Tuesday, November 24, 2009

दुनिया रंगरंगीली

वेगस --- Welcome to Fabulous Las Vegas अशी पाटी आपलं स्वागत करते, तेव्हा आपल्याला तो एक जाहिरातीचा प्रकार वाटतो, पण जाहिरातीतला दावा प्रत्यक्षात आणणारी जागा म्हणजे लास वेगास. मोहमयी, what you do in Vegas remains in Vegas असा दिलासाच हे शहर, नव्हे नगरी देत असल्यामुळे या पापनगरीत येऊन पाप करण्यात लोक अहमहमिकेने सामील होतात.
एक वेगळीच दुनिया इथली रात्र आपल्यापुढे उलगडते. अशी दुनिया जी आपण केवळ सिनेमात, आणि त्यानंतर स्वप्नातच बघत असतो. इथला झगमगाट ज्या भागात आहे, त्याला strip म्हणतात. स्ट्रिप पाच साडेपाच मैलांची आहे. या जागी तुम्ही भर रस्त्यावरही कायद्याने दारु पिवू शकता, इथल्या कॅसिनोमध्ये जुगार खेळू शकता पण इथे कुठेही वेश्याव्यवसायाला कायद्याने बंदी आहे त्यासाठी तुम्हाला स्ट्रिपपासून थोडं लांब म्हणजे 60 मैलावर असलेल्या दुसऱ्या गावी जावं लागतं. स्ट्रिपवर शेकडो कॅसिनोज आहेत आणि प्रत्येक कॅसिनोमध्ये शेकडो लोक रोज रात्री पैशाची उधळण करत असतात तर त्यांच्या दिमतीला प्रत्येक कॅसिनोत हजारो लोक राबत असतात. इथल्या प्रत्येक हॉटेलला एक थीम आहे. त्यानुसार त्याची सजावट केलेली असते. Hard Rock या हॉटेलच्या बाहेर भलंमोठं गिटार दिव्यांनी चमकत असतं तर Venetian ची सजावट व्हेनिससारखी केलेली आहे. या हॉटेल्समध्ये तुम्ही राहू शकता, दरही शहरातल्या इतर हॉटेल्स इतकाच. इथे कोणत्याही हॉटेलच्या self parkingमध्ये तुम्ही गाडी ठेवू शकता आणि तेही फ़ुकट. कारण इथे पैसा मिळवण्याचं प्रमुख साधन म्हणजे कॅसिनो.इथल्या ब-याच हॉटेल्समध्ये नाटक, जादूचे प्रयोग, टॉक शोज यासाठी कायमची थिएटर्स बांधलेली आहेत. आम्ही पाहिलेल्या "का" या फ़्रेंच नाटकाचं थिएटर अखाद्या खेळाच्या स्टेडियम इतकच प्रचंड होतं. आम्ही पहिल्या दिवशी गेलो ते हॉटेल होतं बेलाजियो. एक तळं आणि त्याच्या सभोवार वेगवेगळी हॉटेल्स. पॅरिस, बेलाजियो, प्लॅनेट हॉलिवूड ही त्यातलीच काही. यातलं प्रत्येक हॉटेल प्रासादतुल्य. इथे रहाण्याची सोय असते आणि खाली जुगार खेळण्याची.तिथे अप्रतीम पोषाख केलेले स्त्री पुरुष हातात हात घलून येतात आणि कॅसिनोत शिरतात. आम्हीही "कॅसिनो म्हणजे काय रे भाऊ" म्हणत आत शिरलो तर अनेक टेबल्सवर बहुतांश म्हातारी मंडळीच खेळत होती आणि त्यातही म्हाता-या स्त्रियांचा भरणा अधिक होता. इथे १ डॉलरपासून तुम्ही खेळू शकता. आणि ते सगळ्या हॉलमध्ये मांडलेल्या टेबल्सवर. कोटींची भाषा करणारे खास आतल्या दालनात असतात आणि तिथे ऐ-यागै-यांना प्रवेश नसतो.

बेलाजियोमध्ये आम्ही गेलो तेव्हा हॅलोविन हा विषय घेऊन सजावट केली होती. मेपलची प्रचंड पानं, भोपळे, भाज्या अशा काही मांडल्या होत्या की ख-याच वाटाव्यात. एका कोप-यात प्रचंड आकाराचं रहाटगाडग्याचं चाक विहिरीतलं पाणी काढून ओतत होतं. त्या बागेतल्या दोन झाडात भुतं कोरलेली होती. आपल्याकडे झाडातून रोखून पाहणारी भुतं इतकी गोड होती की त्यांची भीती वाटण्याऐवजी त्यांनी आपल्या घरच्या बागेत रोज येऊन आपल्याला रोज दूरदेशीच्या गोष्टी सांगाव्यात असं वाटावं. एक भूत तर आम्हालाच विचारत होतं आपल्या खर्जातल्या आवाजात, " Do you want me to smile? say cheese" आणि मग हसत होतं. फ़ोटो काढायला मग झुंबड उडणार नाही तर काय?

बेलाजियोच्याबाहेरच्या तळ्यात संध्याकाळी ६ ते रात्री ८ या वेळात दर अर्ध्या तासाने आणि तिथून पुढे दर पंधरा मिनिटांनी musical fountain चा शो होतो. तो रात्री १२ वाजेपर्यंत असतो. तो पाहण्यासाठी लोक वेड्यासारखे उभे असतात. आम्हीही त्यात सामील झालो. अतिशय तोकडे कपडे घातलेल्या तरुणी म्हणजे ज्यांना बघून पाप करायला उद्युक्त व्हावच लागेल अशा, हसत खिदळत चाललेल्या होत्या. या स्ट्रिपवर तुम्ही भर रस्त्यावरही वारुणी चाखू शकता. त्यामुळे ब-याचजणींच्या हातात लहान मोठ्या सुंदर आकाराच्या बाटल्या होत्या. यामध्ये पुरुष होते तशाच स्त्रियाही होत्या. सगळे आपले एकच धुन आळवत होते, "चला जाता हूं खुषीकी धुनमें धडकते दिलके तराने लिये" पण मला मजा वाटली ती ही की यात कुठीही बिभत्सपणा किंवा छचोरपणा, टपोरीपणा नव्हता. जे काही चाललं होतं त्यातही एक नजाकत होती. सारा परस्पर खुषीचा मामला असल्याने आणि बाकीच्यांच्या नजरा तिकडे वळत नसल्याने चोरटेपणा आणि त्यातून येणारी बुभुक्षितता नव्हती. मला तर आपण गोष्टीत वाचतो त्या गंधर्वनगरीतले यक्ष, किन्नर, गंधर्व आणि अप्सरा विहरत चालल्या आहेत असंच वाटत होतं. आमच्यासारखे जे कुटुंबवत्सल लोक ’काय आहे वेगास ते बघूया तरी’ म्हणून आलेले होते, तेच त्यांच्याकडे हळूच चोरटा कटाक्ष टाकत होते.
आणि एकाएकी तळ्यातल्या पाण्यात हलके हलके तरंग उमटायला लागले. पाश्चात्य संगीताची हलकीच धुन उमटली आणि एकदम सगळं तळंच उजळून निघालं. पुढची पंधरा मिनिटं त्या तळ्यात कारंजांच्या माध्यमातून जे काही घडलं ते केवळ अवर्णनीय होतं. शेकडो कारंजी जाझच्या तालावर थिरकत होती. लवत होती. उचंबळून स्वत:ला उधळून देत होती. आणि गाणारा प्रियकर गीतातून प्रेयसीला आपण अनुभवलेल्या मधूर क्षणांची आठवण करून देत उमलवत होता. त्या कारंज्यांच्या उसळण्यातून एक प्रेमी युगुल, आपल्यातच मग्न, असं नाचत असल्याचा जो एक अनुभव येत होता, तो केवळ शब्दातीत होता. पहिलं कारंज उसळल्यावर मी कॅमेरा सरसावला आणि दुस-याच क्षणी भारावून बंद केला. ते सगळं डोळ्यात साठवण्याऐवजी निर्जीव कॅमे-यात बंदिस्त करायला माझं मन मानेना. त्यासाठी दुस-यांदा तो नजारा बघायचा होताच ना!

दुस-या दिवशी आम्ही गेलो ते हॉटेल होतं व्हेनेशियन. हॉटेलच्या कलाकुसरीकडे डोळे फ़ाडून आणि तोंड उघड टाकून बघत आम्ही आत शिरलो आणि ब्रॅंडेड वस्तूंच्या नुमाइशीतून वाट काढत पोचलो ते एकदम मोकळ्या निळ्या आकाशाखाली. त्यात कुठे कुठे पांढरे ढग आणि मंद चमकणा-या चांदण्याही होत्या. क्षणभर काहीतरी चुकतय असं वाटलं . कारण इथे ५ वाजताच अंधार पडतो. इथल्या आसमंताने पांघरलेल्या काळ्या शालीवरची हि-या माणकांची कलाकुसर बघतच आम्ही आत आलो होतो, मग इथे अजून उजेड कसा? आणि नीट निरखून पाहिलं तर जाणवलं की हे मानवनिर्मित आकाश अहे. इथे काळ थांबलेला आहे. उंच इमारतींच्याहीवर आकाशाचा आभास करणारा निळा घुमट आणि त्यावर ता-यांप्रमाणे चमकणारे दिवे. मधल्या भव्य चौकात खाण्यासाठी मांडलेली टेबल्स आणि बाजूच्या कालव्यातून तरंगत जाणा-या बोटी. इटालियन संगीत आळवणारे इटालियन पोषाख केलेले माझी. अर्थात त्या माझींच्या बेल्टला वॉकीटॉकी लावलेला होता आणि त्यावरून त्यांचं परस्परांशी आपापल्या गि-हाइकाबद्दल आणि कामाबद्दल बोलणं अर्थात इटालियनमध्ये चाललं होतं तो भाग वेगळा.
इथे आम्ही नावेतून फ़ेरी मारण्यासाठी रात्री पावणेआठ वाजता उभे राहिलो. आमचा नंबर साडेआठ वाजता लागणार असल्याबादाल आम्हाला आधीच कल्पना देण्यात आलेली होती.एका नावेत चार माणसं बसू शकतात.या चारजणात छोट्या मल्हार वय वर्षे ५ महिने याचाही समावेश असल्याने ते तिघे एका नावेत आणि आम्ही दोघे आणि मूळचं चेन्नईचं आणि सध्या बोस्टनला कामानिमित्त रहात असलेलं एक तरुण जोडपं दुस-या नावेत अशी विभागणी झाली. आम्ही ज्या नावेत बसलो होतो त्या नावाड्याने सुरवातीलाच कमरेत झुकून आम्हाला सांगूनच टाकलं की आता पुढची पंधरा मिनिटं तो आमचा मित्र आहे. आणि तात्काळ जुन्या मित्रासारख्या त्याने गप्पा मारायलाही सुरवात केली. पण ते गप्पा मारणं बहुतांशी एकतर्फ़ीच होतं. कारण मराठीने केला इटालिअयन मित्र. आमचे उच्चार त्याला आणि त्याचे उच्चार आम्हाला समजून येईपर्यंत १५ मिनिटं कधी उलटून गेली ते समजलंच नाही. आम्हाला आमच्या मित्राबद्दल एवढं मात्र कळलं की "फ़िफ़्तीन देज बॅक ही एत इंदियन फ़ूद अंन इत वॉज वेरी हॉत." अर्थात पुढचे प्रवासी ज्या कुठल्या देशातले असतील त्या देशाची माहिती त्याला असली तर तो ते त्यांना मैत्रीत सांगणार होताच. फ़क्त आमच्या या मित्राला त्याच्या नावेतले चौघे प्रवासी इंदियन आहे हे कळल्यानंतर खात्रीने वाटत होतं की "यू मस्त बी नोइंग ईचादर, बिकॉज इंदिय इज अ स्मॉल कंत्री." ज्यावर आम्ही चौघांनी जोरदार आक्षेप घेतल्याने त्याने मान्य केलं की "ही वॉज जस्त किदिंग." सगळ्याच नावांचे नावाडी उत्तम गाणारे असावेत. यात नावाडी मुलीही होत्या. कारण त्यांची गाणी संपली की नावेतले लोक हसत हसत टाळ्या वाजवत होते. त्यातले कितीजण कळून आणि कितीजण सुटकेच्या भावनेने हे कळायला मात्र वाव नव्हता. मल्हारने फ़ेरी मारताना नावेतल्या आईवडिलानाच आनंद दिला असं नाही तर बाजूला उभे राहून बघत असलेल्या लोकांकडे खिदळून बघत त्यांच्याही चेह-यावर हसू उमटवलं. त्याच्यासाठी नावाड्याने ललबाय गाइलं. आमच्या नावाड्याने बहुधा प्रेमगीत गायलं असावं. कारण एका कमी उजेड असलेल्या पुलाखाली आल्यावर त्याने विचारलं, "दोन्च्यू वॉन्त तु किस ?" तेवढं आम्हाला बरोबर कळलं. पण सध्या मल्हारचाच पापा घ्यायची सवय असल्याने गोंधळ झाला, तोपर्यंत नाव पुढे गेली होती. उतरताना मात्र पोराने हाताला धरून उतरवलन हो, आणि वर म्हणाला, "हॅव हॅपी ताईम ममा!"

