Sunday, March 8, 2020

महिला  दिन 
फार दिवसापासून लिखाण बंदच होतं ,आज महिला दिनाचं औचित्य साधून मनीचं गूज सांगावसं वाटलं  म्हणून हा प्रपंच.
सकाळी नेहमीप्रमाणे साडे पाचला जाग आली  . ही एक गम्मत असते, आपण मारे उद्या  सुटी म्हणून मस्त ताणून द्यावी असा विचार रात्री झोपताना करावा आणि सकाळी नेहमीपेक्षा जरा लवकरच  जाग यावी. साधा विचार आहे ना, ज्येष्ठ नागरिकांना सगळे वार सारखेच . मानलं तर सगळेच सोमवार नाहीतर सगळेच रविवार .
तर एक वेगळाच उत्साह घेऊन उठले, हळू पावलांनी सगळं आवरून घराबाहेर पडले. सगळं घर झोपेत. रविवार असल्यामुळे रस्तेही ओस. कारण सहा दिवस व्यायाम केल्यावर एक दिवसाची विश्रांती मस्ट असते. खरं तर शास्त्र असतं ते. रस्तां मोकळा असल्यामुळे मन आणखीच प्रसन्न झालं . थोरांनी जरी सांगितलं असलं की धोपट मार्गा सोडू नको तरी   वाटलं आज जरा वेगळी वाट  धरावी .नव्या वाटेने बाजूचे फुलांचे ताटवे बघत किती लांब चालले जाणवलंच नाही. पण परतताना मन प्रफुल्लीत झालं होतं खरं. नेहमीच्या वाटेवर नेहमीची माणसं दिसायला लागली आणि डाव्या बाजूने जोरात आवाज आला, " महिला दिनाच्या शुभेच्छा  " लगेच आग्रहही सुरु झाला, " चल ना ग आमच्याबरोबर पंचमीमध्ये . आज महिला दिनाच्या सेलीब्रेशनला . त्यांना नकार देऊन मी घराकडे वळले. सकाळच्या त्या अनोळखी वाटेनेच माझं आजच्या दिवसाचं सेलिब्रेशन सुरु झालं नव्हतं का ?
थोड्या वेळाने मैत्रिणीचा फोन. " काय , आज काय खास बेत ?" मी म्हटलं , " का बरं /" तर म्हणाली  कौ तुकाने की  तिच्या नवर् याने  जिलेबी आणली आहे महिला दिनानिमित्त . हसण्याशिवाय दुसरं काय करू शकत होते मी ?म्हटलं माझा झाला ग स्वयंपाक. लक्षातच आलं नाही बघ. अर्थात पुढे मला मी कशी वेंधळी  आणि या दिवसाचं  महत्त्व मला कसं समाजात नाही हे सांगण्यात तिचा बराच वेळ गेला आणि त्यामुळे संध्याकाळी कोणत्याशा क्लबतर्फे आमच्या नेहमी भेटायच्या  बागेत आज असलेल्या कार्यक्रमाला मी येणं कसं जरुरीचं आहे हे मला मान्य करावंच लागलं
संध्याकाळी बाग वेगवेगळ्या उंची साड्यांनी अगदी फुलून गेली होती. एक विशेष समारंभ असल्याच्या अभिमानाने  समस्त  महिलांचे  चेहरे .उजळून निघाले होते. आजूबाजूच्या वस्तीतील महिलाही जागा अडवून होत्या. कारण समारंभात कापडी पर्स फुकट वाटली जाणार होती.म्हणजे तसं फळ्यावर लिहिलंच होतं. एका बाजूला जरा वेळ थांबून आम्ही आमच्या नेहमीच्या वेळी घरी परतलो. जेवताना या समारंभाच्या वरील चर्चेने जरा रंगात आली खरी.
महिला दिन म्हटलं तरी जेवाल्यानंतरची  शतपावली चुकवून चालणार नव्हतं. रात्रीचे पावणे दहा वाजले होते. आताही रस्ता मोकळा होता. घराघरातून टी व्हीचे आवाज रस्त्यावर येत होते. रस्त्याच्या कडेला एक मुलगी जोर लावून रिक्षा कडेला लावत होती. डोकं मळकट ओढणीने झाकलं होतं. चेहरा घामाने धुळीने मळला  होता. रिक्षा लावून ती ताठ उभी राहिली. समोर मला पाहून  ओळखीचं हसू तिच्या चेह-यावर उमटलं.  कालच तिची ओळख झाली होती. बाजूच्या वस्तीत ती रहात होती. छत्तीस वर्षाची ती मुलगी सोळा आणि अठरा वर्षांच्या मुलांची आई होती. नवरा मुलं लहान असतानाच वारला होता. आपल्या आईकडे राहून ती मुलांना घडवत होती आणि मुलंही आईच्या कष्टाची बूज राखून नीट शिकत होती.मी पुढे जाऊन तिचा हात हात हातात घेतला " महिला दिनाच्या शुभेच्छ्या " तिनेही माझा हात दाबला पण मला शुभेच्छ्या देण्याऐवजीती नुसतीच  वळली.  तिचे डोळे मात्र पाण्याने भरले  होते. ती डोळे पुसतेय हे मला कळलय हे त्या स्वाभिमानी मुलीला कळू नये म्हणून मीही पटकन पाठ फिरवून चालायला सुरवात केली.   
.

No comments: