अखेर शेवटी काल बोरिस जोशीच्या नावाआधी कै लागलं. ते लागणार हे गेले २ महिने दिसतच होतं. ह्ळू हळू ज्या पध्द्तीने त्याची तब्येत ढसळत होती ते पाह्ता हे घडणार हे सगळेजणच समजून होते. नाही तर त्या आधी सकाळ संध्याकाळ तो फ़िरायला जायचा. म्हणजे कोंणी ना कोणी त्याला घेऊनच जायचं त्यामुळे त्याचाही नाईलाज व्हायचा. नपेक्षा शक्य तो जागा न सोडावी हा त्याचा मानस असायचा. फ़िरायला जातानाही त्याची शान बघून घ्यावी. हा म्हणजे मागच्या जन्मी कोणी बडा सरकारी अधिकारी असल्यासारखा इकडे तिकडे ढुंकूनही बघणार नाही. आपण मारे" काय बोरुनाना, फ़िरायला चालला वाटतं " असं मोठ्या प्रेमानं विचारावं तर रावसाहेब दुसरीकडेच बघणार." मेल्या, आता घरातली माणसं बाहेर गेली की हाक मार, मग साम्गते तुला" असं चिडून म्हणावं की नाईलाजाने नजर टाकल्यासारखं करणार. पण एकंदरीत अविर्भाव उपकार केल्याचा.
बारा वर्षांपूर्वी एके दिवशी समोरच्या जोशांच्याकडे जेव्हा एक कापसाचं बंडल चार पायावर दुडदुडायला लागलं तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांनीच तिकडे धाव घेतली. विशेषत: शाळकरी निकेतने पळता पळता पुढे जाणार्या बाबांकडे जो कटाक्ष टाकला होता तो स्वच्छ वाचता येत होता, " आपण पाळू या म्हटलं तर नको म्हणतात आणि आता कशाला पळताहेत ?" त्या पिलाभोवती भोवती करताना सुरवातीला कितीदातरी शाळेची वेळ टळून जात असे. कारण निकेत , निनादला त्याला अगदी 'पोलिसी कुत्रा ' करायचं असायचं. त्यामुळे त्यांनी त्याच्या " शिक्षणाची "सगळी जबाबदारी शिरावर घेतलेली असायची.बोरुही फ़ेकलेला चेंडू आणणं जोरात पळणं या सगळ्या कसरतीत बालसुलभ उत्साहाने भाग घ्यायचा. कधी कधी तर मोहनने पळवत तळजाईवर नेलं तर चक्क पळत जायचा. [ अर्थात तळजाईवर जाईपर्यंत तो स्कूटरवर बसायचा हे उघडच आहे] कालांतराने बोरिसचं वेळापत्रक संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी शुभदावर आली आणि ती एक ओघाने येणारी गोष्ट झाली ते वेगळं. त्यामुळे त्याला शिस्त लावताना बोरिसने शुभदाचे किती फ़टके खाल्ले असतील ते बोरिसच जाणे ! पण त्या फ़टक्यांचा धाक अखेरपर्यंत होता. शेवटी शेवटी एक गावठी कुत्रं बोरिसच्या दारावरून चालालं होतं , चक्क मान वर करून. किंचित किलकिलं रहिलेल्या दारातून बोरिसनं ते बघितलं, " बूढा हुवा तो क्या हुवा, शेर कभी घास नहीं खाता " या अविर्भावत तो लंगडतच त्याच्यावर चाल करून गेला आणि ' आई ' मारणार म्हणून दारातच दबून उभा राहिला. अर्थात आजारी असल्यामुळे शिक्षा झाली नाही तो भाग वेगळा. आजी आणि दादांनी केवळ नातवंडांच्या प्रेमाखातरच त्या ' राक्षसा'ला घरात घ्यायला परवानगी दिलेली असल्यामुळे आणि बोरिस मोठा होता होता खरोखरच 'राक्षस ' दिसू लागल्यामुळे त्याला फ़िरवणे हा प्रकार त्या दोघाम्नाही शक्य नव्हता. त्यामुळे बोटीवरून सुटीला आला की मोहन, शाळा क्लास यातून वेळ मिळाला की नेहा, निनाद यांना बोरिस फ़िरवून आणायचा. इतर वेळी बोरिस आणि त्याची "आई." मग अशा वेळी मला जोर चढे, " बघा, आधी नाचतात पाळू या म्हणून आणि मग सगळी जबाबदारी पडते घरच्या बाईवर." बोरिस तसा शांत स्वभावाचा किंवा आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे की काय पण कुणाकडे फ़ारसं लक्ष द्यायचा नाही. त्याने नुसती मान वर करून भुंकणार्या कुत्र्याकडे बघितलं तरी त्या कुत्र्याची बोलती बंद होवून शेपूट पायात जात असे. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे राळ्यांचा सोनू. बोरिस फ़िरायला निघाला की सोनू भुंकून भुंकून तोंडाला फ़ेस आणत असे. पण बोरिस शांत. पण एकदा त्याच्याही अंगात दीवारमधला अमिताभ संचारला होता की काय न कळे, गळ्यातल्या पट्ट्यासकट राळ्यांच्या घरात शिरून त्याने सोनूला असा लोळवला की अखेरपर्यंत बोरीस दिसला की सोनू आज्ञाधारक दासाच्या भूमिकेत शिरायचा. योगायोग म्हणजे बोरिस जाण्याआधी एक दिवस सोनु ' गेला.'