याच हॉटेलात मादाम तुसा म्युझियम आहे. म्हणजे मूळ म्युझियममधले काही पुतळे इथे आणि काही न्यूयॉर्कला आलटून पालटून रहायला जातात. आम्ही प्रवेश केला तेव्हा बहुतेक सगळे आम्हाला अगम्य असलेली माणसंच होती. पण जी काही होती त्यांच्याबरोबर फ़ोटो काढून घेताना मजा आली. एका मजल्यावरून खाली जाताना निकेतकडे स्ट्रोलर असल्याने तो लिफ़्टने गेला आणि आम्ही दोघे एका अंधा-या वाकड्या जिन्याने खाली जायला निघालो. वाटेतच स्पायडरमॅन आपल्या नेहमीच्या पोजमध्ये आमची वाट बघत होता. त्याला हाय करून खाली आलो तर अंधारात एका बाजूला एक बंदिस्त खोलीकडे जायला पडदा लावलेला होता. तिथून आपण आत गेलो की आपल्याला घाबरवून किंचाळायला लावणारी, अंगावर येणारी भयानक भुतं तयार असतातच. मागच्यावेळी निकेत आणि स्वप्नील कसे घाबरले होते ते मी हसत हसत विलासला सांगत असतानाच माझी नजर एका कोप-यात गेली. डोक्यातून रक्ताची धार एक लागलेला उघडाबंब तरुण कसाबसा गलितगात्रसा भिंतीला टेकून उभा असलेला मला दिसला. ५ मिनिटांपूर्वी तो तिथे नव्हता. माझ्या मनात शंकांचं मोहोळ. कुठल्यातरी टोळीयुध्दात मार खाऊन आलेला हा तरुण इथे लपून बसलेला असावा या विचाराने मी पावलं चटकन उचलली आणि तो एकटक बघणारा तरुण एकदम हलला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. ही कसली बिलामत. मरतोय आता हा पुढे आला तर या विचाराने माझी बो बो बोबडी वळली. मी पळत निकेत होता तिथे पोचले आणि त्याला सांगितलं तर तो हसायला लागला. "अग, तो तिथे याच कामाला ठेवलाय." पण यावर विलासचाही विश्वास बसेना. "अरे, डोक्यातून केवढं रक्त येतय त्याच्या" असं म्हणतच तो परत डोकावून बघायला लागला तर तिथे कोणीच नव्हतं. मग निकेतने सांगितलेलं आठवलं त्या अंधा-या बोळकांडीत पाटीच लावलेली असते म्हणे. "Don't beat the ghosts. They are humans like you." कारण घाबरलेले लोक कधीकधी अंगावर आलेल्या भुतांना हातात असेल ते फ़ेकून मारतात.पहिला भीतीचा धक्का ओसरल्यावर माझ्या मनात आलं, कोणीतरी येणार आणि मी त्याला घाबरवणार या कामासाठी अंधारात वाट बघत नुसतं बसून रहायचं हे किती कंटाळवाणं होत असेल.
स्ट्रिपवर आम्ही चार दिवस फ़िरत होतो. कारण मल्हाररावांच्या झोपण्याच्या, खाण्या पिण्याच्या वेळा आम्हाला जास्त महत्त्वाच्या वाटत होत्या. तिस-या आणि चौथ्या रात्री त्या झगझगाटाचा खरं तर कंटाळा आला. अगदी "तिथे निसर्ग म्हणजे अगदी कच-यासारखा पडलेला असतो" या धर्तीवर वैभव तिथे नुसतं कच-यासारखं पडलेलं असतं असं म्हणायची वेळ आली. पण तरीही एका हॉटेलवर मंद प्रकाशात उजळलेले ग्रीक पुतळे त्यांची सभा, हातात भाले घेऊन दक्ष असलेले रखवालदार आम्हाला त्या काळात घेऊन गेले. अखेरच्या दिवशी आम्ही मिराज हॉटेलच्याबाहेर असलेला वोल्कॅनोचा शो बघितला. तिथेही फ़ूटपाथवर लोक आधीपासूनच जागा धरून होते. मोठे मोठे खडक कौशल्याने मांडून एक छोटासा डोंगर तयार केलेला होता. त्यावरून झुळूझुळू पाणी वहात होतं. आजूबाजूला हिरवीगार झाडं होती. शो बरोबर ८ वाजता सुरु होणार होता. आणि बरोबर आठ वाजता स्फ़ोटासारखे प्रचंड मोठे आवाज यायला लागले. एकाएकी डोंगराआडून लाल पिवळा प्रकाश दिसायला लागला. आणि पुढची दहा मिनिटं हळूहळू संपूर्ण डोंगरच पेटत गेला. आकाशात उंचच उंच लाव्हा उसळायला लागला. डोंगराच्या कपारीतून पिवळ्या प्रकाशाच्या शलाका डोकावायला लागल्या. इतकच नाही तर डोंगराच्या जवळच्या परिसरात पाण्यात पिवळ्या आगीचा लोळ उसळायला लागला. लाल पिवळया प्रकाशाच्या त्या नर्तनाकडे पहात असतानाच हळूहळू आग कमी होऊ लागली. आणि पेटलेला डोंगर शांत झाला. परत झुळूझुळू पाणी वहायला लागलं. थोड्या वेळापूर्वीच्या तांडवाचा मागमूसही उरला नाही. पहिल्या दिवशी जलाचं शांतवणारं नर्तन पाहिलं तर शेवटच्या दिवशी संहाराचं आगीचं नर्तन पाहिलं. दोन्हीही खिळवून ठेवणारं.
स्ट्रिप सोडल्यास इथे बाकीच्या शहरात एक आरामदायी वातावरण आहे.इतर शहरात असतं तसच कुटुंबवत्सल. सुंदर सुंदर बंगले किंवा अपार्टमेंटस. मोठ मोठी ऑफ़िसेस. गंमत म्हणजे जागेची विपुलता असल्याने बहुतांश ऑफ़िसेस आडवी वाढलेली. रस्त्यावर फ़ुलांची सुंदर सजावट. पण वाळवंट असल्याने घनदाट झाडीचा अभाव. आम्ही गेलो त्यावेळी मंदीचा प्रभाव इथेही दिसला. ब-याच इमारतीवर "विकणे आहे" किंवा "भाड्याने देणे आहे" च्या पाट्या लटकलेल्या होत्या. कुठल्याशा कॅसिनोतले १२०० कर्मचारी काढले. कुठलासा कॅसिनो पूर्ण बंद पडला असं ऐकण्यात येत होतं.रस्त्यावर मळलेले कपडे घातलेले भकास चेह-याचे पुरुष हातात पाटी धरून चालताना दिसत होते. नोकरी गेल्यामुळे दोन मुलं आणि बायको यांना पोसू शकत नाही अशी पाटी घेऊन चालणारा भकास चेह-याचा एक तरुण अजूनही माझ्या चेह-यापुढून हलत नाही. हे शहर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. इथे या कॅसिनोत जुगार खेळून जीव रमवा आणि आम्हाला प्रचंड पैसा कमवून द्या. त्यासाठी आम्ही तुम्हाला ऐषोआराम मिळवून देऊ. एखादी थीम जुनी झाली म्हणून काही वर्षांनी संपूर्ण कॅसिनो पाडून नवीन थीम घेऊन पहिल्यापेक्षाही भव्य कॅसिनो बांधू, पण माणसांसाठी आमच्याकडे वेळ नाही. इथे जाहिरातींचे फ़लक हातात घेऊन भर उन्हात चौका चौकात माणसं उभी असलेली दिसतात. कारण कुठेही फ़लक लावून शहराच्या सौंदर्यात बाधा आणून पर्यटकांना नाराज करणं आम्हाला परवडणारं नसतं. सॅनहोसे-सॅनफ़्रान्सिस्कोमध्ये कुठल्याही मोठ्या मॉलमध्ये गेलं की लहान बाळाला पाजण्यासाठी किंवा त्याचे डायपर बदलण्यासाठी एक फ़ॅमिलीरुम असते. पण अशी रुम कुठल्याही मॅलमध्ये सोडाच पण विमानतळावरही नाही. याचं कारण असं सांगितलं जातं की १८ वर्षाखालील मुलांनी इथे येणं अपेक्षितच नाही. आणि बाळाची भूक काय तुम्ही बाटलीने भागवू शकता, जी तुम्ही कुठेही देऊ शकता. वारे वा, उध्दवा अजब तुझे सरकार. वेगासने निघताना तिथल्या अनेक आनंददायी, सुखकारक क्षणांबरोबरच ही काही प्रश्नचिन्हं माझ्या मनात उमटवली खरी! निकेत स्वानंदीचे डोळे मात्र भरून आले होते आणि डोळे पुटपुटत होते, Vegas we will be back again ! कारण त्यांच्या तिथल्या वास्तव्याला केवळ स्ट्रिपचं आकर्षण नव्हतं तर त्यांनी अनुभवलेला, आपलेपणाचा सुगंधही होता, त्यांनी मनात जपलेला, रेशमी कपड्यात ठेवलेल्या केवड्याच्या पानासारखा.

Saturday, November 21, 2009

लास वेगास ---- प्रथम दर्शन !

सॅनफ़्रान्सिस्कोपासून, म्हणजे सॅनहोजेहून लास वेगास, इकडचा उच्चार वेगस, विमानाने सारं मिळून दीड तासाचं अंतर बसल्यावर बेल्ट बांधा ही घोषणा कानात शिरेपर्यंत उतरायच्यावेळचे बेल्ट बांधायची वेळ येते. विमान जसजसं खालच्या दिशेने सरकायला लागलं तसं तसे निकेत आणि स्वानंदीचे चेहरे उजळायला लागले. गेली ३ वर्षं ते वेगासलाच होते, एका सुंदर नात्याची वीण त्यांनी इथे विणली होती. म्हणजे त्यांच्या परस्पर नात्याचीच नव्हे तर मैत्रीचा एक सुंदर गोफ़ त्यांनी एथे विणला होता. अनेक मित्र , मैत्रिणी जोडल्या होत्या, अनेक सुंदर क्षण त्यांच्या डोळ्यात मला तरारलेल्या पाण्याच्या आड मला दिसले. अनेक जुन्या खुणा ते शोधत होते,नवीन बांधकामं पाहून आनंदाने त्या बांधकामाची सुरवात आठवत होते. मला मात्र जमीन जवळ येता येता एक अतिशय सुबक, आखीव रेखीव शहर दिसत होतं, मधूनच गोल्फ़ मैदानांच्या हिरव्या रंगाने सजलेलं.
गाडी विमानतळावरून बाहेर पडता पडता काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. सगळा परिसर मोकळा मोकळा वाटत होता. मग लक्षात आलं ते हे की इथे झाडांची गर्दी नाही. सगळी पामची झाडं किंवा खुरटी झुडपं. सॅनफ़्रान्सिस्कोसारख्या हिरव्यागार परिसरातून आल्यामुळे तर हे अधिकच जाणवलं. आणि जाता जाता एकदम जाणवलं तो म्हणजे वाहनांचा वेग. सगळ्या वातावरणात एक सुशेगातपणा भरून राहिला होता, आपल्या गोव्यासारखा. रहदारी आरामात चालली होती. कोणालाच गडबड नव्हती. कारण ही एक रंगिली जागा आहे, मौजमजा करायची.सगळे ताण विसरून मदिरा आणि मदिराक्षींचा सहवास लुटायची. अर्थात इथे ही रंगीनमिजाज हवा फ़क्त पुरषांसाठीच आहे असं नाही, स्त्रियाही सगळ्या गोष्टी तितक्याच सहजतेने उपभोगू शकतात. म्हणजे पाहिलेल्या जाहिरातीत पोरी जशा आव्हान देत होत्या, तसेच तरुण पोरंही " निधड्या छातीने" उभी होती.
या सगळ्या रंगीन हवेची झुळूक विमानतळावरच येत होती. विमानतळावर आव्हानात्मक , चेतवणा-या जाहिराती रंगीत टीव्हीवर झळकत होत्या. आजूबाजूच्या गर्दीत एखादी का होईना, मदमस्त तरुणी गर्दीचं लक्ष वेधून घेत होती. माझं लक्ष मात्र वयामुळे असेल, पण विमानतळावरच दिसलेल्या तीन म्हाता-यांनी वेधून घेतलं. एक विमानतळावरच व्हिडिओ गेम्सच्या स्टॉलवर काम करत होती. दुसरा माणूस बसमध्ये काम करत होता, बॅगा वगैरे उचलून ठेवत होता.आणखी एक म्हातारी होती. तरुनपणी ते नक्कीच सुंदर दिसत असावी. पण तिचा झगझगीत मिनी स्कर्ट, उंच टाचेचे बूट, चेह-यावरचा मेकप बाजारु वाटत नसला तरी ती कुठे काम करत असेल ते सांगत होता. वाईट वाटलं मला,. तीनही व्यक्ती ६० ते ७० वर्ष वयाच्या होत्या.पोटासाठी त्यांना या वयातही काम करावं लागत होतं. कदाचित हीच या रंगीन दुनियेची काळी बाजू असावी.अर्थात वयाने पिकलेल्या माणसांनी अखेरपर्यंत काम करत राहणं हा अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्याचा एक साइड इफ़ेक्ट असावा. वयाच्या १६व्या वर्षी घर सोडून स्वतंत्र राहण्याच्या अट्टाहासापायी शिक्षण, नोकरी या रहाटगाडग्यात कितीतरीजण पिसले जात असतील दमछाक होऊन शिक्षण सोडून मिळेल ती नोकरी पटकावून जीवनाच्या प्रवाहात वहात जात असतील. मग त्यांची अखेर आणखी वेगळी कशी असणार? आपल्याकडे दारिद्र्य म्हणून आणि इथे सुबत्तेचा महापूर म्हणून पण परिणाम एकच.
हॉटेलवर जाता जाता या नगरीच्या प्रथम दर्शनाने मला थोडसं अंतर्मुख केलं खरं!

