रोज सकाळी ६.२० पर्यंत आम्ही दोघे फ़िरण्यासाठी घराबाहेर पडतो. ठराविक मार्गानेच फिरायला जातो. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खोदकामामुळे रस्ता बदलावा लागला तरच दुसरा रस्ता पकडतो. अन्यथा आखीव रेखीव कॉलनीतून बाहेर पडून पुढच्या महामार्गावरच्या रहदारीवर एक डोळा ठवून चालण्याची कसरत आता आम्हाला जमू आणि आवडूही लागली आहे.
पूर्वी आमच्या कॉलनीच्या एका बाजूला सडक आणि दुस-या बाजूला शेतांचे लहान - मोठे तुकडे पसरलेले होते. आम्ही त्या शेतांमधून जाणा-या रस्त्यावरून फिरणं पसंत करत असू. आमच्याप्रमाणेच त्या रस्त्यावरून फिरण्यासाठी लोक मुद्दामहून यायचे, अगदी महामार्गाच्या पलिकडच्या कॉलनीतूनही. झाडांच्या सळसळत्या फांद्यांखालून जाताना, कधी काळ्याभोर शेतात स-या पाडलेल्या पाहताना, कधी वितभर रोपट्यांमधून खुरपणी - भांगलणी चाललेली पाहतानातर कधी एखाद्या शेतामधून उसाचे तुरे डोलताना पाहताना पन्नास पावलांपलिकडचा कर्णकटू आवाजांचा धबधबा विसरायला होतो म्हणायचे. सकाळच्या रामप्रहरी इथून जाताना त्यांच्या मनाच्या गाभ्यात एक हिरवा चाफा उमलायचा त्याचा सुगंध त्यांना दिवसभर प्रसन्न ठेवायचा.
कालान्तराने शरीराने शहरात पण मनात आपलं " गाव " जपणा-या त्या माणसाचा एकछत्री अंमल संपला आणि वावराच्या प्रत्येक तुकड्याभोवती तारेचं कुंपण आलं. नव्या पिढीचं काळ्या आईत काही आतडं गुंतलं नव्हतं, त्यामुळे पटापट त्या जागांवर वेगवेगळ्या सोसायट्यांचे फलक लागले. कदाचित आमच्या सोसायटीचा जन्मही असाच झाला असावा. काळाची ती गरज होती. त्याप्रमाणे सर्व घडत होतं.
हळूहळू एकेका वावरातली काळीभोर माती सिमेंटखाली झाकली जाऊ लागली. खडी, सिमेंट यांच्या ढिगांनी, कॉंक्रीट मिक्सरच्या घरघराटाने कॉंक्रीटची घमेली एका हातातून दुस-या हातात आणि तिथून पुढे तिस-या चौथ्या, पाचव्या आणि वरवर जाणा-या पुढच्यांच्या हातात जाताना उठणा-या आरोळ्यांनी, होणा-या ओरड्याने , शांत बेटासारखं आपलं अस्तित्व टिकवून धरणारा आमचा भाग मुख्य महामार्गाशी अलगद जोडला गेला. हे होत असताना छोट्या छोट्या बंगल्यांपासून थोडं हात राखून का होईना पण तुरळक झोपड्या उभ्या राहिल्या. अनिवार्यपणे .. या झोपड्यांतले आईवडील समोरच चाललेल्या बांधकामात गुंतलेले असत, देवानं पदरी दिलेलं दान देवाच्याच भरवंशावर सोडून. रोज सकाळी फिरायला जाताना त्या कच्च्याबच्च्यातली कोणी गोधडीत गुरफटून झोपलेली दिसत तर कोणी आपल्या अम्माच्या मागे मागे लुडबुडताना दिसत.
त्या दिवशीही नेहमीची रपेट आटोपून येत असताना रस्त्याच्या कडेला, फूटपाथला टेकून एक स्कूटर दिसली. स्कूटरस्वार एक पाय फूटपाथवर आणि दुसरा रस्त्यावर टेकवून पुढे झुकला होता आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन - चार वर्षांच्या मुलीचे गालगुच्चे घेत होता. मुलीच्या डोक्याचं शिप्तर, अंगावरचा फाटका, मळकट फ्रॉक बघून ती जवळच्या झोपडीतली असणार हे कळत होतं. मुलगी बाळसेदार आणि लोभस होती. एखाद्या ब-या घरात जन्मली असती तर "सोनुली" "छकुली" "साजिरी" म्हणून मिरवली असती.
"चढ पटकन" असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच मुलगी टुणकन उडी मारून स्कूटरवर चढली आणि हँडलवर हात ठेवून उभी राहिली. "हं , दाब " असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच तिने बटन दाबलं आणि पीप, पीप चा आवाज ऐकताच खुषीने मान डोलावत हसली. दुस-या क्षणाला स्कूटरस्वाराने स्कूटरला वेग दिला. सगळा दोन मिनिटांचा मामला. एक नजर त्या जोडीकडे टाकून मी पुढे सरकले. आणि स्कूटरस्वाराचं चित्र मेंदूवर उमटल्याने दचकून थबकले. चुरगळलेले कपडे, टापसलेला चेहरा, त्यावर दाढीमिशांचं जंगल. पाऊल पुढे टाकवेना. डोळ्यापुढे भीषण चित्रं यायला लागली. आणि त्या पोरीचा निष्पाप चेहरा. काहीच न सुचून मी नव-याकडे पाहिलं. त्याचाही चेहरा गंभीर दिसत होता. अरे देवा, म्हणजे मला जे वाटतय तेच त्यालाही वाटातय की काय ? आता मात्र मला धीर धरवेना.
त्या मुलीच्या आईच्या बेपर्वा वागण्याबद्दल तिला झापावं म्हणून मी वळले तर नव-याने हाताला धरून अडवलं आणि लांबवर बोट दाखवून म्हणाला, "तो बघ आला.'' तो स्कूटरस्वार दिसताच डोक्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. सैलावलेल्या मनाने तिकडे पहात राहिले. नवराही तणावरहित आवाजात म्हणाला, "बरं झालं आला ते. मी तेवढ्यात स्कूटरचा नंबरही बघून घेतला होता.'' एवढं होईतो स्कूटर जवळ आली. मुलगी उतरली आणि त्याचवेळी झोपडीच्या बाजूने एक दीडेक वर्षाचं पोर, अंगात फक्त सदरा आणि कमरेला करदोटा अडकवलेलं, मातीच्या ढेकळातून वाट काढत हात उभारून स्कूटरकडे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो स्कूटरस्वार त्याच्याकडे पाहून हसत होता.
" हुश्श! " म्हणून चालायला लागतानाच एक विचार मनात विजेसारखा घुसला. कुठून कुठे आलो आपण. काळ्या मातीबरोबरच बापाचं वात्सल्यही सिमेंटखाली गाडलं आपण !
Monday, September 1, 2008
Subscribe to:
Posts (Atom)