बोरिस आमच्या दोन्ही घरात विभागला गेला होता. म्हणजे जोशी मंडळी बाहेर गेली की बोरीसचं पालकत्व आमच्याकडे असायचं. घर बंद झालं की अर्ध्या तासातच त्याच्या हाका सुरू होत. आपण जरा दुर्लक्ष केलं की बंद दाराला नखांनी खाजवून तो आपला निषेध व्यक्त करी.दार उघडलं की घराभोवती एक फ़ेरी मारली की त्याचं समाधान होई. मग परत तो आत जायला तयार ! कोणी पाहुणा आला आणि त्याला बाल्कनीत कोंडलं आणि फ़ाटक उघडून पाहुणे बाहेर पडलेले दिसले की हा दार ढकलत रहायचा आत घेण्यासाठी.लहान असताना किरकिर्या मुलासारखा बराच वेळ त्याचं भुंकणं चालायचं. मोठा झाल्यावर संध्याकाळच्या सिरियल्स लागल्या की याला ' नरडं ' साफ़ करायची हुक्की येत असे. त्यासाठी त्याने आम्हा सगळ्यांच्या शिव्या खाल्लेल्या होत्या. अपवाद मणजे निनाद आणि विलास. ही दोन माणसं त्याने काहीही केलं तरी यशोदेनं कान्ह्याच्या बाललीलांकडे बघावं तशी बघायची.
हळू हळू आजींच्या राक्षसाचं " बोरु " त कधी रुपांतर झालं ते त्यांनाही कळलं नाही. इतकं की दादू, बबी सारखं हे नातवंडही आजींकडून गुपचुप लाड करून घ्यायला लागलं.आणि आम्हाला तर कितीजणांनी "आपल्या शत्रूपक्षा"त टाकलं असणार.
वय झालं की माणसांसारखीच कुत्र्यांनाही दुखणी होतात हे नवच ज्ञान आम्हाला झालं. शेपटाला झालेली जखम इतकी प्राणघातक असेल असा संशयही येऊ नये इतक्या पटकन बोरुनानांची तब्येत ढासळत गेली. तसंही आपल्या हिशेबाने त्यांचं वय ७५ झालच होतं. आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको असं म्हटल्यासारखं त्याने आपला मुक्काम बेसमेंटमध्ये हलवला. अगदीच आठवण झाली की तो वर घरात जाई.पण अखेर अर्ध्या अंगातली शक्ती पूर्णपणे गेल्याने त्याला एक पायरीही चढवेना. आपली अखेर कळल्यासारखा तो शेवटच्या दिवसाची वाट पहात पडून राहू लागला.त्याच्या यातना न बघवून त्याला अखेर इच्छामरण दिलं .
आज तो मते फ़ार्ममधल्या जोशांच्या बागेत चिरविश्रांती घेतोय. या जगात कुठलीच गोष्ट विनाश पावत नाही; ती संपूर्णपणे नाहीशी होत नाही. त्याला पुरलेल्या ठिकाणी त्याची आठवण म्हणून लावलेलं झाड वर्षभरात वाढेल. त्याच्या पानांचं हिरवेपण , फ़ुलांचा सुगंध जीवनाचं गाणं गात राहतील. त्या झाडाच्या पारावर बसून गप्पा मारताना मध्येच बोरुची आठवण निघेल. त्याच्या खोड्यांना हसताना प्रत्येकाच्या मनात त्याच्या वेगवेगळ्या आठवणी जाग्या होतील, पण त्या सगळ्या आनंदगान गाणार्या असतील, नक्कीच !
Wednesday, September 5, 2007
Subscribe to:
Posts (Atom)