Friday, November 13, 2009

पियर ३९

या रविवारी आम्ही पियर ३९ या ठिकाणी गेलो होतो. हे शिप यार्ड आहे. त्यातल्या ३९व्या गेटकडे वेगवेगळी दुकानं , गमतीचे खेळ जादूचे प्रयोग असले प्रकार असल्याने आम्ही तिकडे गेलो. अर्थातच रविवार असल्याने पार्किंगला जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागलीच. हल्ली कोणत्याही पर्यटनस्थळाकडे असतात तशी दुकानं, ( शिंपल्यांच्या वस्तू वगैरे विकणारी, शो पिसेसची) होती. एक नुसतं मोज्यांचं एक नुसतं टोप्यांचं. माशांचे प्रकार खिलवणारी.एका दुकानात शंख शिंपल्यापासून केलेल्या वस्तू होत्या. त्यात एकावर एक अशी मोठ्यापासून लहान अशी दहा कासवं ठेवलेली होती, शंखाची. आपण पेपरवेट म्हणून ठेवतो तसे शंख एका बाजूला कापून तिथे स्प्रिंग बसवलेली होती. तिला कवडी लावून त्यावर मणी चिकटवून डोळे केले होते. आणि मोठ्या कासवावर छोटं कासव बसवलं होतं. जरा हात लावला की कासवं मान हलवायला लागायची. मोहमयी वस्तू होत्या, पण आमचा ५०चा पाढा चांगलाच पाठ असल्याने नयनसुख की काय म्हणतात ते भरपूर घेतलं.असो. एक मोत्यांचं दुकान होतं. तिथे शिंपले ठेवलेले होते( पाण्यात, एका भांड्यात). आपण चिमट्याने त्यातला एक शिंपला उचलायचाआणि वेगळ्या डिशमध्ये ठेवायचा. मग ज्याने उचलला त्याने शिंपला ठेवलेल्या डिशला हात लावायचा आणि अलोऊऊऊऊऊऊऊओहा( Aloha) असं म्हणायचं. आपल्याबरोबर तिथले लोकही म्हणतात आणि एक बाई घंटा बडवते. मग अगदी श्टाईलमध्ये ती बाई शिंपला सुरीने कापते. शिंपला उघडल्यावर आत मोती सापडला तर तो आपला. ( अर्थात pearl farming असल्याने तो सापडतोच.)मला गुलाबी छटा असलेला मिळाला आणि स्वानंदीला क्रीम कलरचा. दोन सारखे हवे असतील तर बदलून मिळतात, पण मग त्यांच्याकडच्या दागिन्यात तो बसवून घेतला तरच. अशी ती मीठी छुरी असते. पण ते ड्राम्यॅटायझेशन इतकं भारी असतं की आपण क्षणभर हवाई बेटावर जातो आणि पैसे वसूल होतात.
तिथून पुढचा गाळा मिठाचा. दिवाळीच्या रंगीत रांगोळ्यांचे ढीग ठेवल्यासारखे मिठाचे ढीग होते आणि ते वेगवेगळ्या सुगंधाचे होते ( असं त्यावरच्या पेट्यांवर लिहिलेलं होतं) हे Hand made मीठ होतं आणि ते पाण्यात टाकून ( म्हणजे टबमध्ये , बादलीत) टाकून अंगावर घेतल्यास अंग दुखत असल्यास बरं वाटतं.अंग हलकं होतं असं मला सांगितलं गेलं.. मला सगळ्याला उदबत्तीच्या दुकानात गेल्यावर एक उग्र वास येतो तसा येत होता. मग आम्ही तिथून एक बाटली विकत घेतली आणि अपल्याला हव्या त्या रंगाचं मीठ त्यात भरलं. त्या माणसाने बूच लावून " कसं गंडिवलं " असं मनातल्या मनात म्हणत बाटली दिली. पण अशा ठिकाणी आपण गंडण्याची मजा लुटायला तर जात असतो.
सगळी दुकानं पालथी घालत आम्ही टोकाला पोचलो. तिथून समुद्र पाऊलभर अंतरावर होता. अथांग पसरलेला समुद्र, त्यावरून जाणा-या बोटी, फ़ेरी बोट्स मधूनच डोकं वर काढून सुळकांडी मारणारे सी लायन्स, तरंगणारी छोटी बदकं, आकाशातून पंख पसरून उडत असतानाच पाण्यात सूर मारणारे पक्षी आणि आजूबाजूला असणारी गर्दी. अशा ठिकाणी आपल्याला समुद्र जिवलगासारखा भेटत नाही. लग्नसमारंभात भेटलेल्या बालमैत्रिणीसारखा वाटतो . भेट तर होते पण पोटभर गप्पा होत नाहीत.
याठिकाणी सी लायन्सच्या झुंडी बघायला मिळाल्या.तिथे सी लायन्सचं अभयारण्य आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते.त्यांचं संवर्धन केलं जाते. कदाचित एक एकटे भेटले असते तर मजा वाटते पण ते समुद्रात स्टॅंडवर पसरलेले मासाचे लडदू आणि त्यांचा तो आवाज, वास. ५ मिनिटातच तिथून निघाले मी.
एवढं सगळं होईतो ५ वाजून अंधार पडला होता. समुद्रकिनारी येऊन परमेश्वराच्या आद्य अवताराला भेटल्याशिवाय निघणं शक्यच नव्हतं. तिथे एक हॉटेल होतं. त्याचं नाव बुब्बा गम्प्स. Forest Gump नावाच्या सिनेमावरून प्रेरणा घेऊन Bubba Gump shrimps नावाची हॉटेल्सची चेन अमेरिकेत प्रसिध्द आहे. आम्ही गेलेल्या हॉटेलमध्ये त्या सिनेमासारखंच वातावरण निर्माण केलेलं होतं. Tom Hanks या सिनेमाचा हिरो आहे .त्याचं सिनेमातलं नाव Forest Gump. तो डोक्याने अधू असतो आणि ज्या गोष्टी करतो त्यात प्रथम स्थानावर असतो. मी हा सिनेमा निकेतबरोबर टी.व्ही वर पुण्यात बघितला होता, खूप वर्षांपूर्वी. माझ्या मते या सिनेमात त्यांनी कमर्शियल सिनेमाच्या हिरोची खिल्ली उडवली आहे. त्या सिनेमातले प्रसंग, वाक्य हॉटेलात लावलेले आहेत. टेबलावर त्या सिनेमात वापरलेल्या वस्तूंसारख्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आमच्या टेबलावर टेबल टेनिसच्या रॅकेटस साखळीने बांधून ठेवलेल्या होत्याआणि त्यावर ड्रिंक्सचं मेन्यु कार्ड होतं. त्या सिनेमात हिरो टे. टे. खेळतो. आम्ही आत गेल्यावर रिसेप्शनिस्टने निकेतला एका रिकाम्या टेबलाकडे बोट दाखवून साम्गितलं, "Run Forest to that point".सिनेमातला फ़ॉरेस्ट हा नायक पळण्याच्या शर्यतीत पळतही असतो आणि पहिला येतो. आमची वेट्रेस मागवलेले खाद्यपदार्थ ( म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने तळलेली कोलंबी) येईपर्यंत निकेतशी त्या सिनेमातल्या माहितीवरून क्विझ खेळत होती. अगदी हसतमुख होती. कुठे वेटर्स आलेल्यांशी चेष्टामस्करी करत होते. कुठे वाढदिवस असलेल्या मुलीसाठी गाणी म्हणत होते. एकंदर तिथे बहुतेक तरुण मंडळी होती आणि मस्त गप्पा गोष्टी करत होती. मस्त महोल तयार झाला होता. सगळं हॉटेल लाकडी , वेगवेगळ्या, पातळ्यांवर टेबल्स मांडलेली होती. काचेच्या खिडक्या त्यातून दिसणारा समुद्र, आणि लांबवर गेलेली ब्रिजवरची दिव्यांची माळ आणि चमचमणारे सॅनफ़्रॅन्सिस्कोचे दिवे. आणखी एक तरल संध्याकाळ. लक्षात रहावी अशी!

