साठ वर्षांपूर्वी मूल पाच वर्षांचं झालं की, त्याला कुठल्यातरी शाळेत अडकवून टाकण्याचा विचार घरात सुरु व्हायचा. शाळा शक्यतो घराच्याजवळ असावी हा एकच निकष लावला जायचा किंवा जवळपास रहाणारी बरीचशी मुलं त्या शाळेत जाणारी असावीत अशी माफक अपेक्षा ठेवली जायची. अर्थात त्यामागे, कळपातलं मेंढरु आपोआप योग्य ठिकाणी पोचतं, हा अनुभव कामी यायचा.
काळ बदलत रहाण्याचं आपलं काम करत रहातॊ. साठ वर्षांपूर्वीचं मूल वाढतं, संसारात पडतं, आणि आपल्यासारख्याच क्रमाने करायच्या गोष्टी आपल्या मुलांबाबतही करत रहातं.तीसपस्तीस वर्षं उलटलेली असतात. परत कालचक्राने तोच फेरा घेतलेला असतो. पण आता गोष्टी खूपच बदलेल्या असतात. साठ वर्षांपूर्वीचं मूल आता आजी झालेलं असतं आणि तीस वर्षांपूर्वीचं मूल बाबा. आजी खुषीत. नातवाच्या बाललीलात दंग. वर्षांना काय त्याचं ? ती आपली पुढे पुढे सरतच असतात.बघता बघता नातू चक्क दोन वर्षांचा होतो आणि घरात वेगवेगळ्या शाळांच्या नावांची चर्चा सुरु होते. हे काय नवं आक्रित ? आजीला वाटतं. अजून चांगली अडीच वर्षं आहेत. आता तर सहा वर्षं पूर्ण झाल्याखेरीज शाळेत घेत नाहीत. आतापासूनच काय हा गोंधळ? असा मनात आलेला विचार मनातच ठेवून आजी नातवाला गोगलगाय दाखवण्यात, पानांवरचे कोवळ्या उन्हात चमकणारे दवबिंदू दाखवण्यात दंग असते.नातूही बापडा त्याला दिसणा-या नानो, एस्टेलो, आल्टो, औडी अशा गाड्या आजीला दाखवण्यात दंग असतो. डम्पर, ट्रक यातला फरक समजावून देत असतो." अग, कुकुली, पोकलेन आणि क्लेन(क्रेन) वेगली अशते" असं दटावत असतो.मजेत दिवस चाललेले असतात. आई आणि बाबा मात्र वेगवेगळ्या शाळांची माहिती मित्रांकडून, शाळेच्या माहितीपत्रकातून, इंटरनेटवरून मिळवण्यात दंग असतात.
आणि अखेर एक दिवस असा उजाडतो की त्या दिवशीच्या आई बाबाच्या आनंदाची तुलना फक्त " आर्किमेडिज"च्या "युरेका"शीच होऊ शकेल. बहुगुणी, आखुडशिंगी, अशी घराच्या जवळची एक शाळा सापडते. आई बाबा त्या शाळेत जाऊन पैसेही भरुन आलेले असतात. किती ते विचारायचं नाही. कारण आकडा ऐकून आकडी यायची वेळ येते हे आजीला आणि आबांना वारंवार माहीत झालेलं असतच. तरीही ’ पडिले वळण इंद्रिया’ असं असल्यामुळे ती लेकाला विचारतेच आणि लेकाला कळवळून म्हणतेच, " अरे, काय रे हे ? या हिशेबाने म्हटलं तर तुमचं शिक्षण फुकटच म्हणायला पाहिजे की रे.’ लेकही नेहमीच्याच धीरगंभीरपणानं सांगतो, " आई, ही तर सुरवात आहे." नातूही खुष असतो. कारण तोही नवा ’युलिफोर्म’, खाऊचा डबा, नवं दप्तर या सगळ्या गडबडीत असतो.आजी मात्र काय बाई तरी एकेक फ्याडं’ असं मनाशीच पुटपुटत असते.मनातल्या मनात एवढसं पोर, कसं राहील शाळेत म्हणत उदास होत असते.
दिवाळी संपते. शाळेचा पहिला दिवस. युनिफोर्ममध्ये पिल्लू अगदी साजरं दिसत असतं. नवे बूट, पाठीवर दप्तर, हातात पाण्याची लालचुटुक बाटली ’ मी शालेत चालले " असं अख्ख्या गल्लीला सांगत पिल्लू स्कूटरवर बसून निघतं आणि आजीच्या डोळ्यासमोर मात्र पिल्लाच्या बाबाने त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचं नाही म्हणून घातलेला धिंगाणा उभा राहतो. पाचदहा मिनिटात स्वारी परत येणार आणि " कुकुली गाड्या बघायला चल" म्हणत हाताला धरुन नेणार या विश्वासाने आजी पटकन आंघोळ उरकून घ्यायच्यामागे लागते. तासाभराने पिल्लू येतं ते नाचतच. कारण शाळेच्या बागेत भरपूर गाड्या खेळायला ठेवलेल्या असतात, घोडा, हत्ती वगैरे प्राण्यांचं तोंड असलेल्या. त्यामुळे तर नातवाची चंगळच झालेली असते.शाळा म्हणजे गाड्या असं समीकरण झाल्यामुळे पुढचे आठ दिवस सकाळी आठ वाजल्यापासूनच " शालेत जाऊ या" असा धोषा लावून नातू सगळ्यांना भंडावून सोडत असतो.
