"त्याची माझी ओळख होऊनही आता ३५पेक्षा जास्त वर्षं उलटली तरीही मला त्याच्या छंदाची सवय होऊ नये याचं मलाच आश्चर्य वाटतं। तसा तो साधा, सरल मार्गी। आपण बरं की आपल्या हातातलं वर्तमानपत्र बरं या विचारसरणीचा। देवाचा कोणतासा भक्त "" मी देव सेवतो, देव प्राशन करतो आणि देवचि पांघरतो '' असं म्हटल्याचं सांगितलं जातं तसा तो कायावाचामनाने वर्तमानपत्रमय झालेला आहे। म्हणजे हे सगळं मी त्याच्या बायकोकडून ऐकलं आहे। नाहीतर त्यांच्या हनीमूनच्या कथा मला माहीत असण्याचं काय कारण? सुचरिता , म्हणजे अर्थातच आपल्या प्रमुख पात्राची अर्धांगी , एकदा करवादून मला सांगत होती, की ताई, आमच्यावेळी असं दोघांनीच बाहेर फ़िरायला जायची पध्दत नव्हती, पण घरच्यानी आम्हाला महाबळेश्वरला पाठावलं हौसेनं। हिंडावं फ़िराव ह्यांच्याहातून गजरा माळून घ्यावा या स्वप्नात मी दंग । तर "हे'' बाजारात गेलं की प्रथम वर्तमानपत्राच्या स्टॊलवर जाऊन थडकायचे। पेपर साग्रसंगीत वाचून झाल्याखेरीज त्यांच्या कानात मी काहीही बोललेलं शिरायचच नाही। मी मात्र त्या चार दिवसातच समजून चुकले की मला " दुसरेपणा''ला दिलय घरच्यांनी। पहिली माझी सवत म्हणजे पेपर आणि त्यातून वेळ मिळाला तर मी।
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीही त्यात थोडं तत्थ्य होतच। कारण आम्हा सगळ्यांची " माहिती खाण'' म्हणजे दिनकरच। टेलिफ़ोनच्या नवनवीन योजना असोत, पाणीपुरवठ्याच्या वेळेतला बदल असो, वीजेच्या लपंडावाची वेळ असो की क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक असो दिनकरने सांगितलं की बाकीचे निर्धास्त। कारण कोणत्याही विषयासंबधीची माहिती असो दिनकरच्या नजरेतून ती सुटणं अशक्य। वर्तमानपत्राच्या नावापासून ते " यांनी येथे यांच्यासाठी छापले;पर्यंत वाचून दिनकर त्यासम्बंधीची माहिती शोधून काढणार आणि सम्बंधिताला ती पोचवणार। मग भले घरातला गेस संपल्याने नंबर लावायचं काम असो, की सोनालीला शाळेत पोचवायचं काम असो ते थांबू शकतं पण वर्तमानपत्रातून हवी असलेली माहिती मिळाल्याखेरीज इतर कामाला हात न लावणा-या दिनकरमध्ये आणि आधी लगीन कोंडाण्याचं '' म्हणणा-या तानाजीत आणि दिनकरमध्ये काहीच फ़रक नसतो। अशा वेळी "श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं, असं कसं वेडं माझ्या नशीबी आलं ' असं म्हणून सुचरिता सुस्कारे टाकते तर ज्याचं काम झालेलं असतो तो इरावती कर्व्यांच्याच सुटकेच्या भावनेने " बरं झालं मी याचा मित्र झाले, बायको नाही झालो'' असे सुस्कारे टाकतो.