Thursday, October 29, 2009

मिस्ट्री स्पॉट

पुन्हा एकदा बिग बेसिनचा रस्ता. झाडीने आच्छादलेला, मधून मधून सूर्यप्रकाशाला अटकाव करणारा. शांततेची दुलई पांघरलेला. वळणा वळणाचा. पण यावेळी फरक एवढाच होता की आठ मैल हेअरपिन नव्हती तर अडीच मैलावर एका मस्त वळणानंतर आम्ही मिस्ट्री स्पॉटच्या रस्त्याला लागलो. मी आणि विलासने मारे स्वेटर वगैरे घातले होते, पण लहान लहान मुलं आणि त्यांचे मोठे मोठे आई वडील छोट्या छोट्या कपड्यात होते.
मिस्ट्री स्पॉट हा सॅंताक्रुजजवळच्या रेडवुडचा एक भाग आहे. त्यामुळे निकेतच्या घरापासून तीन तासात आम्ही तिथे जाऊन , पाहून आणि खाऊन परतलो.हे अमेरिकन लोक व्यापारात किंवा प्रेझेंटेशनमध्ये एकदम माहीर. आत प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा रस्ता दुभागला होता मोठ्या झाडांनी. त्यामुळे गाडीचं लायसन्स काढताना आठचा आकडा काढताना कसं वाटत असेल ते कळलं. ( मला गाडी चालवायला येत नसल्यामुळे लायसन्सचा प्रश्नच नाही.)आत प्रवेश केल्यावर गाड्या लावायला प्रशस्त जागा. आणि एका झाडाच्या बुंध्यावरच तिकिट खिडकी, कॅंटीन, रेस्टरूम या सर्वांची जागा बाणांनी दाखवली होती. आम्ही तिकीट काढून वाट बघत बसलो. आमची १७ वी टूर होती. तेव्हा दुपारचा १ वाजला होता आणि संध्याकाळपर्यंत हे चालू रहाणार होतं.आम्ही जिथे बसलो होतो तिथे इतकी सुंदर फुलं बघायला मिळाली! दोन रंगातली ती नाजूक फुलं बघेपर्यंत आमच्या टूरची घोषणा झाली. निकेत बरोबर असल्याचा फायदा व्हायचा तो असा. कारण आमच्या पिढीतले आई बाप आईच्या भाषेत शिकलेले असल्यामुळे अमेरिकन उच्चारातलं इंग्लिश आमच्या हिंग्लीश कानांना समजेपर्यंत निम्मी टूर संपली असती.सगळा घोळका जमल्यावर आमच्या गाईड पोरीने जमिनीची लेव्हल दाखवणारी पट्टी काढून जमिनीवर ठेवून जमीन लेव्हलमध्ये असल्याचं दाखवलं आणि तिथे दोन सारख्या उंचीच्या व्यक्तींना उभं केलं. त्या म्हणजे मी आणि दुसरी एक भारतीय बाई ( आणि ती चक्क मराठी बोलणारी निघाली).मग आम्ही जागा बदलली तर बघ्यांना आमच्या उंचीत फरक भासला . त्यावर ती मुलगी म्हणाली की म्हणून पट्टीच्या या बाजूला उभं रहाण्याचे ५ डॉलर्स आहेत. ( लोक हसले म्हणून मी लेकाला कारण विचारलं तर त्याने सांगितलं.मलाआपल्याला समजलं नाही म्हणून त्यात लाजण्यासारखं काही वाटलं नाही. कारण थोड्या वेळाने त्या मुलीने दोन वेगवेगळ्या उंचीच्या व्यक्तींना बोलावलं तेव्हा माझ्या मागचा माणूस ( तोही भारतीय होता साऊथकडचा) आपल्या बायकोला सांगत होता की वेगवेगवेगळ्या वयाची माणसं बोलावताहेत म्हणून आणि त्याच्या मुलाने गडबडीने त्याला दुरुस्त केलं आप्पा, not age, heightम्हणून. म्हणजे त्यालाही इंग्लीश येत होतच की. तेव्हा होता है, उसमे क्या. मी तर अशा ठिकाणी आपलं वय ५ वर्षं आहे असं मानूनच जाते आणि मस्त एन्जॉय करते.उगीच आमचे केस काय उन्हाने पांढरे झालेत का? असं म्हणण्यात काय अर्थ आहे? उच्चाराच्या बाबतीत तर मी लग्न कोल्हापूरहून होऊन नगर जिल्ह्यात गेल्यानंतर आमचा घरगडी जे काही बोलायचा ते कळायला मला दोन महिने लागले होते. तो म्हणायचा, " मी वजेवजे उजुक जाऊन येतो. ( मी हळूहळू परत जाऊन येतो). मी आपली , बावळटासारखं तोंड करून सासूबाईंकडे बघायची.
वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही वर गेलो. पाय भरून आले पण मजा वाटत होती. कारण वातावरण निर्मिती मस्त केली होती. वर एक लाकडाचं तिरकं घर होतं. आत आपण सरळ चालूच शकत नाही.सगळे आपले बुध्दीबळातल्या उंटाची चाल चालतात. घरात नकली जळमटं करून घर भुताटकीचं करण्याचा प्रयत्न केला होता.त्या ठिकाणी सरळ ठेवलेल्या फळीवरून चेंडू एका बाजूला घरंगळतो, पाणीही उतार असल्यासारखं एका बाजूला सांडतं. लोखंडाचा टांगलेला गोळा एका बाजूलाच ढकलता येतो.घराबाहेर एका ओंडक्यावर वेगवेगळ्या उंचीची माणसं जागा बदलली की एकाच उंचीची किंवा उंच माणूस बुटका आणि बुटका माणूस उंच दिसतो.( तिथल्या झाडांनाही एकाच बाजूला फांद्या होत्या.)लहान मुलं जास्त एन्जॉय करत होती. तरुण मुलं माफक हसत मजा लुटत होती. आमच्या पिढीची माणसं, जी थोडीच होती, ती, नको रे बाबा डोकं गरगरेल, पडलं तर हाड मोडेल या भीतीने भिंतीला धरून धरून काठावरून मजा लुटत होती.डोकं गरगरलं हे खरं, पण पडायला काही झालं नाही. कारण हात धरून संभाळून नेणारा होता ना बरोबर.
घरी आल्यानंतर नेटवर या चमत्काराबद्दल वाचायला सुरवात केली तर आपण गंडलो की काय असं वाटावं इतक्या टोकाची मतं वाचायला मिळाली. कोणी म्हणे ही सगळी धूळफेक आहे. टेकडीवर घर असल्यामुळे घरच तिरकं बांधलय. कोणी शास्त्रीय उदाहरणं देऊन त्यातला फोलपणा सिध्द केलेला होता तर कोणी आपला अनुभव सांगून त्याचं समर्थन केलं होतं. मला इतकच वा्टतं होतं की ५ डॉलरमध्ये परत लहान होऊन जादूई नगरीत जायला मिळत असेल तर काय हरकत आहे?

Sunday, October 18, 2009

भाऊबीज

लहानपणी चांदोबात एक लोककथा वाचली होती. एका आदिवासी स्त्रीचा नवरा, मुलगा आणि भाऊ युध्दात मारले जातात. सर्वत्र पडलेल्या शवांच्या गर्दीत तिला आपली माणसं ओळखू येत नाहीत. ती देवाची करुणा भाकते. देव प्रसन्न होऊन तिला वर देतो की, तुला हवा असेल तो नातेवाईक मी जिवंत करून देतो. सगळेच जवळचे असल्याने ती स्त्री विचारात पडते. पण निर्धाराने देवाला सांगते की, माझ्या भावाला जिवंत कर. देव कारण विचारतो , तर ती सांगते, " नवरा परत मिळेल कारण मी परत लग्न करेन. त्यामुळे मला मुलगाही मिळेल. पण भाऊ परत मिळणार नाही." त्या लहान वयात हे विधान धक्कादायक वाटलं. पण आता विचार केल्यावर जाणवतं ते हे की आदिवासी स्त्री असल्यामुळे ती निसर्गाच्या अधिक जवळ होती. त्यांचे नियम हे वास्तवाला धरून होते. एक नवरा मेल्यावर दुसरा करणं हे त्यांच्यासाठी अगदी नैसर्गिक होतं. देव तिच्या चतुराईवर प्रसन्न होऊन सगळ्यांना जिवंत करतो हा भाग वेगळा.
आज सकाळीच ही गोष्ट आठवायचं कारण म्हणजे, आज भारतात आणि उद्या अमेरिकेत भाऊबीज. लांब अंतरावर असलेल्या माझ्या भावांची सहज आठवण आली , जे आता सत्तरी ओलांडलेले आहेत , आणि त्यापाठोपाठ ही गोष्ट आठवली. या गोष्टीतला बाकीचा भाग वगळता भावाचं आपल्या आयुष्यातलं स्थान परत एकदा आतून जाणवलं.
सहोदर. एकाच आईच्या उदरात वाढलेले, एकाच आईशी नाळेने बांधलेले , तिचं रक्त आपल्या धमन्यातून वाहून नेणारे जीव ते सहोदर. त्यांनी तिच्या रक्तातले कोणते गुण- दोष घेतले यावर त्यांच्यातली जवळीक वाढत जाते. माझ्याबाबतीत हा प्रश्नच आला नाही. कारण सगळ्यात मोठा भाऊ १७ वर्षांनी मोठा दुसरा पंधरा वर्षांनी तर तिसरा आठ वर्षांनी. पहिल्या दोघांच्या विद्वत्तेच्या दबावाखाली आम्ही धकटे दोघे दबून. निदान मी तरी. त्यामुळे भावा बहिणीची भांडणं, मारामारी हे सूख मला कधी मिळालच नाही. कारण हे दोघे नेहमी जाड्या जाड्या पुस्तकांच्या गराड्यात. पण त्यामुळे एक झालं की लहानपणापासूनच पुस्तक ही मोठी जादूभरी गोष्ट आहे हे कळलं. त्यातही आम्ही वाचणार म्हणजे fiction. जे आप्पाला वाटायचं बांडगूळ. काहीतरी. शास्त्रीय माहिती वाचावी, मुळात गादीवर पालथं पडून वाचू नये यासाठी मी लहानपणी त्याच्या कितीदातरी शिव्या खालेल्या आहेत. ( आता शिव्या म्हणजे जास्तीजास्त " मूर्ख". कारण वरच्या दोघांनी कधी च्यायला किंवा साल्या इतके साधे शब्दही उच्चारलेले मी आजतागायत ऐकले नाहीत. तो मान माझा आणि भैय्याचा).सगळ्यात मोठा बाबा तर माझा गुरु. कारण कॉलेजात आम्हाला शिकवायला तो होता. ( त्यामुळे त्याच्या तासाला (attendance compulsary). त्यामुळे मारामारी झालीच तर थोडीशी भैय्याशी ज्याचं पर्यवसान नेहमी भैय्याला बोलणी किंवा मार बसण्यात व्हायचं .कारण तीनही भावात मी एकटी, सगळ्यात लहान. यांनी त्यांच्या रडक्या बहिणीला शांत करण्यासाठी किती तरी वेळ फ़िरवलं आहे.उत्तमोत्तम सिनेमे दाखवले आहेत, स्वत: वाचून चांगलं साहित्य वाचायची सवय लावली आहे. ( आज सांगायला हरकत नाही, की, जे वाचायला निषिध्द होतं ते मी त्यांच्या अपरोक्ष गुपगूप वाचून काढलं होतं)त्यामुळे निकेत चैत्रा म्हणतात तसं " आई, तू कोल्हापूरला असलीस की मामा लोक जितक्या खुषीत येऊन जोक मारतात तितके आम्ही तुझ्याविना गेलो की मारत नाहीत. आता याला काही सयुक्तिक अर्थ आहे का? "खरच नाही . पण काय करणार? सहोदर हेच त्यामागचं कारण.
आज हे सगळं आठवायचं कारण, केवळ दूरच्या देशात मी आहे हेच. कारण गेल्या ३५ वर्षात लग्न झाल्यापासून मी त्यांना दोन तीनदाच ओवाळलं असेल. कारण घरची लक्ष्मी दिवाळीतपूजनाला घरीच असली पाहिजे हा सासरचा नियम. आणि आता मी या वयाला येऊन पोचले आहे की, हे बाह्य उपचार माझ्यासाठी अगदी गौण आहेत. पण आजच्या दिवशी माझ्या भावांना मला सांगावसं वाटतं, की तुम्ही मला वडिलांची माया दिलीत आणि भावाचं प्रेमही. माझं आयुष्य तुमच्यामुळे समृध्द झालं . तुम्ही माझ्यासाठी आहात, " द्रौपदीसी बंधु शोभे नारायण " असे!

