फ़ार फ़ार वर्षांपासूनचं एक स्वप्न होतं, घराभोवती बाग आणि तिच्या एका कोप-यात झोपाळा। त्यातलं घराभोवती बाग हे स्वप्न साकार झालं पण बागेतला झोपाळा यायला माझ्या वयाची साठ वर्षं उलटावी लागली। ३० जानेवारीच्या संध्याकाळी बागेच्या मोठ्या फ़ाटकाच्या समोरच्या जागेवर झोपाळा उभा राहिला। अगदी मला जसा हवा होता तसाच। दोन माणसं बसू शकतील एवढीच रुंदी, बळकट पण तरीही आटोपशीर दिसणा-या कड्या आणि खांब आणि मुख्य म्हणजे वर कौलारु छप्पर। बसल्यानंतर उजव्या हाताला मधुमालतीचा वेल आणि डाव्या बाजूला बोगनवेलीचा फ़ुलोरा। एक हिरवी खोलीच तयार झाली , घरापासून वेगळी आणि तरीही घराच्या इतक्या जवळ। जिथे बसून घरातून बाहेर पडून घर न्याहाळताही येतं तुकड्या तुकड्याने आणि रमताही येतं एखाद्या तुकड्यात।
लहानपणी घराजवळच्या मैदानात खेळून झाल्यावर सरिताच्या घरातल्या भल्यामोठ्या झोपाळ्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी दाटीदाटीने बसून गाणी गायचो, आणि गाता गाता झोपाळाइतका उंच चढवायचो की अखेर काकू येऊन ओरडायच्या । तीच झोक्याची झिंग हा झोपाळा झुलवतानाही येते। लहानपणी मनात नुसतीच आनम्दाची कारंजी उसळत असतात.... अकारणच! पण आता कधी कधी अकारणच कातर होणा-या मनाला परत प्रवाहात आणण्यासाठी अशा एखाद्या सख्याची, " चौथ्या कम-याची' गरज असते। कोणाला तो देवळात मिळतो कोणाला वाचनात, तर कोणाला मित्रमंडळीच्या गराड्यात । माझा चौथा कमरा मला माझ्या या झोपाळ्यात मिळतो। मुलांच्या आठवणींनी व्याकुळलेल्या मनाला तो चार व्यवहाराचे बोल समजावतो, एखादंसुंदर पुस्तक वाचल्यानंतर स्वत:शीच संवाद करताना साथ देतो,चांदण्या नि:शब्द रात्री लपेटून आपल्या सावलीत मुरवून घेतो, मंद वा-यावर सळाळणा-या सांजेला मधुमालतीच्या गंधाने जोजवत राहतो तर सोनसळी सकाळी चैतन्याने न्हाणतो।
आभारी आहे बाळांनो, मनापासून आभारी आहे मी तुमची, माझ्यातल्या मी ला माझीच साथ घ्यायला मदत करण्यासाठी! दूर राहूनही माझाजवळच असण्यासाठी! या झोपाळ्याच्या रुपाने.
Saturday, May 16, 2009
Subscribe to:
Posts (Atom)