आठ दिवसांची रंगीत तालीम पुरेशी झालीसं वाटून शाळेच्या " आत" जाण्याचा कार्यक्रम नवव्या दिवशी ठेवलेला असतो. एकेक पिल्लू आत जाताना आकांत सुरु करतं आणि नातवाचं आणि त्याला सोबत म्हणून बसलेल्या आजीचंही धैर्य खचायला लागतं. नातू आरडाओरडा करुन आपला निषेध व्यक्त करु शकत असतो पण आजी मात्र तटस्थपणाचा मुखवटा सांभाळता सांभाळता जेरीला आलेली असते. अर्धा तासच ’आत’ बसायचं असतं, पण त्या वेळानंतर ’बाहेर ’ आलेल्या सगळ्या पिल्लांची अवस्था ’ गाई पाण्यावर काय म्हणुनि गेल्या’ अशी झालेली असते. आजीच्या गाई तर पाण्यावर जाऊन परत येऊन आता त्या पाण्याची वाफ व्हायला लागलेली असते. नातवाला छातीशी कवटाळून घरी आल्यानंतार आजीने घोषणा करुन टाकते, " मी त्याला पोचवायला मुळीच जायची नाही. काही बिघडत नाही आणखी वर्षाने शाळेत गेला तरी."म्हणजे आता आजी आणि नातू दोघंही एका बाजूला आणि इतर घर दुस-या बाजूला.मग दुस-या दिवसापासून आई कंबर कसते आणि घरातली सकाळच मुळी " शालेत नाही जायच्यं’ या भूपाळीने आणि " बघ, आज तुला डब्यात गंमत देणार आहे, आज तुला शाळेतून आल्यावर चाकलेट देणार आहे" अशा ख्यालापासून सुरु होऊन अखेर " सगळे हसतील, तुला हम्मा आणून देऊ या. तू हम्माबरोबर जा. रस्त्यावर हम्मा शेण टाकते ते गोळा करावं लागेल" अशा ध्रुपद धमाराने याचा शेवट होई. नातवाची यालाही संमती असते. फक्त तो " हम्माला डायपर घालू या का? म्हनजे तिची शी लश्त्यावल पडनार नाही" असा मौलिक सल्ला देऊन आईच्या रागातली हवा काढून टाकतो. पण अखेर " बरं , तू आत जाऊ नको. बागेत खेळ. " असं करता करता " नीलाक्षी टीचर असल्या तर आत जा" इथपर्यंत मानसिक तयारी करण्यात आई यशस्वी होते.
मग एक दिवशी आजी आणि नातू स्कूटरवरुन शाळेला निघतात. आपल्या धडधडणा-या छातीचे ठोके नातवाला ऐकू येऊ नयेत म्हणून आजी चेहरा हसरा करुन नातवाशी काहीतरी गमतीदार बोलण्याचा प्रयत्न करत असते. नातू आपल्याच नादात रस्त्यावरच्या गाड्या बघण्यात दंग.शाळेच्या फाटकाशी आल्यावर तर आजीला आपले पायही थरथरताहेत अशी सूक्ष्म जाणीव होते आणि घशालाही कोरड पडलीय की काय असं पुसटसं वाटायला लागतं. नातू आता फाटकापासून उलटा फिरणार, आपल्या कमरेला विळखा घालणार आणि भोकाड पसरणार या भयाने ती गळाठून जात. पण पाच मिनिटं झाली तरीही काहीच आवाज येई ना म्हटल्यावर , पोरगं पळालं की काय या विचाराने ती दचकते तर नातू तिच्याकडेच पहात असतो. तिची नजर त्याच्या नजरेला भिडताच तो म्हणातो, " कुकुली, माजं दप्तल दे ना. मी न ललता आत जानाल आहे.आज आमी भालतमाताकी जय अशं मोठ्यंदा म्हननार हाये’
पाठीवर चिमुकलं दप्तर घेऊन जाणा-या पाठमो-या नातवाकडे पहाताना आजीचे डोळे जरासे चुरचुरतात.जगरहाटीचा पहिला धडा नातवाने किती लवकर गिरवला या विचाराने ती किंचित हसते, पण परतीच्या वाटेवर ती मुकाटच असते आणि रोज पटकन संपणारी वाट आज सरता सरत नसते.