Thursday, October 15, 2009

हॅलोविन

कुपरटिनोला येऊन दोन दिवस झाले होते आणि मी " अय्या, किती छान, किती वेगळं " या मूडमध्ये असल्याने पानांचे आकार, फ़ुलांचे रंग, माणसं, रहदारीचे नियम, फ़ूटपाथ सगळं सगळं मला म्हणजे देवाच्या बागेत फिरणा-या ईव्ह इतकच नवं नवं होतं.त्यामुळे काही खरेदीसाठी एका मॉलमध्ये शिरताना दारात, शेल्व्हजवर सगळीकडे भोपळेच भोपळे दिसल्यावर मी स्वानंदीला विचारलं, " बाई ग, म्हातारी भोपळ्यात बसून लेकीकडे गेली ही आपली गोष्ट इकडे माहीत आहे का? " सासूने केलेल्या इनोदावर जेवढा प्रतिसाद देता येईल तितका देऊन तिने नम्रपणे सांगितलं, " काकू, आता हॅलोविन आहे ना, त्याची तयारी म्हणून हे भोपळे आहेत."
आत गेल्यावर भोपळ्यांच्या जोडीला वाळलेल्या पाचटाच्या मोठ मोठ्या जुडग्या उभ्या केल्या होत्या शिवाय " Happy Harvest " अशा पाट्याही विकायला होत्या.हा सण म्हणजे सुगी झाल्यानंतरचा सण असावा असं म्हणून मी मॉलमध्ये हिंडायला लागले. तर एका शेल्फ़वर कवट्या, हाडं, कोळ्याची जाळी, सुनसान बंगलीसारखी बंगली असलं काय काय विकायला ठेवलेलं दिसलं " आता काय करु या कर्माला " असं मनात मी म्हणतेय तर माझ्यामागून अमेरिकन ऍक्सेंटमध्ये कोणीतरी काहीतरी बोलायला लागलं . कोण बोलतय म्हणून बघायला वळले तर बेशुध्द पडायचीच राहिले. कारण माझ्यामागे एक सहा फ़ुटी भूत, काळ्या वेषात, दात विचकून, आपले लाल लाल डोळे रोखून बोलत होतं. चालता चालता माझाच धक्का लागून तो सांगाडा बोलायला लागला होता. आणि तो सांगाडा कवट्या सगळं हॅलोविनसाठीच होतं.
म्हणजे हॅलोविन हा सण सुगीचा सण आहे की भुताखेतांचा. काही समजेना.कारण इकडे निकेत स्वानंदी मल्हारसाठी हॅलोविनचे ड्रेस बघत होते ते किती छान होते. अगदी नवजात बाळापासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंतचे पोषाख दुकाना दुकानातून दिमाखाने झळकत होते. आणि हे कवट्या बिवट्या म्हणजे अगदीच कसंतरी वाटत होतं. अखेर आपल्या पितरपाठासारखं गेलेल्या लोकांसाठीचा दिवस असावा अशी मनाची समजूत घातली आणि मॉलमधून बाहेर पडले.
मल्हारसाठी ऑन लाइन बघितलेल्या केळं, वाटाणा, अळी, फ़ुलपाखरु, माकड, अस्वल अशा अनेकानेक पोषाखातून अखेर भोपळ्याची निवड झाली आणि आम्ही प्रत्यक्ष खरेदीसाठी " Babies r us" नावाच्या दुकानात जायला निघालो. त्याआधी एक हॅलोविन नावाच्या दुकानात कदाचित अधिक व्हरायटी मिळेल असं वाटल्याने तिकडे वळलो. दाराशी गेल्यावरच आत जावं की नाही असं वाटावं असा प्रकार होता. आत सगळं धुरकट वातावरण होतं. बाळ आणि त्याचे आई वडील आत शिरल्यामुळे मीही धीर एकवटून आत शिरले. म्हटलं कसल्या दुकानात आलो आपण . सगळीकडे धूर सोडून वातावरण निर्मिती केली होती. भुतांचे मोठ मोठे सांगाडे सगळीकडे उभे. कोयता, सुरा, चक्क त्रिशूळ, तलवार आणि जी जी म्हणून शस्त्र असतील ती विकण्यासाठी ठेवलेली होती.त्यावर रक्त सांडलेलं होत. जोडीला भूतबंगले होतेच. त्यातला हिडीस भाग असा की छोटी छोटी रांगती बाळं केली होती आणि त्यांची तोंडं रक्ताने बरबटलेली होती. म्हणजे तशी रंगवलेली होती. जमिनीवर रिमोट होते .त्यावर पाय दाबला की एखादं भूत कबरीतून खदखद हसत उठत होतं तर कोणी दात विचकत होतं.सुन्न होऊन आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. प्रत्येकाच्या चेह-यावर हाच भाव होता की आधी कल्पना असती तर या दुकानात गेलोच नसतो.मी घरी येताच रामरक्षा म्हणून मल्हारला देवापुढचा अंगारा लावला.
या सगळ्या प्रकाराने माझी उत्सुकता चाळवली आणि मी जाळं उघडलं त्यात मला मिळालेली माहिती अशी की, celtic ही जमात ३०० देवांची पूजा करायची, पण त्यांचा मुख्य देव सूर्य होता. त्यामुळे सूर्य प्रभावशाली असताना Beltane सण आणि सूर्यावर मात करणा-या Samhain या म्रुत्युदेवतेचा सण असे त्यांचे दोन मुख्य सण असत. या जमातीचा भुता खेतांवर विश्वास होता.Samhain हा देव आदल्या वर्षी मरण पावलेल्या evil spirits ना आपल्या घरी भेट द्यायला पाठवतो अशी समजूत असल्याने भुतांना प्रसन्न करण्यासाठी खेड्यात घराबाहेर खाणं ठेवलं जाऊ लागलं आजच्या Trick or Treat चं मूळ त्यात असावं किंवा भुतांना घाबरवण्यासाठी त्यांच्यासारखाच पोषाख केला की भुतांपासून सुटका होईल अशीही एक समजूत. पण नंतर रोमन व ख्रिश्चन लोकांच्या संपर्काने यात खूप बदल झाले आणि हा दिवस सुगीचा सण म्हणूनही साजरा केला जाऊ लागला.
गेला महिनाभर अनेक घरांच्याबाहेर भोपळे टांगून ठेवलेले दिसतात. भुतांच्या आकाराची बुजगावणी, पाचटाच्या पेंड्या बागेत दिसतात. आता ३१ तारखेला लहान मुलं वेगवेगळे पोषाख करूनलोकांच्या घराची दारं ठोठावतील आणि घरातल्या माणसांना घाबरवून त्यांच्याकडून कॅंडीज उकळतील.मोठी मुलं भीतिपट बघतील. मोठी माणसं , मुलं पार्ट्या करून आपली पार्टी जास्स्तीजास्त भीतिदायक कशी होईल याची आखणी करतील.
मला हे सगळं बघितल्यावर असं वाटलं की आपल्या आणि पाश्चिमात्यांच्या आचारात जरी फ़रक असला तरी त्यात काही साम्यस्थळही आहेत. फ़रक असा की आपणही पितरपाठात गेलेल्या माणसांच्या नावाने जेवण घालतो, पण त्यात भीतीची, दुष्ट शक्ती ही भावना नसून त्यांची पुण्याई आपल्या पाठी असावी ही आदराची भावना असते. दुसरं असं की मी बघितलेल्या त्या भीतीदायक दुकानात ७ - ८ वर्षांची मुलं रिमोटवर उड्या मारून भुतांना कबरीतून बिनदिक्कत उठवत होती. ५ वर्षाची मुलगी आपल्याला कोणतं शस्त्र हवं ते निवडत होती.
साम्य असं वाटलं की आपल्याकडेही पितरपाठात भोपळ्याला महत्त्व असतं आणि इथेही भोपळे टांगून ठेवलेले असतात. विचार केला की मानवी इतिहासाची मजा वाटते हे खरं!

Sunday, October 11, 2009

आमचं मालक मल्हारराव

सकाळचे ७
त्यांच्या खोलीचं दार उघडून निकेत डोकावतो. उकळी आलेल्या आधणात चहाची पावडर टाकता टाकता, मी:
"काय रे झोपला का नीट?"
यावर "हो, आज झोपला बाबा नीट. एकदाच उठला." किंवा "नाही ग, आज सारखा उठतच होता" शक्य तितक्या हळू दार लावत निकेत.
आता पुढच्या सगळ्या क्रिया ’हळू’च करायच्या असतात. काही वेगाने व काही फ़ारच वेगाने . पण त्या वेळी आपोआपच उमगतील.
यानंतर स्वानंदी बाहेर येतानाही तोच सावधपणा तिच्या हालचालीत असेल.
"काय उठले का महाशय?" जन्मभर विळीवर भाजी चिरलेली मी, सुरीने आवाज न करता भाजी चिरण्याचा प्रयत्न करत विचारते.
"चुळबुळ चालली आहे, उठेलच एवढ्यात"
असं जर उत्तर आलं तर "शस्त्र न धरि करी" म्हणत मी सुरी खाली ठेऊन तयारीत. निकेत ब्रेकफास्टचा घास गपकन गिळून अर्धा डोळा लॅपटॉपवर आणि अर्धा खोलीच्या दाराकडे. मॉर्निंगवॉक आटोपून आलेला विलास बुटाच्या लेसेस पटकन सोडण्यात मग्न, पण चेह-यावरचे उत्सुकतेचे भाव लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत. आणि केव्हातरी खोलीतून जोरात आवाज येतो की मग जो कोणी असेल तिथून सायरन वाजल्यावर शेल्टरकडे धावणा-यांच्या वेगाने खोलीकडे धावत सुटतो.
"चिंगी, झिंगाणी" "शोनामोना" "बबिता" "गुनाश्का" असे सगळीकडून आवाज उठतात, मालक उठलेले असतात, त्यांना गुडमॉर्निंग करायला. "ए आज मी घेणार आहे, मला ऑफिस आहे". "ए नाही रे मी घरात असले म्हणून काय झालं मी पण माझ्या ऑफिसमध्येच असते." तेवढ्यात शोनामोनावाल्याने मालकांच्या पोटाला हात लावून संधी साधलेली असते, आणि गुनाश्कावाली तर अर्धवट उचलण्यात यशस्वी झालेली असते. पण आता दुसरं कोणी नको असतं, कारण आता मालकांच्या जेवणाची वेळ झालेली असते. मग ऑफिसवाले त्याला शांत करण्यासाठी जवळ घेतात. तोही क्षणभर त्याच्या खांद्यावर मान टेकवतो आणि परत आठवण झाल्यासारखी जोराने आपली मागणी पुढे चालू ठेवतो. नाईलाजाने इतर खोलीच्याबाहेर पडतात.
दुपारचे ४
मालक झोप काढून ताजे तवाने झालेले असतात.आता त्यांना घोडेसवारीची लहर आलेलीअसते. दोन घोडे पागेत त्याच कामासाठी तयार असतात.
"हे बघ, दिवसभर तुझं काही ना काही चाललच असतं. तू बस आता जरा वाचत. मी फ़िरवतो."
"ए बाबा, माझ्या दमण्याची एवढी तुला काळजी आहे ना, तर तू चहा ठेव, मी फ़िरवते.. घरात घरात कंटा्ळतो तो" अखेर चहा होईतो परत फ़िरायच्या बोलीवर घोडीला परवानगी मिळते.
एका हातात मुटकुळं संभाळत जिना उतरायची सर्कस करत घोडी फूटपाथवर येते, जरा झाडं दाखवायला थांबते तर लगेच पोटावर एक चिमुकली लाथ. मग मात्र घोडी "घोडे जल्दी चलो, जल्दी चलो रे" च्या तालावर चालायला लागते. शिवाय वर घरात गेल्यावर चहा झालेला असणार याचही तिला भान ठेवायला लागतच.
संध्याकाळचे बाहेर जाणे
सगळे कपडे करून तयार.
चला, आता कार सीटमध्ये बसायचं. मनु आमचा कुथे जानाल?
मनुला कल्पना असते की आता भूर्र्र जायचय. म्हणजे सरकत जाणारं काहीतरी दिसणार आणि आपण जरा जरी आवाज केला तरी सगळ्यांची तारांबळ उडणार. तो आपला दोन्ही हाताने कथकली मुद्रा करून तोंडातून लाळेच्या फ़ेसाचे भले मोठे फ़ुगे काढण्यात मग्न.
"अरे, मान धर," "अग, हात आला बघ अंगाखाली" अशा सूचनांच्या गदारोळात मालक स्थानापन्न होतात. मग महाराजांची पालखी मावळ्यांनी नेली नसेल इतक्या वेगाने बाबा कारसीट उचलून जिन्यावरून पळायला सुरवात करतो. त्याच्यामागून आई. खांद्यावर छोटी पिशवी. त्यात बर्पिंग क्लॉथ, सॅनिटायझर, शिवाय पॅसिफ़ायर. मागून आजी आबांना सांगत "आता बरं आहे नाही, नुसतं डायपर, तोंड पुसायचं फ़डकं, बोथी घेतली की झालं. आपल्यावेळी तो लंगोटांचा, दुपट्यांचा पसारा इतका की ते बाहेर जाणं नको आणि काही नको.त्यात तुम्हा पुरषांना त्यावेळी आपणही काही ओझं उचलावं हे भानच नसायचं. आपले छाती पुढे काढून पुढे चालणार. बायको आपली लोंबकाळतेय मागून पोरांचं आणि पिशवीचं ओझं संभाळत."आबाही इतक्या वर्षांच्या सहवासाने कान बंद करून ऐकायला शिकलेले असल्यामुळे चेह-यावर आजीसला पटेल इतकीच ओशाळगत आणून वाटेत असलेल्या सोसायटीच्या पोहण्याच्या तलावातलं "निळशार पाणी" पहात चाललेले असतात.
तोवर मालक कारमध्ये बसून दोन्ही हाताची बोटं एकदम कशी तोंडात घालता येतील याचा गंभीरपणे विचार करत असतात.
"चला बबुजी आता निघायचं का?" गाडीवान विचारतो. बबुजींचा तोंडातल्या तोंडात गुरगुराट.
"चल रे बाबा, लौकर. आपल्याला हॅलोविनचा द्लेश आनायच्या आहे ना?" किंवा "च्यला लवकल नाही तल आमी ललू हं" हा कारच्यामागच्या बाजूने प्रतिसाद मिळतो. कारण मालकांच्या सगळ्या लहरी संभाळून त्यांना शांत करायला आईच शेजारी हवी असते. शिवाय गाडीत मधेच मालकांना त्यांची जागा सोडून मांडीवर येता येता नसल्याने त्यांना आनंदी ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आईवर असते. मग मालक कधी सम्पूर्ण प्रवासभर बाहेर बघतात, कधी १० मिनिटातच प-यांच्या राज्यात जातात, तर कधी मधेच ऐन रहदारीच्या रस्त्यावर गाडी दणाणून टाकणारा आवाज करून सगळ्यांची घाबरगुंडी उडवून टाकतात. मग कधी हसत तर कधी दमून मंडळी परतात, पण मालकांची सकाळी हाक आली की सगळ्यात आधी आघाडी मारून मालकांना कसं उचलायचं याची मनोमनी आखणी करतच दुस-या दिवसाची वाट बघत झोपी जातात.

