणारी आजी धावत पळत घेऊन यायची. हे काही मी अनुभवलं नाही. पण तरीही मला माझ्या आजोळची वेगळीच ओढ लागते. एखाद्या इंग्लीश सिनेमातल्या हिरोसारखा माझा राकट मामा अबोलपणे माझे विहिरीत पडलेले कपडे काढायला उतरलेला आठवतो. नाना च्या देवघरातल्या फुलांचा सुगंध माझ्या नाकाला जाणवतो. कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेली माझी मोठी आई आठवते. तिच्याबरोबर माडाच्या झावळयांचे हीर काढता काढता गप्पा मारत बिडीचे झुरके मारणारी पणग्या आठवते. माझे लाड पुरवणारी जनग्या आठवते. आजोळ आजोळ म्हणजे तरी काय असतं? एक उबदार पांघरूण असतं. बालपण जपणारं !  

Saturday, March 15, 2014

सत्याचा विजय असो!

 रविवारची सकाळ
प्रसन्न .....थोडीशी सुस्तावलेली ...आळसटलेली
सोफ्यावर दोन चार वर्तमानपत्र विस्कटून पडलेली
बातम्या-- अग्रलेख-- चटपटे  , गंभीर लेख --शब्दकोडी  पांघरून -  ,
इमेल्स ,टारगेट , डेडलाईन   हे शब्द पुसून टाकणारी सकाळ !
Relax---
चहाच्या तिस-या ( की चौथ्या  पाचवा सहावाही असेल)
 कपाच आधण चढवून ती ओटयाशी उभी , गुणगुणत
रविवार सकाळ पसरत असते कणाकणाने
फक्त अकरा  वाजेपर्यंत


अकरा वाजतात
वातावरणात चैतन्य  उत्सुकता
आजचा विषय काय असेल
राजकारण --- करप्शन----काळा पैसा ----
सत्यमेव जयते  गीत सुरु होतं
जनसामान्यांनी जनांसाठी गायलेलं
ती शेगडी बंद करून ओटयापासून  दूर होते
लसूण सोलायला घेऊन बाहेर येते
चिकन करायला लागेलच लसूण
उत्साहाचं कारंज बनून तो येतो
नमस्कार आदाब खुशामादिन करता करता विषयाला हात घालतो
बोलता बोलता आकडे मांडतो , मध्येच गंभीर होतो
कधी डोळ्यात तरळलेलं  पाणी हळुवारपणे टिपतो
कधी जादूची झप्पी कधी खोल सुस्कारा
रडू आवरणारे प्रेक्षकांचे चेहरे
टी  व्हीसमोरचं वातावरणही बदलतं
हवेत आलेला ताण तिच्या श्वासात शिरतो की तिच्या श्वासातला हवेत
न   बघितलेल्या पिडीतांचे श्वास तिला हवेत जाणवायला लागतात
पोलीस स्टेशनमधली जबानी-डॉकटरांची तपासणी-- वकिलांची उलटतपासणी
कळ लागल्यानंतर  तिच्या लक्षात येतं की आपली नखं आपल्या हातात घुसली आहेत
तोंडात कडवट चव जमा होते
मागच्या वर्षीही हाच विषय होता तेव्हा तिनेही एसेमेस केला होता
चार दिवस  उदात्त वाटत होत
आज मात्र  ते उघडे वाघडे प्रश्न ऐकताना तिचं अंग आक्रसू लागलं
खुर्चीत बसल्या बसल्या ती पाय मांड्या आवळून थरथर थांबवू पाहते
थांबवा हे सगळं. वर्णनातून होणारे हे बलात्कार थांबवा प्लीज !
आतून येणारे उमाळे  दाबता दाबता आवाज होतोच
तिचा नवरा चमकून बघतो
ती कळवळून त्याला खूण करते
टी  व्ही बंद करता करता तो म्हणतोच, "अग , कार्यक्रम लढणा-या स्त्रियांचा आहे. भारीच बुवा सेन्सिटिव्ह तू "
अचानक टी  व्ही बंद झाल्याने नुकतीच मिसरूड फुटलेल्या मुलाच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह असतं
तिच्या डोळयाला मात्र धारा  लागलेल्या असतात.
      

Sunday, March 2, 2014

शब्द

शब्द असतात पहाटवेळी कोवळ्या गवतावर चमकणा-या दवासारखे
नाहीतर शब्द असतात त्सुनामीने झालेल्या भकास उजाड गावासारखे  !

मानले तर शब्द असतात वेळू बनातल्या बासरीचे सूर
नाहीतर शब्द बनतात अलगुजातून फिरणारा वारा बेसूर  !

शब्द मुके होतात ओथंबलेल्या  घननीळ मनामुळे
शब्द मुके होतात रित्या पालथ्या घड्यामुळेही  !

म्हणूनच
शब्द असावेत फुले मंद सुगंधी
शब्द नसावेत नकली माणिक मोती
शब्द तोडू  देत खोट्या ताठर भिंती
शब्द फुलवू  देत मना- मनांची नाती  !

नाती

कपड्यांचं कपाट  --------गच्च भरलेलं, ओथंबलेलं , फुटून बाहेर येऊ घातलेलं
कपडे लागतात तसेही ----- बाहेरचे, घरातले, हळदीकुंकवाचे आणि " सवाई"चेही 
कपडे असतात वेगवेगळे ----धुवून सुरकुत्या काढून घडी घातलेले कॉटनचे  
                                             चमकत्या रंगाचे  नायालोनचे
                                             परंपरागत खादीचे 
                                            केवडा घालून जपलेले रेशमाचेही ! 
पण मग कधीतरी 
                          कॉटनचे धागे विरतात 
                           नायलोनची चमक ओसरते 
                           खादीचा रंग उडतो  
                          रेशमालाही कसर लागते. 
मग मात्र 
                        कॉटनला रफू करावं लागतं
                         रेशमाला मागून पुढून ऊन द्यावं लागतं 
                        रंग उडल्या खादीचं काय करायचं हा प्रश्न असतोच 
                        नायलोनला  मात्र एक गरम इस्त्री पुरते.  
नात्यांचंही  तसंच असतं
                                    त्यांनाही अधून मधून कोवळ  ऊन द्यावं लागतं 
                                   विरलेले धागे जोडावे लागतात 
                                   कधी कधी ठिगळ लावून झाकावेही लागतात !                                
                                       
कपाटाचं  एक बरं असतं  ते बापडं लाकडी असतं 
मन मात्र आसुसतं  
                           कॉटनच्या उबेसाठी 
                          मऊसूत सोनसळी रेशामासाठी 
                          आणि रंग उडाल्या खादीसाठीही  !

Saturday, March 1, 2014

निरोप

उन्हे   आली उताराला , लांबल्या सावल्या अता
वाट  आता सरत आली निरोप द्यावा जिवलगा !
अनोळखी , अज्ञात आपण भेटलो  बहरलो इथे
पांघरोनी चंद्रमौळी चांदणेही, शांतलो   फुललो इथे !
जाणशी मम भाव राया, जाणते मीही तुला
भांडलो तम्डलो  तरीही, शोधते मी तुलाअन तू ही मला !
पण
पण लांबल्या सावल्या आता; येई सूर कानी बावरा
हात हाती घेता तुझा मी, जीव होई घाबरा !
हुरहुरे मन थरथरे तन ,जीव ना मला हा सावरे
हात सुटता वाटे मला की , तू कुठे अन मी कुठे!
शब्द ओले भाव माझे जाणसी तू  साजणा
 तूच मी अन मीही तू ,जाण या  अंतरीच्या  खुणा !