एकदा तर दिनकरने हद्द केली होती। ते सांगताना सुचरिताचे डोळे संतापाने भरून आले होते आणि हसून हसून आमचे! म्हणजे झालं काय की, अनंतचं, दिनकरच्या दोन नंबरच्या मुलाचं टॉन्सिल्सचे ऒपरेशन होतं। त्याच्याजवळ बसायला लागेल म्हणून दिनकरने नेहमीपेक्षा जास्तीची दोन तीन वर्तमानपत्र, इंडिया टुडे, सुचरितासाठी " माहेर'' अनंतासाठी चांदोबा वगैरे सगळी जय्यत तयारी केली होती। सकाळी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अनंताने चांदोबा वाचून टाकला आणि त्याची चुळबुळ सुरू झाली। तो आणखी अस्वस्थ होऊ नये म्हणून दिनकरने त्याला इंडिया टुडे चित्रं बघायला दिला। तेवढ्यात नर्स बोलवायला आली, ऑपरेशन थिएटर तयार आहे आणि चला म्हणून, भराभरा सगळं सामान भरून लगबगीने सगळे तिकडे धावले। ओपरेशन व्यवस्थित पार पडलं। बायको डबा आणायला घरी जाणार होती अनंता भानावर आल्यानंतर । दिनकर अनंताजवळ थांबणार होता। तसे दिनकरचे पेपर्स वाचून झाले होते, पण बायको येइपर्यंत त्याला इंडिया टुडेचा आधार होता। सुचरिताने बघितलं की अनंत हालचाल करतोय, आता जायला काही हरकत नाही तोच तिला दिनकरचं खेकसणं कानावर आलं। आता इथे ठेवला होता, एक वस्तू जागेवर सापडेल तर शपथ। सुचरिता, आधी इंडिया टुडे शोधून दे आणि मग जा।'' सुचरिता आधीच घाईत। ऑपरेशनच्या काळजीने तिने धड स्वयंपाकही केलेला नव्हता। आता चटकन निदान डाळतांदळाची खिचडी टाकून यावं म्हणून ती भरकन निघाली होती तर याचं गुरगुरणं।असेल हो इथेच। नीट बघा असं तिने बराच संयम करून सांगितलं आणि त्याच वेळी दिनकरला आठवलं की इंडिया टुडे अनंताला चित्र बघायला दिला होता। दुस-या क्षणी तो कॉटकडे झेपावला आणि शुद्धी - बेशुध्दीच्या सीमेवर असलेल्या अनंताला विचारू लागला, ; अनंता, बाळा तू इंडिया टुडे कुठे ठेवलास? तो... तो ते.... तुला मी चित्रं बघायला दिला होता तो....' आता अशावेळी सुचरिता जोरात किंचाळली, नर्स पळत आली तिला न जुमानता सुचरिताने पिशवी जमिनीवर पालथी केली आणि जमिनीवर पिशवीतून पडलेला इंडिया टुडे दिनकरच्या हातावर आपटून ती तरातरा चालायला लागली तर यात तिचा काय दोष?
यानंतर पुलाखालून खूप म्हणजे खूपच पाणी वाहून गेलय।मोठ्या सोनलचं लग्न झालय। अनंता आता अमेरिकेत असतो।दिनकरने इकडे यावं आणि आपलं वैभव पहावं असं त्याला फ़ार वाटतं पण दिनकर त्याला तयार नाही। कारण तिथे मराठी वर्तमानपत्रं नाहीत आणि इंटरनेटवर बातम्या वाचण्यात दिनकरला मजा वाटत नाही। शेवटी कंटाळून सुचरिता एकटीच लेकाबरोबरनिघाली। ती येईपर्यंत दिनकर सोनलकडे राहणार होता। त्याला सोडून निघताना नाही म्हटलं तरी सुचरिताचं मन भरून आलं आपण लेकाच्या आग्रहाला बळी पडून निघालो हे चुकलं की काय अस ही तिच्या मनात आलं। पाणावल्या डोळ्यांनी दिनकरचानिरोप घेताना तिचे कान आसुसले होते, दिनकरचे शब्द ऐकायला, " लवकर ये हं मी वाट पाहतो। ' आणि दिनकर तसं म्हणालाही, पण पुढच्याच वाक्याने सुचरिताला जमिनीवर आणलं, " .... आणि येताना कोणताही एक पेपर घेऊन ये तिकडचा। बघू तरी एवढा मोठा असतो म्हणतात तर काय असतं तरी काय त्याच्यात ते।''