Sunday, October 4, 2009

आमचं फिरणं

निकेतच्या घराच्या भल्यामोठ्या खिडकीतून सुंदर झाडी दिसते. समोरच्या बाजूला एका कंपनीचं भलं मोठं आवार आहे, आणि तिथेही जागेच्या विपुलतेमुळे हिरवळ आणि भली मोठी झाडी आहे. अशा रस्त्यावरून फेरफटका मारायला कोणाला आवडणार नाही बरें? त्यात आणखी चाकलेट, आइसक्रिम वगैरे मोहमयी वस्तूंच्या सहवासात असताना तर हे फ़िरणं एक कर्तव्यच ठरत नाही का आपलें? तर असो.
तर सुप्रभाती म्हणजे सकाळी सात साडे सातच्या सुमारास मी आणि विलास घराबाहेर पडतो. जिना उतरून खाली आलं की थोडी बाग आहे. एक फ़ाटक आहे (ते आतल्या बाजूने तुम्ही उघडू शकता, पण बाहेरून आत येताना मात्र ठरलेले आकडे फ़िरवावे लागतात) ते उघडून बाहेर आलं की या कॉम्प्लेक्सचं आवार. डावीकडे वळून रस्त्याला लागा आणि परत डावीकडे वळून चालालला लागा, पण पदपथावरून. मग तुम्ही कुपरटिनो चौकात येता. त्या चौकात सिग्नल्स आहेत. पादचा-यांसाठी अणि वाहनधारकांसाठी. (हे म्हणजे जरा लईच हुतय.) त्या सिग्नल्सपर्यंत पोचायला एक २५ पावलांची जागा आहे. आपण त्या लेनमधून जात असताना डावीकडून जर एखादी गाडी आली तर तिचा मालक, "माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा आणि रस्ता ओलांडा सरकार" असा चेहरा करून वाट बघत रहातो. थेट पुण्याहून आल्यामुळे तर हे सौजन्य फ़ारच जाणवतं. चौकात एक आपल्या कमरेच्या उंचीइतका खांब आहे आणि त्याला एक बटन आहे. ते दाबून आपण चौकात जरा निरिक्षण करत उभं रहायचं आपल्याला असं थांबून रहायची सवय नसल्याने प्रथम ऑकवर्ड आणि नंतर इरिटेटिंग वाटतं, पण मग सवय होते. ठराविक वेळाने समोरच्या बाजूचा लाल हात नाहिसा होऊन चालणारा पंढरा माणूस येतो की आपण पळा रे पळा म्हणोन चालायला सुरवात करायची. कारण आपल्या हातात (की पायात?) २० सेकंद असतात. तेवढ्यात आपण रस्ता ओलांडायचा असतो. ही पध्दत रहदारीच्याच चौकात असते असं नाही तर निर्मनुष्य चौकातही हा नियम पाळला जातो. हा चौक ओलांडला की आपण मोठ्या झाडांनी केलेल्या हिरव्यागार कमानीत येतो. उजव्या बाजूला नीट कापलेली हिरवळ, तिला लागून असलेली उंचच उंच झाडं, आणि डाव्या बाजूला वाहता रस्ता. त्यामुळे विलासचं तोंड डावीकडे तर मी उजवीकडे बघत. वाटेत दोन ठिकाणी बाक आहेत पण ते बसण्यासाठी नसून बसने जाणा-या लोकांसाठी आहेत. या बाकांची गंमत म्हणजे, त्यातल्या काही बाकावर लिहिलेलं असतं, "A seat in the past". आणि त्या बाकावर चित्रं रंगवलेली असतात जुन्या काळातली. एका बाकावर आहे, "J. W. Shaw Grocery Shop 1890" दुस-या एका बाकावर लिहिलय, "Red Star Laundry. 1860" तिस-याएका बाकावर लिहिलय, "A cable car in the street". वाचता वाचता माझ्याभोवतीची ती मोठी ऑफ़िसेस, त्या भरधाव धावणा-या गाड्या नाहिशाच झाल्या आणि जुन्या इंग्रजी सिनेमात बघितलेले स्त्री - पुरुष कोणी चालत, कोणी कोणी घोडागाडीतून तर कोणी केबलकारमधून जाताना दिसायला लागले. २०० वर्षांपूर्वी इथेही हिरवीगार शेतं असतील, स्वस्थ शांत ग्रामीण आयुष्य माणसं जगत असतील हे जाणवून वेगळंच वाटायला लागलं, म्हणजे आपल्या सेझ सारखं इथेही शहरीकरण होऊन ती माणसं नुकसानभरपाई घेऊन यंत्रांच्या घरघराटात हरवली हे जाणवून मन उदास झालं. मला तर त्या न बघितलेल्या जे. डब्लू शॉ चे वंशज कुठे काय करत असतील असं वाटून मन त्यांच्यासाठी क्षणभर हळवंही झालं, पण जुनं गेलं तरी जे काही नवं झालय, ते मनाला सुखवणारं गारवा देणारें आहे, हे नक्कीच. म्हणजे आपण "a m c" मॉलच्या बाजूने गेलो आणि तिथल्या पुलावर उभे राहिलो तर खालच्या फ़्री वे वरून जाणा-या गाड्यांचा वेग आपल्याच अंगातून निघाला आहे की काय असं वाटतं, पण त्याचबरोबर रस्त्याच्या दुभाजकावर लावलेले फ़ुलांचे ताटवे मनाला आल्हादही देतात.
आम्ही चालत जातो तो रस्ता वुल्फ़ रोड आणि त्याच्या पुढच्या चौकात एक ली नावाचा डेंटिस्ट आहे. मी त्याच्या घरावर सोन्याची कौलं आहेत का ते रोज बघत असते. तिथून आम्ही परत उजवीकडे वळतो. आता रस्त्याच्या दुस-या बाजूला घरं आहेत, त्यांच्या आवारात फ़ुलझाडं आहेत. त्याला कुंपण नाही पण फ़ुलं सुखरुप असतात. एका घराबाहेरचा भलामोठा निवडुंग पूर्णपणे लाल फ़ुलांनी फ़ुललेला आहे. एका घराबाहेर वेगवेगळ्या गुलाबांची दाटी आहे. एका घराबाहेर माशाच्या आकाराचा कापडाचा, निळ्या गुलाबी रंगाचा आकाशदिवा टांगलेला आहे. एका घराबाहेर बोनसाय केल्यासारखी झाडं छाटली आहेत तर दुस-या घराबाहेर तसलीच झाडं भलं मोठं जात्याचं पाळं, अर्थात हिरवंगार, ठेवल्यासारखी छाटणी केली आहे. त्या रस्त्यावरच्या चौकात परत उजवीकडे वळलं की आम्ही मेमरी हॉस्पिटलच्या रस्त्याला लागतो. हा रस्ताही सुरेख आहे. तिथे चिंचेच्या आकाराची पानं आहेत आणि त्यांच्या टोकाला दवबिंदू लटकावेत तसे गोल आहेत. तिथून टोकाला जाऊन आम्ही परत फ़िरतो.
या सगळ्या फ़िरण्यात आम्हाला फ़ूटपाथवर एक भलीमोठी म्हातारी आखूड स्कर्टमध्ये, एक सडपातळ मुलगा अर्धी चड्डी आणि हातकाप्या (स्लीव्हलेस) बनियनमध्ये आणि एक ठीकठाक माणूस त्याच्या कुत्र्यासह दिसतो. शिवाय एक काळा कावळा आणि दोन तितक्याच काळ्या खारीपण दिसतात या रस्त्यावर. नाहीतर हम और हमारी तनहाई, (जी आम्ही एन्जॉय करतो) अक्सर बातें करते है, तुम सब होते तो हम ऐसा करते, वैसा करते!

Saturday, October 3, 2009

अजि म्या झाले आजी आज !

गाडी निकेतच्या घराच्या जवळ जवळ लागली तसं तसं मन आणखी आणखी उचंबळायला लागलं. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा तसं मला फ़क्त सावळे सुंदर रुप मनोहर दिसायला लागलं. मी आजी होऊनही आता दोन अडीच महिने झाले होते, पण अजून ते " फील" आललं नव्हतं. म्हणजे मी कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे सगळ्या गोष्टी करत होते, म्हणजे स्वेटर विणत होते, अंगडी टोपडी शिवत होते, बाळलेण्याचे प्रकार निरखत होते, पण मनात समाधान नव्हतं. मनातली हुरहूर कसली होती ते गाडीतून उतरून निकेतच्या घराच्या दारात उभी राहिल्यानंतर कळलं. आतापर्यंत सगुण निर्गुण भक्तीच्या वादात मी बहुधा निर्गुण भक्तीच्या बाजूने होते, पण या वेळी मात्र विठ्ठलाला उराउरी भेटायचा ध्यास वारकरी का घेतात ते कळलं. दार उघडलं आणि "अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. त्या चिमुकल्या गाठोड्याला उराशी घट्ट कवटाळावं अशी सर्वांगातून उर्मी सळसळत गेली. पण......
एक तर २४ तासांचा प्रवास, त्यात आम्ही स्वाइन फ़्लू च्या आगारातून ( पुण्यपत्तन) आलेलो आणि भरीस भर म्हणजे माझ्याशेजारी बसलेली कोरियन मुलगी सगळ्या प्रवासभर सीटवर मान टेकून झोपली होती ती फक्त टिश्यू पेपर नाकाला लावून त्यांचा बोळा बाजूला टाकण्यापुरतीच उठत होती. म्हणजे तिथोनही सर्दीचा प्रसाद मिळण्याची शक्यता होतीच. त्यामुळे पंढरपूरला जावून कळसाचं दर्शन घेऊन परतणा-या वारक-यासारखी मी आंघोळीसाठी बाथरुमकडे वळले.
बस्स! आता मी खरी आजी झाले. उराशी उबदार मुटकुळं, त्याचं चिमुकलं डोकं आपल्या खांद्याजवळ आणि आपले डोळे आनंदाने मिटलेले. हाच तो क्षण, ज्यासाठी आपण धावत आलो. आमच्या शेजारच्या निमोणकरकाकूंच्या नातवाला भेटायला गेले असता त्या नातवाला कवटाळून अशाच उद्गारल्या होत्या, "आईपेक्षा आजी होणं किती सुखाचं असतं नाही? आई असताना ज्या सुखाला मुकलो त्या सुखाची आता भरपाई करता येते." तेव्हा वाटलं, अगदी त्यांच्या चेह-यावरचे कृतार्थतेचे भाव बघूनही असं वाटलं, की आई होण्याच्या सुखाची कशाची तुलना कशी होऊ शकेल? पण आंघोळ करून आल्यावर मल्हारला छातीशी कवटाळल्यावर पटलं, आजी या हाकेत जगातला सगळ्यात मोठा आनंद दडलेला आहे.

Thursday, October 1, 2009

मल्हारवारी

अमेरिकन पोर्टरच्यामागून आम्ही एका प्रचंड दाराकडे आलो, सामानाची ट्रॉली पुढे झाली, दार उघडलं, वा-याचा एक शहारा उठवणारा झोत अंगावर आला. दारातून पाऊल पुढे टाकलं आणि आता लिहितानाही आठवत नाही की मी धावत पुढे गेले, की तो पुढे धावला, पण तरळत्या पाण्याच्या पडद्यापुढे त्याचा हसरा, जग जिंकल्याचा आनंद झाल्यासारखा चेहरा होता आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. तसाच तो बाबांच्याही मिठीत क्षणभर विसावला आणि सामान हातात घेऊन पुढे चालू लागला, त्याच्या मागून आम्ही, त्या प्रचंडपणाने भांबावलेले.
अमेरिकेला जाणं हे आम्हा दोघांनाही किंचितही आकर्षक वाटत नव्हतं. त्यासाठी लोक आम्हाला अगदी मूर्खात नाही तरी वेड्यात काढत होते, पण २२-२४ तास प्रवास करून तिथे जावं असं आम्हा दोघांनाही वाटत नव्हतं. यात विलासला एवढा वेळ बसायचं, ते आपल्याला झेपेल की नाही ही चिंता असायची तर बंद जागेत बसणं म्हणजे साक्षात मरणाला आमंत्रण ही माझी तीव्र भावना. म्हणून तर निकेत लास वेगसला असतानाही आम्ही त्याची विनवणी धुडकावून लावलेली होती. पण आता गोष्ट वेगळी होती. आता आम्ही बढती मिळून आजी - आजोबा होणार होतो आणि आताच्या अलिखित नियमाप्रमाणे आम्हाला जावं लागणार होतं. आणि तिथेच तर वांदे होते. आपण बाबा होणार हे कळल्यापासूनच निकेतने माझा मेंदू धुवायला सुरवात केली होती. त्याचं बोलणं संपेपर्यंत मला पटत होतं की बंद खोलीत काहीही होत नाही, श्वास नेहमीसारखाच करता येतो, पण त्यासाठी सिनेमाला जा, ए सी गाडीतून प्रवास कर हे उपाय करून बघायची वेळ आली की माझं भिजलं मांजर व्हायचं. प्रथम प्रथम हसण्यावारी नेणारा नवराही मनातून हबकला. परस्पर फोनवर लेकाला म्हणायला लागला, "अरे, कराल का तुम्ही मेनेज? अवघड वाटतय बुवा." पण आमची मुलं हार मारणारी नाहीतच. त्यांनी हळूहळू खिंड लढवायला सुरवात केली. कारण मदतीपेक्षा आपण इथे कसे राहतो, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आईवडिलांबरोबर शेअर करायची त्यांची आस होती. आणि ती त्याच्या बहिणीला कळत होती. आम्हाला कळत असून काय उपयोग? कारण वळत नव्हती. अखेर सायकोलोजिस्टसबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलेले व्यायाम करून, औषधं घेऊन मन तर तयार झालं आणि १० सप्टेंबरची तिकिटं हातात पडली. दरम्यानच्या काळात येणार हे माहीतच असलेला आमचा नातू आला, सगळ्यांची गडबड उडवत आधीच आणि मग जाण्याचे खरे वेध लागले.
मुंबई विमानतळावर जाण्यापूर्वी कितीही कान बंद करून ऐकलं तरी विमानप्रवासाबद्दल भरपूर मौलिक माहिती गोळा झाली होती त्यामुळे विमानतळावर पोचल्यावर त्यातल्या बहुतेक सगळ्या सूचना आम्ही विसरलो होतो आणि हम करेसो कायदा या न्यायाने सामान चेक इन करा म्हणजे तुम्हाला ओझं वहायला नको हे कानाआड टाकून नवरा भरायचे फॉर्म आणायला गेला आणि मी सामानाच्या डोंगराआड उभी राहून "अरे, किती ही गोरी माणसे एकदम पहायला मिळतात बरे" म्हणत नव-याची वाट बघत एका कोप-यात उभी. पण नंतर ३५ वर्षांच्या संसाराच्या शहाणपणाच्या जोरावर तगून आम्ही विमानात जायच्या रांगेत उभे राहिलो. सिक्युरिटी चेकनंतर चालतोय, चालतोय. आता जिना येणार त्यावर चढून आम्ही विमानात प्रवेश करणार, आणि आमच्या तरुणपणाच्या काळातल्यासारखी हवाईसुंदरी आम्हाला अभिवादन करून आमची सीट दाखवणार असा आम्ही विचार करत असतानाच आम्ही चालत असलेली बोळकांडी संपली तिथे दारात दोन छानशा प-या आणि एक भलामोठा परा हसून आमचं स्वागत करत असलेले दिसले. हा धक्का एवढा मोठा होता की आपण कोरियन विमानात पोचलो, हे समजलंच नाही. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी विमान किती मोठं आहे हे पाहून घेतलं. म्हणजे अगदी यष्टी नाही, तेव्हा काळजी नको. अर्थात मन:शांन्तीच्या गोळ्या मला चांगलच धीट बनवत होत्याच. तेवढ्यात नव-याने सामान जागेवर ठेवलं आणि आम्ही स्थानापन्न झालो. मग मात्र आम्ही सगळी मोठेपणाची जोखडं झुगारून दिली, नेहमी प्रवास करणारे आपल्याला हसतील की काय हा विचारही मुंबई विमानतळावरच सोडून दिला आणि बाहेर बघायला लागलो, लहान मुलांच्या निरागसतेने! कितीतरी विमानं उभी होती आणि आम्ही अगदी हे वडिंग्याला, हे कवठेमहांकाळला, हे कुडित्र्याला या थाटात ते कुठल्या देशाचं आहे ते न्याहाळत होतो..
पण आम्हाला फार वेळ मिळालाच नाही, कारण एक गोरी गोरी काळ्याभोर डोळ्याची परी आमच्याजवळ झुकून अगम्य इंग्रजीत आम्हाला पट्टा बांधायला सांगत होती. त्या सगळ्याच पोरींचं बोलणं म्हणजे कारवारी हेलात एखाद्या प्रेमळ म्हातारीने "पट्टा बांधतेस का बाळा?" विचारावं असं मधाळ वाटत होतं. त्यांचा चटपटीतपणा, अदबीने वाकून बोलण्याची पध्दत (भले ती कमावलेली का असेना) आणि हसरा चेहरा मनाला सुखवत होता. झगमगणारी मुंबई सोडून आम्ही अंतराळात झेप घेतली, आणि खाण्या - जेवण्याचा तोबरा सुरु झाला. निघतानाच वजनाचा विचार करायचा नाही हा आम्हा दोघात ठराव झालेला असल्याने समोर येईल ते परब्रह्म उदरात न्यायचं काम आम्ही इमाने एतबारे केलं, विमानप्रवासात काहीच करायचं नसल्याने आणि सक्तीची झोप घ्यायची असल्याने पडदे सरकवून डोळे मिटण्याखेरीज काहीच काम नव्हतं. पण विमानप्रवासात मुरलेल्या मुरब्बींनी सांगितलेलं ऐनवेळेला विसरले असतेतरमात्र माझ्यासारखी करंटी मीच म्हणावं लागलं असतं. विमानात आम्ही घड्याळाची वेळ बदलली नव्हती ती याच कारणाने. सकाळ होतेय हे जाणवताच मी वर्ग चालू असताना बाईंच्या नकळत लिमलेटची गोळी तोंडात टाकावी त्याच खोडकरपणाने पडदा हळूच सरकवला. (हळूच म्हणण्याचं कारण म्हणजे, जरा आत उजेड आला की त्या परीचं खाष्ट हेडमास्तरीणीत रुपांतर व्हायचं. त्यातल्या त्यात जरबेचा आवाज काढायचा ती प्रयत्न करायची जो प्रत्यक्षात तितकाच मधाळ असायचा, "दोन्त ओपन, अदर पिपल आर स्लीपिंग"). आम्ही उंचावर होतो आणि खाली आकाशात लाल रंगाची उधळण चाललेली होती, ती केवळ दैवी होती, केवळ दैवी. त्यानंतर मला तो चाळाच लागला, हळूच पडदा सरकवला की आपण पुढे आणि खाली आपल्यामागून कापूस पिंजून ढीग करावे तसे ढग पांढरेशुभ्र, तेजस्वी. कुठे लाबलचक पट्टा. कुठे वेगवेगळे आकार. डोळ्याचं पारणं फिटावं आणि आपण आपल्याला भाग्यवान समजावं असेच ते देखावे होते.
सेऊलपासून विमानप्रवासाला आम्ही सरावल्यासारखे झालो होतो आणि पुढे १२ तास काढायचे हे मनाला पटवत होतो. पण हे विमान पहिल्यापेक्षा मोठं असल्याने प्याशिंजरंही जादा होती, आणि कोरियन असली तरी सगळीकडे स्वभाव सारखेच असल्याने त्यांचं निरिक्षण करतानाही मजा येत होती. त्यामुळे विमान सॅनफ्रॅन्सिस्कोला कधी पोचलं ते जाणवलंही नाही.
आता सामान घेतलं की झालं असा विचार करत पट्ट्याजवळ आलो तर तिथे ही गर्दी. शोधतोय, शोधतोय, दोनदा पट्टा समोरून गेला तरीही लाल पिवळ्या रिबिनींची खूण कुठे दिसेना. गेल्या वाटतं आपल्याही ब्यागा अमिताभसारख्या. आता कुठल्या चितळ्यांच्या बाकरवड्या आणि कुठली आंबा बर्फी असा विचार करत असताताच तिथेच दुसरा पट्टा असल्याची मौलिक माहिती कळली आणि आमच्या ब्यागाही भूमीवर आलेल्या दिसल्या. आपली आंबलेली कंबर आणखी ओझं सहन करू शकणार नाही याची खात्री असल्याने नव-याने पोर्टर शोधला आणि आम्ही विमानतळाबाहेर आलो. सगळी सूत्रं मुलाने आपल्या हाती घेतली, सामान गाडीत टाकलं आणि सारथ्य करता करता तो वडिलांना त्यांच्या आवडीची माहिती देऊ लागला. म्हणजे रस्त्यांची नावं समोरून चाललेल्या गाड्यांचे मेक. पण वडलांनी एक अनपेक्षित प्रश्न विचारून त्याची मतीच गुंग केली. "अरे, झोपलेला असेल की जागा असेल रे मल्हार यावेळी?".
त्याच विचारात असलेल्या माझ्या मनात आलं, "पुरुषही बदलतो तर आजोबा झाल्यावर!" आम्हा दोघांकडे हसून एक कटाक्ष टाकून मुलाने गाडी चालवण्याकडे लक्ष दिलं कारण त्यालाही आपल्या मुलाला आपले आई वडील दाखवण्याची तितकीच ओढ लागली होती!

Saturday, May 16, 2009

झोपाळा

फ़ार फ़ार वर्षांपासूनचं एक स्वप्न होतं, घराभोवती बाग आणि तिच्या एका कोप-यात झोपाळा। त्यातलं घराभोवती बाग हे स्वप्न साकार झालं पण बागेतला झोपाळा यायला माझ्या वयाची साठ वर्षं उलटावी लागली। ३० जानेवारीच्या संध्याकाळी बागेच्या मोठ्या फ़ाटकाच्या समोरच्या जागेवर झोपाळा उभा राहिला। अगदी मला जसा हवा होता तसाच। दोन माणसं बसू शकतील एवढीच रुंदी, बळकट पण तरीही आटोपशीर दिसणा-या कड्या आणि खांब आणि मुख्य म्हणजे वर कौलारु छप्पर। बसल्यानंतर उजव्या हाताला मधुमालतीचा वेल आणि डाव्या बाजूला बोगनवेलीचा फ़ुलोरा। एक हिरवी खोलीच तयार झाली , घरापासून वेगळी आणि तरीही घराच्या इतक्या जवळ। जिथे बसून घरातून बाहेर पडून घर न्याहाळताही येतं तुकड्या तुकड्याने आणि रमताही येतं एखाद्या तुकड्यात।
लहानपणी घराजवळच्या मैदानात खेळून झाल्यावर सरिताच्या घरातल्या भल्यामोठ्या झोपाळ्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी दाटीदाटीने बसून गाणी गायचो, आणि गाता गाता झोपाळाइतका उंच चढवायचो की अखेर काकू येऊन ओरडायच्या । तीच झोक्याची झिंग हा झोपाळा झुलवतानाही येते। लहानपणी मनात नुसतीच आनम्दाची कारंजी उसळत असतात.... अकारणच! पण आता कधी कधी अकारणच कातर होणा-या मनाला परत प्रवाहात आणण्यासाठी अशा एखाद्या सख्याची, " चौथ्या कम-याची' गरज असते। कोणाला तो देवळात मिळतो कोणाला वाचनात, तर कोणाला मित्रमंडळीच्या गराड्यात । माझा चौथा कमरा मला माझ्या या झोपाळ्यात मिळतो। मुलांच्या आठवणींनी व्याकुळलेल्या मनाला तो चार व्यवहाराचे बोल समजावतो, एखादंसुंदर पुस्तक वाचल्यानंतर स्वत:शीच संवाद करताना साथ देतो,चांदण्या नि:शब्द रात्री लपेटून आपल्या सावलीत मुरवून घेतो, मंद वा-यावर सळाळणा-या सांजेला मधुमालतीच्या गंधाने जोजवत राहतो तर सोनसळी सकाळी चैतन्याने न्हाणतो।
आभारी आहे बाळांनो, मनापासून आभारी आहे मी तुमची, माझ्यातल्या मी ला माझीच साथ घ्यायला मदत करण्यासाठी! दूर राहूनही माझाजवळच असण्यासाठी! या झोपाळ्याच्या रुपाने.

Thursday, April 30, 2009

झावळ्या

खिडकीतून दिसणा-या नारळाच्या झावळ्या इतक्या सुंदर दिसत असतील हे मला इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही याचं आश्चर्य वाटतय। कारण नारळाच्या झावळांचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं आहे।आमच्या घरासमोर एक घर मुनिश्वरांचं। त्यांनी दारातच नारळाचं झाड लावलेलं होतं। रात्रीच्यावेळी, विशेषत: चांदण्या रात्री त्या झावळ्या अशा काही झळाळून निघायच्या , की वाटायचं म्यानातून निधणा-या तलवारी अशाचतळपत असतील।त्या शांत रात्री वा-यावर डुलणा-या चमकणा-या झावळ्या न्याहाळताना मनात गूढ देशीचे राजपुत्र शस्त्रागारात आपल्या या तलवारी न्यायला कोणत्याही क्षणी येतील असं वाटत रहायचं.
शिरोड्याला, आजोळी गेलं की, सगळीकडे नारळाचीच झाडं। गेल्या गेल्या मामांनी कोणातरी बाबल्याला किंवा पांडग्याला नारळाच्या झाडावर चढवून शहाळी काढवून घेतलेली असत। खास बहिणीच्या, भाचरांच्या स्वागतासाठी। शहाळ्याचं पाणी पिताना आठवत रहायची ती झाडाची उंची आणि इतक्या उंचीवरून डोलणा-या झावळ्या! मग आईशी गजाली करायला पणग्या किंवा जनग्या किंवा नानीबाय यायची , कोणी बागेतलीच झावळी ओढून आणायची आणि सुख - दु:खाच्या देवाण घेवाणीबरोबरच झावळीचे हीर साळून भलेमोठे खराटे तयार व्हायचे.
शिरोड्यालाच ओसरीवर बसलं की बागेत डावीकडे दोन माड गळामिठी घालून बसलेले होते। दिवसभराची कामं आटपून मामा आणि आई बसलेले असत। मिणमिणते कंदील आजूबाजूचा अंधार आणखीनच गडद करत असायचे। वा-याबरोबर ते माडही किंचितसे डोलायचे आणि त्यांचा करकर आवाज माझं बाल- काळीज कातरत जायचा। उंचच उंच माड राक्षसात बदलून जायचे आणि मामांना चेष्टा करायला स्फ़ुरण चढायचं। " इंदू असा काय गो तुजा चेडू, माडाक भिता? मगे रात्री देवचार बघलो तर काय करीत?'' नुसत्या कल्पनेनेच माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं ।पण रात्र सरल्यानंतर तेच माड सकाळी झावळ्या डोलवत उभे असयायचे तेव्हा मात्र एखाद्या खोडकर मुलासारखे वाटायचे।
माझ्या घराच्या दारात बसलं की समोर माडाची झाडंच झाडं आहेत। पुण्यासारख्या शहरात प्रत्येकाने आपल्या बागेत एखाद दुसरं तरी नारळाचं झाड लावलेलंच आहे। त्या झाडांच्या हिरव्यागार झावळ्या दिवसाच्या कोणत्याही वेळी बघितल्या तरी मनाला सोबत करत असतात। सकाळी हातात चहाचा कप घेऊन वर्तमानपत्रात डोकावत असावं, आणि सहज म्हणून समोर नजर टाकावी तर सूर्यकिरणाचं कोवळेपण घेऊन शेजारी खेळणं घेऊन स्वत:तच रमलेल्या छोट्या मुलासारख्या त्या झावळ्या माझ्याही मनात एक कोवळीक पसरून देतात। दुपारच्यावेळी जेवणानंतर बडिशेप चघळत सहज नजर टाकावी तर " काय आवरलं का? माझंपण आत्ताच आटपलं, पण आज कामवाली आली नाही ना, त्यामुळे भांडी घासायचीत'' असं साम्गणा-या शेजीबाईसारख्या त्या झावळ्या मला पुढच्या कामाला बळ देतात। एखाद्या संध्याकाळी कातर झालेल्या मनाला आपल्या नि:शब्द हेलकाव्यातून गोंजारतात। कधीकधी एखादी वाळलेली झावळी खाली कोसळते, आवाज होतो, पण तो ऐकताच जाणवतं की थोड्याच वेळात बाजूच्या झोपडपट्टीतून सावळ्यामामा येऊन तिला उचलून नेईल , रस्त्याच्या कडेला बसून तिची पानं साळेल, त्याचे हात सराईतपणे त्या हिरांचा खराटा करण्यात गुंततील, ... तेवढेच दहा रुपये मिळतील त्याच्या घरच्या मीठ मिरचीला !

Wednesday, March 25, 2009

"त्याची माझी ओळख होऊनही आता ३५पेक्षा जास्त वर्षं उलटली तरीही मला त्याच्या छंदाची सवय होऊ नये याचं मलाच आश्चर्य वाटतं। तसा तो साधा, सरल मार्गी। आपण बरं की आपल्या हातातलं वर्तमानपत्र बरं या विचारसरणीचा। देवाचा कोणतासा भक्त "" मी देव सेवतो, देव प्राशन करतो आणि देवचि पांघरतो '' असं म्हटल्याचं सांगितलं जातं तसा तो कायावाचामनाने वर्तमानपत्रमय झालेला आहे। म्हणजे हे सगळं मी त्याच्या बायकोकडून ऐकलं आहे। नाहीतर त्यांच्या हनीमूनच्या कथा मला माहीत असण्याचं काय कारण? सुचरिता , म्हणजे अर्थातच आपल्या प्रमुख पात्राची अर्धांगी , एकदा करवादून मला सांगत होती, की ताई, आमच्यावेळी असं दोघांनीच बाहेर फ़िरायला जायची पध्दत नव्हती, पण घरच्यानी आम्हाला महाबळेश्वरला पाठावलं हौसेनं। हिंडावं फ़िराव ह्यांच्याहातून गजरा माळून घ्यावा या स्वप्नात मी दंग । तर "हे'' बाजारात गेलं की प्रथम वर्तमानपत्राच्या स्टॊलवर जाऊन थडकायचे। पेपर साग्रसंगीत वाचून झाल्याखेरीज त्यांच्या कानात मी काहीही बोललेलं शिरायचच नाही। मी मात्र त्या चार दिवसातच समजून चुकले की मला " दुसरेपणा''ला दिलय घरच्यांनी। पहिली माझी सवत म्हणजे पेपर आणि त्यातून वेळ मिळाला तर मी।
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीही त्यात थोडं तत्थ्य होतच। कारण आम्हा सगळ्यांची " माहिती खाण'' म्हणजे दिनकरच। टेलिफ़ोनच्या नवनवीन योजना असोत, पाणीपुरवठ्याच्या वेळेतला बदल असो, वीजेच्या लपंडावाची वेळ असो की क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक असो दिनकरने सांगितलं की बाकीचे निर्धास्त। कारण कोणत्याही विषयासंबधीची माहिती असो दिनकरच्या नजरेतून ती सुटणं अशक्य। वर्तमानपत्राच्या नावापासून ते " यांनी येथे यांच्यासाठी छापले;पर्यंत वाचून दिनकर त्यासम्बंधीची माहिती शोधून काढणार आणि सम्बंधिताला ती पोचवणार। मग भले घरातला गेस संपल्याने नंबर लावायचं काम असो, की सोनालीला शाळेत पोचवायचं काम असो ते थांबू शकतं पण वर्तमानपत्रातून हवी असलेली माहिती मिळाल्याखेरीज इतर कामाला हात न लावणा-या दिनकरमध्ये आणि आधी लगीन कोंडाण्याचं '' म्हणणा-या तानाजीत आणि दिनकरमध्ये काहीच फ़रक नसतो। अशा वेळी "श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं, असं कसं वेडं माझ्या नशीबी आलं ' असं म्हणून सुचरिता सुस्कारे टाकते तर ज्याचं काम झालेलं असतो तो इरावती कर्व्यांच्याच सुटकेच्या भावनेने " बरं झालं मी याचा मित्र झाले, बायको नाही झालो'' असे सुस्कारे टाकतो.
एकदा तर दिनकरने हद्द केली होती। ते सांगताना सुचरिताचे डोळे संतापाने भरून आले होते आणि हसून हसून आमचे! म्हणजे झालं काय की, अनंतचं, दिनकरच्या दोन नंबरच्या मुलाचं टॉन्सिल्सचे ऒपरेशन होतं। त्याच्याजवळ बसायला लागेल म्हणून दिनकरने नेहमीपेक्षा जास्तीची दोन तीन वर्तमानपत्र, इंडिया टुडे, सुचरितासाठी " माहेर'' अनंतासाठी चांदोबा वगैरे सगळी जय्यत तयारी केली होती। सकाळी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अनंताने चांदोबा वाचून टाकला आणि त्याची चुळबुळ सुरू झाली। तो आणखी अस्वस्थ होऊ नये म्हणून दिनकरने त्याला इंडिया टुडे चित्रं बघायला दिला। तेवढ्यात नर्स बोलवायला आली, ऑपरेशन थिएटर तयार आहे आणि चला म्हणून, भराभरा सगळं सामान भरून लगबगीने सगळे तिकडे धावले। ओपरेशन व्यवस्थित पार पडलं। बायको डबा आणायला घरी जाणार होती अनंता भानावर आल्यानंतर । दिनकर अनंताजवळ थांबणार होता। तसे दिनकरचे पेपर्स वाचून झाले होते, पण बायको येइपर्यंत त्याला इंडिया टुडेचा आधार होता। सुचरिताने बघितलं की अनंत हालचाल करतोय, आता जायला काही हरकत नाही तोच तिला दिनकरचं खेकसणं कानावर आलं। आता इथे ठेवला होता, एक वस्तू जागेवर सापडेल तर शपथ। सुचरिता, आधी इंडिया टुडे शोधून दे आणि मग जा।'' सुचरिता आधीच घाईत। ऑपरेशनच्या काळजीने तिने धड स्वयंपाकही केलेला नव्हता। आता चटकन निदान डाळतांदळाची खिचडी टाकून यावं म्हणून ती भरकन निघाली होती तर याचं गुरगुरणं।असेल हो इथेच। नीट बघा असं तिने बराच संयम करून सांगितलं आणि त्याच वेळी दिनकरला आठवलं की इंडिया टुडे अनंताला चित्र बघायला दिला होता। दुस-या क्षणी तो कॉटकडे झेपावला आणि शुद्धी - बेशुध्दीच्या सीमेवर असलेल्या अनंताला विचारू लागला, ; अनंता, बाळा तू इंडिया टुडे कुठे ठेवलास? तो... तो ते.... तुला मी चित्रं बघायला दिला होता तो....' आता अशावेळी सुचरिता जोरात किंचाळली, नर्स पळत आली तिला न जुमानता सुचरिताने पिशवी जमिनीवर पालथी केली आणि जमिनीवर पिशवीतून पडलेला इंडिया टुडे दिनकरच्या हातावर आपटून ती तरातरा चालायला लागली तर यात तिचा काय दोष?
यानंतर पुलाखालून खूप म्हणजे खूपच पाणी वाहून गेलय।मोठ्या सोनलचं लग्न झालय। अनंता आता अमेरिकेत असतो।दिनकरने इकडे यावं आणि आपलं वैभव पहावं असं त्याला फ़ार वाटतं पण दिनकर त्याला तयार नाही। कारण तिथे मराठी वर्तमानपत्रं नाहीत आणि इंटरनेटवर बातम्या वाचण्यात दिनकरला मजा वाटत नाही। शेवटी कंटाळून सुचरिता एकटीच लेकाबरोबरनिघाली। ती येईपर्यंत दिनकर सोनलकडे राहणार होता। त्याला सोडून निघताना नाही म्हटलं तरी सुचरिताचं मन भरून आलं आपण लेकाच्या आग्रहाला बळी पडून निघालो हे चुकलं की काय अस ही तिच्या मनात आलं। पाणावल्या डोळ्यांनी दिनकरचानिरोप घेताना तिचे कान आसुसले होते, दिनकरचे शब्द ऐकायला, " लवकर ये हं मी वाट पाहतो। ' आणि दिनकर तसं म्हणालाही, पण पुढच्याच वाक्याने सुचरिताला जमिनीवर आणलं, " .... आणि येताना कोणताही एक पेपर घेऊन ये तिकडचा। बघू तरी एवढा मोठा असतो म्हणतात तर काय असतं तरी काय त्याच्यात ते।''